Thats all your honors - 10 in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण -१०)

Featured Books
Categories
Share

दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण -१०)

प्रकरण दहा.
दैविक दयाळ, सरकारी वकील, अॅड.खांडेकर यांचा मानस पुत्र समजला जायचा. तो कोर्टात उठून उभा राहिला.
“ युवर ऑनर, राज्य सरकार विरुद्ध आकृती सेनगुप्ता हा खटला उभा राहिलाय आणि ही फक्त प्राथमिक तपासणी आहे. हे पाहण्यासाठी की आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध होण्या एवढा पुरेसा पुरावा सरकार पक्षाकडे आहे का . सरकार पक्षातर्फे मी खटल्याचे काम पाहणार आहे. इथे आरोपी तर्फे पाणिनी पटवर्धन हजर आहेत. ते कामकाज सुरु करायला तयार आहेत असे मी समजतो.”
“ आम्ही बचाव पक्ष तयार आहोत.” पाणिनी म्हणाला.
“ आम्ही सरकार पक्ष तयार आहोत.”
“ तर मग कामकाज सुरु करा.तुमचा पहिला साक्षीदार बोलवा.” न्यायाधीश कार्तिक भाटवडेकर म्हणाले.
“ माझा पहिला साक्षीदार आहे, डॉक्टर हिरण्य द्रविड., यांनी प्रेताची उत्तरीय तपासणी केली आहे.” दैविक दयाळ म्हणाला.
डॉक्टर द्रविड यांनी शपथ घेतली.आपले ज्ञान, अनुभव शिक्षण या बद्दल माहिती दिली.त्यांनी सांगितले की त्यांनी तपन ची उत्तरीय तपासणी केली.त्याचा मृत्यू पाठीमागून सुऱ्याने भोसकले गेल्यामुळे झाला.आणि त्याचे प्रेत तपासणी साठी आले तेव्हा तो चाकू तसाच होता.त्यांनी सांगितले की मृत्यूची अगदी अचूक वेळ सांगता येणार नाही पण एवढे सांगता येईल की मांस आणि अंडी खाल्ल्या नंतर पुढील वीस मिनिटातच त्याचा मृत्यू झाला आहे.वेळेच्या बाबतीत साधारण अंदाज द्यायचा तर सायंकाळचे सात नंतर पण मध्यरात्री पूर्वी असा अंदाज देता येईल पण जास्त योग्य अंदाज म्हणजे मयताने जेवायला सुरुवात केल्यानंतर पाच ते दहा मिनिटात मृत्यू झाला असे म्हणता येईल.
“ उलट तपासणी घ्या तुम्ही पटवर्धन.” दैविक म्हणाला.
पाणिनी उठून उभा राहिला.
“ तपन जेवला कधी याची तुमच्याकडे माहिती नाही ? ” पाणिनी ने विचारले.
“ नाही ”
“ मृत्यू लगेचच आला? अगदी तात्काळ ? ”
“ अक्षरश: तात्काळ.” डॉक्टर म्हणाले.
“ वार जरी पाठीत करण्यात आला असला, तरी पुढे उभ्या असणाऱ्या व्यक्तीला तो करणे शक्य होते का ? ”
“ मला नाही वाटत तसे कोणाला जमू शकते.” डॉक्टर म्हणाले.
पाणिनी च्या चेहेऱ्यावर स्मित रेषा उमटली. “ दॅट्स ऑल युवर ऑनर ”
“ मी न्यायाधीशांची माफी मागतो आधीच की नेहेमीच्या पद्धती नुसार खुनाची जागा आणि प्रेताची ओळख पटवणे हे सोपस्कार आधी करायच्या ऐवजी मी डॉक्टरांची साक्ष आधी घेतली. ते खूप व्यस्त असतात, त्यांना लौकर जायचे होते त्यामुळे मी त्यांना आधी बोलावले. आता मी नेहमी प्रमाणे नकाशे सादर करून खुनाची जागा नक्की करतो. त्यानंतर प्रेताची ओळख पटवतो.” दैविक म्हणाला.
त्या नंतर त्याने अनेक नकाशे सदर केले, फोटो सदर केले, ते नकाशे तयार करणाऱ्यांना आणि फोटो घेणाऱ्यांना कोर्टात बोलावले.आणि ते सर्व पुरावा म्हणून सादर केले.
“ मी आता जयराज आर्य ला पिंजऱ्यात बोलावू इच्छितो.” दैविक म्हणाला.” मी त्याला दोन्ही गोष्टींसाठी उपयोग करून घेणार आहे, एक सर्वसाधारण साक्षीदार म्हणून आणि मृताची ओळख पटवणारा म्हणून.” दैविक ने स्पष्ट केले.
“ ठीक आहे.” न्यायमूर्ती म्हणाले. “ जेवढे पटापट उरकता येईल तेवढे करा.कारण ही प्राथमिक सुनावणी आहे.तरीही तपन कुटुंबामुळे त्याला जास्तच प्रसिध्दी मिळाली आहे.त्यातून पटवर्धन सारख्या वकिलाने खटल्यात भाग घेतल्याने गर्दी वाढली आहे.तेव्हा आम जनतेचा अडथळा कामकाजात होणार नाही याची दक्षता घ्या.”
पाणिनी पटवर्धन च्या लोकप्रियतेचा झालेला उल्लेख दैविक ला रुचला नाही.पण स्वत:वर नियंत्रण ठेवत तो म्हणाला, “ मिस्टर आर्य, तुमचा व्यवसाय, उद्योग वगैरे काय? ”
“ मी अत्ता आणि गेली अनेक वर्षे कास्टिंग अॅण्ड इंजिनियरिंग कंपनीत मॅनेजर म्हणून कंपनीच्या मुख्यालयात काम करतो.”
“ तुमचे वय? ”
“ बत्तीस.”
“ तुमचा कधी तपन लुल्ला शी संबंध आला होता? त्याची ओळख झाली होती?”
“ हो अर्थातच.”
“ कुठे आहे तो सध्या?”
“ तो हयात नाहीये.”
“ तुम्हाला कसं माहिती की तो हयात नाहीये? ”
“ मीच त्याच्या प्रेताची ओळख पटवली ”
“ कोणी सांगितलं तसे करायला?”
“ पोलिसांनीच सांगितले. तपन चे वडील नमन खूपच खचले होते.त्यांना एवढा धक्का....”
“ ते सर्व सांगू नका.” दैविक दयाळ म्हणाला. “ तुम्ही पोलिसांच्याच सुचने नुसार हे सर्व केलेत ना?”
“ हो सर्.”
“ पोलिसांनी तुम्हाला या प्रकरणात काही माहिती काढायला पाठवले आणि जेव्हा तुम्ही त्यासाठी गेलात तेव्हा तुम्हीच स्वत:हून तपन च्या प्रेताची ओळख पटवायची तयारी दर्शवली?”
“ अगदी बरोबर.”
“ या खटल्यातील आरोपी आकृती हिला तुम्ही ओळखता. ? ”
“ हो.”
“”कधी पासून ओळखता? ”
“ ती या कंपनीत लागल्या पासून ”
“ म्हणजे कधी पासून ? ”
“ साधारण दोन महिने,”
“ पाच तारखेच्या सोमवारी तुमचे आणि आकृती चे काही बोलणे झाले होते? ”
“ हो झाले होते. संध्याकाळी.नेहेमीची ऑफिस ची वेळ संपल्या नंतर ”
“ काय संवाद झाले होते? ”
जादा वेळ थांबून काम करण्या बद्दल. मी सहसा कधी कोणाला जादा वेळ थांबवून घेत नाही.”
“ ते नका सांगू.मी एवढंच विचारतोय की तिच्याशी जादा वेळ थांबून काम करण्या बद्दल चर्चा झाली होती का? ”
“ म्हणजे अस झालं की ऑफिस चे कामकाज संपत आलं होत आणि स्टेनोग्राफर वगैरेंची घरी जायची वेळ झाली होती.”
“ किती वाजता संपते ऑफिस ? ”
“ पाच वाजता. ”
“ बर मग काय झालं? ”
“ आरोपी आकृती काम करतच बसली होती.”
“ मग तिच्याशी काही बोलणे नाही का झाले?”
“ झाले ना ! पण ते नंतर.”
“ कधी झाले ते बोलणे ? म्हणजे किती वाजता?”
“ साडे पाच वाजता.जेव्हा ती कामाचे कागद माझ्याकडे घेऊन आली तेव्हा. मी तिला मनापासून धन्यवाद दिले आणि म्हणालो कि हल्ली अशा मुली दिसतं नाहीत स्वत:हून काम पूर्ण केल्या शिवाय न जाणाऱ्या. ओव्हर टाईम चा विचार न करता.त्यावर ती म्हणाली कि त्या कामाची कागदपत्रे आजच मेल ने जायला हवी होती हे तिला माहित होते.म्हणूनच थांबून काम केले.”
“ती बाहेर कधी पडली नंतर ”
“ साडेपाच नंतर लगेचच ”
“ त्यावेळी आणखी कोणी होते ऑफिसात ? ”
“ कोणीच नाही फक्त मी आणि ती.”
“ त्यावेळी हवामान कसे होते ? ”
“ पाउस पडत होता. तशी दिवसभरच रिपरिप होती.” आर्य म्हणाला.
“ तुम्ही उलट तपासणी घेऊ शकता. मिस्टर पटवर्धन ” दैविक दयाळ म्हणाला.
पाणिनी ने साक्षीदाराकडे नीट निरखून पहिले.
“ तुम्ही म्हणाला की आरोपी तुम्ही काम करत असलेल्या कंपनीत मागील दोन महिन्य पासून नोकरी करते , बरोबर ? ”
“ हो बरोबर ”
“ तुम्ही तिला त्यापूर्वी पासून म्हणजे ती तिथे नोकरीला लागण्यापूर्वी पासून ओळखता का? ”
“ नाही .”
“ कंपनीत पर्सोनेल डिपार्टमेंट असेल ना?”
“ हो आहे ना.”
“ कर्मचारी नोकरीला लावताना तुमचा काही त्या विभागाशी संबंध येतो का? म्हणजे तुम्हाला काही अधिकार आहेत का ? ”
“”नाही.तसे काही अधिकार नाहीत.”
“ पण काढून टाकण्याचे आहेत? ”
“ हो.”
“ तुम्हाला आरोपी नोकरीला लागल्याचे स्मरणात आहे.? ”
“ चांगलेच स्मरणात आहे. ”
“ ती नोकरीला लागताना सर्व साधारण माणूस ज्या प्रक्रिया पूर्ण करून नोकरीला लागतो त्या प्रक्रिया आरोपीने पूर्ण केल्या होत्या ? ”
“ नाही. तपन लुल्ला च्या खास सुचने नुसार तिला या नोकरीत ठेऊन घेण्यात आल होतं.”
“ आरोपीने नोकरी कधी सोडली? ”
सहा तारखेला मी तिला काढून टाकले. कारण ....”
“ माझा प्रश्न समजून घेऊनच उत्तर द्या.मला फक्त तिच्या तारखेत रस आहे.”
“ सहा तारखेला.” साक्षीदाराने त्रोटक उत्तर दिले.
“ दॅट्स ऑल युवर ऑनर ” पाणिनी म्हणाला. “ एवढंच विचारायचं होत मला.
“ तुम्हाला फेर तपासणीत पुन्हा काही विचारायचे नसेल तर पुढचा साक्षीदार बोलवा.” न्यायाधीश दैविक दयाळ ला म्हणाले.
“पायस हिर्लेकर ” दैविक ने नाव पुकारले.
त्याने पुढे येऊन शपथ घेणे , ओळख करून देणे इत्यादी सोपस्कार पूर्ण केल्यावर दैविक ने त्याला विचारले, “ या महिन्याच्या पाच तारखेच्या सोमवारी संध्याकाळी थोड्या उशिरा , तुम्ही कुठे होतात? ”
“ मी माझ्या घरातच होतो.”
“ पत्ता सांगा तुमच्या घराचा ”
साक्षीदाराने पत्ता सांगितला.
“ तुम्ही विवाहित आहात कि एकटेच? ”
“ अविवाहित ”
“ तुम्ही तुमच्या घरात एकटेच राहता?”
“ अर्थात.”
“ तपन लुल्ला शी तुमचा परिचय होता? ”
“ मी अनेकदा पाहिलंय त्याला.माझ्या घर जवळच्याच इमारतीत तो राहत असे.”
“ त्याची गाडी तुमच्या परिचयाची आहे? ”
“ हो माहिती आहे त्यांची गाडी.”
“ मला वाटतय तुमचे अपार्टमेंट आणि त्यांचे अगदी शेजारी आहे. आणि तुमच्या घरातून तपन च्या अपार्टमेंट मधे बघता येते.” दैविक ने विचारले.
“ बरोबर आहे ”
“ आता मला सांगा की पाच तारखेच्या संध्याकाळी उशिरा तुम्हाला तपन च्या गाडीत कोणी दिसले का? ” दैविकने विचारले.
“ हो.आकृती सेनगुप्ता दिसली.”
“ काय करताना दिसली ती? ”
“ ती नुकतीच गाडी घेऊन आली होती आणि अग्नी शमन यंत्राच्या खांबा समोर गाडी लाऊन उतरत होती.”
या वर दैविक काहीतरी बोलणार होता तेवढ्यात साक्षीदार मधेच म्हणाला, “ मी माझ्या वाक्यात जरा सुधारणा करतो, मी असे गृहीत धरले कि ती गाडी घेऊन नुकतीच आली होती. मी तिला बघितले ते ती खाली उतरत असताना.”
“ आता मी विचारतो ते नीट ऐकून उत्तर द्या., तुम्ही तपन ची गाडी ओळखली.आरोपीला ही तुम्ही ओळखले.आणि अग्नी रोधाकासमोर गाडी लाऊन ती गाडीतून उतरत असताना तुम्ही पहिले आणि ओळखले., बरोबर का? ” दैविक ने विचारले.
“ अगदी बरोबर ”
“ ओळख पटवण्यात काहीही संदेह, शंका नाही हे नक्की? ”
“ अजिबात चूक होत नाही.” हिर्लेकर ने आत्मविश्वासाने सांगितले.
“ तुम्ही उलट तपासणी करू शकता पटवर्धन.” दैविक दयाळ म्हणाला.
“ सात तारखेला मी तुमच्या दुकानात आल्याचे तुम्हाला आठवतंय ? ” पाणिनी ने विचारले.
“ अगदी चांगले आठवतंय ”
“ तेव्हा माझ्या बरोबर एक तरुणी होती. ? ”
“ बरोबर ”
“ त्यावेळी इन्स्पेक्टर तारकरच्या उपस्थितीत, आणि माझ्या समोर आणि माझ्या बरोबर असलेल्या तरुणी समोर तुम्ही खात्रीपूर्वक सांगितले होते की माझ्या बरोबर असलेली तरुणी आणि तुम्ही तपन च्या गाडीतून उतरताना बघितलेली मुलगी या एकच आहेत ? ”
“ हो मी सांगितले होते परंतू ती माझी चूक झाली होती.”
“ तुमच्या मनात अत्ता ती घटना जेवढी ताजी आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्यावेळी म्हणजे मी जेव्हा तुमच्या दुकानात आलो होतो तेव्हा जास्त ताजी होती? ”
“ नाही , अगदी उलट स्थिती होती. मला विचार करायला नंतर अवधी मिळाला तेव्हा माझ्या लक्षात आले की त्यावेळी मला गंडवण्यात आले होते.”
“ कोणाकडून गंडवण्यात आले तुम्हाला ? ”
“ तुम्ही आणि तुमचा तो खाजगी गुप्तहेर .त्याने मला तुमच्या बरोबर आलेल्या मुलीचा, मैथिली आहुजाचा फोटो दाखवला, तो फोटो सतत बघितल्यामुळे माझा गोंधळ झाला.आणि तुम्हाला काय हवंय ते माझ्या कडून हो म्हटले जावे या बद्दल तुमची सुचवण्याची पद्धत आणि ताकद एवढी जबरदस्त होती की मला हो म्हणण्या वाचून पर्यायच नव्हता. ”
“ पण तुम्ही त्या वेळी ते कबूल केलेत की मैथिली आहुजा ला च तुम्ही गाडीतून उतरताना बघितले होते? ”
“ हो पण मला फसवण्यात आल्यामुळे ते घडले होते.”
“ प्रश्न हा होता की त्यावेळी तुम्ही तसे विधान केले होते की नाही. ? ”
“ पण ....”
“ प्रश्नाचे हो किंवा नाही असे उत्तर द्या.” पाणिनी ने फटकारले.
“ बर ठीक. केले तसे विधान मी.”
“ ठाम पणाने केले होते त्यावेळी. ? ”
“ ठाम पणे म्हणजे काय तुम्हाला अपेक्षित आहे? ”
“ त्यावेळी तुम्ही केलेले विधान हे खात्रीपूर्वक केले होते? ”
“ चुकीमुळे खात्रीपूर्वक विधान केले.
“ असेल पण खात्रीपूर्वक केले होते.? ”
“ हो ” नाईलाजाने साक्षीदार म्हणाला.
“ काय तारीख होती तुम्हाला तपन ची गाडी लावताना ती दिसली त्या दिवशी?”
“ पाच तारीख.”
“ आणि किती वाजता ? ”
“ रात्री दिसली.अगदी नेमकी वेळ नाही सांगता येणार.”
“ साधारण वेळ काय असावी? ”
“ मध्यरात्री पूर्वी एवढेच मी सांगू शकतो.”
“ मध्यरात्री च्या आधीच कशावरून? ” पाणिनी ने विचारले.
मी गाणी ऐकत आणि वाचत बसलो होतो कोचावर . तिथेच मला झोप लागली.मग मला कॉफी प्यायची इच्छा झाली म्हणून बाहेर च्या हॉटेलमध्ये गेलो.ते हॉटेल बारा वाजता बंद होते . त्यापूर्वीच मला ती दिसली म्हणजे रात्री बारा पूर्वीच असणार. माझा अंदाज आहे कि रात्री दहा च्या सुमाराला असणार पण खात्री नाही.मी घड्याळ घातले नव्हते.”
“ गाडीतून बाहेर आल्यावर आरोपीने काय केले.? ”
“ ती क्षणभरासाठी फुट पाथ च्या कसौम्या उभी राहिली. मग गाडीच्या उजव्या बाजूचे दार जोरात लावले आणि कोपऱ्या पर्यंत चालत गेली.”
“ कोणत्या बाजूचा कोपरा? ”
उत्तर दिशेकडील.”
“ दॅट्स् ऑल युवर ऑनर. माझे प्रश्न संपले.” पाणिनी म्हणाला
प्रकरण १० समाप्त