सा य ना ई ड
प्रकरण १७ (शेवटचे प्रकरण)
कोर्टाचे कामकाज थांबल्यामुळे, खटला ऐकायला आलेल्या प्रेक्षकांना पूर्ण गोंधळातच टाकले. अत्ता पर्यंत कुठल्याच प्रकरणात, अगदी पाणिनी पटवर्धन असलेल्या प्रकरणात सुध्दा अशी गोंधळाची स्थिती झाली नव्हती असे एका वर्तमान पत्रकाराने जाहीर केले.खांडेकर यांचा चेहेरा बघवत नव्हता, अचानक घडामोडीमुळे त्यांना क्लेश झाल्याचे जाणवत होते.दार ढकलून,चिडचिड करत ते कोर्टातून बाहेर पडले.मिलिंद बुद्धीसागर आणि लीना ला कैदेत टाकले होते.तो तिला सत्य सांगण्याबद्दल विनवणी करताना दिसत होता तर ती त्याला अर्वाच्च्य शिवीगाळ करत होती. “ माझ्यातली एक पै सुध्दा तुला मिळणार नाही.” ती म्हणाली
“ मला देण्यासाठी तुझ्याकडे काही नाहीच आहे.” तो तिला म्हणाला .
सौम्या सोहनी आणि कनक ओजस ने पाणिनी पाणिनी पटवर्धन आणि अनन्याभोवती घोळका केला आणि दोघांचे अभिनंदन केले.अनन्याएकदम सैरभैर झाली होती. तिला एकाच वेळी हसू आणि रडू येत होते, तेवढ्यात पोलीस आला आणि म्हणाला “ माफ करा मला ,पण अजून मला गुळवणी यांना सोडण्याचा अधिकृत आदेश आलेला नाही त्यामुळे मला त्यांना कैदेतच ठेवावे लागेल.”
पाणिनी ने तिच्या पाठीवर थोपटल्या सारखे केले. “ निश्चिंत रहा आता, सर्व काही ठीक होईल.”
तिला एकदम आनंदाश्रू आले. आवेगाने पुढे येऊन तिने पाणिनी चे चुंबन घेतले. वर्तमान पत्राच्या वार्ताहराना अचानक हे दृष्य टिपायला मिळाले. पण त्यांच्यातल्या एकाची ती संधी हुकली.
“ अहो, थांबा , थांबा, मला फोटो घ्यायचा होता तुम्ही पाणिनी पटवर्धन चे चुंबन घेताना. पण माझा कॅमेरा तयार नव्हता ! तसच पुन्हा एकदा करायला तुमची हरकत आहे का?”
“ अजिबात हरकत नाही ! “ असे म्हणून अनन्याने त्याची इच्छा पूर्ण केली. हे सगळे प्रकार होई पर्यंत त्या पोलिसाने वाट पाहिली आणि नंतर तिला घेऊन गेला.
“ मग , पाणिनी, आता खांडेकर काय करतील अस तुला वाटतंय?” ओजस ने विचारले.
“नव्व्याण्णाव टक्के ते चुकीचा निर्णय ठरेल अशी कृती करतील.”
‘ म्हणजे कशा प्रकारची कृती?”
“ ते लीना बुद्धीसागर वर खुनाचा आरोप ठेवून फिर्याद लावतील.”
“ मग ? त्यात चुकीचे काय आहे?”
“ जसा अनन्याचा होता, तसा यावेळी त्यांच्या कडे तिचा कबुली जबाब नाहीये. गुन्हा घडल्याचा पुरावा त्यांच्याकडे नाहीये. हर्षल मिरगल हा पोटॅशियम सायनाईड मुळे गेला हे त्यांना सिध्द करता येणार नाही आणि ते कसे दिले गेले हे सुद्धा “
“ पण अर्थात मिलिंद बुद्धीसागर ची साक्ष त्यांना.....” ओजस ने बोलायचा प्रयत्न केला पण पाणिनी ने चक- चक आवाज काढून त्याचे म्हणणे धुडकावूनच लावले.
“ का ? काय झाले?’’ ओजस ने विचारले.
“ मिलिंद बुद्धीसागर ची साक्ष मान्य होणार नाही कारण नवरा आणि बायको एकमेकां विरुद्ध साक्ष देऊ शकत नाहीत. त्यामुळे मांजर जशी स्वतः ची शेपटी पकडायचा प्रयत्न करते पण तिला ते जमत नाही तशी अवस्था झालेले खांडेकर आपल्याला बघायला मिळतील ! “
“ म्हणजे पाणिनी तुला अस म्हणायचं आहे की खुनासारख्या आरोपातून ती लीना सहज सुटेल?”
“ कोण म्हणत की तिने खून केला म्हणून?” पाणिनी ने विचारताच ओजस आणि सौम्या दोघेही चाटच पडले
“ म्हणजे ? तिने नाही केलाय खून?’’
“मिलिंद बुद्धीसागर च्या साक्षीतील महत्वाची बाब तुझ्या लक्षात आलेली दिसत नाही माझ्या आली .” पाणिनी म्हणाला.
“ काय होती ती?”
“लक्षात घे , ज्यावेळी निमिष जयकर सायनाईड च्या गोळ्या मिळवण्यासाठी हर्षल मिरगल च्या घरी गेला,त्याने बलदेव ला अनन्याच्या खोलीत बाटली आणण्यासाठी पाठवले.बलदेव ने ती शोधली आणि जयकर कडे दिली.त्यावेळी चार गोळ्या त्यात कमी होत्या,आणि त्याचे काय झाले कोणालाच स्पष्ट करण्यात आले नाही.” पाणिनी म्हणाला.
“अरे देवा ! “ सौम्या उद्गारली.” क्षणभर तुम्हाला अस तर वाटत नाहीये ना की अनन्याने त्याला खरंच विष दिले ?”
“ एक विसरत्येस तू सौम्या, तिला डॉ.डोंगरेनी औषध देऊन तिच्या कडून खरा प्रतिसाद मिळवला होता.तिला माहिती होते तेवढे तिने कथन केले.”
“ पण ती सायनाईड ची बाटली- का... निमिष जयकर सांगतो त्या प्रमाणे,त्याने त्या घरातून बलदेव मार्फत बाटली मिळवली, ,तेव्हा त्यात चार गोळ्या कमी होत्या. ज्यावेळी अनन्या चॉकलेट बनवत होती त्याच वेळी ती बाटली घरातून बाहेर नेण्यात आली ! ” सौम्या उद्गारली
“ बरोबर , पण लक्षात ठेव की तेव्हा त्यात चार गोळ्या कमी होत्या.” पाणिनी म्हणाला.”
“ मग तिने टेप वर सांगितलेली घटना तिच्या दृष्टीने बरोबर आहे. तिने प्रत्यक्ष गोड गोळ्या च मिरगलला दिल्या पण तिला वाटलं की आपण सायनाईड च्या गोळ्या दिल्या म्हणून तिने ती गोड गोळ्यांची बाटली सायनाईड च्या गोळ्या ची बाटली समजून नंतर तळ्यात टाकली.” सौम्या उलगडा करून घेण्याच्या दृष्टीने म्हणाली.
“ तीच गोड गोळ्यांची बाटली म्हणजे पुरावा क्र ब म्हणजेच अनन्याने टाकलेली आणि मी तळ्यातून मिळवलेली बाटली.” पाणिनी म्हणाला.
“ पण मग हर्षल मिरगल मेला कसा?” ओजस ने विचारले.
“ मगाशी मी म्हंटल्या प्रमाणे, मिलिंद बुद्धीसागर च्या साक्षी मधील एक महत्वाचा मुद्दा तुम्ही दुर्लक्षित केलाय; तो असा की जेव्हा त्याची बायको जेवणाच्या खोलीत गेली तेव्हा तिथे कोणीच नव्हते.अनन्याही नव्हती आणि बलदेव पण तिला दिसला नाही आणि शेगडीवर चॉकलेट चे दूध गरम करायला ठेवलेले होते आणि....”
“ म्हणजे तुला म्हणायचंय की कोणी नाही असे पाहून,लीना ने विषाच्या गोळ्या खरोखरच त्या चॉकलेट.....” ओजस ने मधेच पाणिनी ला विचारले.
“ नाही. त्या वेळी अनन्या बाजारात गेली होती पण बलदेव चे काय? “ पाणिनी ने प्रश्न केला.
“ त्याचे काय?” ओजस ने विचारले.
“ बलदेव ने आपल्याला सांगितलंय की तो संपूर्ण वेळ जेवणाच्या खोलीतच खिडक्या स्वच्छ करत होता पण मग लीना ला तो कसा दिसला नाही? मिलिंद बुद्धीसागर ला कसा दिसला नाही? निमिष जयकर ने बलदेव ला च सांगितलं होत अनन्याच्या खोलीतून बाटली मिळवायला. ती जेव्हा बलदेव ने शोधून काढून निमिष जयकर ला दिली तेव्हा त्यात चार गोळ्या कमी होत्या.
बलदेव ला अनन्याबद्दल खूप आत्मीयता होती. तिच्यावर मुली प्रमाणे प्रेम होते.हर्षल तिला जो त्रास द्यायचा ते त्याला अजिबात आवडायचं नाही.त्याने त्याच्या कडे बरीच वर्षे काम केले होते.त्याला अनन्याच्या आई बद्दल, रीमा गुळवणी बद्दल, सर्व माहिती होती, भागीदारीत मिरगल ने केलेल्या घोटाळ्याची, त्याचा भागीदार कसा मेला या सर्वच गोष्टीची माहिती त्याला होती. नाहीतरी त्याने मिरगलची नोकरी सोडून गावाकडे एखादे घर बांधून रहायला जायचं ठरवलं होतंच. त्यामुळे मिरगल जगला काय किंवा मेला काय त्याला स्वतःला काहीच फरक पडला नसता, पण जाता जाता मिरगल मेला तर अनन्याला वारस म्हणून फायदाच होईल ही जाणीव त्याला झाली.शिवाय अनन्या त्यावेळी तिथे नसल्याने तिच्यावर आळ येण्याची शक्यता नाही हे त्याला माहीत होते. ‘’ पाणिनी ने सविस्तर खुलासा केला.
ओजस ने पाणिनी कडे कौतुकाने आणि आश्चर्याने पाहिले. “ बाप रे पाणिनी, तू जेव्हा हे सगळे तर्क शुद्ध पणे समजावून सांगतोस तेव्हा ते सर्व घटनेत बरोब्बर बसते. ! “ पण मला सांग तू , पुढे काय करणार आहेस तू? हेरंब खांडेकर ना तू बलदेव बद्दल टिप देणार आहेस का? म्हणजे तो निघून जाण्यापूर्वीच ते त्याला पकडण्याची व्यवस्था करतील.”
“ त्यांना जरा काही काळ स्वतःला हात पाय मारू देत, आपली मदत ते स्वीकारणार नाहीत. निदान सध्या तरी.” पाणिनी म्हणाला. “ पण कनक, तरीपण मला असे वाटते की माझ्या ऐवजी तू जर त्यांना टिप दिलीस बलदेव बद्दल, तर ते फारसा विरोध नाही करणार. त्यामुळे तू जरा त्यांच्या आसपासच वावर आणि योग्य वेळ येताच त्यांच्यावर मेहेरबानी कर ! मला जरा लांबच ठेव यातून.”
ओजस च्या भावना विरहित चेहेऱ्यावर एखादा भाव उमटणे म्हणजे अवघडच होते पण पाणिनी च्या या बोलण्या नंतर त्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले .
“ हे केले नाही तर पाप लागेल मला ! “ तो म्हणाला. !!!
-; प्रकरण १७ आणि संपूर्ण कादंबरी समाप्त ;-