३२.
सुखांत
काही दिवसातच मंदिरात मंडप घातला गेला.
अगरवाल आणि अगरवाल धान्याचे होलसेल व्यापारी, या दुकानाचे मालक देवचंद अग्रवाल. त्यांचा एकमेव सुपुत्र केशव नि ईश्वरलाल मौर्या गुरूजींची ज्येष्ठ कन्या लीला यांचा विवाह संपन्न झाला. पाठोपाठ संतोकसिंग ठाकूर यांचे पुत्र दिलदारसिंग आणि मौर्यागुरूजींची द्वितीय कन्या कजरी हिचा. अर्थात एकूण परिस्थिती पाहून हा दुसरा विवाह पहिला पार पडल्यावर लावला गेला. अगरवाल व्यापारी म्हणजे गावातील मोठे प्रस्थ. त्यांचे दुकान दोन वेळा संतोकसिंगच्या टोळीने लुटलेले. त्या संतोकसिंग पुत्राशी कजरीचा विवाह एकाच वेळी होणे अशक्य. तेव्हा तडजोड केली गेली. लीलाची बिदाई झाली. तिची दूरची एक बहीण पाठराखीण म्हणून पाठवली गेली. नि त्यानंतर दिलदारसिंग संतोकसिंग ठाकूर समशेरसिंगसह मंदिरात दाखल झाला. मोजून दोन जणांची वरात. त्यात एक स्वतः नवरा मुलगा, घोड्यावरून आलेला!दुसरा अर्थातच समशेर. हरिनाथ गुरूजी मात्र जातीने हजर होते. कजरीबेटीचा विवाह म्हणजे मोठी घटना त्यांच्यासाठी. मौर्यागुरूजी या डाकूविवाहाबद्दल साशंक होते पण आचार्यांचे भविष्यकथन जास्त प्रभावी ठरले. ठरल्याप्रमाणे सारे पार पडले. आचार्य लाल कदाचित येतील असा पुजारीबुवांचा अंदाज होता, तो मात्र फोल ठरला. दिलदार तिथे असताना आचार्य कसे येणार? पण जी गोष्ट तिथे कजरी, दिलदार, समशेर नि हरिनाथगुरूजींनाच ठाऊक होती, पुजारीबुवांना कुठून माहिती असणार? लग्न लागले, सात फेरे झाले, घरचाच ब्राह्मण त्यामुळे साग्रसंगीत पार पडले. अनिष्ट ग्रहांची छाया कजरीवर पडू नये म्हणून पुजारीबुवांनी पोथ्यापुराणातून वेगवेगळ्या पूजा धुडांळून त्या ही पार पाडल्या. विवाह सोहळा पार यथासांग पडला. दिलदार नि कजरी सर्वांच्या पाया पडून आशीर्वाद घेते झाले. पुजारीबुवा, रसीलाबेन बरोबर हरिनाथ मास्तरांचे डोळे भरून आले. पुजारीबुबा नि मावशीचे डोळे मुलगी परक्या घरी चालली म्हणून तर होतेच पण कजरीच्या भविष्याबद्दलची साशंकता त्यात जास्त होती. तर मास्तर हरिनाथ कजरी-दिलदार प्रेमकथेचे साक्षीदार .. दिलदारच्या कजरी दर्शनापासून नंतरच्या खटपटी लटपटी आठवून त्यांचे मन नि डोळे भरून येत होते.
बिदाई नंतर कजरीला घेऊन दिलदार मास्तरांच्या घरी आला. त्याला जायला स्वतःचे असे दुसरे घर तरी होतेच कुठे? मास्तरांच्या छोट्याश्या घरात मास्तरांनी जमेल तसे दोघांचे स्वागत केले. दिलदार नि कजरीच्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरूवात मास्तरांनी करून दिली. दिलदारला मास्तरांचे ऋण कसे फेडू असे झाले होते. त्याच्या प्रेमकथेला मूर्त रूप आले ते मास्तरांमुळेच. एक दरोडेखोरांची टोळी सन्मार्गी लागली ती ही त्यांच्याच प्रयत्नाने. दिलदारचा एखाद्या भरल्या घरात राहण्याचा हा पहिलाच अनुभव. घर नि त्याची ऊब कधी अनुभवली नव्हती त्याने, आई गेल्यावर असे प्रेम ही अनुभवले नव्हते त्याने. मास्तरांच्यामुळे सारे असे पूर्णत्वाला गेलेले.
दिलदार कजरीची प्रेमकथा एखाद्या लोककथेप्रमाणे सांगितली जाईल.. कजरीची स्थिती वेगळी नव्हतीच. मास्तर नसते तर एखाद्या डाकूंच्या टोळीशी संबंध जोडला जाणे याचा विचार ही ती करू शकली नसती. त्यात मास्तर संतोकसिंगच्या टोळीच्या शरणागतीसाठी कजरीला श्रेय देत होते. मास्तरांची गोष्टच वेगळी .. हरिनाथ मास्तर आपल्या मुलीची घ्यावी तशी कजरीची काळजी घेत होते.
दिलदार आता एकटा होता. संतोकसिंगने त्याचे नाव टाकले असावे.. तो आपल्या निवडणुकीच्या व्यापात नि उपद्व्यापात मग्न होता. विवाहप्रसंगी तर त्याचे येणे अपेक्षित नव्हतेच, पण त्यानंतर ही दिलदारला भेटायला तो आला नव्हता. दिलदारला आता नवीन माणसं जोडण्यापासून सगळी सुरूवात नव्याने करायची होती. मास्तर होते, पण किती दिवस ते त्यांना मदत करणार होते?
मग काही दिवसांतच दोघे तिकडून राजस्थानातील मास्तरांच्या घरी रवाना झाले. मास्तर दोघांबरोबर काही दिवस राहिले. नवविवाहित दांपत्याला नव्याचे नऊ दिवस अनुभवायला मिळत होतेच. घरच्या संपन्नतेतून साध्या आयुष्याकडे कजरीचा प्रवास झालेला तो निखळ प्रेमापोटी. सारे आनंदात नि खुशीने सुरू झाले. दिलदार आपले गृहस्थाश्रमी जीवन जगत होता. कजरी खूश होती. नि त्यामुळे दिलदारही. मास्तरांचे घर फार मोठे नव्हते, पण दोघांसाठी पुरेसे होते. जवळच्या शेतजमिनीवर दिलदार मेहनत करणार होता. असेच काही महिने गेले. हरिनाथ मास्तर एकदा त्यांच्या घरी आले..
"गुरूजी तुम्ही? इतक्या दूर आलात. दमले असाल.."
"हो बेटा. आठवण आली तुमची. राहवले नाही. हा दिलदार तुला परेशान तर करत नाही ना?"
"काय तुम्ही गुरूजी.."
"अरे समशेरची गोष्ट जोरदार पुढे चाललीय. समशेर भेटला तेव्हा सांगत होता."
"काय सांगता गुरूजी?"
"अरे, तुझा आदर्श ठेवलाय पुढे तर पुढेच जाणार ना तो.. दिलदार कामाचे कसं काय?"
"गुरूजी शेतावर जातोय. शिकतोय."
"अरे, माझ्या ओळखीतले एक आहेत, भंवरलाल. त्याची गाठ घालून देतो. तो शिकवेल. शेतीचे तंत्र शिक. मेहनत कर. घाम गाळल्यावाचून यश नाही. आणि गाळलेल्या घामातून एक दाण्यातून हजारो मोत्यांसारखे दाणे पिकवशील, मग बघ कसा आनंदी होशील. आपली जमीन चांगली आहे. एकेकाळी पीक घेतलेय.."
चष्म्याच्या पाठून मास्तरांचे डोळे भरून आल्यासारखे झाले. जुनी आठवण आली असावी काहीतरी.
"आणि तू कजरी बेटी? सुखात आहेस ना? कष्टाची भाजी भाकरी पंचपक्वानाहून गोड लागते.."
"होय गुरूजी. एक गोष्ट विचारायची होती.. दिलदार पण तयार आहे .."
"कशाबद्दल?"
"गुरूजी, मी इथल्या शाळेत शिक्षिकेची नोकरी धरू? पोरांना शिकवेन. थोडी कमाई होईल. नि जीव ही रमेल.."
कजरी म्हणाली नि अनपेक्षितपणे मास्तरांच्या डोळ्यांतून पाणी वाहताना दिलदार नि कजरीने पाहिले.
"काय झाले गुरूजी?"
न राहवून मास्तर म्हणाले, "पोरांनो, या असे जवळ बसा.. इतके दिवस सांगू की नको सांगू विचार करत होतो. आज आलो ते सांगण्यासाठीच."
"काय गुरूजी .."
"अरे दिलदारबेटा .. गोष्ट खूप जुनी आहे. पण कालच घडल्यासारखी डोळ्यांसमोर उभी राहते. हे माझे घर. मास्तरकी होती. नवीन नोकरी. त्यात थोडीफार शेती होती. नव्याने लग्न झालेले. शोभा म्हणजे माझी पत्नी, शाळेत होती शिक्षिका म्हणून इथल्याच.."
"तुमची पत्नी?"
"होय. मग आता कुठे?"
"आमच्या लग्नाला थोडेच महिने झाले असतील. मग घडू नये ते घडले.."
"म्हणजे?"
"त्यावेळी इकडे राजस्थानात डाकूंच्या टोळ्या होत्या. हैदोस नुसता. लूटालूट, अपहरण नि बायकांना पळवणे.. शोभा तेव्हा तीन महिन्यांची गरोदर होती .."
"बाप रे!"
"भररात्री तिला पळवून नेले डाकूंनी. तिला पळवणारी टोळी होती ती.. संतोकसिंगची. त्यावेळी ती टोळी राजस्थानात होती. त्यापाठोपाठ पोलिस अगदी हात धुवून त्यांच्या पाठी लागले. संतोकसिंग पळून गेला.."
"मग पुढे?"
"पुढे? तो इकडे चंबळच्या खोऱ्यात येऊन राहिला असावा इकडे आपले साम्राज्य उभे केले.."
"आणि तुमची पत्नी?"
"कित्येक वर्ष नव्हता पण हल्लीच तिचा पत्ता लागला."
"कुठेत त्या?"
"देवाघरी."
"अरेरे!"
"ती गेली. पण तिची निशाणी सापडली.."
"निशाणी?"
"तिचे नाव शोभा .. दिलदार तीच तुझी आई रे .."
"गुरूजी .."
"आणि संतोकसिंगशी बोललो मी त्यादिवशी .. त्या अपहरणानंतर काही महिन्यातच तिच्यापोटी हा दिलदार जन्मला.. गरोदरपणात पळवून नेलेली माझी शोभा.. जंगलात तुझा जन्म झाला. जंगलातच तू वाढलास. दिलदार, तू माझाच खराखुरा पुत्र.. तुला जंगलात पाहिले .. मातृमुखी तू. तुझी गोष्ट ऐकली नि खात्री पटली. तू माझाच मुलगा.. शोभा खरीखुरी शिक्षिका होती. तिने तुला शिकवले असणार सारे. माणसासारखे कसे बनावे हे त्यातले मुख्य. त्या जंगलात कशी काय राहिली असेल? पण आमच्या प्रेमाची निशाणी तू.. तुझ्यासाठीच बिचारी इकडे अशी राहिली असणार. संतोकसिंग त्या दिवशी आलेला. त्याच्याशी बोललो. तर संतोकसिंगला पटली खात्री.. तू त्याचा नाहीसच म्हटल्यावर त्याने तुझे नावच टाकले.. तसे ते पथ्यावरच पडले. कारण तूच त्याचा मुलगा नाही म्हटल्यावर त्याने टोळीच्या शरणागतीचा मार्गच पत्करला. नि तू माझा मला परत मिळालास. तुमच्या त्या जंगलातून परत निघालो तेव्हाच मला खात्री पटलेली.. मग कजरीच्या घरी गेलो. मला ठाऊक होते, कजरीच्या हाती सारे काही आहे. तुझ्यासाठी कजरी जीव ओवाळून टाकतेय.. मला शोभाचा ठावठिकाणा असा लागेल असे कधी वाटलेच नव्हते .. आणि तुझा तर अगदीच अनपेक्षित.."
"पण गुरूजी, तुम्ही हे घर सोडून तिकडे गेलात?"
"काय करणार? शोभाच्या आठवणी आहेत या घरात. मला एकट्याने राहवेना, नि साहवेना. मग त्या आठवणी मागे सोडून मी निघून गेलो. फिरत फिरत गावागावात शाळेत शिकवत राहिलो. ही कजरी माझीच विद्यार्थिनी. आता गेली काही वर्षे मी हरिनामपुरात आहे. त्यादिवशी या पोरांनी पळवून नेले. नशीब चांगले माझे. जंगलात महिनाभर राहिलो. दिलदारच्या चांगुलपणाची खात्री झाली. मन भरून आले अगदी. समशेरपण चांगला मुलगा आहे. खरेतर त्यातील कित्येकांना डाकूगिरीहून वेगळे काही असू शकते हेच ठाऊक नाही. त्यांना संधी मिळायला हवी. या दिलदार कजरीच्या प्रेमकथेने सारे कसे जुळून आले. अगदी सगळेच जुळून आले. त्यात मला माझा हा एकुलता दिलदार ही भेटला. तुला ठाऊक आहे, शोभाने ठरवलेले, मुलगा पोटी आला तर त्याचे नाव हरीशरण किंवा हरीवंश ठेवायचे.."
दिलदारच्या डोळ्यांत पाणी भरून आले. आजवर गुरूजी म्हणून हाक मारली तोच आपला खरा पिता. आणि त्या पित्याच्या मायेनेच हे सगळे घडवून आणले. कजरी मिळाली, नवे आयुष्य मिळाले नि प्रत्यक्ष आपल्या खऱ्या पित्याची भेट झाली. पित्याचे प्रेम मिळाले. आजवर टोळीतील कित्येकांना त्याने मगरूरीने वागताना पाहिलेले. त्यातील समशेर गुरूजींच्या मायेने फिरवलेल्या एका हाताने बदलला. इतरांना अशी माया नि प्रेम काय असते ते ठाऊक असते तर ते ही आतून बदलले असते.. काही न बोलता त्याने आपल्या पित्याला मिठीत घेतले. मास्तरांचा हात त्याच्या पाठीवर फिरत राहिला. मास्तरांचे डोळे भरून आले.. दिलदारचे ही डोळे वाहात होते नि कजरीलाही हे सारे पाहून गहिवरून येत होते. पित्याच्या घरी माया नि प्रेम होते.. तेच या नव्या सासरच्या घरी मिळणार होते. त्या घराच्या भूमीवर त्या तिघांच्या अश्रूंचा जणू अभिषेक घडला..
दिलदार नि कजरीची प्रेमकथा अशी सुफळ संपूर्ण झाली. पुढे दोघेही सुखाने नांदू लागले. परिकथेशी दोघांचाही तसा संबंध लहानपणी आला नसावा, दिलदारचा तर येणे शक्यच नव्हते. पण त्याची गरज तरी काय होती? प्रत्यक्ष एक परिकथाच तर ते जगत होते. पूर्वीच्या कित्येक प्रेमकहाण्या त्यांच्या दु:खद अंतामुळे प्रसिद्ध झाल्या नि वर्षानुवर्षे लोकांना मनामनात घर करून राहिल्या. तशीच ही दिलदार कजरीची प्रेमकहाणी. सुखद अंतामुळे प्रसिद्ध झाली. खरेतर अंत का म्हणावा? दिलदार मेहनतीने हुशार शेतकरी झाला. दिलदारच्या आईची आठवण काढत कजरी शिक्षणाचे व्रत पुढे चालवत राहिली. पुढे संसारवेल बहरली .. हरिनाथ मास्तर कृतकत्य झाले.. आपली पोर एका डाकूपुत्राशी विवाह करूनही सुखात नांदताना पाहून पुजारीबुवांना आचार्यांबद्दल अजूनच आदर वाटायला लागतो. त्यांची वाट ते अधूनमधून बघतात पण देवीच्या आदेशावाचून आचार्य येणार नाहीत इतकेच त्यांना ठाऊक आहे!
चंबळच्या खोऱ्यातील दिलदार कजरीची ही प्रेमकथा! एका डाकूची प्रेमकहाणी म्हणून प्रसिद्ध तर आहेच.
-आणि पुढे ही लोककथांतून सांगितली जाईल ..
*******