आज सकाळी मात्र कोणालाच लवकर जाग आली नाही. सगळेजण अगदी आठ वाजेपर्यत झोपून राहिले. जाग आल्यावर पण बिछान्यात लोळत पडावेसे वाटतं होते दहा वाजता विल्सन येणार होता त्यामुळे साडेआठ नंतर मात्र मी सगळ्यांना आटपायला सांगितले. आज वेळ कमी असल्यामुळे आम्ही चहा आणि नाष्टा एकत्रच उरकून घेतला. ठरल्याप्रमाणे विल्सन गाडी घेवून आला. आज आम्ही सेंट्रल गोवा बघायचं ठरवलं होतं.
आजचा सुरवातीचा प्रवास पण छान निसर्गाने नटलेल्या रस्त्यांवरून सुरू झाला. आमच्या गाडीने सपाट रस्ता सोडून एक टेकडी चढायला सुरुवात केली. रस्ता घाट वळणाचा होता. दोन्ही बाजूला जंगल आणि घनदाट झाडी. दिवसाढवळ्या सुध्दा निर्मनुष्य रस्ता .. इकडे कोणी जास्त फिरकत नाही असे विल्सन ने सांगितले.. अश्या निर्जन ठिकाणी आम्ही एक चर्च बघायला जात होतो.. 'शापित चर्च' 'थ्री किंग्ज चर्च ' असं याचं नाव आहे... याला भुताटकीच चर्च का म्हणतात याची कहाणी विल्सन ने आम्हाला रस्त्यात सांगितली. या ठिकाणी रात्रीच कोणी येत नाही.. चर्च वर्षातून फक्त फिस्ट असतो त्याच वेळी उघडतात. बाकीचे दिवस ते बंदच असतं. गाडीतून उतरून डाव्या बाजूस असलेल्या पायऱ्या चढून गेलो की समोर चर्च दिसते. खरचं चर्चच बाह्यरूप बघूनच त्याला शापित का म्हणत असतील याची प्रचिती येते.. सतत बंद असल्या मुळे त्याची थोडी पडझड झाली होती . चर्चच्या आजूबाजूचा परिसर पाहून आम्ही लवकरच तिथून काढता पाय घेतला. जर ढगाळ वातावरण नसेल तर त्या टेकडीवरून गोव्याचा छान नजारा दिसतो.
आता आमची गाडी निसर्गाचं सानिध्य सोडून शहरी भागातल्या रस्त्यावर धावू लागली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला फॅक्टऱ्या , गजबजलेली घरे दिसत होती. रस्त्याचा एका बाजूला दुरपर्यंत झोपडपट्टी पसरली होती. विल्सन ने सांगितले या ठिकाणी जे कामगार गोव्याच्या बाहेरून त्यांच्या उदरनिर्वाह करण्यासाठी येतात त्यांची घरे आहेत. अश्या बारीक सारीक गोष्टींची माहिती देत देत विल्सन ने गाडी एका ठिकाणी थांबवली. This point is hidden gem..you will definitely enjoy it.. असं सांगून एका छोट्या पायवाटेवरून विल्सन साहेब आम्हाला घेवून जावू लागले. दोन्ही बाजूला दाट झाडी आणि छोटी पायवाट . 'आता हा बाबा कुठे घेवून चालला असं मनात आलं '. तेवढ्यात लाटांचा आवाज कानावर येवू लागला. जवळच समुद्र आहे हे नक्की झालं होत मग hidden gem असं विल्सन का बोलला याचं अजून रहस्य समजलं नव्हतं. आता समुद्र पण दिसायला लागला होता..पण विल्सन अजून चालत होता आणि तो चालता चालता थांबला . उजव्या बाजूला हाताने इशारा करत , Madam,see it's a heart shape lake.. खरचं , समोरं एक तळ होतं आणि एका साईड ने बघितलं तर त्याचा आकार मानवी हृदया सारखा दिसत होता.. तळ्यातल पाणी स्वच्छ आणि निळसर रंगाचे दिसत होते.. समोरं डाव्या बाजूला खाऱ्या पाण्याचा समुद्र आणि उजव्या बाजूस हे गोड्या पाण्याचे मानवी हृदयाच्या आकाराचे तळे.. समोरच असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही खाली उतरून आनंद घेवू शकता पण भरती तर नाही ना याची खात्री करूनच खाली उतरावे नाहीतर पाण्यात अडकण्याची शक्यता असते. आम्ही खाली न उतरता वरूनच छान फोटो काढले.. आणि पुढच्या प्रवासासाठी निघालो.
यानंतर आम्ही बोगम्यालो बीच आणि बियाना बीच बघितले.. बियाना बीच वॉटर स्पोर्ट्स साठी प्रसिद्ध आहे.. इथे सर्व प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स होतात. बीचच्या सुरवातीलाच हनुमानाचे मंदिर आहे.. मंदिरात जावून आम्ही दर्शन घेतले. मंदिराच्या गाभाऱ्यात खूप थंड वाटत होते . आम्ही पाच मिनिटे तिथेच मांडी घालून बसलो. आज कालच्या पेक्षा उकाडा जाणवत होता त्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यातून उठू वाटतं नव्हते. उकाडा जाणवायच अजून एक कारण म्हणजे सेंट्रल गोवा खूप गजबजलेलं आहे.. घरे खूप जवळ जवळ आहेत. त्यामुळे सुद्धा वातावरण कालच्या पेक्षा उष्ण वाटत असेल. आज आम्ही नेवल एविएशन म्युझियम पण बघणार होतो..पण आज नेमका सोमवार होता आणि हे म्युझियम सोमवारचे बंद असते. खूप चांगलं म्युझियम बघण्याची आमची संधी हुकली. या ठिकाणी आतल्या भागात गॅलरी आहे त्यात नेव्हीच्या संबंधित सगळ्या वस्तू आहेत आणि बाहेरील भागात विंटेज विमानांचे मॉडेल्स ठेवले आहेत..
' वास्को ' म्हणजेच ' वास्को द गामा ' सिटी याबद्दल मला ट्रीपच्या अगोदर पासून उत्सुकता होती. याच नाव प्रसिध्द पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा यांच्या नावावरून पडले आहे. हे एक महत्वाचे बंदर आहे. बाकीच्या ठिकाणांना रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गाने जोडलेले आहे. इथे असलेल्या 'मार्मा गोवा पोर्ट ट्रस्ट ' मधून लोह खनिज दुसऱ्या राज्यात पाठवले जाते.
तिथूनच जवळ ' सेंट ज्यासिंतो आयलंड ' आहे. हे बेट झुयारी नदीच्या मुखाशी वसलेले आहे. नदीवर असलेल्या पुलाने ते इतर भागाशी जोडलेले आहे. छोट्याश्या या बेटावर साधारण दोनशे च्या आसपास घरे आहेत. या लोकांनी अजून पण आपली संस्कृती जपली आहे. बाहेरच्या कोणत्याच लोकांना यिथे कसलाही व्यवहार करता येत नाही. बाहेरच्या डेव्हलपर्सनी येवून तिथे डेव्हलमेंट करण्याचे खूप प्लॅन स्थानिकांना सांगितले पण स्थानिकांचा त्याला विरोध आहे . आहे त्या मूळ स्थितीत ते आयलंड ठेवण्यावर ते ठाम आहेत. या ठिकाणी विविध धर्माचे लोक आहेत पण सगळे एकजुटीने राहतात. तरुण वर्ग कामासाठी वास्को किंवा भारताबाहेर सेटल आहे.पण सणासुदीला सगळं कुटुंब या ठिकाणी एकत्र येतात. आयलंड वर चर्च , सीमेट्री आणि एक हॉटेल पण आहे. आम्ही जास्त आतल्या भागात न जाता बाहेरचा थोडा भाग फिरून माघारी वळलो.. तेही विल्सन होता म्हणून तिथे गेलो नाहीतर ती पण हिम्मत केली नसती.
दुपारच्या जेवणाची वेळ होत आली होती. पोटात कावळे ओरडत होते. आम्ही आमचा सारथी विल्सनला गाडी कुठल्या तरी चांगल्या रेस्टॉरंटला घ्यायला सांगितली. सारथी पण खूप आज्ञाधारक होता त्याने ओके मॅडम म्हणत 'Antique Mardol' या रेस्टॉरंट जवळ गाडी आणली. इथे जेवण तर छान मिळतेच पण बाजूलाच ॲबिज फिश अक्वेरियम आहे ते पण बघून होते.. असे एका दगडात दोन पक्षी आमच्या सारथ्याने मारले. हे रेस्टॉरंट वेरणा या भागात आहे. आम्ही आतमध्ये प्रवेश केला. बरीच गर्दी होती. हे रेस्टॉरंट त्या भागात नॉन व्हेज जेवणासाठी प्रसिद्ध आहे. आमच्यातील निम्म्या लोकांनी नॉन वेज थाळी मागवली. माझ्यामुळे अनिल आणि आर्याला कधी कधी व्हेज खावं लागतं पण त्यांची कधीच तक्रार नसते. आम्ही पनीर मसाला, रोटी ,दाल खिचडी अशी नेहमीची ऑर्डर केली. थोड्याच वेळात वेटरने नॉन व्हेज थाळी आमच्यासमोर आणून ठेवली. केळीच्या पानावर भात, फिश फ्राय, फिश करी, शिपल्यांच सुक ,सोलकढी, तोंडी लावायला दोन तीन प्रकारच्या भाज्या .. बघूनच तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. सगळं ताजं आणि गरमागरम.मी आधी पण सांगितलं आहे की मांसाहारी लोकांची गोव्यात खाण्याची चैन असते. व्हेज जेवण पण टेस्टी होतं.
जेवण उरकून आम्ही बाजूलाच असलेल्या अबिज फिश अक्वेरियम कडे पदार्पण केले. इथे फिश अक्वेरियम,12D शो, हॉरर शो असे बरेच पर्याय मनोरंजनासाठी आहेत. तुम्हाला हवे ते कॉम्बिनेशन निवडायचे किंवा एकच पर्याय हवा असेल तर एकाचच तिकीट काढायचं. एकाधा तास सहज मोडतो या ठिकाणी. अक्वेरियम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. जसं की लायन फिश, अरवाना, पॅरोट फिश , स्टिंग रे .मुलांनी छान एंजॉय केलं. आम्ही 12 D शो आणि हॉरर शो नाही बघितले. मुलं खूष होऊन बाहेर पडली .
विल्सन आता आम्हाला शोधत आला. अजून दोन ठिकाणी वेळेत जायचं होत. 'अभी बिग फूट म्युझियम अँड ओल्ड पोर्तुगीज हाऊस चलते है ' बिग फूट म्युझियम हा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायला आम्ही उत्सुक होतो. एन्ट्री फीस देवून आम्ही आतमध्ये प्रवेश केला.या ठिकाणी गोव्याच्या लोककलांचे पुतळ्यांच्या आणि देखाव्यांच्या साहाय्याने खूप छान प्रकारे प्रदर्शन आणि जतन केले आहे. मुख्य म्हणजे प्रत्येक देखाव्याजवळ ध्वनिफितीच्या साहाय्याने तुम्हाला त्या देखाव्याची पूर्ण माहिती सांगितली जाते. हा ऑडियो गाईड आम्हाला खूप आवडला. त्यामुळे नुसतच देखावा न बघता त्याची इत्यंभूत माहिती पण आपल्याला मिळते. म्युझियम बऱ्यापैकी मोठे आहे. सगळे देखावे पाहत पाहत आम्ही सगळ्यात शेवटी असलेल्या गुहेत आलो. या जागेचे नाव बिग फूट का पडले याची इथे कथा ऑडियो द्वारे सांगितली जाते. कथेतील ज्या सद्गृहस्थाने एका पायावर उभे राहून तपश्चर्या केली त्याच्या पायाचा ठसा इथे आहे म्हणून याचे नाव बिग फूट म्युझियम. इथून बाहेर पडलं की समोरच ओल्ड पोर्तुगीज हाऊस आहे. हे एका पोर्तुगीज कुटुंबाचे जवळपास दोनशे वर्षे जुने घर आहे. ते आता म्युझियम मध्ये बदलले आहे. आतमध्ये जुन्या काळातील भांडी, खुर्च्या, दागदागिने, ग्रामोफोन, पालखी, टॉयलेट सीट्स अश्या सर्व वस्तू आहे त्या मुळ स्थितीत जतन करून ठेवल्या आहेत. पोर्तुगीज संस्कृतीचे दर्शन आपल्याला या म्युझियम मुळे घडते.
आजच्या ट्रिपची सांगता आम्ही वेरना इथे असलेल्या ' म्हाळसा नारायणी देवी ' मंदिराच्या दर्शनाने केली.मंदिर खूप भव्य आणि प्रशस्त आहे. परिसर खूप स्वच्छ ठेवला आहे. फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर मनाला एक प्रकारची शांतता लाभते. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर मोठा मंडप आणि त्याच गोल घुमट आपलं लक्ष्य वेधून घेतं. गाभाऱ्यात ग्रॅनाईट च फ्लोअरिंग आहे. त्यावरती चालताना आपल्याला वरच्या घुमटाच प्रतिबिंब दिसतं. मुख्य मूर्तीच्या थोडे आदी डाव्या बाजूला शारदंबा देवीचे आणि उजव्या बाजूला आदिनाथ शंकराचार्य यांची छोटी मंदिरे आहेत. आम्ही मनोभावे देवीचे दर्शन घेवून मंदिराच्या बाहेर आलो. मंदिराच्या बाहेर उजव्या हाताला चौसष्ठ योगिनी मंदिर आहे. या सगळ्या योगिनिंच्या मूर्ती वर्तुळ आकारात एका बाजूला एक आहेत. मधोमध भैरवाची मूर्ती आहे. त्या योगिंनिंची नावे बाहेर फलकावर लिहली आहेत. मंदिराच्या आवारात एक प्राथमिक शाळा आणि लग्नाचा हॉल पण आहे.अश्या प्रकारे प्रसन्न मनाने आम्ही बाहेर पडलो. सूर्यास्त पण होत आला होता आता आमचं मन कॉटेजेस कडे ओढ घेवू लागल. विल्सन शांतपणे आपल काम करत होता. आजचा गोव्यातला शेवटचा दिवस . या पूर्ण ट्रीप मध्ये विल्सन ने आम्हाला अगदी घरच्या सारखी सर्व्हिस दिली. कुठेही मालक आणि ड्रायव्हर असं नात वाटलं नाही. आम्ही काहीही सांगो विल्सन येस सर येस मॅडम म्हणत एका पायावर तयार असायचा. त्याने सुचवलेली सगळी जेवणाची ठिकाणे शॉपिंग पॉईंट एकदम परफेक्ट होती. आम्हाला या तीन दिवसात कसलीच तक्रार करायची संधी या माणसाने दिली नाही.
आता कॉटेजेस जवळ आल्या . आम्हाला सोडून आणि उद्या मडगाव स्टेशन वर ड्रॉपसाठी वेळेवर येतो ही हमी देवून विल्सन ने गाडी त्याच्या घराच्या दिशने वळवली.
आजची संध्याकाळ मॅजोर्डा बीचवर परत एकदा जावून शांतपणे घालवण्याचे ठरवले.. आज बीचवर गेलो तर शॅकच्या बाजूला DJ चालू होता. काही तरुणांनी DJ वर ताल धरला होता. आम्ही पण थोडा वेळ ही मजा घेतली. आजचं रात्रीच जेवण कॉटेजेस वर पार्सल आणून एकत्र जेवणाचा आनंद घेतला.. एकत्र बसून सगळे ट्रीपचे फोटो बघितले. फोटोंची देवाणघेवण केली. पोरं खेळण्यात मग्न होती.आता आम्ही आवरतं घेतल. घरी जायचे वेध लागले होते ..उद्या सकाळी बॅक टू पॅवेलियन . . . ...