Thats all your honors - 6 in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण -६)

Featured Books
Categories
Share

दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण -६)

दॅट्स ऑल युअर ऑनर भाग ६

दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे आठ वाजताच पाणिनी ऑफिसला आला तेव्हा कनक ओजस आणि सौम्या सोहोनी वर्तमान पत्र वाचताना दिसले.

“ फोटो ओळखण्या बाबत काही प्रगती?” पाणिनीने विचारले.

“ खास अशी नाही काहीच.” कनकने उत्तर दिले. “ आपला तो वॉचमन रात्रपाळी करतो आणि त्यामुळे सकाळी उशिरा पर्यंत झोपतो.पोलीस त्याला सकाळी लौकरच झोपेतून उठून त्यांच्या बरोबर कुठेतरी घेऊन गेलेत.नेमके कुठे ते समजले नाही.मी माझा एक माणूस तिथे पेरून ठेवलाय.मला कळवेलच तो.त्याला माझा माणूस फोटो सुद्धा दाखवेल आणि प्रश्न विचारेल.दरम्यान तुला सांगायचे म्हणजे तुझे नाव पेपरात आलय, पोलिसांना काही नवीन पुरावा मिळालाय म्हणे.”

“ कसे काय ?”

“ आपल्या दोघांचा लाडका मित्र इन्स्पे. तारकर, त्याच्या हुशारीला दाद दिली पाहिजे.

तपन ची तपासणी करताना त्याच्या खिशात डिस्ट्रिब्युटर नावाचा एक कार च्या इंजिन चा भाग सापडला.दरम्यान आकृती ने मेकॅनिक ला बोलावून घेऊन नवीन डिस्ट्रिब्युटर टाकून घेतला होता.हे पोलिसांनी शोधून काढले.”

“ पण यात माझे नाव गुंतले कसे गेले?” पाणिनीने शंका व्यक्त केली.

“ आकृती ने ऑफिसातून तातडीने बाहेर जाण्यासाठी सवलत मागितली हे त्यांना कळले, आणि तिची गाडी तर बिघडली होती त्यामुळे ती कुठेतरी टॅक्सीने गेली असणार असा अंदाज पोलिसांनी काढला आणि जवळच्या स्टॅंड मधील सर्व टॅक्सी ड्रायव्हर कडे चौकशी केली.त्यातील एक पोलिसांच्या गळाला लागला.त्याला तुझे नाव कळण्याचे कारण एवढेच की आकृती ने टॅक्सी ने जाताना वाटेत त्याला सूचना दिली की गाडी जरा जलद चालव मला वकीलांच्या ऑफिस ला अगदी वेळेत पोचायचे आहे.तिने तुझे नाव आणि पत्ता एका कागदाच्या तुकड्यावर लिहून घेतला होता. तो टॅक्सीत पडला होता.तो कागद तपन कंपनीच्या स्टेशनरीचा होता.त्यावरून तारकर कंपनी पर्यंत पोचला आणि तुझ्या पर्यंत पोचला.” ओजस ने माहिती पुरवली.

“ म्हणून पोलिसांनी आकृती च्या फ्लॅट ची कसून तपासणी केली का?”

“ हो. त्या तपासणीत त्यांना कपड्यांच्या कपाटात एक स्कर्ट मिळाला जो एका ठिकाणी फाटला होता, नंतर त्यांच्या लक्षात आले तेव्हा ते त्या कंपनीच्या आउट हाऊस जवळच्या काटेरी तारेच्या कुंपणाजवळ गेले तपासणी करायला.तिथे त्यांना तारेत अडकलेला स्कर्ट चा तुकडा मिळाला.त्या आधारे पोलीस अशा निष्कर्षाला आले आहेत की आकृती हीच त्या काटेरी कुंपणाच्या खालून सरकत गेली.तेव्हाच तिचा स्कर्ट फाटून त्यात अडकला.आता पोलीस हे जाणण्यात उत्सुक आहेत की अचानक आकृती ला पाणिनी पटवर्धन कडे जाण्याची गरज का भासली असावी आणि त्यानंतर तिला अचानक स्वतःचे घर सोडण्याची गरज का वाटली ”

“ पाणिनी, अजून पुढची प्रगती ऐक ” ओजस पुढे म्हणाला. “ आकृती ने तपन ची गाडी त्याच्याच अपार्टमेंटच्या बाहेर असलेल्या अग्नी रोधकाच्या पुढे लावली, हे पाहणारा एक साक्षीदार पोलिसांना सापडलाय.”

“ कोण आहे हा ?” पाणिनीने विचारले.

“ पायसहिर्लेकर नावाचा माणूस आहे.त्याचे अपार्टमेंट तपन च्या बाजूलाच आहे.त्याचा म्युझिक सिस्टीम,जुन्या रेकोर्ड वगैरे विकण्याचा धंदा आहे..”

“ कनक, तू कोणालाही संशय न येता या माणसाला मी दिलेला फोटो दाखव आणि विचार की फोटोतल्या तरुणी ने च तपन चीगाडी अग्नी रोधाकासमोर लावली असावी असे त्याला वाटतय का?”

अत्यंत नाखुशीनेच ओजस ने पाणिनीने दिलेला

मैथिलीआहुजा चा फोटो हातात घेतला. “ मला जर असले उद्योग करण्या बद्दल पोलिसांनी मला जर आत टाकले तर मला सोडवायची जबाबदारी तुझी आहे लक्षात ठेव.” एवढे बोलून ओजस बाहेर पडला.

पुढची पंधरा वीस मिनिटे पाणिनीने रोजचे टपाल बघण्यात आणि वर्तमान पत्र वाचण्यात घालवली.तेवढ्यात ओजस चा एकदम उत्तेजित आवाजात फोन आला.

“ तुझा आवाज तंतोतंत खरा ठरला पाणिनी.त्या माणसाला मी फोटो दाखवला.सुरुवातीला त्याला खात्री वाटत नव्हती. जरा साशंक वाटला पण मी त्याला सतत फोटो दाखवत राहिलो.आता तो म्हणायला लागला आहे की फोटोतली मुलगी मी पाहिलेल्या मुली सारखीच दिसते आहे.”

“ छान काम केलंस कनक.”

“ अजून एक ऐक, तू तुझी गाडी घेऊन आकृती ला भेटायला जाशील या अंदाजाने इन्पेक्टर तारकर ने तुझ्या गाडीवर नजर ठेवली आहे. आपल्या ऑफिस च्या इमारती समोरच्या अग्नी शमन यंत्राच्या खांबा समोर या क्षणी पोलिसांची गाडी उभी आहे.”

“ खूप बर झाल आधीच कल्पना दिलीस ते. मी विचार करून ठेवतो त्या दृष्टीने.” पाणिनीम्हणाला.

सौम्या कडे वळून पाणिनीम्हणाला,“ इथून बाहेर जाऊन मैथिली ला फोन लाव.आपल्या ऑफिसचे फोन कदाचित पोलिसांनी टॅप केला असेल.तिला मी आज रजा घ्यायला सांगितलं होत.तिला म्हणावे इकडे निघून ये गाडी घेऊन.मी माझी गाडी ज्या पार्किंग लॉट वर लावतो त्या इमारतीचा पत्ता तिला दे. आता नीट ऐक सौम्या, महत्वाचं आहे आणि ते जसे च्या तसे तिला सांग. ती मला बरोब्बर दहा वाजून चाळीस मिनिटांनी पार्किंग लॉट मधे पोचायला हवी आहे.मी माझी गाडी घेऊन तयारच असेन तिथे.तिने तिची गाडी पार्कींग मधल्या माणसाच्या ताब्यात दिली की लगेच ती माझ्या गाडीत बसेल. मला बघायचयं तारकर त्याचा सापळा माझ्या भोवती पसरवायला किती वेळाने सुरुवात करतोय आणि मला किती अवधी मिळतोय.”

“ तुम्ही जाणार आहात कुठे पण ? ”

“ दुकानात, खरेदीला.! आता आपण दोघांनी आपापली घड्याळे अगदी सेकंदाला सेकंद अशी जुळवून घेऊ. नंतर तू आणि मैथिली एकमेकांची जुळवून घ्या. ”

“ रहदारीचा विचार करता, एखादे मिनिट पुढे मागे होवू शकते तिला पोचायला. आकृती ला काय सांगायचे तिने बाहेर पडायचे कारण? ” सौम्या ने विचारले.

“ तिला सांग की आकृती ला म्हणावे घरीच स्वस्थ बस.आणि रहदारीचा विचार करूनच घरून नीघ मला ती दहा वाजून चाळीस मिनिटांनी इथे हवी आहे.”


( प्रकरण सहा समाप्त.)