Jal tu Jvalant tu - 3 in Marathi Fiction Stories by Prabodh Kumar Govil books and stories PDF | जल तू ज्वलंत तू! - 3

Featured Books
Categories
Share

जल तू ज्वलंत तू! - 3

3

---------------

रात्र बरीच झाली होती. मुलांच्या आई-वडिलांना आश्चर्य वाटत होते की, रोज लवकर झोपणारी मुले आजोबांची गोष्ट ऐकण्यात इतकी तल्लीन झाली की, दुपारची संध्याकाळ आणि संध्याकाळची रात्र झाल्याचे त्यांना जाणवले नाही. फिन्जानच्या कथेचा शेवट जाणून घेण्याची सगळ्यांना उत्सुकता होती. त्यामुळे कोणाला भूक-तहान आठवली नाही. मुलांनी आणि आई-वडिलांनी काही वेळेपूर्वी बफलो नगरात हिंडून फिरून त्या सगळ्या जागा पाहिल्या होत्या. त्यामुळे त्यांना वाटत होते, त्यांच्यासमोर ती घटना घडली आहे. गोष्ट संपल्यावर आजोबांच्या लक्षात आले की, त्यांच्या पाहुण्यांनी दुपारपासून काही खाल्ले नाही.

तेवढ्यात दार उघडले. भारतीय परिवाराला तिथे सोडणार्‍या दोघी बहिणी आल्या. त्या जवळच फ्लॅटमध्ये राहत होत्या. त्यांच्या हातात मोठी टोपली होती. त्यात डिनरचे सामान होते. सगळे जेवणाच्या टेबलावर आले. बहिणी सांगत होत्या, त्यांनी आज भारतीय पद्धतीने  भाजी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. हे ऐकून मुलांची उत्सुकता व भूक वाढली. जेवताना गप्पा चालल्या होत्या. धाकट्या बहिणीने सांगितले, ती दर आठवड्याला जेव्हा सुट्टीत घरी येते तेव्हा आजोबांच्या घरासमोर अडकवलेले घरटे बघायला जाते. आजोबांनी ते स्वत: बनवून लावले आहे. आजोबा म्हणतात, त्या घरट्यात एक ना एक दिवस आपोआप अंडी येतील. सगळ्यांना उत्सुकता आहे की अंडी कधी आणि कशी येतील?

त्या भारतीय कुटुंबातील धाकटीला त्या घरट्यांचा उल्लेख आवडला नाही. तिला आठवले, त्या घरट्याचे चित्र असलेल्या डब्याला कशी आपोआप आग लागली होती. तिचा हात भाजता भाजता वाचला होता. ते सगळं आठवून ती घाबरली. तिचे डोळे लाल होऊ लागले. ताप आला. तिचा चेहरा पाहून आई घाबरली. आजोबांना काही सांगणे, तिला योग्य वाटले नाही. कारण त्या वयोवृद्ध व्यक्तीला त्यांना त्रास द्यायचा नव्हता. तिने मुलीला एका चादरीत गुंडाळले व अंथरुणावर झोपवले. ती आजोबांजवळ येऊन बसली. तिचा नवरा आणि मुलगा फिन्जानबद्दल प्रश्न विचारत होते. ते फिन्जान व रस्बीला सहजासहजी विसरू शकत नव्हते.

एक मुलगी भारतीय गावात जन्माला आली. लहानपणीच आपले नाव, धर्म आणि नशीब बदलून खाडीच्या देशात आली होती. आणि पुन्हा एकदा नवीन नाव आणि नवीन नशीब घेऊन अमेरिकेसारख्या देशात आली. रसबालाची रसबानो बनून रस्बी बनण्यापर्यंतचा प्रवास अंगावर शहारे आणणारा होता. आजोबांना कळले की छोटीला ताप आला आहे, तेव्हा त्यांनी जाऊन तिला पाहिले. मुलीला औषध देऊन झोपवण्यात आले. आजोबा आणि मुलीच्या आई-वडिलांना वाटत होते की, सारखे बसून गोष्ट ऐकत असल्याने थकून मुलीला ताप आला असावा. जेवण झाल्यावर दोघी बहिणींनी भारतीय दांपत्याची परवानगी घेतली. त्यांना सकाळी लवकर ड्युटीवर जायचे होते. त्या दोघी अभिवादन करून निघून गेल्या.

आजोबा वयस्कर असूनही थकले नव्हते. म्हणून पाहुणे दंपत्ती आणि त्यांचा मुलगा आजोबांजवळ येऊन बसले. आई मुलाला म्हणाली, “रात्र झाली आहे. आता तू जाऊन झोप.” पण त्याने ऐकले नाही. तो आजोबांजवळ बसून राहिला. मुलाने विचारले, “आजोबा, रस्बी आंटीला पाण्यावर वाहणारे फिन्जानचे प्रेत दिसले का?” हा प्रश्न ऐकून आजोबा विचार करू लागले. हे लोक इतक्या रात्री त्या गोष्टीबद्दल आणखी जाणून घेऊ इच्छितात? आईवडिलांच्या चेहर्‍यावरसुद्धा मुलासारखीच उत्सुकता पाहून आजोबा म्हणाले, “रस्बी पाण्यात पडल्याबरोबर मरण पावली. दुसर्‍या जगात गेली. त्या जगात कोणाला शोधणे कठीण असते. आपण विचार करतो, जे लोक या जगातून जातात ते देवाच्या घरी एका ठिकाणी भेटतात. पण तसे नाही. इथे आपण शेपन्नास वर्षांसाठी येतो आणि आमची संख्या अब्जावधी होऊन जाते. पण त्या जगात तर आपण कोट्यावधी वर्षांपासून अब्जावधीच्या संख्येने जात आहोत. तिथे कोणाला शोधणे आणि सापडणे सहज शक्य नाही. तरीही ते जग आणि हे जग यातील अंतर एवढे नाही की, कोणी तेथून परत आलाच नसेल.”

“म्हणजे? मृत्यूनंतर कोणी पुन्हा जीवंत झाला का?”

“नाही, जिवंत झाला नाही. पण असे झाले आहे की कोणी पूर्णपणे मरू शकला नाही.”

“पूर्णपणे मरणे काय असतं?” आईवडिलांनी उत्सुकतेने विचारले.

“जर एखादी व्यक्ती अवेळी मरण पावते. एखादी जबरदस्त इच्छा बाकी असते. कोणाबद्दल आपलेपणा असतो. आणि तो अकस्मात निघून जातो. त्याच्या शरीराबरोबर त्याच्या आत्म्याचे सगळे तंतू गोळा झालेले नसतात. अशावेळी तो कधी कधी कोणत्या ना कोणत्या रूपाने जगात दिसतो. आपण त्याला कधी आत्म्याचे भटकणे म्हणतो, तर कधी पुनर्जन्म होणे!”

अशा गोष्टी त्यांनी भारतात ऐकल्या होत्या. पण अमेरिकेत; तेही इतक्या वयोवृद्ध व्यक्तीच्या तोंडून ऐकणे त्यांना रोमांचित करून गेले. मुलाच्या अंगावर शहारे आले. तो आपल्या अंथरुणावर पडला आणि त्याने चादरीने चेहरा झाकून घेतला. आजोबांनी त्यांना आता झोपण्याचा आग्रह केला. त्या दांपत्याच्या लक्षात आले की, आजोबांनाही आता झोपायचे असेल. त्यांना विश्रांती घेऊ दिली पाहिजे.

आईवडील आणि मुलगा दुसर्‍या खोलीत आले. मुलगी गाढ झोपेत होती. आता तिला ताप नव्हता. झोप आणि विश्रांतीमुळे तिच्या चेहर्‍यावरचा तणाव गेला होता. हळूहळू मुलगा गाढ झोपला. भारतीय दांपत्याला आता काळजी वाटत होती की, जर त्यांच्या मुलांवर खरंच काही संकट आले असेल तर ते कळावे व त्यावर उपाय व्हावा. इथे विदेशी वडीलधार्‍या यजमानांच्या उपस्थितीत ते निश्चिंत होते. पण भारतापर्यंतच्या प्रवासाचे अनेक मुक्काम बाकी होते. आता त्यांना कोणतीही जोखीम घ्यायची नव्हती.

ही आश्चर्यजनक घटना त्यांच्या देशात घडली असती तर कदाचित याला अंधविश्वास समजून दुर्लक्ष केले असते. पण या समृद्ध देशाच्या नागरिकांकडून अशा गोष्टी ऐकून ते सहजासहजी टाळू शकत नव्हते. शिवाय मुलांबरोबर जे काही घडले ते काल्पनिक नव्हते.

दुसर्‍या दिवशी सकाळी भारतीय दांपत्य उठून बाहेर लॉनवर आले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. त्यांची दोन्ही मुलं नेहमी उशीरापर्यंत झोपतात. पण आज ती लवकर उठली होती आणि बागेतील झाडांना पाणी घालायला आजोबांना मदत करत होती. मुलांना पाहून मुलांच्या आईला आपले कर्तव्य आठवले. त्यांनी आत जाऊन स्वयंपाकघर सांभाळले. आजोबांना कुटुंबाबरोबर राहण्याची संधी मिळाल्याने ते उत्साहित होते.

दुपारच्या जेवणानंतर आईवडील आणि आजोबा बोलत बसले. ते त्यांच्या गप्पांच्या इतक्या नादात होते की मुलं कधी बाहेर गेली आणि एका डिपार्टमेंटल स्टोअरमधून रंगीबेरंगी मेणबत्त्या खरेदी करून आली त्यांना कळले नाही. एवढ्या मेणबत्त्या पाहून आईने प्रश्नार्थक नजरेने पाहिले. मुले संकोचाने काही बोलली नाही पण वडिलांनी पुन्हा विचारले तेव्हा मुलगी म्हणाली, “आम्ही संध्याकाळी रस्बी आंटी आणि फिन्जान भैयाच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करणार आहोत.”

आईवडील अभिभूत झाले. आजोबांचे डोळे भरून आले. आईवडील आत गेले. मुलांनी आजोबांना घेरले. “आजोबा, फिन्जान भैयाला पाण्यात वाहणार्‍या रस्बी आंटीचे शव दिसले होते का?” मुलाने विचारले. मुलं अजूनही रात्रीच्या गोष्टीतच अडकली होती.

आजोबांनी उसासा टाकला व म्हणाले, “फिन्जान झरा पार करून खाली येऊ शकत नव्हता.”

“का? काय झाले होते? मग नाव कशी मोडली?”

एखादे गाठोडे सोडावे तसे मुलांचे प्रश्न समोर येऊ लागले.

आजोबा म्हणाले, “फिन्जान आपल्या नावेत बसून निघाला. तो खूप आनंदात होता. त्याच्याबरोबर कुत्र्याचे पिल्लूपण होते. त्याच्यासाठी नावेत बेल्ट लावलेला खिसा बनवला होता. फिन्जानसाठी नावेत सुरक्षित, मजबूत, ट्रान्स्फरन्ट सेफ्टी कॅप्सूल होता. दोघांच्या तोंडाजवळ ज्यूसचे पाऊच असे लावले होते की थोडा प्रयत्न केला तर ज्यूस पिता येईल. पण...”

“एअरटाईट नौकेत भरपूर ऑक्सिजन होता. पाण्याचा आवाज आत ऐकू येत होता. बाहरेच्या तुलनेत आत आवाज कमी येत होता. ढगांच्या गडगडाटासारखा आवाज होता. तेवढ्यात एक मोठा भयंकर आवाज आला. जणू नौकेवर कोणी गोळीबार केला असावा. वार इतका आक्रमक होता की बुलेटप्रुफ पडद्यावर ओरखडे पडले. ब्लेडने कापल्यासारखी पडद्याला एके ठिकाणी चीर पडली. आधी एक गोळी आली. नंतर थोड्या वेळाने आणखी तीन-चार गोळ्यांचा आवाज आला.

वाहत्या पाण्यात पळणार्‍या नावेचा जो भाग उघडा पडला तो बाहेरच्या बाजूला उलटला. कुत्र्याचे पिल्लू ओरडून पाण्याबाहेर जाऊन पडले. फिन्जानने बेल्ट काढून वीजेच्या वेगाने पाण्यात उडी मारली. आपल्या मोहिमेच्या सुरुवातीला अमेरिकन महिलेने उच्चारलेले शब्द त्याला आकाशवाणीसारखे ऐकू येऊ लागले. मी माझा मुलगाच नाही, आपल्या जीवनाचा एक भाग तुम्हाला देत आहे. पोहण्यात तरबेज असलेल्या फिन्जानने कुत्र्याच्या पिल्लाला हातात धरले. वेगाने लांब जाणार्‍या नौकेकडे आशेने पाहिले. ती आकाशात उडणार्‍या विमानासारखी क्षणात दिसेनाशी झाली. फिन्जान संध्याकाळच्या वेळी पोहत किनार्‍याला आला. निराश होऊन बसला. आता तो विचार करू लागला. त्याच्यावर गोळ्या चालवणारा कोण असेल? फाटून चिंध्या झालेली नाव बघता बघता वहात गेली. त्याचे कोणाशी वैर नव्हते. त्याच्या मोहिमेमुळे कोणाचे काही नुकसान होणार नव्हते. त्याच्या आईने सकाळी रागाने प्लेट फेकून मारली होती. पण आई असा जीवघेणा हल्ला करू शकेल हा तो स्वप्नातही विचार करू शकत नव्हता. आईला तर हेही माहीत नव्हते की, या क्षणी तो कुठे आहे. त्याने घरी काही सांगितले नव्हते. आईच्या जीवनात पिस्तुल त्याने कधी पाहिले किंवा ऐकले नव्हते. तरीही याक्षणी त्याला आई आठवली. तो लवकरात लवकर घरी जाऊन आईच्या मांडीवर विश्रांती घेऊ इच्छित होता. आईच्या हातून काही खायची इच्छा होती. तिला आश्वासन देणार होता की, ती नाही म्हणत असेल तर तो अशा यात्रेला जाणार नाही.

सकाळी डोक्याला झालेली जखम पाणी लागल्याने चिघळली होती. एका हातात लहान कुत्र्याला उचलून, जमिनीवर हात टेकून तो उठला. त्या निर्जन ठिकाणी त्याला तो बुटका म्हातारा दिसला. त्याच्या लांब दाढीमुळे फिन्जानने त्याला ओळखले. म्हातारा फिन्जानच्या गळ्यात पडला आणि मोठमोठ्याने रडू लागला. इतक्या म्हातार्‍या माणसाला असे रडताना फिन्जानने कधी पाहिले नव्हते. तो आश्चर्यचकित झाला. ही काय भानगड आहे त्याला कळेना. रडताना म्हातारा थरथरत होता. त्याने सांगितले की नावेवर त्याने गोळ्या झाडल्या. फिन्जानने कुत्र्याला खाली ठेवले आणि एक बुक्का मारला. पहिला बुक्का मारल्याबरोबर म्हातार्‍याच्या ओठातून रक्त येऊ लागलं. पण फिन्जान थांबला नाही. त्याने लाथा बुक्क्या मारणे सुरूच ठेवले. फिन्जान हेही विसरला की, तो ज्याला मारत आहे, ती व्यक्ती त्याच्यापेक्षा वयाने खूप मोठी आहे. तो हेही विसरला की याच म्हातार्‍याने त्याच्या आईला घोडा आणून दिला होता. आईला घोडा चालवणे यानेच शिकवले होते. तो आईच्या ओळखीचा होता. फिन्जानच्या डोक्यात एकच विचार झंझावातासारखा फिरत होता, की या माणसाने वैरासारखा लपून त्याच्यावर वार केला होता. त्याचे इतक्या वर्षांचे स्वप्न बंदुकीच्या गोळीने चाळणी करून टाकले होते. फिन्जानच्या मनात हा विचार आला नव्हता की त्याची आई रस्बी त्याच्यावर हल्ला करायला कोणाला पाठवेल. त्याच्या मोहिमेत तिने कधी उत्तेजन दिले नव्हते. पण तिला फिन्जान जीवंत असायला हवा होता. ती फिन्जानला वाचवू पाहत होती. या विचाराने त्याने त्या म्हातार्‍यावर आणखी वार केले.

फिन्जान फार रागावला होता. त्याने त्या म्हातार्‍याचा जीव घेतला असता पण मार खाता खाता म्हातारा सारखा म्हणत होता, “एकदा माझे म्हणणे ऐकून घ्या.”

फिन्जानने हात थांबवला.

“हं बोल, तू असे का केलेस?”

म्हातारा म्हणाला, “मला रसबानोने पाठवले होते.” असे सांगितल्यावर म्हातार्‍याला पश्चात्ताप झाला. तो म्हणाला, “मला क्षमा करा. मला तिने घातलेली शपथ मी मोडली.”

फिन्जान एकदम थांबला. त्याला आश्चर्य वाटले की ही कोण व्यक्ती आहे जी त्याच्या आईला ‘रसबानो’ नावाने ओळखते. त्याच्या आईने त्याचे मिशन फेल करण्यासाठी त्याला पाठवले याचे त्याला फारसे आश्चर्य वाटले नाही.

म्हातारा हताश होऊन कपाळाला हात लावून खाली बसला. त्याला वाटले, तो पुन्हा पुन्हा चुका करत आहे.

फिन्जान क्षणात दुसर्‍या जगाचा राहणारा झाला. त्याला वाटले कोणीतरी त्याच्या डोक्यावर प्रश्नांचे गाठोडे ठेवले आहे. तोसुद्धा कपाळावर हात ठेवून म्हातार्‍यासमोर बसला.

म्हातारा आपलेपणाने म्हणाला, “तुझी आई तुला नुकसान पोहोचवू इच्छित नव्हती. तिने मला तुझ्यावर नजर ठेवायला सांगितले होते. तू जेव्हा पाणी जिंकण्याच्या मोहिमेवर जाशील, तेव्हा तुला थांबविण्याचा प्रयत्न करावा.”

फिन्जान म्हातार्‍याकडे पाहत राहिला. म्हातारा पुढे म्हणाला, “तुझी नाव बुलेटपु्रफ होती. त्यावर गोळ्यांचा परिणाम होणार नव्हता. मी काठावरून नावेत लांब कट लावण्याचा प्रयत्न केला. मला छिद्र पडलेले दिसले नाही. नाव वेगाने चालली होती. मला भीती वाटली. तू थोड्याच वेळेत चाळणी झालेल्या नावेतून आकाशाएवढ्या उंचीवरून पडणार होताय. मला भान राहिले नाही. मी मागचा पुढचा विचार न करता नावेच्या किनार्‍यावर गोळ्या झाडल्या.” म्हातारा पुन्हा आपले अश्रू पुसू लागला. “मी आजपर्यंत माझ्या बहिणीची कोणतीही गोष्ट टाळली नव्हती. तिने आधीच खूप दु:ख भोगले आहे.”

फिन्जान सगळं विसरला. आपले मिशन अयशस्वी झाल्याचे विसरला. आपल्या वेदना विसरला. स्वत:ला विसरला. त्याला फक्त एवढेच आठवत होते की, एक म्हातारा त्याच्या आईला आपली बहीण म्हणत होता. आईचे नाव रस्बी नाही, रसबानो उच्चारत होता. त्याच्या आईचा आदेश मान्य करून, एवढी मोठी जोखीम घेऊन, त्याला वाचवायला आला होता. आईने शपथ घातल्याचे सांगत होता. आपल्यापेक्षा चतकोर वय असलेल्या मुलाचा मार खात होता. त्याला आईची आठवण आली. त्याने म्हातार्‍याला आपल्याबरोबर येण्याचा इशारा केला आणि तो घराकडे धावू लागला. आईने एवढे मोठे रहस्य का लपवून ठेवले की तो म्हातारा तिचा सख्खा भाऊ आहे. आई आपले रसबानो नावसुद्धा त्याच्यापासून लपवून ठेवत होती. आईचा हा परिचय आता एकदम नवीन होता.

फिन्जानला धावत आईकडे जायचे होते. पण त्या अभाग्याला कुठे माहीत होते की, त्याची आई आता या जगात नाही आणि आईचे या जगातून जाण्याचे कारण तो होता. जगात जगताना कोण विचार करतो की, कोणाचे जीवन, कोणाचा मृत्यू कोण कसा ठरवतो.

नदीच्या काठावरून दमलेला फिन्जान जड पावलांनी त्या म्हातार्‍याला आणि कुत्र्याला घेऊन घराकडे निघाला तेव्हा त्याला कल्पनाही नव्हती की आता त्याचे कुटुंब हेच आहे. आईबद्दल त्याला काही माहीत नव्हते.

उजाड पडलेल्या घरात फिन्जान रात्री उशीरापर्यंत आईची वाट बघत होता. मग मात्र त्याला काहीतरी अघटित घडले असावे असे वाटू लागले. फिन्जानने कसेबसे आपले व आपल्या साथीदारांचे पोट भरले. सगळे झोपले. सगळे थकलेले होते. तो म्हातारा, त्याचा मामा एखाद्या पुतळ्यासारखा त्याच्या बरोबर होता.

दुसर्‍या दिवशी सकाळी सूर्य आणि पोलीस दारात आले. पोलिसांनी सांगितले की, रस्बी आता या जगात राहिली नाही. फिन्जानने जीवनातील तो अंधार पाहिला, जो दूर करण्यात नुकताच उगवलेला सूर्य असमर्थ होता!

दुपारी दारावरची बेल वाजली. फिन्जानने दार उघडले. दारात ओळखीची कार उभी होती. न्यूयॉर्कहून आलेल्या महिलेने फिन्जानची मोहीम यशस्वी झाली नाही म्हणून दु:ख व्यक्त केले. आपल्या मुलासारख्या असलेल्या कुत्र्याला घेऊन जाण्याबद्दल विचारले. फिन्जानने तिचे डॉलरसुद्धा परत देऊ केले. तेव्हा ती म्हणाली, “फिन्जानने आपल्या भविष्यातील मिशनसाठी अ‍ॅडव्हान्स शुभेच्छा म्हणून ठेवून घ्यावे.”

फिन्जानने नाइलाजाने हा प्रसाद स्वीकारला. त्याला जाणवले की त्याच्या बाबतीत जे काही घडले ते महिलेला माहीत आहे.

आता फिन्जानला म्हातार्‍याकडून आपल्या आईबद्दल जास्तीत जास्त माहिती काढून घ्यायची होती. आतापर्यंत फिन्जानला एवढेच माहीत होते की, ते लोक सोमालियाहून इथे आले होते. त्याचे वडील अमेरिकन सैन्यात होते आणि सैन्यात असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता.

म्हातारा आता समाधानी होता की फिन्जानने त्याच्यावरचा राग सोडला होता. त्याच्याबद्दल आपलेपणा दाखवला. त्याने फिन्जानला परीलोकाची गोष्ट सांगावी, तसे मागच्या गोष्टी सांगितल्या.

ज्ञश्र