जयजय रघुवीर समर्थ
शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे।
वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे ।।
कवी वाल्मिकासारखा मान्य ऐसा ।
नमस्कार माझा सद्गुरू रामदासा ।।
मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात चार वेद, अठरा पुराण, एकक्षेआठ उपनिषद, दोन इतिहास आणि असंख्य श्लोक, सुभाशित, भाष्य, सूत्र आहेत. जर कोणाला वाटलं तरी तो मनुष्य आपल्या संपूर्ण आयुष्यात एवढ सगळं वाचू शकणार नाही आणि वाचलं तरी गोंधळून जाईल, कारण श्रुति: विभिन्ना स्मृतयश्च भिन्ना, न एको मुनिर्यस्य वच: प्रमाणम्। धर्मस्य तत्व निहित गुहायाम्, महाजनो येन गत: स पन्था ।। अर्थात तर्काने पदार्थाचे ज्ञान होत नाही, श्रुतींचा विरोधाभास आपापसात दिसतो, असा एकही ऋषी नाही, ज्यांचे वचन आपण पुरावा आणि धर्माचे तत्त्व म्हणून स्वीकारू शकतो. अशा अवस्थेत महापुरुष कोणत्या मार्गाने जातो जा, त्या वाटेने जायला हरकत नाही. पण काळजी करण्याचे कारण नाही कारण याचे समाधान स्वतः कृष्ण द्वैपायनांनी दिले आहे, ते उपदेश करतात की, गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः। या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिःसृता।। अर्थात, फक्त गीता कंठस्थ करा कारण ती साक्षात श्रीकृष्णाच्या मुखारविन्दातून प्रकट झाली आहे. काही लोकांना प्रश्न पडतो. गीता! ही तर आधुनिक युगात केवळ पाच हजार वर्षांपूर्वी कुरुक्षेत्री उदयास आली होती! ती त्रिकाळाला मार्गदर्शक कशी ठरेल? मित्रांनो याचे उत्तर स्वत: आदीपुरुषाने दिले आहे ते म्हणतात, इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् | म्हणजेच पाच हजार वर्ष तर सोडाच चक्क सत्य युगाच्या प्रारंभी विवस्वानास भगवंताने सांगितलेली हीच ती गीता आहे! श्रीकृष्ण हेच खरे परब्रह्म आहेत. तेच जगातील सर्व गोष्टींचे आदिबीज आहेत. ते क्षरअक्षरातीत आणि ब्रह्मांडाचे सूत्रधार आहे. धर्मग्रंथात तर एवढे ही म्हटले आहे की कृष्णस्तू भगवान स्वयं! भारतीय विचार आणि धर्माचे सार त्यांच्या उपदेशात सामावलेले आहे!
आमचे विनोबा म्हणायचे एखाद्या ग्रंथाची शक्ती आणि प्रगल्भता यावरुन ठरवायची असते की त्यातून किती वेगवेगळे अभिप्राय निर्माण होऊ शकतात, आता बघा ना याच भगवद्गीतेत आदि शंकराचार्यांनी अद्वैत तर माधवाचार्यांना द्वैत आणि रामानुजाचार्यांना विशिष्टद्वैत दिसलं! ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् । मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या: पार्थ सर्वश: ।। भगवंताचे ब्रिद ज्यास-तस अस आहे! भगवंतांनी योग्यांसाठी राजयोग, पंडितांसाठी ज्ञानयोग आणि जनसामान्यांसाठी कर्म आणि भक्ती योग आखून दिलेला आहे!
जो मनुष्य या जन्मात स्वतः गीता वाचतो किंवा श्रवण करतो तो सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होतो. गीताशास्त्र हे संपूर्ण मानवजातीच्या उद्धारासाठी आहे. कोणतीही व्यक्ती कोणत्याही वर्णात, आश्रमात किंवा देशात वसलेली असेल, ती भक्तिभावाने गीतेचे पठण करून परम सिद्धी प्राप्त करून घेऊ शकते. गीतेत यम-नियम आणि कर्म-धर्म पासून अष्टांग योगाचे सगळे पैलू देखील सांगितले आहे. पुन्हा पुन्हा गीता वाचल्याने तिचे वेगवेगळे रहस्य समजून येते. मित्रांनो गीतेच्या प्रत्येक शब्दावर स्वतंत्र ग्रंथ लिहिला जाऊ शकतो एवढी आपली गीता अलौकिक आहे! श्रीकृष्णाने अर्जुनाद्वारे जगाला समजावून सांगितले आहे की, नि:स्वार्थी कर्म करण्याच्या भावनेतच जगाचे कल्याण आहे. गीतेची शिकवण सर्वांनी स्वीकारली आहे, त्यामुळेच ती कोणत्याही विशिष्ट पंथाची आणि उपास्य देवतेची नाही . जशी आमची ज्ञानेश्वर माऊली म्हणते, विश्वात्मक भागवंताची पूर्ण जीवसृष्टीला दिलेली भेट म्हणजे गीता! भारतात आणि परदेशातही गीतेचा भरपूर प्रचार होत आहे. जगात क्वचितच अशी कोणतीही सभ्य भाषा असेल ज्यामध्ये गीतेचा अनुवाद झालेला नाही.
मित्रांनो याच गीतेने महात्मा गांधींना अहिंसेचा संदेश दिला आणि याच गीतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांना सशस्त्र क्रांतीचा संदेश दिला. १६ जुलै १९४५ रोजी मानव इतिहासातील प्रथम अण्वस्त्राचा स्फोट पाहिल्यावर रॉबर्ट ओपेनहाइमरच्या मुखातून उस्फुर्त पणे भगवद्गीतेचा श्लोक प्रकट झाला, त्यांना ते तेज भगवान श्री कृष्णाच्या विराट स्वरूपा सारख वाटलं! कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भू: मा ते सङ्गोस्त्वकर्मणि ।। या एका श्लोकावर टिळकांनी कर्मयोगशास्त्र उभ केलं! सर्व क्रांतिकारकांच्या मनात निष्काम कर्माची ज्योत पेटवली! वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि। तथा शरीराणि विहाय जीर्णा- न्यन्यानि संयाति नवानि देही।। अस सांगून आत्मा अमर आहे अस प्रतिपादन केल आणि मारिता मारिता मरे तो झुंझेन असे प्रतिज्ञा करणारे असे अनोको स्वातंत्र्यसैनिक उदयास आणले! अनादी मी अनंत मी अवध्य मी भला मारील रिपू जगती असा कवण जन्माला? तात्यारावांची ही कविता जगप्रसिद्ध आहे! नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः। न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।। ब्रायटनच्या समुद्रात जेव्हा त्यांनी मोरया बोटीतून उडी घेतली तेव्हा गीतेचे हेच तत्वज्ञान त्यांच्या हृदयस्थ होत! त्यांच्या या उडीने देशभक्तीची अशी लाट उसळली की ब्रिटेनच साम्राज्य डोलायमान झालं! गीतेने वॉर्नर हेस्टिंगस पासून सुनीता विलियमस पर्यंत अगणित महातम्यांना प्रभावित केलं आहे!
भूतकाळ असो वा वर्तमानकाळ, काय योग्य आणि काय अयोग्य हे सर्वांना माहीत आहे! पण आपलं ही दुर्योधना सारखं झालं आहे, जानामि धर्मं न च मे प्रवृत्तिर्जानाम्यधर्मं न च मे निवृत्तिः। केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोऽस्मि तथा करोमि।। आपण आपल्या मनावर ताबा मिळवू शकत नाही! अर्जुन सुध्दा हेच म्हणाला होता, वायोरिव सुदुष्करम्! हे देवा मनाला ताब्यात आणण असंभव आहे! पण अच्युत म्हणाले, असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् । अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ।। अर्थात, हे महाबाहो अर्जुन मनाला नियंत्रणात आणण कठीण आहे पण असंभव नाही! आणि ज्ञान आणि वैराग्याने ते शक्य आहे! याच गीतेच्या ज्ञानाने मार्गदर्शन घेऊन, टिळक लोकमान्य झाले! सावरकर वीर ठरले! विनोबा आचार्य तर शिवबा छत्रपति झाले! गांधींना महात्मा आणि बोसांना नेताजी याच गीतेने बनवलं!
तर मित्रांनो या गीतेच्या अमृत ज्ञानाच्या सहाय्याने आजचा समाज सुध्दा "न योद्धसे गोविंदम" ते "करिष्ये वचनम तव" चा मार्ग पादाक्रांत करेल ही सदिच्छा व्यक्त करतो आणि त्या कृष्ण परमात्म्याच्या चरणी हा लेख समर्पित करतो! हे देवा आम्ही सर्व तुला क्षरण आलो आहोत आमचा योगक्षेम आता तूच वाहा आणि आम्हाला तुझ्या पद्मपदी स्थान दे! वसुदॆव सुतं दॆवं कंस चाणूर मर्दनम् । दॆवकी परमानन्दं कृष्णं वन्दॆ जगद्गुरुम् ॥
~ अमृत डबीर