'शाहीर'!
भाग- तीन
क्रमशः....
"...मिरजतलं नाटक झालं आन् गावोगावच्या कार्यक्रमासाठी सुपाऱ्यांचा ओघ सुरू झाला.
गणेश चतुर्थीनिमित्त मिरजेत कार्यक्रम झाला आन् पुढच्याच महिन्यात दसऱ्याला घरणिकीच्या कार्यक्रमाची सुपारी आली. दसऱ्याला घरणिकीला रात्री कार्यक्रम झाला आणि दुसरी दिवशी सकाळी तिथंच त्या गावच्या लोकांनी जमून ठरवलं, की प्रत्येक वर्षी दोन खेळ करायचे. यात्रंला आणि दसऱ्याला, असे पुढच्या सलग दहा वर्षांसाठी करार करायचा आणि तो करार केला सुद्धा.
आमच्या मनात सुरवातीला धाकधूक होती, की आमचं बेभरवशाचं कलापथक; दहा वर्षांसाठी करार कसा करावा! पण जे व्हायचं हाय ते होऊदे, असं ठरवलं आणि काम करत राहिलो. प्रत्येक वेळी बबन नवीन नाटक लिहायचा. वर्षाला नवीन दोन नाटकं लिहायची. ती बसवायची. तालमी करायच्या. कलेची चटक गप्प बसून देत नव्हती, त्यामुळंच ही नाटकाची तारेवरची कसरत सलग दहा वर्षे आम्ही करत राहिलो.
घरणिकीला प्रत्येक वर्षी यात्रंला आणि दसऱ्याला असे सलग दहा वर्षे कार्यक्रम करत होतोच, पण त्या दरम्यान, आसपासच्या गावातल्या लोकांना तर आमच्या कलापथकाची चटकच लागली होती.
एके वर्षी काय झालं, अगोदरच ठरल्याप्रमाणं यात्रेनिमित्त घरणिकीला रात्रीचा कार्यक्रम झाला. लांब पल्ल्याच्या गावाला गेल्यावर रात्रीचा कार्यक्रम झाल्याझाल्या पडदा सोडवून ठेवायचा, लाईटचं सामान, बाकीच्या सगळ्या वस्तूंची आवराआवर करून ठेवायची आन् सकाळ होईपर्यंत तिथंच कुठंतरी आडवं व्हायचं आन् सकाळ झाली, की लवकरच घरी परत फिरायचं, असं आमचं नियोजन असायचं.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच आटपाडी तालुक्यातल्या झऱ्याची (झरे) चार सहा लोकं येऊन आमच्या जवळ येऊन बसली. 'आमच्या गावात आज रात्रीचा कार्यक्रम तुमचाच झाला पाहिजे' म्हणून अडून बसले.
आता काय करायचं! आता झाली का पंचाईत..
एकतर सकाळची आंघोळ झाली नव्हती, आदल्या दिवशी कार्यक्रमासाठी धुतल्याली, इस्त्री केल्याली चांगली कापडं घालून आलो होतो आन् त्या कपड्यावरच सकाळपर्यंत लोळलो होतो. त्यामुळं सगळ्यांचीच कापडं न्हाय म्हंटलं तरी थोडी मळल्यालीच. नाटकाच्या पात्रासाठी जी कापडं होती, ती नाटकापुरती वापरता येत्याली, पण बाकीच्या टायमाला आपल्या आंगच्या कापडावरच वावरावं लागणार.
मळक्या कापडावर कार्यक्रम करायचा तरी कसा!
लोकं आपल्याला न्हाय, तर आपली कला बघून आपल्याला न्यायला आलेत आन् आपल्यात कला हाय म्हणून लोकं इतक्या लांबून आपल्याला त्यांच्या गावात येण्याचं निमंत्रण देत्यात, न्हाय तर आपल्याला विचारायला कशाला आले असते!
आन् येत नाय म्हणून सांगितले, तर तो त्यांचा नाही, तर आपल्या कलेचा अपमान होईल, माणसाच्या अंगात कला भिनली, की त्याला बाकी काही दिसत न्हाय आन् सुचतबी न्हाय. तो कला नेईल तिकडे तो आपोआपच व्हात राहतो. मग आमचा अंगावरच्या मळक्या कपड्यावर तसाच पुढचा झऱ्याकडचा प्रवास सुरु झाला.
दुसऱ्या दिवशी झऱ्याचा कार्यक्रम झाला, तिसऱ्या दिवशी लगेच आटपाडीत आणि चौथ्या दिवशी खानापूरला, असा सलग चार दिवस आमच्या कार्यक्रमाचा सपाटा सुरू होता. सुपारी घेऊन आलेल्या लोकांना असा सलग कार्यक्रम करायला नाही म्हंटलं, तरी लोकं आयकायची न्हायती. आमच्या नाटकासाठी लोकं अक्षरशः वेडी झाली होती.
आम्ही न्हाय म्हंटल्यावर, लोकं काय करणार हायती!.. पण काय काय लोकं, 'आमच्या गावात तुमचा कार्यक्रम झालाच पाहिजे, न्हाय तर तुमचं कलापथकाचं सामान आमच्या ताब्यात घेऊ आणि ते सामान आमच्या गावात कार्यक्रम झाल्यानंतरच तुमच्या ताब्यात देऊ.' असा दम द्यायची. त्यात त्या लोकांची नाटकासाठीची ओढ, तळमळ दिसायची, मग पर्यायच उरायचा न्हाय. जावंच लागायचं.
हा सगळा प्रवास बैलगाडीनं होता. ज्या गावात कार्यक्रम आसंल, त्या गावात कार्यक्रमा दिवशी लोकं गेल्या गेल्या चहा पाणी देत.
संध्याकाळी तापल्या तव्यावर थापल्याल्या भाकरी-कालवण आणून देत. लय करुन आमचा कार्यक्रम कुठल्याही गावच्या ऊरूसा दिवशी असायचा, त्यामुळं त्या दिवशी सगळीकडं सकाळी पुरणाच्या
पोळ्या बनवल्याल्या असायच्या, त्याच पोळ्या संध्याकाळी गोड मानून शेक, भात गुळवण्या संगं खायाच्या आन् रात्रभर जागून काढायची. लय खाऊनबी चालायचं न्हाय. अर्ध्या अर्ध्या पोटानं उठायचं, न्हाय तर झोप आलीच म्हणून समजा.
सकाळचं प्वॉट खपाटीला गेल्यालं असायचं, मग सकाळचं ती लोकं जे खायला देतील ते सडकून हाणायचं. रात्री नाटकात केलेली भूमिका लोकांच्या मनात घर करून राह्याची, त्यामुळं काही काही लोकं जेवायला घरी बोलवायची.
त्या गावातल्या बायका भाऊ दादाच्या नात्यानं आपल्या घरचंच मानून सकाळचं तिथनं निघताना गरम गरम थापल्याल्या भाकरी आणि सोबत चटणी फडक्यात बांधून द्यायच्या. आम्ही मग ऊन डोक्यावर येईपर्यंत कधी चालत, कधी बैलगाडीत बसत प्रवास करत राह्याचो. रस्त्यानं जाताना रानात कुठं पाण्याचा चेंबर चालू दिसला आणि सावलीचं झाड दिसलं, की त्या झाडाखाली सगळे जाऊन बसायचो. बसून चटणी भाकरीचं जेवण घास घास खायचो आणि परत पुढचा प्रवासाला लागायचो. तर सगळं आसं चालायचं...
खानापूरला कार्यक्रम करायचं ठरलं होतं, पण असं सलगच्या दिवसात, तेही अशा ऐनवेळी करायचं मनात नव्हतं. त्यावेळी रामभाऊ कंडक्टर हे आटपाडी डेपोला कंडक्टर होते, त्यांच्या डेपोतल्या लोकांपर्यंत बातमी पसरली होती, की रामभाऊ हे वेड्या झालेल्या आईचं खूप छान काम वटवतात. म्हणून मग तिथल्या लोकांनी आमच्या कार्यक्रमासाठी रामभाऊकडे आग्रह केला, मग मात्र आम्हाला नाही म्हणता आलं नाही. तीन दिवस झोपेचा पत्ता नव्हता, रोज दिवसा चालायचं अन् रात्री कार्यक्रम करायचा. पार थकून गेलो होतो, तरी सुद्धा आम्ही तो त्या दिवशीचा प्रयोग चांगल्या पद्धतीनं केला.
मला आठवतंय, त्यावेळी आम्हाला बक्षीस म्हणून मिळालेलं एकशे पन्नास रुपये जमा झाले होते. त्यावेळी दिडशे रुपये म्हणजे आमच्यासाठी लय मोठ्ठी रक्कम होती...
आणि हो, खानापूरच्या प्रयोगादिवशीची गंमत राहिलीच की!...
खानापूरच्या यात्रेला कलापथक, कोल्हापूरच्या पार्ट्या, तमाशा हे सगळं प्रत्येक वर्षी असायचंच आणि त्या ऑर्केस्ट्रात, तमाशात काम करणाऱ्या कलाकार मंडळींच्या जेवणाची सोय ठरलेल्या खानावळीत केलेली असायची. आमच्यासाठी सुद्धा जेवणाची व्यवस्था त्याच खानावळीत केलेली. दोन तीन दिवस चालून सगळेच थकल्यालो आणि मग मी, आत्माराम, प्रकाश, नानाभाऊ, राजाराम, बबन अशी आठ दहा जण ओळीनं जेवायला बसलो.
खानावळीत चपात्या लाटणाऱ्या बायकांना नेहमीप्रमाणं वाटलं होतं, की 'ही आरकेस्ट्रात काम करणारी माणसं! त्यांचं नाजूक खाणं. खाऊन खाऊन किती खाणार! दोन, नाही तर तीन चपाती.. लय झालं तर चार.. पाचवी चपाती खाणं म्हणजे शेडीवरनं पाणी जाण्यासारखं.',
अशी त्यांची समजूत होती, पण आम्ही सगळीच जण रोज रानात कष्टाचं काम करणारी, आडदांड शरीराची आणि जेवणाच्या बाबतीत मागं पुढं न बघणारी, जेवायला ताट असणारी होतो. पहिल्यांदा सगळ्यांच्या ताटात दोन दोन चपात्या दिल्या. पुन्हा सगळ्यांनी दोन दोन चपात्या मागवल्या. चपात्या लाटणाऱ्या बायकांना वाटलं,'झालं यांच जेवण.' पण कुणीच बसलेल्या जागेवरून उठला नाही. मग पुन्हा बायकांनी थोड्या चपात्या लाटल्या आणि निवांत झाल्या.
पण तरीही कुणी जेवणाच्या ताटावरून उठायला तयार नाही. पुन्हा खानावळीच्या मालकानं बायकांना, 'या कलाकार मंडळींचं जेवण होत नाही, तोपर्यंत चपात्या लाटणं बंद करू नका' म्हणून सांगितले. मग सगळेच हाताच्या बाह्या मागं सारून जेवणावर तुटून पडलेले. चपात्या लाटणाऱ्या बायका आळीपाळीने आम्हा जेवण करणाऱ्यांना बघायला बाहेर यायच्या आणि पडद्याच्या आडोशानं बघायच्या. त्यांना सुद्धा वाटलं असेल, 'हे नेमके कलावंतच हायेत, की राक्षस!...'
बायका चपात्या लाटून थकल्या, तरी आमचं जेवण चालूच. एका एकानं दहा दहा, बारा बारा, पंधरा पंधरा चपात्या हांटल्या. जेवण झालं. आम्ही सगळीच जेवण उरकून येताना मागं बायकांचं कुजबूजनं कानावर पडलं, त्यातली एक बाई म्हणाली सुद्धा,
"आसली राक्षसासारखी खाद आसणारी माणसं, म्या आजतागायत कुठं बघिटली नव्हती."
उपाशी माणसाला कशाची आल्या लाज!..
कोण काय म्हणंल, याकडं लक्ष न देता पुढ्यात येऊन पडेल ते मुकाट्याने दामटत राह्यचं, येवढंच आम्हाला ठावं. 'प्वॉट भरल्यावरच कोण काय म्हणतंय याकडे लक्ष जातं, तोपर्यंत न्हाय...'"
शाहिर नाना इतकं बोलून थांबले आणि नजर खाली जमिनीवर स्थिर केली. कदाचित, मला हे सारं सांगताना तो काळ त्यांच्या डोळ्यासमोर तरळून गेला असेल. ते ज्या उत्साहाने सांगत होते, त्यावरून असे वाटत होते, की ही घटना कालचीच आणि ती आज मला सांगत आहेत.
ते बोलत होते आणि माझ्या नजरेसमोर तो काळ, तो प्रसंग जसाच्या तसा उभा रहात होता.
त्यांची एकाग्रता भंग करून मी पुढचा प्रश्न विचारला, " नाना, असं कधी झालंय का, की 'एखाद्या ठिकाणी तुमचा कलापथकाचा कार्यक्रम आहे आणि तिथं तुम्ही आळस करून कार्यक्रमाला गेलाच नाहीत.' नाहीतर, 'मनाला येईल तेव्हा जायचं, मनाला येईल तेव्हा नाही जायचं. असं कधी केलंय का?"
"आसं.....
क्रमशः...
©_सुभाष आनंदा मंडले
(9923124251)