Dildar Kajari - 31 in Marathi Fiction Stories by Nitin More books and stories PDF | दिलदार कजरी - 31

Featured Books
Categories
Share

दिलदार कजरी - 31

३१.

गंगेत घोडे न्हाले!

दिलदारला परतल्यावर समशेरला पाहून प्रश्न पडला.. हा भैरवलालला भेटला? की नाही भेटला? आणि का नाही भेटला? भेटला असेल तर भैरवलालची येण्याची हिंमत झाली नसती.

"समशेरा, आज कजरीच्या घरी या आचार्यास कोण भेटावा?"

"कोण?"

"तू सांग?"

"मी? मी काय सांगणार? मला कोण भेटले विचार."

"कोण?"

"तू सांग.."

"आधी मी विचारलेय.. समशेर."

"मग आधी तू बोल.."

"भैरवलाल! भैरवलाल येऊन उभा राहिला. नशिबानं शेवटीशेवटी आला नाहीतर काही खरं नव्हतं. तू भैरवलालकडे गेलाच नाहीस?"

"मी? अरे राहिले. मला गीता भेटली.. कशी ते विचार .."

"म्हणून. म्हणून तुझं लक्ष नाही दिसत. भैरवलाल आचार्यासमोर, म्हणजे माझ्यासमोर. मला वाटलं सपलं सारे.. पण वेळ निभावली.."

"काय सांगतोस काय! अरे मी चाललोच होतो तर रस्त्यात गीता दिसली. टांग्यातून चाललेली. मग तिच्या टांग्याचे चाक निखळले. ती रस्त्यावर. रस्ता सामसूम होता सगळीकडे गावाबाहेर. टांगेवाला कसाबसा उठला. मग मी उचलून घरी नेले.."

"कोणाला? टांगेवाल्याला?"

"अर्थात गीताला.."

"काय सांगतोस काय! अगदी भरधाव सुरूवात होतेय दिसतेय प्रेमकथेला. मग पुढे?"

"पुढे काय? घरात शिरलो. ती धक्क्यातून सावरली नव्हती, ती सावरेपर्यंत थांबलो. मग काहीबाही बोलणे झाले."

"बघ. माझी मदत झाली तुला."

"तुझी? ती कशी?"

"कशी काय? मी तुला भैरवलालला दम द्यायला पाठवले नसते तर भेटली असती गीता.. गीतावहिनी?"

"हुं. ते ही खरंच."

"खरंच आहे ते. मग आता पुढे?"

"अरे आजचा तो परिणाम तर जाऊ देत. मग विचार करतो. पण तुझे काम फत्ते झालेले दिसतेय. नाहीतर आला असतास तोंड लटकावून.."

"झाले. एकदाचे झाले. सासरा नामक मांजरीच्या.. नव्हे बोक्याच्या गळ्यात घंटा बांधून झाले."

"ससुरा मान गया?"

"मग? आचार्य लाल काशीवरून गेले तिथे. मानणारच. भैरवलाल मला पाहून घाबरला जाम. मला पाहून घाबरणारा पहिलाच कोणीतरी! मी ही त्याचा घाबरू दिले. आता फक्त जाऊन कजरीच्या घरी रीतसर मागणी घालणे बाकी आहे. आणि एकावर एक मोफत .. लीला म्हणजे तिच्या मोठया बहिणीचे पण ठरवून आलो.. आता एका मांडवात दोन शाद्या.. तुझी ठरवलीस फटाफट तर इजा बिजा तिजा करून टाकू.."

"माझी? आता कुठे सुरूवात .."

"हुं. प्रेमांकुर आता फुटला. त्याचे रोप होईल. पालवी फुटेल. मग वृक्ष होईल त्याचा. त्याला फुले फळे लगडतील. वेळ तर लागेलच. आणि झाड वाढवायचे तर मेहनतही लागेल.. खतपाणी घाल नीट.."

"तू काय अनुभवी माणूस. तुझे ऐकावे लागेल.. ऐकून घ्यावे लागेल.. ऐकतो. ही प्रेमबाग कशी फुलवायची.. दिलदार माळीबुवांकडून ऐकतो. बोलावे आचार्य माळीबुवा .."

प्रीतीची फुलबाग फुलवण्यासाठी दिलदार माळीबुवांनी घेतलेली मेहनत समशेरला दिसत तर होतीच. त्याहून अधिक दिलदार काय सांगणार होता? एकच वाक्य हरिनाथ मास्तरांचे सांगितले त्याने, 'खरेखुरे प्रेम आणि इच्छा असेल तर ते गंगेसारखे दुथडी भरून वाहिल नि त्यात साऱ्या अडचणी वाहून जातील. आणि प्रेमाची नौका किनाऱ्यास पोहोचल्यावाचून राहणार नाही हे नक्की!'

आपल्याहून सीनियर, काॅलेजातील कोणी ज्युनियरास टीप्स देतो नि तो ज्युनियर लक्ष देऊन ऐकत असतो, तसे काहीसे समशेरचे झाले. शेवटी दिलदारने शून्यातून आपली प्रेमकथा पुढे सुफळ संपूर्ण करत आणली होती! समशेर आता कुठे त्या प्रवासाची सुरूवात करत होता.

एवढी मोठी गोष्ट सांगायची तर प्रथम हरिनाथ मास्तरांनाच .. दोघेही भररात्री हरिनामपुरी निघाले. कजरीच्या घराबाहेर रात्री थबकले. घोड्याच्या टापांचा आवाज कजरीने ऐकलेला.. दोन्ही घोडेस्वारांकडे पाहून तिने हात केला.. दिलदार मनाशीच खुदकन हसला.

हरिनाथ मास्तरांची अपेक्षा होती तसतसे घडत होते. आधी टोळीची शरणागती नि आता दिलदारची कजरीच्या आघाडीवर प्रगती. शेवटी प्रेमानेच सारे जग जिंकता येते. दिसायला बंदुकीच्या गोळीचा धाक दिसतो. दहशत दिसते. लोक मान तुकवताना दिसतात, त्या जोरावर एखाद्या प्रदेशावर राज्य करता येईल पण मनावर राज्य करायला नि ते जिंकायला प्रेमच हवे. दिलदारच्या कजरीवरील प्रेमाने कितीतरी बदल घडताना दिसत होते. मास्तर समाधानी होते.

"आलात दोघे. मैदान मारून?"

"काल कजरीकडे गेलेलो गुरूजी. आचार्य बनून. मौर्यागुरूजींना पटवून आलोय.."

"अतिशय मेहनत करतोयस. तसा मी खोटेपणाच्या विरूद्ध आहे, पण थोडे राजकारण करायचे तर डावपेच खेळावे लागतात. त्यांना तुझा नेक इरादा पटवून देणे शक्य नाही. आता तुमचे शुभमंगल होऊन कजरी सुखात राहिली की आपोआप पटेल. हे आचार्य प्रकरण म्हणजे.. तू नाटकात वगैरे काम करायचा विचार करायला हरकत नाही. कजरी बेटीने सांगितलेले मला तू आचार्य बनून गेलेलास ते."

"ते आधी. आता परत.."

"ते कळले मला. आता पुढे काय?"

"जोवर त्या आचार्यांच्या बोलण्याचा परिणाम आहे तोवर लग्नाची मागणी घालून येईन. मग पुढे .."

"पुढे काय? तुला सांगितले तसे. राजस्थानातील घरी तू नि कजरीबेटी. सुखाने रहा. मी येईनच आशीर्वाद द्यायला. आणि तुमचे काय डाकू समशेरसिंग?"

"गुरूजी, काल गीतापठण करून आलाय. पहिला अध्याय .. आता बाकी कधी आणि कसे.."

"करेल. समशेरच्या समशेरीत तेज आहे. ती तळपेल.."

"गुरूजी तुमचा आशीर्वाद असेल तर.."

"तो तर आहेच.. आता शरणागती जवळ आलीय.. लवकरच सारे काही मार्गी लागेल .."

"होय गुरूजी .."

मग संध्याकाळी कजरी नदीकिनारी भेटली.. त्याच प्रेम दगडाच्या पाशी. दिलदार हरिनाथ मास्तरांना भेटून आला की नेहमीच खुशीत असायचा तसा होता.

"एवढा उशीर काय रे केलास?"

"तुला माहितीय ना? गुरूजींना भेटायला गेलेलो.."

"तरीही. मी वाट पाहात होते.. "

"गुरूजी भेटले की बरे वाटते. तेवढे एकच कोणी आहेत की ज्यांचा आधार वाटतो. गुरूजी म्हणाले भविष्य उज्ज्वल आहे.."

"तुमचे नाही आचार्य.. माझे भविष्य सांगा .."

"तुझा हात हातात देऊन बसत असशील तर अनंत काळ भविष्य सांगायला तयार आहे मी. आणि चेहरा वाचन ही करेन. पण तुझे ठाऊक नाही, पण माझे भविष्य उज्वल आहे.."

"आणि भैरवलाल ज्योतिषी काय म्हणतात?"

"बाप रे! त्याला बघूनच घाम सुटला मला."

"नि तुला पाहून त्याला!"

"गुरूजी काय म्हणाले?"

"गुरूजी? खूप खूश होते. म्हणाले, चट मंगनी पट ब्याह! लगेच उरकून टाका.."

"चल. गुरूजी असे काही म्हणाले नसणार. तूच बसला आहेस गुडघ्याला बाशिंग बांधून. उतावळा नवरा .."

"मी आणि उतावळा? मग लवकर घरी ये म्हणून मागे कोण लागलेले?"

"मी?"

"नाहीतर मी? पण विचार कर, मी येण्याआधी भैरव तिथे पोहोचला असता तर..?"

"किंवा तू गेल्यावर आला असता तर?"

"काय होणार होते? तू गेली असतीस हजारीमलच्या घरी शेठाणी बनून. कमरेला किल्ल्यांचा जाडजूड जुडगा नि भरलेली तिजोरी. बघ अजून विचार कर.."

"आता परत बोललास तर हा दगड घालेन डोक्यात. पण त्याचा उपयोग नाही. तुझ्या डोक्यात ही तेच दगड भरलेले आहेत. या दगडानी काय होणार?"

"असं म्हणतेस? पण आम्ही गेल्यावर तुझे बाबा काय म्हणाले? जोरका झटका लागला असणार.."

"मला म्हणाले, बेटी सारे काही ठीक होईल. विधिलिखित बदलता येत नाही. मी म्हणाले त्यांना, मी तयार आहे .. तुम्ही अजिबात चिंता करू नका. तुम्ही आचार्य म्हणाले तसेच करा ..!"

" किती साळसूदपणे म्हणाली असशील तू. तशी डांबीसच आहेस तू. आणि नादान .. तुझ्या घरी तुझा हा पराक्रम ठाऊक नाही म्हणून, नाहीतर नादान म्हणायला कोणी धजावणार नाही तुला .."

"शहाणाच आहेस. आणि हे सारे आताच केले नसते तर.. तुझ्याबद्दल घरी काय सांगणार होते मी? यही डाकू मेरा दिलवर है?"

"गुरूजी पण हेच म्हणाले."

"हेच म्हणजे? तू डाकू तो डाकूच राहशील. माझ्या दिलावर डाका घालणारा डाकिया रूपातला दिलवर दिलदार डाकू.."

काही दिवसांतच संतोकसिंगची टोळी समशरेसिंगची टोळी या नावाने शस्त्रे टाकती झाली. शरणागतीची बातमी दूर दूर पसरली. दिलदारवरचा डाकूत्वाचा शिक्का पुसला तर गेला. पुजारीबुवा सगळ्या बातम्या ऐकून होते. अस्वस्थ होते पण त्यांचा इलाजही नव्हता. दिलदारशी लग्न कजरीचे होणार ही काळ्या दगडावरची रेघ होती.

पुढे गहन खलबतं झाली. लीलाच्या केशव अग्रवालने आधी नि त्या नंतर दिलदारने पुजारी बुवांच्या घरी एकामागून एक जाण्याचे ठरले. लीला नि कजरी, पुजारीबुवांच्या दोन्ही पोरी चलाख खऱ्या. आपल्या प्रेमप्रकरणांचा सुगावा लागू न देता आपल्या प्रेमकथेला पूर्णत्वाकडे नेऊ लागल्या. आणि 'होनी को कौन टाल सकता है' म्हणत मौर्यागुरूजी आनंदाने पुढे पाऊल टाकते झाले. आणि गंगेत दोन घोडे न्हाते झाले!