Swash Aseparyat - 17 in Marathi Fiction Stories by Suraj Kamble books and stories PDF | श्वास असेपर्यंत - भाग १७

Featured Books
Categories
Share

श्वास असेपर्यंत - भाग १७



" अगदी खरं आहे लक्ष्मी तुझं. एखाद्याच्या आवडी-निवडी जपणं. त्याच्या किंवा तिच्या मनासारखं वागणं किंवा ती सांगते तसंच राहणं, तिच्या आठवणीत जगणं, ती दिसताच चेहऱ्यावर हास्य उमटणं, ती नाही दिसली की मन कासावीस होऊन जाणं, कदाचित यालाच प्रेम म्हणत असावं आणि हे सर्व माझ्या बाबतीत होत असायचं. आपण तर कित्येक वर्ष झाले एवढे चांगले मित्र आहोत , मग या मैत्रीमध्ये प्रेम होणे स्वाभाविक आहे . त्यात तुझा माझा काही एक दोष नाही. "

" मलाही तू आवडतं . माझं ही प्रेम तुझ्यावर आहे. तू कदाचित माझ्यापेक्षा जास्त करत असणार पण माझं ही प्रेम काही कमी नाही. पण मी हेच सांगायला तुला घाबरत असायचो. मी प्रेमाचा प्रस्ताव सांगावा आणि तू मैत्रीचा गैरफायदा घेतला म्हणून आपली मैत्री कायम गमावून बसायचो. म्हणून मी तुला कधी मनातलं बोलून दाखवलं नाही. वरून एक चिंता, काळजी, भीती सतत वाटतं असायची.

" कसली चिंता, कसली काळजी रे अमर !!!"
मला तरी सांग . भुवया उंच करत लक्ष्मी म्हणाली.

" एवढं महत्त्वाचं नाही ग ते . पण नेहमी मनातल्या मनात वाटायचे कि , तू फुलांसारखी वाढलेली, तुझ्या घरच्यांनी तुला फुलासारखं वाढवलं आणि मी सतत परिस्थितीने अर्धवट कापलेल्या थोडा जीव राहतो तसा, तू वाड्यात राहणारी आणि माझ्या घराला साधी चांगली भिंतही नाही . तुझ्या वडिलांकडे जमिनचं -जमीन, माझ्याकडे असणारा तो दोन एकर चा तुकड तो कर्जाने आमचा म्हणून शिल्लक राहिलेला नाही. तू गावच्या पाटलांची पोरं आणि मी रोजंदारीत काम करणाऱ्या, गुलामासारखं मान खाली जगणाऱ्या समाजाचा , त्यामुळे आपलं काही जमणार नाही, म्हणून मी ही प्रेमाची गोष्ट आजपर्यंत लपवून ठेवली. या गोष्टीचा उल्लेख आनंद सोबत पण मी बऱ्याचदा केलेला आहे. पण आज तू तुझ्या मनातलं बोलून गेलीस , शेवटी मला नाईलाजाने सर्व खरं सांगावं लागलं. "

" बरं केलं तू सांगून. आता कसं एकदम हृदयावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं आहे. इतके वर्षे ते आतल्या आत दाबून राहत असायचं.. भावनाही आतल्या आत दाबून ठेवाव्या लागत होत्या. "
मी बोलत होतो लक्ष्मी नुसतीचं ऐकत होती. म्हणून मी सुरुवातीलाचं तुझं अभिनंदन केलं की , " तू लग्न करायला निघाली आहे. कारण आपला काही मिलन होणार नाही. .."

" एवढा कठोर कसा असू शकतो रे तू !!! तुला खरंच काही वाटतं नाही का माझ्या लग्नाचं ऐकून ??? आणि आपलं मिलन न व्हायला काय झालं!!! शक्य केल्यास सर्व होऊन जातं. तुझी तयारी असेल तर मी माझ्या बाबांना सांगते . ते मान्य तर होणार नाही, म्हणून आपण आंतरजातीय विवाह करायचा किंव्हा पळून जाऊन लग्न करायचं. करतील काही एक वर्षे विरोध!! शेवटी मुलगी या नात्याने करतील ते स्वीकार माझा आणि शेवटी तुझाही!!!"

" लक्ष्मी हे एवढं सहज शक्य आहे असं तुला वाटतं का???? आणि काय म्हणून मला तुझ्या घरचे द्यायला तयार होतील??? ना माझ्याकडे जमीन ना , जुमला ना , राहायला घर , दोन वेळेस खायचे प्रश्न आमचे असतात, तुला असचं म्हणून देणार का???? आणि राहीला पळून जाण्याचा प्रश्न , तर तो पर्याय निवडावा हे मला रुचणार नाही , त्यापेक्षा तुला जे स्थळ येईल ते माझ्यापेक्षा कितीतरी चांगले राहील, तू त्यांच्याशी लग्न कर आणि घरच्यांचा सुद्धा सहभाग असेल त्यात ."
मी डोळ्यांत भावना ओतून बोलत होतो.

" बरोबर आहे तुझं अमर . तुझ्यापेक्षा पैशाने, घरदाराने, जमीन-जुमला ने, तुझ्यापेक्षा तर नक्कीच मोठं असणार . पण त्यात तू नसणार !!! त्याचं काय ???? आणि मला तू हवा आहेस !!! आत्ता पुरताचं नाही तर शेवटच्या श्वासापर्यंत, अखरेचा श्वास असेपर्यंत तू हवा आहे!!!. तू कोणत्याही परिस्थितीत असला तरी, मी स्वतःला त्या स्थितीत सामावून घेईल. पण तू असं दुसऱ्याशी लग्न करून खुश रहा हे तरी निदान म्हणू नको ." लक्ष्मी डोळ्यांत पाणी आणून बोलू लागली.

" आणि राहिला प्रश्न जातीचा उच्चनीचतेचा तर आपण सुशिक्षित आहोत , त्याचा आपल्या भविष्यावर परिणाम व्हायला नको .आणि स्पेशली तुला तरी फरक पडायला नको. "

ठीक आहे बुवा . तू म्हणतेस ते अगदी योग्य आहे . तुझ्यासमकर कधी कोण जिंकला आहे, तर मी आज जिंकणार आहे. बघू समोर काय होते तर ???? काय नशिबात लिहून ठेवला आहे तर??? असं म्हणत आमच्या बसण्या मधील अंतर कधी कमी झाले आम्हांला ही कळले नाही .

आज लक्ष्मी चा हात पहिल्यांदा हातात घेतला होता. तेंव्हाचा तो स्पर्श अजूनही तसाच आठवतो आहे. जणू तो हात म्हणजे मखमली ,मऊशार चादर चं होती की काय??? त्यात तो माझा कठोर ,कडक असलेला हात तिच्या हातांमध्ये होता. जणू त्या कोमल हाताला चुरगाळून टाकतो की काय असंच वाटत होतं. किती तरी वेळ तो हात तसाचं हातात घेऊन आम्ही बसून राहिलो. एकमेकांना सोडून जावंसं वाटत नव्हतं. आज आम्ही खऱ्या अर्थाने मैत्रीतून बाहेर पडून प्रेमाच्या एका नवीन नात्यांमध्ये गुंतलो होतो. भविष्यात काय होईल याची चिंता बाजूला सारून लक्ष्मी चा हातात हात घेऊन मी भविष्याची स्वप्ने रंगवत होतो.

हातात हात तुझा ,
वाटे नेहमीचं हवा हवा,
सोडून सारे रुढीचे बंध आज,
उडतो आहे इथे भावनेचा थवा,
निभावीत राहीन वचन तुझे ,
शेवटचा श्वास असेपर्यंत,
शेवटापर्यंत साथ देण्याचे,
मैत्रीच्या नात्यातूनचं जुळून आले हे,
बंध रेशमाचे...........


शेवटी दोघांनीही एकमेकांची डोळ्यांत प्रेमाचे आनंदी अश्रू, ह्रदयात प्रेमाची गोड आठवण ठेवून नजरेला नजर संमेपर्यंत रजा घेतली..दोघांच्या ही मनात विविध प्रश्नांची उकल तर झालीचं होती, पण पुढे काय होईल???याची दोघांनाही चिंता लागली होती...

क्रमशः ......