अभिषेक
रेवतीबाई शाळेत जाण्याची तयारी करत होत्या . डब्यासाठी भाजी चपाती तयार केली होती.डबा भरायचा होता.कंगवा घेऊन त्या अंगणात आल्या.सकाळचे नऊ वाजले होते. थोडीफार थंडी होती.पलीकडच्या काजूच्या झाडातून प्रकाशकिरण अंगणात डोकावत होते.त्यामुळे उन्हात उभे राहिल्याने त्यांना थोड बर वाटल. वातावरण प्रसन्न व चैतन्यदायी होत.
" बाईंनू तयारी झाली?"
हायस्कूल मध्ये जाणारी मुल हाक मारत होती.
" होय .शाळेत चाललात? सावकाश चला."
पंचक्रोशीतील काही मुल पाऊण एक तास चालत हायस्कूल मध्ये जात.वाडी- वाडीतली मुल घोळक्या- घोळक्याने जात.गप्पा-गोष्टी करत रमत गमत जात. काटे कुटे ..नदी नाले ओलांडत...रानटी प्राण्यांचे...पाखरांचे आवाज कानात साठवत...ज्ञानाची वाट सोपी करत जात.खर म्हणजे रेवतीबाई दोन महिन्यांपूर्वी या गावात बदली होवून आल्या होत्या.
.गावात चवथी पर्यंत प्राथमिक शाळा होती.दहा मुल असलेल्या या शाळेत दोन शिक्षिका होत्या.रेवतीबाई व दुसर्या त्यांच्या सहकारी निर्गुणबाई. दोघीही मन लावून किम करत होत्या.रेवतीबाईंना हे गाव खूप आवडल होत. काजू ,नारळी व फोपळीच्या बागा....शांत शितल वातावरण. देवभोळे व प्रामाणिक कोकणी लोक .एकूण चार वाड्यात विखुरलेला....साडेतीनशेच्या आसपास लोकवस्ती असलेला छोटा गाव. काजू ...नारळाच्या उत्पन्नामुळे गाव संपन्न होता.गावात धर्मभोळेपणा.....अंधश्रद्धा पाय रोवून होत्या. बाईंनी गावात एक घर विकत घेतलं.दोन महिन्यातच त्या गावातल्या माणसांत मिसळून गेल्या.
" काल वाटेत गवे रेडे दिसलेले...जरा जपान जावा तयसून ...घरवाल्यांनू."
रेवतीबाई वळून पाहिलं तर शेजारच्या दळवींच्या घराच्या अंगणात
एक वृध्द स्री ऊभी होती.मळकट लुगडे...ठिगळ लावलेला ब्लाऊज...विस्कटलेले केस...असा तिचा अवतार होता.कदाचित दलित वस्तीतली असावी.
" गावकारनी..चहा घेवून जा" शेजारच्या दळवी काकूनी चहाचा पेला आणला व भिंतीवर ठेवलेला कप काढला.त्या कपात पेल्यातली चहा ओतली व कप सिमेंटच्या सोफ्यावर ठेवला.त्या वृध्द स्रीने कप घेतला व अंगणात बसून चहा पिऊन कप पायरीवर ठेवला.
" येतंय गे ...घरकारनी..सुपा- बिपा होई तर निरोप पाठय."
ती दलित स्त्री बाहेर पडली तस दळवींच्या पत्नीने कपात पाणी ओतले कप विसळला व पुन्हा भिंतीवर ठेवला.रेवतीबाईंना हसू आल . जात पात गावात कशी पाळली जाते हे त्यांना माहित होते.पण बदलत्या काळात माणसा-माणसांत भेदभाव करण योग्य नव्हे हे आता सगळ्यांना कळल पाहिजे..हे बंद झाल पाहिजे अस त्यांना वाटल.
रेवतीबाई केस विंचरून घरात गेल्या. डबा भरून घेतला....साडी बदलून त्यांनी देवासमोर दिवा लावला.सारी तयारी झाली होती. थोड्या वेळाने त्या बाहेर पडणार होत्या.एवड्यात आरडाओरडा ऐकू आला .त्या पाठोपाठ किंचाळण. आवाज मुलींचा होता. रेवतीबाई धावतच घराबाहेर आल्या. दलित वस्तीतल्या पाच-सहा मुली सैरावैरा पळत होत्या.या मुली रोज हायस्कूल मध्ये याच वेळी जायच्या. त्यांच्यापाठीमागे मधमाश्यांचा थवा रोरावत येत होता. बहुतेक एक दोन मुलींना त्यांनी दंश केला होता. मुलींचा आरडाओरडा ऐकून दळवी व त्या पलिकडे राहणारे सावंत बाहेर आले. मुली आसर्यासाठी दळवींच्या अंगणात धावत आल्या.पण दळवी व त्यांच्या पत्नीने घरात जात दरवाजा बंद केला..त्यापाठोपाठ सावंतांचा दरवाजा बंद झाला. भेदरलेल्या मुली पुन्हा रस्त्यावर धावत आल्या. त्या पाठोपाठ मधमाश्यांचा जथा आवाज करत धावू लागला. सगळ्यांनी झटपट आपले दरवाजे बंद केले होते.मुली सैरभैर झाल्या होत्या.
" मुलींनो....इकडे या लवकर...." रेवतीबाई ओरडल्या.
मुलींनी जीवाच्या आकांताने रेवतीबाईंच्या घराकडे धाव घेतली त्यापाठोपाठ मधमाश्यांनी आपला मोर्चा तिकडे वळवला. पण तोपर्यंत मुली घरात पोहचल्या होत्या .बाईंनी झटकन बाहेरचा दरवाजा बंद केला.इतर दरवाजे व खिडक्या पूर्वीच बंद केल्या होत्या.दोघा मुलींना मधमश्यांनी दंश केला होता.त्यातल्या एकीने सरळ जमिनीवर लोळण घेतली व गडाबडा लोळू लागली.तिचा पूर्ण चेहरा सुजला होता.इतर मुली कोपर्यात जमा होऊन थरथरत कापत रडत बसल्या होत्या. रेवतीबाईनी त्या लोळणार्या मुलींला हलकेच उठवलं....कुशीत घेतलं...थोपटले.
" रडू नकोस...तू आता सुरक्षित आहेस...!"
बाईंनी अमृतांजन घेऊन मुलीच्या चेहर्यावर हळूवार हातानी लावलं. चेहर्यावर मधमाश्यांची दोन कुस दिसली.
बाईंनी ती कुस बाहेर काढली. त्या मुलीला त्यांनी बेडवर झोपवल.त्यांनी सर्वांना पाणी दिल....चहा करून दिला.मुली थोड्या स्थिरावल्यावर बाईंनी हायस्कूलमध्ये फोन लावला.घडलेल्या घटनेची कल्पना दिली.काही वेळाने हायस्कूलमधून शिक्षक आले व मुलींना घेवून गेले.त्यानंतर रेवतीबाई आपल्या शाळेत गेल्या.
संध्याकाळी शाळेतून घरी आल्या तेव्हा त्यांच्या अंगणातल्या सोफ्यावर सहा-सात गावातले मानकरी बसले होते.त्यात सावंत,राऊळ,..गवस..घाडी...अशी मंडळी होती. रेवतीबाई विचारात पडल्या. हे गावगुंड आपल्याकडे का आले हे त्यांना समजेना...
" काय काम काढलात?" बाईंनी बळेच हसून विचारल.
" बाईंनू....घरात गोमूत्र शिंपडूक ईलोय."
दळवी हातातला छोटा तांब्या हलवत म्हणाले.
" ब्राह्मणभोजन पण कराव लागेल अस भटजी म्हणालेत." घाडींनी सांगितले.
"पण हे सगळं कशासाठी?"रेवतीबाईंना विचारले.
" कश्याक म्हणजे काय? तूम्ही सकाळी त्या मुलींका घरात घेतलात ना?"
" आता आल लक्षात त्या गरीब..दलित..जखमी मुलींना घरात घेतलं म्हणून घर शुध्द करायचंय तुम्हाला? होय ना?" रेवतीबाईंनी आश्चर्याने विचारले.
" होय...! होय तर..! तुम्ही काम बरा केलात...पण गावाचे काही रिवाज...नियम आसत ते तोडूक येवचे नाय."
सावंतांनी बजावले.
" ठिक आहे.तुम्ही म्हणता तस गोमूत्र शिंपडल....होम केला की घर पवित्र होईल?" रेवतीबाईंनी आश्चर्याने विचारले.
"मग ? घराचं शुध्दीकरण होताला समाजला मा...वर्षानुवर्ष असाच चालू असा." गवसांनी समजावले.
" तुम्ही माझ्यापेक्षा जेष्ठ आहात....अनुभवी आहात..पण बघा, देव सगळ्यांना सारखाच प्रकाश देतो....पाणी देतो..मग आपण असा भेदभाव का करावा. काल तुम्ही सर्वांनी दरवाजे बंद केले होते...मीही तस केल असत तर...तर त्या मुलींच काय झाल असत? ते सगळं बघून देव प्रसन्न झाला असता का?"
सारे एकमेकांकडे बघत गप्प बसले.सगळ्यांच्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह होत.
" गोमूत्र शिंपडण्याच म्हणाल तर ते शिंपडा पण आज सकाळी त्या मुलींच्या आसवांनी माझ्या घरात पवित्र असा जलाभिषेक झालाय....घर पवित्र झालय.....जाताना त्यांच्या चेहर्यावर जे हसू उमटलेल त्यान घरात एक आनंद पसरलाय.....त्यांच्या पावलांनी घरात शुभशकून आलाय...मला आता यापेक्षा वेगळ काही नको.बाकी सगळं तुमच्या हातात...शाळेत सगळे एकत्रच बसतात ना? तुम्ही माझ्यावर बहिष्कार टाकलेत तरी चालेल."
रेवतीबाईंनी निक्षून सांगितल.
तेवढ्यात हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आल्या. त्यांनी रेवतीबाईंना एक गुलाबाचा फुल दिल व म्हणाल्या..
" बाई.... तुम्ही मुलींसाठी देवासारखे धावलात!"
" देवासारखे की देवीसारखे?" बरोबर आलेले शिक्षक हसून म्हणाले. रेवतीबाई सुध्दा हसल्या.
अंगणातल्या सार्या गावकर्यांना आपली चूक समजली ते खजील झाले.कदाचित त्यांच्या मनात ज्ञानाचा एक नवकिरण प्रवेशला होता.हातातला गोमूत्र झेंडूच्या मुळात ओतून बाईंना नमस्कार करत ते निघून गेले.
--------------*-----------*-----------
बाळकृष्ण सखाराम राणे
सावंतवाडी
8605678026
.