रात्री अगदी गाढ झोप लागल्यामुळे सकाळी लवकर जाग आली. दरवाज्यावरचा पडदा बाजूला करून बाहेर बघितलं तर बाहेर निरव शांतता पसरली होती. मध्येच पक्ष्यांचा किलबिलाट कानावर पडत होता. तेवढ्यात रस्त्यावरून हॉर्न वाजवत एक सायकलवाला जाताना दिसला.तो काहीतरी विकत होता. मुंबईला असं हॉर्न वाजवत इडली डोसावाले सायकल वरून येतात. मला वाटलं येथे पण असच काहीसं आहे का ? म्हणून चौकशी केली तर समजलं की तो पाववाला आहे. त्याच्याकडे आपल्यासारखे छोटे पाव होते आणि गोल आकाराचे मोठे पाव पण होते. एक पाव दोन तीन जण सहज खावू शकतील एवढा मोठा होता. पाव बघून आम्हाला चहा पिण्याची तलफ झाली. मग काय ! मी आणि अनिल निघालो चहाच्या शोधात ! येवढ्या सकाळी एकाधी टपरी तरी चालू आहे का शोधत शोधत ! थोडा वेळ चालल्यानंतर ' आराध्या ' नावाचे हॉटेल उघडे दिसले. चहाची ऑर्डर देऊन मी हॉटेल न्याहाळू लागले. श्री. अरुण गावडे यांचे ते हॉटेल आहे. गावडे साहेब मूळचे कोल्हापूर जिल्यातील आहेत पण गेली 12 वर्षे ते मॅजोर्ड्यात स्थायिक झालेले आहेत. सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत हे छोटेखानी हॉटेल चालू असते. येथे चहा नाश्त्यापासून व्हेज नॉनव्हेज थाळी असं सर्व काही रीझनेबल दरात मिळतं. आमचा चहा आला. आम्हाला तिथे एक वेगळा पदार्थ दिसला . काय आहे विचारलं तर स्वीट बन असं त्यांनी सांगितलं. आम्ही ते टेस्ट करायचं ठरवलं. खाल्ल्यावर लक्षात आले की आपल्याकडे काकडी किंवा भोपळा किसून जश्या घाऱ्या बनवतात त्यातलाच हा गोवन प्रकार आहे. दिसायला ही तसाच आणि चव पण सारखीच. चहा आणि स्वीट बन खावून आम्ही कॉटेजेस कडे परत आलो. आमची लेक आणि बाकीचे अजून झोपले होते. आधी जावून रिषांकला उठवलं तो नेहमी आर्याला उठवायच काम अगदी चोख करतो. थोडा वेळ स्विमिंग पुलमध्ये एंजॉय केल्यावर नंतर अंघोळ करून सगळे आजची साईटसीईंग करायला तयार झाले. सकाळचे 10 वाजत आले होते आमचे विल्सन साहेब 11 वाजता गाडी घेवून येणार होते. त्याअगोदर सगळ्यांनी आराध्या मध्ये जावून नाष्टा करून घेतला.
आज आमचा प्लॅन पालोलिम बिच आणि त्याच्या जवळचे पॉईंट बघण्याचा होता. जसजशी गाडी पुढे जात होती तसतस गोवा किती सुंदर आहे याची प्रचिती येत होती. छोटी टुमदार कोकणी पद्धतीची घरे, आलिशान बंगले , पोर्तुगीजकालीन घरे त्याचं वेगळेपण दाखवत होती. लाल, पिवळा, निळ्या रंगाची ती घरे आमचे लक्ष्य वेधून घेत होती. गाडीत बसून नुसता प्रवास करण्यात पण मजा येत होती. विल्सनने एका ठिकाणी गाडी थांबवली ते एक सुंदर आणि भव्य चर्च होते. आम्ही खाली उतरून चर्च आणि आजूबाजूचा परिसर पाहून आलो. अशी खूप लहान मोठी चर्च तुम्हाला पाहायला मिळतात. पालोलिमला जाणारा रस्ताच एवढा सुंदर आहे की हा प्रवास संपूच नये असं वाटतं. छान गाणी ऐकत ऐकत आम्ही गोव्याचे सौंदर्य डोळ्यात साठवत होतो. मध्येच विल्सन एकाद्या नदीच्या ब्रिजवर किंवा जिथे दुतर्फा नारळाची झाडे असतील अश्या ठिकाणी फोटोशूट साठी गाडी थांबवत होता. आपको जिधर किधर रुकना है, आप मुझे बोलिये , मी तिथे गाडी टाकणार !! गाडी टाकणार नाही रे, विल्सन , गाडी थांबवणार ! असं आम्ही त्याचं मराठी सुधरवायचो. तास दीड तास प्रवास झाल्यावर विल्सन ने एका ठिकाणी गाडी थांबवली. तिथून आम्हाला अगोंडा बीचवर चालत जायचे होते. जिथे गाडी थांबवली तिथेच घरगुती जेवणाची सोय होती. विल्सन ने आम्हाला इथे जेवणार का विचारले. टेस्टची त्याने गॅरंटी घेतली. तशी पण जेवणाची वेळ होत आली होती. व्हेज नॉनव्हेज जेवणाची ऑर्डर देऊन आम्ही अगोंडा बिचकडे पायी चालत निघालो. अगोंडा बीचकडे जाणारा रस्ता पर्यटकांच्या राहण्यासाठी असलेल्या छोट्या छोट्या कॉटेजेसच्या मधून जात होता. थोड अंतर चालून गेल्यावर समोरच स्वच्छ,सुंदर, शांत बीच दृष्टीक्षेपात येतो. बीचवर असलेल्या कॉटेजेसच्या गॅलरी मध्ये लोक शांतपणे पुस्तक वाचताना दिसत होते. येथे कोणत्याही प्रकारचा गोंगाट अजिबात नव्हता. येथून बोट भाड्याने घेवून आपण हनिमून बीच, बटरफ्लाय बीच, टर्टल रॉक , डॉल्फिन सफारी अशी तास दीड तासाची बोट राईड करू शकतो. सहा ते दहा सिटर बोट भाड्याने मिळतात. तुम्ही कमी लोक असाल तर बोट शेअर करू शकता. साधारण माणसी 500 रुपये खर्च येतो. अशीच सेम बोट तुम्हाला पालोलीम वरून पण करता येते काही फरक नाही आहे. पैसे पण तेवढेच पडतात. आम्ही बोट राईडसाठी लाईफ जॅकेट्स घालून तयार झालो. बोट सुरू होवून थोड अंतर गेल्यावर आमची खरी एडवेंचर्स बोट राईड सुरू झाली. भरती असल्यामुळे समुद्राच्या लाटा खूप जोरात उसळत होत्या त्यावर आमची बोट आपटत होती आणि थोडी उंच उडत होती व परत पाण्यावर आपटत होती. प्रत्येक आपटण्याबरोबर ती आम्हा सगळ्यांना अंघोळ घालत होती. पटापट आम्ही सगळे मोबाईल , कॅमेरा आत बॅगेत टाकले आणि या राईडची मजा घेण्यासाठी घट्ट धरून बसलो. मजा तर येत होती पण मनातून मी घाबरले होते. एवढीशी ती सहा सीटर बोट आणि हा उधानलेला समुद्र.. कधी एकदा जमीन दिसतेय असं वाटतं होत. बोट चालवनाऱ्याला याची सवय असल्यामुळे तो शांतपणे आपलं काम करत होता. येवढ्या छोट्या बोटीत बसून असा उसळत्या लाटांच्या समुद्रतला हा अनुभव मी कधीच विसरणार नाही. आर्या अनिल आणि रिषांक छान एंजॉय करत होते. मी ,भाऊ आणि वहिनी जरा शांत होतो. आमचे सगळे कपडे भिजले होते. त्यात खाऱ्या पाण्यामुळे अंग चिकट वाटत होतं आणि असाच पुढचा प्रवास करावा लागणार होता. त्यामुळे थोडं अपसेट झालो होतो. कधी कधी प्रवासात आपल्याला काही अनपेक्षित बाबींना सामोरं जावं लागतं. तेवढ्यात समोरं बीच दिसू लागला. आम्ही हनिमून बीच वर खाली उतरलो. फुल्ल एकांत असणारा एकदम छोटासा खडकाळ बीच . याचे नाव हनिमून बीच का आहे हे त्या एकांतावरून आणि आजूबाजूला असलेल्या दाट झाडीवरून समजून येते. बऱ्याचश्या बोटी तिथे लागलेल्या होत्या. तरुणवर्ग जास्त होता. सगळेजण छान एंजॉय करत होते. यानंतर बाजूलाच असलेल्या बटरफ्लाय बीच कडे आमची बोट वळली. या बीचवर आम्हाला भरतीमुळे खाली उतरता नाही आले. आम्ही बोटीतूनच बीचचं वेगळेपण न्याहाळू लागलो. दोन्ही बाजूला डोंगर आणि मध्ये जमीन यामुळे बीचचा आकार फुलपाखरा सारखा दिसतो. म्हणून याचे नाव बटरफ्लाय बीच पडले आहे. या बीचवर तुम्हाला बोटीतून यायचे नसेल तर दुसऱ्या रस्त्याने ट्रेक करून पण येवू शकता. अशी काही ट्रेकर्स मंडळी तिथे बीचवर मजा करत होती. आमच्या नाविकाने बोट परतीच्या दिशेने वळवली. जाताना कासवाच्या आकाराचा मोठ्ठा खडक दिसतो त्यालाच टर्टल रॉक म्हणतात. आमच्या नशिबात डॉल्फिन दर्शन नव्हते . तास,दीड तास राईड करून आम्ही अगोंडा बीचवर उतरलो. विल्सन आमची वाटच बघत थांबला होता. त्याने जेवण तयार असल्याचे आम्हाला सांगितले. आप के फ्रेश होने का सब इंतजाम किया है मैने ! हे ऐकल्यावर आमचे चेहरे उजळले. पुढच्या प्रवासासाठी स्वच्छ हातपाय तोंड धुवून फ्रेश होणं खूप गरजेचं होतं.फ्रेश होवून आम्ही जेवण उरकले .जेवण घरगुती असलं तरी छान रुचकर होत. बांगडा फिश खूप टेस्टी आणि ताजा होता. व्हेज जेवण पण छान होते. गोव्यात तुम्हाला फिश करी आणि राईस अशीच थाळी मिळते . भाकरी किंवा चपाती थाळीमध्ये नसते. इथले स्थानिक लोक रोज बांगडा आणि राईस खातात. संडेला चिकन असते त्यांच्या जेवणात.
जेवण उरकून आम्ही पालोलिमकडे निघालो. दुपारचे ३:३० वाजत आले होते. तिथून पालोलिम बीच 7 कि. मी. होता. मला स्वतःला पालोलिम बीचबद्दल खूप आकर्षण होते. पालोलिम बीचला गोव्याचा 'पॅराडाईस बीच' म्हणतात. रशियन आणि बाकीचे फॉरेनर्स या बीचवर रहायला प्राधान्य देतात. यात रशियन जास्त असतात महिनोन्महिने ही लोकं इथे राहतात. हा समुद्रकिनारा पण खूप मोठा आणि स्वच्छ आहे. बीचवर आराम करण्यासाठी शॅक आहेत. येथे आपण कयाकिंग पण करू शकतो. बीचवर वेगवेगळ्या प्रकारची रेस्टॉरंट आणि बार आहेत.. सर्व प्रकारचे खाण्याचे पदार्थ मिळतात अर्थातच थोडे महाग असतात. रात्रीचे वेगवेगळ्या प्रकारच्या बीच पार्ट्याचे पण आयोजन इथे केले जाते. या ठिकाणी 'Silent Noise Club ' नावाचे नाईट आऊट खूप फेमस आहे यात तुम्हाला हेडफोन्स दिले जातात. तुम्हाला हव्या त्या प्रकारचे म्युजीक सिलेक्ट करून हेडफोन्स कानात घालून त्यावर डान्स करायचा. यात बॉलिवूड, हीप हॉप , सायलेंट म्युजिक असे सर्व पर्याय उपलब्ध असतात. रात्री 9 नंतर ही पार्टी चालू होते टे पहाटे पर्यंत तुम्ही एंजॉय करू शकता. आमचा स्टे , पालोलिमजवळ नसल्यामुळे आम्ही ही पार्टी नाही एंजॉय करू शकलो.
आता आम्ही पालोलिमचा निरोप घेतला . आम्हाला सूर्यास्त बघण्यासाठी 'काबो दि रामा' फोर्टकडे जायचे होते. या फोर्टच नाव हिंदू भगवान श्रीराम यांच्या नावावरून पडले आहे अशी आख्यायिका प्रचलित आहे.चाळीस मिनिटांचा प्रवास करून आम्ही सायंकाळी साडेपाच च्या सुमारास फोर्टवर आलो.. गाडी अगदी फोर्टसमोर पार्क करता येते. फोर्टमध्ये शिरताच समोर त्याकाळच्या तोफा दिसतात.थोड पुढं गेलं की छोट चर्च आहे.चर्च अजून सुस्थितीत आहे . आम्ही गेलो तेंव्हा ते बंद होतं. फोर्टला चारही बाजूंनी तटबंदी आहे. तटबंदीवरुन खालच्या बीचचा सुंदर नजारा दिसतो. फेसाळता समुद्र,हिरवीगर्द झाडी आणि त्यात माडाची झाडे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली दिसतात. तटबंदीवरुन खाली बीचवर उतरण्यासाठी पायऱ्या आहेत .फोर्टपासून सनसेट पॉइंट थोड्या अंतरावर आहे आणि आम्हाला तिथे वेळेवर पोहचायचे असल्याने आम्ही खाली उतरून बीचवर गेलो नाही. हळू हळू सगळेजण तिथून निघून सनसेट पॉइंट कडे जायला निघाले. आम्ही पण गाडीने तिकडे रवाना झालो. सनसेट पॉइंटवर बसून तुम्ही समुद्रात होणारा सूर्यास्त बघू शकता. दिवे आगारला आम्ही असा समुद्रात होणाऱ्या सुर्यास्ताचा आनंद घेतला होता.पण या ठिकाणी तुम्ही उंच टेकडीवरून समुद्रात होणारा सूर्यास्त बघता. अजून एक ,या टेकडीच्या पायथ्याशी बीचवर रिसॉर्ट आहे. त्या रिसॉर्ट मध्ये असणाऱ्या हट्सच्या छप्परामधून समुद्रात दिसणारा सूर्यास्ताचा नजारा विलोभनीय वाटतो. मन एकदम शांत होवून जाते. ना फोटो काढावा वाटतो ना व्हिडिओ शूट करावा वाटतो. नुसतं बघत बसावं वाटतं. सूर्यास्त होवून गेला तरी तिथून उठावे वाटतं नाही.पण आपल्याला आपल्या फायनल डेस्टिनेशन ला जायचे असते त्यामुळे नाईलाजाने उठावेच लागते.
परतीच्या प्रवासात सगळेजण शांतपणे गाडीत म्युजिक ऐकत बसले होते. दिवसभराचा थोडा थकवा पण आला होता. एकटा रिषांक तेवढा सतत चुळबुळ करत होता. कुठून आणतो एवढी एनर्जी कुणास ठाउक !
मॅजोर्डाच्या थोडे अगोदर कोलवा मार्केट आहे. विल्सन ने आम्हाला सांगितले इथे शॉपिंग खूप स्वस्त आहे. आता शॉपिंग म्हटलं की बायकांचा विक पॉइंट. कंटाळा आला असून सुद्धा मी आणि वहिनी लगेच तयार झालो. आता आम्ही दोघी तयार झालो म्हणजे पुरुष बिचारे येणारच . कोलवा मार्केट खूप मोठे आहे. इथे गोवा बीच अशी प्रिंट असलेले टी शर्ट , सगळ्या प्रकारची कपडे, वेगवेगळ्या प्रकारच्या हॅट्स, ज्वेलरी , पर्सेस , होलसेल मध्ये काजू असं खूप काही मिळते. शॉपिंग करताना तुम्ही बार्गनिंग करून अजून पैसे वाचवू शकता. कोलव्याची नाईट लाईफ पण फेमस आहे. शॉपिंग उरकून आम्ही निघालो आणि आराध्या कडे डिनर साठी थांबलो.मी सोडून सगळ्यांनी पापलेट थाळीवर ताव मारला .गोव्यात शाकाहारी लोकांचे थोडे हालच होतात. मनासारखे पोटभर जेवण , दिवसभराचा आलेला शीण त्यामुळे झोप कधी लागली कळलेच नाही.