Sant Eknath Maharaj 9 Bhakti Yoga in Marathi Spiritual Stories by Sudhakar Katekar books and stories PDF | संत एकनाथ महाराज ९ भक्ती योग

Featured Books
Categories
Share

संत एकनाथ महाराज ९ भक्ती योग

“श्री संत एकनाथ महाराज”
भक्ती महात्म्य

श्लोक ४४

ततोऽन्तर्दधिरे सिद्धाः, सर्वलोकस्य पश्यतः

राजा धर्मानुपातिष्ठन्नवाप परमां गतिम् ॥४४॥

यापरी ते भागवतश्रेष्ठ नवही जण अतिवरिष्ठ

समस्तां देखतांचि स्पष्ट झाले अदृष्ट ऊर्ध्वगमनें ॥९३॥

ते भागवतधर्मस्थितीं अनुष्ठूनि भगवद्भक्ती

राजा पावला परम गती पूर्णप्राप्ती निजबोधें ॥९४॥

भावें करितां भगवद्भक्ती देहीं प्रगटे विदेहस्थिती

ते पावोनि नृपती परम विश्रांती पावला ॥९५॥

श्लोक ४५ वा


त्वमप्येतान्महाभाग, धर्मान् भागवतान् श्रुतान्

आस्थितः श्रद्धया युक्तो, निस्सङ्गो यास्यसे परम् ॥४५॥

सकळ भाग्यांचिया पंक्ती जेथें ठाकल्या येती विश्रांती

ते वसुदेवा भाग्यस्थिती तुझ्या घराप्रती क्रीडत ॥९६॥

वसुदेवा तुझेनि नांवें देवातें 'वासुदेव' म्हणावें

तेणें नामाचेनि गौरवें जनांचे आघवे निरसती दोष ॥९७॥

येवढ्या भाग्याचा भाग्यनिधि वसुदेवा तूंचि त्रिशुद्धि

तुवां भागवतधर्माचा विधि आस्तिक्यबुद्धीं अवधारिला ॥९८॥

श्रद्धेनें केलिया वस्तुश्रवणा मननयुक्त धरावी धारणा

तैं निःसंग होऊनियां जाणा पावसी तत्क्षणा निजधामासी ॥९९॥

जया निजधामाच्या ठायीं कार्य कारण दोन्ही नाहीं

त्या परम पदाचे ठायीं निजसुखें पाहीं सुखरूप होसी ॥५००॥

श्लोक ४६ वा


युवयोः खलु दम्पत्योर्यशसा पूरितं जगत्

पुत्रतामगमद्यद्वां, भगवानीश्वरो हरिः ॥४६॥

तुम्हां दांपत्याचिये कीर्ती यशासी आली श्रीमंती

तुमचे यशें त्रिजगती परमानंदें क्षिती परिपूर्ण झाली ॥१॥

ज्यालागीं कीजे यजन ज्यालागीं दीजे दान

ज्यालागीं कीजे तपाचरण योगसाधन ज्यालागीं ॥२॥

जो वर्णवे वेदां शेषा जो दुर्लभ सनकादिकां

त्या पुत्रत्वें यदुनायका उत्संगीं देखा खेळविसी ॥३॥

जो कळिकाळाचा निजशास्ता जो ब्रह्मादिकांचा नियंता

जो संहारकाचा संहर्ता जो प्रतिपाळिता त्रिजगती ॥४॥

जो सकळ भाग्याचें भूषण जो सकळ मंडणां मंडण

षडूगुणांचें अधिष्ठान तो पुत्रत्वें श्रीकृष्ण सर्वांगीं लोळे ॥५॥

श्लोक ४७ वा


दर्शनालिङगनालापैः शयनासनभोजनैः

आत्मा वां पावितः कृष्णं, पुत्रस्नेह प्रकुर्वतोः ॥४७॥

परब्रह्ममूर्ति श्रीकृष्ण सादरें करितां अवलोकन

तेणें दृष्टि होय पावन डोळ्यां संपूर्ण सुखावबोधु ॥६॥

कृष्णमुखींचीं उत्तरें प्रवेशतां कर्णद्वारें

पवित्र झालीं कर्णकुहरें कृष्णकुमरें अनुवादें ॥७॥

आळवितां श्रीकृष्ण कृष्ण अथवा कृष्णेंसीं संभाषण

तेणें वाचा झाली पावन जैसें गंगाजीवन संतप्तां ॥८॥

नाना यागविधीं यजिती ज्यातें तेथ घे जो अवदानातें

तो वारितांही दोंहीं हातें बैसे सांगातें भोजनीं कृष्ण ॥९॥

दुर्लभु योगयागीं तो वेळ राखे भोजनालागीं

मुखींचें शेष दे तुम्हांलागीं लागवेगीं बाललीला ॥५१०॥

तेणें संतप्त संतोखी तोही ग्रास घाली तुम्हां मुखीं

तुम्हां ऐसें भाग्य त्रिलोकीं नाहीं आणिकीं अर्जिलें ॥११॥

तेणें कृष्णशेषामृतें रसना विटों ये अमृतातें

मा इतर रसा गोड तेथें कोण म्हणतें म्हणावया ॥१२॥

तेणें श्रीकृष्णरसशेषें अंतरशुद्धि अनायासें

जें नाना तपसायासें अतिप्रयासें लभे कदा ॥१३॥

देतां कृष्णाशीं चुंबन तेणें अवघ्राणें घ्राण पावन

चुंबितांचि निवे मन स्वानंद पूर्ण उल्हासे ॥१४॥

तुम्हां बैसले देखे आसनीं कृष्ण सवेग ये धांवोनी

मग अंकावरी बैसोनी निजांगमिळणीं निववी कृष्णु ॥१५॥

तेणें श्रीकृष्णाचेनि स्पर्शें सर्वेंद्रियीं कामु नासे

तेणें कर्मचि अनायासें होय आपैसें निष्कर्म ॥१६॥

सप्रेमभावें संलग्न देतां श्रीकृष्णासी आलिंगन

तेणें देहाचें देहपण मीतूंस्फुरण हारपे ॥१७॥

शयनाच्या समयरूपीं जना गाढ मूढ अवस्था व्यापी

ते काळीं तुम्हांसमीपीं कृष्ण सद्रूपीं संलग्न ॥१८॥

योगी भावना भावून कर्म कल्पिती कृष्णार्पण

तुमचीं सकळ कर्में जाण स्वयें श्रीकृष्ण नित्यभोक्ता ॥१९॥

पुत्रस्नेहाचेनि लालसें सकळ कर्में अनायासें

स्वयें श्रीकृष्ण सावकाशें परम उल्हासें अंगीकारी ॥५२०॥

तुमची पवित्रता सांगों कैसी पवित्र केलें यदुवंशासी

पुत्रत्वें पाळूनि श्रीकृष्णासी जगदुद्धारासी कीर्ति केली ॥२१॥

नाम घेतां 'वसुदेवसूनु' स्मरतां 'देवकीनंदनु'

होय भवबंधच्छेदनु ऐसें पावनु नाम तुमचें ॥२२॥

तुम्ही तरा अनायासीं हें नवल नव्हे विशेषीं

केवळ जे का कृष्णद्वेषी ते वैरी अनायासीं विरोधें तरती ॥२३॥

श्लोक ४८ वा


वैरेण यं नृपतयः शिशुपालपौण्ड्रशाल्वादयो गतिविलासविलोकनाद्यैः

ध्यायन्त आकृतधियः शयनासनादौ, तत्साम्यमापुरनुरक्तधियां पुनः किम् ॥४८॥

शिशुपाल दंतवक्र पौंड्रक-शाल्वादि महावीर

कृष्णासीं चालविती वैर द्वेषें मत्सरें ध्यान करिती ॥२४॥

घनश्याम पीतांबर कटे विचित्रालंकारीं कृष्णु नटे

गदादि आयुधीं ऐसा वेठे अतिबळें तगटे रणभूमीसी ॥२५॥

ऐसें वैरवशें उद्भट क्रोधें कृष्णध्यान उत्कट

ते वैरभावें वरिष्ठ तद्रूपता स्पष्ट पावले द्वेषें ॥२६॥

कंसासी परम भयें जाण अखंड लागलें श्रीकृष्णध्यान

अन्नपान शयनासन धाकें संपूर्ण श्रीकृष्ण देखे ॥२७॥

कंसासुर भयावेशें शिशुपाळादिक महाद्वेषें

सायुज्य पावले अनायासें मा श्रद्धाळू कैसे पावती मोक्ष ॥२८॥

तुम्ही तरी परम प्रीतीं चित्तें वित्तें आत्मशक्तीं

जीवें वोवाळां श्रीपति पायां ब्रह्मप्राप्ति तुमच्या लागे ॥२९॥

पूर्ण प्राप्ति तुम्हांपासीं ते तुमची कळे तुम्हांसी

बालक मानितां श्रीकृष्णासी निजलाभासी नाडणें ॥५३०॥