Dildar Kajari - 26 in Marathi Fiction Stories by Nitin More books and stories PDF | दिलदार कजरी - 26

Featured Books
Categories
Share

दिलदार कजरी - 26

२६.

एक पाऊल अजून पुढे!

शेवटी एकदाचे मास्तर भेटलेच. पहाटे पहाटे समशेर आणि दिलदार मास्तरांच्या घरी पोहोचले. गेल्या काही दिवसांत खूप काही घडून गेलेले. त्यानंतर मास्तरांची ही भेट..

"नमस्ते गुरूजी."

"अरे वा! या! काय नवीन बातमी? कजरीबेटीबद्दल असणार तर गोडच असणार. आणि तुझी भगवद् गीता.. पारायणे सुरू केलीस की नाही समशेर?"

"काय तुम्ही गुरूजी .."

"अरे लाजू नकोस. एका डाकूला लाजणे शोभत नाही समशेर .."

"डाकू? आमची शरणागती.."

"अरे ठाऊक आहे.. गंमत थोडीशी."

"आम्ही दोनवेळा येऊन गेलो गुरूजी."

"असणार. थोडा व्यस्त होतो."

"तुम्ही सरदारांशी बोललात गुरूजी .. त्यादिवशी आम्ही आलो तर.."

"अरे, एखादी डाकूंची टोळी शरण येणे काही साधी गोष्ट आहे? सगळीकडून प्रयत्न करावे लागतात. चारी बाजूने."

"पण गुरूजी बातम्यांमध्ये ते मंत्रीच सारे श्रेय घेऊन गेले .."

"जाऊ देत की. काम चांगले झाले हे महत्त्वाचे. आपले काम आहे काम करणे. त्यांचे श्रेय घेणे. पण याचे खरे श्रेय तुम्हा दोघांना आणि कजरीला."

"आम्हाला?"

"अर्थात. हा दिलदार कजरीच्या मागे लागला नसता तर या समशेरने माझे अपहरण केले असते? नि मला तुम्ही भेटला नसतात तर पुढच्या गोष्टी झाल्या असत्या? गोष्टी घडायच्या असतील तर अशा घडत जातात.."

"पण गुरूजी तुम्ही नसता तर.."

"मी निमित्तमात्र. अरे, निवडणुकांसारखी दुसरी चांगली गोष्ट नाही .. म्हणजे संतोकसिंगला आधी डाकूगिरीची धुंदी होती, ती धुंदी आता निवडून येण्यात दिसायला लागली. आपण नेमकी संधी पाहून घाव घातला की काम फत्ते.. राजकारण ह्यालाच म्हणतात. राजकारण वाईट नाही, पण लोक स्वतःच्या फायद्यासाठी वापरतात ते वाईट. पण वाईटातून चांगले निघते ते असे.. तर दिलदार .. पेढे कधी लग्नाचे?"

"काय गुरूजी तुम्ही .."

"लाजतोयस? तुम्हा डाकू लोकांत लाजण्याची साथ आलीय की काय?"

"गुरूजी, तिच्या घरी कोण मानणार? मी हा असा.. न शिकलेला. काम नाही .."

"दिलदार, तू काळजी करू नकोस. फक्त तुला राजस्थानात जावे लागेल.. तिकडे माझे छोटे घर नि थोडी जमीन आहे.. कजरीबेटीला घेऊन जा. मेहनत कर.. कष्ट केलेस तर कमाई दूर नाही. बाकी मार्ग दाखवायला मी आहेच.."

"पण गुरूजी तुमचे घर.. राजस्थानात?"

"ते सारे नंतर सांगेन बेटा.. पण समज तुला ती माझ्याकडून लग्नाची भेट आहे. खरेतर तुझे बक्षिसच म्हणायला हवे ह्या सगळ्यासाठी. पण तू म्हणशील कजरीच तुझे बक्षिस.. तेव्हा दुसरे काही बक्षिस नको.."

"गुरूजी तुम्ही पण.."

"पण आता कजरीच्या घरी.. तुमच्यात काय म्हणतात ती फिल्डिंग लावावी लागेल तुला .. आधी कजरीसाठी लावली तशी काहीतरी."

"फिल्डिंग? काय तुम्ही गुरूजी.."

"खोटेय की काय? तुम्ही हेच म्हणता ना? आता त्याबद्दल विचार कर. तू समशेर आपली उपसलेली समशेर टाकून गीतापठणाचा विचार कर. सदा सर्वदा तोच विचार केलास की मार्ग सापडेलच. दिलदार इथवर पोहोचेल असा कोणी विचार केला असेल?"

"तुम्ही सांगाल तसे गुरूजी."

"आणि मधून मधून लाजायला हरकत नाही. डाकू लोकं लाजताना जास्तच सुंदर दिसतात .."

"काय तुम्ही गुरूजी. आमची टांग खेचता.."

"ठीक आहे राहिले. आता निघा .. तुम्हाला आपापलींना भेटायचे असेल. रस्ता दूरचा आहे. दिलदार आधी पोस्टमन होता तेव्हा ठीक होते.. आता तो डाकिया नाही नि डाकूही नाही, नाही का?"

"गुरूजी तुम्ही पण ना .. पण गुरूजी, सरदार माझ्यावर रागावले असणार का? हल्ली दोन तीनदा येऊन गेले, माझ्याकडे पाहिले पण नाही, बोलण्याची तर बात दूरची.."

"असेल ही कदाचित तसे दिलदार. पण या सगळ्यात सगळ्यांचेच भले होतेय हे ध्यानी घे. गावातील सारे, तू, कजरी, हा समशेर, सगळे टोळीतील डाकू नि खुद्द संतोकसिंग .. सगळ्यांचा फायदा आहे यात."

"खरे आहे गुरूजी .."

दोघे निघाले. आता पुढे काय? कजरीच्या घरचा किल्ला सर करणे महा कठीण काम. एका सन्मार्गी डाकूला मुलगी द्यायला देवभक्त पुजारीबुवा तयार होतील? संध्याकाळी कजरीला तसे म्हणाला दिलदार, तशी आपल्या शेपट्याशी खेळत ती म्हणाली,

"माझ्याकडे एक चांगली कल्पना आहे.."

"सांग."

"तू ओळखतोस त्यांना, त्यांची मदत घेऊ. म्हणजे ते पोस्टमन काका ओळखायचे त्यांना .."

"कोणाला?"

"ओळख कोणाबद्दल बोलत असेन?"

"काहीतरीच. पोस्टमनला जे ठाऊक ते या दिलदारला कसे ठाऊक. बिचारा तो पोस्टमन कधीच मृत झाला. गेला बिचारा .."

"हो ना. तसा चांगला होता.."

"पुनर्जन्म झाला त्याचा. पूर्वजन्मीच्या गोष्टी या जन्मी नाही आठवत.."

"पण आचार्य लाल यांची मदत घे.. आता आचार्य कोण हे विचार .."

"कोण आचार्य..? शहाणीच आहेस. तुला हे ही माहिती होते? काय भयंकर आहेस तू? अजून काय काय ठाऊक आहे तुला?"

"तुला काय वाटले? तू इतरांना फसवू शकशील.. पण मला? आणि मालती कोण? कळले ना की नाही? गावातल्या कजरीचं लग्न ठरलं तर एका माणसाचा चेहरा त्या दाढीच्या आत बघण्यासारखा झाला होता.. मावशीचा हात पहायचा होता तुला.."

"कोण म्हणाले? तुझा पहायचा होता. मला काय वाटलं होते सांगू?"

"काय वाटणार? पण मला गुरूजींनी फक्त डाकू आणि डाकिया बद्दल सांगितलेले, या आचार्यांबद्दल नाही. ते मीच समजले आपोआप.."

"तशी तू आहेसच हुशार. अतिहुशार खरेतर. अगं, मला वाटले की तुला घरच्यांनी घरात कोंडून ठेवले की काय ते पत्र हाती लागल्यावर. तुला शोधायला आलेलो.."

"आणि मावशी आणि बाबा कसला पत्ताच लागू देत नव्हते .. खूप मजा आली."

"मजा कसली.. मला घाम सुटलेला.."

"आता परत सुटेल.. आचार्य लाल .. पूर्ण नाव आठवतेय ना? नाहीतर नवीन काहीतरी सांगशील.."

"म्हणजे?"

"म्हणजे? तू परत एकदा ये. देवीचा आदेश म्हणून .."

"आणि काय करू?"

"ते मी सांगू? मागच्या वेळी स्वतः ठरवलेस ना.."

"तेव्हाची गोष्ट वेगळी. आता वेगळी.."

"एक लक्षात ठेव. लीला.. आता लीला कोण विचारू नकोस. तुला ठाऊक आहे.."

"तिचं काय?"

"तिला मदत कर.."

"मी?"

"अर्थात आचार्य.."

"कशी काय?"

"एका दगडात दोन पक्षी .. एका गोळीत दोन पक्षी.."

"बाप रे! डाकू दिलदार बंदूक घेऊन येणार की काय?"

"ऐक.. लीलाला गावातील एक मुलगा आवडतो. तिचे आणि माझे एकाच वेळी लग्न लावणे शुभ .. हेच तुला सांगायचे आहे.."

"तुझे? कोणाशी?"

"कोणाशी? त्या पांढऱ्या दाढीवाल्या आचार्याशी. तुला कशाला उचापती नसत्या?"

"पण यात माझे काय?"

"ते तू ठरव. घरी कोणाला कसे पटवायचे ते हस्तसामुद्रिक आचार्यच ठरवतील.."

"कठीण काम आहे.. पण तू लपून बसू नकोस. सासऱ्यासमोर तुझा हात हातात घेऊन बसण्याची गंमतच वेगळी .."

"मग कधी येतोस? नाही, कधी येता आचार्य?"

"लवकरच."

"हिंमतलालला जाऊन धन्यवाद देऊन यायला हवेत.."

"म्हणजे? तुला हिंमतलालची गोष्ट ही ठाऊक आहे?"

"अर्थात. त वरून ताकभात कळायला हवे.. तितकी हुशार आहे मी.."

"तितकी? जरा जास्तच हुशार आहेस.."

"जरा त्या लीलाच्या लीला कोणाबरोबर नि त्या मनुष्य प्राण्याचे गुणवर्णन केले तर चांगले होईल. म्हणजे त्या हिशेबाने आचार्य बोलतील.."

"सांगेन आचार्य. आधी लीलाकडून लीलया माहिती मिळवेन मग सांगेन."

"तशी तिने माझी माहिती काढली असेल की नाही?"

"अर्थात."

"मग तू काय केलेस वर्णन. अर्थात तुला शब्द अपुरे पडले असतील .."

"हो ना.. सांगितले तिला.. जगातील सर्वात बावळट आणि बुद्धू कोणी असेल .. तर तो तू.."

"आणि माझा उद्धार करणारी तू? तू तर शंभरपटीने जास्तच बावळटी असायला हवी!"

दिलदार परतला तो नवी उमेद घेऊन. त्याचे स्वप्न साकार होण्याची लक्षणे दिसत होती. एक एक गोष्ट पुढे सरकत होती. एका कजरीपायी इतके सारे घडले.. ती चांगली म्हणून सारे चांगलेच घडले आणि घडणार.. आता पुढील चाल.. आचार्य बनून परत जाणे. मागच्या वेळेचा तपशील नीट आठवणे गरजेचे. त्यात गफलत होऊन चालायचे नाही. सासरेबुवांकडे दूध नि केळी खावी लागतील.. काही हरकत नाही. कजरी संपादन कार्यात एवढे तर करावेच लागेल..

समशेरला सांगून परत वेशांतर करणे आले..

"समशेर, यार.. दिलकी पुकार.."

दिलदारच्या हाकेने समशेर दचकलाच.. कारण तो गीतास्मरण करत मास्तरांच्या आदेशाचे पालन करत होता! त्यात व्यत्यय आणला कुणी तर तो दचकणे स्वाभाविकच होते!