एक रहस्यकथा
ईश्वर त्रिंबक आगम
"बहिर्जी आणि त्यांच्या सवंगड्यांनी तोरणा किल्ला कशाप्रकारे जिंकण्यासाठी शिवरायांना मदत केली आणि तोरणा गडावर खजिना आणि शस्त्रागार यांचा कसा शोध लावला. त्याची काल्पनिक, रंजक अशी ऐतिहासिक दंतकथा. कृपया, वाचकांनी हि काल्पनिक कथा म्हणजे खरा इतिहास समजू नये, हि विनंती."
1. देवीचं मंदिर
2. झुंजार महाल
3. हर हर महादेव
1. देवीचं मंदिर
ढंगांच्या पांढऱ्या धुरकट छताला भेदून उंच आभाळाला भिडलेलं! घोंघावणारं वादळ, सोसाट्याचा वारा, अंगाची लाहीलाही करणारं ऊन, आणि कितीही मुसळधार पाऊस असो, यांच्याशी अष्टौप्रहर झुंजणारं! जणू आस्मानीच्या सुलतानाशी जवळीक साधू पाहणारं ते उंच गिरी शिखर! पायथ्यापासून वर पाहाताना डोकं कितीही मागं गेलं तरी डोळ्यांच्या पट्ट्यात न सामावणारा आणि सह्याद्रीच्या उंच माथ्यावर राजा सारखा विराजमान झालेला तो गिरिदुर्ग! सह्याद्रीच्या डोंगररांगेतील सर्वांत उंच, जणू श्रीकृष्णाच्या राजमुगुटातला मोरपंखचं! जेवढा उंच, तेवढाच रुंदही! गिरिदुर्गाला दोन उपत्यका म्हणजे माच्या. तेलाचा बुधला उपडा करून ठेवल्यावर जसा दिसतो, तसा तिचा आकार! म्हणून ती बुधला माची! दुसऱ्या बाजूला भरभक्कम तासीव कातळी तट आणि खाली बघितलं तर डोळे गरागरा फिरतील अशा खोल खोल दऱ्या. इकडून गडाखाली उतरायला अतिशय भयंकर, अवघड आणि चिंचोळी वाट. खाली उतरणारा आजपावेतो पुन्हा गडावर आलाच नाही. येईल कसा, ज्याने ज्याने खाली जायचा प्रयत्न केला तो सरळ ढगात गेला. वर यायचं म्हटलं, तरी घोंघावणारा वारा, कडे, कपाऱ्या, नाजूक वाटा सदैव स्वागताला तयारच असतात. थोडा जरी पाय घसरला, तोल गेला तर कडेलोटच! त्या डोंगराशी झुंजूनच वर येता येतं. म्हणून ती झुंजार माची! आपले दोन्ही बाहू पसरून सारा कानद खोऱ्यातला परिसर आपल्या कवेत घेऊ पाहणारा असा तो उंच, बुलंद, बळकट आणि अभेद्य गिरिशिखर म्हणजे गड तोरणा!
सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये अत्यंत बळकट आणि बिकट अशा किल्ल्यांमध्ये सर्वात उजवा ठरण्याचा मान तो तोरणा गडाचाच! गडावर जाण्यासाठी अत्यंत अरुंद वाटा. खडी चढण. वर्षानुवर्षे उभे असलेले, काळया पत्थरात सांधलेले भरभक्कम दरवाजे. काळ्याकुट्ट सापासारखी वळणे घेत गडभर पसरलेली तटबंदी. गडाच्या मध्यावर असलेल्या बालेकिल्ल्यापासून मुरुंबदेवाच्या डोंगराच्या दिशेने जाणारी एक आणि पूर्वेकडे म्हणजे पुरंदरच्या दिशेने जाणारी दुसरी. अशा दोन माच्या. दोन्हीही काळ्याकभिन्न नागमोडी तटबंदीने संरक्षित. आणि त्यांचा शेवट बुरुजांनी परिपूर्ण केलेला. एखादा भला मोठा कालसर्प डोंगरावर फडा काढून बसल्यासारखे वाटायचं! खाली खोल खोल दऱ्या. बुरुजावरून खाली पाहणाऱ्याचे डोळेच फिरावे. गडाच्या सभोवती डोंगराच्या खाच खळग्यांत आणि झाडा झुडपांत ठिकठिकाणी चौक्या होत्या. यांना चकवून गडावर जाणं म्हणजे अतिशय अवघड काम. गडावरून दिसणारं सह्याद्रीच रूपडं म्हणजे पृथ्वीवरील दुसरा स्वर्गच जणू! जेवढं विलोभनीय आणि डोळे दिपवून टाकणारं! तेवढंच ते रौद्र आणि भयंकर!
बुधला माचीला लागून पश्चिम अंगाला आतकरवाडी, खोपडेवाडी, भालवाडी अश्या वाड्या, वस्त्या होत्या. पन्नास एक घरे असणाऱ्या या वाड्या! गडाचा किल्लेदार मराठा. पण किल्ला आदिलशाही अखत्यारीत. आजुबाजुच्या गावांतून करापोटी मिळणारा जेमतेम वसूल शिरवळातल्या गढीत राहणारा आदिलशाही फौजदार आमीन बळकावत असे. इथं गडकरी आणि शिबंदीलाही मिळणारी रक्कम तुटपुंजी तिथं गडाच्या दुरुस्तीकडे कोण कशाला लक्ष देतंय. त्यामुळे गडावर तोफा असूनही त्याला लागणार दारुगोळा नव्हता. तोफा कुठेही अस्ताव्यस्त पडलेल्या. काही तर गंजून निकामी झालेल्या. हत्यारे आणि शिबंदीही जेमतेम. पावसाळ्यात तर किल्ल्यावर फक्त पाखरं आणि रानटी जनावरं फिरायची. माणसं गडाखाली वस्तीला यायची.
गड सहजपणे मिळवता येऊ शकत होता. पण मराठा किल्लेदाराशी वैर नको म्हणून शिवबाराजांनी तान्हाजी, येसाजी आणि बाजी पासलकर यांना किल्लेदाराशी सामंजस्याने काही करता येऊ शकते का म्हणून कामगिरी दिली. राजांचा मुक्काम खेड शिवापूरच्या वाड्यातच होता. तान्हाजी मालुसरे, येसाजी कंक अन बाजी पासलकर हे इथले पिढीजात वतनदार. तान्हाजी, येसाजी पाच दहा वर्षांनी राजांपेक्षा मोठे होते, पण पासलकर म्हणजे ह्या सगळ्यांचे आजोबाच! आजूबाजूच्या साऱ्या किल्लेदारांशी चांगलीच ओळख होती. आता त्याच ओळखीचा उपयोग स्वराज्यकामासाठी करायचा होता.
येनकेन प्रकारे जर किल्लेदाराशी बोलणी जमलीच नाही तर दुसऱ्या बाजूने गडावर चढाईची तयारीही राजांनी केली होती. त्यासाठी बहिर्जीला त्या कामगिरीवर नेमलं होतं.
बहिर्जी आणि त्याच्या सवंगड्यांनी आठवडाभर तोरणा - मुरुंबदेवाचा मधला दोन तीन कोसांचा परिसर धुंडाळून काढला. एक दोन ठिकाणी चौक्या पहारे करण्यासाठी मेटे होती. पण महत्त्वाचं असं काहीच हाती लागत नव्हतं. मुरुंबदेवाच्या वाटेवर उजव्या बाजूला शंभर दोनशे पावलांवर असलेल्या एका देवीच्या प्राचीन रावळात सगळे पथारी पसरून आराम करायचे. तेवढं एकच ठिकाण जरा आडवाटेला होतं. आजूबाजूला काही लहान मोठ्या टेकड्या आणि दाट झाडी! त्यामुळं लोकांची इकडं वर्दळ नसायची. मंदिरावर आणि मंदिराच्या दगडी भिंतींवर रानवेलींनी गच्च दाटी केली होती. पावसाचं पाणी साचून राहिल्यामुळे भिंतींवर, शिखरावर, खांबांवर हिरवं शेवाळ पसरलं होतं. त्यामुळे सहजसहजी कुणाचंही इकडे लक्ष जात नसे. आणि इतक्या आडवाटेला, आणि दाट झाडीमध्ये इकडेही एखादं मंदिर असू शकेल! असा कुणी विचारही केला नसेल. मुरुंबदेवाच्या दक्षिणेकडच्या बाजूची माची इथून एखाद दोन मैल अंतरावर होती.
उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला. धो धो पाऊस बरसत होता. नद्या ओढे तुडुंब भरून वाहत होती. तोरण्यापासून ते मुरुंब देवाच्या डोंगरापर्यंतचा परिसर झाडा झुडपांनी गच्च भरलेला. आता सारा परिसर चिखल पाण्यानं ओला कंच झाला होता. पाय पडताच वीतभर पाय चिखलात रुतत होता. पावसानं थोडी उघडीप दिली. तरीही आकाशातून पाणी भुरभुरतच होतं. गाव पाड्यावरची लोकं हळूहळू निकडीची कामं करण्यासाठी अधून मधून डोकावत होती.
संध्याकाळची वेळ. ढगाळ वातावरण. अंधार पडायला सुरुवात झाली होती. वस्तीपासून दूर जंगलाच्या दिशेने दोन इसम डोक्यावर कोपऱ्या टाकून, चिखलानं भरलेली निसरडी पायवाट तुडवत निघाले होते. काही अंतर चालून गेल्यावर दोघेही थांबले. एकाने तोंडाजवळ हात घेत एक शीळ दिली. एक दोन क्षण गेले असतील तोच प्रत्युत्तरादाखल तशीच शीळ ऐकू आली. दोघांनी त्या दिशेने मोर्चा वळवला. झाडावेलींनी आणि शेवाळाने झाकलेल्या मंदिरात दोघांनी प्रवेश करताच एकजण म्हणाला,
"नाईक....???"
सामोरे येत बहिर्जी म्हणाले, "राणोजी , सुंदऱ्या. आलास का रं? किती वाढूळ झालं. वाट बघून जीव इटून जायची येळ आली की लगा."
कोपऱ्या बाजूला काढून ठेवल्या आणि खालच्या गोणपाटाला पाय पुसत राणोजी आणि सुंदऱ्या आतमध्ये आले. माठातलं पाणी प्यायले. खाली बसले. बहिर्जीने विचारलं,
"बोला... वाट गावली का न्हाय...?"
"व्हय... नाईक... आतकरवाडीतंन बुधला माचीव जायला एक वाट हाय. जरा अवघड हाय पर जाता यील."
"चला... एक काम झालं तर... बर आता तुम्ही दोघं निघा. राजास्नी जाऊन वाड्यावर भेटा. म्या आन मारत्या उद्या सांच्याला वाड्यावर यितु."
"बरं..."
राणोजी, सुंदऱ्या आल्या वाटेने निघून गेले. बहिर्जी, मारत्याने देवळात बसून भाकर तुकडा संपवला. आणि तिथंच अंग टाकून दिलं. पिशवीतल्या तंबाकूची पानं हातावर चुरगाळून हाता पायावर चोळलं. माश्या, डास, मुंग्या, किडे त्याच्या वासानं जवळ फिरकत नसायचे. दोघंही घटका अर्धा घटका गोष्टी करत बसले होते. अचानक, बाहेर कुणाच्या तरी पावलांचा आवाज येऊ लागला. दोघेही सावध झाले. कमरेच्या तलवारी आवाज न करता हळूच बाहेर आल्या. दगडी खांबाच्या मागे लपून समोर कोण येतंय पाहू लागले.
डोक्यावरची घोंगडी बाजूला सारून एक इसम आतमध्ये आला. त्याला बहुदा इथं कुणीतरी असल्याची चाहूल लागली असावी. त्याच्या हातात कुऱ्हाड होती.
"कोण हाय रं हिथं???", घोगऱ्या आवाजात त्याने दम भरला.
खांबाआडूनच बहिर्जी म्हणाला, "तू कोण?"
तो इसम पुन्हा मोठ्याने म्हणाला, "आधी तुम्ही लोकं कोण त्ये सांगा? आन हिथं कशापाई उपटलासा??"
"आम्ही शिवबाराजांची माणसं...", खांबाआडून बाहेर येत बहिर्जी म्हणाला.
"कशावंन???", पुन्हा त्याचा तो घोगरा आवाज.
बहिर्जीने कमरेच्या पिशिवीत हात घातला. हातात सोन्याची राजमुद्रा कोरलेलं नाणं दाखवत म्हणाला, "ह्ये पगा..."
ते नाणं हातात घेत दोनचार वेळा त्याने निरखलं. खात्री पटल्यासारखं वाटलं.
म्हणाला, "बसा हिथं... नावं काय म्हणलासा तुमची?"
"म्या बहिर्जी आन ह्यो मारत्या..."
बहिर्जी, मारत्या दोघेही निर्धास्तपणे बाजूच्या खांबाला टेकून बसले. खुंटीवर अडकवलेल्या कंदिलाच्या प्रकाशात त्याचा चेहरा दिसला. दाढी मिशा पार पांढऱ्या झालेल्या. म्हातारं माणूस पर आवाज एकदम खणखणीत.
"बोला... काय काम काढलं ह्या जंगलात?"
"म्हातारबा... राजं तोरणा गड घ्यायचं म्हणत्यात..."
"ऑ???", मोठाले डोळे करत म्हातारबाने तोंडाचा आ वासला.
"काय झालं बाबा?"
"काय न्हाई पोरानु... पर काम लय अवघड हाय. बोलून चालून काम होत आसल तर बघा."
"म्हातारबा. सवराज्याची शपथ घेत्या वक्तापासून जीव मुठीत घेऊनच फिरतुया. जीवाची फिकीर न्हाय आमास्नी."
"हं...!"
"आन... शिवबाराजांची किल्लेदाराशी मसलत बी चालू हाय. आणि मी चारपाच दिस झालं चढाईची वाट सोधत फिरतूय. पर म्हणावं आक्शी वाट घावंना."
"झुंजार माचीच्या बाजूनं चढायचा परयत्न क्येला पर फुडं वाट काय दिसंना. चारपाच येळा पघितलं पर काय साधलं न्हा बा...", मारत्याने पुढचं वाक्य जोडलं.
"पोरांनु... त्या बाजूनं वाट हाय. म्या दावतु. पर ध्यानात ठिवा. त्या बाजूनं वर येंगाय येतं, पर माघारी यायचा इचार बी मनात आणू नगा."
"असं... का?"
"आजपतूर तिथून वर ग्येलेला मनुक्ष जित्ता वापस आलेला न्हाई..."
"आस्स्स...?"
"कड्याच्या टोकावर एक बुरुज हाय. त्येच्या खाली खबदाडीपातूर जाता येतं. त्येला कळकीचं मेट म्हणत्यात. रात पडाय लागली कि, माचीवर कुणीक सुदा नसतंय. सकाळच्यालाच लय येळानी मंग माणूस उगावतु. वर जायला तिथंनं दोर टाकावा लागल. पर त्ये लय अवघड काम हाय."
"त्येची फिकीर नगू... फूडचं आम्ही पघु..."
"ऐक पोरा... त्यापरास म्या तुला दुसरी वाट दावतु..."
"दुसरी?"
"व्हयं. आईक... माचीच्या खाली एक भलं मोठं भुयार हाय. त्येत झुंजारमल देवाचं राऊळ हाय. त्येला झुंजारम्हाल म्हणत्यात."
हे ऐकताच दोघांचे डोळे एकदम विस्फारले. एकमेकांकडे पाहू लागले.
"ह्या देवळाच्या मागं एक जागा हाय. हिथून एक भुयार झुंजार माचीच्या पायथ्या पातूर जातं. तिथून वर भूयारातल्या पायऱ्या चढून वर जायचं. वाट अंधाराची हाय पर उच टोकावं बारीक उजेड दिसंल. त्या दिशेनं चालत राहायचं. ती जागा दाट झाडीत डोंगराच्या आर्ध्याच्यावर निगती. तिथून वर चढाय खुबनी केल्यात. त्यात हात पाय घालून, आक्शी वानरावानी येंगुन झुंजारम्हालापातूर वाट निघती."
"तिथून माचीवर जायला वाट हाय ना?", मारत्याने शंका विचारली.
"हां ऐका... तिथून दोन भुयारानी माचीवर जाता येतं. देवाच्या डाव्या बाजूनं एक दरवाजा हाय. तिथनं वर माचीच्या मधोमध जो बुरुज हाय ना! त्येच्या खाली निगतु. आन दुसरी, झुंजारमहालाच्या आक्शी तोंडाला वर एक भगदाड हाये. तीतून वर दोर टाकून चढता येतं. ती वाट माचीच्या टोकावल्या झुंजारबुरूजाखाली निगती."
"पर म्हातारबा... वर निघणाऱ्या वाटा बंद क्येल्या आसतील तर?"
"हां... त्ये काय माहित न्हाय बा... त्येचा सोध तर फकस्त वर जाऊनच घेता ईल."
"म्हातारबा... ह्ये तुमास्नी कसं काय म्हाईत??"
म्हातारबानं सांगायला सुरुवात केली.
"माझ्या आज्यानं मला ह्याची गोष्ट सांगितली."
म्हातारबाच्या सांगण्यावरून बहिर्जी आणि मारत्याला आजपर्यंत कधीही ऐकिवात नसलेली माहिती मिळाली.
'तोरणेश्वराच्या डोंगरावर अकराव्या शतकामध्ये शैव पंथातील लोकांचा समुदाय राहायचा. डोंगरावर शंभू महादेवाचे मंदिराची स्थापना करून शिवाची उपासना करायचे. जवळच्याच ब्रह्मदेवाच्या डोंगरावर ब्रह्मदेवाचे उपासक वस्तीला होते. काळानुसार डोंगराचे नाव, ब्रह्मदेव. बृम्बदेव. मुरुंबदेव असे बदलत गेले. दोन्हीही पंथ एकमेकांच्या मदतीने राहायचे. झुंजार माचीच्या खाली एक मोठा महाल होता. त्यामध्ये पाचशे लोक मावतील एवढी मोठी व्यवस्था होती. बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात अल्लाउद्दीन खिलजीने दख्खन मध्ये प्रवेश केला आणि त्याचे वर्चस्व प्रस्थापी केले. त्यावेळी त्याचा सेनापती मलिक काफूर तोरणेश्वराला वेढा घालून बसला होता. एक महिना, दोन महिने, असे करत वेढा सहा महिन्यांपर्यंत चालू होता. गडावरचा शैव पंथाचा योद्धा वीरशैव हा हिमतीचा आणि जिद्दीचा. त्याने नेटाने खिलजीने आक्रमण थोपवून ठेवले होते. दोन महिने होत आले. वेढा अजूनही चालू होता. रसद संपत आली होती. त्याने एक धाडसी निर्णय घेतला. झुंजार महालातून मुरुंबदेवाच्या डोंगरापर्यंत भुयार खोदायचं! ते हि दीड दोन कोसांचं अंतर! हा शुद्ध वेडेपणा होता. पण पर्याय नव्हता. उपाशी राहून मरण्यापेक्षा प्रयत्न करून मरणं कधीही चांगलंच! झालं! कामाला सुरुवात झाली. शेकडो हात रात्रंदिवस झटू लागले. भुयार तयार होऊ लागलं. दीड कोसांच अंतर पार केलं होतं. तोच मागे दहा पंधरा हातांच्या अंतरावर वरचा सगळा भाग कोसळला. पाच पंधरा लोक दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडले. दोर टाकून वर जाऊन पाहिलं तर देवीच्या मंदिराच्या अगदी मागे निघाला. आजूबाजूला घनदाटझाडी. खिलजीच्या सैन्याच्या एक मैल दूर आणि एक दीड मैलावर मुरुंबदेवाचा डोंगर. काम फत्ते झालं होतं. मंदिराच्या खाली तळघर बनवण्यात आलं. वीरभद्राचे साह्य घेऊन रसद तोरणेश्वरावर पोहोचू लागली. वेढा वाढू लागला. मलिक काफूर वैतागला. मुसळधार पावसाळा सुरु झाला. पावसाळा सुरुवात झाली आणि सह्याद्रीने त्याचं रौद्ररूप दाखवायला सुरुवात केली. खिल्जीचं सैन्य वेढा उठवून निघून गेलं. सह्याद्रीचे बुलंद गडकोट जिंकण्याचं खिल्जीचं स्वप्न मात्र काही पूर्ण होऊ शकलं नाही.'
बोलता बोलता म्हातारबाला खोकल्याचा उबळ आली. मारत्याने दिलेलं माठातलं थंडगार पाणी पोटात जाताच म्हातारबा जरा हुशार झाला. हि सगळी कहाणी बहिर्जी मारत्या दोघेही अचंभित होऊन ऐकत होते.
"म्हातारबा... फुडं काय झालं मंग...?"
"फुडं... लय वर्ष डोंगूर त्यांच्याकडंच हुता. हळूहळू माणसं सगळीकडं पांगाय लागली. डोंगूर ओस पडाय लागला. शेवटी शेवटी तर दहा पंधरा माणसं ऱ्हायली हुती. नंतर इजापूरच्या बाच्छावाची माणसं आली आणि त्यांनी डोंगूर बळकावला. पंथातल्या लोक्कांनी डोंगर सोडायच्या आधी झुंजारम्हालाच्या साऱ्या वाटा बंद करून टाकल्या. त्ये आजपातूर कुणाच्या बापाला न्हाई घावंलं. माझ्या आजाला कुठून कळलं काय म्हाईत न्हाय. पर त्यानं मला सांगितलं आणि मंग म्या सोध घ्यायला लागलू. मला बी मायंदाळ दिवस लागलं हुडकायला."
"म्हातारबाबा. ह्यो तर चमत्कारचं म्हणायचं."
"व्हय बाबा. पर त्याच्या परास कमी बी न्हाय. बरं. तुमचा भाकर तुकडा झालं का?"
"व्हयं म्हातारबा. आन तुमी?"
जागेवरून उठत म्हातारबा म्हणाला, "म्या खाऊनच आलुय. चला झोपा आता. लई वाढूळ झालं म्या सांगत बसलू. आता रात बी झाली हाय. सकाळच्याला तुमास्नी जायची वाट दावतु."
मंदिराच्या मंडपात खालच्या दगडी फरसबंदीवर तिघांनी अंग टाकून दिलं. झोप लागली असली तरी बहिर्जीची झोप मात्र सावधच होती.
क्रमश: