श्री एकनाथ महाराज १२
श्रीकृष्ण
दर्शन
श्लोक ६ वा
स्वर्गोद्यानोपगैर्माल्यैश्छादयन्तो
युदूत्तमम् ।
गीर्भिश्चित्रपदार्थाभिस्तुष्टुवुर्जगदीश्वरम्
॥६॥
मांदार पारिजात संतान । कल्पद्रुम
हरिचंदन ।
ऐशिया वृक्षांचीं सुमनें जाण ।
कृष्णावरी संपूर्ण वरुषले ॥६४॥
श्रीकृष्णासी चहूंकडां । दिव्य
सुमनांचा जाहला सडा ।
समस्त देवीं सन्मुख पुढां । केला पैं
गाढा जयजयकारु ॥६५॥
सार्थ पदबंधरचना । नाना
गद्यपद्यविवंचना ।
स्तवूं आदरिलें यदुनंदना । अमरसेना
मिळोनी ॥६६॥
श्लोक ७ वा
श्रीदेवा
ऊचुः ।
नताः स्म
ते नाथ पदारविन्दं बुद्धीन्द्रियप्राणमनोवचोभिः ।
यच्चिन्त्यतेऽन्तहृदि
भावयुक्तैर्मुमुक्षुभिः कर्ममयोरुपाशात् ॥७॥
विवेकयुक्त प्राणधारणा । मनसा वाचा
कर्मणा ।
नमस्कारु तुझिया चरणां । सच्चिद्धना
श्रीकृष्णा ॥६७॥
इंद्रियउपरमालागीं जाणा । सांडूनि
विषयवासना ।
दश इंद्रियीं लागलों चरणां । नमन
श्रीकृष्णा निजभावें ॥६८॥
विषयीं होऊनियां उदास । सांडोनि
संसाराची आस ।
चरण चिंतिती तापस । कर्मपाश छेदावया
॥६९॥
ऐसे मुक्तीचिया वासना । मुमुक्षु
चिंतिती चरणां ।
त्यांसी अर्धक्षण न येसी ध्याना । दृढ
भावना करितांही ॥७०॥
ते प्रत्यक्ष तुझे चरण । आम्हांसी
झालें जी दरुषण ।
देव आपुल्या भाग्या आपण । अतिस्तवन
करिताति ॥७१॥
देखूनि सगुण स्वरूपासी । एवढी
श्लाघ्यता कां म्हणसी ।
जें आलें आकारासी । तें निश्चियेंसी
मायिक ॥७२॥
जैसे तुम्ही शरीरधारी । तैसाच मीही एकु
शरीरी ।
त्या माझेनि दर्शनेंकरीं । तुम्ही
कैशापरी तराल ॥७३॥
ऐसें न म्हणावें जी अनंता । तूं मायेचा
नियंता ।
हेंही कळलें असे तत्वतां । समूळ कथा
परियेसीं ॥७४॥
श्लोक ८ वा
त्वं
मायया त्रिगुणयाऽऽत्मनि दुर्विभाव्यं । व्यक्तं सृजस्यवसि लुम्पसि तद्गुणस्थः ।
नैतैर्भवानजित
कर्मभिरज्यते वै । यत्स्वे सुखेऽव्यवहितेऽभिरतोऽनवद्यः ॥८॥
झोंप लागल्या झोंप न दिसे पाहीं ।
जागें जाहल्या दिसतचि नाहीं ।
तैसी माया अतर्क्य देहीं । न पडे ठायीं
सुरनरां ॥७५॥
मूळींच तुझी अतर्क्य माया । तिसी
गुणक्षोभु जाहला साह्या ।
ते ब्रह्मादिकां न येचि आया । देवराया
श्रीकृष्णा ॥७६॥
तूं धरोनि दैवीमायेसी ।
ब्रह्मादिकांतें सृजिसी ।
प्रतिपाळोनि संहारिसी । तूं त्या
कर्मासी अलिप्त ॥७७॥
स्वप्नीं स्वयें सृष्टि सृजिली ।
प्रतिपाळूनि संहारिली ।
ते क्रिया कर्त्यासी नाहीं लागली ।
तेवीं सृष्टि केली त्वां अलिप्तत्वें ॥७८॥
मृगजळाची भरणी । सूर्य करी निजकिरणीं ।
शोषूनि ने अस्तमानीं । अलिप्तपणीं तैसा
तूं ॥७९॥
समूळ धर्माची वाढी मोडे । अधर्माची शीग
चढे ।
तैं तुज अवतार धरणें घडे । आमुचें
सांकडें फेडावया ॥८०॥
करोनि अधर्माचा घातु । धर्म वाढविशी
यथस्थितु ।
देवांसी निजपदीं स्थापितु । कर्मातीतु
तूं श्रीकृष्णु ॥८१॥
तुज अखंडदंडायमान । आत्मसुखाचें
अनुसंधान ।
तें आम्हांसी नाहीं अर्ध क्षण । दीनवदन
यालागीं ॥८२॥
ज्यासी आत्मसुख निरंतर । तो देहधारी
परी अवतार ।
त्याचे चरण पवित्रकर । गंगासागर आदि
तीर्थांसी ॥८३॥
तो जरी वर्ते गुणांआंतु । तरी तो
जाणावा गुणातीतु ।
त्याचा चरणरेणु करी घातु ।
त्रैलोक्यांतु महापापां ॥८४॥
ऐशी तुझ्या दासांची कथा । त्या तुझे
चरण वंदूं माथा ।
असो चरणांची हे कथा । कीर्ति ऐकतां
निजलाभु ॥८५॥
चरण देखती ते भाग्याचे । त्यांचें
महिमान न वर्णवे वाचे ।
पवित्रपण तुझिये कीर्तीचें । परिस
साचें स्वामिया ॥८६॥
अग्निशिखा समसमानीं । इंधन घलितां वाढे
अग्नी ।
आशा वाढे देहाभिमानीं । श्रवणकीर्तनीं
ते त्यागवी ॥८७॥
श्लोक ९ वा
शुद्धिर्नृणां
न तु तथेड्य दुराशयानां । विद्याश्रुताध्ययनदानतपःक्रियाभिः ।
सत्त्वात्मनामृषभ
ते यशसि प्रवृद्ध । सच्छ्रद्धया श्रवणसम्भृतया यथा स्यात् ॥९॥
कृष्णस्तवनें स्तविता तरे ।
श्रवणद्वारें ऐकता उद्धरे ।
यालागीं स्तव्य तूंचि निर्धारे ।
स्तवनद्वारें तारकु ॥८८॥
एवं तुझे कीर्तीचें श्रवण । तेंचि परम
शुद्धीसी कारण ।
यावेगळें जें साधन । तें केवळ जाण
प्रयास ॥८९॥
ऐकें गा सुरवरिष्ठा । तुझिया श्रवणाची
उत्कंठा ।
अंतरीं पापाचा मळकटा । धुवोनि चोखटा
करी वृत्ती ॥९०॥
तुझ्या श्रवणीं होऊनि उदास । तपें
तपतां तापस ।
नाना साधनीं कर्कश । जाहल्या निरस मती
त्यांच्या ॥९१॥
'मंत्रविद्याग्रहण' । विकळ उच्चारितां
वर्ण ।
शुद्धी नव्हे परी दारुण । पातक पूर्ण
अंगीं वाजे ॥९२॥
करितां 'शास्त्रश्रवण' । चौगुणां गर्व
चढे पूर्ण ।
तो ज्ञातेपणाचा अभिमान । न निघे जाण
चतुर्मुखा ॥९३॥
करितां 'वेदाध्ययन' । विस्वर गेलिया
उच्चारण ।
शुद्धी नव्हेचि परी मरण । अवश्य जाण
वृत्रासुराऐसें ॥९४॥
'दान' देतां नृग बहुवस । कृपीं जाला
कृकलास ।
प्राप्ती दूरी परी नाश । असमसाहस रोकडा
॥९५॥
'तप' करितां ऋष्यशृंगारासी । तो वश
जाहला वेश्यांसी ।
श्रद्धा श्रवणाचिया ऐशी । शुद्धी
आणिकांसी पैं नाहीं ॥९६॥
'कर्म' करावें यथानिगुती । तंव त्या
कर्माची गहन गती ।
प्राचीनबर्ह्याची कर्मस्थिती ।
नारदोक्तीं सांडविली ॥९७॥
कर्मीं आचमन करावें । तेथ माषामात्र जळ
घ्यावें ।
न्यूनाधिकत्वासवें । दोष पावे
सुरापानसम ॥९८॥
एवं दुष्टहृद्य ज्यासी । तपादिक
साधनें त्यासी ।
शुद्धि नव्हे हृषीकेशी । श्रवणें
कीर्तीसी नायकतां ॥९९॥
श्रवणें परीक्षिती तरला । श्रवणें
क्रौंच उद्धरिला ।
मकरोदरीं श्रवण पावला । सिद्ध जाहला
मत्स्येंद्र ॥१००॥
तुझें श्रवण दोपरी । एक तें
चित्तशुद्धी करी ।
दुसरें जीवब्रह्मऐक्य करी । दोंहीपरी
उद्धारु ॥१॥
प्रत्यक्ष पाहतां वाराणसी । श्रवणीं
तारक ब्रह्म उपदेशी ।
मुक्तिक्षेत्र जाहली काशी । श्रवणें
जीवासी उद्धारु ॥२॥
तूं अवाप्तसकळकाम । निष्कामाचें निजधाम
।
ऐशिया तुज करणें कर्म । भक्तभ्रम
छेदावया ॥३॥
नाना चरित्रांची करणी । करिता झालासी
चक्रपाणी ।
मोक्षमार्गाची निजश्रेणी । दिधली रचूनि
जनासी ॥४॥
चित्तशुद्धीसी कारण । प्रेमयुक्त
कीर्तिश्रवण ।
येथ सच्छ्रद्धाचि प्रमाण । अकारण
साधनें ॥५॥
अपेक्षा जें जें साधन साधिलें । तें
तें अपेक्षेनेंचि फोल केलें ।
निरपेक्षाचें हृदय भलें । वेगीं गेलें
परमार्थीं ॥६॥
हृदयाचे सखोल आळा । स्वधर्मबीजें
अंकुरला ।
श्रद्धेचा वेल उगवला । कोंभ निघाला
तरितरितु ॥७॥
सच्छ्रवणप्रबळजळें । रुतलीं
वैराग्यदृढमूळें ।
वेगीं गेलीं निजबळें । श्रद्धामेळें
चिदाकाशीं ॥८॥
ते चिदाकाशींचा चंद्रमा । स्वप्रकाश
तूं पुरुषोत्तमा ।
साधक शिणती मेघश्यामा । तुझी प्रतिमा
पहावया ॥९॥
त्यां तुझे श्रीचरण । प्रत्यक्ष जाहलें
दर्शन ।
घालोनियां लोटांगण । चरणस्तवन करिताती
॥११०॥