Manachya vaatevarti Avyakt to an mi - 15 in Marathi Fiction Stories by अनु... books and stories PDF | मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 15

Featured Books
Categories
Share

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 15

पुढे...

"कब कैसे ना जाने ये, कहाणी रुहानी हो गई।
तुम मिले ऐसे मुझे की, जिंदगी सुहानी हो गई।"

आयुष्यात सगळ्यात मोठं सुख कोणतं असावं??? आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याची साथ..!! प्रेमाची सोबत मोठी सुखावणारी असते, असं म्हंटलं जातं. आपली प्रिय व्यक्ती भेटल्यावर एक अतीव आंनद होतो. त्या व्यक्तीशी हितगुज करताना आपण आपलं अस्तित्व विसरून जातो...कधी कधी हितगुज करायला शब्दही लागत नाहीत... थोडेसे ओझरते स्पर्श, हावभाव आणि डोळ्यांची भाषा ही पुरेशी असते संवाद साधायला...आणि हे फक्त प्रेमातंच घडू शकतं... आयुष्यात प्रेम नावाची गोष्ट अगदी चोर पावलांनी येते, काहीही चाहूल न करता, हळूहळू... पण आल्यानंतर मात्र आयुष्याचा चेहरा मोहराच बदलून टाकते, कारण ज्या चोर पावलांनी हे प्रेम येतं, जातांना त्याच्या त्सुनामीत सगळं वाहून नेतं... जसं माझं सगळं वाहून नेलं.....

अतुलचं आणि माझं नातं ऋतूंप्रमाणे बदलत होतं... आमच्या नात्यात कधी धोधो कोसळणारा पाऊस, कधी शरदेच्या पुनवेसारखा थंडावा तर कधी ग्रीष्मातल्या झळाही सोसल्या होत्या आम्ही...पण आता खऱ्या अर्थाने आमचा वसंत सुरू झाला होता, पुन्हा एकदा नवी पालवी फुटत होती आमच्या प्रेमवृक्षाला...जे मेघरुपी काळोख दाटले होते आमच्या मनपटलावर ते आता हळूहळू दूर होत होते...आणि मला हा बदल खूप आवडत होता...त्यादिवशी जेंव्हा अतुलला माझी इतकी काळजी करताना पाहिलं, माझी तर अशी कळी फुलली होती, काय सांगू?? सगळीकडे 'आज मै उपर, आसमाँ नीचे' करत नाचत बागडत, हिंडत फिरावं वाटत होतं... पण काहीवेळा मनावर अंकुश ठेवावा लागतो, नाहीतर आपलीच नजर लागते आपल्याला...

मी जरी खूप नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करत होती तरी माझ्या जवळच्या लोकांना माझ्यातला बदल दिसत होता.. असं नाही की जेंव्हा अतुल अन माझ्यात अबोला होता तेंव्हा मी नाराज राहायची पण आता जे तेज चेहऱ्यावर होतं, जी आनंदाची लकेर दिसत होती ती कदाचीत नसावी या आधी, त्यामुळे माझ्या जवळच्या लोकांना ते जाणवायला लागलं होतं... शेवटी मांजरीने डोळे झाकून दूध पिलं तरी सगळ्यांना ते कळतंच ना...एकदा मला बोलता बोलता चेतनने छेडलं ही,

"काय ग?? आजकाल माझ्यावर नो चिडचिड, नो शिव्या... माझी बकबक ही हसत हसत ऐकून घेते...क्या बात है?? हम्मम...मला नाही सांगणार का?? कोण आहे तो??"

"ककाय?? कोण तो?? कमाल आहे बुआ तुझी...मी नाराज असली तरी तुला प्रॉब्लेम आणि आनंदी असली तर तू असा चिडवणार...काय करायचं मी?? कोणीही नाहीये सध्या तरी...आणि येईल तेंव्हा सांगेल तुला..."

"हो का...नाहीये का कोणी??? शिट यार, तू माझी एक्सईटमेंटच खतम केली...ठीक आहे.."
आणि मन खट्टू करत त्याने फोन ठेवला...मी त्याला काहीही न कळू देण्यात यशस्वी झाली होती; पण मी का नाही सांगू शकली चेतनला हे मला कळत नव्हतं..म्हणजे तो मला समजू शकेल असा तो नक्कीच होता पण तरीही मी त्याला अतुल बद्दल नाही बोलू शकली...कदाचित हे यामुळे की तो अतुलचा भाऊ होता आणि कदाचित यामुळे ही की मी अजून स्पष्टपणे अतुलच्या तोंडून त्याच्या भावना ऐकल्या नव्हत्या...

त्याप्रसंगानंतर खरं तर मी अजूनच सावध झाली होती, कारण सतत अतुल भोवती माझं मन रेंगाळत होतं, तो सोबत असो किंवा नसो...जेंव्हा कधी कॉलेजमध्ये, कॅन्टीनमध्ये येता जाता आमची नजरानजर व्हायची माझी धडधड वाढायची त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरचे भाव कोणाला समजू नये यासाठी सगळा खटाटोप असायचा माझा...उगाच कॉलेजमध्ये चर्चेला उधाण येऊ नये हे प्रयत्न असायचे आमचे आणि हे यासाठी ही होतं की हे अतुलचं शेवटचं वर्ष होतं आणि मला माहित होतं सध्या त्याच्यासाठी त्याचा अभ्यास, त्याचं प्लेसमेंट जास्त महत्त्वाचं आहे...आणि ह्या सगळ्यांमध्ये मला त्याची आडकाठी बनायची नव्हती...बाकी, बोलायला किंवा वेळ सोबत घालवायला आयुष्य पडलं होतं... पण हे आयुष्यचं कमी आहे हे कळलंच नाही मला तेंव्हा...

इंजिनिअर्स डे ला कॉलेजमध्ये एक टेक्नीकल इव्हेंट झाल्यावर मुलींसाठी एक गेस्ट सेशन ठेवण्यात आलं 'सेल्फ डिफेन्स' वर...ते सेशन झाल्यावर जेंव्हा मॅडमने सगळ्या आयोजकांचं नाव घेतलं त्यात एक नाव अतुलचंही होतं... आणि जेंव्हा तो स्टेज वर येऊन हे बोलला,

"आम्हा सगळ्यांना, म्हणजे माझे मित्र, कॉलेजचे सगळे मुलं.. सगळ्याना हे वाटतं की आपल्या कॉलेजच्या एकाही मुलीला तिच्या संरक्षणासाठी कोणाची गरज पडू नये.. तिने इतकं मजबूत व्हावं की आम्हा मुलांना जेंव्हा गरज पडेल तेंव्हा आमच्या मदतीला मुलींनी धावून यावं..आणि त्यासाठीचं हे सेशन होतं...."
आणि बोलता बोलता त्याचे डोळे मला शोधत होते आणि मी सापडल्यावर जेंव्हा त्याची नजर माझ्यावर पडली, आपुसकच आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर हसू आलं... त्याच्या ह्याच गुणांमुळे कदाचीत तो 'बेस्ट आऊटगोईंग स्टुडन्ट' च्या शर्यतीत होता... त्याला बघून असं वाटलं, 'माझ्या एकाच मनाला तू कितीवेळा जिंकणार आहेस रे...'

जवळपास महिना झाला होता, मला आणि अतुलला भेटून...दोघांचे डिपार्टमेंट वेगळे होते त्यामुळे भेटणं व्हायचं नाही, मध्ये एक दोन फोन झाले पण एके दिवशी जेंव्हा त्याने फोन केला आणि मी रूममध्ये नव्हती तर आमच्या ऋता मॅडमने फोन उचलला..त्याला बिचाऱ्याला तिला उत्तरं देता देता नाकी नऊ आले होते...किती रुसून बसला होता माझ्यावर की मी फोन जवळ ठेवत नाही म्हणून... आणि त्यानंतर बोलणं टाळलंच आम्ही... आणि तसही संयम ही प्रेमाची सगळ्यात कठीण पायरी आहे म्हणतात आणि ती तर नक्कीच पार करायची होती मला...

त्यादिवशी संध्याकाळी साडे पाच ला मी , ऋता, निखिल, अनिमिष सगळे कॉलेजनंतर कॅन्टीनच्या दिशेने निघालो, तर कॅन्टीन बाहेरच्या कट्ट्यावर अतुल बसला होता... त्याला बघून माझ्या चालण्याची गती मंदावली, त्याची नजर अजूनही माझ्यावरचं होती...त्याच्या जवळून जात असतांना तो त्याच्या मित्राला बोलला,

"खामोश ही सही कुछ इशारा तो कर,
कुछ लम्हे कभी मेरे साथ गुजारा तो कर।"

"ह्यां...काय?? बरा आहेस न तू...? मी पूर्ण दिवसभर तुझ्या सोबतच तर असतो...तुझा 'दोस्ताना' झालेला दिसतो मला....तुझ्या शायरीचं भूत उतरवायला पाहिजे, कुठेही आणि कोणातही रोमान्स दिसतो तुला... लांब राहायला पाहिजे तुझ्यापासून.. हाहाहाखिखिखी..."
त्याच्या मित्राच्या बोलण्यावर अतुलचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता... मी माझं हसू ओठांतच दाबत माझ्या मित्रांना बोलली,

"गाईज...ऐका ना, मला लायब्ररीत जायचं आहे...म्हणजे, ते मी बुक्स घेतले होते ना, ते परत करायला, नाहीतर ड्यु लागेल मला...." मी उगाच बहाना बनवला...

"येsss... तुझं हे लायब्ररी प्रेम खूपचं उतू चाललंय आजकाल... नाही जाऊ देणार तुला आज..तेरे बिना मेरा दिल नही लगता रे..." मला थांबवण्यासाथी निखिल ने माझी बॅग पकडली आणि त्याचे नाटकं बघून ऋता आणि अनिमिष ही त्यात शामिल झाले आणि त्यांचं खिदळणं सुरू झालं.

"हो रे...इतका अभ्यास करून काय करणार आहे ही काय माहीत..काय असतं ग त्या लायब्ररीत असं?? आज तर जाऊच देणार नाही तुला..."
ऋताने आगीत तेल ओतलं...आता या शैतानांच्या टोळीसमोर माझा काही निभाव लागणार नव्हता...मी हताश नजरेने अतुलकडे पाहिलं आणि तिकडे त्याने त्याची बॅग आपटली...आणि जायला निघाला...त्याच्या मित्राने त्याला कुठे जातोय विचारलं तर बोलला,

"कम्प्युटर डिपार्टमेंट, सेकंड फ्लोर वर...काम आहे जरा... तुला यायचं असेल तर ये... मी वाट पाहतोय..."
तो त्याच्या मित्राला बोलला, आणि त्याच्या मित्राने नकार दिला..खरं तर ते बोलणं माझ्यासाठी होतं हे मला कळत होतं, पण मी फसली होती...किती लहान मुलांसारखा राग राग करत गेला अतुल म्हणून हसू ही येत होतं... मी जेमतेम पंधरा मिनिटं बसली कॅन्टीनमध्ये आणि पुन्हा एकदा बहाणा करून तिथून निघाली...धावत पळत कॉम्प्युटर डिपार्टमेंट ला पोहोचली...तिथे जाऊन बघते तर अतुल कुठेच दिसत नव्हता, पूर्ण डिपार्टमेंट सामसुम वाटत होतं...त्यात संध्याकाळी काळोख दाटत आला होता...मी थोडं भीतभितच एक एक पाऊल पुढे टाकत होती इतक्यात कोणीतरी मला पकडून क्लासरूम मध्ये खेचलं... मी जोरात ओरडणार इतक्यात त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि बोलला,

"श्शू...ओरडू नको, मी आहे..इकडे बघ..."
आणि डोळे उघडून बघितलं तर समोर अतुल उभा होता... त्याने एका हाताने मला विळखा घातला होता आणि त्याचा एक हात माझ्या तोंडावर होता... मी भीतीने त्याचा शर्टची कॉलर गच्च पकडली होती...एक तर धावत पळत, दोन मजले चढून गेल्यामुळे माझ्या श्वासांची गती वाढली होती आणि त्यात आता अतुल इतक्या जवळ होता, त्यामुळे माझी धडधड मलाच ऐकू येत होती...माझ्या चेहऱ्यावर आलेले केस अतुलने हळूच मागे केले आणि माझ्या डोळ्यांत बघत बोलला,

"नूर ऐसा देखकर इस चेहरे से नजर हटती नही,
बोलना है बहुत कुछ लेकीन आपको फुर्सत मिलती नही.."

त्याने हळूच त्याचा हात माझ्या तोंडवरून काढला पण माझ्यासाठी सगळं काही स्तब्ध झालं होतं... त्याच्या डोळ्यांत इतकं प्रेम मला दिसत होतं की मला वाटत होतं जर मी यात हरवली तर मी कधीच यातून बाहेर निघू शकणार नाही...खरंच, अतुल नसला सोबत तर हे जगणं ही जगणं असेल का माझं, त्यात फक्त श्वास असतील, पण जीव नसेल, भावना नसतील...त्याच्यासोबतची ती निरव शांतता ही किती बोलकी होती...इतक्यात अचानक अतुल माझ्यापासून दोन पाऊलं मागे होत बोलला,

"फोन... फोन वाजतोय तुझा..."
त्याच्या बोलण्याने मी भानावर आली, फोन काढून बघितला आणि लगेच कट करून बाजूला बेंच वर ठेवला..

"सॉरी... ते तुला असं.. म्हणजे मला तसं करायचं नव्हतं.. पण झालं....सॉरी....आई शुड कंट्रोल मायसेल्फ (हे तो तोंडातच पुटपुटला).."
अतुल नजर इकडेतिकडे फिरवत थोडा नर्व्हस होत बोलला,

"अम्म्म... काही...काही बोलायचं होतं का??"
मी स्वतःला जरा सावरत विचारलं...

"हो...ते..अभ्यास... अभ्यास चांगला सुरू आहे ना?? काही अडचण तर नाही ना....?"

त्याच्या या प्रश्नावर मी फक्त होकारार्थी मान हलवली.. आणि आम्ही पुन्हा शांत झालो..यावेळी मीच बोलली मग,

"बस??? इतकंच बोलायचं होतं....?"

"नाही...म्हणजे...ते....."

"आपण असं का भेटतोय अतुल???"
आणि त्याचं बोलणं संपायच्या आधीच मी न रहावून त्याला प्रश्न केला....तो पुन्हा माझ्या जवळ आला आणि बोलला,

"का म्हणजे??? तुला यायचं नव्हतं का??? सॉरी...मी असं बोलवायलाच नको होतं...खरं तर तुला फोन केला तर तुझी रूममेट असते सोबत आणि कॉलेजमध्ये मित्र...तुझेही आणि माझेही...आणि इथे, जरा काही झालं की तुला माहीत आहे ना, कश्या अफवा पसरतात..मला नकोय ते...तुझं नाव कोणत्याही प्रकारे चुकीच्या पध्दतीने नको कोणासमोर यायला...."

"मला नव्हतं यायचं असं नाही... पण मी हे विचारते की हे काय आहे?? काय चाललंय...आपलं??"
आणि मी मोठी हिम्मत करून विचारलंच त्याला...आणि मी बेंचवर जाऊन बसली, माझ्या बाजुला तो ही येऊन बसला, माझा तळहात हातात घेतला आणि बोलला,

"तुला माहीत नाही काय चाललंय?? की कळत नाही??

कुछ आँखो ने बया किया, कुछ खामोशी कह गई...
जज्बात जो लफ्जों मे ना निकले, वो हमारी अदा कह गई.।

पण तरीही आता कोड्यात काही न बोलता मी स्पष्टपणे सांगतो की माझं तूझ..."

....पुन्हा बेंचवर ठेवलेला माझा फोन तरफडला, आणि माझं लक्ष फोनवर गेलं, यावेळी चेतन खूप खूप शिव्या खाणार होता माझ्या..का नेहमी चुकीच्या वेळेवर हा असा करतो?? मी सर्रकन माझा हात अतुलच्या हातातून मागे खेचत फोन कट केला...आणि पुन्हा अतुलकडे मान वळवत बोलली,

"हं... बोल ना..काय बोलत होतास...?"

आणि इतक्यात अतुल उठून उभा झाला आणि बॅग खांद्यावर घेत बोलला,
"काही नाही...अभ्यासावर लक्ष दे, सेमिस्टर एक्साम जवळ आलीये....मी उद्यापासून प्लेसमेंट मध्ये बिझी असेल, कामं आहेत भरपूर...उशीर झालाय..चल तुला होस्टेलला सोडतो मी..."

आणि मी त्याला बोलायच्या आधी तो क्लासरूमच्या बाहेर जाऊन उभा राहिला...मी त्याच्या मागोमाग गेली आणि आम्ही हॉस्टेलची वाट धरली...सोबत चालतांना यावेळी हातांचा स्पर्श एकमेकांना होतं होता पण त्याने पकडला नाही...कदाचित मघाशी जे काही झालं त्यामुळे त्याला अवघडल्यासारखं वाटत असावं... पण हे नेहमीच असं होत आलेलं आमच्यासोबत...जेंव्हा जेंव्हा असे क्षण आले मला स्वतःवर ताबाचं ठेवता आला नाही, मी त्याच्यात पूर्णपणे हरवून जायची, पण त्याने मात्र स्वतःला काठावरच थांबवून ठेवलं होतं... असं काहीतरी होतं जे तो मला सांगू शकत नव्हता, त्याच्या ओठांपर्यंत ते यायचं पण तो बोलू शकत नव्हता...

होस्टेलच्या मेन गेटच्या थोडं अलीकडेच येऊन आम्ही थांबलो...काही सेकंद असेच गेल्यावर मी बोलली,
"जाऊ मी??"

आणि त्याने फक्त "हम्म.." म्हणून मान हलवली..मी लगेच जायला निघाली तर त्याने माझ्या उजव्या मनगटाला पकडलं तशी मी त्याच्याकडे चेहरा करून उभी झाली... माझ्याकडे बघत तो बोलला,

"तू मला तेंव्हा प्रश्न विचारला होता म्हणून सांगतो...कसं आहे, भरपूर वेळा भावनांची गुंतागुंत होते आणि त्याच्या आहारी जाऊन आपण असं काही करून जातो, बोलून जातो किंवा वागून जातो ज्याचा आपल्याला पुढे जाऊन त्रास होतो...आपल्यात काय आहे, याचा निष्कर्ष काढण्यापेक्षा सध्या तुला एकच सांगतो की तुला काय हवंय याचा तू नीट विचार कर...भरपूर वेळा असं होतं की आताच्या क्षणाला जे आपल्याला हवं असतं, पुढच्या क्षणी असं वाटून जातं की अरे निर्णय चुकला माझा... आकर्षणापोटी घेतलेले निर्णय बरोबरचं असतील असं नाही ना..."

त्याचं ऐकून घेऊन मी फक्त मान हलवली आणि जायला निघाली तेवढ्यात त्याने माझ्या उजव्या गालावर त्याचा डावा तळहात ठेवला आणि बोलला,

"काळजी घे, कधी काही अडचण आली तर सांग...."

...पण त्याच्या ह्या कृतीवर मी काहीही उत्तर न देता निघून आली... खरं तर त्याचं असं बोलणं, त्याचे इतके प्रॅक्टिकल विचार ऐकून मन अस्वस्थ झालं... त्यावेळी माझ्या मनाला विचारलं असतं तर ते मन हेच बोललं असतं की त्याला आतमध्ये थोडंस दुखल्यासारखं झालं आहे...पण अजून अतुलला हे कळत नव्हतं की प्रेम विचार करून, त्याचे फायदे तोटे बघून केल्या जात नाही, ज्यामुळे आपण त्याच्या त्रासातून सुटू शकतो.... प्रेम तर होऊन जातं, कसं होतं, कधी होतं कळत नाही, फक्त होऊन जातं...मग आता जे झालं त्याचे जे काही परिणाम असतील ते तर भोगावेच लागतात...प्रेम हे असं रसायन आहे, असा पदार्थ आहे जो जेवढ्या वेळा चाखून बघणार प्रत्येक वेळी तो वेगळी चव देणार....आता लव्ह स्टोरी आहे म्हणजे त्यात फक्त प्रेमच दिसेल असं नाही ना...प्रेम आणि आयुष्य ही असंच आहे, त्यात थोडी मस्ती मज्जा, थोडं सुख, थोडं दुःख, थोडी शोकांतिका, थोडा आनंद सगळंच येणार, तेंव्हाच कुठे आयुष्याची कहाणी रंगतदार बनेल ना...आता सगळ्याच गोष्टी मोजून मापून, विचार करून केल्या जाऊ शकत नाही... प्रेमही त्यापैकीच एक आहे हे अतुलला कळलं नव्हतं....मला काय हवंय हे मला खूप चांगल्याने कळलं होतं पण कदाचित अतुलला काय हवंय याचा त्याने विचार केला नव्हता किंवा त्याचा निर्णय होत नव्हता...
**********************

क्रमशः