Swash Aseparyat - 24 in Marathi Fiction Stories by Suraj Kamble books and stories PDF | श्वास असेपर्यंत - भाग २४

Featured Books
Categories
Share

श्वास असेपर्यंत - भाग २४



पोलिस स्टेशन वरून पायी निघालो. डोक्यांत विचारांचे तांडव मांडले होते. पुढे काय होईल???परत आपल्याला दुःखाचे दिवस येतील???आईला काय वाटेल ??? या विचाराने मन रडकुंडीला आलं होतं. विचारां - विचारांत घरी पोहोचलो . येताचं आईने प्रश्न केला ,
" कुठे होता अमर रात्रीला तू ???"

आता खरं सांगावं की खोटं हाचं पेच मनात निर्माण झाला होता . घडलेला प्रकार सांगितला तर , आईला धक्का पोहोचेल. आईने पाहिलेले स्वप्न की, आपल्याला चांगले दिवस येतील, चांगलं घर होईल , आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचं फळ मिळेल, इत्यादी म्हणून मी आईसोबत खोटं बोललो आणि म्हणालो ,

" काही नाही ग आई!!! काल कार्यक्रमातून येतांना उशीर झाला , त्यामुळे कॉलेजच्या सरांसोबत त्यांच्या घरी गाडीने गेलो होतो. तिथेचं कालची रात्र काढली आणि आता इकडे परत येतो आहे. "

घरी आलो. डोळ्यांवर झोप होती. रात्रभर विचारात गेलेली रात्र आता थोडं मन शांत असल्याने झोपेची गरज होती. पडल्या पडल्या झोप कधी लागली कळलं नाही . झोपेतून उठल्यावर आता एकच प्रश्न सतत भेडसावत होता की , आता नेमकं करायचं काय ??? कारण कॉलेजमध्ये गेलो तर कॉलेजचे प्राध्यापक , विद्यार्थी सुद्धा माझ्याकडे संशयित नजरेने बघणार ??? आणि मी अशी लाज, संशयी नजरेने घेऊन जगू शकणार नाही !!! दुसऱ्या कॉलेज साठी पर्याय चांगला आहे!!! पण जुन्या कॉलेज सोडण्याचं कारण विचारतील??? आमच्या कॉलेज पेक्षा तुमच्याचं कॉलेज ला पगार चांगला असतांना इथे प्राध्यापक पदासाठी रुजू होणे, म्हणजे मूर्खपणाचं म्हणतील !!! कुणा - कुणाला मी उत्तर देत फिरणार आहे.

शेवटी आईला हे सर्व माहिती होऊ नये म्हणू रोज सकाळी उठल्यावर , तयारी करायचो आणि दिवसभर बाहेरचं राहायचो. जे लागेल ते काम करायचो आणि संध्याकाळी घरी वापस यायचो. कधी - कधी दुरूनचं कॉलेज कडे जायचं , पाहत बसायचं , तिथे गेल्यावर ते पुन्हा घेतील पण त्या संशयित नजरा मला शांत बसू देणार नाही , म्हणून मी परत जाण्याचं टाळत होतो . पुन्हा एकदा या समाजातीलचं व्यक्तीने घात केला होता आणि परत दुःखाच्या खाईकडे लोटले होते.

आई नेहमी विचारायची की, " पूर्वी अगदी लवकरचं वापस येत असायचा, आता मात्र तू इतक्यात खूप रात्री येतो . सर्व ठीक आहे ना !!!"

मी मात्र प्रत्येकचं वेळेस खोटं बोलायचो. सांगणार तरी कसं !!! " की तुझ्या अमर वर एका छाया नावाच्या मुलीने , तिला प्रेमाचा नकार दिला, लग्नाचा नकार दिला , म्हणून त्या मुलीने माझ्यावर लैंगिक छळ , बळजबरी करण्याचा आरोप लावून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. सर्व प्राध्यापकांच्या नजरेत मी न केलेल्या गुन्ह्याने बदनाम झालो आहे. जरी तो आरोप खोटा ठरला , तरी मी त्या कॉलेजमध्ये शिकवायला जाऊ शकत नाही!!! " की हे सांगू , " रोज तयारी करून बाहेर जरी निघत असलो तरी सोबत एक मळका ड्रेस घेऊन जात असतो आणि मिळेल ते काम करतो हे सांगु !!!! नक्कीचं नाही. माझी हिंमत होत नव्हती दिवसभर काम करून मग त्यात पोते उचलायची ,हमाली काम करायचं, एखाद्या हॉटेलात काम करायचो, असं करून मी आपली आणि आईचा उदरनिर्वाह करत असायचो .

अशी आयुष्याची आठ - दहा वर्षे निघून गेली. मग या वर्ष्यात मिळेल ते काम करून आईला जगवत असायचो. मग आई मध्येच विचारायची की , "तुला पूर्ण वेळ पगारी मास्तर ची नोकरी मिळणार होती, त्याचं काय झालं????" मी मात्र प्रत्येक वेळेस मनात येईल ते कारण सांगून विषय टाळत असायचो. आई कधी कधी म्हणायची, अरे अमर मी थकली रे!! माझ्या डोळ्यांनी सुद्धा दिसत नाही!! नीट काम ही करता येत नाही, किंव्हा काम करायला गेले की, धाप लागते, काम उरकत नाही!!! आता तरी मिळेल एखाद्या मुलीशी लग्न करून आपला संसार बसवं!!! मला नातवंडे खेळायला मिळतील!!! पण मी मात्र लग्नाचा ही विषय आला की , फक्त शांत बसायचो ,काही एक उत्तर द्यायचो नाही. कारण मनात फक्त नेहमी लक्ष्मी असायची. तिच्याच आठवणीत जगणं माझं सुरू होतं.

आई आता म्हातारी झाली असल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या होत्या. पांढरे केस झालेले होते. पण आता ती पहिली सारखी सावित्री राहिली नव्हती . तबियत सुद्धा बरोबर राहत नसायची. "अमर ने लग्न करून आपला संसार बसवावा !!" असं तिला मनोमन वाटत असे, पण तीचं पाहिलेलं स्वप्न काही केल्या पूर्ण होत नव्हतं. एकेदिवशी आई अचानक बिमार झाली. तिला सरकारी इस्पितळात मी घेऊन गेलो. आईला इंजेक्शन देऊन घरी आणले. आईला मी सर्व गोळ्या वैगरे देऊन आपल्या नेहमीच्या कामावर गेलो.
आज कामावर उशिरा गेल्याने काम मिळायला ही वेळचं झाला. त्यामुळे घरी यायला उशीर होईल असा वेळ झाला होता. आज कामही भरपुर मिळाले व पैसे ही बऱ्यापैकी जमले होते. घरी येणार त्याचं रस्त्यात छाया मॅडम दिसली. माझा अवतार वेगळाचं असल्याने मी स्वतःला लपवून घेतलं. पण शेवटी तिने मला ओळखले. पण आज मात्र ती एका बाळासोबत व सोबतचं एक पुरुष होता बहुतेक नवरा असावा तिचा. मला पाहताचं तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले. पण मी आपली वाट चुकवली आणि घराच्या रस्त्याने चालू लागलो. पण आज छाया च्या डोळ्यांत माझ्यासाठी का अश्रू असावे???? या विचाराने मी पावले झपाझप टाकत घर गाठण्याचा प्रयत्न करत होतो.

कदाचित छाया ला माझा अवतार, माझी दशा पाहून तिने केलेल्या चुकीची माफीचं म्हणजे ते अश्रू असावे. परमनंट भरती होणार, चांगलं घर होईल, सर्वांच्या आवडीचे सर पण माझ्या एका बदनामी ने यांना कुठून कुठे आणले ,याची कदाचित तिला जाणीव झाली असावी???? तरीही हा व्यक्ती मिळेल ते काम करून जगतो आहे!!! ही सर्व चुकी माझी असून याला मी जबाबदार आहे, कदाचित हे अश्रू त्याचेचं असावे!!!!! नंतर छाया ने ही बदनाम केल्याच्या आरोपाने तिच्याकडे ही पाहण्याच्या नजरा चुकीच्या झाल्या होत्या, म्हणून तिने ही नोकरी सोडून मगचं संसार बसविला असावा????किती तरी सारखे विचार मनात घुमत होते, शेवटी शहराच्या बाहेर असणाऱ्या घराजवळ मी पोहोचलो....

घरी येतांना आज आईला बरं नाही, म्हणून मी काही फळे विकत घेतली होती. विकत कायची घेतली??? त्याचं दुकान बंद होणार होतं, आणि काही फळे खराब होतील , म्हणून ती व्यक्ती कमी पैशात हुंड्यामध्ये विकत होती. मी ही विचार केला, की पूर्ण नाही तर काही फळे कामात येतील, म्हणून मी अजून भाव कमी करून ती सोबत आणली होती. घरी आलो, आई खाटेवर पडलेली होती. मी आलो, हातपाय धुतले आणि आईला आवाज दिला, आई उठ!!! तुझ्यासाठी मी सोबत फळे आणली !!! ती खाऊन घे!!! आणि परत झोपून घे!!! आईला बरं नसलं की, कधी कधी मी स्वयंपाक करत असायचो.पण आज काही जास्त भूक नव्हती, त्यामुळे हे फळे खाऊन आपली भूक शमवता येईल, आई ही जास्त खाणार नाही, म्हणून मी आईला आवाज देत होतो. पण आईने काही प्रतिसाद दिला नाही. मला वाटलं झोपून असणार, म्हणून तिला हलविण्या साठी, मी तिच्या खाटेकडे गेलो.

आईला उठवत होतो, पण ती काही प्रतिसाद देत नव्हती. मग हलवून उठवायला लागलो, तरी ती काही एक प्रतिसाद देत नव्हती. छातीत धडधड वाढली, अचानकपणे मन सुन्न झालं. आज परत आयुष्यात, आयुष्यभर सोबत असणारी जन्मदात्री आई , बहीण चित्रा आणि बाबा जवळ निघून गेली. सर्व आयुष्य दुःखात काढताना , संकटाशी खेळताना , नवरा मेला तरी खंबीर होऊन जगणारी आई, स्वतःच गाव माझ्यामुळे सोडावयास तयार होणारी आई, " माया पोरगा मास्तर आहे !!" असं सांगणारी माझी माय, सावित्री !!! आयुष्यभर सुखं - दुःखात शेवट पर्यंत साथ देणारी माय, मला आज कायमस्वरूपी सोडून गेली होती .

" पिकलं पान की ते गळून पडतं !!" असं म्हणतात, पण ते पान गळून पडल्यावर त्या झाडालाही दुःख होतं असते हे काहींना माहिती नसेल. कारण त्या झाडावर चं ते पान लहानाचं मोठं झालेलं असतं, त्या झाडालाही त्याची सवय झालेली असते, आणि मग अचानक ते झाड जगावं म्हणून खाली गळून पडते, पण दुःख मात्र त्या झाडालाही तेवढंच होत असते. त्याचा तो लाभलेला सहवास त्याचं झाडाला हवाहवासा वाटत असतो. आज तसंच काही तरी माझ्या बाबतीत घडलं होतं. आज झाड सुद्धा तेच होतं आणि पिकलं पान सुद्धा तीचं आई होती. मी मात्र त्या झाडाच्या कुशीत वाढलेला, एक फांदीच होतो. परत आज मी अनाथ झालो होतो.

आता मला आई म्हणून हाक मारता येणार नाही. आई गेल्यावर दुःख जास्त याचंच वाटायचे की , " मी तिच्या उतारवयात तिच्याशी खोटं बोलत असायचो!!! आज मात्र तिचा देह समोर ठेवून, " आई मला माफ कर!!! हा अमर तुझ्याशी नेहमी खोटं बोलत आला!!! मी एका मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, असा खोटा आरोप म्हणून मला बदनाम प्रयत्न करण्याचा केला आहे. त्यामुळे मी परत कॉलेजला शिकवण्यासाठी कधी गेलोचं नाही.इथून तयारी करून निघायचो, पण कॉलेज ला शिकविण्यासाठी परत कधी गेलो नाही. मिळेल ते काम करून घरी यायचो. आई मला माफ कर !!! " म्हणून मी आईच्या पार्थिवावर खूप रडलो . आईचा अंतिम संस्कार मी मात्र तिच्या जन्मगावी जाऊन केला. तेवढचं मला पुण्य लाभेल या खोट्याचं भावनेने गावी अंतिम संस्कार केला. या वेळी इथेवचं इकडून तिकडून बनलेली जोडपी ,जी अशीच टोळ्या करून राहायची, त्यांची साथ लाभली होती..

आयुष्य दुःखातच जाईल की काय???? ज्यांना ज्यांना जवळ केले , ते सर्व दूर गेले. तर मग मी एकटा राहून करू तरी काय ???? आत्महत्या !!!!! नाही असला भित्रेपणा मला तरी करायचा नाही. जगावं तर कुणासाठी??? एवढे शिक्षण घेतलं त्याचा काही फायदा झाला नाही???? नोकरी होती पण बदनामी नंतर सोडून दिली!!! जगण्याचा आधार म्हणून आई होती , ती पण सोडून गेली !!! मग जगावं तरी कुणासाठी??? इत्यादी प्रश्न सारखेचं डोक्यांत येत असायचे. एकटाचं मी कुठेही सारखा भरकटत असयचो. कधी इथे , तर कधी तिथे पण एका जागेवर जीव रमत नव्हता. शेवटी स्वतःला समाजकार्यात वाहून घ्यायचं आणि बाबासाहेबांनी , तथागत बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाला अनुसरून करून, हाचं मार्ग पकडून आयुष्य जगू लागलो. हाचं मार्ग आपल्याला शांती प्रस्थापित करण्याची आंतरिक प्रेरणा देईल.

आई गेल्यानंतर ज्या भागांत जिथे शिक्षणाचा अभाव आहे, जीथे शिक्षणाचा गंधही पोहोचला नव्हता, अशा वाड्या-वस्त्यांवर शिकविण्याचं काम करू लागलो .सोबतचं संपूर्ण आयुष्य धम्मप्रसाराचे काम करू लागलो. मिळेल ते खायचं, नाही तर तसंच राहायचं म्हणून जगू लागलो. एकाच्या मदतीने विविध दलित , शोषित , पीडितांच्या प्रश्नांना लेखांत मांडून लिहू लागलो.
लिहितांना पत्रकारिता करू लागलो. समाजात असणाऱ्या अनिष्ट प्रथा परंपरा, बुरसट चालीरीती, गावखेड्यातील प्रश्न, अन्याय अत्याचार यांवर लिहून आपलं जीवन जगू लागलो. यांतून जी मिळकत मिळायची, ती सर्व धम्मप्रसाराच्या कार्यात देऊ लागलो...आता खऱ्या अर्थाने मला जगण्याचा परत नवा मार्ग सापडला होता.

क्रमशः....