'तांबूस तपकिरी सुर्यकिरणे काचेच्या तावदानावरती पसरली होती. झिरपून गेलेल्या जलसरींचे थेंब त्यावर पाझरू लागले. त्याबरोबर आतल्या गडद निळ्या पडद्याची लवलवं सुरू झाली. एखादा चुकार कवडसा आत डोकावू पहात होता. त्याचा एक तिरकस कटाक्ष पडताच तो पडदा स्वतःच्या जागी निश्चल झाला आणि किरणांनी आपली दिशा बदलली. कोणीही आतमध्ये डोकावून पाहणे त्याला मान्य नव्हते, अगदी वार्यानेही...
कारण त्याची ती, ती त्याच्या बाजूला उजव्या कुशीवर पडून शांत निवांत साखर झोपेत होती. हो त्याचीच 'ती' आणि तिचा 'तो'. कालच तर त्यांनी पळून जाऊन लग्न केले. परत तिच्या भोवती आपले तुटके दोन हात गुंफून तो ही निद्रेच्या अधीन झाला. ना कोणाची भीती, ना जगाची तमा.'
थोड्याच वेळात काही तरी तुटण्या-फुटण्याचा मोठा आवाज झाला आणि त्या दोघांचीही झोप उडाली.
धडामsss दाराचे कुलूप तोडून पोलिस इन्स्पेक्टर आत शिरले. अर्थातच त्यांचा लावाजमा सोबतीला होता. नाकाशी रुमाल बांधून कोनस्टेबलने दोन्ही बोडीज ताब्यात घेतल्या.
" गळफास लावून आत्महत्या केली आहे, आत्महत्या की खून झाला म्हणायचं? हे समजेल लवकरचं." वेटर आपापसात कुजबुज करत होते.
" बाजुच्या गावातल्या सावकाराचा पोरंगा आहे साहेब, आणि ही त्या कलावंतांनीची पोरगी. नुसतंच लग्न झालेलं दिसतं होत, त्यात कातरवेळी आले, नाही म्हणणं बरं दिसत नाही, म्हणून मी त्यांना इथे राहू दिल, नाहीतर अशा लोकांना मी नाही ठेवून घेत." होटेलचे मालक गयावया करतं पोलिसांना माहिती देत होते.
‘जास्त वेळ खर्च करण्याची गरज नव्हती त्यामुळे ठरल्याप्रमाणे पोलिस त्या रुमची पाहाणी आणि काही जुजबी चोकशी करून तेथील निरुपद्रवी टाकाऊ सामान सोबत घेऊन निघून गेले, निघताना एक पोलिस फोनवर बोलत होता, " हो साहेब. आत्महत्या केली त्यांनी. आत्महत्याच ती. तुम्ही अगदी निर्धास्त रहा. उद्या येईल रिपोर्ट, तेवढ आमच्यावर कृपा दृष्टी ठेवा, म्हणजे झालं."
'तो' छद्मीपणाने हसला आणि त्याची 'ती' ही. " या साल्याने फक्त एका रात्री इथे राहण्याचे चांगले ५००० घेऊन लपायला परवानगी दिली, गद्दारी केली ती गोष्ट वेगळीच. आणि आता दाखवण्यापुरती गयावया करतोय." तो पलंगावरून उठत म्हणाला.
" या जगात सगळेच स्वार्थी. तो पोलिसपण लाचट. मग कशाला उगाच हा शोधाशोधीचा खेळ? जगाला दाखवण्यापुरता? " ती देखील उठून तयारीला लागली.
" असो, कुठून सुरुवात करायची म्हणतेस?" उभ्या जागेवरून कपाटाखाली हात घालून त्याने एक अंगठी बाहेर काढली. त्याच्या वडिलांची, पोलीस डेडबॉडी घेऊन गेले तेव्हा घरंगळत जाऊन खाली पडलेली. एवढा मोठा पुरावा सोबत घेऊन जाण्याची त्यांना तरी काय गरज म्हणा.
" माझ्या माय पासून सुरुवात. म्हणजे एक पार्टी संपते. मंग तुझं खानदान उडवू! " ती अंगठी डस्टबिन मध्ये टाकत उद्गारली.
" तुझ्या म्हणण्याप्रमाणे." तो ही तिच्यामागे बंद दारातून आरपार बाहेर पडला.
*****
" काय रे! कश्टमर आहेत का?"
"सायेब, ते आपले नेहीचं जोडपं, बाजुच्या गावातल्या सावकाराचा पोरं हाय, आणि ही त्या कलावंतांनीची पोरगी. तेच हायत." वेटर गुपचुप येऊन होटेल मालकांच्या कानात पुटपुटला.
" सदा काय वेडा झाला काय? ते दोघं काल गेले ना ढगात. माहित नाही का रे?
मालक दुसऱ्या वेटरला विचारु लागले.
" सायेब, हा गावाला गेला होता, सकाळी माझ्या आधी हित हाजर झालाय, आणि आल्यापासून सारखं तेच बडबडतोय." चावीचा गुच्छ घेऊन गडबडीत वरच्या रुमकडे वळत तो वेटर उद्गारला.
" तू का पळतो, काय झालं?" मालकही त्याच्या मागून निघाले.
" तो रुम नंबर ५ उघडत नाय सकाळ पासन." तो मागून मोठमोठ्याने बोलत होता.
" भावा ५ नंबर मध्येच ते दोघं हायत ना." वेटर सदा ओरडून सांगत होता. पण मालक चावी घेऊन त्या रूम कडे एकटेच निघाले. चालताना हातात वाजलेला फोन त्यानी कानाशी लावला.
"दादा काय बोलता काय? सावकारासकट सगळ खानदान गळफास लावून गेलं. कोणीही शिल्लक नाही. त्याला पर्वा रात्री मदत केली होती, पोराला उडवायला, आता माझे पैसे कोण देणार? " बोलत बोलत दरवाजा उघडून ते रुम नंबर ५ मध्ये शिरले.
"आणि कलावंतीण बी गायब झाली हाय." पलिकडून कोणीतरी माहिती देत होते, पण या बाजूने ऐकणारे कोणीही शिल्लक नव्हते. हॉटेल मालकाला कैद रुम नंबर ५ चा दरवाजा कायमचा बंद झाला, पुन्हा कधीही न उघडण्यासाठी. दिवस मावळतीकडे झुकला होता. सरता सरता न सरणारी वेळ म्हणजेच कातरवेळ सुरु झाली होती. ती वेळ, जी उगीच अधांतरी लटकावून ठेवते ती कातर वेळ सुरु झाली होती. संधीकालच्या सूर्यास्ताची पिंगट-केशरी किरणे खिडकीतून आत डोकावू पहात होती, त्याने एक कोरडा कटाक्ष टाकला आणि किरणांनी आपली दिशा बदलली. कोणीही आतमध्ये डोकावून पाहणे त्याला मान्य नव्हते अगदी वार्यालाही.
-------------------------------
समाप्त
https://siddhic.blogspot.com/