The lust or love in Marathi Anything by Vaishu Mahajan books and stories PDF | प्रेम कि वासना

Featured Books
Categories
Share

प्रेम कि वासना

सुर्य लगबगीने अस्ताला चालला होता. दिवसभर स्वतःसह अवघ्या सृष्टीला पोळल्यानंतर डोंगरापलिकडच्या आपल्या शीतल महालात कधी एकदा पोचतोय याची त्याला अतिशय घाई झाली होती. सारी सजीवसृष्टि आपापले दिनक्रम मालवण्यामागे गुंग होऊन आपापल्या घरट्यांकडे परतू लागली होती. अंधाराने हळुहळु आपले बस्तान आसमंतावर पसरवण्यास सुरूवात केली होती. पण आपल्या प्रियाला याचं काहीच सोयर सुतक नव्हतं. ती आपल्याच तंद्रीत किना-याकडे चालत येत होती. तिच्या उद्वीग्न मनात असंख्य प्रश्नांची वावटळं थैमान घालीत होती. समोरच्या शांत सागराचा तिच्या मनातल्या भावनांशी कधी संगम झाला तीचं तिलाच कळलं नाही अन् ती तिच्या परमसखीच्या म्हणजेच शितल वालूकेच्या कुशीत विसावली. तिच्याच भाषेत, म्हणजे नाजूक बोटांनी तिच्या मुलायम पाटीवर आपलं सारं मनोगत गिरवू लागली.

प्रणवचं हल्लीचं वागणं प्रियाला आताशा खूप खटकायला लागलं होतं तसं खूप अस्वस्थ ही करायला लागलं होतं. प्रणव हा प्रिया चा प्रियकर. गेल्या एक वर्षापासून त्या दोघांचे प्रेमसंबंध दिसामाजी बहरत चालले होते. प्रिया ही एका जीम ची इंस्ट्रक्टर ही होती आणि मालकीण सुद्धा. फिटनेस एक्स्पर्ट असलेली प्रिया जेवढी दिसायला अतिशय सुंदर, आकर्षक, गोरीपान, तेवढीच सुदृढ बांध्याची ही होती. योग्य आहारपद्धती व सुयोग्य व्यायाम यांचा संगम घडवत खूप मेहनत घेतली होती तिने त्यासाठी. निसर्गातल्या चित्रकाराने सुंदरतेच्या सा-या रंगांची तिच्यावर वारेमाप उधळण केली होती असं म्हंटले तर ते अजिबात वावगं ठरणार नाही. ती रस्त्याने जायला लागली की सा-यांच्या नजरा तिच्यावरच खिळलेल्या असत. तिच्याशी सलगी करण्यासाठी, बरेच जण तिच्या जीमचे आजीवन सभासद झाले होते. मेकपची फार रेलचेल नसलेलं जातीवंत आरसपानी सौंदर्य होतं ते, पण त्याचा तिने कधी गर्व केला नाही. अनं प्रणव एका एम्.एन्.सी मध्ये एक्झेक्युटिव्ह ऑफीसर पदावर कार्यरत असलेला देखणा तरणाबांड युवक. पिळदार शरिरयष्टीचं वेड असलेला, राकट बांध्याचा प्रणव स्वभावाने मात्र अगदी विरूध्द म्हणजे एकदम, शांत खूप मनमिळावू असा होता. आपल्या मितभाषी गोडबोल्या स्वभावामुळे सगळ्यांना लवकर आपलसं करण्याची अवघड कला प्रणवने अगदी लिलया आत्मसात केलेली होती. कोणालाही मदत करायला कायम तत्पर असलेला मायाळू प्रणव अल्पावधीतच सगळ्यांंच्या गळ्यातला ताईत बनला होता. प्रणव प्रियाच्या जीममधे व्यायामासाठी यायला लागला अन् त्याच्या ह्या स्वभाववैशिष्ट्यांची प्रियावर पुरती भुरळ पडली. अल्पावधीतच त्या दोघांची चांगली मैत्री जमली नसती तरच नवल.

हळुहळु प्रणवच्या मनावर प्रियाच्या आरसपानी सौंदर्याची, भोऴ्या, लाघवी स्वभावाची अन् प्रियावर प्रणवच्या आकर्षक पिळदार व्यक्तीमत्वाची, मोहक बोलण्याची मोहिनी चढू लागली. मग त्यांच्या वारंवार भेटीगाठी होऊ लागल्या. संभाषण वाढवण्यासाठी, सतत एकमेकांच्या सोबत रहाण्यासाठी दोघे त्यांच्या ही नकळत निमीत्त शोधू लागले. हळुहळु प्रेमाचे मोगरे दोघांच्याही मनाच्या ताटव्यांवर खुलू लागले. अव्यक्त प्रेमाची मुकसंमती दोघांनी एकमेकांना कधीच देऊन टाकली होती. अन् आपल्या सूचक संवादांतून दोघांनी ते वेळोवेळी व्यक्त ही केलं होतं. आता फक्त हृदयांच्या देवाणघेवाणीचा अनौपचारिक सोपस्कार तेवढा बाकी होता. पण बरेच दिवस प्रणवच्या प्रस्तावाची वाट बघून प्रिया आता कंटाळली होती, त्याच्या प्रेमासाठी खूप आतूर झाली होती ती.




आज च्या भेटीत जर त्याने आपल्या प्रेमाची कबूली दिली नाही तर आपणच स्वतः पुढाकार घेऊन त्याला आपला आजवरच्या अव्यक्त प्रेमाचा नजराणा पेश करायचा या अधीर निर्णयाप्रत ती आली होती. पण म्हणतात ना, अगदी मनाच्या अंतरंगापासून कुणी कसलीही इच्छा व्यक्त केली की ती पूरी होतेच होते. याची प्रचिती प्रिया ला आजच्या भेटीतच आली. रम्य संध्याकाळच्या त्या गोड भेटीत प्रणव ने प्रियाचा हात हातात घेऊन आपल्या प्रेमभावनांची ओंजळ सारी रिती केली आणि अगदी फिल्मी स्टाईलने एका गुढग्यावर जमिनीवर बसून एक आरक्त गुलाबकळी देऊन तिची जन्मभरासाठी साथ मागितली. प्रिया एकदम स्तब्धच झाली, निशब्द झाली. जे घडत होतं ते सगळंच स्वप्नाळू होते, त्यामुऴे तिचा अजूनही त्यावर विश्वास बसेना. आनंदातिशयाने तिने त्याला एकदम मिठीच मारली व दोघांचे पुढचे सारे संवाद जणू मुके झाले. प्रियाच्या आनंदाला आता पारावार राहिला नव्हता, तिला जणू स्वर्ग दोन बोटे उरला होता.

प्रियाने आता तिच्या मनातील मौल्यवान आठवणींची संदूकच उघडली होती व परत एकदा तिला ते सगळं, हृदयाच्या नाजूक वेलीवर इवल्याश्या प्रेमकलीकेचं अलगद उमलणं, दिवसांगणीक वाढत्या सहवासाच्या पाकळी-पाकळीने सुगंधित होत फुलत जाणं अन् प्रेमाच्या व्यक्ततेच्या आनंदाने भारावून जाऊन त्या कळीचं अचानक प्रितफूल होणं, सारं सारं लख्ख आठवत होतं आणि तिच्या गालावरची खळी नाजूक गुलाबी हास्याने भरत होती. किना-यावरील केशरी तिन्हीसांजेचे वारे जसे रात्रीच्या झोंबणा-या वा-यांशी अलगद हितगूज करू लागले तसे तिच्या अंगावर त्या मोहमयी सहवासाचे शहारे मंद
लागले. स्वर्गसुख बहाल करणारी एकमेव आठवण, जीने तिला तिच्या स्त्रीत्वाला मिळालेल्या एका दैवी देणगीची तिच्याशी सर्वप्रथम आोळख करून दिली. तेव्हा ही त्या अमृततुल्य घटनेचा साक्षीदार तिचा लाडका समुद्रच होता व किना-याच्या कुशीतलं सुरूचं लांब पसरलेलं बेट.

मावळत्या तिन्हीसांजेची त्यांची त्या दिसाची भेट अन् ते सारे क्षण निळ्या सावळ्या आकाशात होणाऱ्या. सप्तरंगांच्या मुक्त उधळणीने सजले होते व सोबत होती परतीच्या पक्षांनी तिथेच रेंगाळत लयबद्ध चिवचिवाटाची भरवलेली मैफील. प्रणवच्या खांद्यावर आपल्या सा-या थकव्याचा भार अर्पण करून वाळूत शांतपणे पहुडलेली प्रिया अन् दुनियादारी करून दमलेला पण या भेटीने खुललेला प्रणव, दोघेही गोड गप्पांमधे मशगुल झाले होते. हळुहळु बोचरा वारा प्रियाच्या गो-या नितळ अंगाशी लगट करायला लागला होता. अलगद बांधलेल्या केसांच्या खोडकर लहरी बटा तंग स्लिव्हलेस कुर्तीने अधोरेखित केलेल्या उघड्या मानेवर अन् हातांवर उगाचच वळवळत होत्या व त्यांना बळेच कानामागे रेटताना प्रियाची तारांबळ उडत होती. प्रणव चोरट्या नजरेने ही तिची धडपड मिश्कील हासत पहात होता आणि एका क्षणी त्याची ही चोरी पकडली गेलीच. प्रियाने त्याला लाज भरल्या डोळ्यांनी विचारलच, “वेडू, असं रे काय पहात आहेस माझ्यात?” तसा उत्तराच्या बहाण्याने त्याने तिचा हात हातात घेतला, हलकेच तिला आपल्याकडे ओढली व दुस-या हाताचा विळखा तिच्या कंबरेला घातला. अचानक झालेल्या ह्या कृतीमुळे बेसावध प्रिया पुरती गांगरून गेली होती.

कसे व्यक्त व्हावे तिला कळेना. पण दुस-या क्षणी लटक्या रागाचे चेह-यावर अनार उडवत, स्वत: ला त्याच्यापासून बळेच सोडवून घेत प्रिया बनाच्या दिशेने पळाली. तिची खोडसाळ धाव तिच्या नकळत तिला एका रिकाम्या कौलारू खोपटाच्या आडोशाला घेऊन आली होती. छातीचा भाता फुलला होता तिचा धावत आल्यामुळे, कोंडलेले श्वास मोकळे होऊ पहात होते छोट्याश्या नासिकेतून व मनाच्या आकाशात अनामिक भितीच्या छोट्या छोट्या वीजा जमायला लागल्या होत्या. त्यातल्याच काही विजा लाडेलाडे सांजावलेल्या केशरी आकाशाला जाऊन बिलगल्या अन् मग काय विचारता? ते नेहमीचं बरसण्यासाठी अधीर आकाशही मग आपल्या ह्या सख्यांना सोबत घेऊन त्याच्या मनातल्या प्रेमपूराला त्याच्या लाडक्या धरतीवर रितं करू लागलं अन् प्रिया ही त्या पुरात नखशिखांत न्हाऊन निघाली. कौलारू छताच्या फटींतून पडणा-या थंड पाण्याच्या आोघळाचे मोती एव्हाना प्रियाच्या गो-यापान ओलेत्या पाठीवर चमकू लागले होते. इकडे कस्तुरीमृगाच्या कस्तुरीचा वेडा, तिचा सुगंध आल्यावर जसा त्या दिशेने धावत सुटतो तसा प्रणव प्रियाकडे खेचला जात होता. निथळत्या पाऊसधारांपासून वाचण्याचे निष्फळ प्रयत्न प्रिया करत असतानाच गरम श्वासांचे मोरपिस तिच्या पाठीवर अलगद फिरायला लागलं अन् त्यांच्या सोबतीला होता गरम ओठांचा मोती टिपणारा स्पर्श. ह्या प्रेमळ आक्रमणाला अगदीच अनभिज्ञ प्रिया गरकन् मागे वळली अन् काही बोलणार तोच तशी हलकीशी संधी ही न देता प्रणवने तिला आवेगाने मिठीच मारली. शरिराच्या अंगास जागवणारी ही गुंंतलेली मिठी पुढील अनेक आव्हानांना आमंत्रण देत होती हे जितकं खरं होतं, तितकच आधीच्या अनामिक भिती ची जागा आता सुखद हवीहवीशी जाणिव घेत होती. का माहित नाही, पण त्या आतुर मिठीच्या वलयातुन सुटूच नये असं तिला वाटायला लागलं.

मग हेच वलय वावटळ बनून हळुहळु त्या दोघांभवती फिरू लागले, पण निशब्द स्थितीत, भावनांच्या आवेगाला सोबत घेत. प्रणव ने मग प्रियाचा लाजेने लालबुंद झालेला चेहरा हातात घेतला अन् त्यावर तो चुंबनरूपी गुलाबांची हलकेच बरसात करत राहिला. ओठांवरच्या गुलकंदाचा गोडवा मग कणाकणाने तिच्या सर्वांगावर पसरत गेला व सुखद रेशमी स्पर्शाच्या अनुभूतींची मनोवेधक रांगोळी दोघांच्या तनामनावर चितारत गेला. एरव्ही जनमानसाला भुलवणारा अन् त्यांच्या ह्या सहवासाचे निमीत्त बनलेला हा निसर्गच आता दोघांसाठी दुर्लक्षीला गेला होता. लाजेचे पडदे दुर-दुर होत होते व मिलनाच्या अमृतकुंभात दोघे ही मनसोक्त विहारत होते. क्षणाक्षणाने एकमेकांच्या सर्वस्वाला सारासार विचारांची, विवेकाची कसली ही तमा न बाऴगता एकमेकांत विरघळवत होते. जसे दिवसभर मनसोक्त बागडलेले वारे सागराला शांत करत त्याच्या कुशीत पहुडले होते तसाच इकडे काही क्षणापूर्वी जागा झालेला निद्रीस्त ज्वालामुखी काही काळासाठी सुप्त होऊन धरतीच्या कुशीत विसावला होता.

त्या सुखद सहवासातल्या रत्नपेटीतून सा-या रम्य आठवणींची नवरत्ने एक एक करून स्वत:च्या मनावर मढवताना प्रिया हरखून जात होती. ज्या स्वर्गसुखाच्या सागरात डुंबण्यात ते दोघे रममाण झाले होते त्याच शरीरसुखाची नशा दिवसेंदिवस त्यांच्या सहवासाचा आता अविर्भाज्य घटक बनू लागली होती. त्यांच्या पुढील प्रत्येक भेटींना कुठेतरी कारणीभूत त्या मनमोहक, समागमाला व्यापून रहाणा-या कस्तुरीचा आकर्षित करणारा सुगंधच होता, ज्याची त्यांना भुलवणारी मोहिनी थक्क करणारी होती. दिवस असो रात्र असो, हे दोघे आपले त्याच मधुस्वप्नांच्या गगनभेदी हिंदोळ्यांवर अविरत झुलत असायचे. सुरूवातीला नव्याची नवलाई सरत्या दिवसांना मोहरू लागली होती. तिला ती फोनवरील, मेसेजेस् मधील, भेटींमधील सुरूवातीची संभाषणे आठवू लागली, जेव्हा दोघांच्या मैत्रीने प्रेमाचं सुंदर रूपडं ल्यायलं होतं. किती कळकळ, किती काळजी, किती ओढ, किती भावनिक प्रेम ओथंबून वहायचं त्या बोलण्यातून, चौकशीतून. जणू त्याने “गुड माॅर्निंग डिअर” म्हंटल्यावरच सुर्याला डोंगरांच्या रजईतून बाहेर पडून आकाशात तळपायला परवानगी होती आणि जगातली प्रत्येक रात्र त्याच्या घट्ट मिठीच्या दुलईत बिलगूनच सरावी, जेव्हा तो “गुड नाईट जान” म्हणायचा. “पिल्लू नाश्ता केलास की नाही? सोना, वेळेवर जेवायचा मुहूर्त काढून आणू का?” ही अशी प्रेमळ दटावणी तिच्या मनाला खूप सुखावून जायची व त्या गोडव्याने दोन घास ज्यास्तच पोटात जायचे तिच्या.

प्रणव ला आता कामाच्या वाढत्या व्यापामुळे रोज जीमला यायला जमायचं नाही, तिला रोज बघता भेटता यायचं नाही, तर त्याची नाराजी, हुरहूर, बेचैनी त्याच्या प्रत्येक वागण्याबोलण्यातून जाणवायची. “तू कहे अगर, तो इन बादलोंके पंख लगाकर उडा चला आऊ तेरी कोमल बाहोंमे” किंवा “तुझ्या डोळ्यांतील वाहणा-या आसवांना सांग, आता निघून जा कायमचे ही जागा सोडूून, मी जिवंत असेपर्यंत तुम्हाला इथे थारा नाही” असे फिल्मी संवाद जेव्हा तो फोनवर बोलायचा तेव्हा प्रियाच्या गालावरच्या अश्रूंना पळवून लावत त्यांची जागा गोड लाज-या हास्याने घेतलेली असायची. तिला स्वतः चा च खूप हेवा अन् अभिमान ही वाटायचा की प्रणव सारखा अतोनात प्रेम करणारा, तिच्यावर जीव ओतून देणारा जिवनसाथी तिला लाभला होता.

पण जसजसा सहवास वाढत गेला तसतसं काही गोष्टींची प्रियाला नव्याने जाणीव होऊ लागली होती. साखरझोपेत असताना कुणीतरी जबरदस्तीने उठवून डोळ्यांमधे झणझणीत अंजन कोंबावं तसं त्याच मधुस्वप्ने भरलेल्या डोळ्यांसमोरचा तरल फसवा पडदा बाजूला सारणारी बोचरी जाणीव, डोळे उघडायला लावणारी दुसरी बाजू तिला दिसायला, जाणवायला लागली. काही वेगळया शंकाकुशंका मनामध्ये बस्तान टाकू लागल्या आणि जेव्हा त्या घडणा-या गोष्टींमध्ये सातत्य यायला लागलं तेव्हा त्या शंकाकुशंकांचा सुरवंट कोशाची कात टाकून पक्क्या विचारांची स्वैर वाळवी बनून तिच्या मनाला व्यापून टाकू लागला. ज्या दिवशी ते दोघे मनाबरोबरच शरिराने एकरूप झाले त्या एकरूपतेेने दुर्दैवाने काही चुकीच्या भावनांना देखील जन्म दिला, याची प्रचिती तिला थोड्याच दिवसांत यायला लागली होती.

ब-याच दिवसांच्या विरहानंतर होणारी प्रत्येक भेट आता फक्त शरिरसुखाची भोक्ती होऊ लागली होती. प्रियाला भेटण्यासाठी च्या ओढीत सुद्धा मानसिक प्रेमाचा गोडवा कमी व शरीररसपानचा चढलेला नशा च अधिक असायचा. प्रियाच्या व प्रणवच्या संभाषणातील वारंवार ओसंडणा-या अलवार भावनिक प्रेमाची, कणवेची जागा आता केवळ शारिरीक विरहाच्या संवादांनी, आरक्त फोटोज् व अश्लिल विडीयो क्लिप्स च्या मागण्यांनी घेतली होती. “तुझे लाल गुलाबी मऊसर ओठ किती रसाळ आहेत गं ? जणू मधूरसाचा उतू जाणारा प्यालाच. सतत ओठांला लावून सुधारसपान करत रहावे असे वाटते. प्राणप्रिये, जेव्हा कधी तू साडी नेसतेस ना आहाहा….जणू साक्षात स्वर्गलोकीची, सर्वांगावर सौंदर्याच्या खाणी मढवलेली मेनकाच भासतेस गं. तिथल्या रंभा अप्सरा सुध्दा जळून कुरूप होतील तुझ्या तेजाने. मला सतत त्यातल्या अद्वितीय सौंदर्याच्या खजिन्याला आंतरीक समाधान होईपर्यंत मनसोक्त लुटत रहावेसे वाटते, पण तरीही त्या कधी रित्याच होत नाहीत. मी मात्र समाधानी होऊन सुद्धा जन्मोंजन्मीचा उपाशी असल्यासारखा सतत परत परत तुझ्या दरवाज्याशी येत रहातो आणि तुझी मेहेरबानी कधी होईल व तू मला उराशी कधी कवटाळशील याची आशाळभूत पतंगांप्रमाणे वाट बघत बसतो”. या आणि अशा त्याच्या लोभस बोलण्याने सुरूवातीला प्रिया खूप हरखून जायची आणि त्यातूनच मग तिचा ह्या फक्त वासनामय भेटींना मूक होकार मिऴत गेला अन् कालांतराने मग फक्त हे प्रेमाचे नाते टिकवण्यासाठी म्हणा किंवा नात्यातली तडजोड म्हणा, पण तिच्या मनाविरूद्ध, तिची त्यांच्या ह्या फक्त वासनीक भेटींना संमती मिळत गेली.

आणि भेटी तरी कसल्या? ना गोड हितगूज, ना प्रियाची आस्थेने विचारपूस, ना तिला काय हवं काय नको, तिची इच्छा तिच्या आवडी, तिच्या अपेक्षा हे सगळ जाणून घेण्यात रस. भेटल्या क्षणापासून फक्त आणि फक्त निशब्द शारिरिक जवळीक व भेटीचा शेवट म्हणजे साठलेल्या वासनेच्या कुंभाला भावनाविरहीत निर्जीव पलंगावर रितं करणं बास्स. जणू काही आता हा गोड हवाहवासा सहवास फक्त वासनेचा बाजार होऊन बसला होता जिथे प्रियाचं अबोल झालेलं सौंदर्य विनातक्रार लुटलं जात होतं प्रेमाच्या दोन शब्दांच्या बोलीवर. प्रणवचे क्षणाक्षणाला येणारे, भावनिक प्रेमाने ओथंबलेले, काळजी व्यक्त करणारे संवाद, मेसेजेस् काळाच्या ओघात कुठेतरी लोप पावत गेले व त्यांची जागा फक्त शारिरीक सुखाची ओढ लावणा-या भेटीच्या विचारणांनी घेतली. प्रियाला त्याच्या या रोजच्या त्याच त्या भावविरहीत अन् फक्त शरिरसुखाला चटावलेल्या संभाषणांचा, भेटींचा कंटाळा यायला लागला होता. तिने ह्या बाबतीत ब-याच वेळा बोलण्यातून नाराजी व्यक्त केली होती.

“काय रे प्रणव? असा कसा रे तू बदलत चालला आहेस दिवसांगणीक. कधी वेळ काढून केलेला प्रेमभाव ओसंडून वाहणारा फोन नाही, ना कधी अास्थेने, काळजीने केलेला मेसेज नाही आणि कधी केला तरी फक्त रंगील्या समागमाच्या भेटीसाठीचा निरोप”.

प्रणव मूडमधे असला ही हे सगळं हसण्यावारी नेऊन व्यस्ततेचे कारण पुढे करायचा.

नाहीतर “हा तुझा निव्वळ गैरसमज आहे” असं बोलून ह्या संवादांवर पडदा टाकायचा. पण कधी कधी फक्त अबोला, रूसवा, चिडचीड, भांंडण हेच पदरी पडायच, जे अतिशय क्लेशदायक होतं कारण या सगळ्याचा प्रणववर काहीच उपयोग व्हायचा नाही पण व्यर्थ मनस्ताप, नैराश्य प्रियाच्या नशिबी यायचं अन् प्रिया एकटीच, स्वतः शीच भांडत, कुढत, कोसळत रहायची.

तिन्ही सांज जशी हळुहळु पुढे सरकत होती तसा प्रियाच्या भुतकालातल्या आठवणींचा रथ देखील. कालचक्राच्या सारिपाटावरचे फासे जसे एक एक दिवस एक एक घर मागे टाकत होते तसा प्रणवच्या मनातला प्रेमाचा उत्फूर्त निर्झर आटत चालला आहे व त्या ठिकाणी भडक रंगातले अय्याशी पलंगच चहूकडे व्यापले आहेत की काय असं प्रियाला वाटत होतं. प्रिया तुटत होती दिवसांगणीक. अस्वस्थ होऊन नैराश्याच्या गर्तेत खोल खोल बुडत जात होती. तिला हा भावनीक दुरावा खायला उठत होता. तिऴ तिऴ पोखरत होता तिच्या अंतरंगाला. अशातच एक दिवस स्वत:च्याच विचारांच्या मायाजाऴात गर्क असताना प्रणवचा दोन शब्दांचा मेसेज आला “संध्याकाळी घरी ये”. या इतक्या दिवसांच्या दुराव्यानंतर त्याची भेट होणार म्हणून तिच्या विचारांचे ढग साचलेल्या चेह-यावर आनंदाची पुसटशी रेघ उमटली…पण क्षणभरच. त्या रेषेला लहान करायला जुन्या त्याच त्या नकोश्या आठवणींच्या असंख्य रेषांची स्पर्धा सुरू झाली. परत त्याच निशब्द, भावनाहीन अय्याशीला तोंड द्यावं लागणार या विचाराने तिची भेटीची ओढ नैराश्याच्या काळोखात विरत गेली.

प्रणव इश्काच्या शामियान्यात प्रियाची वाटच बघत होता. ती येताच जसा चातक पक्षी पावसाच्या पहिल्या सरीच्या पहिल्या थेंबाला चोचीत झेलायला अधीर होतो तसं प्रणवने तिला आपल्या बाहुपाशांत घेतलं अन् तिच्या सौंदर्यावरील मधुथेंबांना आपल्या आतूर स्पर्शाने टिपून घेऊ लागला, त्यातच तनामनाने रममाण होऊ लागला. आता मात्र प्रियाच्या संयमाची मनाशी असलेली तार तुटली. तिच्या डोऴ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिने हलकेच त्याला तिच्यापासून दूर केले. ह्या तिच्या कृतीने प्रणव वैतागून भानावर आला. आपल्या ह्या अत्यानंद लुटण्याच्या प्रक्रियेत खंड पडला हे त्याला सहन झाले नाही. पण मोठ्या हुशारीने ते भाव चेह-यावर आणू न देता, स्वतः ला बऴेच सावरत त्याने तिचा चेहरा हातात घेतला, कपाऴाचे हलके चुंबन घेतले, तिच्या अश्रूंना ओठांनी पुसलॆ अन् तिला विचारले,
सोना, काय झालं तुला? का रडत आहेस अशी मी जवळ असताना?, तुला काही त्रास होतोय का? “. ह्या अशा प्रेमळ विचारण्याने प्रिया अचंबित झाली. तरी स्वत:ला सावरत, इतके दिवस साठवलेल्या भावनांचा पेटारा तिने त्याच्या कुशीत रिता केला .

“प्रणव, तू खूप बदलला आहेस हल्ली. माझा सुरूवातीचा प्रणव हरवला आहे रे कुठेतरी या मोहमयी जगात, त्याला प्लिज शोधून आण ना!! खूप खूप प्रेम करते रे मी तुझ्यावर, अगदी स्वतः पेक्षाही जास्त. पण या वासनेला आपल्या निर्मळ प्रेमाच्या वरचढ करू नकोस रे!! सुखी संसाराची किती सुंदर स्वप्ने बघितली आहेत मी. कधी करायचं आपण लग्न? मी त्या दिवसाची किती आतुरतेने वाट पहातेय, काय सांगू तुला? तू तुझ्या नावाचं मंगऴसुत्र जेव्हा माझ्या गऴ्यात घालशील तो क्षण माझ्या जिवनातला सुवर्णक्षण असेल. तो हिरवा चुडा, ते कपाऴावरील कुंकू हाच माझा खरा साजश्रूंगार असेल. अन् आपण दोघे व आपली मुले हेच फक्त माझं जग असेल. पण या गोड सहजिवनात प्रवेश करताना त्याचा उंबरठा असा फक्त वासनेने बरटलेेेला नकोय रे मला. तुझ्या ह्या जीव ओतून प्रेम करण्यासोबतच समाधानदेय शारिरीक सुखाला ही सहजिवनात तितकच महत्व असतं हे मानण्याएवढी समजूतदार मी नक्कीच आहे रे. मलाही हे सुख नकोय अशातला भाग नव्हे. आपल्यातल्या निसर्गानेच बहाल केलेल्या ह्या मौलीक नजराण्याला कधीतरी तू ही लुटावंस व मी ही तुलाा ते लुटून द्यावं असं मला पण वाटतच, पण त्या ही पेक्षा मी भावनीक प्रेमाची खूप भुकेली आहे. तू सतत माझ्याशी बोलावस, मला काय हवं नको ते विचारावंस, माझी काऴजी घ्यावीस, माझ्या तब्येतीतल्या उतारचढावांची सतत विचारपूस करावीस, माझी सतत वाट पहावीस, मला तर तुझी खूप गरज आहे पण तशीच किंबहूना त्या ही पेक्षा अधीक गरज तुला माझी आहे हे तू मला क्षणोक्षणी दाखवून द्यावंस, अलगद स्पर्शांने गोंजारून वासनाविरहीत कुशीत घ्यावंस अन् तुझ्या ह्या एका मिठीवर मी माझं सर्वस्व ओवाऴून टाकावं असंच मला सारखं वाटतं रे.”



प्रियाला डोळ्यांतल्या अश्रूंचा सहारा घेवून अजून ही बरच काही बोलायचं होतं. पण प्रणवने तिला तशी संधीच दिली नाही. आपला हात तिच्या ओठांवर ठेवून त्यांना कुलूप घातले. तिला बिलगून लडीवाऴे म्हणाला, “माझं पिल्लू खरोखरच वेडं आहे. माझ्या प्रेमात किती ओव्हर-पझेसीव्ह झालं आहे ते. पण त्यामुळेच खरं तर किती असुरक्षित वाटून घेत आहेस राणी तू स्वत:ला. आणि सर्वप्रथम मनातला हा गैरसमज पुर्णपणे काढून टाक की मी केवऴ शारिरीक सुखासाठी चटावलेलो आहे किंवा तुझा केवळ एखाद्या भोगवस्तूसारखा वापर करतो आहे. त्या शिवाय मला दुसरं काहीच सुचत नाही, मला सतत तेच दिसत असतंं, तेच हवं असतं. मी वासनांध पशू झालो आहे, तुझ्या तनामनाला कायम ओऱबाडतच असतो. राजा, खरच तसं अजीबातच नाहीये. फक्त कामाच्या वाढत्या व्यापामुऴे व त्या सोबत येणा-या वाढीव जबाबदा-यांमुऴे व टेंन्शंनस् मुऴे मी मानसिकदृष्ट्या पण व्यस्त व त्रासलेला असतो. त्यातच एक नवीन प्रकल्पावर काम सुरू आहे आणि माझे वरिष्ठ मला मी तो लवकर पुर्ण करावा म्हणून दबाव आणत आहेत. म्हणून मला तुला आधीसारखे प्रेमाने, काऴजीने ओथंबणारे मेसेजेस्, फोन नाही करता येत आहेत, तुझ्याशी आधीसारखं तासंतास बोलता येत नाहीये एवढच. माझे संवाद रूक्ष होत आहेत, माझी चिडचीड होत आहे. तूच सांग, मी काय करू? पण म्हणून माझ्या तुझ्यावरील प्रेमात काडीचाही फरक पडलेला नाही. माझं ही तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे अगदी सुरूवातीला होतं ना तसंच आणि मला ही तू हवी आहेस.

लवकरात लवकर लग्न करून तुला माझी सहचारिणी, माझी गृहलक्ष्मी झालेली पहायचंय. हा नवीन प्रोजेक्ट पूर्ण व्हायच्या बेतात आहे. तो पूर्ण झाला रे झाला की मग मी तुझं काही एक ऐकणार नाही अन् दुस-याच दिवशी तुला लग्न करून घरी घेवून येणार. आपण दोघं राजा राणी मग प्रेमाने सुखाचा संसार करू. आता खूश माझ्या सोन्या?” असं म्हणत प्रणवने तिला आपल्या छातीशी कवटाऴले व तिच्या केसांवर हात फिरवत बराच वेऴ थोपटत राहला..

प्रणवच्या शब्दांशब्दांत समोरच्याला आपली बाजू झटकन पटवून द्यायचं सामर्थ्य होत व प्रभूत्व ही. आपली साधी भोऴी मिरा या वाक्चातुर्याला भुलली नसती तरच नवल. तिच्या मनातल्या विचारांच्या धुमसणा-या आगीवर प्रणवने आपल्या प्रेमऴ जादूमय शब्दांच्या थंड पाण्याची पाखड करून तिला काही मिनीटातच शमवलं होतं. प्रणवच्या या मायाजालात परत एकदा प्रिया स्वतः च्याच नकऴत गुरफटत गेली, स्वत:ला त्याच्या स्वाधीन करून बसली. परत एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली होती. परत एकदा वासनेचा बाजार सजला होता.

सुर्य जसा क्षितीजापलीकडच्या महालात लुप्त झाला तसा तिन्हीसांजेच्या पदराआड लपलेल्या खट्याळ चांदण्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्या दुडुदुडु धावत बाहेर आल्या अन् काळ्याशार जमिनीवर निसर्गदेवतेने ठिपक्यांची सुबक रेखीव रांगोळी काढावी तशा काळ्याशार आभाळभर पसरल्या. त्यातल्या काहींना थकलेल्या लाटांना उगाचच त्रास द्यायची लहर आली व त्या लाटांवर उड्या मारत त्यांना गुदगुल्या करू लागल्या. तो लाटांवरचा नयनरम्य चमचमता गालिचा प्रियाने पाहिला अन् तिला आठवली ती त्या दिवशीची, स्वतः मधेच हरवलेली सकाळ, खिडकीच्या तावदानातून चोरून आत येणारी, तिच्या अंगाला गुदगुल्या करणारी उमलत्या उषेची किरणे व त्यांना बाजूला सारत कालच्या क्षणांच्या धुंदीला डोक्यापासून पायापर्यंत ओढून घेऊन मानसीक समाधानाच्या उबेत रमलेली प्रिया.

त्या आनंदाच्या अनुभूतीच्या धुंदीतच प्रियाने प्रणवला फोन लावला. बराच वेळ रिंग वाजत राहिली पण पलिकडून काहीही प्रतिसाद आला नाही. झोपला असेल कदाचित् किवा फोनची बॅटरी उतरली असेल, नंतर करू परत, असं म्हणून ती गप्प राहिली. तो सारा दिवस फोन, मेसेज करून त्याच्यापर्यंत पोचण्याचे प्रयत्न करण्यात गेला. पण एकाही फोन चा, मेसेजचा तिला रिप्लाय आला नाही, त्याचा फोन तिच्या संपर्कक्षेत्राच्या बाहेर गेला होता, बंद होता. सकाळी आफीसला जायला उशीर झाला असेल म्हणून, कामात व्यस्त असेल म्हणून नसेल जमलं, असं म्हणून ती स्वस्थ राहिली.

२-३ दिवस असेच निघून गेले. प्रियाला काहीच कळत नव्हतं, प्रणव कुठे गेलाय? कसा असेल तो? काहीच उत्तर का देत नाहीय ? फोन का बंद आहे? त्याचं काही बरंवाईट तर झालं नसेल ना? बापरे, ह्या विचाराने ती चरकलीच, असा वेडा विचार केला म्हणून स्वत:वरच चिडली. अगदीच न राहवून, दुस-याच क्षणी तिने प्रणवच्या आॅफीसमधे फोन लावला व तेव्हा तिला कळलं, प्रणवला प्रोजेक्ट संबंधीच्या कामासाठी दुस-या दिवशी सकाळीच अचानक दिल्लीला जावं लागलं होतं. प्रिया भलतीच हिरमुसली. आपण इथे उगाचच याच्या काळजीने झुरत आहोत अन् हा मात्र आपल्याला काहीही न कळवता खुशाल दिल्लीला निघून गेला ? मनात दाटणा-या अस्वस्थतेला तोंड फुटलं होतं. “काय हे वागणं म्हणायचं? असं कोणी वागतं का कधी? तडकाफडकी निघावं लागलं असेल कदाचित, निॆघताना नसेल जमलं कळवायला. पण वाटेतून तरी एखादा फोन, कमीत कमी एक मेसेज करून कळवता येत नाही का? ते तर सहज शक्य होतं ना? ही काय वागण्याची रीत झाली? किती हा बेजबाबदारपणा? मी इथे तडफडतेय अन् हा तिकडे खुशाल कामात गुंग? सुधारणार तरी कधी हा ? याला कधी कळणार माझी तडफड!!” प्रिया संतापाचे घण मनावर घालत होती अन् त्यातूनच शब्दांच्या लालबूंद ठिणग्या उडत होत्या. ह्याच विचारांच्या ओझ्याखाली दबलेल्या प्रियाला कशाचेही भान नव्हते. त्या भरात स्वत:शीच बडबड करत जिन्यावरून उतरताना तिचा पाय कधी सरकला आणि ती संपूर्ण जिन्यावरून गडगडत कधी खाली आली हे तिचं तिलाच कळलं नाही. काही सेकंदातच हे आक्रीत घडलं होतं. तिची शुद्ध हरपली होती व पुढील अव्यक्त भावना ओठांवरच जमा झाल्या होत्या.




डोळ्यांवरच्या ग्लानीच्या धुसर पडद्यावर तरंगती प्रणवची छबी दिसत होती प्रियाला अन् तिच्याशी ही भांडत होती ती अस्पष्ट बडबडीतून. हळुहळु ती छबी दिसेनाशी झाली अन् डोळ्यांसमोर लख्ख प्रकाश, शुभ्र दुनिया, औषधांचा वास, तिच्यातलाच एक भाग ती नर्स, जवळून काहीतरी प्रियाला विचारत होती. प्रिया एकदम घाबरली. तिला काहीतरी विचारायला म्हणून ती उठणार तोच एक तीव्र सणक तिच्या पाठीतून पायाच्या नखापर्यंत गेली. प्रिया जिवघेण्या वेदनेने किंचाळली. तेव्हा तिला कळलं, पाठीवर पडल्यामुळे तिच्या मणक्याला मोठी दुखापत झाली होती म्हणून ताबडतोब अाॅपरेशन करावं लागलं. तिला कमीत कमी २ महिने तरी संपूर्ण बेडरेस्ट घ्यायला लागणार होती. अजीबातच हलायचं नव्हतं, तात्पूरतं अपंगत्व आलं होतं तिला. निर्जीव लाकडासारखी ती बेडवर निपचीत पडून रहाणार होती, भोवतालचे सगळं विश्व त्या बेडवर स्वत:भोवती गोळा करून. महत्प्रयासाने तिने आपल्या आजूबाजूला पाहिलं. का कोण जाणे, तिला उगाचच वाटलं की प्रणव आपल्या उशाशी नाहीतर जवळ तरी आहे. पण तो कुठेच नव्हता. अपघाताने शरिरावर व प्रणवच्या अबोल्याने, यावेऴी ही त्याच्या जवळ नसण्याने, मनावर झालेल्या घावामुळे पुरती घायाळ प्रिया बेडवर निष्प्राण देहासारखी निपचीत पडली होती.

दुस-या दिवशी थोडं भानावर आल्यावर प्रियाने हट्ट करून मोबाईल मागवून घेतला अन् त्यामधे अधाश्यासारखे प्रणवचे फोन, मेसेजेस् शोधू लागली. दुर्दैवाने ना एकही फोन होता ना मेसेज. चिडून जाऊन तिने एक साधा मेसेज करून त्याला औपचारिकता केल्यासारखे स्वतः च्या अपघाताबद्धल सविस्तर कळवलं. तिची अपेक्षा होती की तेव्हा नाही तर नाही पण आत्ता तरी त्याचा ताबडतोब फोन येईलच. अर्ध्या तासाने त्याचा फोन आला ही. प्रिया ला आकाश ठेंगणं झालं होतं, त्याचा आवाज कधी ऐकतेय अन् आपली प्रेमळ कैफियत त्याच्याकडे कधी मांडतेय असं तिला झालं होतं. ती त्याच्यावर आधी खूप रुसणार होती, तक्रारींचे सूर लावणार होती अन् मग त्याच्या लाघवी शब्दाने विरघळणार होती. तिने त्याचा फोन उचलला अन् डोळ्यांतून वहाणा-या आनंदाश्रूंची चेह-यावर सारवासारव करून काही बोलणार तोच,

“हाय डिअर्, कशी आहेस आता तू? अग, दिल्ली आॅफीस ला नवीन प्रोजेक्ट संदर्भात खूप मोठा प्राॅब्लेम झाला अन् मीच त्याचा सर्वेसर्वा असल्याने मला तडकाफडकी तिकडे जावं लागलं. फोन चार्ज करायला विसरल्याने बंद पडला व तिथे गेल्या गेल्या घाण्याच्या बैलासारखं कामाला जुंपल्यामुळे तुला फोन, मेसेज, काहीच करता आलं नाही. जेवण, झोप सगळचं बिघडलेलं आहे माझं. आज इथे थोडासा टेक्निकल इशू झाल्यामुळे काम ठप्प झालं म्हणून २ मिनीटं बोलू तरी शकलो. तू इथली चिंता करू नकोस. तुझी काळजी घे. औषधे, फिजीओथेरपी, जेवण व्यवस्थित कर. मी फोन ठेवतो आता. साहेब बोलावत आहेत मला. मी लवकरच येईन परत, पण कधी ते निश्चीतपणे नाही सांगता येणार. टेक केअर. बाय”. असं म्हणून एखादा औपचारिक व्हाॅइस मेसेज पाठवल्यासारखा प्रणवने फोन बंद ही केला. प्रेमाचे, आपुलकीचे दोन शब्द ऐकण्यासाठी आसूसलेल्या उघड्या कानांना मौनाच्या झडपा लावत अन् डोळ्यांतून पडून ओठांवर रेंगाळणा-या शब्दांच्या जलाशयाला पुन्हा एकदा मनाच्या गर्तेत वाट करून देत निशब्द झालेल्या प्रियाने बळेच गच्च डोळे मिटून घेतले अन् पापण्यांपलिकडल्या विचारांच्या अंधारात ती ही विरून गेली.

कधीकाळी सतत व्यस्त असणारं प्रियाचं संपर्कक्षेत्र आताशा ओस पडलं होतं. फोन, मेसेजेस सगळं बंद झालं होतं. केवळ शरिरानेच नाही तर मनाने ही प्रणव प्रियाच्या खूप दूर निघून गेला होता. वास्तविक पहाता एवढा मोठा अपघात झालाय हे कळल्यावर प्रणवने हातातील सर्व कामे टाकून प्रियाकडे धाव घेणं, तिची आस्थेने विचारपूस करणं, पुरेपूर काऴजी घेणं, मानसिक धीर देणं, तिला सावरायला, पुन्हा खंबीरपणे उभं रहायला मदत करणं अत्यंत गरजेचं होतं. फक्त काळाचीच नव्हे तर प्रेमाची गरज होती ती. त्यांच्या प्रेमाला ही दोन्ही घरातून संमती होती च, त्यामुळे आता तो राजरोसपणे तिच्या घरी येवू शकत होता. लगेच नाही जमलं, निदान थोड्या दिवसांत तरी त्याचं येणं अपेक्षितच होतं. पण खरच प्रणवला ते महत्वाचं वाटलं नाही? कधी काळी जीममधे तिला झालेल्या छोट्याश्या दुखापतीवर, “प्राथमिक उपचारांचा” डबा तिथे नाही म्हणून तिला पट्टी लावण्यासाठी आरडाओरडा करून आकाशपाताळ एक करणारा प्रणव खरा? की एवढी तिची दुर्दशा समजून ही तिचा कळवळा न येता, निष्काऴजीने, कठोर मन करून दूर रहाणारा, हा प्रणव खरा. येणं तर लांबच राहिलं, दोन मिनीटांचा साधा फोन करून किंवा मेसेज तरी करून तिची प्रेमाने विचारपूस ही करायला जमू नये, एवढाही वेळ त्याच्याकडे नसावा ही गोष्ट जेवढी अतर्क्य, अनाकलनीय तेवढीच तिलाच काय, कुणालाही पटायला अवघड अशीच होती. खरोखरच, कामाने त्याचे हातपाय बांधले होते? की दुसरंच काहीतरी कारण होतं त्यामागे?

खरं, निर्मळ, आत्तापर्यंतचं उत्कट प्रेम काळाच्या ओघात लोप पावलं होतं की तिच्यासाठी ची मनातील जाणीव, ओढ, कळकळ हे सगळं दिसामासाने कमी कमी होत संपूष्टात आलं होतं. पर्यायाने हे सगळं विचारचक्र हऴुहऴु प्रियाला तिच्या जुन्याच पण मध्यंतरी मोडीत काढलेल्या त्याच कटू विचारांकडे परत परत ढकलत होतं. हे प्रेम आहे की खरोखरच वासनेचा बाजार आहे. ज्याला वरवर म्हणता प्रणवच्या अचानक जाण्यामुळे की प्रियाच्या अवचीत झालेल्या अपघातामुऴे बंदी आली होती. वास्तवित तिला एवढा मोठा अपघात होऊनही काळजीचे, आपूलकीचे दोन शब्द आता जिथे महाग झाले होते, तिथे वासनिक, सहवासाला उद्यूक्त करणा-या, तिच्या सौंदर्याची तारिफ करणा-या शब्दांना कुठे थारा होता ? मग विचार करता करता ह्या वागण्यातला एक एक बदल तिच्या हळुहळु लक्षात यायला लागला. याला कारण होतं तिचा अपघात, ज्याने तिला काही महिन्यांसाठी शरीरसुखास असमर्थ, अपंग करून टाकलं होतं. जणू काही काळासाठी तो पांढरा पलंग सुरकत्यांविना बेवारसच पडणार होता. त्यावर आता फुलांचा, उंची अत्तरांचा, उन्मादक शरिरांचा नाही तर घायाळ शरिराचां, गोळ्या औषधांचा उग्र दर्प येणार होता. सौंदर्याच्या खाणीतून रत्नांएेवजी आता फक्त अचेतन मासाचे गोळे हाती लागणार होते. आणि म्हणूनच प्रणवने तिच्याकडे पाठ फिरवली होती. विचारांचे खिळे बोचून मनाला रक्तबंबाळ करायला लागले तिच्या अन् तिने त्याच पलंगाच्या पांढ-या चादरीत स्वतः ला संपूर्ण लपेटून घेतलं.

खिडकीतल्या चिमण्यांच्या चिवचिवाटाने तिला जाग आली. पहाते तो काय? डोळ्यांच्या अर्धवट उघडलेल्या झडपांतून परत तीच ती प्रणवची धूसर छबी दिसत होती तिला. तिला वाटलं स्वप्नच आहे ते. तेवढ्यातच तिच्या हातावर तोच तो परिचित उबदार स्पर्श तिला जाणवला. अन् तिने झपाट्याने डोळे उघडले. तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास च बसेना. हो, प्रणवच आला होता खरोखरच तिला भेटायला. आनंदातिरेकाने तिच्या तोंडून शब्दच फुटेना, आनंदाश्रूंचे पाट मात्र त्याचं जंगी स्वागत करत होते. असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही, पण हे तिच्यासाठी जगातलं आठव आश्चर्य होतं. तिला वस्तुस्थितीचं ही भान राहिलं नाही. स्तिमित होऊन त्याला मिठी मारायला ती उठणार तेवढ्यात,

“अगं वेडू, काय करत आहेस तू, तुझं तुला कळतय का?” असं म्हणून त्याने तिला परत आडवं झोपवलं. “किती ही भेटण्यासाठी अधीरता? मी कुठे पळून जातोय का? आलोय न आता परत. खूप त्रास झाला असेल ना मी सोबत नव्हतो तर? पण आता मी तुला कधीही सोडून जाणार नाही हं! खरंच मला कामामुळे अजिबात वेऴ नाही मिळाला गं, तुला खरंच सांगतो, विश्वास ठेव गं माझ्यावर. जसं काम पूर्ण झालं, त्याच पावली बॅग भरली, पहिली गाडी पकडली अन् धावत आलो तुला भेटायला बघ. आता कध्धी सोडून जाणार नाही तूला.” असं म्हणत तिच्या कपाळाचे चुंबन घेतले अन् तिला कुशीत घेऊन बराच वेळ थोपटत राहिला.

तिथले अनुभव, तिथल्या कामाचं वरिष्ठांनी केलेलं कौतुक, याबाबत तोंडभरून सांगत राहिला पण एकदा ही, “इतके दिवस तू माझ्याशिवाय कशी राहिलीस? तुला ह्या दुखण्याने किती त्रास झाला? खूप मनस्ताप झाला असेल ना तूला? माझ्यासाठी किती झुरलीस? किती हाल करून घेतलेस जिवाचे?”, ह्यापैकी एकही प्रश्न तिला विचारला नाही. का कोण जाणे, पण ह्या वेऴेस प्रियाला त्याचं हे बोलणं, वागणं फारच कृत्रीम वाटत होतं. तिच्या विषयीची आत्मियता, मानसिक ओढ, काळजी एवढंच काय, हे प्रेम, सगळं सगळं वरपांगी, मनाच्या गाभा-यातून न आणता, ओढूनताणून केलेल्या एकपात्री अभिनयासारखं वाटत होतं. पहिल्यांदा त्याच्या ह्या बोलण्याने प्रिया ला तो इतक्या दिवसांनी भेटल्यानंतरही हुरळून, मोहरून जावसं वाटत नव्हतं.

बराच वेळ झाला, प्रणव कधीचा एकटाच बोलत होता अन् प्रिया ऐकण्याचा प्रयत्न करत होती, पण ते तिच्या मनापर्यंत पोचतच नव्हतं, पोचत होते ते तिच्या तल्लख मेंदूचे विचार जे दिवसेंदिवस जास्त परिपक्व होत होते. बिछान्यावर पहूडलेली जातिवंत सुंदरतेची सम्राज्ञी प्रिया त्या मलूल घायाळ अवस्थेतही पूर्वीइतकीच सुंदर दिसत होती. तिच्या निष्पाप चेह-यावरचं तेज अजूनही वाखाणण्याजोगं होतं, अन् तिच्या अंगावरील तलम रेशमी शुभ्र गाऊन तिला अजूनच आकर्षक बनवतं होता. प्रणवच्या वेधक नजरेने ते सारं टिपलं होतं अन् त्याच्या मनात भलतच काही शिजत होतं. बहूदा वासनेचा बाजार परत एकदा मांडू पहात होता तो अन् बिचारी प्रिया ह्या त्याच्या विचारांपासून अनभिज्ञ. बोलता बोलता त्यानं प्रियाच्या हातांवरून, केसांतून हात फिरवायला सुरूवात केली. त्याची नजर काही वेगळच मागत होती.

जसं त्यानं ओंजळीत घेऊन तिच्या चेह-याचं, ओठांचं चुंबन घेतलं, तसा अचानक एक करंट लागल्यासारखी प्रिया विचारांच्या मायाजाळातून बाहेर आली. प्रणवचा गरम स्पर्ष चेह-यावरून हळुहळु पुढे सरकत होता. जे चाललं होतं, ते खरोखरच अघोरी व मानवी कल्पनाशक्ती च्या ही पलिकडचं होतं अन् प्रियाला एक क्षण कसं व्यक्त व्हावं ते कळेच ना. आता तिला खरोखर वेड लागायची पाळी आली होती. पण जणू काही तिच्यातल्या आंतरीक शक्तीने तिच्या नकळतच पुढे काय होणार हे ओळखून अगोदरच तिच्या मनाची तयारी केली होती. त्याचा हात गाउनच्या बटणाला लागला होता अन् पुढे काही होणार इतक्यात सर्व बळ एकवटून स्वत:च्या अपंगावस्थेत ही तिने त्याला दूर केलं व त्याच्या अंगावर जवळजवळ खेकसलीच.


“तू शुद्धीत आहेस का प्रणव? हे काय चालवलं आहेस तू? माझी अवस्था तरी बघ? ह्या अशा अवस्थेतही तुला तुझा वासनेचा गलिच्छ खेळ रंगवावासा वाटत आहे? मला अजून माझ्या पायावरही उभं राहता येत नाहीये. माझी तहानभूक हरपली आहे मेल्यासारखं पडून राहून अन् तुला तुझ्या अविचारी वासनेची भूक भागवण्यात कमालीचा रस दिसतोय. तुझी हिम्मतच कशी झाली असं माझ्याशी वागण्याची? अन् ते सुद्धा माझ्या ह्या परावलंबी अवस्थेत? असं तर कुणी आपल्या वै-याशी पण वागत नाही रे?

मला जेव्हा तुझी, तुझ्या शाब्दिक, मानसीक आधाराची, तू माझ्या जवळ आहेस ह्या अंतरीक समाधानाची सुद्धा खूप गरज होती, तेव्हा तू कुठे होतास? मी तुझ्यावर जीव ओतून प्रेम केलं, माझं सर्वस्व तुला दिलं, जगात सर्वात प्रिय तूच होतास रे माझ्यासाठी. अन् त्या बदल्यात तू मला काय दिलस? हे लांछनास्पद कृत्य? शी… माझीच मला लाज वाटतेय. तू माझा पुर्वीचा प्रणव नाही राहीलास. खूप बदललास रे तू? माणूसकी हरवलेला वासनापिशाच्च झाला आहेस अगदी? मला खरंच पश्चात्ताप होतोय आता, तुझ्यावर जिवापाड प्रेम केल्याचा. खर तर एका प्रकारे माझ्या ह्या दुर्दशेस सर्वस्वी जबाबदार तूच आहेस. तुझ्यासारख्या खोटारड्या माणसासाठी मी निष्कारण स्वत:ची शारिरीक, मानसीक हानी करून घेतली ह्याचं मला खूप वाईट वाटतंय. अन् तुझ्यासारख्या माणसावर विश्वास ठेवून मी माझ्या आयूष्यातले सर्वात दुर्मीळ क्षण फुकट घालवले म्हणून माझाच मला राग ही येतोय. मला तुझ्याशी काहीही बोलायची इच्छा नाहिये आता”.

प्रियाचा तो क्रोधावतार पाहून उत्तरादाखल काहीही बोलायचा प्रणवचा धीरच झाला नाही. संतापाने पाय आपटत स्वत:च्या समर्थनार्थ सुद्धा काहीही न बोलता तो निघून गेला. प्रियाला आता ती धूसर छबी दिसतच नव्हती. दिसत होता तो एका गोंडस, निष्पाप, निरागस नात्याचा असा वासनेच्या बाजाराच्या तोंडाशी होणारा शेवट व अशाश्वत अंधार. प्रिया चे उपचार, फिजीओथेरपी व्यवस्थित सुरू होतं. आता ती वाॅकरच्या मदतीने थोडं थोडं चालू ही लागली होती अन् उपचारांना ही सकारात्मक प्रतिसाद देत होती. योग्य व्यायाम, आहार यामुळे तिची तब्येत लवकर सुधारत होती. या दरम्यान प्रणवचे मनधरणी करण्यासाठी फोन ही येऊन गेले पण आता ती त्याच्या भुलथापांच्या जाळ्यात फसणार नव्हती.

तिने फोन घेतलेच नाहीत. खंबीरपणे सा-याला सामोरी गेली ती अन् एक दिवस स्वतःच्या पायावर तिच्या जीममधॆ तीचं परत एकदा आगमन झालं होतं. पण तिथे प्रणव नव्हताच. मनाच्या बागेतला प्रेमाच्या रोपट्यावरचा गुलाब आता गळून पडला असला तरी त्याने मागे सोडलेल्या रोपट्याचे काटे अजूनही अधूनमधून कुठेतरी मनाला सलत होते, रक्तबंबाळ करत होते. मन उद्विग्न होत होतं विचार करून की असं का व्हावं? घुसमट व्हायला लागली जिवाची अन् ह्या भावनांच्या कोंडमा-याला तिच्या सख्याकडे, सागराकडे एकदाचं रितं करावं असं वाटलं अन् तडक उठून ती निघाली सुद्धा. तिन्हीसांजेने आपलं कामकाज निशेकडे सोपवून कधीचीच पळवाट साधली होती अन् निशेनेही आपलं अनभिषिक्त साम्राज्य जैवसंपदेवर कधिचंच पसरवलं होतं.

प्रिया मात्र आठवणींच्या अंधारात चाचपडताना विचारांच्या पसा-याशी अजून ठेचकाळत होती, निसर्गाकडे तरी आपल्या प्रश्नांची उत्तरे मिऴतील का? हे पहात. कधी कधी आपण इतके दुर्बल, हतबल का होतो कोणत्याही गोष्टीपुढे ? मग ती कुणी व्यक्ती असो, परिस्थिती असो वा वेळ. हे कलियूग आहे की वासनायूग बनत चालले आहे. एवढी का वरचढ होत आहे ही वासना निर्मळ प्रेमभावनांवर. लग्न झाल्यावर ही हे जर असंच चालणार असेल तर सुकाणू तुटलेल्या जहाजासारखे आपण भरकटत जाऊ जीवनाच्या प्रलयंकारी सागरात, काळाचा प्रवाह घेऊन जाईल तिकडे, शारिरीक अन् मानसिक अपंगत्व आल्यासारखं किंवा बसू त्या वासनेच्या “कायदेशीर बाजारात” रोज सर्वस्व लुटून घेत, जिथे आपल्या भावनांना, आवडींना, माफक अपेक्षांना काडी ची ही किंमत नसेल. ह्याची कल्पना करून प्रियाच्या अंगावर भितीने सरकन् काटाच आला. तिला त्या पांढ-या पलंगावर आपलं ओरबाडलेलं शरिर अन् रक्ताळलेलं मन दिसायला लागलं. तिने सुरूवातीपासूनचा सगळा आलेख नजरेसमोर आणला.

आपल्या ह्या विचारांचा तिने प्रणवकडे वेळोवेळी केलेला पाठपुरावा आणि त्याच्या ह्या चुकीच्या वागण्याचा तिने केलेला ठाम नकार, आणि तो अपघाताच्या वेळचा बिभत्स प्रसंग तो ही आठवला अन् तिचं हृदय परत नैराश्याने व डोळे आसवांनी भरून आले. पण क्षणभरच. आत्तापर्यंत खूप रडलो, लढलो ही पण तरीही हरलो. पण आता ही वेऴ रडायची नाही, तर मन कठोर करून, नवीनच उदयाला आलेल्या एका विचाराबाबत ठाम निर्णय घेण्याची आहे. बंद दरवाज्यावर धडका मारून सतत रक्तबंबाऴ होण्यापेक्षा तो दरवाजा कायमचा बंद करावा ह्या निर्णयाप्रत ती आली होती. तिने मेसेज करायला फोन हातात घेतला तेव्हा प्रणवचा येऊन गेलेला फोन दिसला. अतीशय थंड डोक्याने तिने त्याला मेसेज पाठवला, “यापुढे तुझ्याशी कुठल्याच प्रकारचे संबध ठेवायची माझी जरा सुद्धा इच्छा नाही. तू आजवर निरपेक्ष, निखळ, निरागस प्रेमाच्या नावाखाली भरवलेल्या वासनेच्या बाजाराला मी आज आत्ता कायमचं उधळून लावत आहे. माझ्या मनाच्या दरवाज्याला सतत ठोठावत राहून, परत स्वतः च्या निर्जीव मनाला विनाकारण घायाळ करून घेऊ नकोस”. अन् अचानक तिला खूप हलकं झाल्यासारखं वाटायला लागलं. हातातून निसटणा-या काळाच्या तलम वाळूला हातात घेेेऊन तिने त्या सगळ्या कटू आठवणींचं, मनावर, विचारांवर साठलेल्या जळमटांचं, तसंच चेहप्यार्रेम् आजवर रडूूून साचलेल्या अश्रूंच्या चिखलाचं त्या विशाल सागराला अर्घ्य अर्पण केलं अन् जराही मागे वळून न पाहता ती तिथून निघाली…. नव्याने उगवत्या, तिला हव्याहव्याशा रम्य पहाटेच्या शोधात………