Shahir - 6 in Marathi Fiction Stories by Subhash Mandale books and stories PDF | शाहिर... - 6

Featured Books
Categories
Share

शाहिर... - 6

'शाहीर'!

क्रमशः..
भाग- सहा

"कलापथक बंद केलं नाही, बंद झालं. चांगल्या फळालाच किड लागायचा थोका जास्त असतो, त्यासाठी ते फळ जपावं लागतं, त्याची काळजी घ्यावी लागते, तसं कलापथकात काम करणाऱ्या कलाकारांचं झालं. त्यांनी स्वतःच्या जीवनाची काळजी घेतली नाही. तुला तर ठावं आहेच; बाकी मी अजून काय सांगणार.
पाच सहा पोरं दारूचं व्यसन करत होती, तरीही आमचं कलापथक चालू होतं, कलापथकात काम करणारी काही चांगली चांगली माणसं वयोमानानं गेली आणि जी काम करण्यारखी होती, त्यांना व्यसनाची किड लागलेली. वाईट येवढंच वाटतंय, की ज्यांच्या अंगात वेगवेगळी चांगली कला होती, अशी सहा सात पोरं दारूच्या व्यसनामुळं वयाची पन्नाशी सुद्धा गाठू शकले नाहीत.

आमच्या कलापथकातला वयाची ऐंशी पार केलेला गुणी माणूस रामभाऊ कंडक्टर हे पार थकले आहेत, आत्ता ते अंथरूणाला खिळून पडले आहेत.

आमच्या कलापथकात काम करणारे हौशी, आवड असणारे काही कलाकार अजूनही आहेत, पण आत्ता नव्यानं कलापथक चालू करायचं मनावर घेणारं कोण आहे का..? अजूनही कुणी मनावर घेणारं असेल, तर कलाकार म्हणून काम करायला आत्ताही मला आवडेल. मला कवणं म्हणायची हौस असल्यामुळं जुनी सुरपेटी खराब झाली होती, म्हणून एक नवीन सुरपेटी आणली आहे. सवड मिळंल तसं ती वाजवत, कवणं म्हणत असतो. खूप सारी कवणं लिहलेल्या अवस्थेत माझ्याजवळ नाहीत, पण ती अजूनही माझ्या तोंडपाठ आहेत.

जे कलापथक कलाकारांनी आयुष्यभर एका कळीसारखी खुलवलं, ते फुलासारखं उमललं, पण पटकन कोमेजलं.
समाधान येवढंच, की कलापथकात काम करणारे कलाकार गेले, पण आपल्या कलाकारीची छाप मागे सोडून गेले.
आता झालं गेलं गंगेला मिळालं, सगळं इतिहास जमा झालं."

इतकं बोलून त्यांनी एक सुस्कारा सोडला आणि खुर्चीवरून उठले आणि पाण्याचा तांब्या हातात घेऊन कळशीतून पाणी घेऊन ते बाहेर गेले आणि हात तोंड धुवून थोड्या वेळाने आत घरात आले. कदाचित, इतका वेळ त्यांनी माझ्यासमोर जो त्यांच्या अनुषंगाने सहकलाकारांचाही कलाकारी जीवनातील चैतन्याचा झरा वाहता केला, त्याचा शेवट असा दुःखाच्या आठवणीने ओला झालेला मला दिसू नये, म्हणून ते माझ्या समोरून उठून बाहेर गेले असावेत.

खूप वेळ आमच्या गप्पा रंगल्या होत्या. नंतर माझ्या आग्रहाखातर त्यांनी अडगळीत एका मोठ्या बॅगेत पॅक करून ठेवलेली सुरपेटी काढली आणि काही गीतं गायली, खूप वेळ झाला होता, दुपार झाली, तरी माझ्यासोबत गप्पांमध्ये रंगून गेल्यामुळे जेवणाची आठवण राहिली नव्हती.

जिजीनं (शाहिरनानांची मालकीन कमल, त्यांना आम्ही सगळेच आपूलकीनं जिजी म्हणतो.गावात सगळे 'शाहीरनानांची जिजी' म्हणूनच ओळखतात.) आणि शाहीरनानांनी जेवण करायला मला आग्रह केला, पण मला त्या एका दिवसात तडसर येथील आत्त्याला आणि कडेगांव येथे खास मित्रांना भेटून, विचारपूस करून माघारी फिरायचं होतं, त्यामुळं मला शाहीर नानांच्या इथं अजून जास्त वेळ थांबता आलं नाही, तरीही मी त्यांना विचारले, "नाना, मला अजूनही तुमच्याशी बोलायचं आहे, तुम्ही जी कवणं सादर केलेली आहेत, ती लिहून काढायची आहेत. या नंतर तुम्हाला मोकळा वेळ कधी मिळेल, संध्याकाळी ?"
त्यावर त्यांनी क्षणाचाही विचार न करता सांगितले, " मी चार-पाच वाजता वस्तीवर येतो."

माझ्यामुळं त्यांना चार पाच किलोमीटरची पायपीट करावी लागू नये, म्हणून मी त्यांना सांगितले, की मी आज दिवसभर बाहेर गावी असणार आहे, संध्याकाळ होईपर्यंत घरी परतेन. मी एका दिवसात अनेक गोष्टी साध्य करून घेत होतो, त्यात किती गोष्टी साध्य झाल्या, किती गोष्टी निसटल्या, ते पुढे काळच ठरवेल...

त्या दिवशी नियोजित ठिकाणी गेल्यानंतरही मला अजून दोन तीन ठिकाणी जाणं अत्यंत आवश्यक वाटलं. ती ठिकाणं म्हणजे वांगी, ऐतिहासिक संदर्भासाठी तडसरच्या डोंगरावर आणि कडेगांव कुस्ती संकुल येथे.

मला संध्याकाळी घरी यायला खूपच उशीर झाला होता. घरी आल्यावर आईने मला सांगितले, की शाहीरनाना चार वाजता घरी आले होते, 'सुभाष कुठं हाय, त्याची भेट घ्यायची होती', असं म्हणत होतं. तू घरी न्हाय म्हंटल्यावर ते थोडावेळ बसले, बोलले आणि निघून गेले. हे ऐकून मनात थोडी हळहळ वाटली. खास माझ्यासाठी, खास माझ्या आग्रहाखातर त्यांनी वेळात वेळ काढून स्वतःहून इतकी पायपीट करून घेतली आणि इतकं करूनही त्यांची आणि माझी भेट झालीच नाही, याची माझ्या मनाला खूप बोचणी लागली.

त्यांनी वयाची बाहत्तरी पार केलेली असताना सुद्धा त्यांचं कलेवरचं प्रेम, कलेची आस्था त्यांना अजूनही स्वस्थ बसू देत नाही आणि आपण तर अजून धडधाकट आहोत, त्यामुळे मला अजूनही त्यांच्याकडून काही गोष्टी नव्याने शिकायच्या आहेत. त्यांचे अनुभव ऐकायचे आहेत, त्यासाठी गावी गेल्यावर मला त्यांना पुन्हा पुन्हा भेटायचं आहे.....

शाहीरनानांना दिर्घायुष्य लाभो, त्यांच्या सहवासाचा माझ्यासह इतरांना मिळणारा आनंददायी लाभ असाच वर्षानुवर्षे मिळत राहो,
हीच मनोमन सदिच्छा.
🙏🙏🙏

©_सुभाष आनंदा मंडले
(9923124251)