Premgandh - 18 in Marathi Short Stories by Ritu Patil books and stories PDF | प्रेमगंध... (भाग - १८)  

Featured Books
Categories
Share

प्रेमगंध... (भाग - १८)  

(आपण मागच्या भागात पाहीलं की, अजय त्याच्या आईबाबांसोबत राधिकाच्या घरच्या परिस्थितीविषयी बोलतो. आणि त्याचे आईबाबा पण त्याला खूप समजून घेतात.

अजय- "आई बाबा खरंच मी खुपच नशीबवान आहे... तुमच्यासारखे समजदार आणि प्रेमळ आईबाबा मला भेटले... खुपच समजून घेतात तुम्ही मला..."

बाबा- "अरे तुला समजून घेणार नाही तर आणखी कोणाला घेऊ... तू खुश तर आम्ही खुश... तुझ्या सुखातच आमचं सुख आहे... हो ना गं सावी..."

आई- "हो अगदी बरोबर बोललात तुम्ही...."

आईबाबांचं बोलणं ऐकून अजयला खुप छान, आणि मनालाही तेवढंच समाधान वाटत होतं...
आता पुढे...)

-----------------------------------------------------------

अखेर राधिकाच्या घरी जाण्यासाठी रविवारचा दिवस उजाडला. अजय खूप खूश होता. तो सकाळपासूनच गाणी गुणगुणत फिरत होता. अर्चना तयारी करून अजयच्या घरी आली. पण अजय अजून आरशासमोर उभा राहून तयारीच करत होता. त्याची आई बसून त्याची सगळी गंमत बघत होती आणि गालातल्या गालातच हसत होती. अर्चनाला पण त्याला बघून हसू आलं.

अर्चना अजयजवळ गेली. ती त्याला हाताची घडी घालून उभी राहून न्याहाळू लागली.

अजय -"काय...." तो तिच्याकडे बघत म्हणाला.

अर्चना - "कुठे काय?" ती हसतच म्हणाली.

अजय - "अशी काय बघतेस मला? कधी पाहीलं नाहीस का?"

अर्चना - "पाहीलंय रे तूला, पण आज कुछ बदले बदले से लग रहे हो आप." आणि तीने अजयच्या केसांवर हात फिरवून त्याचे केसच विस्कटले. आणि तिथून पळत जाऊन अजयच्या आईच्या बाजूला जाऊन बसली आणि हसू लागली. अजय तिच्याकडे रागानेच बघू लागला, आणि मग स्वतःच हसू लागला.

अजय - "आता जायला उशीर होईल म्हणून, मी गप्प आहे, नंतर बघतोच तुला. जीजूंकडे तुझी कम्पेंटच करावी लागेल मला. आजकाल खूप छळतेस मला तू."

अर्चना - "हो, चालेल, जा कर कम्पेंट. मला काय प्रॉब्लेम नाही. आणि मला काही त्रास झाला तर सोबत तुलाही त्रास होईल."

अजय - "आई, बघितलं तुझी पोरगी खूपच हुशार झालंय हा आता. तिला सगळे विक पॉईंट माहीती आहेत माझे. म्हणून सारखी छळत असते मला."

आई - "हो मग, पोरगी कोणाची आहे, माझीच ना. मग माझ्यासारखीच हूशार असणार ना."

अजय - "व्वा...! बरं आहे तुमचं दोघींचं. दोघीही सारख्याच तुम्ही." तो हसतच म्हणाला.

अर्चना - "मावशी, आज काही खरं नाही दिसत आमच्या भाऊरायांचं. डायरेक्ट लग्नच लावून येतात वाटतं आता. तुझ्या सुनबाईंना आजच घरी घेऊन येतात की काय माहीती." आणि ती हसू लागली.

अजय - "हो, तू फक्त माझी खेचत रहा बस, बाकी तूला काही काम नाही ना."

आई - "अगं काय करणार मग, पहिल्यांदाच सासूरवाडीला जातोय ना... मग सासरच्या मंडळींवर जरा इम्प्रेशन नको का पडायला ?" आणि आई पण हसू लागली.

अजय - "काय गं आई, एक ही होती, ती पुरे नव्हती का माझी टिंगल करायला. तर तिच्यांत तू पण सामील झालीस आता. काय दिवस आलेत अजयराव तुमचे. सब दुश्मन होते जा रहे है अपने, संभलके रहना पडेगा."

आई आणि अर्चना दोघीही त्याला हसत होत्या.

अर्चना - "हो खरंच, सांभाळून रहा तुम्ही अजयराव आता. आमच्या गँगमध्ये अजून एकजण सामील होणार आहे."

अजय - "अरे बापरे, माझं काही खरं नाही दिसत आता. सगळी गँगच तयार होत आहे. आई तू तरी माझ्या बाजूने राह गं. मी एकटा पडत चाललोय. तुला पण दया नाही का गं तुझ्या पोराची..." तो बारीक तोंड करत म्हणाला.

आई - "अरे, माझ्या मुलाची काळजी मला असणारच ना. पण तुला असं चिडवायचे दिवस पुन्हा थोडे येणार आहेत. म्हणुन मी पण पार्टी बदलते थोडे दिवस. थोडी मज्जा मला पण घेऊ दे ना." आई हसतच म्हणाली.

अजय आई आणि अर्चनाच्या मध्ये जाऊन उभा राहिला आणि दोघींच्या खांद्यावर त्याने हात ठेवले.

अजय - "हो गं आई, तुम्ही दोघीही असेच हसतखेळत खूश रहा बस्स. बाकी मला काही नको."

आई - "हो रे बाळा, आम्ही तर खुश आहोत सगळे आणि तुझ्या आनंदातच आमचा आनंद आहे. तुझं लग्न झालं, सगळं व्यवस्थित झालं की आम्ही पण खुश." आई त्याच्या गालावर प्रेमाने हात ठेवत म्हणाली.

अजयने आईचा हात घेऊन हातावर एक किस केलं आणि म्हणाला, "अगं आई, नको जास्त काळजी करूस माझी. सगळंच व्यवस्थित होईल. फक्त तु आणि बाबा माझ्या सोबत कायम रहा बस. मला आणखी काही नको."

अर्चना - "मावशी, आणि आता काही दिवसात तुझी सून पण येईल, तुमच्या सगळ्यांची काळजी घ्यायला हो की नाही."

आई - "हो अगदी खरंय तुझं. आणि किती वेळ इथेच गप्पा मारत बसणार आहात तुम्ही दोघं. आधीच उशीर झालाय. राधिका वाट बघत असेल तुमची. चला निघा आता तुम्ही."

अजय - "पाहीलंस अर्चू, सुनेची आत्तापासूनच किती काळजी." आणि दोघेही हसू लागले.

आई - "हो मग, काळजी असणारच मला माझ्या सुनेची. आणि आता निघा चला पटकन. अजून उशीर नको व्हायला. आणि अजय! राधिकाच्या आईबाबांशी सगळं व्यवस्थित बोलून घे. त्यांच्या तब्येतीची नीट विचारपूस कर."

अजय - "हो आई, सगळं बोलेन मी त्यांच्याशी व्यवस्थित. तू काळजी करू नकोस." आणि अजय आणि अर्चना दोघेही राधिकाच्या घरी जायला निघाले.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

राधिकाच्या घरी मात्र सकाळपासूनच खूप घाईगडबड चालू होती. अजय आणि अर्चना पहिल्यांदाच घरी येणार होते. सगळे सकाळी लवकर उठून घरातली कामं आवरत होते.

मेघा - "ताई, आज जिजू येतील, म्हणून खूप खुश आहेस ना तू." ती हसतच म्हणाली.

राधिका - "मेघा, पुन्हा चालू झाली का गं तूझी मस्ती. शांत राहताच येत नाही ना तूला. आणि आता अजय, अर्चना येतील थोड्यावेळात म्हणून तू, आणि मीरा तू पण, दोघींनीही शांत राहायचं. दोघींचाही मला अजिबात गडबड गोंधळ नकोय कळलं का."

मीरा - "हो गं ताई, मी एकदम शांतच राहेन. तू मेघाला समजावून ठेव हिच जास्त मस्ती करत असते."

मेघा - "ताई, मी नाही गं हीच मस्ती करत असते. हीलाच समजाव तू."

आई - "हे भगवंता, या पोरी ना खरंच, सतत गोंधळ घालत असतात. आता शांत बसतात का दोघी, कि देऊ पाठीत धपाटे दोघींच्या पण."

आई थोडी रागातच म्हणाली. तशा दोघीही शांत बसल्या. सोनाली मात्र त्यांच्या गमती बघून त्यांना फक्त हसत होती.
सगळं शांत झालं आणि थोड्या वेळाने परत मेघा बोलली.

मेघा - "ताई, एक विचारू."

राधिका - "हो विचार ना."

मेघा - "ताई, तू जीजूंना नावाने का आवाज देतेस गं? आता तुमचं लग्न होईल मग तू त्यांना अहो ऐकलंत का, अहो जरा इथे या हो, असं नाही बोलत का गं." ती एक बोट गालावर ठेऊन अ‍ॅक्टींग करतच म्हणाली. तीचं ऐकून मीरा आणि सोनाली खूप हसू लागल्या. आईला पण हसू आलं.

राधिका - "मेघू, तू ना आता खूपच बोलायला लागलीस हा. आणि मी काय बोलायचं ते लग्नानंतर माझं मी बघून घेईन बरं. तू नको शिकवूस मला आणि काय गं आई तिचं ऐकून तू पण हसतेस मला?"

आई - "हसू नको तर काय करू. आणि काय चुकीचं बोलली ती. बरोबरच तर बोलतेय ती. असं नावाने आवाज देणं बरं वाटते का?"

राधिका - "अगं आई, मला पण कळतंय गं ते. पण आता सध्या आमची मैत्रीच आहे गं. लग्न झालं की मग मी अहोजाओच करून बोलेन ना गं."

आई - "बरं गं राधिका बाई, तुमच्या बोलण्यापुढे कोण गेलंय का." आईचं बोलणं ऐकून सगळेच हसू लागले.

थोड्या वेळाने राधिका बाबांसाठी चहा नाश्ता घेऊन गेली. बाबा डोळे मिटून शांतपणे झोपले होते. तिने बाबांना आवाज दिला.

राधिका - "बाबा, उठा आणि नाश्ता करून घ्या. औषध घ्यायची आहेत ना." राधिकाचा आवाज ऐकून त्यांनी हळूच डोळे उघडले.

बाबा - "अगं ठेव, नंतर नाश्ता करतो मी."

राधिका - "नाही बाबा, आताच नाश्ता करा. उठा तुम्ही."

बाबा हळूहळू उठत होते पण त्यांना उठायला जमत नव्हतं. राधिका त्यांना पकडून उठवू लागली आणि तीने पाहीलं तर बाबांच्या अंगात खूप ताप भरला होता. ती खूप घाबरली.

राधिका - "बाबा, तुमच्या अंगात खूपच ताप आहे. चला आपण डॉक्टरकडे जाऊन येऊया."

"आईऽऽऽ ए आईऽऽऽ, अगं लवकर ये बाहेर." ती ओरडूनच म्हणाली. राधिकाचा आवाज ऐकून आई, मीरा, मेघा, सोनाली सगळेच बाहेर आले.

आई - "काय गं राधी, काय झालं? "

राधिका - "अगं बाबांना ताप किती भरलाय बघ. आताच डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल बाबांना." आईने बाबांच्या गळ्याला, कपाळाला हात लावून पाहीलं.

आई - "हो गं खरंच, खूपच ताप भरलाय. राधी तू घरीच रहा. मी घेऊन जाते डाॅक्टरकडे."

बाबा - "अगं सरू, मी ठीक आहे गं. एवढं काही नाही झालंय मला आणि अजय आज पहिल्यांदाच आपल्या घरी येणार आहे. ते आल्यावर आपणच घरात नसू मग त्यांना काय वाटेल. असं बरं नाही दिसत ना गं. हवं तर संध्याकाळी जाऊ आपण डाॅक्टरकडे."

राधिका - "नाही बाबा, अजिबात नाही. आपण आताच डाॅक्टरकडे जाऊया आणि अजय, अर्चना दोघेही खुप समजदार आहेत. समजून घेतील ते आणि तुम्हाला एवढा ताप असताना डाॅक्टरकडे नाही नेलं तर दोघेही मलाच ओरडतील आणि स्वतःच तुम्हाला डाॅक्टरकडे घेऊन जातील. म्हणून चला आपण आताच जाऊन येऊया."

आई - "अगं राधी, तू नको येऊस, मी घेऊन जाते तुझ्या बाबांना. ते दोघे येतील तर कोणीतरी मोठं हवं घरात. म्हणून तू रहा मी जाते यांना घेऊन."

राधिका - "नको आई, मी पण येते सोबत. चल निघूया आपण. अजून बोलण्यांत वेळ नको घालवूस."

आई - "बरं चल ठिक आहे, असं पण तू ऐकणार नाहीस." आणि दोघीही बाबांना डाॅक्टरकडे घेऊन जायला तयार झाल्या.

राधिका - "मेघा, अजय आणि अर्चना दोघेही आले की त्यांना पाणी वैगेरे द्या आणि बसायला सांगा त्यांना. आणि काहीही टवाळगीरी करत बसू नका दोघीही कळलं का. आम्ही येतो पटकन जाऊन." राधिका जाता जाता म्हणाली.

मेघा - "हो ताई, तू नको काळजी करूस. ते आल्यावर व्यवस्थित पाहुणचार करू आम्ही."

आई आणि राधिका दोघीही बाबांना डाॅक्टरकडे घेऊन गेले. आता मेघा, मीरा आणि सोनाली तिघीच घरात होत्या. तिघीही आपापली कामं आवरत बसल्या होत्या.
थोड्या वेळाने त्यांना गाडीचा आवाज आला. मेघा पटकन बाहेर आली. अर्चना आणि अजय दोघेही आले होते.

मेघा - "अर्चू ताई आणि अजय जीजू, राईट."

मेघाच्या तोंडून जीजू हा शब्द ऐकताच अजयला खूप छान वाटले. अर्चना अजयकडे बघून हसू लागली.

अर्चना - "हो, आणि तू राधिकाची बहीण ना."

मेघा - "हो ताई, मी मेघा, या ना घरात बसा. मी पाणी आणते."

अर्चना - "अगं पण राधिका कुठे आहे? तीला बोलव ना."

मेघाने दोघांनाही सगळं सांगितलं. दोघंही थोडे टेन्शन मध्येच आले.

अजय - "बाबांची तब्येत जास्तच खराब आहे का? मला सांग कोणत्या डाॅक्टरकडे नेलं बाबांना. मी पण जातो."

मेघा - "नाही जीजू, तुम्ही नका जाऊ. ताई वैगेरे येतील अर्ध्या पाऊण तासात घरी. तुम्हाला दोघांनाही बसायला सांगितलंय. आणि बाबांना फक्त ताप आहे, जास्त काही नाही."

अजय - "बरं ठीक आहे मग. बसतो आम्ही."

मेघा - "हो या ना, घरात बसा."

अर्चना - "अगं घरात नको. आम्ही बाहेरच बसतो इथे पाळण्यावर. किती छान गार वारा येतो ना इथे."

अजय - "हो ना खरंच, इथेच बसतो आम्ही."

मेघा - "बरं ठीक आहे, बसा तुम्ही मी पाणी घेऊन येते."

मेघा पाणी आणायला आतमध्ये निघून गेली. आणि अजय, अर्चना दोघेही बाहेर पाळण्यावर बसले. थंडगार वारा सुटला होता. दोघेही राधिकाने फुलवलेली छोटीशी फुलबाग न्याहाळत बसले होते.

अर्चना - "राधिकाने छान फुलझाडं लावलेत ना. छान वाटते घरासमोर छोटीशी फुलबाग."

अजय - "हो ना खरंच, छान वाटते."

अर्चना - "अजयराव, आतापासूनच जीजू बोलतात तुम्हाला तुमच्या सालीबाई. भारी वाटत असेल ना तुम्हाला." ती हसतच म्हणाली. तसा अजयपण हसू लागला. पण तो थोडा विचारातच होता. अर्चनाने ते पाहीले.

अर्चना - "अरे अजय, कसला विचार करतोस तू? कधीशी गप्प गप्प का आहेस तू. मी एकटीच बडबड करतेय वेड्यासारखी."

अजय - "अगं अर्चू, राधिकाच्या बाबांची तब्येत जास्तच खराब नसेल ना गं. काळजी वाटतेय त्यांची. आपण इथे येऊन नुसते बसलोत, बरं नाही वाटत गं ते. तू बस इथे मी जाऊन येतो डाॅक्टरकडे. बघतो त्यांची काय कंडीशन आहे ती."

अर्चना - "बरोबर बोलतोस तू, मला पण असंच वाटतंय. बरं ठीक आहे. जाऊन ये तू मी बसतेय इथे."

तेवढ्यात मीरा दोघांसाठी पाणी घेऊन आली. दोघांनीही पाण्याचे ग्लास घेतले आणि मीराच्या तोंडालाच दोघेही बघू लागले.

मीरा - "काय झालं? असे का बघता तुम्ही माझ्याकडे?"

अर्चना - "अगं काही नाही. तू मेघा ना."

मीरा - "हो ताई, आताच आपली भेट झाली ना मघाशीच."

अर्चना - "हो गं, पण मला वाटतं तू थोड्या वेळापूर्वी पोपटी रंगाचा ड्रेस घातला होतास. आता हा हिरव्या रंगाचा आहे म्हणून विचारलं."

मीरा - "नाही हो ताई, मी हाच ड्रेस घातला होता. कदाचित तुम्ही नीट पाहीलं नसेल."

अर्चना - "हो का, हो कदाचित असंच असेल."

दोघांनाही काय बोलावं कळत नव्हतं. त्यांनी चुपचाप पाणी पिलं. मीरा ते ग्लास घेऊन घरात निघून गेली. दोघेही एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले.

अर्चना - "काय रे अजय, तू कोणत्या रंगाचा ड्रेस पाहीला होतास."

अजय - "अगं मला वाटतं, मी पण पोपटी रंगाचाच ड्रेस पाहीला होता."

अर्चना - "हो ना रे, मी पण तोच रंग पाहीला होता. अजय आपल्या दोघांनाही एकदमच रंगआंधळेपणाचा आजार नाही ना झाला?" ती हसतच म्हणाली.

अजय - "गप गं, वेड्यासारखं काहीही बोलतेस. दोघांनाही एकदाच होणार आहे का? कदाचित आपणच नीट पाहीलं नसेल."

थोड्या वेळाने मेघा दोघांसाठी चहा घेऊन आली. तीने चहाचे कप त्यांच्यासमोर पकडले. दोघेही परत तिच्याकडे बघतच राहिले. मेघाने दोघांनाही चहा दिला. मेघा दोघांनाही बघून गालातल्या गालातच हसत होती. ती चहा देऊन घरात निघून गेली.

अजय - "अर्चू, मला असं वाटते, तू बोलतेय ते खरंच आहे. आपल्याला रंग वेगवेगळे दिसतात की आपले डोळेच रंगबिरंगी झालेत?"

मेघा आणि मीरा दोघीही त्यांचं ऐकून घरात खूप हसत होत्या. अजय आणि अर्चना दोघेही विचारातच पडले होते. आणि दोघांनाही हसू आलं.








क्रमशः-

(बघुया पुढच्या भागात मेघा आणि मीरा या दोघींचं काय चाललंय ते...)

[ कथा काल्पनिक आहे, वास्तवतेशी त्याचा काहीही संबंध नाही. तसं काही आढळून आल्यांस तो निव्वळ योगायोग समजावा. कथा आवडल्यांस आपली अनमोल प्रतिक्रिया नक्की कळवा..... ]

🌹💕...Ritika V. Patil... 💕🌹

💕💕 ...प्रेमगंध... 💕💕 - १८

➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️
🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀