भाग-१
शाहीर.!
शाहीर म्हंटले की डोळ्यासमोर येतात,
त्या त्यांना लोकांनी दिलेल्या उपाध्या..
जसे...
राष्ट्रशाहीर...
लोकशाहीर...
शिवशाहीर...
भिमशाहीर...
पोवाडे गावून समाजाचे प्रबोधन करणे आणि त्यातून समाजाला विचारांची दिशा देणे असे सामाजिक आणि ऐतिहासिक काम शाहीर करीत असतात.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रम...
डॉ. भीमराव आंबेडकर यांचे सामाजिक कार्य...
अशा विविध विषयांवर शाहिरी कार्यक्रम सादर केले जातात.
त्या त्या काळातील ज्वलंत विषयावर समाज प्रबोधन व्हावे यासाठी सुद्धा शाहीर समाजासमोर आपली शाहिरी काव्य सादर करत असतात.
आज आपण अशाच एका शाहिरांबद्दल जाणून घेणार आहोत. कलेचा कोणताही वारसा नसताना ज्यांनी वयाच्या तेराव्या वर्षापासून आपले जीवन कलेसाठी अर्पण केले आणि सर्वत्र 'शाहीर' या नावाने लोकप्रिय असलेले, या शिवाय त्यांनी गावात कुणाचं लग्न लावलेलं नाही, लग्नाचा विधी केला नाही किंवा त्यांच्या पहाडी आवाजात लग्नातील मंगलाष्टका खणखणली नाही, असे चुकूनच एखादं लग्न असेल, असे सर्वांचे आवडते,
'शाहीर खाशाबा मंडले.''
मी त्या दिवशी त्यांना सकाळी सकाळीच म्हणजे नऊच्या सुमारास त्यांना भेटायला गेलो, पण जशी कायमचीच लांब लांबच्या लोकांची त्यांच्याकडे दाढकिडीवर औषध घेण्यासाठी वर्दळ असायची, अगदी तशीच खूप मोठी वर्दळ त्या दिवशी दिसली.
या सगळ्या लोकांच्या गराड्यातून त्यांना जास्त वेळ बसून माझ्याशी बोलायला, गप्पा मारायला वेळ देता येत नव्हता, त्यामुळे ते मला बोलले, "साडेअकरा-बारा वाजेपर्यंत ही अशीच वर्दळ राहणार...सुभाष, तू आसं कर.. दुपारी ये, आपण निवांतपणे बोलू."
______मी काहीच बोललो नाही, मी तसाच तिथं एका खाटेवर पेपर वाचत बसून राहिलो.
दाढ दुखत असणारे लोक कानावर झाडपाल्याचा बोळा ठेवून सरासरी अर्धा तास तसेच पडून रहायचे. मैदानावर तळवट पसरलेला. त्यावर सकाळच्या उन्हाच्या तिरपीला चहुकडे लोकं कलंडलेली दिसत होती. असे एका वेळी अनेक लोक मैदानावर आडवे झालेले. त्यांना झाडपाल्याचे औषध तयार करून देण्यासाठी शाहीरनानांची माझ्या जवळून सतत ये जा चालू होती. त्यातूनही त्यांनी वेळ काढून अडगळीत ठेवलेल्या कपाटावर.. ट्रंकेच्या तळाशी जपून ठेवलेल्या..पुस्तकावरची जमा धुळ बऱ्याच वर्षांनी उडवली. हे करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहण्यासारखा होता. जणू आपण कलाकार जीवनातील आठवणींच्या पुस्तकाचं पान न् पान लख्ख करत आहोत.
ते पुस्तक मला वाचायला दिले. पुस्तक वाचण्यात माझा किती वेळ गेला, ते माझे मलाच समजले नाही.
जे जवळपासच्या गावातील असतात, ते सकाळी सुर्य उगवल्यापासून गर्दी करतात आणि जे लांब गावचे आहेत, ते अकरा बारा वाजेपर्यंत पोहचतात आणि औषध घेतात. त्यामुळे सरासरी बारा वाजेपर्यंतच लोकांची वर्दळ असते. नंतर ती पुर्ण थंडावते.
साधारण, साडेअकरा वाजून गेले असतील. शाहीरनाना (लोक त्यांना शाहीरतात्या, शाहीरबाबा, शाहीरनाना असेही म्हणतात. मी त्यांना शाहीरनाना म्हणतो.) झाडपाला कुस्कारून कुस्कारून त्याचे छोटे छोटे गोळे तयार करत होते, असा रोज सकाळी नित्यनेमाने चार पाच तासांचा त्यांचा कार्यक्रम ठरलेला. त्यामुळे हाताला घट्टे पडलेले. पुर्ण सफेद इस्त्री केलेल्या सदऱ्याच्या हातुब्यातून बाहेर, घट्टे पडलेल्या हातांना हिरवा रंग चढलेला. त्यांनी बाहेर टाकीतल्या पाण्यानं हात धुतले आणि धोतराचा एक सोगा हातात धरून सरळ आत घरात माझ्याजवळ येऊन बसले.
माझी पुस्तकाची काही पाने वाचून झाली होती. त्यांना पाहून मी ते पुस्तक हातावेगळे केले आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या.
खूप वर्षांनी इतकं मनमोकळेपणाने आणि निवांत बसून त्यांच्याशी बोलायला मिळालं, त्यामुळे त्यांनी माझी इकडची तिकडची विचारपूस केली. मलाही त्यांच्याबद्दल आणि त्यांनी शाहिरी, कला जीवन जगलेल्या आठवणींबद्दल जाणून घ्यायचे होते. आमच्यात रंगलेल्या गप्पांचा ओघ त्यांच्या कलाकार जीवनातील जुन्या आठवणींपर्यंत पोहचवणे, हे माझं इच्छित होतं. बोलण्याच्या ओघात मी त्यांना विचारले,
"नाना... तुमचं शिक्षण कितवी पर्यंत झालंय आणि कलेची आवड कशी निर्माण झाली ?"
त्यांनीही आपला जीवनपट अगदी मुक्तपणे सुरुवातीपासून मला उलगडून सांगायला सुरुवात केली.
"घरची परिस्थिती बेताचीच अन् गावात चौथीपर्यंतच शाळा होती, त्यामुळं चौथीपर्यंतचे शिक्षण (हणमंत वडीये) गावातच आणि त्यानंतरचे सातवीपर्यंतचे शिक्षण थोरल्या वडव्याला (वडिये रायबाग) झालं.
थोरल्या वडव्याला शाळेत जायचं म्हंटल्यावर येरळा नदी पार करून जावं लागायचं.
शिक्षणाची आवड पहिल्यापासूनच होती, पण 'नदीला पाणी आलं, की शिक्षणावरही पाणी फिरायचं.'
त्यात, शाळेला जाताना आमचं पाच सहा जणांचं टोळकं असायचं. नदीला थोडं पाणी असलं, की अंगावरची कपडे पाण्यात भिजू नये म्हणून ती काढायची.. शाळेचं दप्तर, कपडे हातात घ्यायची.. आन् कपडे, दप्तर भिजूनी म्हणून हात वर करून नदी पार करून जायचं. मध्येच त्यातल्या कोणाला पाण्यात पोहायची हुकी आली, की तो हातातली कापडं सरळ पाण्यात बुडवायचा. वल्ल्या कापडामुळं शाळंत जाता येत नसायचं,
आन् मग काय!.. सगळ्यांनीच डोक्यातला शाळंत जायाचा विचार वाहत्या पाण्याबरोबर सोडून द्यायचा. सगळ्यांनी शाळेची दप्तरं नदी काठावर ढिग मारून ठेवायची आणि तास न् तास त्या पाण्यात पोहत बसायचं. असं खूप वेळ पोहून झाल्यानंतर शाळा आठवायची, पण तोपर्यंत सुर्य डोक्यावर आलेला असायचा. मग काय! आल्या पावली परत फिरायचो. पण इतक्या लवकर घरी गेलो तर घरचे शिर्डी (शेळी) बांधायच्या कासऱ्याने वळ उठेपर्यंत मारणार, या भितीने संध्याकाळी शाळा सुटायच्या टायमापर्यंत नदी काठावर असलेल्या जांभळाच्या झाडावर चढून जांभळं खायची, कुठं बोरीची झाडं असतील, तर दगडांनी बोरं पाडून खायची, अख्खा दिवस हुंदडण्यात जायचा.
नदीला थोडं जास्त पाणी आसलं, की वाहत्या पाण्याला ओढ जास्त असायची, मग नदी ओलांडून शाळेला जाण्याचा प्रश्नच येत नव्हता, त्यामुळे शाळेची म्हणावी तितकी ओढ राहिली नाही.
आपलं गाव (हणमंत वडीये), जसं पहिल्यापासूनच किर्तन, भजन, प्रवचन, वारकरी संप्रदायाची आवड असणारं गाव आहे, तसं कलेची आवड आणि कलेची जोपासना करणारे गाव आहे.
नारायण मोरे,
बंडा तात्या,
रामभाऊ मोरे (रामभाऊ कंडक्टर),
राजाराम सकटे,
स्वामी,
नानाभाऊ,
हि आणि अशी बरीच मंडळी भजन कीर्तनासोबत कलेच्या माध्यमातून गावात यात्रेला नाटक बसवून लोकांची वाह! वाह! मिळवायची.
यात्रेनिमित्त बसवलेलं नाटक बघायला मिळावं म्हणून सगळेच लोक गावच्या यात्रेची आतुरतेने वाट बघत बसायचे.
गावकऱ्यांनी वर्षभर शेतात केलेल्या कामाचा शीण या एका कौटूंबिक, जिव्हाळ्याचं नाटक पाहण्याने जायचा.
नाटक बघायला गावातली लोकं असायचीच, पण लांब लांबची म्हातारी-कोतारी माणसं सुद्धा हौसंनं यायची. रात्रीचं काय काय बायका तर वाड्या वस्त्या वरून येताना लहान-सहान पोरं वाटेनं वडत-लवंडत, आपटत-झपटत घेऊन यायच्या. माणसं सुद्धा बैलगाडी जुंपून बैलगाडीत सगळ्यांना पुरेल अशी ताडपदरी, सोबत अंथरुण पांघरुण घेऊन येत असत. लहान पोरं जास्त वेळ दम काढत नसायची, त्यामुळं त्यांना अगोदरच ऐसपैस जागा बघून अंथरुण पांघरुण टाकून द्यायचं. ज्याला झोप निभत नसेल तो खूशाल आडवा व्हायचा, कुणी बसल्या जागी कलंडून नाटक बघायचा.
__तर अशा साऱ्या रात्रीचं नाटक बघायला आलेल्या लोकांच्या गमतीजमती असायच्या.
नाटकात काम करणाऱ्या मंडळींनी लोकांच्या मनात मानाचं स्थान मिळवलं होतं, त्यामुळेच गावात प्रत्येक वर्षी सादर होणाऱ्या नाटकाची माझ्यासह कित्येकांच्या मनावर भुरळ असायची.
साधारण; 1962 साल असेल, गावात नवीन नाटक बसवलं होतं. त्यात एक स्त्री पात्र होतं, पण नाटकात काम करणारे सर्वच कलाकार अंगापिंडाने मजबूत असल्याने स्री पात्र शोभून दिसेल असं कोणी मिळत नव्हतं. त्यावेळी तेरा वर्षांचं, एक चुणचुणीत, नाजूक बांध्याचं पोरगं खाशाबा, हे बंडातात्यांच्या नजरेला पडलं आणि त्यांनी ठरवलं, की यालाच आपल्या नाटकात घ्यायचं.
घरी वडील- अग्नुअण्णा हे धार्मिकतेची आवड असणारे होते. नाटकात काम करणारी सर्व मंडळी भजन, कीर्तन, प्रवचन करणारी असल्यामुळं अग्नुअण्णांनीही विरोध केला नाही.
मला कलेची आवड पहिल्यापासूनच होती, पण आवड असणं आणि कला साकारणं यात जमीन अस्मानाचा फरक असतो, हे मला ठाऊक होतं, तरीही या सगळ्यांनी सतत प्रोत्साहन दिले आणि मी धाडसाने स्री पात्र रंगवू शकलो. त्यानंतर प्रत्येक वर्षी माझी नाटकातली जागा फिक्स झाली. जसजसे वय वाढत जाईल तसतसे माझं नाटकातलं पात्र बदलत गेले. स्री पात्रावरून सुरू झालेला प्रवास पुरूष पात्रानं पुढे सरकत होता.
शाळा केव्हाच सुटून मागं पडली होती, पण पुस्तकं वाचण्याची आवड शाळेत असल्यापासूनचीच.. त्यामुळं सुरपेटी वाजवण्याबरोबर, कवणं रचने, त्या कवणांना चालीत बसवणे आणि ती कवणं स्टेजवर सादर करणे, या सगळ्या गोष्टी नारुतात्या, बंडातात्या यांच्यासोबतीत आवडीने मी करु लागलो.
स्टेजवर बोलायची भिती हळूहळू निघून गेली होती. बोथट, मॉंड झालेल्या कुऱ्हाडीला इसण्यावर घासल्यावर जशी धार यावी, तशी या शाहिरी कवणांना धार येत गेली.
बाबासाहेबांचं एक वाक्य कुठं तरी वाचलं होतं, " माझी दहा भाषणं तर शाहिरांचं एक गाणं बरोबर आहे"
त्यामुळं शाहिरी कवणं बसवणं आणि ती सादर करणं हे एक मोठे जबाबदारीचं काम आहे, याची कायम जाणीव होत राहिली. त्यामुळंच हे सगळं माझ्याकडून होत राहिलं.
पुढं पुढं मला पेलतील न पेलतील अशी सर्व प्रकारची, लोकं आग्रह करतील ती शाहिरी कवणं सादर करत राहिलो, पण ती करत असताना मनापासून आणि अगदी प्रामाणिकपणानं करत राहिलो, कदाचित म्हणूनच मला वाटतंय, लोकं मला 'शाहीर' म्हणूनच ओळखतात."
"तुम्ही पहिल्यापासून गावात नाटक सादर करत होताच, पण मग बाहेर गावांत नाटक कधीपासून करायला लागलात?", मी पुढचा प्रश्न केला.
" गावात दरवर्षी नाटक असायचं, त्यावेळी तुफान गाजलेलं नाटक, 'वेडी झाली बाळासाठी'...
या नाटकात....
क्रमशः...
© _ सुभाष आनंदा मंडले
(9923124251)