Swash Aseparyat - 20 in Marathi Fiction Stories by Suraj Kamble books and stories PDF | श्वास असेपर्यंत - भाग २०

Featured Books
Categories
Share

श्वास असेपर्यंत - भाग २०


लक्ष्मीच्या अचानक जाण्याने आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. माझीचं नाही तर आनंदची स्थिती सुद्धा तशीचं होती. कारण आनंद ने सुद्धा त्याची जवळची मैत्रीण गमावली होती आणि लक्ष्मी ला गमावल्याने मित्राच्या चेहऱ्यावरचे हास्य कुठेतरी लपून बसले होते. याचं ही दुःख आनंद ला झालं होतं. लक्ष्मीच्या जाण्याने आयुष्याचं गणित थोडं विस्कटलेल्या संसारासारखं झालं होतं . घड्याळाचे काटे थांबले की वेळ बरोबर दाखवत नाही, तसंच आता आयुष्याचं झालं होतं. ती गेली तेव्हांच आयुष्य थांबल असंच वाटत असायचं.

मनात मग वेगवेगळ्या विचारांची उलथापालथ होत असायची. कधी एकट्यात असलो की , आता लक्ष्मी गेली, जगण्याला अर्थ उरला नाही, माझ्यामुळे लक्ष्मीचा जीव गेला, म्हणून आता स्वतःला संपवून घेण्याचाही विचार येत असे. तसा प्रयत्नही मी केला होता. पण आनंद मध्ये आला. आणि त्याने मला या दुःखातून बाहेर काढलण्यास मदत केली. " लक्ष्मी गेली म्हणजे आयुष्य संपलं असं नाही . तुझ्यासाठी आईचा, तिने केलेल्या त्यागाचा, तुला शिकवण्यासाठी केलेल्या कष्टाचा निदान तरी विचार कर. "

हा आत्महत्येचा विचार मनात कसा काय आणू शकतो अमर तू ???? हा तर भित्रेपणाचे, संकटातून पळवाट काढायचे लक्षण झालं असंच झालं न हे. !!! तू वर्षभर मला सांगत असायचा ना की ,माझ्या बाबांनी आत्महत्या केली ते भित्रेपणा मुळे नव्हे. माझे बाबा भित्रे नव्हते. हेच तू नेहमी समजुन सांगत असायचा ,पटवून देत असायचा!!! मग आता जर लक्ष्मी तुझ्या न केलेल्या चुकीने गेल्यामुळे, तू स्वतःला दोषी कसा समजू शकतो !!!! असं समजायचं की प्रेम केलं जिच्यावर तिच्या बापाने तिचा व आपला ही गळा कापला किंवा नियतीने आपला घात केलाय आणि हे सर्व विसरून पुढील आयुष्याची पाऊलवाट निवडायची व चालत राहायचं. न थांबता!!!न अडखळता!!! अशी विविध प्रकारे आनंद माझी समजून काढत असायचा...

माझ्या आयुष्यात आता फक्त जवळची व्यक्ती म्हणून आई आणि आनंद हे दोघेचं उरले होते. कधी कधी असं वाटायचं की, मी ज्यांना जवळ करतो ,त्यांनाच देव आपल्या जवळ बोलवून घेते,त्यामुळे जगण्यावरून आणि कुणाला आता जवळ करण्यासाठी मन तयारचं होत नसे. लक्ष्मीने राहत्या घरीचं आत्महत्या केल्याने, ही बातमी गावांत आणि गावाच्या आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरली . तिच्या मरणाचा बदला पाटलाने आईवर काढला. आईला शिवागिळ करण्यात आली. तिला खल्लास करण्याच्या धमक्या देण्यात आल्या. काही गावगुंड प्रवुत्तीच्या लोकांनी आईवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

" या गावांत परत दिसलात तर, दगडाने ठेचून मारण्यात येईल, अश्या धमक्याही गावातील गुंड लोकांनी पाटलाच्या सांगण्यावरून देण्यात आल्या. मला आणि आनंद ला सुद्धा वसतिगृहात येऊन, मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. आमच्याही मनात भितीचे वातावरण तयार झाले होते. मनात नेहमी प्रश्न उठायचे की, आमची चुकी तरी काय होती???? आंम्ही सोबत राहिलो, मैत्री केली आणि मैत्रीतून प्रेमात रुपांतर झाले. फरक एवढाचं होता की , पाटलांची पोर आणि महार जातीचक मुलगा होतो. पण लक्ष्मीने सोबत साथ देण्याची तयारी दर्शवली होती. मग पाटीलाने एवढा हा अट्टहास करावा??? शेवटी त्याला स्वतःची मुलगी तर गमवावी लागली, पण मी केलेल्या प्रेमाचा ही अंत झाला!!! असे विविध प्रश्न मनात उठत असायचे.

नाईलाजाने, मग आईला सतत धमक्या येत असल्याने , आईच्या ही मनात भीती निर्माण झाली. आपल्या पेक्षा अमर ला हे लोकं काहीतरी करतील या भीतीने ती घाबरून गेली होती. शेवटी या भीतीच्या वातावरणात, मी माझं जन्मगावं, सोडण्याचा निर्णय घेतला. आई आणि मी सोबत आनंद ची साथ म्हणून गाव सोडला होता. जिथे आई आपल्या नवऱ्यांसोबत नांदायला आली, आयुष्याची अर्धेअधिक जीवन या गावांत व्यतीत केली, जिथे जगली, जिथे माझा जन्म झाला तोच गांव आम्हांला सोडावा लागला. काही एक विचार न करता या गावातून जाण्याचा निर्णय घेतला. समोर काय अडचणी निर्माण होतील??? समोर काय होईल ??? कसं जगू??? हा विचारही न करता मी आईला घेऊन गाव सोडलं .

जिथे कॉलेज होतो त्याचं शहरात आईला घेऊन आलो. शहरात आल्यानंतर राहण्याची भटकंती सुरू झाली!!! कुठे राहायचं !!! हा प्रश्न सतत भेडसावत असायचा. झालेल्या प्रकारामुळे आणि लक्ष्मीच्या जाण्याने कॉलेज मध्येही माझीचं बदनामी झाली. कितीही समजावून सांगण्याचा प्रयत्न केली तरी , सर्वांना वाटायचं की , यांत माझीचं चूक आहे. मीच या दुर्घटनेला कारणीभूत आहे. म्हणून मी कॉलेज संपताच कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला . अगोदर ज्या सरांच्या ऑफिस मध्ये कामाला जायचो, पण सर सुद्धा मलाचं दोष देतील, मलाचं गुन्हेगार नजरेने बघतील, म्हणून मी तिथेही जाणं बंद केलं. वसतिगृहात ही बदनामी झाली, त्यामुळे तिथेही परत जावं वाटलं नाही.

माझं जगणं कठीण होऊन बसले होते. आंम्ही म्हणजे आई आणि मी उघड्यावर कुठेतरी, आमचे दिवस काढत बसायचो. कधी रेल्वेस्टेशन, तर कधी बसस्टॉप, तर कधी मिळेल त्या जागेवर. जे खायला मिळेल ते मागून आंम्ही जगण्याचा प्रयत्न करू लागलो. मग रेल्वे स्टेशनवर झोपून असतांना मध्येच रेल्वेचे कर्मचारी झोपेतून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून उठवून देत असत. मग ती अख्खी रात्र जागून काढावी लागत असे. जेवणासाठी कुठे मग, मंदिरासमोर तर कधी कुठे काय मिळते का असेच दिवस काढत शहराच्या बाहेरच्या भागांत राहण्याची व्यवस्था केली. म्हणजे रोड वरचं जगणं सुरू झालं. या सर्वाला मीच जबाबदार आहे, आईला तिचं गाव सोडावे लागले, म्हणून मीच स्वतःला दोष देत असायचो. त्याचं रस्त्यावर भटकंती करणारे आमच्यासारखे बरीच कुटुंब रस्त्यावर जगून दिवस काढत असायची. मग मला हाताला भेटेल ते काम करायचो. इतरही कुटुंब तशीचं जगत होती. नाही मिळालं काम, तर मग चोरी करून ही कुटुंबे आपली पोट भरत असायचे. कुणी काही विकून , खेळणी दुकान लावून आपला उदरनिर्वाह करत होती.

आमच्याकडे प्रश्न होता तो जगण्याचा. ना मला काम जास्त मिळायचं ना काही. पण आयुष्याची धडपड चाललेली होती. पण आठवण मात्र लक्ष्मीची सतत येत असायची. म्हणतात ना लक्ष्मीने स्वतःला संपवलं नाही , तर तिच्या वडिलांनी तिला तसं करावयास भाग पाडलं . लक्ष्मीने जर माझ्याशी लग्न केलं असतं , तर आज ही परिस्थिती नसती. तिला मानसिक त्रास दिला, तिचे वडील तिला नेहमी म्हणायचे की , तू जर त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न केलं तर , आम्ही आत्महत्या करू , अशा खोटारड्या वचनाचा पाडा तिला नेहमी सांगण्यात आला. आपण कधी एक होऊ शकत नाही, आपलं मिलन होणार नाही या भीतीने स्वतःला संपवून घेतले. नंतर याचीचं शिक्षा म्हणून की काय, लक्ष्मीच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका येऊन, पूर्ण शरीर अधू झालं आणि ते ही मरण पावले . म्हणतात ना इथली पापे इथेचं भरावी लागतात , त्याची शिक्षा कदाचित त्यांना मिळाली असावी..ही सर्व हकीकत लक्ष्मीच्या आत्याने नंतर आम्हांला सांगितली.

शेवटी मनाशी एक निश्चय केला की, लक्ष्मीने आपल्यासाठी मरण पत्करले . तिने आपल्या प्रेमाची परतफेड आपला जीव देऊन केली. म्हणून मीही तिच्या आठवणीत पूर्ण आयुष्य एकटा राहून वेचणार आहे . आयुष्यांत लक्ष्मीच्या आठवणी शिवाय कुणाला आता आपल्या हृदयात जागा देणार नाही . देवाने फक्त माझ्यासाठीचं दुःखाचे दरवाजे खुले केले आहेत, ज्यांनाही जवळ केलं , त्यांना त्यांना दूर करण्याचा प्रयत्न या देवाने , या नियतीनेचं केलेला आहे . लक्ष्मी सुद्धा आपल्याला इथेचं ठेवून निघून गेली. . आता आपल्याला जगायचं आहे ते फक्त आणि फक्त आईसाठी!!! तिची सारखी भटकंती, सतत आयुष्यभर कष्ट, म्हणून आता आईला निवांत बसू द्यायचे आहे. त्यासाठी आपल्याला नोकरी शोधावी लागेल . होत असलेल्या भटकंतीला आता पूर्णविराम द्यावा लागेल .

काही दिवस लक्ष्मीच्या आठवणी झोपू देत नव्हत्या. सतत डोळ्यांसमोर तिचा हसरा चेहरा यायचा मग मी मात्र उदास होऊन जायचो . भटकंती चे दोन - तीन वर्षे गेल्यानंतर नोकरीच्या शोधात म्हणून एका महाविद्यालयाला तासिका तत्वावर प्राध्यापकांची जाहिरात निघाली. मराठी विषयाच्या प्राध्यापकांच्या जागा होत्या. मी त्या महाविद्यालयात जाऊन मुलाखत देऊन आलो. शैक्षणिक गुणवत्ता चांगली असल्याने , माझी निवड करण्यात आली. मग मी तासिका तत्वांवर शिकविण्यासाठी नियमितपणे जाऊन लागलो.

भव्यदिव्य कॉलेजची इमारत, प्रत्येक डिपार्टमेंटचा वेगवेगळा कारभार , खेळण्यासाठी वेगवेगळ्या खेळांची मैदान, सोबत ज्यांना शिकवायला जाणार ते ही माझ्याचं वयाची वाटत असायची. आता आईला काम करावे लागत नव्हती. शहराच्या बाहेरील भागांत ताटव्यांच्या भिंती घालून त्या घरांत आंम्ही राहू लागलो. इतरही कुटुंबे आमच्या सारखीचं राहण्यास घर करून राहू लागली. कॉलेजच्या नियमित तासिका घेऊन मी आपला रममाण होऊ लागलो. या सर्व अडचणीत, सुख दुःखात आठवण यायची ती आनंद ची. माझ्या अध्यापनाचा परिणाम व शिकवण्याची पद्धत मुलांना जास्त आवडायला लागल्याने माझ्या तासिकेला मुले - मुलीं हजर असण्याचे प्रमाण हे नेहमी जास्त असायचे. हे पाहून सर्व प्राचार्यांनी आगाऊ तासिका देऊ केल्यात. ही गोष्ट संस्था चालकांकडे गेली . त्यांनी माझा अहवाल पाहून , तसेच संस्थाचालक मनमिळाऊ, असल्याने त्यांनी मला पूर्णवेळ प्राध्यापक म्हणजे पगारी प्राध्यापक काही एक वर्षांत करू, असा विश्वास त्यांनी मला दिला. सरांचे माझ्यावरील प्रेम पाहून मी भारावून गेलो....



क्रमशः......