Manachya vaatevarti Avyakt to an mi - 19 in Marathi Fiction Stories by अनु... books and stories PDF | मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 19

Featured Books
Categories
Share

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 19

पुढे...


"ये किसी नाम का नहीं होता,
ये किसी धाम का नहीं होता।
प्यार में जब तलक नहीं टूटे,
दिल किसी काम का नहीं होता।"


किती तंतोतंत लिहिल्या आहेत ना अंजुम रेहबार यांनी या ओळी...!! सगळेच दुःख पचवून घेण्याची ताकत देवाने माणसाला दिली आहे, पण मन दुखल्यावर त्याचा ईलाज कसा करायचा याचं उत्तर जगात कुणाकडेच नाही...या जगात जितकं सोप्प प्रेमात पडणं आहे, तितकंच कठीण त्यातून निघणं... म्हणजे जवळजवळ अशक्यच...!! त्यामुळेच आपले वपु म्हणत असावे की जिवंतपणी मरण यातना भोगायाच्या असतील तर प्रेम करावं... आणि मी ते केलं...कोणावर प्रेम करणं म्हणजे त्याच्यावर मालकी हक्क आपण प्रस्थापित करत नाही, की जेणेकरून आपण तोंडातून शब्द काढावा आणि समोरच्याने निर्जीव होवून ते मान्य करावं... प्रेम बंधनं लादत नाही, मुळात प्रेम हेच मुक्त असतं मग ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्या आयुष्यात कुंपनं घालणं हे कितीपत योग्य आहे??? नाहीच पटलं मला ते.. मनात इतकी आग लागली होती की यात आता माझं आणि अतुलचं नातं ही भस्म झालं असतं तरी चाललं असतं मला, आणि त्याचे चटके जितके अतुलला सहन करावे लागले असते त्यापेक्षा जास्त मी त्यातून होरपळून निघणार होती....

त्यादिवशी अतुलला तसंच सोडून मी होस्टलकडे निघाली, तो मागून कितीतरी वेळ मला हाका मारत होता पण मला ऐकू येत होतं फक्त तेच 'कोणा एकासोबत तरी प्रामाणिक रहा, किती लोकांना लाईन मध्ये ठेवलंस...' मी जेवढे प्रयत्न करायची विसरण्याचा तेवढे जास्त अतुलचे ते शब्द माझ्या मनावर घाव करायचे...रागात धावत पळत मी होस्टेलला पोहोचली...सगळ्या मुली डीजे नाईट साठी ऑडिटोरिअम मध्ये होत्या आणि मी एकटी हॉस्टेल मध्ये...
रूम मध्ये आल्यावर हातात जी वस्तू येईल ती फेकत मी माझा राग शांत करण्याचा प्रयत्न करत होती, पण निर्जीव वस्तूंवर राग काढून तो शांत होत नसतो..आपला राग शांत करायलाही तीच व्यक्ती लागते ज्याच्यामुळे आपलं मन दुखवल्या गेलं आहे..विचित्र आहे, पण सत्य आहे...

वर्कशॉप पासून होस्टेल पर्यंतचं अंतर जास्तीत जास्त पाचशे मीटर असेल आणि एवढं अंतर कापायला मला पाच मिनिटं ही लागली नाहीत एवढ्या रागात मी आली होती... या पाच मिनिटांत अतुलचे दहा फोन येऊन गेले होते, पण मला त्याच्याशी बोलण्याची जराही मनस्थिती नव्हती... रूम मध्ये आल्यावर जेंव्हा सगळ्या वस्तू फेकून झाल्या तेंव्हा लाईट बंद केले, बेडवर स्वतःला झोकून दिलं आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली... माझा फोन वारंवार वाजत होता पण मी तो उचलण्याची तसदी घेत नव्हती...पण आता जेंव्हा अजून एकदा फोन वाजला तेंव्हा विचार केला की शेवटचं अतुलला माझा निर्णय सांगून देते आणि फोन स्विच ऑफ करते...मी फोनवर नाव न बघताच फोन उचलला,

"अतुल..हे बघ...." आणि मी हुंदके देत बोलतच होती आणि समोरून आवाज आला.....

"ओ हो...अतुल..अतुल..अतुल...प्यार ही प्यार बेशुमार...म्हणजे आता आमचा आवाज ही ओळखत नाहीत लोकं... आणि आंधळे तर इतके झालेत की मोबाईल च्या स्क्रीनवर माझं नावही पाहिलं नाही..हिहीहीखिखीखी..."
आणि आवाज ऐकून मी अचंबित होत जेंव्हा फोनवर नाव पाहिलं तर चेतन बोलत होता...काय करू, काय बोलू या विचारात मी असताना, त्याची मात्र अखंड बडबड सुरू होती....

"काय पार्टनर बोल ना...छुपे रुस्तम आहात तुम्ही दोघंही... काय मग झाली का सेटिंग..????"

"हो...खूप चांगल्याने..."
मी अतिशय कोरड्या आवाजात त्याला बोलली..चेतनच्या प्रश्नांनी मला अजूनच दुःख दिलं, माझी त्याला जराही बोलण्याची इच्छा नव्हती, कळत नव्हतं मला त्याची का इतकी चीड येत आहे...त्याची काही चूक नसतांना ही मी रागाने फोन कट न करताच बाजूला आपटला..नाही बोलावं वाटलं त्याला, आणि तो तिकडणं,

"हॅलो... काय झालंय तुझा आवाज असा का येतोय? ठीक आहे ना सगळं...? हॅलो... हॅलो...हॅलो...."
आणि मी त्याच्या एकही प्रश्नांचं उत्तर दिलं नाही...त्याने कितीतरी फोन केले, मी उचलले नाही... माझा निर्णय तर ठाम होता, की एकट्या अतुलसाठी मी कोणाचीही मैत्री सोडणार नाही मग का माझा राग चेतनवर उफाळून येत होता हे कळतं नव्हतं....

कॉलेजचं फंक्शन आटोपून रात्री दहाच्या सुमारास ऋता होस्टेलवर आली...रूममध्ये आल्यावर तिने रूमची अवस्था पाहिली, मी अजूनही तशीच बेडवर रडत पडली होती... तिने येऊन जेंव्हा माझ्या डोक्यावरून हात फिरवला, मला हुंदका दाटून आला...तिला बिलगून मी मनसोक्त रडून घेतलं, मध्ये मध्ये तिचे प्रश्न सुरूच होते... एव्हाना तिलाही कळलं होतं की आज माझं आणि अतुलचं सगळंच संपलंय...तिने वारंवार कारण विचारूनही मी तिला आमच्यात नेमकं काय झालंय हे सांगितलं नाही... फक्त यानंतर अतुलचं नाव माझ्यासमोर निघायला नको एवढी सक्ती तिला केली... ऋतानेही मला सांभाळून घेतलं. मैत्रीण होती पण वेळोवेळी ती माझी बहिण ही व्हायची, आणि आईसुद्धा...

दोन दिवस झाले होते मी रूममधून जेवायला ही बाहेर निघाली नव्हती...या दोन दिवसांत अतुलचे तब्बल सत्तर मिसकॉल आणि अठ्ठावन्न मेसेजेस येऊन गेले...सॉरीचे... पण या सॉरी ला काय अर्थ होता...आता लक्षात येत होतं माझ्या, सुरुवातीपासून तो हेच करत आला होता, मला अन चेतनला बघून त्याने स्वतःच काहीतरी गृहीत धरले आणि त्याचा राग माझ्यावर काढला...अगदी जेंव्हा पहिल्यांदा दहावीला असताना मी ताईकडून परत येत होती तेंव्हापासून तर आजपर्यंत मला आणि चेतनला पाहून त्याने स्वतःचं माघार घेतली, तेही चुकीच्या गोष्टी ठरवून... मग प्रत्येकवेळी सॉरी बोलायचं आणि सहा सहा महिने पुन्हा दुरावा...माझा जीव किती तळमळत असेल याचा विचारच केला नाही त्याने...यावेळी तर हद्दपार केली त्याने, त्यामुळे त्याचं 'टर्म्स अँड कण्डीशन्स' वालं प्रेम ही नको होतं मला आणि त्याचं सॉरी ही नको होतं....

ऋताने इतक्यात अनिमिष आणि निखिल ला माझ्याबद्दल सांगितलं असावं...मी चार दिवस झाले कॉलेजला गेली नाही म्हणून अनिमिष मला फोनवर बोलला ही, पण निखिल?? तो कुठे गायब आहे?? चार दिवसांनंतर माझ्या डोक्यात हा प्रश्न पडला... अतुलने निखिल बद्दल अशी शंका एकाएकी तर नाही बोलून दाखवली...काहीतरी कारण असावं का त्यामागे की उगाच अतुलची संशयी वृत्ती त्यासाठी जबाबदार असेल??? माहीत नाही काय, पण निखिलला बोलणं गरजेचं होतं...मी निखिलला जाब विचारायचं ठरवलं... ऋताला आणि अनिमिष ला मला मधात आणायचं नव्हतं कारण माझ्यामुळे त्या तिघांची मैत्री खराब व्हावी हा उद्देश माझा नव्हता...

त्यादिवशी माझा चेहरा पाहूनच निखिल समजून गेला की काहीतरी नक्की झालंय...आम्ही कॅन्टीनमध्ये जाऊन बसलो, अजूनपर्यंत मी काही विषय काढला नव्हता आणि निखिल ही काही बोलला नव्हता...खूप विचार करून मी निखिलला बोलली,

"निखिल...आपण चांगले मित्र आहोत, राईट?? मग तू माझ्याबद्दल काही चुकीचा विचार तर नाही करत आहेस ना?? म्हणजे आपल्या दोघांबद्दल??? "

"आपल्या दोघांबद्दल म्हणजे?? " निखिलचा प्रतिप्रश्न... पण काहीतरी विचार करत तो पुन्हा बोलला,

"एक मिनिट...त्यादिवशी तुझ्या आणि अतूलमध्ये काही झालं का?? तू कॉलेजला का नाही आलीस त्या दिवसानंतर??"

"तुला जे विचारलं ते सांग ना... बाकी चौकश्या नंतर कर तू.." मी पण जरा चिडतच बोलली,

"तू चिडलीस म्हणजे झालंय काहीतरी??? अतुल माझ्या बद्दल काही बोलला का?? मला त्या दिवशी एका सेकंदासाठी वाटलंच होतं की तो काहीतरी वेगळा विचार करेल पण मी दुर्लक्ष केलं..." निखिल काहीतरी आठवून कपाळावर आठ्या आणत बोलला,

"म्हणजे??? काय झालं नेमकं?? सांगशील?"

"अग, त्यादिवशी ऋताने मला तुझ्यासाठी बुके आणायला सांगितला, तर तिथे मला प्रिया, अतुल आणि त्यांची गॅंग भेटली...प्रिया ने मला विचारलं की हे कोणासाठी घेऊन जात आहे, तर मी सरळ सरळ तुझं नाव सांगितलं, तेंव्हापासून प्रिया अन अतुलचे मित्र मला चिडवायला लागले तुझं नाव घेऊन..आपण सतत सोबत असतो त्यामुळे त्यांना असं काही वाटलं असेल कदाचित.. मी पण तेंव्हा त्यांना जास्त काही बोललो नाही कारण मला घाई होती...नंतर विचार केला तर असं वाटलं मला की अतुलला ते आवडलं नाही कदाचित... जसा ते लोकं मजाक करत होते, मी पण मजाक म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं...पण मी अतुलला क्लिअर करायला हवं होतं असं वाटतं मला.. उगाच माझ्यामुळे तुमच्यात गैरसमज नको..."
आणि निखिलने मला सगळी हकीकत सांगीतली... त्याला उगाच अपराधीपणाची भावना येत होती, त्यामुळे मी त्याला आश्वस्त करत बोलली,

"तू कशाला गिल्ट मध्ये आहेस...? आणि तू क्लिअर केलं किंवा नाही केलं काय फरक पडतो, ज्याला जो विचार करायचा तो ते करणारच... जिथे विश्वास नसतो, तिथे कोणतेही स्पष्टीकरण काम करत नाही, आणि विश्वास असला तर स्पष्टीकरणाची गरज पडत नाही... सोड सगळं, मला विश्वास होता की माझे मित्र कधीच चुकीचं वागणार नाही, आणि थँक्स तू तो विश्वास अबाधित ठेवला...चल निघुया आता...."
बोलताना माझा हळवा झालेला आवाज त्याला जाणवला आणि मी जाण्यासाठी उठली.. पण निखिल मात्र अजूनही बसूनच होता, मी माझी बॅग उचलणार तोच त्याने माझ्या बॅगेवर हात ठेवला अन बोलला,

"एक मिनिट... मित्र ही म्हणतेस आणि सांगत ही नाहीस काय झालंय ते??? हे बघ, तू ऋता आणि अनिमिष ला दटावून गप्प बसवू शकते, मला नाही...तुला सांगावच लागेल, मित्र आहे ना मी, मग त्याच अधिकाराने हट्ट करतोय...बस खाली अन बोल पटकन..."

निखिलला चांगलं ओळखून होती मी, तो मला सहजासहजी जाऊ देणार नव्हता..माझ्याकडे त्याला माझी कहाणी सांगितल्याशिवाय पर्याय नव्हता...मला ती रात्र पुन्हा आठवायची नव्हती, पण निखिलच्या हट्टापुढे माझा इरादा कमजोर पडला... त्या दिवशी एक जाणवलं की, खोटं बोलतात लोकं, दुःख वाटल्याने कमी होतं नसतं, तर ते करत असताना थोडफार शांत झालेलं आपलं मन पुन्हा पेट घेतं... कोणाला आपलं दुःख सांगणं म्हणजे त्या व्यथेचा प्रवास पुन्हा करणं, असं मला वाटतं...शांत, स्थिर पाण्यात खडा टाकल्यावर जसा तळाशी बसलेला गाळ पुन्हा वर येतो, तसंच दुःख सांगताना त्याच कटू आठवणींना चेतना मिळते...त्यामुळे मी ते सांगण्याचं टाळत होती, पण निखिलच्या जिद्दीने मला ते दुःख बाहेर पाडावं लागलं... माझं सगळं बोलून झाल्यावर निखिल शांतच बसला होता, एका हाताने त्याची टेबलवर टकटक सुरू होती आणि एक हाताने कपाळ चोळत तो काहीतरी विचारात गुंग होता... दोन मिनिटं विचार केल्यावर तो बोलला,

"त्याने केलं ते चुकीचं...त्याने जी अट घातली ती पण चुकीची...मान्य सगळं... पण मला सांग, तू जे वागत आहेस आता, ते बरोबर वाटतं तुला..??"
मी किती निष्ठेने माझ्या मनातली कालवाकालव याला सांगितली, वाटलं होतं हा मला समजून घेईल, मला सहानुभूती देईल...पण कश्याचं काय, हा शहाणा तर माझ्यावरच निशाणा साधण्याचा प्रयत्न करतोय...मी पण एक हात टेबलावर आदळला आणि चिडलेल्या स्वरात त्याला बोलली,

"काय म्हणायचंय तुला निखिल?? की एवढं सगळं होऊनही मी चुकीची आहे...हां...कमाल आहे...मी तुला बोललेच का?? बरोबर...माझीच चूक आहे.."

टेबलावर ठेवलेल्या माझ्या हातावर तो हात ठेवत बोलला,

"नाही ग बाई...पूर्ण ऐकून घ्यायच्या आधी निर्णय नको घेऊस कोणतेही...मला माझं बोलणं पूर्ण तरी करू दे...तेवढी तरी संधी देशील...??? प्लिज....?"

मी एक सेकंदासाठी डोळे मिटले, लांब श्वास घेतला आणि एक हात वर करत त्याला बोलण्यासाठी इशारा केला... आता निखिलने बोलायला सुरुवात केली...

"हे बघ...मी तुला चुकीचं किंवा अतुलला बरोबर बोलत नाहीये..मुळात हा मुद्दा चूक किंवा बरोबरचा नाहीच..मुद्दा प्रेमाचा आहे... आणि प्रेम व्यक्त करण्यात तुम्ही दोघेही असमर्थ ठरले हे तुम्ही मान्य करा...आधी तुझ्या बद्दल बोलतो...या आधीही अतुलने त्याच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला होताच ना, पण तू त्यात किती सहभागी झालीस?? बरं ते सोड, जेंव्हा जेंव्हा प्रिया त्याच्या आसपास होती तू पण त्यांची ती जवळीक बघून स्वतःहून माघार घेतलीसंच ना किती तरी वेळ, तुलाही ईर्ष्या झालीच प्रियाबद्दल... मग तसंच त्यालाही चेतनबद्दल वाटलं असेल, माझ्याबद्दलही वाटलं असेल..."
निखीलचं बोलणं मला विचारांत टाकत होतं, पण तरीही त्याला मध्येच थांबवत मी बोलली,

"हो वाटलं ना मला असं, म्हणून मी काय त्याच्यावर शंका घेऊन नको त्या अटींवर नातं टिकवायला नाही सांगितलं त्याला....?"
माझ्या बोलण्यावर तो मला हात दाखवत शांत होण्यास सांगत होता...

"हो...बरोबर... पण जसा तू विचार करशील, जसं तू वागशील, त्यानेही तसंच वागावं हे गरजेचं आहे का??? आणि ज्या प्रेमाची व्याख्या तुला माहीत आहे, जरूरी नाही की त्यानेही त्याचंच अनुसरण करावं...तू जसं प्रेम करतेस तस त्याने ही करावं ही अपेक्षाच चुकीची...कोणत्याही नात्यात शंका नसावीच, पण जिथे प्रेम असतं तिथे गमवण्याची भीती नक्कीच असते, आणि ही भीती यासाठी असते कारण आपल्यावर प्रेम करणारा आपल्याबद्दल पसेसिव्ह होतो... अतुलने ज्याप्रकारे ते बोलून दाखवलं ते चुकीचं, पण त्याच्या भावना शुद्ध होत्या तुझ्या बद्दल... समोरच काय बोलला यापेक्षा कोणत्या परिस्थितीला मजबूर होऊन तो बोलला हे जास्त महत्त्वाचं आहे... तुझं आणि चेतनचं जे नातं आहे, त्याबद्दल सुरुवातीला मला ऋतालाही असंच वाटलं होतं की मैत्रिपेक्षा हे जास्त आहे, पण जसा जसा तुझ्यासोबत वेळ घालवला तेंव्हा कळलं ही फक्त मैत्री आहे...आणि तो वेळ अतुलला कधी मिळालाच नाही...."
निखीलचं ऐकुन मी माझं स्पष्टीकरण देण्यासाठी तोंड उघडलंच होतं तर त्याने पुन्हा हात दाखवून मला थांबवलं,

"माझं संपलं नाहीये अजून....एक सांगतो, जर त्याला नातं तोडून जायचंच असतं तर आजपर्यंत त्याने इतके फोन इतके मेसेज केलेच नसते... एवढी माफीही त्याने मागितली नसती...त्यालाही हे नातं हवंय त्यामुळे स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्ट चा विचार न करता तो तुझ्या माफीची वाट बघतोय... प्रेम आणि संयम यात एक पुसटशी रेष असते ती म्हणजे 'पसेसिव्हनेस' ...तू कदाचित ती रेषा पार केली आहेस, पण अतुल अजूनही तिथेच आहे आणि त्यामुळे त्याला इनसेक्युर वाटते, ज्याला तू संशय म्हणतेस... त्याने रागात काही अटी घातल्या असतीलही, पण रागाला रागानेच शांत नाही केल्या जाऊ शकत, त्यासाठी प्रेम हवं, वेळ हवा...त्याने खूप वेळा माफी मागून हे नातं वाचवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलंय, तू पण माफ करून त्याला वेळ दे ना... मला विश्वास आहे तू प्रेमाने त्याला समजावलस तर तो समजून घेईल..."

मैत्रीचं नातं वरवर उथळ वाटत असलं तरी ते फार कठीण असतं निभवायला...मैत्रित आपल्या मित्राच्या मर्जी सांभाळाव्या लागतात, त्याच्या प्रत्येक चांगल्या वाईट वेळेत साथ द्यावी लागते, पण खरे मित्र तेच असतात जे वेळोवेळी आपली साथ देतानाही आपली वागणूक कुठे चुकते हे सांगतात... आपल्या निर्णयाची दुसरी बाजूही आपल्याला दाखवून देतात...आणि असा सच्चा मित्र मला निखीलच्या रुपात भेटला होता....

मात्र आता निखिलच्या बोलण्याने माझी चलबिचल जास्त वाढली... मन आणि बुद्धीत युद्ध व्हायला लागलं...बुद्धी बोलत होती की अविश्वासाला थारा देऊन पुन्हा चूक नको करुस, तर मन बोलत होतं की चूका सगळ्यांच्याच होत असतात पण आपल्या चूका मान्य करून माफी मागण्यची हिंमत तेच करतात ज्यांना आपल्या लोकांची काळजी असते, नातं टिकवण्याची धडपड असते....ज्याप्रमाणे रागात अतुलने चुकीच्या गोष्टी बोलून दाखवल्या त्याप्रमाणे मी रागात चुकीचा निर्णय घेतला का?? अतुलला एक संधी द्यायला हवी का??? काही कळत नव्हतं... इतक्यात माझा फोन वाजला, यावेळीही अतुलचाच फोन येत होता...तो उचलू की नको हा निर्णय होत नव्हता आणि हा वेळ घेत असताना फोन कट झाला...

खरं तर मला अजून वेळ हवा होता, निखिलच्या बोलण्याने माझ्या निर्णयाची कठोरता अंशतः मवाळ झाली होती पण तरिही लगेच नको काही बोलणं म्हणून मी फोन उचलला नाहीच... आणि मी अन निखिल जागेवरून उठलो जाण्यासाठी... मी कॅन्टीनच्या दाराकडे जाण्यासाठी एक पाऊल उचललंच होतं, की पुन्हा फोन थरथरला, आणि मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत जायला निघाली...पण एकाएकी माझी पाऊलं जागेवरचं खिळली... कॅन्टीनच्या दारात अतुल उभा होता, माझं फोन वारंवार कट करून बॅगेत टाकणं तो बघत होता...मला कळत नव्हतं त्याला बोलावं की निघून जावं, पण निखिल माझ्या कानात कुजबुजला,

"बोलून घे...मी निघतो..." आणि तो गेला...मी मात्र जागेवरच उभी होती, निखिल निघून गेल्यावर अतुलने एक तिरकस नजर त्याच्यावर टाकली, अन माझ्या जवळ येत बोलला,

"आजपर्यंत मी फक्त त्रास दिला तुला...हो..खूप वेळा चुकलोही, पण त्याची माफीही मागितली, त्यादिवशी असं वाटलं तू माझी भीती समजून घेशील, पण तुझी वागणूक बघून आता तुझ्याकडून काही अपेक्षा ही नाही, आणि यापुढे माझ्याकडून तुला काही त्रासही नाही...नेहमीसाठी तू आता मुक्त आहेस... आणि हो, प्रेमाची जागा मैत्रीने घेतली तर प्रेमासाठी कधीच आयुष्यात जागा होणार नाही हे लक्षात ठेवशील.....


तेरे इंतजार मे मेरी तडप देखी है तुने,
अब मेरी खामोशी का सब्र भी देख लेना।


बाय... नेहमीसाठीच......"

अतुल बोलून निघून ही गेला...कायमचा...मी फक्त बघत राहिली... मला सोडून जाताना त्याच्या भावना डोळ्यांत उतरल्या होत्या पण शब्दांत तेवढीच कठोरता होती आणि चेहरा निर्विकार.... मी??? मी मूर्खासारखी निर्णय घ्यायला वेळ पाहिजे म्हणून फक्त वाटच बघत राहिली... निर्णयासाठी वेळ घ्यायलाही जास्त वेळ घेतला तर वेळ हातातून निघून जाते..हे मला कळून चुकलं होतं...

मी आणि अतुल वेळेतच सगळं बोललो असतो तर आज आयुष्य वेगळं असतं.... आणि जेंव्हा वेळ आली तेंव्हा सोबत राग घेऊन आली... राग आणि वादळं येतात आणि निघून जातात पण ते निघून गेल्यावरच कळतं की नेमकं किती नुकसान झालंय...

त्यादिवसांनंतर अतुलने त्याचा फोन बंद केला, कदाचित नवा नंबर घेतला, पण मला त्याबद्दल काहीही कळलं नाही...त्याचे शेवटचे दोन महिने होते कॉलेजमध्ये, आणि या दोन महिन्यांत आम्ही समोरासमोर नको यायला याची पूर्णपणे त्याने काळजी घेतली...बोलल्याप्रमाणे तो खरंच आता शांत राहून त्याचा संयम दाखवणार होता... एक चूक त्याने केली होती मला दुखवुन आणि एक चूक मी केली त्याला न समजून...यात मात्र दोघेही होरपळून निघत होतो...चेतनने खूप फोन केले मला मी उत्तर नाही दिलं... एकदा पुन्हा जेंव्हा त्याने फोन केला,

"काय झालंय?? सांगशील का?? तू मला नीट उत्तरं देत नाहीस... दोन महिने झाले अतुलने माझा फोन उचलला नाही किंवा मेसेजला रिप्लाय केला नाही... मूर्ख वाटतो का मी, की रिकामा वाटतो तुमच्या दोघांना...मला आज जाणून घ्यायचंय नक्की काय झालंय.."

यावेळी चेतन जिद्दीने पेटून उठला होता, त्याला शांततेने उत्तर देणं मला कठीण झालं होतं... त्याने अजून हट्ट केला असता तर कदाचित माझ्या तोंडून सगळं बाहेर पडलं असतं आणि त्यातून काय झालं असतं??? दोन भाऊ एकमेकांना नेहमीसाठी मुकले असते, माझ्यामुळे एक चांगलं नातं खराब झालं असतं.. आज जरी अतुल चेतनला बोलत नसला तरी भविष्यात ते एक होणारच होते.. पण जर मी आज सत्य चेतनला सांगितलं असतं तर भविष्यात त्यांची एक होण्याची संधी ही मी मिटवून टाकली असती...त्यामुळे मनाला कठोर करत मी रुक्ष आवाजात बोलली,

"माझ्या पर्सनल मॅटर मध्ये पडणारा तू कोण रे?? तुझं आणि अतुलचं काय आहे हा तुमचा प्रश्न, पण यानंतर मला फोन करून त्रास देऊ नकोस... सांगून देते तुला..."

"काय???? तुझं पर्सनल मॅटर??? मी कोणीच नाही का तुझा??? आणि तू जे माझ्या पर्सनल मॅटर मध्ये मध्यस्ती करत माझ्या अन साक्षीबद्दल घरी सांगितलं ते काय होतं.?? "
माझ्या बोलण्याने चेतन खूप दुखावला होता, एक आवंढा गिळत त्याने मला प्रश्न विचारले,

"चूक झाली माझी ती... खुश आता...पण माझ्या त्या चुकीमुळेच आज तू अन साक्षी सोबत आहात.. तू तर उपकार मानायला हवे माझे...अजून एक उपकार कर, मला फोन करणं, बोलणं बंद कर...."
मी डोळे बंद केले, आणि श्वास रोखून एकाच वाक्यात सगळं बोलून गेली, यावेळी माझा दाटून आलेला कंठ मला सांभाळायचा होता, माझा रडका आवाज चेतनला कळायला नको ही काळजी घ्यायची होती... माझे काट्यासारखे शब्द चेतनच्या हळव्या मनाला खूप टोचून गेले....

"आय कान्ट बिलिव्ह इट...तू हे बोलत आहेस...ठीक आहे यानंतर माझा त्रास नाही होणार तुला....बाय...."

अश्याप्रकारे माझ्या प्रेमासोबत माझ्या मैत्रीचाही अंत झाला...ज्या मैत्रीसाठी मी प्रेम नाकारलं, त्याच प्रेमाने माझ्या आयुष्यातून मैत्री, माझं समाधान, माझं सुख सगळंच हिरावून घेतलं...पण प्रेमाला बदनाम करण्यापेक्षा मी हे म्हणेल की मला माझे निर्णय वेळेवर नाही घेता आले, मनात दाबून ठेवलेलं वेळेवर बोलून दाखवता नाही आलं...

अतुल निघून गेला, फक्त एवढं कळलं की त्याला बंगलोर ला जॉइनिंग मिळालं, बाकी त्याच्याबद्दल काहीही माहीत पडू नये ही व्यवस्था तो करून गेला...कोणाच्या जाण्याने आयुष्य थांबत नाही, आपला नित्यक्रम सुरूच असतो, माझाही सुरूच होता...अतुलच्या आठवणीत आणि चेतनला दुखावलं या गिल्ट मध्ये मी इंजिनिअरिंग पूर्ण केलं, प्लेसमेन्टही मिळालं पण जॉइनिंग इंदोरला होती... आईबाबांना सोडून जायची तयारी माझी कधीच नव्हती, यामुळे अतुलला ही ते बोलून दाखवल होतं मी, आणि म्हणूनच मी जॉईन करणार नाही, हा माझा निर्णय जवळजवळ पक्का होता...अजूनही अतुलच्या आठवणी वेळोवेळी डोकं वर काढायच्याच... आणि त्या बाहेर आल्या की मी स्वतःला कोंडून घ्यायची...

माझं इंजिनिअरिंग संपता संपता फेसबुकचा जन्म झाला होता... ऑर्कुट नंतर सगळ्यांना वेड लावणारा सोशल मीडिया आला होता... सगळ्यांप्रमाणे मी पण त्यावर अतुलला शोधण्याचा प्रयत्न केला पण नाही सापडला तो...हो मात्र, प्रिया जरूर सापडली...तिचे भरपुर फोटो होते... अतुलसोबत... ते पाहून मनात कळ उठली आणि मी माझं ते अकाउंट ही बंद केलं..

इंजिनिअरिंग झाल्यावर थोडे दिवस घरी राहू आणि नंतर पुढचा विचार करू हे माझं ठरलेलं...एके दिवशी ताई घरी आली, मी तिला मोजकेच बोलून स्वतःच्या रूम मध्ये जाऊन बसली इतक्यात तिचे जे काही शब्द कानावर पडले त्यामुळे मी आतून बाहेरून हादरून गेली... ती आईला सांगत होती की तिच्या चुलत दिराने त्याच्या कॉलेजच्या मैत्रिणीशी कोणाला न सांगता लग्न केलं आणि आता तो शिकागो ला जाऊन तिकडेच राहणार आहे...ताईचा चुलत दिर??? म्हणजे...अतुल..!!!...काही दिवसांपूर्वी प्रियाचे त्याच्या सोबतचे फोटो...म्हणजे त्याने खरंच लग्न केलं...कुठे जाऊन हंबरडा फोडावा, मनातलं वादळ कुठे जाऊन शांत करावं ह्या विचाराने मी सैरभैर झाली...

का??? का केलं असेल अतुलने असं??? इतक्या लवकर त्याने मला मनातून काढून फेकलं...महाराष्ट्रात राहायचं नाही म्हणून बोलणारा अतुल आता देशच सोडून गेला...खूपच चांगलं फळ दिलंस रे माझ्या प्रेमाचं...!! पण मी का काहीही अपेक्षा करावी त्याच्याकडून??? माझ्यासाठी तो त्याचं आयुष्य थोडीच थांबवून ठेवणार आहे...शेवटी प्रॅक्टिकल माणूस तो...! एवढं सगळं केलं तर माझ्या मनातून का नाही निघून जाता येत त्याला..ही जागा का नाही रिकामी करता येत त्याला.?

मला त्याच्या आठवणी आता छळायला लागल्या होत्या... जिथे मला त्याचं नावंही ऐकायला येणार नाही तिथे जायचं होतं आणि एका रात्रीत मी निर्णय घेतला की मी इंदोरला जाणार, तिथला जॉब जॉईन करणार... माझ्या ह्या निर्णयावर आईची रडारड झाली, इमोशनल ब्लॅकमेलिंग झालं पण मी निर्णय बदलला नाही... करिअरचं कारण देत बाबांना मनवलं आणि त्यांनीही मान्य केलं...

इंदोरला जाता जाता जेंव्हा आयुष्याची गोळाबेरीज करायला घेतली तेंव्हा हातात काहीच उरलं नाहीये हेच जाणवलं...अतुलच्या आठवणींपासून पळण्याच्या प्रयत्नात हातातून सगळेच सुटले होते... माझं आणि अतुलचं नातं मला शून्य करून गेलं होतं....


"मिलने बिछडने के सिलसिले ऐसे हुये,
अक्सर पास आते आते हम दूर होते रहे।"


जेंव्हा जेंव्हा असं वाटलं की आता सगळं ठीक होऊन आम्ही एक होणार, त्याच वेळी नियतीने आमच्या नात्याला पुन्हा उन्हाच्या झळा सोसायला लावल्या...प्रेमाचा श्रावण आमच्या आयुष्यात नव्हताच का कधी?? नसेलच कदाचित.... आणि आता तर अंतर इतकं आहे की कधी ते शक्य होईल तेही वाटत नव्हतं...अश्याप्रकारे आमच्या अव्यक्त प्रेम कहाणीचा अव्यक्त शेवट जवळजवळ केलाच होता आम्ही...निदान आम्हाला तरी असंच वाटत होतं...
*****************

क्रमशः

(Dear readers,
पुढच्या भाग शेवटचा असेल...आतापर्यंतचा या सायलेंट लव्हस्टोरी चा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा...तुमच्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत...

तुमचीच,
अनु...🍁🍁)