2
-------------
आजोबांकडून सोमालियाच्या फिंजानची कहाणी ऐकून सगळे मंत्रमुग्ध झाले होते. फिंजान लहानपणापासून नायगारा धबधबा पाहत होता. तो त्या धबधब्याकडे असा मन लावून बघायचा जशी लहान मुलं सिनेमा किंवा टी.व्ही. बघतात. पडणार्या पाण्याचा तो दैत्याकार पडदा त्याला भिजलेल्या रजतपटासारखा वाटत असे. तो त्याला फार आवडत असे. फिंजानचे वडील अमेरिकन सैन्यात तैनात होते. त्यांच्या मृत्यूची बातमी आल्यावरसुद्धा त्याने तिथे येऊन बसणे सोडले नव्हते. फिंजानच्या आईची-रस्बीची इच्छा होती की, आता फिंजानने सैन्यात भरती व्हावे. पंधरा वर्षांच्या फिंजानला मनात नसताना आईचे म्हणणे मान्य करावे लागले.
इतरांच्या इच्छेला माणूस मान देतो, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. पण हे तो आयुष्यभर करू शकत नाही. फिंजान लपूनछपून सैन्यातून पळून आला. त्याला एकच छंद लागला होता, नायगाराच्या उंचीवरून पाण्याबरोबर वाहत खाली यायचे. त्याने अनेक कामं केली. पैसे मिळवले. मग तो या प्रयत्नाला लागला की, नायगारा फॉल्स पार करण्यालायक सुरक्षा कवच कसे बनवायचे. त्याच्या आईचा याला विरोध होता. तिने त्याला खूप समजावले होते की, हा वेडेपणा सोड. त्याच्या हट्टीपणाने तीसुद्धा हट्टी झाली. त्याला त्याच्या या छंदापासून वेगळे करण्यासाठी ती कोणताही उपाय करायला तयार होती. तिने त्याला घरात बंद करून ठेवले. नायगाराच्या जवळपाससुद्धा त्याला येऊ देऊ नये म्हणून भाडोत्री रखवालदार ठेवले. मुलाला बफलोपासून लांब नेण्याचा प्रयत्न केला.
पण जसजसे आई आपल्या मनासारखे करत होती तसतसे मुलगासुद्धा आपल्या मनासारखे करण्याच्या हट्टाला पेटला होता. एकत्र राहूनही आई- मुलात हे शत्रूत्व निर्माण झाले होते. सैन्यातून पळून आलेला फिंजान तो विशाल झरा पार करू इच्छित होता. आई रस्बी या विचारानेसुद्धा भ्यायलेली होती. तिने मुलाला सैन्यात पाठवले होते. जिथे कोणत्याही क्षणी मरण येण्याचा धोका असतो. पण या खेळात तर त्याचा मृत्यू निश्चित आहे. फिंजानने जगातल्या सगळ्यात मोठ्या वाहत्या समुद्राशी खेळण्याचे वेड घेतले आहे, या विचाराने रस्बी अस्वस्थ होत होती.
उंदरा-मांजराचा चालतो तसा खेळ त्या घरात चालला होता. रस्बीला वाटत होते की, फिंजानने हा नाद सोडावा व पुन्हा सैन्यात भरती व्हावे. तिकडे फिंजान असे उपाय शोधत होता, ज्यामुळे पाण्याच्या धारेत वाहत जात असताना त्याचे संरक्षण होऊ शकेल.
तो लहानपणापासूनच चांगला पोहणारा होता. पाण्यात एखाद्या माशासारखा क्रीडा करत असे. त्याचे आता एकच स्वप्न होते की, त्याने नायगाराच्या पाण्यात उडी घ्यावी. उंचावरून खाली येऊन या दिव्य प्रपातावर आपल्या प्रतापाचा ध्वज फडकवावा. झर्यापासून वर्लपूलपर्यंत एखाद्या जलदेवतेसारखे येणे, त्याचे स्वप्न होते. या स्वप्नासाठी तो आपल्या आईशी भांडत होता. आपल्या निर्वाहाच्या साधनांशी लढत होता. आपल्या जीवनाशी लढत होता.
त्याने त्या लोकांबद्दल ऐकले होते, ज्यांनी या आधी असे प्रयत्न केले होते आणि अयशस्वी झाले होते. इतिहासजमा झाले होते. अशा कथा त्याला घाबरवत नव्हत्या. उलट सावध करत होत्या, की त्यांनी ज्या चुका केल्या त्या तू करू नकोस. हा विक्रम करून त्याला नावलौकिक, प्रसिद्धी मिळवायची नव्हती, ना धनदौलत! त्याची स्पर्धा वाहत्या पाण्याशी होती. त्याला त्या चांदीच्या गार धारेवर बसून जायचे होते. लाटांच्या झंझावाताला ताब्यात घ्यायचे होते. कारंज्याच्या पाण्याच्या अभिषेकासाठी त्याचे मस्तक तडफडत होते.
सतरा वर्षांपेक्षा कमी वयात असे वादळी स्वप्न निसर्ग एखाद्या काचेच्या शरीरात कसे भरेल? रस्बीला याचे आश्चर्य वाटत असे. तिने सैनिक म्हणून आपला पती गमावला होता. तरीही मुलाला सैन्यात पाठवण्याचा मार्ग निवडला होता. मुलाने तिचे ऐकले नाही. आता ती त्याला त्याच्या वेडेपणापासून वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकत होती. तिला मृत्यूची भीती वाटत नव्हती, ना जगण्यावर प्रेम होतं. ती मुलाचे भविष्य खेळात गमवू नये एवढेच बघत होती. देशाला सैनिकांची गरज आहे. वेड घेतलेल्यांची नाही. असे तिचे विचार होते.
आपल्या लहरी शोधात फिंजानच्या लक्षात आले होते की, वेगवान धारेत लाकडी आधार सुरक्षित राहणार नाही. लाकडी नावा अयशस्वी वीरांच्या कहाण्यांचा हिस्सा होत्या. प्लास्टिकच्या उपयोगाचे युग होते. पॅराशूट आता कामात आले होते. हे उपाय महाग होते. फिंजानच्या वेडगळ मनोवेगाचा कोणी प्रायोजक नव्हता. यशस्वी झाल्यावर कौतुक करायला जग धावते. यशाचे स्वप्न घेऊन धावणार्या तरुणाला कोण साथ देणार? ते सुद्धा जेव्हा त्याची जन्म देणारी आई काठी घेऊन त्याच्या मागे लागलेली असताना!
फिंजानच्या मित्रांनी आधी त्याच्या विचारांची चेष्टा केली. पण हळूहळू ते गंभीरपणे विचार करू लागले. ते त्याच्या मदतीसाठी पुढे येऊ लागले. पैशाच्या कमतरतेचे ढग वितळू लागले. त्यांचा मित्र पवन वेगाच्या घोड्यावर स्वार झाला होता. त्याला हिरवे निशाण दाखवण्यातही एक प्रकारचा रोमांच होता. फिंजानला ‘आपले दिवस’ जवळ येताना दिसू लागले.
रस्बीजवळ धन नव्हते. पण ती मेहनती होती. काटकसरीने आणि व्यवस्थित वागत होती. तिने फिंजानला कधी काही कमी पडू दिले नव्हते. तिचे जे काही जमवलेले, शिल्लक ठेवलेले धन होते ते सर्व फिंजानसाठीच होते. पण तरीही फिंजान जेव्हा आपल्या स्वप्नासाठी काही खर्च करू इच्छित होता तेव्हा रस्बीला असे वाटत असे की, तिचा मुलगा तिच्या काळजाचे तुकडे करून उन्हात टाकून कावळे-घारींना खायला घालत आहे. ती अनेक युक्त्या करून त्याचे मिशन थांबवण्याचा प्रयत्न करत होती. कधी खर्चासाठी तर कधी वेळ वाया घालवतो म्हणून त्याला रागवत होती.
फिंजान दृढनिश्चयी होता. त्याला खायला, कपडे काही नको होते. तो आपल्या शरीरावर नावापुरते कपडे गुंडाळून, मासे खाऊन राहायला तयार होता. त्याचा खर्च एकाच कामावर होत होता. आपल्या यात्रेच्या यशासाठी!
रस्बी त्याची काळजी घेत असे. त्याच्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवत असे. मनातल्या मनात नवस करायची की त्याचा विचार बदलावा.
रस्बीने ऐकले होते की मुलांना आपल्या मरणाचे भीतीदायक दृष्य दाखवले तर ते घाबरतात. रस्बीने तो उपाय केला.
एके रात्री फिंजान गाढ झोपेत असताना रस्बी हळूच उठली. आपल्या कपाटाजवळ गेली. तिने कपड्यांच्यामध्ये ठेवलेली एक लहान काळी वस्तू काढली. आपल्या खिशात लपवली. डोक्यावर आपली जुनी मोठी हॅट घातली. घराबाहेर पडली. तीन तासानंतर परतली. आपल्या खोलीत जाऊन अशी झोपली जणू काही झालेच नाही.
सकाळी फिंजान जागा झाला तेव्हा दचकला. त्याच्या चारी बाजूला चार हाडांचे सापळे ठेवलेले होते. त्या सापळ्यावर चेहर्याच्या ठिकाणी त्याच्या आईच्या चेहर्याचे चित्र होते. टेबलावर ठेवलेल्या टेपवर शोकधून वाजत होती. फिंजान उदास झाला. पण त्याने धीर सोडला नाही. तो मुकाट्याने आपल्या दैनंदिन कामाला लागला. त्यादिवशी दुपारी तो जेवला नाही. रस्बीने दुपारी जेवण बनवले नव्हते. रस्बीने जुन्या कॅमेराने आपले फोटो काढून सापळ्यावर लावले होते. ती रात्र आली आणि गेली. फिंजानला ना पाझर फुटला, ना त्याचा इरादा बदलला. तो नेहमीप्रमाणे आपल्या तयारीत मग्न होता. आईच्या मृत्यूच्या दृष्याने त्याला मनातून वाईट वाटत होते.
एकेदिवशी त्याने आपल्या आईला आपले सामान पॅक करताना पाहिले. त्याला माहीत होते की, त्याच्या आईला घर सोडून जायला दुसरी जागा नाही. एकदा त्याचे मन हळवे झाले. त्याने कधी आपल्या आईला ‘होमलेस’ होऊन फिरतानाची कल्पना केली नव्हती. त्याचे वडील नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर असत. त्याला वडिलांबद्दल फारशी माहिती नव्हती. पण आईला त्याने जेवण बनविताना, घर स्वच्छ करताना, बाजारातून सामान आणताना, त्याचे कपडे, अंथरुण आवरताना, तो आजारी असला तर त्याला औषध देताना लहानपणापासून पाहिले होते. तो कल्पनाही करू शकत नव्हता की अशी व्यक्ती घराशिवाय कशी राहू शकेल. तो तटस्थ राहू शकला नाही. त्याने जाऊन आईची बॅग पालथी केली. मग मुकाट्याने आपल्या कामाला लागला. आई चिडली. पण मग सामान तसेच टाकून इतर कामाला लागली.
फिंजानच्या खोलीत मधोमध लोखंडी तारा पसरलेल्या होत्या. त्यावर रंगीत प्लॅस्टिक लावायचे होते. अशा प्रकारे तो जीवघेणा बॉल तयार होत होता. रस्बीच्या जीवनाला पराभूत होण्याचा धोका होता. फिंजानला जिंकण्याची आशा होती. काळ तमाशा बघत होता.
रस्बीला चार वर्षांपूर्वीची घटना आठवली. एकेदिवशी ती घरी नसताना फिंजान आपल्याबरोबर शाळेत शिकणार्या एका मुलीला घेऊन आला होता. तेरा वर्षांच्या मुलाची समज पाहून ती घाबरली होती. कारण त्या मुलीला पाहून तिला तिचे बालपण आठवले होते. कैदखान्यात घालवलेल्या बालपणाच्या काळ्या सावल्या तिला आतापर्यंत आठवत होत्या. जेलच्या व्हरांड्यात जवळपास जो माणूस दिसेल तो बघता बघता वाळलेले झाड बनत होता. त्या वाळलेल्या झाडाला विळखा घातलेले साप, विंचू, सरडे तिच्या देहाची चाळण करायला चारी बाजूने धावत. रस्बीला ओरडायलादेखील वेळ मिळत नव्हता.
आज घरी आल्यावर आपल्या जवळच्या चावीने तिने दार उघडले. ती स्तंभित झाली. तिचा तेरा वर्षांचा मुलगा सुकलेले झाड बनला होता. त्या वाळलेल्या झाडाच्या मुळापासून निघून एका किड्याला तिने त्या मुलीकडे पळताना पाहिले. ती बेशुद्ध पडली. काट्याने काटा काढला जातो. तसेच भीतीने भीती कमी होते. ज्या अकरा वर्षांच्या मुलीला आपल्या तेरा वर्षांच्या मुलाबरोबर पाहून रस्बी घाबरली होती, आज तिला तिची आठवण आली होती. तिला माहीत होते, ती मुलगी फिंजानवर रागावलेली होती, तरीही गेली चार वर्षे ती त्याची गर्लफ्रेंड होती. फिंजान तिला नेहमी भेटत असे. रस्बीने त्या मुलीची मदत घ्यायचे ठरवले. तिने सांगितले तर कदाचित तो आपला हट्ट सोडेल. आता उलटी गंगा वाहू लागली. ज्या मुलीच्या सावलीपासून रस्बी फिंजानला वाचवत होती, आता तिच्याबद्दल फिंजानकडे चौकशी करू लागली. तिला घरी घेऊन येण्याबद्दल बोलू लागली.
सतरा वर्षांच्या फिंजानला एवढेच कळत होते की, त्याच्या मैत्रिणीला घरी बोलावले जात आहे, तर त्याने तिला आणले पाहिजे. त्या दोघांमधली जवळीक त्याच्या मैत्रिणीला संकटात न टाकेल याची तो आईसमोर काळजी घेत होता. तो आईला जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत असे की, त्याने तिच्या सांगण्यावरून तिला आणले आहे. तिचा फिंजानशी काही संबंध नव्हता.
प्रत्येक आईला माहीत असते की, तिच्या मुलाला कोणते चॉकलेट आवडते. मग तिच्या मुलाला जगातील कोणता मानवी पुतळा पसंत आहे, हे तिच्यापासून कसे लपून राहील? आईने आपली खेळी केली. तिने ठरवले, ती त्या मुलीला विनंती करील की, फिंजानला थांबव!
पण तिची ही चाल यशस्वी झाली नाही. फिंजानच्या गर्लफ्रेंडने स्पष्ट सांगितले की, ती तिच्या मित्राच्या आनंदाला आधार देण्यासाठी त्याची मैत्रीण आहे. त्याची स्वप्ने भंग करण्यासाठी नाही. रस्बी पुन्हा हताश आणि अपमानित झाली.
आकाशातून पडणार्या त्या मायावी समुद्राने फिंजानचे जग ओंजळभर करून ठेवले. फिंजान ते पिऊन टाकू इच्छित होता. पण रस्बीला त्यात जीवन बुडण्याचा धोका दिसत होता. आता रस्बीने काय करावे? तरुण मुलासाठी तिरडी बनवून त्याच्या मृत्यूची प्रतीक्षा करावी? की अशी वेळ येण्याआधी विष खाऊन झोपावे! तिला तिसरा पर्याय दिसत नव्हता. मुलाच्या ममीला एखाद्या म्युझियममध्ये ठेवण्यासाठी तिने त्याला जन्म दिला होता का? मुलगा ज्या वातावरणात जगत आहे त्यात म्युझियममध्ये ठेवण्यासाठी त्याचे प्रेत हाती लागणार नाही.
रस्बीला बहुधा हे माहीत नसावे की, मुलाला जन्म दिला म्हणजे त्याला आपल्या स्वप्नांचा वारस बनवायचा नसतो. एकदा त्याला जीवन मिळाले की त्याचा वापर करण्याचा अधिकार त्यालाच असतो. रस्बी त्याला सैन्यात पाठवून कुठे सुरक्षित करत होती?
सकाळी काही वस्तू घेण्यासाठी फिंजान स्वयंपाकघरात डोकावला तेव्हा त्याने पाहिले भाजी तशीच पडलेली आहे. आईने मनगटावर चाकूचे वार करून घेतले आहेत. रक्त वहात आहे. जमिनीवर रक्त पसरले आहे.
फिन्जानचे काही मित्र दररोज त्याला प्रोत्साहन द्यायला येत असत. त्यांनी रस्बीला क्लिनिकमध्ये नेले. जवळच्या फार्मसीतून मदत घेऊन फिन्जानची प्रेमिका पोहोचली, तेव्हा रस्बीचे ड्रेसिंग झाले होते. ती बेडवर पडली होती. फिन्जानने काही कामासाठी एका मेकॅनिकला बोलावले होते. त्याने आपले काम समजून घेतले व दोन तासानंतर परतला.
डॉक्टरांनी रस्बीला संध्याकाळपर्यंत तिथे रहायला सांगितले. फिन्जानचे मित्र व प्रेमिका निघून गेले. तेव्हा रस्बी म्हणाली, “तुला आठवते का, तू तीन वर्षाचा होतास तेव्हा कॅलिफोर्निया बीचवर आपल्या वडिलांबरोबर गेला होतास. तेव्हा तू पाण्याला पाहून किती घाबरला होतास!” रस्बी छताकडे पहात म्हणाली.
“हो मला हेही माहीत आहे की वडिलांनी मला पाण्यात नेऊन भीती घालवण्याचा प्रयत्न केला असेल.” फिन्जानने अशा स्वरात उत्तर दिले जणू बर्फाच्या घरातून एखादा मुलगा बोलत आहे.
“तुझे वडील जेव्हा साल्मोन फिशिंगसाठी लेकवर जात होते, तेव्हा तुला किती लांब बसवत होते? तू जवळ जाण्याचा प्रयत्न केलास तर ते येऊ देत नव्हते. माशांची बास्केट तुला दाखवण्यासाठी उन्हात चालत येत होते.”
“वडिलांना हेही माहीत असेल की ते मला मासे दाखवण्यासाठी आयुष्यभर माझ्याबरोबर रहाणार नाहीत आणि ते म्हातारेही होणार होते.”
“गप्प बस!” बकवास करू नकोस! तू आपल्या मामाच्या अंगाखांद्यावर खेळलास. तो किती चांगला पोहणारा होता! पाण्याच्या खेळात कोलंबियात त्याने नाव कमावले होते. तो आज व्हीलचेअरवर आहे.” रस्बीचे डोळे भरून आले.
“मामाचे पाण्याने काही बिघडवले नाही. पाण्यात विरघळलेल्या अल्कोहोलने बिघडवले.”
“वाद घालू नकोस. सगळ्यांना मृत्यूची भीती वाटली पाहिजे.”
“भीती मृत्यूमध्ये नाही. मृत्यू तर अतिशय शांतीपूर्ण आहे. भीती मृत्यूला भिण्याची आहे.” फिन्जान म्हणाला.
“सैन्यालासुद्धा बहादूर तरुण पाहिजेत. तिथे तू का जात नाहीस?”
“वडील आणि मामाचे जीवन माझ्या जीवनाचे निर्णय घेताना उदाहरण का बनते? आम्ही इतरांच्या सारखे शिकलो, तर आमच्या जीवनाचे काय?”
रस्बीला कळेना फिन्जानला कसे समजवावे? त्याहून मोठा प्रश्न होता की, स्वत:ची समजूत कशी घालावी?
जगातील सगळ्यात मोठ्या धबधब्याचे हाहाकार करणारे पाणी तिच्या एकुलत्या एक मुलाला गिळायला येत आहे, आणि तिने मूकदर्शक बनून बसावे का?
पाण्याचा गुण अजब आहे. पवित्र स्वच्छ लोक यातच पोहतात, आणि यातच बुडतात.
रस्बी त्याला प्रेमाने समजावू लागली, “तू आपले जीवन जग, खूप म्हातारा हो.” रस्बी आशीर्वाद दिल्यासारखी म्हणाली.
“हे आपल्या हातात असते का?” फिन्जान हसून म्हणाला.
“बेटा, म्हातारपण फार चांगले असते. जीवनाचे अनेक अनुभव आलेले असतात. मनात अनेक लोकांच्या आठवणी गोळा होतात. ज्यांना आपण कधीतरी कोठेतरी भेटलेले असतो. आपल्या त्वचेवर आपल्या खोडकरपणाची चिन्हं असतात.”
“हे तू काय बोलत आहेस आई? आता थोडा वेळ स्वस्थ झोप.”
“बोलू दे रे, जसे पीठ आणि लोणी बराच वेळ फेटल्याने केक मऊ आणि स्पंजी होतो, तसेच म्हातारपणी जीवनातील बहार झेलून हाडं ठिसूळ आणि भुसभुशीत होऊन जातात. त्यांचा उद्दामपणा निघून जातो.”
“आई, तुला विश्रांतीची गरज आहे.”
“खूप विश्रांती मिळते. डोक्यात त्या जत्रांची दृश्ये असतात ज्यात आम्ही फिरलेलो असतो. जिभेला ती चव आठवते जे आम्ही खाल्लेले असते. चेहर्यावर आंबट-गोड आठवणी सुरकुत्या बनून चिकटतात. बेटा, तू हे सुख गमावू नकोस. म्हातारा हो.”
“आई, अजून तूसुद्धा म्हातारी झाली नाहीस. मी तर खूपच लहान आहे.”
“हो. तू खूप लहान आहेस. पण तू विचार कर की तू जगशील. बोल, जगशील ना? जिवंत राहशील ना?”
फिन्जान हसला. वेड्यासारखा बराच वेळ हसत राहिला. रस्बीला इन्जेक्शन द्यायला आलेली नर्स फिन्जानला पाहून क्षणभर थबकली. जणू ती विचारात पडली असावी की इन्जेक्शन कोणाला द्यायचे आहे?
तिसर्या दिवशी रस्बी फिन्जानबरोबर घरी आली. घरी आल्याबरोबर तिच्यासाठी कितीतरी लहान-मोठी कामं होती.
फिन्जानची बंद नौका एका रंगीबेरंगी बॉलचा आकार घेत होती. दुसर्या दिवशी तो ती नौका नदीवर ट्रायलसाठी घेऊन जाणार होता. त्याने त्याच्या मित्राला अर्नेस्टला सांगितले होते की आता जास्त मित्रांना घेऊन जायचे नाही. जास्त लोक असले की काम कमी होईल आणि पिकनिकचे वातावरण निर्माण होईल.
अर्नेस्टला आनंद झाला. त्याला माहीत होते की, नदीवर तोच चिंचेच्या आकाराचा नारंगी रंगाचा मासा दिसेल, जो आपल्या शरीरातून धूर सोडतो. त्यामुळे पाणी गढूळ होते. खोल पाणी उथळ दिसू लागते व लहान-मोठे कीटक खोल पाण्यात जातात. अर्नेस्टला तो सोनेरी मासा आश्चर्यचकित करत असे. अनेक वेळा त्याला वाटले की त्या माशाला पकडून खाऊन टाकावे, पण तो मासा समोर आला की असा तडफडत असे, जणू त्याचा जीव धोक्यात आहे. तो माशाला पकडण्याचा विचार सोडून देत असे. मासा आपल्या शरीरातून धूर सोडत असे. पाणी गढूळ होत असे. मासा पुढे जात असे.
जगाचे हे कपटी वागणेच सगळ्यांचे पोट भरत आहे. खोल पाण्यात आलेले कीटक इतर जिवांचे घास बनतात.
फिन्जानला कोणीतरी सांगितले की न्यूयॉर्कमध्ये कोणी असा किमयागार आहे जो प्लास्टिकच्या बॉलला आतून असा लेप लावतो ज्यामुळे बॉल मजबूत होतो, पण त्याचे वजन वाढत नाही. फिन्जान एकदा तिथे जाणार होता. त्याला त्या दुकानाचा पत्ता मिळाला होता.
पण तिथे जाणे सोपे नव्हते. शिवाय बॉल घेऊन जाण्यासाठी खर्च लागणार होता. अगोदर बफलोमध्येच ट्रायलसाठी दुसर्या दिवशी सकाळी आपल्या मित्रासह नायगारा धबधब्यापासून सात किलोमीटर अलीकडे नदीवर पोहोचण्याची तो तयारी करू लागला. तिथे जाण्यासाठी पिकअप व्हॅनची व्यवस्था केली.
दुसर्या दिवशी सकाळी दोघे मित्र ट्रायलसाठी निघाले तेव्हा रस्बीचे ब्लडप्रेशर वाढले. त्या दिवशी रस्बीने फिन्जानच्या वडिलांची आठवण काढली.
जंगलात खोल पाण्याच्या काठाजवळ व्हॅन थांबली. फिन्जानने एकदा पहाणी केली. लगेच कपडे काढले. फिन्जान संतुष्ट झाल्याचा संकेत समजून त्याच्या मित्राने व्हॅनमधून बॉल काढला. फिन्जानने पाण्यात उडी मारली. उंच लाटांच्या वेगात बुडी मारून चारी बाजूला चक्कर मारली. कातळ, झाडी यांचा अंदाज घेतला. मग आपल्या मित्राला हाताने इशारा केला.
पुढच्या क्षणी अर्नेस्ट बॉलमध्ये होता. व्हॅनच्या ड्रायव्हरने त्याला आधार दिला. पाण्याच्या लाटावर झटके खात बॉल पुढे जाऊ लागला. फिन्जान बॉलच्या आजूबाजूने पोहत पुढे जाऊ लागला. कधी बॉल एखाद्या कातळावर आदळून उंच उडत होता. आत बसलेला अर्नेस्ट घाबरून जात होता. फिन्जानच्या डोक्यात निर्णायकासारखी तत्परता आली.
वाहत्या पाण्याची जितकी रूपे असतील तितकी त्या प्रपाताच्या पूर्वपिठिकेत नोंदवलेली होती. फिन्जान हाताच्या हलक्या स्पर्शाने बॉल इकडे तिकडे ढकलत होता.
फिन्जान आपल्या तयारीने संतुष्ट दिसत होता. त्याच्या मनात एकदा न्यूयॉर्कला जाण्याची इच्छा बळावली. फिन्जानची प्रतिमा जास्तीत जास्त लोकांच्या डोळ्यात बसावी म्हणून हडसन नदी त्याला साद घालत होती.
रस्बी फिन्जानच्या या मोहिमेमुळे इतकी घाबरलेली आणि नाराज आहे, हे त्याच्या मित्राला माहीत नव्हते. त्याने जेव्हा घरी गेल्यावर फिंजानच्या आईची रागीट नजर पाहिली तेव्हा त्याला सत्य कळले.
दुपारी घरी आल्यावर अर्नेस्टने ट्रायलचे परिणाम रस्बी आंटीला सांगायचे ठरवले, पण वातावरण असे होते, जणू कोणी खाटीक बकरीला सांगत होता की कोणता मासाचा तुकडा कसा कापणार आहे. हेच अर्नेस्टच्या जागी फिन्जानने सांगितले असते तर तिने त्याला एक थप्पड मारली असती किंवा आपले डोके भिंतीवर आपटून घेतले असते. अर्नेस्टचे बोलणे ती असे ऐकत होती जणू एखाद्या डॉक्टरच्या हातून लहान मुलगी कडू औषध डोळे मिटून पित आहे.
अर्नेस्ट वाट पहात होता की आंटी आता आपल्याला काही खायला प्यायला देईल. फिन्जान आईच्या चेहर्यावरचे बदलणारे रंग पहात होता. त्याला आश्चर्य वाटत होते की, त्याची आई त्याची काही नवीन करण्याची प्रवृत्ती समजून का घेत नाही!
दृढनिश्चयी फिन्जानने त्या दिवशी संध्याकाळी न्यूयॉर्कला जाण्याची तयारी केली. एका कुरिअर कंपनीतर्फे आपली नौका पाठवण्याचा प्रयत्न करणे शक्य होते. त्यासाठी खर्च लागणार होता. फिन्जान आणि अर्नेस्टने आपल्या रेल्वे प्रवासाची तयारी केली.
न्यूयॉर्क फक्त त्यांच्या सुविधांपुरता मर्यादित नव्हता. महान देशाचे हे मानगर महान स्वप्नांचा रंगमंच होता. फिन्जानला दुसर्या दिवसापासूनच जाणवू लागले होते. योगायोगाने एका पत्रकाराने बफलोमध्ये जी ट्रायल घेतली होती त्याचे फोटो काढले होते. फोटोमध्ये फिन्जान नदीच्या थरथरणार्या प्रवाहात लाटांच्या करंटशी पंजा लढवताना दिसत होता. रंगीत बॉलसारखी नौका वर्तमानपत्रातून न्यूयॉर्कच्या घराघरात पोहोचली. फिन्जानला धाडसी खेळाडू म्हणून प्रसिद्धी मिळाली.
दुसर्या दिवशी रॉकफेलर विश्वविद्यालयाजवळ हडसनच्या लाटांच्या तालावर, विजेच्या वेगाने एका ग्लोबसारख्या नावेच्या मागे पाण्यावरून घसरताना फिन्जानला पाहण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी जमली होती. कोणी हात हलवून त्याचे अभिनंदन करत होता, तर कोणी त्याची किनार्यावर येण्याची प्रतीक्षा करत होते. नदीकाठच्या बागेत फिरणारी उत्तम जातीची कुत्रीसुद्धा रेलिंगवर पाय ठेवून फिन्जानच्या नौकेकडे पहात होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या रस्त्याने जहाज आणि नौका पर्वताएवढ्या उंचीच्या पाण्यातून जात होते, तेथून एक दिवस नायगारा धबधब्याचे गर्वहरण करण्याची इच्छा घेऊन एक मुलगा जाताना हजारो लोकांनी पाहिला. लोकांनी शुभेच्छा दिल्या.
दुसर्या दिवशी फिन्जानला मीडियाकडून एक भेट मिळाली. न्यूयॉर्कच्या वर्तमानपत्रात फिन्जानचा फोटो छापला गेला. बातमीसुद्धा दिली होती. अमेरिकेच्या बफलो शहरात जेव्हा कोणी देशी-परदेशी पर्यटक नायगारा धबधबा बघायला येत असे, तो ते संग्रहालय जरूर बघत असे, ज्यात नायगारा धबधबा पार करण्याचा भयंकर प्रयत्न करणार्या वीरांचे फोटो लावलेले होते. या धाडसी प्रयत्नात अनेकांनी आपले प्राण गमावले होते. पण लोकांनी जेव्हा पाहिले की एक मुलगा या मोहिमेवर निघाला आहे, तेव्हा त्यांनी आश्चर्याने तोंडात बोट घातले. हडसन नदीच्या काठी त्याला शुभेच्छा देण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमले होते.
फिन्जानच्या प्रयत्नांचा वर्तमानपत्रात उल्लेख होण्यामागे त्या किमयागाराचा हात होता. ज्याने त्याच्या नौकेला प्लास्टिकचा लेप लावला होता. त्याने संध्याकाळी आपल्या कंपनीच्या बॅनरबरोबर टाइम स्क्वेअरवर फिन्जानसाठी अभूतपूर्व गर्दी जमवली होती. नायगाराच्या मोठ्या फोटोबरोबर फिन्जानच्या हसर्या फोटोसमोर स्वत: फिन्जानने उभे राहणे, लोकांच्या आकर्षणाचे कारण होते. जगाच्या कानाकोपर्यातून येणार्या लोकांनी आपला देश, नगर, समुदाय, परिवार आिाण् स्वत:तर्फे त्याच्या मोहिमेला शुभेच्छा दिल्या.
तिथे लावलेल्या पांढर्या बोर्डावर सह्या करणार्यांची सीमा नव्हती. स्टेफेन वन, अमोस एअतों, एबेनेजेर, एम्मोस असाफित्य, दौग्लास हौप्तो, जमेश हॉल, ठोदोरे जुद:, एडविन ब्रयंत एवं होस्फोर्ड, बेंजामीन ग्रीन, बिल्ली, कोग्स्वेल, फ्रेदेरिच्क, ग्रिन्नेल, हिरम मिल्स, एमिली रोएब्लिंग, वाशिन्तो रोएब्लिंग, अलेक्सान्दर कास्सल, जॉन फ्लैक विनस्कौ, बिल्ली विले, लेफ्फेर्ट, बुक्क, मोर्देकाई एन्दिकोत, हेनरी रोब्लंद बिल्लिीपित्त मासो, पलोर रिच्केट्स जॉन अलेक्सान्दर, फ्रांक ओस्बोन गार्बेट बल्लिमोरे, गेओगं फेरिंस, जो लोच्खाचर्ट, गेओर्गे होर्तो, पाल्टर इरविंग, संफोर्ड फ्लुएत, मार्गारेट सगे, एमिल प्रेगेर, रोबेर्ट हंट, एरिक जोंस्सों, मिल्टन ब्रुमेर, चलेपभिच्क बेडफोर्ड, अल्ले टू मोंट लिंको हक्विंस, चौनसे स्टारर, राल्फ रोबेर्ट लोएव्य, अॅलन बुरहिस, गेओर्गेलो, शेल्दोरोबर्टस, ननकी देलोए फिल्जरॉय, माठेव हंटर, चिस्तोफिर जफ्फे, हेर्मो हॉउस, दोन अन्देरसों, मर्चियन होफ्फ, रास्मोंद तोम्लिंसो, म्यलेस ब्रांड, इवर गिएवर, जों स्विगेर्ट, रोबेर्ट रेस्निच्क, रोलैंड स्च्मित्त, मार्क एमेर अन्देरसो, अदम पत्रिच्कबीके, चोरिसियो सस्पेदेस मोया, निचोलास गेर्मान कूपर, रोहन दयाल, जो थॉमस दुरस्त, ज्होऊ फंग, स्कॉट गोर्डन घिओसल, वैभवराज मयंक गुप्ता, रमण चक्रधर शंघ्याला, ज्होंग्दा की, श्रुती मुरलीधरन, हर्ष नाईक, करणार तसिमी, स्टेफनी तोमसुको, जेनिफर मारी तुर्नेर, ज्हेंग क्सु, शुन यो, दिन्ग्यो जहॉग जोशुआ, ब्रयॉ कयाले, मिके, स्टेफेन, एरिक, रिचर्ड, एरिन, जेनिफर मिचेल्ले, दानियल, त्रविस, अदम, जोनाथों, ब्रितान्य, जॉन थोमस, जोसेफ, नोर्मन, श्याना, जोसेफ, मत्ठेेव, कैल्लिन रिचर्ड, कार्ल, जाकोब, मलेव, थॉमस, बेंजामिन, पत्रिच्क, तोइद अन्योनी टिमोथी, रंजित, अक्षय, अनुज, अंकेश, गौरव, ही यादी संपतच नव्हती!
एम्पायर स्टेट बिल्डिंग समोर जेव्हा फिन्जान पोहोचला तेव्हा त्याला त्याच्या स्वप्नाच्या उंचीचा अंदाज आला. टाइम एक्वायरपासून जाणार्या गर्दीने फिन्जानच्या मोहिमेला जिवंत प्रतिसाद दिला. जो कोणी पहात होता, हात हलवून त्याचा उत्साह वाढवत होता. जगाच्या सगळ्या देशातून येणारे प्रवासी तिथे हजर होते. फिन्जानने तराजूच्या एका पारड्यात या गर्दीचा उत्साह ठेवला, आणि दुसर्यात आपल्या आई रस्बीची निराशा! इथे येऊन त्याच्या स्वप्नांना नवीन ऊर्जा मिळाली.
फिन्जान भावूक झाला. त्याला वाटले नव्हते की त्याच्या विचारांना इतक्या आशेने पाहिले जाईल. एक त्याची आई सोडून जगातील सगळे लोक त्याचे स्वप्न पूर्ण व्हावे असा विचार करत होते. त्याला वेगवेगळ्या सूचना मिळू लागल्या.
अल्बानीच्या एका कॉलेजने त्याला आश्वासन दिले होते की जर त्याचे मिशन यशस्वी झाले तर त्याला पोहण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी कोच म्हणून नेमणूक केली जाईल. फिन्जान या प्रस्तावाने अभिभूत झाला होता. त्याने उपजीविकेसाठी सैन्यात भरती होण्याच्या आपल्या आईच्या सूचनेव्यतिरिक्त इतर कशाचा विचार केला नव्हता.
मेनहटनच्या अडुसष्ठाच्या स्ट्रीटवर लॉन्ड्री चालवणार्या एका चिनी महिलेने वर्तमानपत्रातून फिन्जानला विनंती केली की तो जे कपडे घालून नायगारा पार करील ते मोठी किंमत देऊन लॉन्ड्री मालकीण खरेदी करू इच्छिते.
पिट्सबर्गच्या एका भारतीयाने घोषणा केली की तो यशस्वी झाल्यावर भारतात त्याच्या नावाने स्विमिंग पूल बनवतील. रात्री साडे अकरा वाजता फिन्जान आणि अर्नेस्ट किमयागारबरोबर जेवत होते तेव्हा किमयागारकडे एका महिलेचा निरोप आला की, जर फिन्जान आपल्या मोहिमेत तिच्या ब्राझिलियन पपीला बरोबर ठेवू शकत असेल तर ती या मोहिमेसाठी दहा हजार डॉलर देईल.
फिन्जानच्या डोळ्यात अश्रू आले. ‘अरेरे, एकदा, फक्त एकदा त्याची आई म्हणाली असती की, “फिन्जान, तू तुझ्या मोहिमेत यशस्वी हो, हा माझा आशीर्वाद आहे.” पण आईचे त्याच्यावर उपकार होते. त्याचे आईवर नाही. आईने त्याला जन्म दिला होता. फिन्जानने मात्र आपल्या आईला भीतीव्यतिरिक्त काही दिले नव्हते.
रात्री उशिरा दोन व्यक्ती फिन्जानला भेटायला आल्या. ते एका नामांकित कंपनीकडून आले होते. कंपनी शहराच्या मधोमध होती. कंपनी दर वर्षी आपल्या हजारो कर्मचार्यांसाठी एका भव्य बागेत गेट टुगेदर आयोजित करत असे. सगळे कर्मचारी आपल्या कुटुंबासह सहभागी होत असत. दिवसभर मनोरंजन आणि खाण्यापिण्याचा कार्यक्रम चालत असे. वातावरण जत्रेसारखं असे. त्यांचे म्हणणे होते की, जर फिन्जान आपल्या त्या नौकेचे प्रदर्शन तिथे करेल, ज्या नौकेत तो नायगारा पार करणार आहे तर कंपनी त्याच्या मोहिमेला मदत करील. तिथे त्याची नाव एक आकर्षणाचे केंद्र होईल. कंपनीकडून नौकेवर तशा अर्थाचे बॅनर लावले जातील.
अनेक कर्मचार्यांनी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. फिन्जानला खात्री पटली की, त्याच्या मोहिमेसाठी पैसे कमी पडणार नाहीत. तो अर्नेस्टाला म्हणाला, “असा कोणी देवदूत मिळावा जो माझ्या आईला समजावू शकेल.” त्याची आई त्याच्याबरोबर इथे आली असती तर लोकांचे आशीर्वाद आणि सहयोग पाहून आश्चर्यचकीत झाली असती.
फिन्जानने बॉलच्या आकाराच्या बनवलेल्या नावेचे फोटो घेतले जाऊ लागले. काही भारतीय तरुणांनी बॉलवर लाल रंगाने टीळा लावून आपल्या भावना व्यक्त केल्या. एका जपानी मुलीने आपल्या गळ्यातील जांभळ्या रंगाचा स्कार्फ फिन्जानच्या हाताला बांधला. तिने मोडक्या तोडक्या भाषेत फिन्जानला सांगितले की “जर फिन्जान आपल्या मोहिमेत यशस्वी झाला तर ती आपल्या घराला फिन्जान नाव देईल, जे तिने अलिकडेच फ्लोरिडामध्ये खरेदी केले होते.”
असे प्रस्ताव आले की फिन्जान भावूक होत होता. तो वयाने लहान होता, पण त्याला इतकं कळत होतं की त्याने यशाची फक्त स्वप्नं पाहिली आहेत. आतापर्यंत यश मिळालेले नाही. म्हणून सगळे प्रस्ताव त्याने शांतपणे ऐकून घेतले. त्यावर कोणताही निर्णय तो घाईने घेणार नव्हता.
का कोण जाणे पण आज संध्याकाळपासून तो अस्वस्थ होता. आतल्या आत घुसमट होत होती. त्याला आईची काळजी वाटत होती. ती घरी एकटीच होती.
***
रात्री रस्बीपण सुखी नव्हती. ती घरात एकटी होती. तिने कसेबसे जेवण बनवले. पण जेवली नाही. तिला भूक लागली नव्हती. रात्री तिला लवकर झोप आली पण खरं तर ती झोप नव्हती. ती तंद्रित होती. रात्री उशीरापर्यंत जागी होती. त्या तंद्रित तिला न जाणो कोणकोणती दृश्यं दिसू लागली. एक रजतपट समोर पसरला.
रस्बीला वाटले ती पाय रोवून एका कातळावर उभी आहे. तिच्या पायाखालची जमीन खचत चालली आहे. बघता बघता पायाखालची वाळू पाण्यात बदलली. ती वेगवान प्रवाहात वाहून जाऊ लागली. पाण्याचा वाहता समुद्र तिचे जग सोडवत आहे. एक ठिकाण असे आले, जणू आकाशाच्या उंचीपासून खाली पडत आहे. एखाद्या क्षुल्लक पाण्याच्या थेंबासारखी! रस्बी जीवनाची आशा सोडून जणू पाताळात गेली. खोल पाण्यातील जीवजंतू महाभोजनासाठी तिच्याकडे धावले. रस्बीने आपल्या मुठी आवळल्या. मूठ इतक्या जोराने आवळली की तिच्या नखांनी तिचे तळहात जखमी झाले. एक जोरदार आवाज आला. जणू तारा तुटला असावा. उल्कापाताचा सहसा आवाज येत नाही. पण हा उल्कापात रस्बीच्या मनात इतक्या जोराने झाला की त्याचा आवाज आला. भीतीदायक गुंजारव झाला!
त्यानंतर दुपारपर्यंत रस्बी बेशुद्धीत- झोपेत होती. ती शुद्धीवर आली तेव्हा पलंगाखाली पडलेली होती. पाण्याची चादर मुठीत घट्ट धरण्याच्या प्रयत्नात तिने पलंगाची चादर मुठीत आवळली होती. तळहातावरचे रक्त वाळले होते.
तिला जाणवले, की फिन्जान काही दिवसांसाठी बाहेर गेला आहे. तरी तिच्या विचारांचा झंझावात तिला घुसळून काढत आहे. उद्या आपला हट्ट आणि वेड घेऊन तो या जगातून गेला तर काय होईल? ही कसली परीक्षा आहे? तिला परिणाम माहीत आहे पण ती काही करू शकत नाही.
असं काय आहे, जे फिन्जानच्या मनात जगण्याची इच्छा निर्माण करील? फिन्जानची ती गर्लफ्रेंड, काय नाव आहे तिचे...? तिला तिचे नावसुद्धा माहीत नाही. रस्बीने तिला बोलावून फिन्जानला प्रेमाने समजवायला सांगावे का? रस्बीला आठवले, फिन्जान त्या मुलीबरोबर खुश होता. रस्बी लाजली. तिला आश्चर्य वाटत होते, फिन्जान किती वेळ त्या मुलीबरोबर होता. कोणी शिकवलं फिन्जानला हे सगळं?
तिचे तिलाच आश्चर्य वाटत होते. आई असून ती मुलाबद्दल काय विचार करत आहे. मुलगा आता लहान नाही. ते दिवस गेले जेव्हा ती त्याला अंघोळ घालण्याआधी त्याचे कपडे काढून मालिश करत असे. बघता बघता तो समजूतदार झाला. घाम गाळून त्या मुलीपासून दूर झाला. ती श्वास रोखून दारातून पाहत होती. ती वेळेआधी परत आल्याने तिला हे सगळे पहावे लागले होते.
मग रस्बीने त्या मुलीशी फिन्जानला बांधावे का?
बर्याच उत्साहाने आशेने दिवस घालवून फिन्जान व अर्नेस्ट घरी परतले, तेव्हा शेजारी मित्रांच्या देखरेखीखाली रस्बी पडलेली होती. त्याला हेही कळले की तिला हार्ट अॅटॅक येऊन गेला आहे. फिन्जान आल्यामुळे मित्र निघून गेले. फिन्जानने अपराध्यासारखी मान खाली घालून त्यांना निरोप दिला.
मुलगा आल्यामुळे रस्बीमध्ये चेतना आली. ती घरातील काम करण्यासाठी उठू लागली. तिला वाटत होते की, फिन्जान आता आपल्या वेडापासून काही दिवस लांब राहील.
घराच्या वातावरणात जणू एक आवाज येत होता. मृत्यूला साथीदार बनवले. चंद्र-सूर्याला मित्र! मग आम्ही विश्रांती घेणे कोणाकडून शिकणार होतो? दोन दिवस कसेबसे गेले. फिन्जानची स्वप्नं पुन्हा समोर येऊ लागली. रस्बीची आशा पुन्हा निराशेत बदलली.
एकेदिवशी दुपारी रस्बी फिन्जानला न सांगता बाजारात गेली. फिन्जानच्या वडिलांचा एक मोठा फोटो सुंदर फ्रेममध्ये मढवून आणला. फिन्जानची मदत न घेता भिंतीवर लावला. फिन्जान आश्चर्याने पाहू लागला. कारण त्याने हा फोटो यापूर्वी पाहिला नव्हता. त्याला सुचेना की फोटोबद्दल आईला काय विचारायचे? त्याने काही विचारायच्या आत रस्बी म्हणाली, “त्यांनी देशासाठी प्राण दिले. कोणीतरी त्यांची आठवण ठेवली पाहिजे!” फिन्जानने फोटेाकडे पाहिले. एकदा आपल्या छातीला आणि डोळ्यांना हात लावला. त्याला हे कळलेच नाही की, त्याच्या आईच्या बोलण्यात त्याला टोमणा होता. उलट त्याने उत्साहाने वर्तमानपत्रात छापलेले फोटो दाखवायला सुरुवात केली. ते फोटो न्यूयॉर्कमध्ये छापले गेले होते. आईने त्या फोटोंकडे असे पाहिले जणू फिन्जानने ती आजारी असताना काढलेला एक्स-रे दाखवलाय!
बफलोमध्ये, न्यूयॉर्कमध्ये मिडियाने छापलेल्या बातम्यांचा परिणाम दिसून आला. फिन्जानची नाव ओळखून मुलं त्याच्याभोवती जमली.
एके रात्री जेवण झाल्यावर फिन्जान घराबाहेर पडला तेव्हा रस्बीचे माथे भडकले. ती जाणार्या फिन्जानला काही बोलली नाही, पण तिचे काळीज धडधडू लागले. तिने आपल्या कपाळाला पट्टी बांधली. काळा चष्मा लावला. आपले अश्रू पुसत त्याच्या मागोमाग चालत जाऊ लागली. फिन्जान सावकाश जात होता. सगळे शहर रंगीबेरंगी दिव्यांनी उजळले होते. लांब पडणार्या धबधब्याच्या पाण्याचे शिंतोडे शहराला भिजवत होते.
रस्बीला आता विश्वास राहिला नव्हता. तिने त्याला अडवले तरी तो आपल्या मोहिमेची तयारी करतच होता. आता तो कोणत्याही क्षणी आपल्या मोहिमेवर जाण्याची शक्यता होती. रस्बीला हेही माहीत होते की, फिन्जानची मोहिम सुरू झाली की तिचा अंत जवळ येईल. जगातील शेकडो लोकांनी आतापर्यंत प्रयत्न केले होते. कोणीही त्या आकाशातून पडणार्या पाण्यातून जिवंत आला नव्हता. मग फिन्जान हा कारनामा कसा करू शकेल? तो किशोरवयाचा होता. अजून मिशा आल्या नव्हत्या. रस्बीच्या अस्वस्थतेत उदासिनतेव्यतिरिक्त कोणताही रंग मिसळण्याची आशा नव्हती.
रस्बीने फिन्जानचा पाठलाग करायचे ठरवले. ती क्षणभरदेखील त्याला मोकळा सोडू इच्छित नव्हती. कधी काय होईल सांगता येत नव्हते. हा मुलगा अंधारात फिरून, मित्रांना भेटून कुठेही जाऊन काहीही करून परत यावा. फिन्जानला नजरेसमोर ठेवण्यासाठी तिनं आपली गती वाढवली.
धो धो पडणार्या पाण्याच्या जवळून जाणार्या रस्त्याने फिन्जान हळूहळू जात होता. पण नंतर नदीकडे जाणार्या रस्त्यावर येता येता त्याचा वेग वाढला. आता त्याचा पाठलाग करण्यासाठी रस्बीला धावावे लागत होते. थोड्याच वेळात तिला धाप लागली. तिला वाटले टॅक्सी करावी. पण एकतर तिला माहीत नव्हते की, फिन्जान कुठे आणि किती लांब जाणार आहे, शिवाय इतक्या रात्री एका तरुणाचा पाठलाग करताना पाहून टॅक्सी ड्रायव्हर काय म्हणेल? आणि ते सुद्धा या उपक्रमात तिच्यापुढे जाणारा तिला मुलगा तिचा पुत्र आहे.
रस्बीने टॅक्सीचा विचार सोडला आणि हिम्मत करून आपला वेग वाढवला. थोड्या वेळाने एका गल्लीतून एक मुलगा आला आणि फिन्जानला भेटला. रस्बीने अंधारातसुद्धा त्यला ओळखले. तो अर्नेस्ट होता. रस्बीला थोडे समाधान वाटले की येणारा मुलगा फिन्जानचा मित्रच आहे. नदीच्या काठाने जाणारा रस्ता पुढे सामसूम होता. लहान लहान रोपं आणि झाडांनी रस्त्याच्या काठाचा भाग बाग आणि जंगलाचे मिळतेजुळते रूप वाटत होते.
एका मोठ्या झाडाखाली फिन्जान आणि अर्नेस्ट थांबले. रस्बीने सुटकेचा श्वास टाकला. झाडाखालच्या गवत, पालापाचोळ्यातून अर्नेस्टने एक लोखंडी पाईप ओढून आणला. रस्बीला कळले की, ते दोघे यापूर्वी इथे येऊन गेले असावेत. थोड्यात वेळात अर्नेस्टने खिशातून एक रंगीत कापड काढले व ते पाईपच्या टोकाला गुंडाळले. फिन्जान झाडावर चढला होता. त्याने पाईप उंचावरील फांदीवर बांधण्यासाठी वर ओढून घेतला. रस्बी आश्चर्यचकीत झाली. तिने फिन्जानला झाडावर चढताना पाहिले नव्हते.
अमेरिकेचा राष्ट्रीय ध्वज हवेत फडकू लागला. रस्बीने आपले अश्रू पुसले. आता तिला तिथे उभे राहवत नव्हते. तिला फिन्जानला कळू द्यायचे नव्हते की, तिने त्याचा पाठलाग केला होता.
ती वळून परत जाऊ लागली. तिचा उद्देश पूर्ण झाला होता. तिने ती जागा पाहिली होती जेथून फिन्जान आपली भयंकर यात्रा सुरू करणार होता. या जागेपासून वेड्यावाकड्या रस्त्यांनी जवळजवळ साडेपाच किलोमीटर लांब गेल्यावर अलौकीक नायगारा फॉलच्या रूपाने पडत होता. अतिशय रुंद पात्राच्या पलीकडे अमेरिकेची सीमा होती आणि कॅनडाची सुरुवात होत होती. झगमगत्या दिव्यांच्या प्रकाशात दोन्ही शहरे अतिशय सुंदर दिसत होती. मध्ये जंगल होते.
रस्बी गेल्यावर दोघा मित्रांनी आपल्याबरोबर आणलेली काही पोस्टर्स झाडावर लावली.
अर्नेस्टने छोटा टॉर्च काढून पाण्यावर उजेड टाकला. त्याला कदाचित चिंचेच्या आकाराचा केशरी रंगाचा मासा दिसला असावा. फिन्जान आणि त्याच्या मित्राला आपल्या मोहिमेची तयारी करताना सोडून रस्बी परतली तेव्हा ती चिडलेली होती. ती विचार करत होती की तिला तिच्या जीवनात काय मिळाले? तिच्या मनावर लहानपणीच्या त्या दिवसाची छाप अजून होती, जेव्हा एक बादली पाण्यासाठी झालेल्या भांडणात तिच्या आईच्या हातून एका स्त्रीची हत्या झाली होती. या घटनेने तिच्या डोक्यावरचे पित्याचे छत्र पण हरवले. त्यामुळे तिला आईबरोबर जेलमध्ये रहावे लागले होते. रस्बी विचार करू लागली, फिन्जान नेहमीसाठी हरपण्याआधी तिने आपले जीवन संपवावे का? पाण्याच्या काठाने चालताना तिच्या मनात न जाणे कोणकोणते विचार येत होते. पण पाण्याच्या लाटेसारखाच एक विचार दुसर्या विचाराला नाहीसा करत होता. जड पावलांनी रस्बी घरी परत येत होती.
धावत पळत घाबरत रस्बी घरी परतली. आल्याबरोबर ती आपल्या अंथरुणावर अशी पडली जणू तिला काही माहीत नव्हते. तिला फिन्जान कधी परत आला, आला की नाही आता काही कळले नव्हते.
ती आढ्याकडे पहात मनातल्या मनात गुणगुणू लागली (सोना होगा सबको, आई पारस पत्थर लेकर रात... रात छुएगी जिसको जिसको, भूल रहेगा दिन को) सगळ्यांना आता झोपले पाहिजे कारण रात्र दगड घेऊन आली आहे. रात्र त्याला ज्याला स्पर्श करील तो दिवसाला विसरेल. रस्बीला झोप येत नव्हती. तिचा थकवा, अस्वस्थता सगळे दूर गेले होते. आता तिला भीती वाटत नव्हती. तिला वाटत होते जणू ती ते ठिकाण पाहून आली आहे, जिथे नियती तिच्या मुलाला फाशी देणार आहे.
रस्बी अचानक जोरजोरात रडू लागली. रडता रडता झोपी गेली.
रस्बीने तो जलप्रपात आपल्या जीवनात अनेकवेळा पाहिला होता. त्या अथांग पाण्याच्या पडणार्या वादळाने तिला कधी असा संकेत दिला नव्हता की एक न् एक दिवस तो तिचा मुलगा मागेल. झरा पार केल्यावर विजेच्या ज्वालामुखीसारखे वर्लपुलापर्यंत जाणारे पाणी एकीकडे आणि कापसासारखा मऊ जो अजूनही किशोर होता तो दुसरीकडे. रस्बीला फिन्जानची प्रेयसी भेटली. तिने तिला घट्ट धरले. ती मुलगी पळू लागली. रस्बी तिच्या मागे धावली. रस्त्याने जाणारे लोक तिला वेडी समजू लागले. मुलगी हाती आल्याबरोबर तिने तिला खांद्याला धरून गदागदा हलवले व म्हणाली, “बोल बोल, तू करशील ना एवढे काम? तू माझ्या मुलाला खोटं सांगशील?” मुलीने भीतीने डोळे मिटून घेतले. तिने काही उत्तर दिले नाही. रस्बी पुन्हा ओरडली, “तू त्याला खोटं सांग, तो आता लहान नाही. जग जिंकण्याचे स्वप्न पहात आहे. तो असेही करू शकतो. बोल, सांगशील ना त्याला... सांग की तुझ्या पोटात त्याचे बाळ आहे.” अचानक ती मुलगी आणि रस्त्यावरचे लोक गायब झाले. त्या रात्री रस्बीने अशी अनेक स्वप्नं पाहिली.
सकाळी नाश्ता बनवताना ती फिन्जानला म्हणाली, “जगात यापूर्वी कोणी तरी हे काम केलेले आहे, ज्यासाठी तू स्वत:ची हत्या करायला निघाला आहेस.”
या प्रश्नाने फिन्जान चकित झाला. तो म्हणाला, “आई, हे तू काय बोलत आहेस? सगळी कामं जगात कधी ना कधी झाली आहेत, कोणी ना कोणी केली आहेत.”
“मी तुझ्यावर माझ्या मुलाला मारल्याचा दावा दाखल करीन.”
फिन्जान हसला.
“जर मी माझा उद्देश्य पूर्ण करू शकलो तर तू दावा हारशील. जर पूर्ण करू शकलो नाही... तर...”
“हां हां! बोल, थांबलास का? बोल, पुढे बोल!” रस्बीने ओव्हनमध्ये गरम झालेली प्लेट फिन्जानच्या डोक्यावर फेकून मारली. प्लेटचे तीक्ष्ण टोक फिन्जानच्या कपाळावर लागले. कपाळावरून रक्ताची धार वाहू लागली. फिन्जान ओरडला. पण त्याने तो वार सहन केला. त्याने एका हाताने कपाळ दाबून धरले आणि दुसर्या हाताने रुमालाच्या घड्या काढून डोक्याला गुंडाळू लागला. रुमाल रक्ताने माखला. फिन्जानने स्वत: जाऊन प्लेट उचलली. ती अजूनही गरम होती. त्याने पाहिले आईने त्याच्यावर वार तर केला होता, पण आता ती अस्वस्थ झाली होती. तिचे लक्ष फिन्जानच्या कपाळाकडे होते. फिन्जान गप्प बसला. त्याला माहीत होते की आई उद्विग्न अवस्थेत स्वत:ला काही करून घेईल. तो मुकाट्याने हळूच बाहेर पडला.
दारावरची बेल वाजली तेव्हा रस्बी फिन्जानच्या डोक्याला पट्टी बांधत होती. पट्टी बाजूला ठेवून रस्बीने दार उघडले. इतर प्रसंग असता तर ती आनंदाने उत्साहित झाली असती. पण या क्षणी तिच्या मनावर फिन्जानच्या जखमेचा भार होता. ती हसू शकली नाही. पण तिचा चेहरा बदलला. फिन्जानने दाराकडे पाहिले, दारात अतिशय ठेंगणा माणूस उभा होता. त्याने लांब दाढी ठेवलेली होती. बहुधा मुसलमान असावा. त्याने रस्बीला काही सांगितले. मग फिन्जानची जखम पाहिली. जो परत जाऊ लागला. रस्बीने इशार्याने फिन्जानला दाराजवळ बोलावले.
रस्बीने काही दिवसांपूर्वी घोडा खरेदी करण्यासाठी ऑर्डर दिली होती. हे अजून फिन्जानला माहीत नव्हते. आता आलेला माणूस घोडा घेऊन आला होता. घोड्याला एका झाडाला बांधून ठेवले होते. फिन्जान आश्चर्याने पाहू लागला. रस्बीला आश्चर्य वाटले नाही. काही दिवसांपूर्वी तिने त्या अनोळखी माणसाकडून घोड्यावर बसण्याचे प्रशिक्षण घेतले होते.
रस्बीने जवळ जाऊन घोड्याला चुचकारले. त्या घोड्याने जणू तिला ओळखले होते. तो तिचा हात चाटू लागला.
रस्बीला वाटत होते की फिन्जानने विश्रांती घ्यावी. पण थोड्या वेळात येतो असे सांगून फिन्जान निघून गेला. तो गेल्यामुळे तिला समाधानही वाटले. कारण त्यामुळे तिला वाटले की त्याची जखम फार मोठी नाही. ती घरात गेली. आता तिला स्वत: अणि फिन्जानबरोबरच घोड्याचीसुद्धा देखभाल करायची होती.
दुपार झाली तरी फिन्जान परतला नव्हता. रस्बी फार काळजी करत नव्हती. कारण तिला माहीत होते की या वेळी तो कुठे असेल. तरीही तो काही न खाता-पिता गेला होता आणि आता बराच उशीर झाला होता.
घरात नवीन स्कूटर आणली की मुलं ती चालवल्याशिवाय रहात नाहीत. तसेच रस्बीला घोड्यावरून रपेट करावीशी वाटत होती. फिन्जानला बोलावून आणण्याचे निमित्त पण होते. हॅट घालून इकडे तिकडे बघत रस्बी झाडाजवळ गेली. रस्बीने नदीकाठी जाऊन पाहिले. फिन्जानने ज्या झाडावर झेंडा लावला होता तो लांबून दिसत होता. पिवळ्या आणि केशरी रंगांची बॉलच्या आकाराची नाव तिथे होती. फिन्जानचे तीन-चार मित्र अर्नेस्टबरोबर तिथे हजर होते. रस्बी लांब उभी राहून पाहू लागली.
थोड्याच वेळेत दोन महिला तिथे कारने पोहोचल्या. गाडीतून उतरून नावेजवळ आल्या. त्यांच्यापैकी एकीच्या हातात ब्राजीलियन वंशाचा लहानसा कुत्रा होता. कुत्र्याच्या डोळ्यावर काळा चष्मा होता आणि त्याच्या गळ्यात रेशमी स्कार्फ बांधलेला होता. त्या महिलेने फिन्जानच्या हाताचे चुंबन घेतले. रस्बीला त्या महिलांचे तिथे येण्याचे कारण माहीत नव्हते. तिने तोंड वेडेवाकडे केले. एवढे नक्की की त्या महिला फिन्जानला रोखण्यासाठी आलेल्या नव्हत्या. उलट त्या महिला वरचेवर फिन्जानचा हात हातात घेऊन चुंबन घेत होत्या. त्यावरून रस्बीला शंका आली की, फिन्जानची यात्रा सुरू होण्याची वेळ आली की काय? फिन्जानने आपली बॉलसारखी नौका अगोदरच तिथे तयार ठेवली होती. त्याचे मित्र हजर होतेच. त्या महिला त्याला प्रोत्साहन देत होत्या.
फिन्जान यात्रेला निघत तर नाही ना? तिच्या लक्षात आले, फिन्जान दुपारी जेवला नाही. आपल्या शेवटच्या यात्रेवर फिन्जान उपाशीच जाईल का? एक आई असून रस्बी फिन्जानला असे पाठवेल? फिन्जान शेवटच्या क्षणी आईला भेटायला येणार नाही का?
रस्बीचं मन हा:हा:कार करू लागले. पण इतक्या लोकांसमोर त्याला अडवून लज्जित करण्याची तिची हिम्मत झाली नाही. तिने आपले अश्रू आवरले. एका झाडाच्या मागे उभी राहिली. टक लावून पाहू लागली. एकदा तिच्या मनात आले, देवाला तिला काही द्यायचेच असेल तर त्याने फिन्जानला या मोहिमेत यश द्यावे. हा विचार जसा आला तसा नाहीसा झाला. कारण तिच्या डोळ्यासमोर आकाशातून पडणार्या पाण्याचा तो दैत्याकार झरा रजतपटासारखा पसरला.
हे काय? रस्बीचं सर्वस्व हरपले.
हातात रंगीत रूमाल घेऊन मित्रांनी आणि त्या महिलांनी फिन्जानला रवाना केले. त्याची पिवळी, सोनेरी, केशरी नौका विशालकाय बॉलसारखी किनार्यावरच्या उथळ पाण्यावर डळमळू लागली.
रस्बी किंचाळली. तेथून परतली. घोड्यावर बसून विरुद्ध दिशेने जाऊ लागली. वाहत्या पाण्याच्या गर्जनेत बाकीचे आवाज सामावले. रस्बीच्या आशा-आकांक्षांसारखे!
पाण्याचा वेग काठाला कमी होता. पण मध्ये तीव्र होता. ती शंकरा सारखी निसर्गाशी लढत होती. कोणाला काही माहीत नव्हते. सूर्यापासून तुटून उल्का पडली होती. तिच्या भीषण झोक्याने नवीन ध्रुवीकरण जन्माला येणार होते. काय वाचणार होते, काय जाणार होते, ते काळाच्या गर्भात होते. अथांग पाणी एखाद्या वितरागी संन्याश्यासारखे पडत होते. जणू विधात्याने निर्माण केलेल्या सृष्टीला धुऊन काढण्याचे पवित्र कार्य त्यालाच करावयाचे आहे!
आकाशात उडणारे पक्षीसुद्धा त्या अलौकिक नौकेकडे पाहत होते. जेथून ही मोहीम सुरू झाली होती तेथील झाडांवर पोस्टरच्या रूपाने प्रार्थना, शुभेच्छा, आराधना लिहिलेल्या होत्या. फिन्जानच्या चित्रासोबत लिहिले होते, “आम्ही जेव्हा हे जग सोडून परत जाऊ तेव्हा आकाशात आमचे स्वागत करणारा खुदा ते श्वास मोजणार नाही जे आम्ही इथे घेतले होते. आम्ही आमच्या पावलांच्या निशाण्यांनी धरतीच्या छातीवर ज्या प्रार्थना लिहून जाणार आहोत त्या वाचण्याचा प्रयत्न करील.” तो कागद पतंगासारखा जंगलात उडत होता. काही कागदांवर फिन्जानने आपल्या हाताने लिहिलेल्या शाळेतील प्रार्थना होत्या. सूर्याने त्या भयंकर दृश्याचा फोटो घेऊ नये म्हणून आकाशाने काही ढग सूर्यावर पसरले. सूर्यप्रकाश अंधूक झाला. थोड्या वेळेसाठी आसमंत स्तब्ध झाला.
रस्बी घोड्यावर बसून उद्विग्न अवस्थेत इकडून तिकडे धावत होती. ती काही निष्णात घोडेस्वार नव्हती. रस्ता उंचसखल होता. रस्त्यावर शांतता होती. घोड्याला बहुधा कळले असावे की त्याची मालकीण संकटात आहे. घोडा त्या रंगीबेरंगी नावेच्या दिशेने पळत होता. रस्बीला लगामाची शुद्ध नव्हती ना जीनची. ती समोर पाहत नव्हती. तिची नजर नावेवर होती. थोड्या अंतरावर जाऊन त्या नावेला अतिशय वेगाने पडणार्या पाण्याबरोबर पाताळात पडायचे होते. वेगवान लाटांच्या ज्वालामुखीत वाहून जायचे होते. हा निसर्गाच्या परिक्षेचा क्षण होता. फिन्जानला आपले धाडस आणि ब्राजिलियन पपीबरोबर या नौकेत बसताना रस्बीने पाहिले होते.
पडत्या पाण्यात एखादे फुलपाखरू पडावे तशी ती नौका पडताना रस्बीने पाहिले होते. थिजलेल्या डोळ्यांनी पाहिलेल्या त्या दृष्याने रस्बीच्या आतून न जाणो काय नेले.
त्या संध्याकाळी बर्याच लोकांना चिंचेच्या आकाराचा केशरी रंगाचा मासा दिसला. तो आपल्या शरीरातून धूर सोडून पाणी गढूळ करतो. त्यामुळे उथळ पाणी आणि खोल पाणी यामध्ये भ्रम उत्पन्न करतो.
जल प्रपातानंतर काही अंतरावर बनलेल्या वर्लपूलच्या उद्दाम लाटांमध्ये रस्बीला तो मासा दिसला. तिचे डोळे थिजले!
ती कितीतरी तास तिथे एकटी बसली होती. तिची नजर पाण्यावर होती. पिवळ्या-केशरी रंगाच्या धागेदोरे निघालेली चादर पाण्याच्या वेगाने थपडा खाताना दिसली. तेव्हा ती तंद्रितच चालत किनार्यावर आली आणि तिने पाण्यात उडी मारली.
रस्बीने जलसमाधी घेतली.
खोल पाण्यातील जीवजंतूंच्या भोजनासाठी नियतीने तिला वाढले होते.
दुसर्या दिवशी वर्तमानपत्रात फिन्जानच्या अयशस्वी मोहिमेची लहानशी बातमी आली होती.
***