(कादंबरी)
मूळ हिंदी लेखक
प्रबोधकुमार गोविल
मराठी अनुवाद
डॉ. सुशीला दुबे
अनुवादिका परिचय
---------------------
* सुशीला दुबे
जन्म : 22-7-1936
* शिक्षण- एम.ए.पीएच्.डी. (पुणे विद्यापीठ)
* साहित्य-
हिंदीतून मराठीत अनुवाद केलेल्या एकवीस कादंबर्या व नऊ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत.
हिंदीतून मराठीत व मराठीतून हिंदीत अनुवाद केलेल्या कथा दर्जेदार मासिकांतून प्रकाशित झालेल्या आहेत.
* संपर्क-
डॉ. सुशीला दुबे,
फ्लॅट क्र. 303, बिल्डिंग डी-2,
शिवसागर को-ऑप. सोसायटी,
माणिक बाग, सिंहगड रोड,
पुणे-411051
मो.- 9923011613
***
मूळ लेखक परिचय
------------------
* प्रबोधकुमार गोविल
जन्म : 11 जुलै 1953
* साहित्य-
देहाश्रम का मनजोगी (हिंदी व सिंधीमध्ये), बेस्वाद मांस का टुकडा, रेत होते रिश्ते, वंश, आखेर महल (हिंदी व पंजाबीमध्ये), जल तू जलाल तू (नऊ भाषेत प्रकाशित)- या सगळ्या कादंबर्या.
अन्त्यस्त, सताघर की कंदराए, खाली हाथवाली अम्मा, थोडी देर और ठहर (हिंदी व पंजाबीमध्ये), हार्मोनल फेसिंग (इंग्रजी अनुवाद)- सगळे कथासंग्रह.
सौ लघुकथाएँ (लघुकथा संग्रह), पडाव और पडताल-8 (संपादित लघुकथा संकलन), रेडोलेन्स ऑफ लव्ह (इंग्रजी अनुवाद), उगते नहीं उजाले (हिंदी-इंग्रजीत), मंगल ग्रह के जुगनू (याच भाषेत) याद रहेंगे देरतक (संपादित).
बालसाहित्य - तीन पुस्तके प्रकाशित
कविता संग्रह- रच्चासासी नाचे दिल्ली, शेयर खाता खोल सजनिया, उगती प्यास दिवंगत पानी, रास्ते में हो गई शाम- संस्मरण.
* संप्रती-
प्रोफेसर व निदेशक, ज्योति विद्यापीठ महिला विश्वविद्यालय, जयपूर.
* संपर्क-
बी-301, मंगलम जाग्रती रेसिडेन्सी, 447, कृपलानी मार्ग, आदर्शनगर,
जयपूर-302004 (राजस्थान).
****
हिंदी ‘जल तू जलाल तू’ या प्रबोधकुमार गोविल यांच्या कादंबरीच्या आत्तापर्यंत तीन आवृत्ती प्रकाशित. याच कादंबरीची आतापर्यंत इंग्रजी, राजस्थानी, ओडिया, असमिया, तेलगू, सिंधी, उर्दू आणि पंजाबीमध्ये भाषांतरे प्रकाशित झाली आहेत.
******
दुर्गम यात्रेच्या आधी
पाण्यात फार शक्ती आहे. योग्य वातावरणात हे दगडासारख्या बिळामध्ये शिरून एक मोठे झाड काढून आणते. थोड्या शिंतोंड्यांनी भडकलेल्या ज्वाळांचे गर्वहरण करते.
पाण्याने माणसावर आलेला आपला हक्क कधी सोडला नाही. कधी त्याचे रक्त पांढरे केलेे, कधी माणुसकीच्या नात्यांना मातीत मिळवले.
या कादंबरीत अशा एका स्त्रीची कथा आहे जिच्या आईला बादलीभर पाण्याने तिच्यापासून हिरावून नेले होते. म्हणून अमेरिकेतील विशाल धबधबा ‘नायगारा’ने आपला वाहता ज्वालामुखी तिच्या मुलाच्या जिवामागे लावला तेव्हा ती व्याकूळ झाली. रागावली!
याच कादंबरीत अशा एका मुलाची कथा आहे, ज्याने जगातील महान धबधब्याच्या रूपाने वाहणार्या पाण्याला पिऊन टाकण्याचे स्वप्न पाहिले, जसे पवनपुत्र मारुतीने जळत्या सूर्याला घशात ठेवण्याचे दुस्साहस केले होते.
या कादंबरीच्या चादरीवर लाल, काळे, पिवळे डाग त्या जीवनांचे पडले आहेत, जे निसर्गाच्या जन्मचक्रात आपला वेग घालवून डळमळले. त्यामुळे त्यांचे परमतत्त्व नाहीसे झाले आणि ते फक्त ‘आत्मा’ राहिले.
ही कादंबरी तुम्हाला हा प्रश्न विचारेल की राष्ट्रीयता काय असते? पिता, पती, पुत्राबरोबर आपले नशीब बांधून स्त्री जेव्हा देशोदेशी सीमा बदलत जाते तेव्हा तिची राष्ट्रीयता कोणाच्या मनासारखी असते? स्त्रीचा धर्म काय आहे? स्त्रीची जात कोणती आहे? कादंबरी हेही सांगण्याचा प्रयत्न करील की स्त्री काय असते!
मला भीती आहे की या कडवट प्रश्नांमुळे तुमचे मनोरंजन तर होणार नाही. तरीही माझे तुम्हाला निवेदन आहे की वाचताना थकून जाऊ नका. फुलपाखराच्या मागे धावताना जर एखादी निरागस मुलगी लांब एखाद्या बागेत निघून गेली तर लपून तिच्यावर नजर ठेवा. तिच्या मागे जाणारा कोणी मुलगा तिचे चुंबन ना घेवो. कुठे एकांतात हिरवळीवर लोळणारे तरुण मन परमेश्वराची परीक्षा न घेवो!
ही कादंबरी फक्त पाण्याची कथा नाही. ही पाणी वाळून जाण्याची सुद्धा कथा आहे. पाणी वाळले की जमीन वाळू लागते. माणसं भाजून निघतात. आणि मग पश्चात्तापाच्या आगीत पाणी पेटू लागते. माणसाची ईर्षा त्याच्या विवेकाची वाफ बनवून उडवून लावते. ही वाफ जेव्हा परमेश्वराच्या दाराशी जाते तेव्हा आश्चर्यचकीत झालेला परमेश्वर खाली वाकून पाहतो. तो सुकलेल्या नद्या, नाले, तलाव पुन्हा भरतो. सगळे गाऊ लागतात, नाचू लागतात, जीवन पुन्हा सुरू होते. आकाश सुटकेचा श्वास घेतो.
निसर्गाने जेव्हा माणूस बनवला तेव्हा आपल्यासारख्या रूपात सजवले. आपल्यासारखी झाडं, पानं, झरे, नाले, गोड पाणी शरीरात टाकण्याचे झरे, नवीन पानं पोसण्यासाठी दुधाचे झरे, नाती बनवण्यासाठी रक्ताचे झरे, अनारशुद्धीसाठी मळाचे झरे.
झरे सीमा ओलांडतात. ते शिखरापासून पायथ्यापर्यंत वाहतात. आकाश पाताळ सीमा बनतात. देशाच्या हद्दी बनतात. समुद्राच्या खार्या पाण्याचा स्रोत बनतात. इतिहासात नोंद झालेल्या महानायकांच्या आशेच्या नावेचे शीड, डोलकाठी!
- प्रबोधकुमार गोविल
*****
जल तू, ज्वलंत त!
1
--------------
त्यावेळी त्या दालनात एकूण अकरा लोक होते. ते इतर देशातून आलेले प्रवासी होते. त्यांच्या भाषा वेगवेगळ्या होत्या. कदाचित विचारसुद्धा! परंतु सगळे एकाच दिशेने विचार करत होते. बहुतेक लोकांचे मत असे होते की, या आत्महत्याच होत्या. कसेही करून यांना थांबवायला पाहिजे होते. कदाचित थांबवण्याचा प्रयत्न झालाही असेल, पण आता ते एखाद्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या योद्ध्यांसारखे इतिहासजमा झाले होते.
अमेरिकेतील एका लहानशा नगरात बफलोच्या एका मुख्य रस्त्यावर ते स्मारक-संग्रहालय बनले होते. ते अशा लोकांची कथा सांगत होते ज्यांनी कधी विश्वविख्यात धबधबा ‘नायगारा फॉल्स’च्या अति उंचावरून पडणार्या पाण्यावरून वहात खाली येण्याचा धोकादायक प्रयत्न केला होता. हे धाडस करून त्यांना काय मिळणार होते कोण जाणे! पण त्यामुळे त्यांनी काय घालवले हे आता जग पहात आहे. अनेक पर्यटकांनी संवेदना आणि समर्थन प्रकट करण्यासाठी त्यांच्या चित्रावर हस्ताक्षरं केली होती. हृदयविदारक संदेश लिहिले होते. पाणी, ज्याला जीवन, अमृत म्हणतात, त्याने त्यांचे जीवन गिळून टाकले होते. यात दोष पाण्याचा नव्हता. अशा प्रकारची धोकादायक जोखीम उचलणार्यांचा होता. ते चांगले पोहणारे असावेत. एकाने लाकडी बॉक्स बनवून, त्यात स्वत:ला बंद करून, वरून विजेच्या गतीने वाहणार्या पाण्यात उडी घेतली होती. कोणी प्लास्टिकची नावेसारखी पाणबुडी बनवून, त्यात बंद होऊन वरून उडी मारली होती. कोणी पॅराशूटसारखा पारदर्शक चेंबर बनवून त्यात जलसमाधी घेतली होती. त्या सगळ्यांनी यश मिळवले नाही. यशाची स्वप्नं इतिहासात कैद केली. हा धबधबा पहायला येणारे पर्यटक या लोकांबद्दल ऐकून आश्चर्यचकीत होत होते.
मी तेथून बाहेर पडलो, तेव्हा त्याच लोकांचा विचार करत होतो. ज्यांनी अमर होण्यासाठी जीव पणाला लावला होता. रस्त्यापासून जरा पुढे एका कोपर्यावर एक मोठी इमारत होती. तिथे धबधबा पहाण्यासाठी तिकीट विकत घ्यावे लागत होते. इथे पर्यटकांसाठी मोठा बाजार होता. तिथे अनेक आकर्षक वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या होत्या. इथे अनेक देशाचे स्वादिष्ट पदार्थ उपलब्ध होते. लहान-मोठ्या सगळ्या लोकांमध्ये एक प्रकारचा उत्साह होता. ही इमारत अशा ठिकाणी होती, जिथे तीन रस्ते एकत्र मिळतात. एक रस्ता वॉशिंग्टनकडे जाणार्या रस्त्याला मिळत होता. दुसरा रस्ता धबधब्याच्या समानांतर जात होता. तो वर्लपूलजवळून बफलो विश्वविद्यालयाच्या परिसरापर्यंत जात होता. तिसरा रस्ता धबधब्याकडे जात होता.
इथे एका गोष्टीकडे माझे लक्ष गेले. साधारणपणे इतक्या तीव्रगतीने वाहणार्या पाण्यात मासे असणे शक्य नसते. पण लक्षपूर्वक पाहिल्यावर केसरी रंगाचा चिंचेच्या आकाराचा मासा मला पाण्याच्या वर दिसला. रुंद फट असलेल्या एका नदीचे पाणी झर्यासारखे पडत होते. ते काही ठिकाणी खोल होते तर काही ठिकाणी उथळ होते. पाण्याच्या धारेची तीव्रता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी होती. बहुधा हेच पाणी भूमिगत मार्गाने जाऊन दोन देशांच्या सीमा बनवत होते. पाण्याच्या पलीकडे कॅनडाच्या सुंदर इमारती दिसत होत्या.
नायगारा फॉल्सजवळ बफलो विश्वविद्यालय आहे. काल काही तरुण विश्वविद्यालयाच्या गेट जवळून फोटो घेत होते. त्या वेळी एका झाडाच्या बारीक फांदीचा फोटो त्यांनी घेतला. तो का घेतला त्यांनाही माहीत नसावे. पर्यटक जे फोटो घेतात, त्यात बहुधा चेहरेच असतात. गर्दीच्या ठिकाणच्या पर्यटनस्थळावरून कॅमेर्यात कैद होऊन काय काय, कुठे कुठे जाऊन पोहोचते कोण जाणे! नंतर त्यापैकी काही गोष्टी बाहेर येतात आणि प्रसिद्ध होतात. झाडाच्या त्या फांदीवर एक लहानसे घर होते. आता ते जर चिमणीने बनवलेले असते तर त्याला घरटे म्हटले असते, पण ते घरच होते, कारण ते माणसाने बनवले होते. फक्त सजावट करण्यासाठी!
त्या घराकडे जाणार्या येणार्यांचे फारसे लक्ष जात नव्हते, पण नकळत ते कॅमेर्यात आले होते. दररोज तेथून कितीतरी लोक गप्पा मारत निघून जात होते.
नायगाराचे पडणारे पाणी पाहण्यासाठी अगोदर लिफ्टने जमिनीच्या खाली जावे लागत होते. मग शिपमध्ये बसून, राजहंसाच्या गतीने जाऊन, अथांग पाण्याच्या समुद्राचा सामना करावा लागत होता. पाण्याचा वेग पाहून लोकांना समुद्रात बनलेल्या प्रदेशाची जाणीव होत होती. या पाण्याच्या दर्शनाने लोकांना जवळपासच्या भागात फिरणे जास्त बरे वाटत होते.
असं म्हणतात की अशा ठिकाणीच आत्मे राहणे पसंत करतात. जगात करोडो लोक येतात-जातात. काही लोक या जगात आल्यावर विभिन्न कारणांनी येथून जात नाहीत. सुख-दु:ख, अन्याय, जिज्ञासा, चमत्कार, दुर्भाग्य-सौभाग्य, संशय वगैरे कारणांनी या जगातच रहातात. शरीर तर ठरलेल्या वेळेनंतर मातीत मिसळते, पण प्राण इथेच रहातात. मग मायावी शक्तीने आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करून घेतात. यांना कोणी भूत-प्रेत म्हणतात तर कोणी आत्मा!
एका पर्यटकाच्या कॅमेर्यात कैद झालेल्या डहाळीवरल्या घराने सगळ्यांना गोंधळात टाकले होते. तो फोटो साधारण फोटोप्रमाणेच घेतला होता. पण त्यात एक विशेषता आपोआप आली होती. फोटो पहाताना दर वेळी त्याचा रंग आणि शेड वेगवेगळी दिसत होती. पर्यटकाने तो फोटो एका स्टुडिओत विकला. हा स्टुडिओ एका जाहिरात कंपनीचा होता. कंपनी फोटोचा उपयोग जाहिरातीत करत होती आणि भरपूर नफा मिळवत होती.
काही महिने गेले. टर्कीच्या एका व्यापार्याने आपल्या घराजवळच्या प्रिटिंग प्रेसमध्ये पाऊल ठेवले. व्यापारी फळांचा व्यापार करत होता. तो फार उत्साहित दिसत होता. त्याचा मुलगा काही दिवसांपूर्वी दुबईहून बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेऊन आला होता. आता बाप-लेकांनी मिळून आपला व्यवसाय वाढवण्याची योजना बनवली होती. फळांचा व्यापारी आपल्या पॅकिंग मटेरियलचे डिझाइन घेऊन छापून घ्यायला आला होता. प्रेसने त्याला अनेक आकर्षक डब्यांचे नमुने दाखवले. त्यात एक अतिशय सुंदर, गवताच्या काड्यांनी बनवलेल्या डब्याचा नमुना होता. तो डबा असा दिसत होता, जणू चिमणीच्या मोठ्या घरट्यात ताजी फळं ठेवून पॅक केली आहेत. अशा प्रकारे ठेवलेली फळं नैसर्गिक आणि पर्यावरण संरक्षणात ठेवल्यासारखी वाटत होती. शिवाय प्रेसच्या मालकाने सांगितले की, हे डिझाइन मौलिक आहे. याचे प्रतिरूप उपलब्ध नाही. प्रेसने त्या डिझाइनचे पेटन्ट घेतले होते.
गवताच्या काड्यांनी बनवलेल्या घराचा नमुना असलेला डबा त्याच फोटोच्या आधारावर बनवला होता. जो त्या फळ व्यापार्याच्या मुलीने आपल्या अमेरिकेच्या प्रवासात घेतला होता. या डब्याचे वैशिष्ट्य हे होते की, त्यात ठेवलेली फळे झाडाला लागलेल्या फळांसारखी दिसत होती. जणू त्यांना तिथेच गवतात गुंडाळले असावे. व्यापार्याला तो डबा आवडला. लवकरच तो डबा त्याने पाठवलेल्या फळांची ओळख बनला. डबा पाहिल्यावर असे वाटत होते, जणू ताज्या फळांचा सुगंधसुद्धा त्यात सुरक्षित असावा.
जगरहाटी चालत आहे. फक्त चालत नाही, याचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणम असा होता की, पानगळीनंतर आलेला वसंत आणि त्यानंतर आलेल्या ग्रीष्म ऋतूने दार वाजवले, तेव्हा बफलोमध्ये येणार्या पर्यटकांची संख्या वाढली होती. पर्यटक वाढले तर फळांची विक्री वाढली. पर्यटक कोठूनही आले तरी ते पाण्याची ही खाण बघायला जरूर येत. नायगारा बघायला आले तर त्यांना त्या इमारतीत यावे लागे जेथून बुकिंग केल्यावर यात्रा सुरू होत असे. इमारतीतीला दुकाने आणि कॅफेटेरिया माल आणि माणसांनी भरलेला राहू लागला.
रात्री दोन-तीन वाजेपर्यंत पांढर्या-पिवळ्या रंगांची लॉरी इमारतीच्या वरच्या मजल्यावर फळांच्या डब्यांचा ढीग लावत असे. तीन मजूर लिफ्टमधून ते डबे वर आणत असत. प्रवाशांच्या आदर-सत्काराची व्यवस्था करताना त्या इमारतीत ना दिवस दिसत होता ना रात्र. पर्यटक रात्रीसुद्धा शहरात पसरलेले असत. झर्याजवळ तर जास्तच असत. झर्याच्या चारी बाजूला असलेली बाग अशी झगमगत असे, जणू इंद्रदेव टॉर्च लावून पहात आहे की, धरतीवर इंद्रलोकापेक्षा जास्त सुंदर दृश्य तर उभे राहिले नाही ना!
त्याच बफलोमध्ये एका रात्री एक जोडपे आपल्या दोन लहान मुलांसह एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले. चौघांपैकी कोणीही रेस्टॉरंटची सजावट पाहण्याच्या मूडमध्ये नव्हते. सकाळपासून फिरत असल्याने दमलेले असावेत आणि भूक लागली असावी. ते लवकर जेवण आटोपून हॉटेलच्या आपल्या खोलीत जाऊन झोपू इच्छित होते. वेटरने मेनू आणून ठेवला, पण त्यांनी तो फक्त पाहिल्यासारखे केले. मुलांना काय पाहिजे ते आईला माहीत असते. आईने साधारण दक्षिण भारतीय जेवणाची ऑर्डर दिली. जेवण यायला फार वेळ लागला नाही.
पण तेवढ्यात अशी एक घटना घडली की मुलांचे आई-वडील आश्चर्यचकीत झाले. सात वर्षाच्या मुलाने जेवणाचे ताट बाजूला केले. पाण्याने भरलेला मोठा जग उचलला आणि तोंडाला लावून गटागट पाणी पिऊ लागला. तिघे बघतच राहिले. मुलगा इतका नादान नव्हता की हॉटेलमध्ये जग तोंडाला लावून पाणी पिऊ शकेल. तो एका चांगल्या शाळेत शिकत होता. त्याच्या सवयी चांगल्या होत्या. त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या लहान मुलाने तीन लिटर पाणी एका दमात पिऊन टाकले होते. एक वेटर येऊन मुलाकडे बघू लागला. त्यामुळे आई-वडिलांना लाजिरवाणे वाटले. वेटरला ही घटना मजेशीर वाटली. त्याने जग उचलला आणि पुन्हा भरून आणण्यासाठी धावला.
वेटर पाणी घेऊन येईपर्यंत अशीर झाला होता. मुलाने डोळे बंद केले होते. तो झोपेमुळे एका बाजूला कलंडला होता. आईने त्याला आपल्या मांडीवर घेतले आणि पदराने वारा घालू लागली. लहान मुलगी या अचानाक घडलेल्या घटनेने घाबरली होती. तिने आपल्या भावाला असे असभ्यपणे पाणी पिताना कधी पाहिले नव्हते.
जेवण आले पण कोणी काही खाल्ले नाही. कोणी काही बोलले नाही. बिल दिले. झोपलेल्या मुलाला वडिलांनी घेतले, खांद्यावर मान ठेवली. आई त्याला जागा करण्याचा प्रयत्न करत होती, पण मुलगा बेशुद्ध झाल्यासारखा गाढ झोपेत होता. ते कुटुंब ज्या हॉटेलमध्ये उतरले होते, ते हॉटेल जवळच होते. ते हॉटेलमध्ये आले. मुलाला कॉटवर झोपवले. तो झोपेत होता. त्याची तब्येत बिघडलेली नव्हती. आता त्यांची भीती कमी झाली होती. भूक जाणवू लागली होती.
आईने ठरवले की काही फळं मागवून घ्यावी. नाश्त्याचे काही पदार्थ त्यांच्या जवळ होतेच. थोड्याच वेळात एक वेटर एक ट्रॉली घेऊन खोलीत आला. ट्रॉलीवर ज्यूसच्या ग्लासबरोबर एका सुंदर डब्यात काही फळं होती. लहान मुलीला तो डबा आवडला. ती ट्रॉलीजवळ गेली. असे वाटत होते, तो डबा नाही, चिमणीच्या घरट्यात फळं ठेवलेली आहेत.
त्या कुटुंबासाठी तो दिवस आश्चर्याचा असावा. लहान मुलीने त्या डब्याला हात लावला. त्याबरोबर तो डबा जळू लागला. अगोदर काही ठिणग्या निघाल्या. मग ज्वाळा निघू लागल्या. मुलीच्या वडिलांनी वेटरला बोलवण्याचा इमर्जन्सी कॉल स्वीच दाबला. मुलीला जळणार्या डब्यापासून लांब केले. मुलीचे आई-वडील घामाघूम झाले होते.
झटक्याच्या आवाजाने दार उघडले. दोन कर्मचारी आत आले. त्यांनी आग विझवली. टेबलाच्या आजूबाजूला आगीचे कारण शोधू लागले. त्यांना काही कारण सापडले नाही. ते एकमेकांकडे पाहू लागले. ते बाहेर जाऊ लागले, तेव्हा मुलांच्या वडिलांनी त्यांना ट्रॉली घेऊन जाण्याचा इशारा केला.
बराच वेळ विचारविनिमय केल्यावर काहीही न खाता-पिता ते कुटुंब झोपले. आई-वडिलांच्या डोळ्याला डोळा लागला नाही. रात्री उशिरा कधी तरी त्यांना झोप लागली असावी.
सकाळी ते लवकर उठले. मुलांना उठवले. दोन्ही मुलांवर रात्रीच्या घटनेचा काही परिणाम नव्हता. मुलाला आठवतही नव्हते की, काल रात्री काय झाले! आई-वडिलांनी त्यांना आठवण करून दिली नाही. नेहमीप्रमाणे तयार होऊन ते बाहेर पडले. काल रात्री जे झाले त्याच्या खुणा आई-वडिलांच्या मनावर होत्या.
ते कुटुंब आज परत जाणार होते. काही तासांचा प्रवास करून एक पर्यटनस्थळ बघायला जाणार होते. ते तिथे पोहोचले, तेव्हा दुपार झाली होती. सगळीकडे शांतता होती. ती जागा एका मोठ्या हॉटेलसारखी दिसत होती. तिथे गेल्यावर कळले की या जमिनीखाली पाताळलोक आहे. तिकीट घेऊन ते लोक खाली गेले. डोळ्यांबरोबर मनसुद्धा शांत झाले. जमिनीखाली प्राचीन गुहा होत्या. त्यांच्या तळाशी गार पाणी वहात होते. इथे काहीही मानवनिर्मित नव्हते. जमिनीवरून वाहणार्या पाण्याने दगड झिजून ते सुरम्य स्थान बनले होते. पर्यटक त्या गुहांमध्ये लाकडी नावेमध्ये बसून फिरण्याचा आनंद घेत होते. भारतीय परिवार तेथील वातावरणात कालच्या घटना विसरला होता. येथील कातळावर पाण्याच्या प्रहाराने अद्भुत आकार बनले होते. नौका चालवणारे स्थानिक तरुण-तरुणी पर्यटकांना माहिती देत होते.
हे कुटुंब ज्या नावेत बसले होते ती नाव एक मुलगी चालवत होती. मुलीने त्यांना बरीच माहिती दिली होती. हे लोक यात्रा पूर्ण करून उतरले, तेव्हा मुलीने मुलांच्या गालाला हात लावून लाड केले होते. नाव विचारले होते. त्यांना उतरवल्यावर इतर प्रवाशांना घेऊन ती पुन्हा गुहेत गेली होती.
लिफ्टमधून ते वर आले. लिफ्टचे दार उघडल्याबरोबर दोन्ही मुलं बाहेर आली. समोर त्या मुलीला पाहून ते तिच्याकडे धावले आणि तिला बिलगले. मुलगी एकदम ओरडली. त्यांना बाजूला ढकलून मागे सरकली. आई-वडिलांना कळेना हे काय आले आहे. त्यांना नावेत बसवून फिरवून आणणारी मुलगी अमेरिकन होती. उतरताना ती स्वत: होऊन मुलांशी बोलली होती. मग आता मुलांना पाहून ती भीतीने का ओरडली? इतक्या लहान मुलांची कसली भीती?
मुलीच्या ओरडण्याने मुलांचे आई-वडील घाबरले. डोके धरून जवळच असलेल्या सोफ्यावर बसले. लहान मुलं घाबरून मागे सरकली. आता आई-वडिलांना शंका येऊ लागली की काल रात्रीपासून त्यांच्या मुलांवर काही ना काही संकटं येत आहेत. मुलांच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. मुलं धावत येऊन वडिलांच्या गळ्यात पडली.
तेवढ्यात काउन्टरच्या पलीकडे बसलेली एक वृद्ध महिला धावत आली आणि मुलांच्या वडिलांना सांगू लागली, त्यांचा गैरसमज झाला आहे. त्यांच्या कंपनीत जुळ्या बहिणी काम करतात. एक बहीण त्यांना नावेत बसवून घेऊन गेली होती. तिला मुलांनी पाहिले होते, पण आता इथे असलेली मुलगी ती नाही. तिच्यासारखी दिसणारी तिची बहीण आहे. मुलांनी तिला ओळखले पण तिने मुलांना ओळखले नाही म्हणून ती घाबरली.
हे स्पष्टीकरण ऐकल्यावर आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला. त्यांनी मुलांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला व आइस्क्रीम पार्लरकडे गेले.
तेवढ्यात त्या मुलीने वृद्ध महिलेच्या कानात काहीतरी सांगितले ते ऐकून वृद्ध महिला चक्कर येऊन पडली. पुन्हा एकदा गडबड उडाली. मुलीने महिलेला सांभाळून सोफ्यावर झोपवले. इतर कर्मचारीसुद्धा मदतीला धावले. मुलांच्या वडिलांनी ते दृश्य पाहिले. तेसुद्धा धावले. मुलं आपल्या आईला चिकटून आइस्क्रीम खात होती. वृद्ध महिलेला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला जात होता.
अर्ध्या तासानंतर मुलं, त्यांची आई आणि वृद्ध महिला जवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये काही खात होते. मुलांचे वडील आणि ती मुलगी बाहेर लॉनवर काही गंभीर चर्चा करत होते. मुलीने सांगितले की ती आणि तिची बहीण इथे नोकरी करतात आणि बफलो शहरात राहतात. मुलीने वडिलांना जी माहिती दिली त्याने त्यांच्या पायाखालची जमीन खचली. मुलगी सांगत होती की, मुलं अनोळखी होती म्हणून ती घाबरून ओरडली नव्हती. त्या मुलांच्या डोक्यावर संकटं फिरताना पाहून ती ओरडली होती. तिने सांगितले की मुलांना पाहिल्याबरोबर तिच्या लक्षात आले की त्यांच्यावर ‘आत्म्या’चा प्रभाव पडलेला आहे. मुलं त्या शक्तीच्या ताब्यात आहेत.
मुलीचे आजोबा बफलोमध्ये अशा दैवी शक्तीच्या अस्तित्वावर संशोधन करत होते. मुलगी त्यांना मदत करत असल्याने तिला थोडेफार ज्ञान आहे. मुलीच्या बोलण्यावर वडिलांचा विश्वास बसला होता. मुलीने सुचवले की त्यांनी त्यांच्याबरोबर बफलोला यावे. त्यांच्या आजोबांना भेटावे. दुसर्या दिवशी आठवड्याचा शेवटचा दिवस होता. त्या दोघी बहिणी घरी जाणार होत्या.
दुसर्या दिवशी ते सगळे बफलोला जायला कारने निघाले. दोघी बहिणींनी रस्त्यात त्यांना आत्म्याबद्दलच्या बर्याच चमत्कारिक कथा ऐकवल्या. भारतीय परिवाराला स्वप्नातही वाटले नव्हते की अमेरिकेसारख्या विकसित देशात त्यांना अशा विचित्र कथा ऐकायला मिळतील. अशा कथा त्यांनी भारतीय आख्यानात ऐकल्या होत्या. काल त्यांच्या मुलांच्या बाबतीत जे झाले होते, त्यावरून आता ते या गोष्टी कपोलकल्पित मानायला तयार नव्हते. या प्रवासात दोन मुली आपल्या शुभचिंतक म्हणून बरोबर आहेत, याचा त्यांना आनंद होता. त्यांची भीती कमी झाली होती. ते आपआपसात गप्पा मारत होते. मुलं कारच्या खिडकीतून बाहेरची दृश्यं पहात होती. कार एका दिशेने धावत होती आणि रस्ता दुसर्या दिशेने. कधी कधी ढग अगदी रस्त्यावर येत होते. मुलांना वाटत होते जमीन-आकाशात गाढ मैत्री आहे.
दोघी बहिणीच्या जन्मात चार मिनिटांचे अंतर होते. पण धाकटी मोठ्या बहिणीला मान देत होती. बर्याच गोष्टी मोठी बहीण विचारत होती. मुलांवर निष्कारण ओरडल्याबद्दल तिला अजूनही अपराधी वाटत होते.
“तुम्ही सिम्मीला ओळखता का?” तिने वडिलांना विचारले. ते एकदम दचकले. ते काय उत्तर देतात हे जाणण्यासाठी धाकटी बहीणसुद्धा त्यांच्याकडे बघत होती. वडिलांनी काही उत्तर दिले नाही.
“सिम्मी ग्रेवाल, इंडियन आणि हॉलिवूड अॅक्ट्रेस!” तरुणीने आणखी क्लू दिला.
“ओह! हो हो, पण आता ती फार फेमस आणि सक्रिय नाही.”
हे ऐकून दोघी बहिणी उदास झाल्या. त्या मुलींनी सांगितले की त्यांना भारताबद्दल फक्त दोन गोष्टी माहीत आहेत. एक ही की तिथे पाणी खूप कमी आहे, आणि दुसरी तिथे सिम्मी ग्रेवाल रहाते. तिचा एक सिनेमा त्यांनी पाहिला होता.
मुलांचे वडील म्हणाले, “तिथे पाणी कमी नाही. देशाचा एक भाग असा आहे, जिथे वाळवंट आहे. तिथे पाऊस पडत नाही. सगळीकडे वाळूच्या टेकड्या आहेत. भारताच्या तीन बाजूला समुद्र आहे. अनेक लहान मोठ्या नद्या आहेत. चेरापुंजीत तर मुलाच्या वडिलांनी आपल्या देशाचा मान राखण्यासाठी लहानपणी वाचलेला भूगोल आठवून सांगितला.
मुलांच्या आईने तहान लागल्याचा इशारा केला. योगायोगाने सर्व्हिस एरिया जवळ आला होता. कॉफी पिण्यासाठी गाडी थांबवली. सगळे कॅफेटेरियाकडे जाऊ लागले. आई मुलाला शौचालयाला घेऊन जाण्यासाठी मागे थांबली. मुलीने एवढे मोठे शानदार शोरूम पाहिले, तर तिला तेथून काही घेण्याचा मोह झाला. ते बोलत होते. कॉफी आली. गार झाली. पण मुलगा आणि आई अजून आले नव्हते. मुलाचे वडील जाऊन बघणारच होते, तेवढ्यात अतिशय घाबरलेली आई धावत आली. ती पुन्हा पुन्हा सांगत होती की, मुलगा न जाणो कुठे गेला. सगळे आश्चर्यचकित झाले. असे कसे होऊ शकते? शौचालयाच्या दारात आई उभी होती. मुलगा आतून गायब झाला. दुसरे दारसुद्धा नव्हते. दोघी बहिणी घाबरून त्याला शोधायला धावल्या.
मोठ्या बहिणीने पोलिसांना फोन करून सूचना दिली. धाकटी मुलाच्या आईला धीर देऊ लागली. या गोंधळात पाच-सहा मिनिटे गेली असतील. तेवढ्यात बाहेर पोलिसांची गाडी थांबण्याचा आवाज आला. कोणाला आश्चर्य वाटण्याइतका वेळसुद्धा मिळाला नाही, की सूचना दिल्याबरोबर पोलिसाची गाडी कशी आली् आश्चर्य याचे वाटत होते की, पोलिसांच्या गाडीत एका पोलीस अधिकार्याबरोबर त्या कुटुंबाचा लाडका मुलगा बसला होता. सगळे संभ्रमित झाले. फोन करणार्या तरुणीशी पोलीस ऑफिसरने हात मिळवला. त्याने गाडीकडे पाहिले. मुलगा निर्विकार चेहर्याने खाली उतरून उभा राहिला. आईने धावत जाऊन त्याला हृदयाशी धरले. लहान मुलगी आतापर्यंत उदास होती. ती रडू लागली. तिच्या रडण्याकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही. कारण त्यांना वाटले हे आनंदाश्रू आहेत.
आता त्या दोघी बहिणी पोलीस अधिकार्याच्या बोलण्यावर मोठमोठ्याने हसत होत्या. शौचालयात दुरुस्तीचे काम चालले होते. त्यासाठी छतावरून एक ट्रॉली खाली सोडण्यात आली होती. पाइप तपासण्याचे काम करायचे होते. इकडे आई दाराबाहेर उभी होती. तिकडे मुलगा ट्रॉली पाहून त्यावर चढला. त्याच्या काही लक्षात येण्याआधी तो छतावर पोहोचला होता. ट्रॉली मॅनने त्याला त्या परिसरातील पोलिसांच्या ताब्यात दिले. त्या तरुणीचे हसणे पाहून सगळ्यांच्या चेहर्यावर समाधान दिसू लागले.
ऊन आता कमी होऊ लागले होते. सगळे पेंगत होते. मुलाच्या वडिलांनी पुन्हा संभाषण सुरू केले. त्यांना सिम्मी ग्रेवालच्या काही सिनेमांची नावे आठवली असावीत. ते सांगू लागले, भारतातील प्रसिद्ध डायरेक्टर ख्वाजा अहमद अब्बासने ‘दो बूंद पानी’ या सिनेमात वाळवंटात पाण्याची टंचाई दाखवली आहे. त्या सिनेमात सिम्मीने काम केले होते. दोघी बहिणींना आनंद झाला, कारण त्यांनी तोच सिनेमा पाहिलेला होता. या सिनेमामुळे त्यांना वाटत होते की, भारतात पाण्याची टंचाई आहे.
ते लोक बफलोला पोहोचले, तेव्हा रात्र झाली होती. दोघी बहिणींनी त्यांना हॉटेलमध्ये राहू दिले नाही. त्या कुटुंबालाही त्या लोकांबरोबर रहाणे सुरक्षित वाटले. भारतीय कुटुंब त्यांचे पाहुणे झाले. रात्री जेवणं झाल्यावर मुलं झोपली. पण वडील मुलींच्या आजोबांना लवकर भेटू इच्छित होते. फोनवर बोलणे आले आणि सकाळी भेटायचे ठरले. रात्री बराच वेळ ते बोलत बसले. त्यांना बरीच माहिती मिळाली.
मुलांच्या वडिलांना त्या बहिणींनी आपल्या आजोबांच्या कामाबद्दल सांगितले. आजोबांना जुन्या वस्तू जमवण्याची हौस होती. ते स्वत: वेगवेगळ्या वस्तू जमवत असत. त्यांनी खूप परिश्रम करून एक सुंदर घरटे बनवले होते. ते त्यांनी आपल्या घरासमोर एका झाडावर अडकवले होते. ते म्हणत असत की, हे मायावी घरटे आहे. यात एके दिवशी आपोआप रंगीत अंडी येतील. त्यांना त्या दिवसाची प्रतीक्षा होती. अंडी कोठून येतील कोणाला माहीत नव्हते. मुलाच्या वडिलांना एवढीच अपेक्षा होती की त्यांनी त्यांच्या मुलांवर आलेले संकट दूर करावे. दिवसभराचा थकवा विसरून ते पहाट होण्याची वाट बघत होते. सकाळी आजोबा आले आणि त्या कुटुंबाला आपल्या घरी घेऊन गेले. घर जवळच होते. दोघी बहिणींना दुसर्या दिवशी कामावर जायचे होते.
आजोबा एकटेच राहत होते. दोन्ही लहान मुलांना होणारा त्रास पाहून त्यांनी सुचविले की त्या कुटुंबाने काही दिवस आजोबांबरोबर राहावे. त्या दांपत्याने ते आनंदाने स्वीकारले. कारण त्यांना आपल्या मुलांवर आलेले हे चमत्कारिक संकट दूर व्हावे असे वाटत होते. आजोबांच्या आग्रहात एका डॉक्टरचा आपलेपणा होता. ज्याला हे माहीत असते की, पेशन्टला औषधाबरोबरच आपलेपणाची गरज असते. शिवाय हे पेशन्ट लांबच्या देशातून आलेली लहान मुलं होती. त्यामुळे ही आत्मियता स्वाभाविक होती.
मुलांना आणि आईवडिलांनासुद्धा आजोबा खूप आवडले होते. त्यांचे कुटुंब अनेक वर्षांपूर्वी स्कॉटलंडहून ब्राझीलला आले होते. त्यांच्या कुटुंबात ते आणि त्यांच्या दोन नाती होत्या. नंतर ते बफलोमध्ये राहिले. त्यांनी सांगितले की लहानपणी ते अतिशय खोडकर, हिंसक होते. इतरांना दु:खी पाहण्यात त्यांना आनंद वाटत असे. त्यांना जुन्या वस्तूंचा मोह होता. जुन्या वस्तू त्यांना वडीलधार्या माणसासारख्या वाटत असत. ते म्हणत असत की, समजा एका म्हातार्याने चाळीस वर्षे एका काठीच्या मदतीने पावले टाकली असतील तर म्हातार्याच्या मृत्यूनंतर ती काठी म्हातार्याबद्दल बरंच काही सांगेल. त्यासाठी तिची भाषा समजणारा असावा. एखाद्या वडीलधार्या स्त्रीचा चष्मा तिच्या डोळ्यांची कहाणी जाणतच असेल.
त्यांचा लाल चेहरा बिनहाडाचा पुतळा वाटत असे.
ग्रोव सिटीजवळ त्यांची मोठी शेती होती. ती त्यांनी बनाना रिपब्लिक कंपनीला स्वस्तात दिली होती. कारण कंपनीने त्यांना आश्वासन दिले होते की, नवीन इमारत बनवताना, खणताना जमिनीखाली मिळालेल्या सगळ्या मृतांच्या पेट्या ते त्यांना देतील. आजोबा म्हणतात, आता त्यांच्या खजिन्यात शेकडो वर्षांपूर्वी मृत्यू पावलेल्या माणसांचे आत्मे आहेत.
ज्ञश्र