२७.
पूर्वतयारी!
कजरीच्या घरी दिलदारचे आचार्य बनून जाणे थोडे दूरवर गेले, कारण पुजारीबुवाच आपल्या दूरच्या गावी काही दिवसांसाठी निघून गेले. आता त्यांची वाट पाहाणे आले..
नदीकिनारी कजरीला दिलदार सांगत होता,
"तुला सांगू, प्रियेची वाट पाहणारा प्रियकर असेल पण आपल्या सासऱ्याची आतुरतेने वाट पाहणारा मीच एक असणार जगात."
"का? म्हातारा आचार्य बनायची इतकी हौस आहे?"
"नाही. तुझा हात पकडून बसायची आहे.. तू अशी बसलीयेस नि मी हात पाहून भविष्य घडवतोय.."
"ज्योतिषीबुवा, भविष्य सांगतात .."
"असतील ही. आम्ही घडवतो .. तर मी भविष्य घडवेन.. मग तुझ्या डोळ्यांत डोळे घालून प्रत्यक्ष तुझ्याच घरी बसेन. सर्वांसमोर.. चेहरा वाचन करत! काय छान कल्पना आहे!"
"छान कल्पना आहे म्हणे.. हां.. तशी छानच आहे कल्पना .."
"तुला सांगू काल खूप दिवसांनी कविता सुचली.."
"तू आणि कविता?"
"अर्थात. मला सुचतात. कविता करणारा मी जगातील पहिला डाकू असणार .."
"कविता करणारा डाकू?"
"अर्थात. जगातील पहिला.. डाकू कवी.."
"डाकू की लडाकू? गुरूजी म्हणाले मला, प्रत्यक्ष बंदुकीने लढण्यापेक्षा ही लढाई कठीण आहे. परिस्थितीशी लढणे.."
"असं म्हणाले गुरूजी?"
"आणि असंही म्हणाले, तुला सांगू नकोस हे. नाहीतर चढून बसायचास हरभऱ्याच्या झाडावर.."
"असं का?"
"खरंच."
"ऐक ना माझी कविता .."
"ऐकावीच लागेल? तर ऐकते.."
"अर्थात ऐकावी लागेलच.. तुझ्यावरच केलीय ती.. आणि चांगली नसेल किंवा आवडली नाही तुला, तर दोष तुझा.. कारण तू जशी आहेस तशी ही कविता.."
"वा रे वा! बरं ऐकव.. आलिया भोगासी.."
"चूप. भोग आपले भोग. आणि ऐक आता.. मी एका भुंग्यासारखा.. पण त्यादिवशी तू पहिल्यांदा दिसलीस आणि.. एखाद्या कमळ फुलात भुंगा अलगद अडकावा तसा मी अडकलो .. ती हवीहवीशी कैद ..
पाहिले तुलाच मी
अन घडले ते काही
माझ्याच ह्रदयीचे
मज कळलेच नाही..
झंकारल्या तारा ह्रदयी
चिंब झाल्या भावना
सांग तू आवरू कसा
सांग ना माझ्या मना
गेलीस तू निमिषात ही
वळूनी मन मागे पाही..
होतीस उभी तू
उन्हात वाळवीत केस
टपटपत पडती थेंब ते
ओलांडूनी मनीची वेस
त्या थेंबांचा भार असा
सहन मज झालाच नाही..
आज ही दुनिया कशी
एका क्षणात बदलली
भ्रमरासम अचपळ वृत्ती
पुष्पात ती अडकली
सुटण्याची त्यातूनी
इच्छा मनी न बिलकुल ही..
कशी वाटली?"
"वा! भुंग्याची भुणभूण.. छान.."
"म्हणावेच लागेल .. छान. कारण आहेच ती.. छान. तुझ्यासारखी.."
"तुला इतकी सारी भाषा चांगली कशी येते रे? अगदी कविता करण्याइतकी?"
"अर्थात माझी आई. ती कविता करायची. स्वतःचीच गाणी स्वतः गायची. या जंगलात नसती ना तर खूप मोठी झाली असती. छान होती ती.. तुझ्यासारखी.."
"आज कौतुक जास्तच सुचतेय माझे."
"माझी चूक नाही, तूच आहेस तशी तर.."
"नक्कीच काहीतरी घोटाळा दिसतोय .."
"हे चांगलेय.. कौतुक केलं तरी त्यात घोटाळा शोधतेस तू.. आता आचार्य येतील घरी तेव्हा तुझे लग्न त्या गावच्या सावकाराबरोबर लावायला सांगतो.."
"क्काय?"
"हजारीमल सावकार. पैसेवाला आहे. ढेरपोट्या. त्याची एक बायको नुकतीच गेली. दुसरे लग्न करेलच लवकर. बनशील तू हजारीमलची कजारी शेठाणी.. तुझ्या घरी आचार्य सांगतील तसेच होणार .. तेव्हा आता मी सांगेन तसेच होणार.."
"वा रे! मी सांगेन तसेच होणार.. आचार्या, तुझी ती दाढी उपटून हातात नाही देणार मी?"
"अरे वा! म्हणजे बघ हा दिलदारच तुझा दिलवर.. म्हणजे तुला मी इतका आवडतो.."
"चुप रे.. आता मी रागावले तर बोलणारच नाही. मग बस नुसत्या कविता करत.."
"ठीकेय.. राहिले. पण तू बरी रोज नदीकाठी येतेस? घरातून येऊ देतात?"
"इतक्या दिवसांनी विचारतोयस?"
"मग काय डाकिया बनून हे प्रश्न विचारले असते? तितकी हुशारी दाखवावी लागते. मोहब्बत की राहोंमें चलना संभलके म्हणतात.."
"वा! मोठा हुशार तू! लीला आहे ना.. तिला मी नि मला ती.. एकमेकांना मदत करतो आम्ही.. तिला तिच्या त्याला भेटायला सकाळी जायचे असते. ती पण इथेच येते.."
"काय सांगतेस? पण एक गोष्ट कठीण आहे.. मैं तुझसे मिलने आई मंदिर जाने के बहाने असले गाणेही गाऊ शकत नाही.."
"का? गाऊ शकतो!"
"आता कुठेय हुशारी? मंदिरातच राहणाऱ्या तुम्ही .. मंदिर जाने का बहाना कोठून शोधणार?"
"ते ही खरेच रे.. मग आम्ही गातो.. मैं तुझसे मिलने आई नदीमें नहाने के बहाने.. आहे की नाही छान गाणे? पण इतके दिवस आलेच ना मी..?"
"ते तर खरंच. आपण ह्या खडकाचे नावच प्रेमाचा दगड ठेऊया.. मैलाचा दगड असतो तसा. प्रेमाचा दगड!"
"छान कल्पना .. दोन प्रेमकथा पाहणारा एक मोठा खडक.. प्रेमाचा दगड, प्रेम पत्थर!"
"गुरूजी आहेत म्हणून, नाहीतर तोच दगड तुझ्या घरच्यांनी माझ्या डोक्यात घातला असता.."
"आणि मग मी गाणं म्हटले असते .. लोगों न मारो इसे.. यह तो मेरा दिलदार है!"
"छान! तुला काही गाता यावे म्हणून माझ्या डोक्यात हा काला पत्थर?"
"काय हरकत आहे?"
दोन दिवसांत पुजारीबुवा परतले नि दिलदारच्या वेशांतराची वेळ आली. आधीचे सारे आठवणे गरजेचे. यावेळी काम अधिक जोखमीचे. एकावेळी लीला नि कजरी, दोघींच्या लग्नाचा बार उडवायचा, वर त्यातील एक नियोजित वर, भूतपूर्व दरोडेखोर अशी उपाधी असणारा.. तर तयारी तशीच जबरदस्त हवी. भैरवलालला परत पकडून आणावे? आता हे धोकादायक.. एकतर संतोकसिंगट टोळीने हे काम सोडलेले, आणि त्याहूनही महत्त्वाचे, हा भैरवलाल कुठूनही पुजारीबुवांच्या संपर्कात आला तर मुश्किल.
आणि एके दिवशी कजरीची खबर आलीच.. कजरीकडून.
"तुझा तो ज्योतिषी, भैरवलाल येणार आहे लवकरच घरी."
"काय बातमी आहे! काय म्हणतेस? कशासाठी?"
"ते नाही ठाऊक. घरी सगळ्यांचा जोतिषावर विश्वास खूप. आता हा भैरवलाल आला मध्ये तर कठीण आहे."
"आणि मी येणार तेव्हाच जर आला तो तर अजूनच कठीण आहे. तो तर या वेशांतरसकट ओळखेल मला. त्याला सारी अंडीपिल्ली ठाऊक.."
"अंडीपिल्ली? आमच्या घरात नाही चालणार मांसाहार.. आधीच सांगतेय.."
"आता कुठे गेली तुझी हुशारी? मांसाहार म्हणे!"
"ठीकेय.. पण तू अजूनपर्यंत आला का नाहीस? कसली वाट पाहतोस? आचार्य मुहूर्त काढून देणारेत?"
"मी तयारी करत होतो. एकाच मांडवात दोघींना उजवून टाकायला सासरेबुवांना तयार करायचे तर.. मेहनत तर लागणारच. पण आता मी उद्याच येतो.."
"ये, नाहीतर हा टोळभैरव कोणाच्या गळ्यात बांधून टाकेल मला ठाऊक नाही!"
"खरंय! माझे ठीक आहे. दुसरा कोणी असा धोका पत्करेल.. बिचारा!"
"असे काय? मी जातेच त्या हजारीमलकडे.."
"ऐक ना.. उद्याच आचार्य येणार. आणि मी समशेरला सांगतो भैरवलालला सांगायला, काही झाले तरी त्याने तुझ्या गावाकडे फिरकायचे नाही. डाकूगिरी सोडली तरी नुसता दम तर देता येतोच ना! नाहीतर हा भैरू पैलवान पुजारीबुवांना आमचे उपद्व्याप सांगत बसेल.. अगदी तिखट मीठ मसाला लावून आणि पुजारीबुवांना येईल संशय."
"त्यांना हा भैरव कशासाठी नि कुठे भेटला कोणास ठाऊक. पण गावच्या ज्योतिषापेक्षा काशीचे आचार्य मोठे. ते सांगतील तेच खरे! मी म्हणाले बाबांना की आपण आचार्यांनाच बोलावूया. त्यांचा अभ्यास मोठा नि अधिकार मोठा."
"खरेय ते!"
"खरेय काय? तर ते म्हणाले, त्यांचा काय ठाव ठिकाणा? देवीचा संदेश आला तरच येतील म्हणे. आता पोस्टमनला तर देवीचे थेट पत्रच येणार की नाही? तर दिलदार पोस्टमन, जास्त वेळ दवडू नका. देवीचा संदेश आलाय. उठा. जलदीने या आणि भैरवलाल येण्याच्या आत सारे काम संपवून टाका. आचार्य.. लवकरच आमच्या घरी यावे.."
"जो हुकूम राणी सरकार, नव्हे कजरी देवी .."
त्या दिवशी रात्री दिलदार आणि समशेर परत तयारीला लागले. भैरवलालला भेटायच्या निमित्ताने गुरुदासपुरात जायला मिळेल म्हणून समशेर खूश होता नि प्रत्यक्ष कजरीच्या घरी जायचे म्हणून दिलदार. काही चुका होऊ नये म्हणून मनातल्या मनात तो तालीम केल्यासारखे बोलू लागला. आता कजरी-दिलदारच्या लग्नाचे भवितव्य ज्योतिषी आचार्य दिलजार लाल काशी यांच्या हातात होते.. आणि कजरीचा हात हातात घेऊन ते आता भविष्य घडवणार होते. यशस्वी झाले तर दिलदारच्या प्रेमकथेला पूर्णत्व येणार होते..
अस्वस्थपणे दिलदार दुसऱ्या दिवशीची वाट पाहात झोपी गेला.