कालाय तस्मै नमः| भाग ४
आस्तनीतले साप
श्रीपाद दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साधनेच्या खोलीतून बाहेर आला. साधनेच्या वेळी त्याला काही गोष्टींचा अंदाज आला होता त्यामुळे तो बऱ्यापैकी स्थिरावला होता. अरुंधतीच्या तब्येतीत फारशी सुधारणा नव्हती. पण वैद्यांच्या औषधांमुळे तिचा त्रास बराच सुसह्य झाला होता. तिच्या तब्येतीची बातमी एव्हाना बाकीच्यांकडे पोहोचली होती.
झालं गेलं बाजूला ठेवून सगळेजण एकेक करत वाड्यावर येण्यासाठी तयारी करत होते. सगळे येण्यापूर्वीच अरुंधतीला काकांना काहीतरी सांगायचे होते. त्यासाठी तिने श्रीपादला तशी कल्पना दिली. तसे काकांना त्याने सांगितले. त्यांनाही अंदाज आला होता. ते अरुंधतीच्या खोलीत गेले. जिला बघताक्षणी महालक्ष्मीचा भास काकांना होत असे, ती अरुंधती अगदी कृश अवस्थेत पहुडलेली होती. पण त्या अवस्थेतही तिच्या चेहऱ्यावरचं तेज अजिबात कमी झालेलं नव्हतं. उलट एका वेगळ्या आणि विलक्षण प्रकाशाचं वलय तिच्या आसपास त्यांना जाणवलं. प्रचंड त्रास होत असतानाही ती तो हसतमुखाने सहन करत होती.
काका शेजारीच असलेल्या खुर्चीवर बसले. डोळ्यात जमा झालेल्या अश्रूंना त्यांनी नकळतच टिपण्याचा प्रयत्न केला. पण तिला ते समजलेच.
हळुवार हसत ती म्हणाली, “काका तुम्ही नात्याने जरी माझे सासरे असलात तरी तुम्ही कधीही मला सुनेसारखे वागवले नाही. मीही तुम्हाला सदैव बाबांच्या जागी मानत आले. वयाने आणि मानाने मोठे असूनही तुम्ही माझ्या अटी कुठल्याही प्रश्नाशिवाय मान्य केल्या तेव्हा तर माझ्या मनात तुमच्याबद्दल आदर द्विगुणित झाला. तुम्ही श्रीपादबरोबरच मलाही माझ्या साधनेबाबत मोकळीक दिली. त्यामुळेच आज खरे तर मी तुमच्याशी बोलू शकते आहे.
काका आपल्याशी कुठल्याही नात्यांनी जोडली जाणारी सगळी माणसं काही ना काही देवाणघेवाण करण्यासाठीच आयुष्यात आलेली असतात. काही जण आपल्या प्रगतीत वाटेकरी होतात तर काहीजण फक्त आणि फक्त अधोगती करण्यासाठी आलेले असतात. प्रत्येकाचा मुखवट्यामागचा चेहरा वेगळाच असतो तो सामान्य माणसाला सहसा लवकर समजत नाही कित्येकदा तो समजू नये अशीच त्याची म्हणजे परमेश्वराची इच्छा असते. कारण कोण कुठल्या हेतूने आले आहे हे जर आधीच समजले तर माणसाला ना सुखाची आस राहील ना तो दुःखातून सुटण्यासाठी धडपड करेल. त्यामुळे योग्य ती शिकवण मिळेपर्यंत त्याच त्याच स्वरूपाच्या व्यक्ती भेटत असतात, घटना घडत असतात. त्यातून जेव्हा काय शिकायचं हे समजतं तेव्हाच तो धडा पूर्ण होतो.
कालचक्र असतं ते . हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आपल्याही कुटुंबात काही अशा विघ्नसंतोषी व्यक्तींनी प्रवेश केला आहे. त्या कोण हे तुम्हाला योग्य वेळ आल्यावर योग्य व्यक्तीकडून समजेल. मी ती व्यक्ती नाही. पण त्या वाईट शक्तींच्या प्रभावाखाली असलेल्या व्यक्तीमुळे आपल्या सगळ्या कुटुंबाची खूप मोठी हानी होणार आहे. अर्थात हे सगळे त्याने ठरविल्याप्रमाणेच जरी घडणार असले तरी तुम्ही, माई, मी, श्रीपाद एका विशिष्ट मर्यादेपर्यंत त्याची तीव्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतो.
माझं जाणं हा माझा ह्यातला सहभाग आहे ह्या जन्मातील, पण माझी आणि त्या शक्तीची लढाई इथेच संपणार नाही. तिला तिच्या चुकांची जाणीव होऊन प्रायश्चित्त करण्याची एक संधी मी जाता जाता देत आहे. जर तसं झालं तर फार बरं होईल आणि मला परतण्याचा मार्ग मोकळा होईल.”
आश्चर्य वाटून काका तिच्याकडे बघतच होते,
तेवढ्यात ती पुढे बोलली, “माझा मृत्यू जरी मी स्वीकारला असला तरी त्यासाठी कारण ठरलेल्या व्यक्तीला आणि तिच्यासोबतच कुटुंबालाही त्याची शिक्षा भोगावी लागणार आहे. माझ्या अशा मृत्यूमुळे ह्या घरात सहजासहजी मुलीचा जन्म होणार नाही. वंशाला जरी दिवा हवा असला तरीही त्याला जगात आणण्यासाठी स्त्रीचीच गरज असते. पण हे शक्य व्हावे यासाठी त्या व्यक्तींसोबतच सर्वांनी दरवर्षी एका ठराविक वेळी कुलदैवताचे दर्शन घेऊन सर्व काही रीतीने करावे. तिथे तिची मनोमन माफी मागावी असे केले तरच ह्या घरात मुलगी जन्माला येईल.
तुम्ही कुटुंबप्रमुख आहात काका त्यामुळे हे करून घेणे तुमच्याच हातात आहे आणि गरजेचे आहे. ह्या गोष्टींमुळे भविष्यात घडणाऱ्या घटनांची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. कदाचित बराच वेळ लागू शकतो पण होईल नक्की. अजून एक महत्त्वाची गोष्ट ह्या घरात पहिली मुलगी जी जन्माला येईल ती मी असेन काका. माझं कार्य पूर्ण होण्यासाठी मला परत यावेच लागणार आहे.
तसेच माझ्या मृत्यूनंतर ह्यांना आणि कैवल्यला तुम्ही इथे थांबण्यासाठी आग्रह करू नका. मी त्यांना काही विशिष्ट हेतूने दूर जाण्यास सांगितले आहे. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला, ह्या घराला त्यांची गरज असेल ते इथे येतील. कैवल्यला भविष्यात घडणाऱ्या घटनांसाठी तयार करायचे आहे त्यामुळे तो दूरच असेल.
तुमची पुण्याई माझ्या पुनर्जन्मातही माझ्या सोबत लागणार आहे. त्यामुळे तुम्ही आणि माईंनी खंबीर असणं खूप गरजेचं आहे. मी मागत आहे ते खूप अवघड आहे काका माहिती आहे मला पण अशक्य नक्कीच नाही. ह्या वास्तूला तिच्यात राहणाऱ्या चांगल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी तयार केलं आहे मी. पण त्याच्यात भर घालण्याचे काम तुम्हाला करावं लागणार आहे आणि ते कसं करायचं ते तुम्हाला ठाऊक आहे.
माझी एक विनंती आहे आज मी जे काही तुम्हाला सांगितलं ते योग्य वेळ येईपर्यंत कुणालाही सांगायचं नाही. योग्य वेळ आली की तसे संकेत तुम्हाला मिळतील आणि कुणाला सांगायचं हेही कळेल. त्याच वेळी त्या वाईट शक्तीच्या प्रभावाखाली कोण आहेत आणि किती जण आहेत हेही उघड होईल. माझ्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी कराल ना?”
अरुंधती काकांकडे बघत म्हणाली. तसे भानावर येत त्यांनी होकार दिला. ते म्हणाले, “खूप मोठी जबाबदारी दिलीस गं मला. तू माझ्या घरात सून म्हणून आलीस तेव्हाच मला तुझ्या रूपाने दैवी शक्ती च्या आगमनाची जाणीव झाली होती. वेळोवेळी तू आम्हाला सावरलंस, वाचवलंस आणि आता आमच्यासाठी स्वतःची आहुतीही दिलीस. तुझे खूप मोठे ऋण आहे आमच्या घरावर. तू जे सांगितलंस ते करून ते ऋण थोडेतरी फेडण्याचा प्रयत्न मी नक्की करेन.”
दिवेलागणीची वेळ झाली होती, त्यामुळे काका खोलीतून निघून सरळ देवघरात गेले. माईंचं दिवा लावून दोन्ही मुलांकडून (अरुंधतीचा कैवल्य आणि संगीताचा समीर) शुभंकरोती म्हणून घेणं सुरू होतं. क्षणभर तिथे थांबून देवाला नमस्कार करून काका बाहेर येऊन बसले.
श्रीपाद त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, “एक विचारायचं होतं काका. खरं तर परवानगी हवी होती.”
“कशासाठी?”, काकांनी विचारलं.
“परवा पर्यंत सगळे जण येणार आहेत पण त्याआधीच मला घरात गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे. अरुंधतीची तशी इच्छा आहे शेवटची,” असं म्हणत त्याने आवंढा गिळला. काका उसनं हसतच म्हणाले, “मग त्यात विचारतोस काय? कर की. तूच करणार आहेस की नेहमीच्या गुरुजींना बोलवायचे?”
“मीच करणार आहे तशी मी सुटीची तजवीज केली आहे.” “ठीक आहे. मग बाकी तयारी करण्यासाठी माईला सांग.” हो म्हणत श्रीपाद माईंशी बोलण्यासाठी गेला. काका पुन्हा विचारांमध्ये हरवले.
येणारा प्रत्येक दिवस घरात आणि नात्यात खूप काही बदलून टाकणार होता, ह्याची जाणीव त्यांना क्षणासाठी अस्वस्थ करून गेली. नकळतच आकाशाच्या दिशेने त्यांचे हात जोडले गेले आणि मुखातून बाहेर पडले, कालाय तस्मै नमः| ......
कुठल्याही व्यक्तीला त्रास सहन केल्याशिवाय काहीच मिळत नाही जर एखादी गोष्ट सहज मिळत असेल तर हे नेहमी लक्षात ठेवावे की कुठेतरी कुणीतरी त्याची किंमत नक्की मोजली आहे आपल्यासाठी, आपल्यावरच्या प्रेमासाठी.
क्रमशः
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल
ह्या कथेचे सर्व कॉपीराईट अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत. परवानगी न घेता वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.