२८.
पुन्हा आचार्य!
मौर्या पुजारीबुवा आरती संपवून घरी परतले आणि दरवाजावर थाप पडली..
"प्रणाम!"
"आपण आचार्य? वा! या या.."
"देवीका संदेसा आया. चले आए."
"अलभ्य दर्शन. अलभ्य लाभ. तुमची आठवण काढली होती हल्लीच. आपल्यासारख्यांचे चरण आमच्या घराला लागले.. "
"पांव तो लगे आपके घर, पर वह तो हमारे हाथोंमें नहीं. देवीका इशारा हुवा तो जहां भी हो चले जाते हैं. आज रात संदेसा आया. मौर्यागुरूजी जैसे पुण्यशील व्यक्तिके घर जाने के लिए. चले आए."
"बहुत शुक्रिया. रसीलाबेन.. आचार्यजी आए हैं. दूध आणि केळी आणा.."
आतून रसीलाबेन बाहेर आल्या. मागच्या वेळी कपभर दूध होते. यावेळी मोठा प्याला भर! दिलदारला दुधाचे वावडे.. त्यात हा मोठा प्याला. केळी ठीक.. पण दूध? ज्योतिषी झाला म्हणून त्याने चहासारखी पेये पिऊ नयेत असा नियम आहे की काय? दूध न पिण्यासाठी काहीतरी कारण शोधायला हवे .. पण ते महत्त्वाचे की आजचा आपला हा अभिनय? दूरगामी विचार करता महत्त्वाचे ते कजरी संपादन. त्यासाठी ह्या ग्लासभर दुधाची ती काय तमा! इश्कका जहरी प्याला पीते हैं लोग. तिथे पेलाभर दुधाचे काय!
"मला कालच देवाचा संदेश आलेला. तुम्ही येणार म्हणून. मी म्हणाले ही, भैरवलालना नको, आपले आचार्यच आपल्याला मार्गदर्शन करतील. देवाच्या भक्तीतच एक शक्ती आहे. देवभक्ती मनापासून केली तर तो कोणाना कोणाच्या रूपात येतोच.." दुधाचा प्याला हातात देत रसीलाबेन भक्तिरस निर्मितीत तल्लीन झाल्या.
"घ्या ना आचार्य. केळी घ्या. दूध घ्या. मी मुद्दाम काढून ठेवलेले बाजूला. तुमच्यासाठी.."
ज्या कोणी देवाचा संदेश या रसीलाबेनला जात असेल त्या देवाचा दिलदारला मनातल्या मनात राग आला.. कसाबसा 'आमचा प्याला दुधाचा, डोळे मिटून प्यायचा' म्हणत एका घोटात त्याने दूध घशाखाली उतरवले. फार पूर्वी त्याची आई मागे लागायची तेव्हा प्यायलेल्या दुधानंतर आज खूप वर्षांनी तो इतके दूध परत पीत होता.. त्याच्या दाढी मिशांच्या जंजाळामागे त्याचे वाकडे तोंड कोणाला दिसणार नाही इतकाच काय तो दिलासा होता.
"कैसी हैं रसीलाबेन?"
"मी कशी असणार? सगळी त्याची कृपा. ठेविले अनंते तैसेचि रहावे. दिवस काढतेय. ढकलतेय. आता लीलाच्या लग्नाची काळजी. एक मुलगी सासरी गेली. आता लीलाचा नंबर."
"उसी सिलसिलेमें आया हूं. मैं हस्तसामुद्रिक. विवाह स्पेशालिस्ट. लेकिन आप चिंता मत कीजिए. वह लडकी बडी भाग्यवान है."
"सो तो है. तुम्ही मागच्या वेळी आलात तेव्हा लीला भेटली नव्हती. आज आहे घरी.."
"लीला मतलब आपकी छोटीवाली कन्या.." कजरीचे नाव यावे म्हणून मुद्दाम चूक करत दिलदार म्हणाला.
"नाही हो. मोठी. छोटीवाली अजून छोटी आहे."
"सही है. पर लडकियां बहुत जल्दी सयानी हो जाती हैं. हम तो हाथ पढकर और चेहरा देखकर बता देते हैं उनके विवाह के बारे में."
"तेच म्हटले मी. अलभ्य लाभ. मी भैरवलाल ज्योतिषीना बोलावणे धाडलेले. येणार होते म्हणाले. आता तुम्ही आलात तर.."
"भैरव? वह तो मेराही चेला है. आप उसे संदेश भेज दीजिए. गुरूजी आ गए कहना."
"ठीक आहे ना आचार्य. आता तुम्हीच आलात तर.."
"बुलाइए आपकी दोनों कन्याओंको. आज हाथ देखकर ही बताता हूं. पिछले समय उनकी सिर्फ तस्वीर देखी थी. आज हाथ देख लेंगे. और कन्याओंका क्या? देखते देखते बडी हो जाती हैं. छोटी है समझते हैं पर कब बडी हो गईं पता ही नहीं चलता.."
"खरंय तुमचे आचार्य. आमची लीला आम्हाला लहानच वाटते अजून. पण जनरीत आहे. वेळच्या वेळी सगळे उरकले की बरे असते." दिलदार कजरीच्या रोखाने बोलत होता नि पुजारीबुवा कात्रजचा घाट दाखवल्यासारखे लीलाबद्दल सांगत होते!
"पोरीची जात नि उजवून टाक म्हणतात ना." रसीलाबेनने तिथल्या तिथे आपल्या भाषेला एक नवीन वाक्प्रचार अर्पण केला. पुजारीबुवांनी लीलाला मोठयाने हाक मारली..
"लीला बेटी.. ये तर बेटा खाली पटकन.."
हाक ऐकून आतून कजरी संधीची वाट पाहात टपून बसल्यासारखी प्रकट झाली..
"काय पिताजी?"
"लीला कुठेय बेटी? तिला बोलाव."
"होय पिताजी.."
कजरीला पाहून दिलदारच्या दिलाचा एक ठोका चुकलेला.. तो परत व्यवस्थित सुरू झाल्यावर दिलदार म्हणाला,
"आपकी छोटी कन्या? बडी ही सुशील है.."
"हो ना. नादान आहे अजून. पण शिकेल हळूहळू .."
लीला नि पाठोपाठ कजरी येऊन समोर उभ्या ठाकल्या.
"कजरी बेटा, तू आत जा.." रसीलाबेन बोलल्या नि कजरी निर्विकार चेहऱ्याने नाइलाजाने आत जायला निघाली. घाईघाईत दिलदार म्हणाला,
"अरे नहीं नहीं. दोनोंको बैठने दीजिए. हमने कहा था ना, एक दूसरे के भाग जुडे हुए हैं इनके.. वैसे तो जुडवा बहनें नहीं हैं पर भगवान की लीला अगाध है!जुडवा बहनों जैसे जुडे भाग इनके. लाखोंमें एक!"
पोरींचे कौतुक ऐकून पुजारीबुवा हरखले.
"बस कजरी तू ही. हे झाशीचे पंडित.."
"झाशी नाही रसीलाबेन. काशी."
"जी हां. काशी. हमारे पिताजीसे सीखी हमने यह विद्या."
"तुमचे पिताजी म्हणजे?"
आता आली पंचाईत! ऐनवेळी नाव काय सांगावे? संतोकसिंग? ज्योतिषाचार्य संतोकसिंग? पटकन विचार करत दिलदार म्हणाला,
"पंडित गिरधारीलाल. बडे असामी हुवा करते थे."
"नाम सुना है. पंडित गिरधारीलाल. मोठा माणूस!ज्योतिर्भास्कर!" पुजारीबुवांनी त्या अज्ञात नि काल्पनिक मनुष्याला प्रशस्तीपत्र बहाल केले! मुलींचे लग्न ठरवायला एखादा वधूपिता काहीही नि कशावरही असे बोलू शकतो!
"हमारा क्या है, हम एक जगह ठहरते नहीं. जहां जरूरत हो वहां चले जाते हैं. सब देवी के आदेशसे. लीला बिटिया.. आ जाना सामने. हथेली दिखाना .."
आपल्या पोतडीतून एक भिंग काढून उगाच दिलदार तिचा हात वाचू लागला. उगाच चेहऱ्यावर गंभीर भाव आणत बघू लागला. लीला कजरीची बहीण शोभावी अशीच होती. तीच पहिल्यांदा दिसली असती तर? कजरीऐवजी तिच्या मागे? आपल्याच विचारांचा त्याला तिटकारा वाटला. कजरी सोडून अन्य कोणाचा विचार मनात आणणे म्हणजे पाप.. आजवर कधी पापपुण्याचा कधीच विचार न केलेल्या दिलदारला स्वतःवरच हसू आले.
"ठीक है. अब तुम उधर बैठ जाओ बेटा. गुरूजी क्या है, इन दोनोंका भविष्य एक दूसरेसे जुडा हुवा है. जरा आपकी छुटकीका भविष्य देखूं तो साथमें बताना आसान हो जाए.. लाखोंमें एक ऐसा होता है. बडे भाग्यशाली हैं आप की आपकी ऐसी बेटी है. आओ बेटी.. हमारे पास आओ."
कजरीला बेटी म्हणताना दिलदारला हसू फुटत होते नि कजरीला ही.
"यात हसण्यासारखे काय आहे कजरी? मोठया माणसांसमोर असे दात काढणे चांगले दिसते का? उद्या सासरी गेली की असे दात काढणारेस? तिकडे आमचा उद्धार व्हायचा. मावशीने काही शिकवले की नाही म्हणतील सासरचे लोक. वळण म्हणून काही नको का मुलीच्या जातीला." रसीलाबेन केवळ आईच बोलू शकेल अशा भाषेत बोलली.
"नहीं नहीं. रसीलाबेन यह तो बडी सुशील कन्या है.
आओ तो नजदीक इधर.. बेटा!" कोणाच्या नकळत दिलदारने डोळा मारला नि कजरी तोंडावर रूमाल ठेवून हसू दाबत समोर आली.
"ये कजरी बेटा. हे आचार्य लाल काशीवरून येतात. मोठे ज्योतिषी आहेत. पंडित आहेत. दाखव बेटा हात तुझा.."
सासऱ्यासमोर कजरीचा हात हाती घेऊन नि डोळ्यात डोळे घालून बसायचा तो क्षण आला.. जणू
हाच तो क्षण ज्याची दिलदार वाट पाहात होता.
"दिखाओ अपना हाथ. और अपना चेहराभी."
"चेहरा? तो तर समोरच आहे ना आचार्य? मी काय बुरखा घालून बसलेय की पडदा?"
"कजरी.. आचार्य लडकी थोडी नादान है.. आप बुरा मत मानिए."
"नहीं नहीं. कजरीकी यह बात भी सही है. होशियार है लडकी आपकी. देखूं तो हाथ. यह चंद्र .. गुरू.. शुक्र.. सूर्य .. जीवनरेखा और यह विवाह रेखा.. ऐसे ही रहने देना हाथ .. अब सामने देखना.."
पुढील दहा मिनिटे हातात हात नि डोळ्यांत डोळे घालून दोघे बसून राहिले. बाहेर कसला तरी आवाज झाला नि दिलदार एकाएकी भानावर आला.