evening festival in Marathi Moral Stories by विश्र्वास पाराशर books and stories PDF | संध्यापर्व

Featured Books
  • You Are My Choice - 41

    श्रेया अपने दोनो हाथों से आकाश का हाथ कसके पकड़कर सो रही थी।...

  • Podcast mein Comedy

    1.       Carryminati podcastकैरी     तो कैसे है आप लोग चलो श...

  • जिंदगी के रंग हजार - 16

    कोई न कोई ऐसा ही कारनामा करता रहता था।और अटक लड़ाई मोल लेना उ...

  • I Hate Love - 7

     जानवी की भी अब उठ कर वहां से जाने की हिम्मत नहीं हो रही थी,...

  • मोमल : डायरी की गहराई - 48

    पिछले भाग में हम ने देखा कि लूना के कातिल पिता का किसी ने बह...

Categories
Share

संध्यापर्व

क्वीक बाईट रेस्टॉरंट मधे गरम गरम साबुदाणा खिचडी व चहा घ्यायचा असा निर्णय करून मी घरातून सकाळी सहाच्या सुमारास निघालो. ताम्हिणी घाटाच्या अलिकडे असलेलं हे रेस्टॉरंट मला आवडायचे. दीड दोन तासांच्या ड्रायव्हिंग नंतर, येथील अर्ध्या तासाचा मुक्काम सुखावह वाटायचा. या मार्गावरचा हा माझा आवडता थांबा. नेहमीप्रमाणे, मी गाडी पार्किंग लॉट मधे नेली. एंजीन बंद करून दार उघडत असताना माझी नजर समोर खिळून राहिली. रेस्टॉरंट च्या व्हरांड्यात एक महिला मोबाईल वर बोलत होती. ती अतिशय सुरेख दिसत होती. तिचा पेहराव म्हणजे साडी सुरेखच होती. तिच्या बोलण्यात व हालचालीत सहजता होती. नजर माझ्या गाडीकडे च होती. फोनवर चे बोलणं थांबवून ती गाडीत काही तरी शोधत असल्याचे जाणवले. मी खाली उतरून गाडी बंद केली आणि रेस्टॉरंट कडे चालू लागलो. डोळ्यांच्या कडेने नजर टाकली .ती पर्समध्ये मोबाईल टाकून माझ्या मागोमाग येत होती. मी रेस्टॉरंट चे दालनात उभा राहून
बसायला जागा बघत होतो. तेव्हड्यात वेटर समोर आला व "या इकडे, जागा देतो" म्हणाला. तिलाही बसायला जागा हवी होती. शेवटून दुसऱ्या रांगेतील एका टेबलच्या दोन रिकाम्या खुर्च्यांवर आम्हाला त्यानं बसविले व काय आणू विचारले. माझा नाष्टा मी मागविला. तो प्रश्र्नार्थक मुद्रेने बघत होता, म्हणून मी त्या महिलेच्या दिशेने मान वळविली. तीनं स्वतः साठी अननस ज्यूस मागविला.
माझा चहा संपताना ,तिनं "माफ करा, आपणाबरोब गाडीत आणखी कोणी आहेत का?" विचारले.मी थोडेसे साशंकता व संभ्रमात प्रश्र्नार्थकपणे "अंsss ,का हो?" विचारले. मग जरासं हसत मागं रेलून ती उत्तरली," मी डॉ. अरूंधती. दापोलीत माझे छोटंस इस्पितळ आहे आणि मला तेथे शक्य तितक्या लवकर पोहचायला हवंय. माझी कार येथून सुमारे दीड-दोन किलोमीटर अंतरावर बंद पडली. सुधाकर नं , या रेस्टॉरंट चा व्यवस्थापक, मोटरसायकलवरून मला येथपर्यंत आणले. गाडीजवळ चालक आहे आणि मी माझ्या मेकॅनिकला बोलावलंय. इस्पितळात एक महिला बाळंतपणासाठी आलेली आहे. तसं, माझी मदतनीस डॉक्टर आहेच तिथे, पण काही समस्या निर्माण झाल्यास माझे हजर असणे गरजेचे आहे. म्हणून आपण जर मला, घाटाचे खाली , निदान मुंबई गोवा हमरस्त्यावर सोडलेत तर मी तिथून पुढे जायची सोय करू शकेन." तिच्या बोलण्यात रूग्णांची काळजी जाणवत होती. मी लगेचच "या, आपण निघूया " म्हणालो आणि उभे रहात व्यवस्थापकाच्या दिशेने चालू लागलो. ती पण मागे आली. व्यवस्थापकानं पैसे मिळाल्याचे सांगितले. मी चमकून डाॅ. अरूंधती कडे बघितलं. तिनं चला सांगते अशी खूण केली. मी गाडी उघडून शेजारच्या आसनावरील कागदपत्र मागील आसनावर ठेवले. गाडी चे दार उघडून तिला आत येण्या विषयी सुचविले.
प्रवासात तिनं स्वतः विषयी बरीच माहिती दिली. गेली पंचवीस वर्षे ती दापोलीत सेवा प्रदान करीत आहे. मुळची मुंबईची. एम् बी बी एस् करून पुण्यात पोस्ट ग्रॅज्युएशन करतांना डॉ. प्रभासशी ओळख व नंतर लग्न करून ती दापोलीत आली. सुरवातीला पांच-सहा वर्षे दवाखाना चालवून नाव कमावत दोघांनी इस्पितळ उभारले. पुढे कन्यारत्न आले. आणि पाच वर्षांपूर्वी चारचाकी ला एका कंटेनर ने धडक दिल्याने मुलीचा मृत्यू झाला. त्या धक्क्याने डॉ. प्रभासना जागेवरच ह्रुदयविकाराचा तीव्र धक्का बसला अन् त्यातच त्यांचा मृत्यू ओढवला. मी सुन्न होऊन ऐकत होतो. सहानुभूती दर्शवत मी विषय बदलणार एव्हढ्यात गाडीसमोर एक गाय अचानक आली. मी झटकन ब्रेक लावले आणि गाडी थांबवली. तरीही, डॉ. अरूंधती चे डोके समोरच्या काचेला धडकले. मी झटकन वळून तिला आधार द्यायचा प्रयत्न केला. परंतु तत्पूर्वीच तिने स्वतःला सावरले. मी क्षमा याचना केली. "त्या गाई मुळे सारे घडले, तुम्ही योग्य वेळी ब्रेक लावलेत, अन्यथा गाईला, गाडीला व कदाचित आपल्यालाही काही इजा झाली असती. परमेश्वराचे आभार मानुयात." अन्य काही चर्चा न करता मी गाडी सुरू केली.
थोडे पुढे गेल्यावर, समोरच्या एका वळणावर एका मोटरसायकलवरून दोघे येताना दिसले. डॉ. अरूंधतीनं गाडी थांबवायची विनंती केली. गाडी थांबेपर्यंत ते दोघे पुढे जावू लागले, डॉक्टरांनी आवाज दिला" गणेश" . त्यानही बघितलं असल्यामुळे असेल कदाचित, पण वाहन वळवून तो माझ्या गाडीमागे येवून थांबला. डॉक्टर खाली उतरून त्यांच्याकडे गेल्या आणि स्वतः च्या गाडीला काय अडचण आली ते सांगून सध्या गाडी व चालक कोठे आहेत हेही सांगितले. परत गाडी कडे येत म्हणाली, " अरे, सुधाकर कडे पैसे ठेवलेत, तिघेही नाष्टा, जेवण करून घ्या."
मुंबई गोवा हमरस्त्यास दोन-तीन किलोमीटर बाकी असताना डॉक्टर अरूंधती म्हणाल्या "थोड्यावेळाने एका रेस्टॉरंट जवळ आपण गाडी थांबवून थोडासा चहा घेऊया. " मी होकार दिला. मलाही खरं म्हणजे आलेला तणाव कमी करावयाचा होता. त्या प्रमाणे गाडी थांबवून आम्ही रेस्टॉरंट मधे जाऊन बसलो. अपेक्षेप्रमाणे डॉक्टर अरूंधतीनं चहा आणि टोस्ट मागवले. त्याबरोबर मी म्हणालो," आता बिल मी देणार". डॉक्टर हसल्या. बोलण्याच्या ओघात त्यांनी मला येथे येण्याचा हेतू विचारला. मी डॉक्टरांना संपूर्ण सत्य न सांगता केवळ मला या भागात यायला आवडते व मी नोकरीत असताना अनेक वेळा येथे आलेलो आहे. इकडे आल्यावर ताजे मासे खाणे हा माझा आवडीचा छंद असल्याचे सांगितले. पुन्हा गाडीत न बसता डॉक्टर अरूंधतीनं स्वतः चे ओळखपत्र माझ्या हातात ठेवले व मनापासून धन्यवाद देवू लागली. तेव्हा मी तिला गाडीत बसण्याची विनंती केली आणि मी दापोलीतच जाणार असल्याचे सांगितले. तिच्या चेहऱ्यावर आनंद जाणवला. "अरे वा ! म्हणजे मला अजून काही वेळ आपला सहवास लाभणार आहे तर." " होय, मी आपल्याला ईस्पितळा पर्यंत सोडणार आहे."
त्या नंतर सुमारे दोन अडीच तास बऱ्याच गप्पा झाल्या. अरूंधतीला नाटकांची बरीच आवड दिसली. काल पुण्यात नाटक बघायला आली होती व आज सकाळी परत येताना तिच्या चारचाकीनं त्रास दिला होता. आणि याच कारणामुळे आमची भेट घडली.
तिच्या ईस्पितळा जवळ गाडी थांबवली. आभार मानताना " या ,आत या. आणि जेवूनच जा. पार्वती फार छान करते मासे. ( तिनं जीभ चालल्याचे जाणवलं) अरे, पण आज एकादशी, पार्वती अजिबात हात लावणार नाही माश्यांना. साधं जेवूयात." एकादशीचा धागा पकडून मी म्हणालो "आता मासे खायलाच येईन . मी अजून तीन-चार दिवस आहे दापोलीत." तिचा निरोप घेवून मी नेहमी च्या ठिकाणी , साने हिल व्ह्यू रिसाॅर्ट वर मुक्कामी गेलो.
हा हिल व्ह्यू रिसाॅर्ट मला फार आवडतो. नोकरीत असताना, माझ्या कंपनीतील प्रतिनिधी किंवा कंपनीचे व्यापारी ,सर्वांच्या सभा मी या रिसाॅर्टच्या मोठ्या कक्षात घेत असे. माझं काॅटेजही ठरलेलं होतं. आजही मी त्याच , रिसाॅर्टच्या नैऋत्य कोपऱ्यातील काॅटेजमध्ये रहाणार होतो.
जेवण उरकून मी आडवा झालो. तत्पूर्वी सुलक्षणाला संदेश पाठवला," आत्ताच पोहचलो. थोडासा थकलोय. आजच्या ऐवजी उद्या सकाळी दहा वाजता येतो. चालेल ना?" थोड्याच वेळात तिचा "चालेल "असा निरोपाचा संदेश आला. सकाळ पासून च्या घटना आठवत, डोळा केव्हा लागला कळलं नाही.सायंकाळी साडेसहा वाजता जाग आली, तीही वनीताच्या फोन नं . वनीता, माझी थोरली मुलगी ‌. पती उदय बरोबर अमेरिकेत वास्तव्यास. तिकडं गेल्यावर, उदयच्या आग्रहास्तव स्वतःही एम् बी ए समकक्ष पदवी मिळवली. गेले सहा वर्षे दोघे व नात ज्ञानदा आनंदात रहात आहेत. दोघेही एकाच बॅंकेच्या एकाच शाखेत काम करतात. 'बाबा, कुठे आहेस? आत्ता बोलू शकते नं? काय झालं?". तिला थांबवत,"वनीता, अरे किती प्रश्र्न हे? जरा धीर धर.तुला वाटतंय तेव्हढे सोपं काम नाही हे. आणि मी आज सुलक्षणाला नाही भेटू शकलो. उद्या जाणार आहे." "बाबा, पण तू असा किती दिवस रहाणार आहेस तिथं?. जाहिरात देवून ही बरेच दिवस होवून गेलेत." , " अरे बेटा, हे काय स्कुटर विकण्या इतकं सोपं वाटतं का?. उर्वरीत आयुष्याचा जोडीदार हवाय मला. "
ती सायंकाळ रिसाॅर्ट भोवती फिरण्यात गेली.
ठरल्याप्रमाणे सकाळी दहाला मी सुलक्षणा च्या घरासमोर ' मास्तरांची वाडी' येथे पोहचलो. वाडीचे फाटक उघडेच होते . गाडी आत घ्यावी कि नाही या संभ्रमात असताना, एक खाकी अर्धी चड्डी ,वर खाकी कुडता घातलेला वयस्कर व्यक्ती लांबूनच ओरडला," सायबानु, आंत घ्या गाडी." तो जवळ आल्यावर मी विचारले," आत वळवायला जागा आहे ना?" "बक्कळ" तो म्हणाला. आंत, आणखी एक गाडी उभी होती. मी त्या गाडी मागे माझी गाडी लावली. मला घेऊन म्हातारबाबा घराच्या प्रवेशद्वारा पर्यंत आला. "या, आंत या." म्हणत, दारात एक मध्यम वयीन महिला हसऱ्या चेहऱ्याने उभी होती. बहुतेक सुलक्षणा असेल ,हा माझा अंदाज. मी स्थानापन्न झालो. तिनं
आत जाऊन पाणी आणले. तिनं स्वतः ची ओळख करून दिली. " मी सुलक्षणा, येथील महाविद्यालयात सोशाॅलाॅजी ची प्राध्यापक आहे. आम्ही येथे सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी आलो. बाबा आणि आई, दोघेही शिक्षक. दोघांचीही पहिली नेमणूक, साकुर्डे गावातील शाळेत झाली. पुढे, शेट्ये सरांचा ; येथील शाळेचे मुख्याध्यापक, घनिष्ठ परिचय झाला. त्यांनी स्वतः ची ही वाडी, बाबांना घ्यायला लावली. ते स्वतः निवॄत्ती नंतर मुलाकडे, पुण्यात स्थायिक झाले. त्याच सुमाराला, आई, बाबांची येथील शाळेत नेमणूक झाली. ह्या वाडीत रहायला आल्या नंतर, दोनच वर्षांत बाबा सर्पदंशाने निवर्तले. नंतर, आई आणि शंकर मामा नं ही वाडी जतन केली." " आज काॅलेज नाही? " मी विचारले. "आत्ताच आले परत, रजा घेऊन" सुलक्षणा म्हणाली. "चहा घेणार कि कोकम सरबत?" तिचा प्रश्र्न. "पण त्यापूर्वी माझी थोडी अधिक माहिती देतो.. आपल्या मातोश्रींनाही बोलावता ना? " मी.
सुलक्षणा आईला घेऊन आली. साधारण पंचाहत्तरी गाठलेली, सावळी व कॄष , थोडी पाठीत झुकलेली वाटली. त्या खुर्चीत स्थिरावल्यानंतर मी माझा परिचय देवू लागलो. " माझ्या पून:र्विवाहाच्या जाहिरातीस आलेल्या तुझ्या प्रतिसादाला दिलेल्या उत्तरात मी बरीच माहिती दिली आहे. माझी नौकरी संपून पाच वर्षे झाली आहेत. माझे वय आजमितीला पासष्ट आहे. माझ्या दोन्ही मुली स्वतःच्या संसारात मग्न आहेत. मोठी वनीता , पती उदय व कन्या ज्ञानदा सह अमेरिकेत स्थायिक आहे. धाकटी सविता, पती सुयश बरोबर सिंगापूरला असते. दोघीही नोकरी करतात. सविता खेरीज इतर तिघांचा माझ्या पूनम:र्विवाहास मनापासून पाठिंबा आहे. सुयश, सविताला समजावतोय, आणि वनीताही तिला समजावणार आहे. त्या दोघांनाही सविताच्या संपूर्ण होकाराची खात्री आहे. पुण्यात माझा ३ BHK चा फ्लॅट आहे. पत्नी, पाच वर्षांपूर्वी निवर्तली. आता घरात एकटाच असतो. नको वाटते एकटेपणा. म्हणून, मुली व जावयांशी विचार विनिमय करून हा निर्णय घेतलाय. फिरायला मनापासून आवडते. आर्थिक दॄष्ट्या सक्षम आहे. याशिवाय अधिक काही माहिती हवी असल्यास विचारू शकता." मग सुलक्षणा नं विचारले," पुणे सोडून तुम्ही इथपर्यंत कसे आलात या मोहिमेसाठी?" प्रश्र्न रास्तच होता. " बरोबर आहे. मी जाहिरात देण्यापूर्वी, पून:र्विवाहाशी निगडित संस्थांशीही संपर्क साधला. एकतर, त्यांच्याकडे पूर्ण माहिती नसायची, किंवा पसंत पडलेल्या व्यक्ती चा आधीच पून:र्विवाह झालेला असायचा. जाहिरातीला पुण्यातूनही प्रतिसाद आला. पण , कुणाची मुलाच्या परदेश शिक्षणाच्या खर्चाची मागणी , तर एकीनं स्वतः चे नावे प्रथम ठराविक रक्कम मुदत ठेवीत हवी म्हणून सांगितले. अशा विविध कारणांनी तर मी येथे येवून तुला भेटायचे ठरवले." यावर दोघींचे ही समाधान झाले असावे. तिची आई खुर्चीतून उठत," बसा तुम्ही बोलत. लक्ष्मे s s यांना मोदक दे हो आधी.," सांगून आंत गेली. सुलक्षणा नं आतून डीश मधे दोन मोदक आणले.मी डिश घेऊन जवळच्या टेबलवर ठेवली. " तुला अजून काही विचारायचं आहे का?", ...नसल्यास,मला एक विचारायचे आहे."
"जरूर विचारा" सुलक्षणा.
"तुझ्या माझ्या वयात तसे बरेच अंतर असताना तू संपर्क का साधलास ? मला जाणून घ्यायचे आहे"
"होय, आपल्या वयातील फरक मी जाणते. माझ्या मते वयातील अंतरा पेक्षा विचारांतील अंतर पती पत्नीच्या सहचर्यावर परिणाम करते. हे अंतर जेवढे कमी तितके सहचर्य सुखावह असते. तसेही, या वयात लग्न करताना सर्वच गोष्टींची अपेक्षा ठेवणे संयुक्तिक वाटत नाही. त्यामुळे मला तुमचा समक्ष भेटीचा प्रस्ताव आवडला. एकाच भेटीत सर्व गोष्टींचा उलगडा शक्य नाही हेही मला पटते. उर्वरीत आयुष्याचा निर्णय एका भेटीत अशक्य वाटतो."
तिच्या या उत्तराने मला समाधान वाटले.
मी मोदकांचा आस्वाद घेतला. फारच चविष्ट आणि सुरेख होते. अत्यंत पातळ पारी ,आतले सारण दर्शवित होती. तिच्या आईने बनविले होते.
निघताना तिनं सांगितलं, कि आईच्या आजारपणामुळे तिला पुण्याला येणं लगेच शक्य नाही व पुढील भेटही दापोलीत व्हावी अशी तिची अपेक्षा आहे. त्या दोघींचा निरोप घेवून मी रिसाॅर्टवर परतलो.
यथावकाश, वनीता ला सकाळचा सर्व वॄत्तांत कथन केला. तिचेही मत मी आणखी तीन चार दिवस येथेच राहून, सुलक्षणाशी अधिक संवाद साधावा असेच होते. सायंकाळी, सहज फिरायला बाहेर पडलो. बाजारात आल्यावर, शेव्हींग क्रीम संपत आल्याची आठवण झाली. समोरच दिसणाऱ्या मेडिकल स्टोअर मध्ये जावू लागलो. दुकानाच्या पायऱ्या चढताना समोरुन सुलक्षणा येताना दिसली. ओळखीच्या स्मितहास्याने एकमेकांना सामोरे गेलो. तिला आश्र्चर्य वाटल्याचे जाणवले. मी " रहाणार आहे अजून तीन-चार दिवस. तू कशी इकडे?"
"आई ची औषधे आणायला आले होते. " तिच्या आईला कर्करोगाने पछाडले असल्यानं, मुंबई च्या डाॅक्टरांची ट्रीटमेंट सुरू असून, डॉ. अरूंधती येथे लक्ष देते हे समजले. "मी, तुला पुन्हा भेटू इच्छितो, चालेल ना?" यावर," ठीक आहे. कधी येताय?" असं विचारले. मी तिला उद्या सकाळी दहा वाजता रिसाॅर्टवर येण्याचं सुचवून, जेवणही एकत्र घेवू असे सुचवले. हसून तिने होकार दिला व निरोप घेतला.
त्या नंतर मी डॉ. अरूंधती च्या इस्पितळात गेलो. परंतु, ती एका शस्त्रक्रियेत व्यस्त असल्याने, तेथे थांबलो नाही.
सकाळी बरोबर दहा वाजता डोअर बेल वाजली. मी दार उघडले. समोर सुलक्षणा उभी होती. तिनं स्वतः ची कार माझ्या काॅटेज पर्यंत आणली होती. माझे लक्ष गाडीकडे गेले. "लाईट सुरूच आहेत" मी म्हणालो. "अरेच्या!! " म्हणत ती मागे वळली व गाडी कडे जावू लागली. कालच्या भेटीत लक्षात न आलेली गोष्ट समजली. तीचे केस लांबसडक व बांधा सुडौल होता. ती आंत आल्यावर मी दोघांसाठी काॅफी बनविली. जेवणाला बराच वेळ होता. गप्पा सुरू झाल्या. तिला टेबल वर काही सीडी दिसल्यावर, जवळ जाऊन बघितल्या. "अरे वा! गाण्याची आवड दिसते तुम्हाला. मलाही डाॅ. सलील कुलकर्णींची गाणी खूप आवडतात. अगदी वेगळ्या धाटणीचे असते त्यांचे गायन व संगीत. " " मला संगीत आवडतं, पण मी काही त्यातला जाणकार नाही." तिला सिनेमा जास्त आवडतो तर मला नाटक. क्रिकेट चे दोघेही शौकीन. फिरणे व स्थलदर्शन दोघांनाही भावते. वाचनाची आवडही सारखीच. वेगवेगळे विषय येत गेले व गप्पा सुरूच राहील्या. जेवताना तिच्या आवडी जाणून घेतल्या. तिला स्वयंपाक येतोही अन् करणेही आवडते.
जेवणानंतर ती निरोप घेवून निघाली. " पुन्हा कधी भेटशील" मी विचारले. त्यावर "कळवते" म्हणाली.
तिचा किंवा माझा काहीच निर्णय होत नव्हता. हे निश्र्चित होते कि ती आईला सोडून लगेच पुण्यात येवू शकणार नव्हती. आणि मी कायमचा येथे राहू शकत नव्हतो. काही मार्ग काढण्यासाठी पुन्हा भेटणे गरजेचे होते.
संध्याकाळी चार चे दरम्यान डॉ. अरूंधतीचा फोन आला. सुर्यास्त बघायला आवडत असेल तर लवकर या. मुख्य निमंत्रण रात्रीच्या भोजनासाठी आहे. पार्वती , मासे बनवणार आहे. लवकरच या.
मी साडे पाचच्या नंतर पोहचलो. आज दवाखान्यात गर्दी नव्हती. वर जाऊन तिसऱ्या मजल्यावरील अरूंधती च्या घराची बेल वाजवली. स्वतः अरूंधती नं दार उघडले. तिचा हसरा व प्रसन्न चेहरा काही सुचवित होता. आत दिवाणखान्यात बसलो. " ही इमारत तीन मजली आहे. आम्ही आणखी वरच्या मजल्यावर केवळ एक खोली केलेली असून त्याला तीन फुटांच्या वर सर्वत्र पारदर्शक काचा बसविल्या आहेत. त्यामुळे, हवामान छान असल्यास सूर्यास्त सुरेख दिसतो. अजून दहा पंधरा मिनिटांनी आपण वर जावू. तोपर्यंत चहा चालेल ना?". तीनं चहा व भजी आणली. त्यांचा आस्वाद घेताना गप्पा सुरूच होत्या. नंतर दोघेही वर जाण्यासाठी जिन्याच्या दिशेने निघालो. तेव्हड्यात अरूंधती चा मोबाईल वाजला. मला वर जाण्या विषयी सुचवून तीनं फोन घेतला. मी वरच्या खोलीत दाखल झालो. आत फारशी सजावट नव्हती. एक साधा सोफा, व साधे खुर्ची, टेबल होते.आजूबाजूचा परिसर व पश्र्चिमेचे डोंगर दिसत होते. नजारा छानच होता. माझे लक्ष टेबलवर पडलेल्या वर्तमान पत्राच्या पानावर गेले. एका जाहिराती भोवती निळ्या पेननं गोलाकार खुण केलेली दिसली. कुतुहलाने मी जवळ जावून बघितले. मी, महिन्यापूर्वी पून:र्विवाहासाठी दिलेली जाहिरात होती. मी बुचकळ्यात पडलो. पेपर पूर्विच्या जागेवर ठेवून मी सुर्यास्त बघू लागलो. खरेच, दॄष्य सुंदरच होते. आणखी दहा मिनिटांनी अरूंधती वर आली. चेहऱ्यावर थोडी नाराजी जाणवली. " सगळं ठीक आहे ना?" मी विचारले. "अं! हो. सुलक्षणाच्या आईची तब्येत बिघडल्याने तिला मुंबई ला न्यायचे आहे. आत्ता मी डाॅ. कौंडिण्यला तिकडे पाठविले आहे. तो परिस्थिती बघून केव्हा निघायचे ते ठरवेल. अम्ब्युलंसही तयार ठेवायला सांगितले आहे. बघुया. " विषय बदलीत अरूंधती नं सूर्यास्ताबद्द विचारले. मी उत्तर दिले पण मनांत सुलक्षणा दिसत होती. तसेच, त्या जाहिराती वरील खुणेने मी पुरता गोंधळून गेलो होतो. स्वतः ला सावरत, इतर काही विषयां नंतर मात्र मी त्या जाहिराती वरील खुणेचे कारण विचारले व ती जाहिरात मीच दिली होती हेही सांगितले.
या वर, ती म्हणाली," थांबा , मी सगळंच सांगते. सुलक्षणा माझी जवळची मैत्रीण. एकदा गप्पा मारताना आम्ही भविष्याचा विचार करीत होतो. दोघींना ही एक जाणीव प्रकर्षाने झाली कि आज आपण अनेकांमध्ये वावरतो आहोत, पण निवॄत्ती नंतर काय? तेव्हा येणाऱ्या एकटेपणा चे निवारण कसे करणार? जर हे एकटेपण टाळता आले तर उत्तमच होईल. मग इतर स्त्रिया अशा परिस्थितीत काय करतात ? त्यांच्यात व आपल्या परिस्थितीत काय अंतर आहे. या सर्व विचारांती दोघींना असे वाटले कि पुढील वाटचालीत कुणी भरवश्याचा जोडीदार हवा. त्यामुळे ,कुणी आपल्याशी विवाह करेल का ? याचाही विचार केला. पुन:र्विवाहास कोणी इच्छुक असेल व वयात फारसे अंतर नसेल तर प्रयत्न करुन बघायला हरकत नसावी. पण हे पाऊल फार जपून टाकायला हवे. वया इतकेच एकमेकांच्या विचारांचे अंतरही लक्षात घ्यायला हवे असे आम्ही ठरविले. त्यानंतर तुमची जाहिरात बघण्यात आली. दोघींनीही प्रयत्न करावा असे ठरले. माझा , जाहिरात देणाऱ्याशी, म्हणजे तुमच्याशी; संपर्क साधण्याचा प्रयत्न अपयशी ठरला . तुम्ही घरात नसताना केलेल्या फोनवर तुमची कामवाली बाई बोलली. तिला बहुतेक ,कसलीशी घाई होती. तिनं "दूध , गॅस " असे ओरडतच फोन बंद केला. मी तुमच्या फोनची वाट बघत होते. सुलक्षणा नं मात्र जाहिरातीत म्हटल्याप्रमाणे व्हाट्सअप वर संपर्क केला. पुढचे सर्वच तुम्हाला माहिती आहे. मी व सुलक्षणा रोजच एकमेकींच्या संपर्कात आहोत. .... आज तिलाही जेवायला बोलावलं होतं." हे सगळं ऐकून मी अस्वस्थ झालो. एकटेपणा बाबत माझी परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. मुली परदेशी, आपापल्या संसारात व्यस्त होत्या. वय वाढत होतं, तसे शारिरीक बंधनं जाणवत होती, त्याहीपेक्षा मानसिक आधाराची गरज वाढली होती. तसा मी बराच क्रियाशील होतो, हिंडत फिरत होतो, ड्रायव्हिंग करित होतो, पण सतत एकटेपण जाणवत होतं.
पार्वतीने वर येवून , जेवण तयार असल्याचे सांगितले. माझ्या प्रतिक्रियेची वाट बघून, शेवटी अरूंधती " चला जावूया जेवायला " म्हणाली. जेवणात माझे फारसं लक्ष नव्हते. शिष्टाचार म्हणून मी मासा व एकंदर जेवण छानच असल्याचे सांगितले. जेवणानंतर दिवाणखान्यात जरा वेळ बसलो. निघताना अरूंधती नं विचारले "काय झालंय, तब्येत बरी आहे ना? तुमचं लक्ष नाहिये कशात." " सगळं ठीक आहे" असं म्हणत मी तिचा निरोप घेतला.
रिसाॅर्टवर येईपर्यंत रात्रीचे साडेनऊ वाजले. मी काॅफी मागविली. वनीता ला फोन लावला. तिला सर्व घडामोडी सांगितल्या. मन जरा शांत झाले. ऐकताना ती अस्वस्थ झाल्याचे जाणवले. " आता तू काय करणार आहेस?" "पुण्याला परतणार आहे उद्या. , तत्पूर्वी सुलक्षणाचा फोन अथवा निरोपाची वाट बघतोय. अर्थात तेही तिच्या आईचे परिस्थितीवर अवलंबून आहे." रात्री फार उशीरा नं झोप लागली.
सकाळी जाग आल्यावर प्रथम मोबाईल घेतला. अपेक्षेप्रमाणे सुलक्षणाचा संदेश होता."आईला घेऊन मुंबईला जात आहे. सोबत, डॉ. कौंडिण्य आहे. मुंबईत दादानं ; मावसभाऊ, त्याच्या परिचयाचे डॉक्टरांचे ईस्पितळात एडमिटची सोय केली आहे. पुन्हा आपली भेट केव्हा होईल माहीत नाही. क्षमस्व."
मला आता येथे रहाण्याचे कारण दिसेना . लवकरात लवकर निघायचे ठरविले.
सायंकाळी सात वाजता घरी, पुण्यात पोहचलो. ही अनिश्चिततेची परिस्थिती फार अवघड असते. मन विषण्ण झाले होते. एक दिवस, डॉ. अरूंधतीचा फोन आला. हाय! हॅलो! नंतर तिने ती बातमी दिली. सुलक्षणाच्या आईचे निधन झाले होते.
मी संभ्रमात पडलो. फोन करायचा विचार केला. पण गैरसमज होऊ शकतो म्हणून फक्त दुखवट्याचा संदेश पाठवला. तिचे काहीच उत्तर आले नाही.
साधारण दहा बारा दिवसांनी अरूंधती चा फोन आला. ती उद्या पुण्यात येत होती. नाटक बघायला. मलाही नाटकाला येण्याची गळ घातली. तिच्या बरोबर नाटक अन् नंतर श्रेयस मध्ये जेवण झाले. दुसऱ्या दिवशी ती दापोलीत परत गेली. माझ्या आग्रहावर, तिनं पुढच्या वेळेस घरी येण्याचे मान्य केले.
दर दहा पंधरा दिवसांनी आमची भेट होवू लागली. कधी नाटक, कधी संगीत मैफल निमित्त असे. कधी कधी नुसतेच भेटत असू. गप्पांचे ओघात तिने, आता रोजच्या रुटिनचा कंटाळा आला असल्याचे सांगितले. लवकरच यातून मुक्त होण्याचा विचार तिनं बोलून दाखवला. चार वर्षांपूर्वी तिची एंजीओप्लास्टी झाल्याचं व दोन स्टेंट बसविल्याचे समजले.
घरचे जेवण शिल्लक राहू लागल्याची तक्रार विनीता कडे पोहचली. तिचा फोन," बाबा, काय झालंय तुला? रूक्मिणी मावशी सांगत होती , तू बऱ्याच वेळा जेवत नाहीस म्हणून. " तिला काहितरी कारणं सांगून शांत केले. काही दिवसांनी पुन्हा फोन, जावयाच्या प्रमोशन ची बातमी दिल्यानंतर तिनं विचारलं," बाबा, परवा रात्री जेवायला कुणी आलं होतं का? नाही म्हणजे तुला काकडीची कोशिंबीर आवडत नसताना कशी केलीस?" आता मात्र तिला सगळं सांगावं लागलं.
एक दिवस अरूंधतीनं , सुलक्षणानं
मुंबईतील डॉक्टरशी लग्न केल्याचे कळविले. " अरे वा! छान" माझी थंड प्रतिक्रिया.
असाच कालावधी जात राहिला. मी स्वतःला पूर्णपणे संभाळत परिस्थितीशी जमवून घेत होतो. वनीता मात्र चिंतेत होती .
एक दिवस अरूंधतीचा फोन आला. " मी माझे ईस्पितळ डॉ. कौंडिण्य चे ताब्यात दिले आहे . लवकरच पुण्यात येत आहे. तत्पूर्वी मला जाणून घ्यायचे आहे कि या वयात आवश्यक वाटणारी सोबत तुम्ही द्याल का? " थोडं थांबून तिनं पुन्हा विचारलं," थोडं स्पष्टच विचारते, आपण दोघे लग्न करूयात का?, म्हणजे तुमचीही ईच्छा असेल तर." क्षणभर मी अवाक्
झालो. भानावर येत, रूक्मिणीला ओरडून सांगीतले" जरा आज काहीतरी गोड कर" . ती प्रश्र्नार्थक मुद्रेने बघतच राहिली.