कधी नव्हे ते आज माझी नेहमीची बस केवळ पाच मिनिटं उशीर झाल्यामुळे चुकली. गेली दोन वर्षे मी या भागात काम करीत आहे आणि मला वरचेवर शोरापुर येथे यावे लागते . अम्मापूर येथून येण्याजाण्याच्या माझ्या बसच्या वेळा ठरलेल्या आहेत. आज मात्र तालुका डेव्हलपमेंट बोर्ड व बॅंकेच्या कामात अधिक वेळ गेल्याने थोडासा उशीर झाला.
आता मी शोरापूर - नारायणपूर या बसने निघालो होतो. ही बस केवळ अम्मापूर फाट्या पर्यंत. जाणार आहे. तेथून पुढचे सहा किलोमीटर अंतर मला पायीच जावे लागणार आहे. वाट माहिती ची आहे पण पायाखालची नाही म्हणून थोडी चिंता. या तंद्रीत असतांनाच " ओsss पुनावाले साsssब अम्मापूर क्रास आया देखो" अशी शब्बीर (वाहकाची )आरोळी कानी आली. मी तंद्रीतून जागे होत उभा राहिलो आणि बस मधून खाली उतरलो. माझ्या मागोमाग एक वृद्ध व एक महिला खाली उतरले. मला जरासे हायसे वाटले. चला थोडीतरी सोबत राहील अम्मापूर पर्यंत .
मी रस्ता ओलांडून पलीकडे गेलो. बसमधून खाली उतरलेला वॄध्द विरुध्द दिशेने चालू लागला होता. मी त्या महिलेच्या दिशेने बघितलं. ती इकडेच येताना दिसली. काहीतरी खिशातून शोधण्याच्या बहाण्याने थोडा वेळ काढला. आता थोडं अंधारून आलेलं होतं. या अंधूक प्रकाशात मी त्या महिलेला न्याहळले. ठेंगणी, नाकी डोळी रेखीव , पण अती सावळी होती. चालण्यात लगबग होती. बहुतेक तिलाही अंधाराची चिंता असावी . माझ्या जवळून जाताना तीने हसत विचारले " यावं ग्राम?(कोणत्या गावी?)" अर्थातच ती कानडी बोलत होती. मला फारसं कानडी भाषा येत नव्हतीच. त्या अंधुक प्रकाशात तीचे पांढरेशुभ्र दात चमकुन गेले. मी केवळ "अम्मापूर" एवढेच म्हणत हात त्या दिशेने हलवला.
ती लगबगीने पुढे चालू लागली. तीच्या चालण्यात घाई जाणवत होती. अंधुक प्रकाशातही तिच्या शरीरयष्टी ची रेखीव रचना जाणवत होती. पाठीवर झोळीत काहीतरी होते.
काही अंतर ठेवून पण फार दूर नाही अशा प्रकारे मी तिच्या मागे चालत राहिलो. आता सांज प्रकाश कमी कमी होत अंधाराची जाणीव होवू लागली . बाजूच्या शेतातून ट्यॅं sss व, ट्यॅं व करीत टिटवीची जोडी उडत उडत नदीकडे निघून गेली. त्या आवाजाने प्रथम थोडा दचकलो . मग लक्षात आले की आपल्याला बराच घाम आलाय. खिशातून रुमाल काढून घाम पुसला. पुढे चालणारी महिला मागं वळून बघतेय असं जाणवलं. भास असेल असे समजून मी दुर्लक्ष केले. आता आमच्यातील अंतर कमी होतंय असं लक्षात आलं. तीने एकदा मागे कटाक्ष टाकला. तिचे डोळे व दात चमकुन गेले. तीचे मागं बघणे दर तीस चाळीस पावलांवर होतंय असं जाणवलं. मी संभ्रमात पडलो. अजूनही अम्मापूर तीन साडेतीन किलोमीटर दूरवर असावे असे वाटत होतं. सर्वत्र अंधार दाटला होता अन् मी धास्तावलो होतो. शरीर श्रमले होते व श्वासांची गती वाढली होती.
चालण्याचा वेग कमी केला. रुमाल काढून घाम टिपला. आता दोघांमधील अंतर थोडं वाढू लागले. माझा श्र्वास हळूहळू स्थिर होवू लागला. आता तिचं मागे वळून बघणे मला सवयीचं झालं होतं. माझी नजरही अंधाराला सरावली होती.
आणखी सुमारे अर्धा किलोमीटर अंतर कापलं असेल तेवढ्यात मंद झुळूक अंगभर आली . त्या बरोबरच तुळशी चा सुगंधही आला. त्या अंधारातच मी झुळूक व सुगंधाच्या दिशेने नजर वळवली. एका शेतात, दिड दोन फूट उंचीची रोपे दिसली. बहुतेक तुळस असावी.
मी पुढे चालणाऱ्या त्या महिलेच्या दिशेने नजर वळवली... पण, पण ती कुठेच दिसत नव्हती. जवळपास एखादा रस्ता अथवा पायवाटही दिसत नव्हती. मी थोडासा भांबावलो. तेव्हड्यात लहान बाळाची हळूवार किंचाळी कानी आली. क्षणात सर्वत्र भयाण शांतता पसरली. मी आता चांगलाच घाबरलो होतो. आवाजाच्या दिशेला कसलीच हालचाल नव्हती. ती महिलाही कुठे नजरेस दिसत नव्हती. त्या आल्हाददायक हवेतही मला दरदरून घाम फुटला.
मी झपाझप पावले टाकत होतो. अजूनही बरेच अंतर कापायचे होते. हवेत मंद गारवा असूनही मी घामाने निथळत होतो. बराच वेळ असा झपाझप चालत होतो. तेव्हड्यात समोर दोन मिणमिणते दिवे नजरेस पडले. बहुतेक, सायकलींवर कुणीतरी येत असावेत. इकडच्या गावांत एकही मोटरसायकल नव्हती. मी क्षणभर थांबून अंदाज घेतला. सायकली पुढेच, म्हणजे माझ्या दिशेनेच येत होत्या. मला जरा हायसे वाटले. मी चाल मंदावली. जे कोणी असतील त्यांना मला अम्मापूर पर्यंत सोडायला सांगायचं हे निश्चित केले. थोडा पुढे गेलो व ते दोन सायकलस्वार माझ्या समिप आले. तिकडून आवाज आला " कौन? पुनावाले साssब क्या? मै पाशा जी." मी जरासा निर्धावलो. "तूम कैसे आये पाशा मियाॅं?"
"वो डाक्टर साब बोले देखो. और ये शरणा डाक्टर के पिछे पडा. बोला , आप तो आनेवालेही है. फिर वो अम्मापूर गाडी में नहीं थे. सब लोगा राह देखे जी. आवो सायकिलपर बैठो"
हा शरणप्पा माझ्या सर्व्हे च्या कामात कुलीचे काम करायचा. डाक्टर ग्रामीण रूग्णालयात नोकरी करीत असे. या खेरीज, गावातील अन्य नोकरदार ही परिचयाचे झाले होते.
मी सायकलच्या कॅरियर वर बसलो. आता आमचा प्रवास वेगाने अम्मापूरच्या दिशेने सुरू झाला. थोड्यावेळाने गावातील दिवे नजरेस पडले. आणखी काही अंतर गेल्यावर पाशा व शरणाप्पा ने गावाच्या तथाकथित बस अड्ड्यावर असलेल्या अत्यंत छोट्या हाटेलजवळ सायकली थांबविल्या. हाॅटेलच्या तुटक्या खुर्ची व बाकड्यावर डाॅक्टर नारायण,मल्लप्पा हेल्थ वर्कर, डोड्डी स्कूल सब् इन्स्पेक्टर, कम्पाउंडर मगदूम, शिपाई सलीम, फॅमिली प्लॅनिंग वर्कर लोकापूर असे सगळे बसले होते.
त्यांना बघून मी आनंदीत झालो. त्यांच्या चेहऱ्यावरील चिंतेचे ढग विरू लागले. डाॅक्टरांनी " आवो जी , चाय पिते है" , म्हणत दुर्गाअम्मास चहा द्यायला सांगितले. मी जावून डाॅक्टरांच्या शेजारी बसलो. अम्मा ने सर्वांना चहा दिला. चहाचा बिन कानाचा कप माझ्या हातात देत," मुक्काम गाडीसे क्यूँ नहीं आये ?" विचारले. मी चहाचा एक घोट घेतला. सैरभैर झालेल्या मनाला जरा सावरले आणि शक्य तितक्या कमी शब्दांत घडलेला प्रसंग निवेदन केला. थोडा वेळ सगळेच स्तब्ध होते. त्यानंतर , जणू सभेची सुत्रे सूपूर्त केल्यासारखे सर्वजण डॉक्टरांकडे बघू लागले. डाॅक्टर विचारांत गुंतल्या सारखे वाटले. ते स्कूल इन्स्पेक्टर डोड्डींकडे बघत बोलले. "अरे सरजी, वो आपको कुछ गलत फहमी हो गयी देखो. वो औरत कुछ काम के लिये आजूबाजू गयी होगी देखो. आसपास पेड के पिछे गयी होगी ." अनेकांनी माना डोलावल्या.
पण मग ती क्षीण किंचाळी?
मी शांतपणे बघतोय याची नोंद घेत डोड्डी बोलले, " वैसे कोई डरनेकी बात नहीं . एखादबार ऐसा होता है. और भी कुछ लोगांके साथ भी ऐसा हुवा है. मगर वो किसिको कुछ नहीं करती जी. आप मन से ये बात निकाल दो."
तेथून निघण्याच्याआविर्भावात डॉक्टर मल्लप्पास म्हणाले," नीवू होगूवगा निम्मोदिगे टॅब्लेट तेगडूकोल्ली. आवरू रात्री मलगली."(जातात टॅबलेट घेऊन जा. रात्री झोपताना दे यांना.) अन् माझ्याकडे बघून " रातको टॅब्लेट लेना देखो." मल्लप्पा "बन्नी" म्हणजे येतो म्हणाला.
टॅब्लेट मुळे किंवा, थकल्यामुळे मला छान झोप लागली. सकाळी उठून मी नेहमीप्रमाणे भूशास्त्रीय सर्वेक्षणासाठी निघालो. सोबत शरणप्पा होताच. दुपारी साडेतीन वाजता परतलो. शिरस्त्याप्रमाणे सर्व कामे उरकली. चार-पाच दिवस असेच कामात व्यस्त होतो.
आज मात्र कामातून सुटी घेणार होतो. त्यामुळे थोडासा उशिरा ने उठलो. आंघोळ करून मल्लप्पा बरोबर दुर्गम्मा चे कॅन्टीन कम् मेस कम् टपरीवजा ' हाटेलात' बसलो. उपलब्ध पदार्थातून मला चालू शकणारी वग्गरणी (चुरमुर्यांचे पोहे) मागविले. दोघांपुढे जुन्या वर्तमानपत्रांचे चतकोर आले. त्यावर दुर्गम्माने वाटी ने वग्गरणी ओतली. सोबत चहाही होता. वग्गरणी संपत असताना मल्लप्पा समोरील वर्तमान पत्राच्या त्या चतकोर तुकड्याकडे लक्ष गेले. त्यावरील छायाचित्रावर लक्ष गेलं अन् मी जरासा दचकलो. त्या छायाचित्रात एक तरूणी व शेजारी एक अर्भक पडलेले दिसत होते. मी झटकन तो वर्तमान पत्राचा तुकडा उचलून मल्लप्पा समोर धरला व त्या खालील मजकूर वाचून मला हिंदीत सांगण्याची विनंती केली. मल्लप्पा ने काळजीपूर्वक मजकूर वाचल्यानंतर मला जे सांगितले त्याने मी स्तिमित झालो. त्या महिलेचा व तिच्या लहानग्याचा तिच्या नवऱ्याने खून केला होता. ती महिला बाळंतपणानंतर दीड महिन्याने सासरी परतली होती. मधल्या काळात तिचा नवरा , जो शेतमजूर होता, शेताच्या विधवा मालकिणी बरोबर रहायला लागला होता. आता त्याला आपल्या पत्नी ची अडचण नको होती. त्यामुळे त्याने हा आततायी प्रकार केला होता. हे सर्व ऐकून मी हादरलो. हा प्रकार सुमारे सहा महिन्यांपूर्वीचा. मला आता त्या रात्रीचा प्रसंग आठवला. स्कूल सब् इन्स्पेक्टर डोड्डी चे शब्द आठवले.
याचा अर्थ त्या रात्री मला दिसलेली स्त्री , हीच तरूणी होती व तिच्या पाठीवर झोळीत ते लेकरू होते. त्या आठवणीने मला पुन्हा अस्वस्थ केले. माझी घालमेल बघून मल्लप्पानं माझ्यासाठी पुन्हा चहा मागविला. मी अतिशय शांत होतो. चहा संपत असताना , रस्त्यावर धूळ उडवत अम्मापूर ला येणारी दिवसातली पहिली बस येवून समोर थांबली. बरेच स्त्री-पुरुष, मुले खाली
उतरली. सगळ्यात अखेरीस एक इसम व पाठोपाठ लगबगीने दोन पोलिस हवालदार उतरले. त्या इसमाचे
दोन्ही दंड दोरखंडानं बांधलेले होते व दोरखंड पोलिसांचे हातात होते. तो इसम खूपच उदास व थकलेला दिसत होता. मल्लप्पा माझ्या कानात पुटपुटला " उस औरता का मर्द है". मी परत एकदा सुन्न झालो. हात धरून मल्लप्पा ने मला निघण्याची सूचना दिली. तो पर्यंत हवालदार व तो इसम आत येऊन स्थानापन्न झाले. इसम जमिनीवरच बसला. हवालदार व माझी दॄष्टभेट झाली. मल्लप्पा कडे बघत त्यानं विचारलं " यारू?"(हे कोण?). " पुणें इंद कल्लूगड परिक्षेगे बंदीदवू" (पुण्याहून आलेत दगड परिक्षणासाठी), "भूविज्ञानी". (भूशास्त्रज्ञ).
आम्ही दोघेही बाहेर पडलो. " अब, उस रात जो भी देखा भूल जाओ." मल्लप्पा वयानं माझ्या पेक्षा लहान होता, पण गावगाड्याचे समाजशास्त्र व नागरिकशास्त्र याची त्याला अधिक जाण होती. मी बेचैनीतून बोलून गेलो " सर्व्हे बंद करके मै घर जाऊंगा. फिर कभी वापस आऊंगा". मल्लप्पा लगेच उत्तरला ,
" जावो, मगर दो-चार दिनों बाद. "