आधार
शब्दांकन : तुषार विष्णू खांबल
नुकतंच लग्न आटोपून पलाक्षी आणि सुप्रित दोघे आज आपला मधुचंद्र साजरा करण्यासाठी गोव्याला आले होते..... साधारण असलेली तोंडओळख आणि लग्नासाठी मिळालेला कमी वेळ यामुळे पलाक्षी थोडीशी बावरलेली होती..... घड्याळाचे काटे जसे हळूहळू पुढे सरकत होते तशी तिच्या हृदयायची धडधड वाढत होती.....
अखेर तो क्षण आला.... त्याने प्रेमाने तिला जवळ घेतले..... तिच्या केसातून तो हात फिरवू लागला.... ती हळुवारपणे मदहोश होत होती..... तिचे डोळे बंद होत होते...... तो पुढे सरकणार इतक्यात तिने डोळे उघडले आणि त्याला स्वतःपासून दूर ढकलू लागली...... तिच्या अश्या अनपेक्षित वागण्याने तो काहीसा गांगरून गेला..... नक्की काय घडलं हे त्याला कळत नव्हते.... ती मात्र जोरजोरात रडत होती..... क्षणार्धात तिचे मन भूतकाळात गेले होते....
दिवाळी दोन दिवसांवर होती..... आज ऑफिसमध्ये दिवाळी सेलिब्रेशन साजरी करण्यात आलं होत.... पलाक्षी मुळातच अप्सरेसारखी सुंदर आणि त्यात आजचा तिचा ट्रेडिशनल लुक हा तिच्या सौंदर्यात अजून भर टाकत होता..... ऑफिसमध्ये सर्वानीच तीच कौतुक केलं.... आजचा संपूर्ण दिवस तिच्यासाठी खूप स्पेशल गेला होता..... ऑफिस सुटलं तशी ती घरी जाण्यास निघाली.... आज ट्रेनसाठी नेहमीपेक्षा जास्तच गर्दी दिसत होती.... थोडा निवांत मिळावा म्हणून तिने एक-दोन ट्रेन सोडल्या.... शेवटी एक काहीशी रिकामी असलेली ट्रेन तिला मिळाली....
गर्दी कमी असली तरी बसायला जागा काही मिळाली नव्हती.... कशीबशी स्वतःला सावरत ती आत शिरली.... मागे असलेल्या जेन्टस डब्यातील काही टवाळ मुलांचा ग्रुप तिला पाहून आपापसात कमेंट पास करत होता.... ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आज दिवसभरातील आठवणींना उजाळा देत होती.... सर्व आठवून तिच्या चेहऱ्यावर एक मधुर हास्य उमलत होते.....
तिचे हे आरस्पानी सौंदर्य मागच्या टवाळ मुलांना अजून चिथावत होते.... ट्रेन हळूहळू मार्गक्रमण करीत विरारच्या दिशेने निघाली होती.... नालासोपारा स्टेशनला आल्यावर ट्रेन आठ नंबर (नवीन एक नंबर) प्लॅटफॉर्मला जाणार असल्याची घोषणा झाली.... इतकं लांब चालत जावं लागणार या कल्पनेने ती थोडीशी त्रासिक झाली.... इकडे मात्र त्या मुलानांच्या डोक्यात वेगवेगळे कट शिजत होते....
ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली तसे सर्व प्रवासी उतरून लवकरात लवकर रिक्षा मिळावी म्हणून पळत होते... हिला तिच्या ड्रेसमुळे तसं करता येत नव्हतं.... ती मिळे तिच्या मागावरच होती.... काही क्षणातच प्लॅटफॉर्म रिकामा झाला.... हीच ती योग्य संधी असे समजून त्यांच्यातील एका धडधाकट मुलाने तिचा हात पकडला आणि तिला जवळ ओढू लागला.... अशाप्रकारच्या अनपेक्षित हल्ल्याने तीला काय करावे हे सुचत नव्हते.... ती ओरडण्याचा प्रयत्न करीत होती.... पण तिच्या तोंडून आवाज निघत नव्हता... तिने तोंड उघडण्याचा पुन्हा प्रयत्न केला.... इतक्यात दुसऱ्याने तिचे तोंड बंद केले.... तिचा प्रतिकार त्या ५-६ मुलांच्या पुढे अपुरा पडत होता.... त्यांनी तिला उचलून प्लॅटफॉर्मच्या मागील बाजूस असलेल्या झाडीत नेले.... आणि तिच्या शरीराची लक्तरे तोडण्यास सुरुवात केली..... एक, दोन, तीन असे करीत करीत ते आपली भूक भागवत होते.... ती तर केव्हाच बेशुद्ध पडली होती.... पण त्यांच्यातील सैतान शांत होत नव्हता... अखेर २-३ तासानंतर जेव्हा त्यांचं मन भरलं तेव्हा तिला परत प्लॅटफॉर्मवर फेकून त्यांनी तिथून पळ काढला......
ऑफिसातून वेळेत सुटलेली आणि रोज वेळेत घरी येणारी पलाक्षी अजून कशी घरी आली नाही या भीतीने तिच्या घरच्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने तिचा शोध सुरु केला..... आजूबाजूला सर्व ठिकाणी शोधत शोधत ते प्लॅटफॉर्मवर येऊन पोहचले.... अखेर एकाच्या नजरेस ती पडली.... तिची अवस्था पाहून सर्व जण हादरून गेले.... पोलिसांना बोलाविण्यात आलं.... त्यांनी सर्व गोष्टींची माहिती घेऊन.... मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले.....
एव्हाना या घटनेची माहिती सर्वत्र पसरली होती..... पलाक्षी आणि तिचे संपूर्ण कुटुंब या घटनेने हादरून गेले होते.... आजूबाजूचे लोक, नातेवाईक सहानभूती दाखवत असले तरी पाठीमागे तिच्याबद्दल चर्चा करतच होते...... अश्यातच दोन वर्षे उलटून गेली..... घरातील वातावरण काहीस निवळलं असलं तरी ती मात्र घराच्या बाहेर निघत नव्हती.... त्या घटनेची भीती आणि समाजाची विकृत नजर या दोन्ही गोष्टी तिच्या मनात घर करून बसल्या होत्या.... वरवर हसत असली तरी आतून दिवसेंदिवस ती तुटत चालली होती......
या सर्वात पलाक्षीच्या कुटुंबानंतर जर कोणाला दुःख झालं असेल तर ते पलाक्षीच्या वडिलांच्या एका सहकारी मित्र सुधाकर राणे यांना.... पलाक्षीच्या वडिलांना तिच्या बद्दल खूप अभिमान होता... आणि या प्रसंगानंतर ते काहीसे अबोल आणि उदास राहू लागले होते.... सर्वांनी त्यांना खूप समजावले परंतु त्यावेळी एक स्मितहास्य करून ते वेळ टाळून नेत असत..... त्यांना या सर्वातून बाहेर काढावं अशी सुधाकर यांची खूप ईच्छा होती..... आणि काही तरी मार्ग निघावा यासाठी ते सतत धडपडत होते.....
सुप्रित काही दिवसांपूर्वीच बाहेरगावावरून सुट्टीवर घरी आला होता.... उच्चशिक्षित आणि सुसंस्कारी असलेल्या आपल्या मुलाशी या विषयावर बोलायचे असे सुधाकर यांनी ठरविले.... रात्री जेवणे उरकल्यानंतर त्यांनी हा विषय आपल्या घरी काढला..... हि घटना ऐकून सर्वांचेच डोळे पाणावले.... त्यांनी सुप्रितला यावर काही उपाय करता येईल का असे विचारले..... काहीसा विचार केल्यानंतर त्याने पलाक्षी सोबत लग्न करता येईल का असे आपल्या वडिलांना विचारले.... त्याच्या या बोलण्यावर बाकी सर्व जरी आश्चर्यचकित झाले असले तरी तरी सुधाकररावांच्या चेहऱ्यावर काहीसे आनंदाचे भाव होते……. पलाक्षी सारखी सून आपल्या घरात आली तर नक्कीच या घरात लक्ष्मी येईल याची त्यांना खात्री होती.... त्यांनी सुप्रितच्या या निर्णयाला लगेच आपली पसंती दर्शविली.... सुधाकररावांचा होकार म्हणजेच संपूर्ण कुटुंबाचा होकार.... कारण त्यांनी घेतलेला निर्णय हा संपूर्ण विचार करूनच घेतलेला निर्णय असायचा
दोन दिवसातच त्यांनी पलाक्षीच्या वडिलांकडे सुप्रित आणि पलाक्षीच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला.... त्यांच्या या प्रस्तावामुळे पलाक्षीचे वडील अक्षरशः गोंधळून गेले.... काय उत्तर द्यावे हे त्यांना सुचत नव्हते.... अखेर सुधाकरावानी त्यांना सविस्तर सर्व साजावून सांगितले.... आणि पलाक्षी आपल्या घरी सुखाने नांदेल याचे आश्वासन दिले.... पलाक्षीच्या वडिलांना तर साक्षात देव सामोरे उभा असल्याची जाणीव होत होती... घरी विचारून आपला निर्णय कळवितो असे सांगून ते निघून गेले....
घरी आल्यावर त्यांनी पलाक्षीला सुप्रित सोबत लग्नासाठी विचारले.... तिने काही उत्तर न देता गप्प राहिली.... सतत ३-४ दिवस चर्चा केल्यानंतर ती या लग्नासाठी तयार झाली..... मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत आणि अत्यंत सध्या पद्धतीने दोघांचा विवाह पार पडला....
सासरी आल्यानंतर देखील पलाक्षी काहीशी अस्वस्थ राहत होती..... तिला त्या घटनेतून बाहेर येण्यासाठी बाहेरील मोकळ्या जगात जावं लागेल हे सुप्रितने ओळखले.... त्याने गोव्याला फिरायला जायचा प्लान तयार केला आणि तसं घरी सांगितलं.... यावर सुधाकर रावांनी काही जुजबी कारणे देऊन त्या दोघांनीच जाऊन यावे असे सुचविले,,, आणि अखेर ते दोघे आपल्या हनिमूनसाठी गोव्याला जाण्यास निघाले.....
पलाक्षी आता रडायची थांबली होती.... तिच्याकडे पाहून ती खूप ठाकली असावी असे वाटत होते.... सुप्रित शांत बसून हे सर्व पाहत होता.... तिचे रडणे थांबल्याचे पाहून तो तिच्या जवळ येऊन बसला..... मागे घडून गेलेली घटना हा एक अपघात होता आणि पलाक्षीने आता यातून बाहेर निघून पुन्हा नव्याने आपले आयुष्य जगायला हवे असे त्याने तिला सांगितले.... पुष्कळ वेळ ते दोघे अश्याच गप्पा मारत बसले होते.... बऱ्याच दिवसानंतर आज पलाक्षी इतकं मनमोकळेपणानं बोलत होती.... तिच्या मनावरील ताण आता हळूहळू कमी होत होता.... बोलता बोलता पहाट कधी झाली हे त्यांना समजलेच नाही.... अखेर सुप्रितने थोडासा आराम करायचे ठरवले आणि तो बेडवर झोपी गेला.... पलाक्षी त्याच्याकडे एकटक पहाट होती..... आपल्या या निराधार आयुष्यात आता तिला सुप्रितच भक्कम आधार दिसत होता