२२.
कजरीशी संवाद
रात्री समशेर आणि दिलदार दोघेही बसलेले. दोघेही आपापल्या विचारात. मास्तरांनी सांगितलेले समशेरला ही पटत होते, पण आपल्या रासवट आणि दांडगाईला चटावलेल्या सगळ्या डाकूगणांना शरणागतीची कल्पना एकाएकी सांगणे कठीण. एकतर त्यांना ते कळणार नाही. दुसरे, त्यातून काही जण तरी तडक सरदार संतोकसिंगास जाऊन खबर देतील. त्यानंतर तर हे सगळे अशक्य होईल. तरीही शरणागतीची कल्पना समशेरला आवडली. म्हणजे गुरुदासपूरच्या गीता बरोबर धागा जुळवता येईल, हा त्यातला मोठा फायदा. दिलदारच्या प्रेमकथेत नि प्रेमप्रकरणात त्याला हल्ली जास्त गंमत वाटू लागलेली. जिच्यासाठी जीव ओवाळून सारे काही पाठी सोडायला तयार व्हावे अशी कोणी मिळाली तर तिची ओढ आणि त्यासाठी करावी लागणाऱ्या धडपडीतील गोडी त्याला जास्त खुणावू लागलेली. ह्या डोंगरदऱ्यातील आयुष्याहून वेगळे आयुष्य काय नि कसे हे एकदा सगळ्या टोळीबहाद्दरांना दाखवले तर कदाचित त्यांना समजावून सांगणे जमेल. पण हे सारे होणार कसे?
"समशेरा, आता काय करूयात रे?"
"काय करणार? एक कल्पना सुचलीय. त्या हिंमतलालला परत पळवून आणूया. मग भजनी मंडळी बनून तुझ्या कजरीभाभीच्या, नाही माझ्या कजरीभाभीच्या देवळात भजन करूयात.. नाहीतरी नवीन काहीतरी करायचेच आहे काम. थेट डाकूगिरीतून देवीच्या पायावर."
"चांगली आहे कल्पना. पण तुझ्या बेडकासारख्या भसाड्या आवाजातील भजने ऐकून निर्जीव मूर्ती ही कान बंद करून घेईल. एक मीच आहे जो तुझा आवाज सहन करतो. भजनाला आवाज कसा हवा?"
"कसा?"
"तुझ्या भाभीसारखा. गोड नि मंजूळ. बांगड्या किणकिणाव्यात तसे शब्द किणकिणतात कानात, किंवा पायातील पैंजणांचा नाद यावा तसा आवाज तिचा. ती बोलते तेव्हा कोकिळा गाते नि पक्षी कूजन करतात असे वाटते. पाऊस पडल्यावर पागोळ्या कशा छतावरून अलगद खाली येतात तसे शब्द तिच्या कंठातून येतात. त्या एकेक शब्दाचा नाद कानात साठून राहतो. असा आवाज हवा. नाहीतर तू. सर्दी झालेल्या डुकरासारखा आवाज तुझा. फारतर घोडा चारा चरून ढेकर देतोय असे वाटेल.."
"वा! अगदी भाषा वर्गात प्रगती झालीय. शब्द जिभेवर नाचताहेत अगदी. पण या शब्दांखेरीज दुसरे काही विचार? तसा विचार करायचा तो बाकी सगळ्यांनाच, पण हल्ली तू फक्त भाभीचाच विचार करतोस. बाकी सारे माझ्यावर सोपवलेस.."
"माझा विश्वास बसत नाही रे, कजरी मला हो म्हणाली यावर. अजूनही ते स्वप्न आहे असेच वाटते. पण तिने दोनदा चिमटा काढला.. एकदा स्वप्नात, एकदा संध्याकाळी खरोखरी. ह्या इथे.."
"काय या इथे?"
"अरे ह्या हातावर. इथे चिमटा काढला. मृदू मुलायम हात तिचे. नाजूक बोटे. असा गोड चिमटा काढलाय सांगू. वाटतं तिने चिमटे काढत रहावे.. गोड चिमटे.. आयुष्यभर.. चिमटाराणी!"
"चिमटाराणी! आता तुझे ते हवेत उंच उडणारे उडाणटप्पू विमान खाली उतरव. त्यातून खाली उतर आणि जमिनीवर पाय ठेवून खरोखरीची परिस्थिती काय आहे आजूबाजूस हे जाणून घे. नाहीतर त्या धुंदीतून डोळे उघडतील तेव्हा कळेल की कजरीभाभी तयार आहे पण तिच्या पुजारी बापास दाखवावे असे आपल्या हाती काहीच नाही. तेव्हा काहीतरी हातपाय हलवावे लागतील. हलवावेच लागतील. मला वाटते आपण गुरूजींना भेटूयात. तेच काहीतरी मार्ग दाखवतील."
"ते खरेच.. जाऊयात.. लवकरच. पण सगळे शरण आले तरी पुढे काय? पोटापाण्याचे काय? आणि सरदारांना खबर पडली तर खैर नाही .."
"गुरूजीच सांगतील.. गुरूबिन कौन बतावे वाट.. आणि वाट दिसली नाही तर वाट पाहून पाहून आपली वाट लागेल.."
संध्याकाळी कजरी भेटली. आता चिठ्ठीतला संवाद प्रत्यक्ष होणार. चार शब्दांहून जास्त. प्रेमाची वाक्ये मनातल्या मनात जमत व्यवस्थित पण तोंडातून बाहेर येतील तर. त्यात आता पुढे काय हा प्रश्न ..
"आता पुढे काय करणार तू दिलदार?"
"काही नाही. हरिनामपुरात नाही जात.. रामगढलाच जाणार."
"त्यात नवीन काय? नेहमीप्रमाणे. हरिनामपुरात तिकडून रस्ता जातो काय..? तुला वाटले मला माहितीच नाही? पण काही म्हण खोटं बोलताना तू मस्त दिसतोस.. पण त्या दिवशी गुरूजी काय म्हणाले?"
"काय म्हणणार. म्हणाले नवीन आयुष्य सुरू कर.. आणि सगळ्यांनी शरण जाऊन टोळीच संपवून टाकावी .."
"तेवढयाने होईल? माझ्या घरी..?"
"कजरी.. काहीतरी मार्ग निघेल.. पण आज रात्री वाड्याच्या माडीवरून बघ.. हात करेन तुला .."
"म्हणजे?"
"गुरूजींना भेटायला जातोय. बघशील तू."
"पण हरिनामपुराचा रस्ता.. इकडून नाही.. तो जवळचा रस्ता तिकडून जातो ना? नाही म्हणजे माझ्या ओळखीचा एक पोस्टमन सांगत होता.."
"हो? मला नाही तो ठाऊक.."
"कोण पोस्टमन?"
"दोन्ही. रस्ता नि डाकिया.. दोन्ही .. तर रात्री हात करेन.. मागच्या वेळी तू घोड्यावरून जाताना पाहिले होतेस ना?"
"अर्थात. तुला पाहिलेले.. आणि बरोबर असणार तो समशेर. रात्री घोड्याच्या टापा.. परत येताना मात्र दिसला नव्हतास.. मी वाट पाहात बसले होते."
"मग तू थेट मी परत आलो तेव्हा पाहिलेस. एक दूरचा ओबडधोबड रस्ता आहे. तू पाहशील आम्हाला येताना म्हणून तिकडून आलो आम्ही.."
"आणि चिठ्ठी आणायला विसरलो.. किती खोटे बोलशील.."
"तू कमी खोटारडी आहेस?"
"मी कसला खोटारडेपणा केला?"
"सारे माहिती असून नसल्याचा.. गंमत पाहात बसलीस.."
"शहाणाच आहेस.. दीड शहाणा. पण मी रोज आमच्या माडीवरून वाट पाहात बसते. मावशी म्हणते त्या झरोक्यात काय आहे गं तुझे.."
"मग तू काय सांगतेस?"
"काय आहे नाही, कोण आहे विचार असे सांगते मावशीला.."
"तुला गंमत सांगू. तुझ्या मावशीच्या मुलीचे लग्न लागले ना तेव्हा मला वाटले तुझेच लग्न होतेय की काय. कसला घाबरलो होतो.."
"तू होतास तेव्हा?"
"अर्थात. मंदिराबाहेर घुटमळत होतो. शेवटी तू दिसलीस ना तेव्हा कुठे जीव भांड्यात पडला.."
"आणि मीच असते नवरी तर?"
"उचलून नेले असते? नाही.."
"पण दिलदार तुझी भाषा इतकी शुद्ध देशी तुपासारखी साजूक कशी?"
"गुरूजींनी नाही सांगितले? माझी आई.. ती शिक्षिका होती. बिचारीला पळवून आणले गेले. ती शिकवायची मला. तिने लिहायला पण शिकवलेले चोरून लपून .."
"चोरून लपून?"
"डाकूंच्या टोळीत पाटी पेन्सिल घेऊन बसणे म्हणजे मुलगा बिघडला असे मानले जाते. आई शिकवायची. बोलायला सगळी भाषा शिकलो. आई कविता करुन म्हणायची. त्या ही शिकलो. लिहायला वाचायला शिकलो पण सराव अजिबात नव्हता म्हणून पूर्ण विसरलो.. मग गुरूजींकडून शिकावे लागले. त्या निमित्ताने गुरूजी भेटले.."
"आता यातून काहीतरी मार्ग निघेल ना दिलदार .."
"निघेल. कजरीराणी निघेल. नाहीतर मी तुला खरोखर भेटेन नि तू मला खरोखर हो म्हणशील याची कधीतरी कल्पना होती का मला? फक्त मोठी नदी दिसली की ओलांडण्यासाठी तिच्यावर पूल मोठा बांधावा लागेल इतकेच.."
"म्हणजे मी कोण? छोटी नदी की नाला?
"तू? नदी नाही नि नाला नाही. तू प्रेमाचा सागर.. नदी नाही तर समुद्र आहेस तू.. पण आपल्या अडचणींची नदी मात्र भली थोरली असणार आहे.."
"हुं. नदी! ही चंबळ नदी समोर आहे साक्षात."
"कजरी दिलदार की प्रेमकहानी.. साक्षात चंबळच्या साक्षीने चंबळच्या खोऱ्यात .. मला अगदी उचंबळून आलेय कजरी.."
रात्री समशेर आणि दिलदार गुरूजींना भेटायला निघाले. वाड्याच्या जवळ आल्यावर काही निमित्त काढून दिलदार थबकला. अंधारात कजरी दिसत नसली तरी वर हात केला..
"या अंधारात तू व्यायाम करतोस का रे?"
"नाही, थोडा लगाम पकडून हात आखडला.."
कजरीने अंधारातच दिलदारला पाहिले. लाजत ती खुदकन हसली. दिसत दोघेही एकमेकांना नव्हते पण बघून हसत मात्र होते! अंधारात दोघांचा एकमेकांना न बघता नि न बोलता संवाद घडला.
थोडे पुढे गेल्यावर समशेरच्या लक्षात आले..
"कजरीभाभीच्या वाड्यापुढे होतास तू थांबलेला.. हात आखडला म्हणे.. सरळ सांगायचे ना.."
"हुं. गुरुदासपुरात तू किती चकरा मारतोस ते सरळ सांगतोस का? मला सारे दिसतेय .."
"तुझे काहीतरीच.."
"तुला सांगू समशेर हे प्रेम ना असला चोरटेपणा शिकवते. खुदा हुस्न देता है तो नजाकत आ ही जाती है.. म्हणतात ना, तसे प्यार होता है तो चोरटेपणा आ ही जाता है.. आपोआप.. काय म्हणते गीताभाभी?"
"तू तिची आठवण नकोस करून देऊ.. दिलदार.. तेरा हुआ अब मेरा क्या होगा? कोणास ठाऊक.."