Tanzaniyachi Shikari Safar in Marathi Travel stories by Paay Trade books and stories PDF | टांझानियाची शिकारी सफर

Featured Books
Categories
Share

टांझानियाची शिकारी सफर

पूर्व अफ्रिकेतील टांझानिया हा ६ कोटी लोकसंख्येचा देश तेथील वन्यजीवन व हजारो वर्षांपासून टिकून असलेल्या आदिवासी प्रजातींमुळे व त्यांच्या परंपरांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. याच टांझानियाच्या अरुषा प्रदेशातील करातू जिल्ह्याच्या आग्नेय भागात 40 हजार वर्षांची परंपरा असलेली 'हद्झाबे' किंवा 'हद्झा' ही आदिवासी मूलनिवासी जमात वास्तव्यास असलेली आढळून येते. आजतागायत जवळपास 1200 इतकेच या जमातीचे लोक राहिले आहेत. आजूबाजूच्या गावांतील शहरीकरण, आधुनिक जीनशैलीमुळे बहुसंख्य लोकांनी पारंपरिक जीवनशैली सोडून आधुनिकतेची वाट धरली असावी. या बाराशे लोकांपैकी केवळ 350 ते 400 लोकच पारंपरिक पद्धतीने प्राणी, पक्षांची शिकार करून जीवन जगतात. इतर लोकांनी शेती, पाळीव प्राणी यांच्या आधारावर जीवन जगायला सुरुवात केली आहे. याचे मुख्य कारण वाढत्या लोकसंख्येमुळे वन्य जीवांची पूर्वीच्या काळी झालेली मोठ्या प्रमाणातील शिकार व त्यामुळे अगदी किरकोळ शिल्लक राहिलेले वन्य प्राणी हे असू शकते. यामुळे शिकारीसाठी वन्यजीव पुरेश्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने अनेकांनी पारंपरिक जीवनशैली सोडून पोट भरण्याचे नवीन मार्ग निवडले असावेत. शिकारीसाठी वन्यजीव पुरेसे उपलब्ध नाहीत हे मला या जमातीतील एका टोळीसोबत शिकारीसाठी फिरताना प्रत्यक्ष दिसले. या बच्या कुच्या जमातीचे लोक आता हे असे रानटी जीवन जगणे सोडून देतील की काय अशी शक्यता जास्त वाटते कारण आजच्या जगात वाहुतुकीची सुविधा सर्वत्र उपलब्ध असल्याने आपल्यासारख्या पुढारलेल्या देशाचे पर्यटक या जमातींच्या वसाहतींना भेट देत असतात व यामुळे तेथील शहरी भागातील लोकांनी इंग्रजी आत्मसात करून पर्यटनाचा उद्योग जोरात सुरु केला आहे. मुळात या देशावर इंग्रजांचे राज्य होते त्यामुळे ख्रिश्चन धर्माचा ईथे भरपूर प्रसार झालेला आहे. येथील शहरी भागातील लोकांची इंग्रजी ही दररोजची भाषा आहे व इतर लोकही चांगले इंग्रजी बोलतात. या सगळ्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची चांगलीच सोय होते (माझ्यासारख्या) व मग हे पर्यटक मोठ्या संख्येने या देशातील दुर्गम भागातील आदिवासी लोकांची जीवनशैली पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी जात असतात. पर्यटकांमुळे या आदिवासी लोकांकडे पैसे येऊ लागले व ते शहरांतून लागणाऱ्या वस्तू खरेदी करु लागले यात शंका नाही. इतक्या रानटी असलेल्या या जमातिकडे चक्क दुचाकी होती! सेल वर चालणाऱ्या टॉर्च होत्या! म्हणजे हळूहळू ही जमात आधुनिकतेकडे ओढली जात आहे किंबहूना ती काळाची गरज आहे.

शिकार करून कुटुंबाचे पोट भरणे हे आता जवजवळ अशक्य झाले आहे. परंतु तरीही हे लोक आपले बहुतेक अन्न हे शिकरितून मिळवतात. तर या अशा लोकांना पाहण्यासाठी, त्यांची जीवनशैली अनुभवण्यासाठी मी माझ्या गाईड सोबत भल्या सकाळी या जमातीच्या एका वस्तीवर आलो. गाईडला हद्झाबे लोकांची हद्झाने ही बोली भाषा येत होती. मी तिथे गेलो तेव्हा सर्व पुरुष शेकोटी करून त्याशेजारी हात शकत बसले होते. त्यांनी अंगावर जनावरांच्या कातड्या मागून पुढून परिधान केल्या होत्या. डोक्यावर आपापल्या पसंतीच्या प्राण्यांच्या शेपट्या, कातडी गुंडाळली होती. गळ्यात विविध रंगी माळा घातल्या होत्या. गाईडने माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. ओळख करून देताना ते त्यांच्या भाषेत बोलत होते, ही भाषा ऐकून मला बाहुबली मधल्या कालकेयची आठवण झाली, ही टॉक-टॉक अशी आवाज करून बोलली जाणारी भाषा पाहूनच कदाचित ती कालकेयाची भाषा तयार केली असावी. त्या लोकांनी लगेच मला त्यांचा टोळीत सामील करून घेतले. मी त्यांच्यासोबत मजा मस्ती करत होतो, त्यांची भाषा बोलण्याचा प्रयत्न करत होतो तेंव्हा माझ्या तोंडून निघालेले भलतेच शब्द ऐकून त्या टोळीत एकच हास्य कल्लोळ उठायचा. ते माझी चेष्टा करत होते की काय कोण जाणे. पण त्यांनी मला त्यांच्या भाषेत नाव कसे सांगायचे ते शिकवले. "ओनो आखनाबे रवी" म्हणजे माझे नाव रवी आहे! त्यांनी मला आपली नावे सांगितली. कोणाचे नाव उहू, कुकू तर कोणाचे ऊफु! त्यानंतर ते माझ्याशी बोलू लागले पण मला त्यातले काही एक कळत नव्हते! त्यांची ही मजेशीर भाषा ऐकायला अन् तिचे मराठीत अर्थ लावायला एक वेगळीच मजा येत होती! त्यांचा भाषेत भावा, भाऊ म्हणजे बावा हे ऐकून मी जरा चकितच झालो. आपणही बोलताना मराठीत 'अरे भावा' असे बोलत असतो. त्यांची भाषा शिकण्याच्या या भानगडीत त्यांनी मला त्यांच्या टोळीत उत्साहाने सामील केले हे पाहून गाईडही चकित झाला! आमची ओळख झाल्यावर काही वेळाने ते पुन्हा शेकोटी शेजारी बसले, मी ही त्यांचा शेजारी बसलो. शेकोटीच्या आगीत बिड्या पेटवून त्या ओढत असताना ते लोक काहितरी चर्चा करत होते. मी माझ्या गाईडला या चर्चेबद्दल विचारले तेव्हा कळाले की, आज शिकारीसाठी कोणत्या भागात जायचे, आजचे शिकारीचे टार्गेट काय असेल, पद्धत कशी असेल याबद्दल ते प्लॅनिंग करत आहेत. त्यांची बोलणी अन् शिकारीसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव सुरू होती, माझा गाइड मला या लोकांच्या राहणीमानाबद्दल, सवयींबद्दल माहिती देत होता. एका जुन्या व मोठ्या झाडाला त्यांनी प्राण्यांच्या कवट्या, शिंगं, कातडी टांगून ठेवली होती. या माणसा सारख्या वाटणाऱ्या कवट्यांबद्दल मी गाइडला विचारले तेव्हा त्या कवट्या बबून माकडांच्या आहेत असे कळाले. त्याशेजरी काळवीटाचे पूर्ण शिंगं असलेले शिर लटकावले होते व त्याशेजारी त्याची सुंदर अशी कातडी. मी गाईड सोबत त्या वस्तीच्या आजुबाजूस फेरफटका मारून माहिती घेत होतो.

तासाभराने शेकोटी विझवून ते सर्व लोक शिकारीसाठी लागणारे भाले, बाण घेऊन निघाले. त्यात विविध आकाराचे लहान मोठे बाण होते. छोट्या प्राण्यांसाठी छोटे बाण, पक्षांसाठी पातळ बाण, मोठ्या प्राण्यांसाठी मोठे बाण व भाले ते वापरतात ही सगळी माहिती मला गाईडने दिली. ते बाण त्या लोकांनी फक्त दगडावर घासून घासून इतके अणकुचीदार अन् धारदार बनवले होते हे नवलच! टोळीतील एका माझ्याच वयाच्या तरुण मुलाने आऊ-आऊ असा विचित्र आवाज काढत सर्व कुत्र्यांना एकत्रीत केले, ही कुत्री मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयोगी पडतात म्हणून त्यांना सोबत घेऊन ते सर्व शिकारीला जात. कुत्र्यांचे टोळके वास घेत घेत जंगलाच्या दिशेने पुढे निघाले अन् त्यांच्या मागे आम्हा माणसाचे टोळके! जंगल फारच विरळ होते, काटेरी वनस्पती इथे जास्त दिसत होत्या, मराठवाड्यातील माळरानावर जसे विरळ वन असते तसेच काहीसे हेही होते. पंधरा वीस मिनिटं चालून झाल्यावर टोळीतील एकाला कोणत्यातरी प्राण्याच्या पायांचे ठसे दिसले व मग त्या ठस्यांचा मागोवा घेत सर्वजण हळू हळू पुढे निघाले. एखादे रानडुक्कर येथून गेले असावे असा त्यांचा अंदाज होता. या टोळीसोबत काट्या कुट्यांतून चालताना माझा शर्ट सारखा सारखा त्या काटेरी झुडपांत अडकत होता, दोन चार काट्यांचे ओरखडे उजव्या खांद्यावर लागलेच होते. ते होद्झाबे लोक मात्र झपाझप चालत होते, मी व माझा गाइड सर्वात शेवटी राहिलो होतो, टोळीतील लोक आमच्यापासून काही अंतरावर पुढे चालत होते. इतक्यात काहितरी गडबडीचा आवाज आला, दोघे जण एका झाडाकडे धावत होते. आम्ही धावत जाऊन झाडापाशी आलो तेव्हा पाणझड झालेल्या एका डेरेदार झाडावर एका कोंबडीच्या आकाराचा पक्षी अडकून पडलेल्या अवस्थेत दिसला. टोळीतील तिरंदाजाचा बाण त्या पक्षाच्या शरीरातून आरपार गेला होता! किमान पन्नास फुटांवरून त्याने तो बाण मारला असेल आणि तो ही बरोब्बर लक्ष्याचा वेध घेणारा! हा हद्झाबे एकलव्य पाहून मी काही क्षण स्तब्ध झालो! त्यानंतर एकापाठोपाठ एक असे तीन पक्षी या एकलाव्याने अचूक टिपले. हे सर्व तित्तीर पक्षी होते. एका पक्षाच्या पायातून बाण आरपार गेला होता, तो पक्षी जीवंत होता व मी त्याला न्याहाळत उभा होतो, तेवढ्यात टोळीतील एका सदस्याने पक्ष्याची मुंडी पकडली अन् दातानेच त्याच्या नरड्याचा घोट घेतला! हे दृश्य पाहून मला कसतरीच झाले, पण हे त्यांचे रोजचेच वागणे होते, त्यांची जीवनशैली होती. ते तिन्ही पक्षी एका दहा बारा वर्षाच्या पोराकडे सोपवण्यात आले व सर्वजण पुढे निघाले. आम्ही त्यांच्या मागोमाग जात होतो.

काही वेळ चालून झाल्यावर सर्वजण एका मोकळ्या जागी थांबले. आम्हीही त्यांच्यापाशी जाऊन उभे राहिलो. एकाने कमरेला अडकावलेली एक चपटी लाकडाची पट्टी समोर ठेवली, दुसऱ्याने ती हाताने जमिनीवर घट्ट पकडली. त्या पट्टीवर मध्यभागी एक गोलाकार खळगी होती, तिच्यात एक गोलाकार लांबसडक लाकडाची छडी ठेवून दुसऱ्याने ती छडी दोन्ही हातांच्या तळव्यांनी ताक घुसळावे तसे घुसळत-घासत फिरवायला सुरुवात केली. पाच एक मिनिटात त्या छडीच्या बुडाला धूर निघायला सुरूवात झाली हे पाहून तो छडी जोरजोरात-वेगाने घासू लागला व पुढच्याच क्षणी त्या लाकडी पट्टीच्या खळगित घर्षणामुळे बनलेला विस्तव त्याने वाळलेल्या गवताच्या बुचक्यात टाकला, त्यावर हळू हळू फुंकर मारली अन् क्षणार्धात गवताच्या बुचक्याने पेट घेतला. मग तो पेटता बुचका काटक्या कुटक्या टाकून त्याची छोटीशी शेकोटी केली. सर्वजण हळू हळू त्याशेजारी येऊन बसले. एकाने सोबत असलेल्या बिड्या सर्वांना वाटल्या व मग सर्वजण मनसोक्त बिडी ओढत पुढच्या प्रवासाबद्दल चर्चा करू लागले. तोपर्यंत मी व माझा गाईड त्या मारलेल्या पक्षांना न्याहाळत बसलो. अर्ध्या तासाभराने टोळी पुन्हा शिकारीसाठी सज्ज झाली. बबून माकडाची शिकार करायची असा त्यांचा प्लॅन ठरला. माकडांचे वास्तव्य ज्या भागात असते तिकडे सर्वजण निघाले. जाता जाता वाटेत भेटेल त्या छोट्या मोठ्या प्राण्याला मारत, आपले अन्न जमा करत टोळी हळू हळू पुढे जात होती. एका झाडापाशी आल्यावर काही मधमाश्या त्यांना दिसल्या. झाडावरील एका फांदीला असणारे मधाचे पोळे त्यांनी बरोबर हेरले, पोळ्याला माशा कमीच होत्या हे पाहून एकाने डायरेक्ट फांदी तोडून त्या माशा झाडल्या अन् मधाचे पोळे घेऊन खाली उतरला. मध जिथे साठवला जातो तो पोळ्याचा भाग त्याने बोटांनीच तोडून तोडून सर्वांच्या हातावर ठेवला. सर्वांनी गपागप तो तोंडात टाकून चॉकलेट सारखे खायला सुरूवात केली. मग मीही तो तुकडा तोंडात टाकला. आहाहा! काय तो मधाळ क्षण! असा नैसर्गिक ताजा मध मी पहिल्यांदाच चाखला होता. अन् टांझानियामध्ये या होद्झाबे लोकांसोबत शिकारीला आल्यावर, चालून थकल्यावर खाल्लेला तो मध अजूनच चविष्ट लागत होता...उरला सुरला मध चाटत आम्ही सर्वजण पुढे निघालो.

सूर्य पश्चिमेकडे येत होता, दुपार संपून सायंकाळचा प्रहर सुरू होणार होता. काट्या कुट्यातून चालून चालून थकवा जाणवू लागला होता. मी व माझा गाईड एका मोकळ्या जागी मोठ्या दगडावर जाऊन बसलो. टोळी अजूनही शिकार शोधत अमच्या आजूबाजूला काही अंतरावर फिरत होती. अर्ध्या तासाने तो दहा बारा वर्षाचा पोरगा ज्याच्याकडे मारलेले पक्षी सांभाळायला दिले होते तो आमच्या दिशेने येताना दिसला. एक काळ्याकुट्ट तोंडचे वानर त्याने पाठीवर टाकले होते. हे दृश्य पाहून अवाक झालो. त्याने जवळ येताच वानर आमच्या समोर धरले. व्हर्वेत जातीचे हे वानर दिसण्याच्या बाबतीत आपल्याकडील वानराशी मिळते जुळते होते पण आकाराने निम्मेच होते. ही वानरे इतकीच मोठी असतात असे गाईडने सांगितले. वानराच्या छातीत बाण लागला होता, जखम झालेल्या ठिकाणीं रक्ताचा डाग दिसत होता. त्या पोरा मागोमाग सर्वजण हळू हळू आमच्यापाशी जमा झाले. सूर्य मावळत होता. परत एकदा लाकडी पट्टी व छडीचा वापर करून त्यांनी आग पेटवली. सकाळी केली होती तशी मोठी शेकोटी केली. दिवसभरात केलेली शिकार आता या आगीत भाजून खाऊन ते सर्व पोट भरणार होते. पक्षांची पिसे वेगळी करून एक एक करून त्यांना आगीत टाकले. दोन जण त्या वानराला घेऊन त्याचे तुकडे करण्यासाठी बाजूला घेऊन गेले. कारण मला ते पाहवत नव्हते म्हणून मीच त्यांना बाजूला जायला सांगितले. त्यानंतर त्यांनी ते मांस आगीत भाजले आणि त्यांचे जेवण चालू झाले. मीही मग बॅगेत ठेवलेले बिस्कीट, ड्राय फ्रूट खाऊ लागलो. त्यांनी मला पक्षाचा लेगपिस खायला दिला. कसलाही मीठ-मसाला न वापरता डायरेक्ट भाजलेला तो लेगपीस बेचव लागत होता, मधुन मधुन करपट चव येत होती. तरीही त्यांचा मान राखण्यासाठी म्हणून मी तो कसाबसा फस्त केला. त्यानंतर काही वेळ आगीचा शेक घेऊन त्या पटांगणात खाली जनावरांच्या कातड्या हातरून आम्ही तिथेच झोपी गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी परत शेकोटी पेटली, बिड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला अन् आता बबून माकडाची शिकार करायची असा ठराव करून टोळी पुढे निघाली. तासाभराने एका माळरानावर गवताच्या आड बसलेली बबून माकडांची टोळी नजरेस पडली. तसे सर्वजण सावध झाले. चहूबाजंनी त्यांनी माकडांना घेरले. आणि कुत्र्यांना त्या माकडांच्या टोळीच्या दिशेने धाडले. माकडे दिसताच कुत्री जोरजोरात भुंकत त्यांचा पिच्छा करू लागली, माकडांनी तेथून पळ काढत जवळच्या झाडांवर उड्या घेतल्या. झाडांची पानझड झाल्यामुळे झाडावरील माकडे तिरंदाजास सहज टिपता येणार होती. त्याने पहिल्या झाडावर नेम धरला अन् एका मोठ्या बबूनच्या पाठाडात गाचकन घुसला तसा तो बबून ख्वाक ख्वाक करत खाली कोसळला. खाली पडताच कुत्र्यांनी त्याला रक्तबंबाळ केले अन् तिथेच त्याचा जीव गेला. टोळीतील एका सदस्याने धाव घेत त्याला ताब्यात घेतले अन् पाठीवर टाकले. ह्या बबूनची शिकार झालेली पाहून इतर बबून प्रचंड घाबरले अन् एकच कल्लोळ करत त्यांनी पाठीमागच्या झाडावर उड्या घेत पळून जाण्यासाठी धावाधाव केली. या गोंधळात काहींच्या उड्या चुकल्या अन् ते खाली कोसळतात तोच कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात आणखी एक बबून जखमी झाला अन् टोळीतील दोघांनी त्याला सहज ताब्यात घेतले, त्याची गर्दन मारून त्यालाही पाठीवर लटकावला. इकडे या खाली पडलेल्या बबूनची शिकार होते न होते तोच तिरंदाजाने आणखी एक मध्यम आकाराचा बनून अचूक टिपला अन् त्याच्या बाणाच्या प्रहारानेच बबून तिथेच आडवा झाला. काही मिनिटांत तीन बबून टोळीला मिळाले यामुळे टोळी आनंदी झाली. खूप दिवांपासून बबूनची शिकार टोळीने केली होती शिवाय बबूनचे मांस या लोकांचे सर्वात आवडते असल्याने ते आज आनंदित होते.

दुपार होण्यापूर्वीच पुरेशी शिकार झाल्याने आता सर्वजण परतीच्या प्रवासाला वस्तीकडे निघाले. अगदी माणसासारखे दिसणारे तीन बबून बॅग अडकवावी तसे तिघांच्या पाठीवर टांगलेले होते. जीव गेल्यामुळे उघडे पडलले तोंड, त्यातून बाहेर पडलेली जीभ, निष्क्रिय शरीर मला पाहवत नव्हते. परंतू बबून माकड मी कधी प्रत्यक्ष पाहिले नसल्याने मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी त्यांना जवळून पाहण्याची इच्छा होती. मी त्यांच्या जवळ गेलो. हाताचा पंजा उघडून बोटं न्याहाळू लागलो, तो हात, ती बोटं, त्यावरील नखं अगदी माणसा प्रमाणे होती. काही वेळ चालल्यावर थोडा विश्राम घेतला, एका बबूनला त्या लोकांनी फस्त केले अन् बिड्या ओढून मग परत चालायला लागले....मला आज इथे मुक्काम करायचा नव्हता त्यामूळे झपाझप चालत आम्ही मावळतीच्या आगोदर वस्तीवर आलो. वस्तीवर येताच आम्ही या हद्झाबे लोकांना निरोप दिला. सूर्य मावळत होता. गाईडने बाईक सुरू केली मी त्याच्या पाठीमागे बसून हद्झाबे टोळीला बाय बाय करत शहराच्या दिशेने निघालो.... शिकारीचा हा अस्सल रानटी अनुभव सोबत घेऊन विचारांच्या तंद्रीत मी कधी गाईडच्या घरासमोर आलो कळालेच नाही. दुचाकी थांबताच विचारांची तंद्री भंग झाली आणि मी त्या गाईडच्या घरीच मुक्कामाला थांबलो.

दुसऱ्या दिवशी परत मी हद्झा वस्तीवर जाणार होतो. भल्या सकाळी नाश्ता करून आम्ही दुचाकी वर हद्झा वस्तीच्या दिशेने निघालो. दीड दोन तासांचा प्रवास करून तिथे पोहोचालो पण दोन वयस्कर माणसे व काही स्त्रिया, आम्हाला पाहून त्यांच्या भोवताली घुटमळणारी अर्धनग्न लहान लहान मुले-बाळे हेच आम्हाला भेटले. गाईडने चौकशी केली की, शिकारीसाठी गेलेली माणसे कोणत्या दिशेला गेलीत, तेंव्हा त्यांचा मागोवा घेत पायवाट शोधत शोधत बाईकवरून रस्ता काढत आम्ही निघालो. अर्ध्या तासाभराने शिकारी टोळी नजरेस पडली, त्यांचा बिड्या ओढण्याचा कार्यक्रम सुरू होता. आज आम्ही मुद्दाम त्यांच्यासाठी शहरात मिळणाऱ्या मोठ्या बिड्या सोबत आणल्या होत्या. आम्ही त्या बिड्या त्यांना देताच ते खुश झाले, आपापल्या बिड्या कमरेला गुंडाळलेल्या कड दोऱ्यात बांधून आम्ही त्यांच्या सोबत पुढच्या प्रवासाला निघालो.

काही मिनिट चालून झाल्यावर टोळी एका मोठ्या झाडापाशी थांबली, त्या झाडाचे बुड खूपच मोठ्या घेराचे होते, त्यात खांद्याच्या उंचीवर एक ढोली होती. ही अशी अनेक झाडं या परिसरात सर्रास दिसत होती. या झाडांच्या आतील भाग पोकळ असतो याचा फायदा घेऊन घुबडं, हॉर्नबिल पक्षी अशा झाडाच्या खोडात राहत असत. हे असेच मोठ्या घेराचे झाड आमच्या समोर होते. त्याच्या ढोलीचे तोंड एवढे मोठे होते की टोळीतील एक सडपातळ सदस्य चक्क त्यातून झाडाच्या खोडामध्ये उतरला! त्यांनी आगोदरच आतमधून खुट्या मारून ठेवल्या होत्या ज्यावर उभे राहून ते खोडाच्या खालच्या बाजूस उतरत असत. हा सडपातळ सदस्य खोडात जाताच दोन एक मिनिटांनी ढोलीतून मोठ्या आकाराच्या मधमाशा बाहेर पडू लागल्या. म्हणजे तो आतमध्ये मधाचे पोळे मिळविण्यासाठी गेला होता होय! हा प्रकार पाहून मी चकित झालो. पाच एक मिनिटात तो ढोलीच्या तोंडाजवळ आला व मधाचे पोळे त्याने बाहेर सोपवले आणि तोही बाहेर आला. त्याच्या खांद्यावर, तोंडावर मोठ मोठ्या मधमाशा घोंगत होत्या, चिकट हातानेच तो त्या पकडून बाजूला करत होता. बऱ्याच माशांनी त्याला दंशही केला पण त्या दंशामुळे वेदनांचे लेशमात्र दुःख त्याच्या चेहऱ्यावर नव्हते, उलट आपण आतमध्ये कसे मोहोळ झाडले याच्या गप्पा मारत तो खिदळत होता. कालच्या प्रमाणे आजही सर्वांनी थोडे थोडे पोळे हातावर घेतले अन् ते तोंडात टाकून पुन्हा एकदा त्या मधाळ क्षणाचा आनंद लुटला! या मधाची चव काही औरच! पोळ्याच्या काही भागात मधमाशांची लहान आळी सारखी पिले होती, ती पिलेही पोळ्या सकट त्यांनी फस्त केली....असे केल्याने त्यांना आवश्यक व्हिटॅमिन मिळत असे, आता यांना व्हिटॅमिन वगैरे काय याची कल्पनाच नव्हती त्यामूळे हे खाल्ल्यावर ताकद येते असे ते म्हणाले. उरला सुरला बोटांना लागलेला मध चाटत आम्ही पुढे निघालो. काही अंतरावर पुढे गेल्यावर एका झुडपा जवळ थांबलो. या इथे लहान लहान बोरा सारखी असणारी फळे लागलेली दोन तीन दहा बारा फूट उंचीची झाडं होती. त्याला ते इक्काचे झाड म्हणतात. अगदी बोराचे झाड असावे तसे पण खोड बुटके अन् फांद्यांचाच पसारा झालेला होता. या निमुळत्या फांद्यांचा उपयोग बाण बनवण्यासाठी होतो हे त्यांनी सांगितले. अन् काही सरळ फांद्या तोडून त्यांच्या छड्या तयार केल्या. या छड्या वस्तीवर गेल्यावर टोकदार बनवून, त्यांना नीट सरळ बाणासारखा आकार देऊन त्यांचे सुंदर बाण बनणार होते. त्या झाडाची लहान लहान फुटाण्याच्या आकाराची बोरं खाण्यालायक होती. आम्हीही ती तोंडात टाकून त्यांचा आस्वाद घेत टोळीच्या मागोमाग चालू लागलो.

पुढे काही छोटी छोटी झुडपं वाटेच्या बाजूला पसरलेली होती. याच झुडपांतून काही खुडबुड ऐकू येताच सर्वांनी त्या जागेस घेरले अन् अंदाज बांधून हातातील बाण, भाले, मोठ्या काठ्यांनी एकच कल्लोळ करत हमला केला. त्यांचा मार बसताच झुडुपात लपलेल्या प्राण्यांचा ची-ची असा किंचाळणारा आवाज कानी पडत होता. काही मिनिटांत दोन मोठ्या आकाराचे व दोन मध्यम असे मुंगसा सारखे प्राणी त्यांनी जखमी अवस्थेत झुडुपातून बाहेर काढले. दातांनी त्यांच्या नरडीचा घोट घेत त्यांना निर्जीव करून त्यांच्या शेपट्या कमरेला बांधून त्यांना लटकावले. अश्या छोट्या छोट्या प्राण्या पक्षांची शिकार करत करत दुपार झाली. आतापर्यंत आठ दहा किलोमीटर जंगलात-डोंगराळ भागातील त्या झाडीत आतमध्ये आम्ही आलो होतो. मोकळी जागा पाहून टोळीने तिथे थांबण्याचा निर्णय घेतला. आपापल्या जवळील शिकार, साहित्य खाली उतरवत आग पेटवण्यासाठी काटक्या कुटक्याची जमवाजमव सुरु झाली. आग पेटवण्यात माहीर असलेल्या दोघांनी लाकडी पट्टी व छडीच्या साहाय्याने काही मिनिटांच्या मेहनतीनंतर आग पेटवली. केलेली शिकार आगीत भाजून भोजन पार पडले. काही वेळ आडवे होऊन झाडांच्या सावलीत आम्ही विश्रांती घेतली. मग चारच्या सुमारास टोळीने विस्तवावर आम्ही दिलेल्या मोठ्या बिड्या पेटवून त्याचा धूर ऐटीत आकाशात सोडला. त्यांना या बिड्या ओढून मजा आली अन् हसत खिदळत पुन्हा सर्वजण शिकारीला निघाले.

तासाभराची पायपीट झाल्यावर एका झुडपाच्या सावलीत एक हरीण विसावा घेत असलेले दिसले अन् त्याला वेढा घालून कल्लोळ करत टोळी चहूबाजूंनी त्याच्यावर दगड- भाल्याने वाऱ करू लागली. काही क्षणातच एक भाला हरिणाच्या मागच्या पायाच्या मांडीवर घुसला अन् ते तिथंच थांबले. त्याला ताब्यात घेऊन त्याच्या नरडीचा घोट घेत त्याची जीवन यात्रा संपवली. मध्यम आकाराचे हे हरीण या सर्वांसाठी पुरेसे होते. तरीही एखादे बबून माकड सापडले तर हरिणासोबत ते वस्तीवरील कुटुंबीयांसाठी घेऊन जाता येईल म्हणून माकडांचा मागोवा घेत आम्ही निघालो. कालच्या शिकारीमुळे माकडे लांब पळाली होती. सूर्य मावळला पण माकडांचा काही पत्ता सापडेना. टॉर्चच्या प्रकाशात वाट काढत आम्ही टोळीच्या मागोमाग चालत होतो. काही अंतर पार करताच पुढे ख्याक-ख्याक ची-ची असा माकडांचा आवाज कानी पडू लागला. पुढे कुठेतरी माकडे विसावा घेत आहेत याचा अंदाज येताच सर्वजण सावध झाले. अंधारात शिकारीसाठी धीट सदस्यांना निवडून बबूनच्या टोळीवर कुत्र्यांच्या व भाल्याच्या साहाय्याने हल्ला करायचा प्लॅन ठरला. बबून आपल्यावरही हल्ला करतात व त्यांचा मोठ्या दातांच्या सुळक्यांनी चावा घेतात तेव्हा खूप मोठी जखम होते यामुळे केवळ धीट सदस्यांची या हल्ल्यासाठी निवड करण्यात आली. टॉर्च चालू ठेवली तर बबून पळून जातील म्हणून अंधारातच हल्ला करायचा होता. टोळीतील पाच सदस्य पुढे झाले अन् दहा मिनिटांच्या शांततेनंतर बबून अन् हे शिकारी यांच्यात धुमश्चक्री सुरू झाली. बबून च्या किंचाळ्या, ख्वाक-ख्वाक, कुत्र्यांचे भुंकणे, ओरडणे व टोळीतील सदस्यांची आरडा ओरड ऐकून भीती वाटू लागली. तिकडे काय घडले असेल या चिंतेने वातावरण गंभीर झाले. बबूनचा आवाज हळू हळू कमी व दूर होत गेला व माकडे पळून गेली असावीत असा अंदाज बांधून त्या हल्ला करणाऱ्या सदस्यांनी आवाज देत टॉर्च चालू करण्यासाठी सांगितले. आम्ही झपाझप त्यांच्याकडे जाऊन थांबलो. एकही माकड हाती लागले नव्हते. माकडे जिकडे धावली त्या दिशेने टॉर्च फिरवत त्यांचा शोध सुरू झाला. अचानक एका उंचवट्यावर दगडाला खेटून एक मोठे माकड इकडे तिकडे पाहत बसल्याचे टॉर्च च्या उजेडात दिसले. आमच्यापासून शंभर फुटाहून जास्त लांब ते माकड बसले होते. टोळीतील तिरंदाज पटकन पुढे होऊन शेजारच्या उंचवट्यावर उभा राहिला. माझ्या गाईडने त्याची टॉर्च माकडावर रोखून धरली अन् तिरंदाजाने काही क्षणात त्यावर नेम धरून बाण सोडला. सपकन गेलेला बाण पुढच्याच क्षणी मकड्याच्या उजव्या बगलेखालील पोटाच्या भागात घुसला अन् माकड अडखळत अडखळत खाली झुडपात पडले. तिरंदाजाचा नेम पाहून मी थक्क झालो! एवढ्या लांबून त्याने अचूकपणे भक्ष्य टिपले होते. टोळीतील सदस्य उत्साहाने आवाज काढत जल्लोष करू लागले. पडलेले माकड सकाळी येऊन शोधून काढू असा निर्णय घेऊन सर्वजण माघारी फिरून मोकळ्या जागी थांबलो. परत आग पेटवली व हरिणाच्या मांसाचे तुकडे ग्रहण करून तिथेच मुक्काम ठोकला.

दुसऱ्या दिवशी सूर्य उगवतीला येताच टोळीतील सदस्यांनी रात्री पाडलेले माकड शोधून पाठीवर टाकून आणले. त्यानंतर एका पाण्याच्या डबक्यात तोंड बुडवून सर्वांनी पिचकाऱ्या मारल्या, पाणी पिले. वस्तीवरून आणलेल्या उगाली नामक पिठाचे गोळे करून पाण्यात बुडवून त्याचा नाश्ता केला. हे उगाली म्हणजे तेथील मक्याचे पीठ होते. हे पीठ ते शेती करणाऱ्या लोकांकडून आणतात कारण दररोज शिकार मिळेल की नाही याचा भरवसा नव्हता व नुसत्या शिकारीवर वर्षभर पोट भागत नव्हते म्हणून उगालीची त्यांनी आहारात नाश्ता म्हणून खायला सुरूवात केली होती. नाश्ता झाल्यावर शिल्लक राहिलेले हरीण अन् अख्खे बबून घेऊन आम्ही सर्वजण वस्तीकडे निघालो. काही वेळ झपाझप पावले टाकत, काही वेळ विश्रांती घेत तीनच्या सुमारास आम्ही जिथे दुचाकी सोडली होती तिथे आलो. गाईडने दुचाकी सुरू केली, मी मागे बसलो. वस्ती येथून पाच सात किलोमिटर लांब होती. मग माझ्या मागे एक तरुण सदस्य पाठीवर माकड टांगून अन् खांद्यावर हरीण घेऊन गाडीवर बसला. आम्ही तिघे अर्ध्या तासात वस्तीवर आलो. बबून, हरीण अन् कॅरीबॅग मध्ये गुंडाळून आणलेले मधाचे पोळे पाहून वस्तीवरील महीला व बालकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले. महिला लगेच बबूनला साफ करण्याच्या कामाला लागल्या. लहान मुले मध चाखू लागली. सगळीकडे आनंदाचे वातावरण तयार झाले. आम्ही त्या मोठ्या झाडापाशी येऊन विसावलो. सहाच्या सुमारास शिकारी टोळी वस्तीवर येताच लहान मुलांनी त्यांच्याकडे धाव घेत त्यांना मिठ्या मारून त्यांचे स्वागत केले. तासाभराने बबून अन् हरिणाचा आस्वाद घेऊन सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळत होता. हळूहळू स्त्रिया शेकोटी शेजारी जमा होऊन गाऊ लागल्या, त्यांच्या तालावर नाचत पुरुषांनी शेकोटीभोवती घेर धरला अन् तेही गाऊ लागले. त्या शेकोटी भोवती गिरक्या मारत तालावर एक साथ नाचू लागले. त्यांच्या या गाण्याने परिसर दुमदुमून गेला. आम्हीही त्यात सामील होऊन मनसोक्त नाचलो. स्वतः नाचाण्यापेक्षा लांबून या सर्वांचे ते विलक्षण आनंदाचे क्षण पाहून मनाला जे समाधान मिळाले ते काही औरच! जीवन म्हणजे काय याचे रहस्य या हद्झाबे लोकांकडे पाहून उलगडून गेले. पोट भरण्याची धडपड, जगण्याचा संघर्ष अन् रोजच्या संघर्षानंतर मिळालेल्या गोष्टी आपल्या कुटुबियांसमवेत, सोबत्यांसमावेत वाटून ते क्षण आनंदाने साजरे करणे अन् पुन्हा नव्या जोमाने पुढच्या संघर्षासाठी छाती ठोकून उभे राहणे हेच तर जीवन आहे! जीवनाचे हे गमक मिळवून ते आनंदचे क्षण डोळ्यात, मनात साठवून मी त्यांचा निरोप घेत गाईड सोबत बाईकवर त्याच्या घराकडे निघालो....

कालपर्यंत क्रूर वाटणाऱ्या लोकांनी आज जीवनाचे रहस्य उलगडून दाखवले होते अन् त्या नव्या लागलेल्या शोधाने मनाला मिळालेली विलक्षण शांतता मी यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. जीवनात संघर्ष असल्याशिवाय काहितरी मिळवल्याचे समाधान मिळतच नाही आणि त्यामुळेच आपल्याला काहीच न करता खूप काही मिळालं की आपण भरकटतो, मनाला नसते रोग होतात, आपण आपला हुकूम दुसऱ्यावर चालवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून एकतर संघर्ष करून मिळवले पाहिजे किंवा जर विरसात मध्ये सर्व काही मिळाले असेल तर त्यातून नवनिर्माणाची खटाटोप चालू ठेवली पाहिजे, इतरांना संघर्षाचा मार्ग दाखवणारा मदतीचा हात दिला पाहिजे, संघर्षातून मुक्त करणारा नव्हे. संघर्षातून मुक्त करणारा हात आपण कमजोर व्यक्तींना दिला तर कालांतराने सर्व मानवजात कमजोर होऊन जगण्यात काहीच अर्थ नाही असे म्हणत जीवन संपवतील की काय याची शंका निर्माण होते.