Manachya vaatevarti Avyakt to an mi - 13 in Marathi Fiction Stories by अनु... books and stories PDF | मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 13

Featured Books
Categories
Share

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 13

पुढे...

किती अजब असतं ना पहिलं प्रेम..!! एका जादुई पण अनामिक नात्याची सुरुवात तर होते, पण त्याचा अंत कधीही लिहिलेलाच नसतो नियतीने...हं, आता हे फार उशिराने कळतं, ही गोष्ट वेगळी...आणि तेही कळतं फक्त, वळत काही नाही...कोवळ्या वयात निर्माण झालेल्या भावना म्हणजे एक कोडंच...! हे जे पहिलं प्रेम असतं ना, ते ओठांवरती मंद मंद स्मित निर्माण करतं, पण खळखळून हसण्याची परवानगी यात नसते...पहिल्या पावसाआधी शीतल वारा वाहत असताना उन्हाची दाहकता जशी कमी होते तसंच पहिल्या प्रेमात होतं, पण जेंव्हा हा पाऊस धोधो कोसळत असतो तेंव्हा, कोणाला सांगून यात भिजण्याची परवानगी मागता येत नाही...गुपचूप त्या पाण्याचे थेंब अलगद खिडकीतून हात बाहेर काढून ओंजळीत घ्यायचे असतात...एक एक थेंब जमा करायचा असतो, पण ते सगळ्यांसमोर दाखवता येत नाही...हे पहिलं प्रेम म्हणजे साखर झोपेतलं असं गोड स्वप्न असतं, जे पूर्ण होत नाही पण त्यात रमायला मात्र खूप आवडतं...

ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर अतुलचं माझ्या आयुष्यात येणं झालं होतं, त्यामुळे जेंव्हा तारुण्यात प्रवेश केला अतुल माझ्यासोबतच होता आणि त्यामुळेच तो आता माझ्यातून बाहेर निघू शकणार नव्हता, मला काढायचंही नव्हतं... त्याप्रसंगानंतर अतुलने एकदाही माझ्याशी बोलण्याचा किंवा भेटण्याचा प्रयत्न केला नाही, मग फोन किंवा मॅसेज तर दूरची गोष्ट..आणि मी त्याची वाट ही पाहिली नाही...जेंव्हा ऐकण्याची आणि बोलण्याची वेळ होती तेंव्हा न मी काही बोलली , न त्याला बोलू दिलं...माझं तर असं झालं होतं की,

"ज़माने भर की बातें उनसे कह दीं
जो कहना चाहिए था वो कहा नहीं..।"

...आणि तसही माझ्या डोक्यात ते प्रियाचं अतुलला 'डिअर' बोलणं घोंघावत होतं, त्यामुळे मी पण विचार सोडला...आधीच पहिल्या सेमिस्टर ला मी जे काही दिवे लावले होते, त्यामुळे बऱ्याच लोकांना निराश केलं होतं मी, म्हणून दुसऱ्या सेमिस्टर ला मन लावून अभ्यास केला आणि यावेळी ८.७० ग्रेडिंग ने पास झाली...

मी आता सेकंड इयर ला आली होती आणि अतुलचं शेवटचं वर्ष होतं...कॉलेज लाईफ एकदाच जगायला मिळते, त्यामुळे नको त्या भानगडीत वेळ खर्च करण्यापेक्षा मी माझा सगळा वेळ आता माझे मित्र, माझा अभ्यास आणि कॉलेजच्या ऍक्टिव्हिटी मध्ये घालवायला लागली... कोणतेही इव्हेंट्स असले तरी आम्ही सगळे मित्र मैत्रिणी त्यात हिरीरीने भाग घ्यायचो... खरं तर ही प्रेरणा ही मला अतुलकडूनचं मिळाली होती.. तो होताच तसा 'ऑलराऊंडर'..एकदम 'परफेक्ट'...!! आणि त्यामुळेच कदाचित पोरींच्या आकर्षणाचा मुद्दा होता तो.. कॉलेजला जाऊन तो किती फेमस आहे हे मला कळलंच होतं, पण कुठेही त्याचा विषय निघायचा, मी तिथून काढता पाय घ्यायची... कोण्या मुलीच्या तोंडून मला त्याचं नावंही ऐकलं तरी राग यायचा, चिडचिड व्हायची... असं का होतंय हे कळत नव्हतं...

आता आम्ही ही सिनिअर झालो होतो आणि इंजिनिअरिंग ची 'वंश, परंपरा' आम्हाला पुढे न्यायची होती, त्यामुळे ते 'इन्ट्रो' सेशन आम्ही ही सुरू केलं...खरं तर ते वातावरणाचं तसं असतं, आपण आपल्याही नकळत त्यात शामिल होतो... आता खरं तर कळत होतं की या सगळ्या गोष्टींमुळे सिनिअर ज्युनिअर्स चं नातं किती प्रबळ होतं.... ज्या सीनिअर्स नी आमचा 'इन्ट्रो' घेतला होता, ते आज आमच्या प्रत्येक अडचणीत आम्हाला मदत करायचे, त्यांच्यावर सुरुवातीला जो राग होता तो आता हळूहळू कमी होऊन मैत्रीत बदलत होता...

एकदा माझ्या एका जुनिअर ला हेच समजवतांना ऋता मला बोलली,
"तुला नाही वाटत का, आपण कधी कधी जे समोर घडत आहे, त्या परिस्थिती वरूनच समोरच्याला जज करतो, त्याच्या त्या कृतीमागच्या भावना न बघताच त्याला चुकीचं समजतो....?"

"म्हणजे??? मला नाही कळलं.." मला ऋताचं बोलणं कोड्यात टाकून गेलं आणि मी प्रश्नार्थक हावभावाने तिला विचारलं....

"म्हणजे?? वाघाचे पंजे...तुला खरंच कळत नाही??"
ती मला प्रतिप्रश्न करत बोलली,

"नाही कळलं ग राणी...सांगतेस का आता??"

"साधारण वर्षभरापूर्वी हीच गोष्ट अतुलने तुला सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याची समजून देण्याची पद्धत वेगळी होती..तू इथे सगळ्या गोष्टी स्वतः ज्युनिअर्स ला सांगत आहेस, त्याने फक्त प्रियाला पुढे केलं होतं... एवढाच काय तो फरक होता, मग जर तुझे हेतू वाईट नाहीत तर तेंव्हा त्याचा हेतू ही बरोबरच होता... होता ना?? आणि त्या एका गोष्टी मुळे जे गैरसमज सुरू झालेत ते आजपर्यंत सोबतच आहेत...मी तेंव्हा ही तुला बोलली होती की स्वतःच्या मनाला विचारून बघ की नक्की तुला काय हवंय??"

मला ऋताचं बोलणं पटायला लागलं होतं, पण पुन्हा मला अतुलच्या वर्तुळात जायचं नव्हतं, त्यामुळे माझी हिंमतच नव्हती की मी पुन्हा त्याचा विचार करू...आणि तसही मानवी प्रकृती आहे ही, की जेंव्हा माणसाला त्याची चूक लक्षात येते तो सहजासहजी ते मान्य करत नाही, थोडी टाळाटाळ करतो, शेवटी 'इगो' ही शांत करायचा असतो ना आपला...त्यामुळे मी तो विषयचं टाळला,

"मी माझ्या मनाला विचारून झालं, आणि त्यावेळेस जे योग्य वाटलं मला, तेच मी केलं...आणि तू का अतुलचा विषय काढत आहेस, त्याचा इथे काय संबंध??"

"रिअली?? त्याचा काहीच संबंध नाही का?? बरं...मग ती आपली हॉस्टेलची ज्युनिअर, काय नाव तिचं...अम्म्म...हं, श्रद्धा, तिने जेंव्हा तिच्या 'फर्स्ट क्रश' मध्ये अतुलचं नाव सांगितलं, तू का भडकली होती?? तू तिचा 'इन्ट्रोच' बंद करायला लावला...का ??"
ऋताचे प्रश्न मला त्रास देत होते, आणि मला तिला उत्तर देणं नकोसं झालं होतं, त्यामुळे मी माझ्या बेडवर जाऊन पहुडली, आणि नजर चोरत बोलली,

"चल..उशीर झालाय, झोपू या, सकाळी लेक्चर्स आहेत आपले...."

"विषय बदलल्याने भावना बदलत नसतात डिअर..."
ऋता हे काय बोलून गेली म्हणून मी मागे वळून तिला पाहिलं तर ती माझ्याजवळ आली आणि एक मिश्किल हास्य देत पुन्हा बोलली....

"...आणि हो..डिअर आपण कोणालाही बोलू शकतो.. कोणालाही...त्यात इतकं मनावर घेण्यासारखं काहीही नाही...चान्स अजूनही आहे....हाहाहा.."
पुन्हा कोड्यात बोलली ती आणि हसत हसत तिच्या बेडवर जाऊन गाणं गुणगुणत मला चिडवत बोलली,

"नजर के सामने, जिगर के पास , कोई रहता है...वो है अतुल..अतुल..अतुल...हाहाहा...."
आता मात्र मला उगाच चिडचिड होत होती, मी उशी ऋताला फेकून मारली आणि चादर तोंडावर घेऊन बळंच झोपण्याचा प्रयत्न करू लागली...पण झोपही कशी लागणार होती, आज ऋताने मला आरसा दाखवून माझ्या दबलेल्या भावना छेडल्या होत्या...पेटलेल्या छोट्याश्या ठिणगीला ऋताने हवा दिली होती, आता मात्र अतुलच्या आठवणींचा वणवा पेटणार होता... ती अख्खी रात्र मी फक्त हाच विचार करण्यात घालवला की मी अतुलला चुकीचं समजली, की चुकीच्या परिस्थितीत नेहमी आम्ही समोरासमोर आलो...मनात द्वंद सुरू असताना बुद्धी शांत कशी राहू शकते, आणि झोप तरी कशी येणार होती... जेंव्हा अतुल सोबत नव्हता तेंव्हा तो जास्त जवळ होता, आणि आता जवळ असूनही का आमच्यात इतका दुरावा आहे, काही कळत नव्हतं... शेवटचं बोलणं, म्हणजे भांडण, जेंव्हा झालं होतं, त्यावेळी बरोबर बोलला होता तो,

"कुछ ऐसे भी हम साथ साथ चले,
जैसे नदी के दो किनारे हो गये।"
******************

आयुष्यात कितीही प्रयत्न केले, धावपळ केली तरी काही ना काही सुटणारच हातातून...मग जे सुटलंय त्यावर दुःख करण्यापेक्षा, हातात काय उरलंय यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे...त्यामुळे मी विचार केला, कदाचित हेच नशीब असेल की मला जे वाटतं ते अतुलला वाटत नसावं आणि त्यामुळे जो वेळ, जितका वेळ मला त्याच्या आसपास राहायला मिळतो तोच भरभरून जगावं.. काहीही अपेक्षा न करता...कदाचित आमची गाठ बांधलीच नसेल देवाने, मग उगाच त्याचा राग करून काय करू मी?? काही गोष्टी कदाचित पूर्ण झाल्यावर जितक्या सुंदर भासत नाहीत, तेवढ्या त्या अधुऱ्या असल्यावर जाणवतात... सगळं काही मनासारखं होईलच असं नाही, मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टीही मनातून स्विकारता आल्या पाहिजे, आणि मी स्वीकारलं होतं की मला कितीही वाटत असेल तरी अतुलला माझ्या रागवण्याचा, माझा असण्या नसण्याचा काही फरक पडत नाही... आणि इथेच मी चुकली होती...

माझं तिसरं सेमिस्टर सुरू होऊन महिना झाला होता..मी आणि निखिल ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल मध्ये एका इव्हेंट मध्ये काम करत होतो...डीन सरांनी कॉलेजच्या सगळ्या मुलांसाठी एक गेस्ट लेक्चर ठेवलं होतं टाईम मॅनेजमेंट वर...खरं तर ते गेस्ट बोलावणं, विषय ठरवणं हे सगळं फायनल इयर चे विद्यार्थी आणि सर बघायचे पण आम्हालाही त्यात शामिल व्हायला सांगायचे, जेणेकरून आम्ही ही ते शिकून घ्यावं...

आमचे गेस्ट स्टेशन वर येणार होते आणि त्यांना घ्यायला मी अन निखिल जाणार होतो, पण निखिलचं नेमकं त्याच वेळेला नॅशनल लेव्हल प्रोजेक्ट साठी सिलेक्शन झालं आणि सरांनी त्याला प्रोजेक्ट साठी पाठवलं...या सगळ्या गोष्टींची माहिती निखिलला होती, मला मात्र कल्पना नव्हती की गेस्ट कोण आहेत किंवा त्यांची काहीही माहिती नव्हती, आणि मी त्यांना ओळखणार कसं हा पण प्रश्न होता...त्यामुळे सरांनी माझ्यासोबत त्याच व्यक्तीला पाठवण्याचा निर्णय घेतला ज्याने हे सगळं अरेंज केलं होतं...सरांनी त्याला बोलावणं पाठवलं आणि अगदी काही मिनिटांत तो येऊन उभा झाला आणि समोर बघते तर दोन मुलं उभे होते त्यात एक अतुलही होता...सरांनी त्या दोघांना विचारलं कोण जाणार तर अतुलने लगेच हात वर केला आणि मी पुन्हा फसली...आता डीन सरांना नाही बोलण्याची हिम्मत तर माझ्यात नव्हती, इकडे आड अन तिकडे विहीर अशी परिस्थिती होती....

मी आणि अतुल स्टेशन वर पोहोचलो, पण दोघांच्या तोंडालाही कुलूप लागलेले होते... उगाच इकडे तिकडे बघण्यात टाईमपास सुरू होता आमचा आणि इतक्यात हे कळलं की ट्रेन अर्धा तास उशिराने येत आहे...मला तर कुठून ही बुद्धी सुचली असं झालं होतं.. मी गुपचूप बेंच वर जाऊन बसली आणि अतुलने त्याचे इयरफोन कानात टाकले... मी खूप प्रयत्न केले त्याच्याकडे लक्ष न देण्याचे किंवा त्याला न बघण्याचे, पण नाही ठेवता आला मनावर ताबा आणि जेंव्हा जेंव्हा मी त्याचे ते भुरभुरणारे केस, त्याची ती खळी पाहायची, भान हरवून जायची...यावेळी ही तेच झालं...जशी त्याची नजर माझ्यावर पडली मी लगेच मान वळवली आणि हलकेच जीभ दातांवर चावली... इतक्यात तो पण माझ्या बाजूला येऊन बसला, कानातले इअरफोन काढत तो बोलला,

"शिकायत भी करते हो, नजरे भी रखते हो,
या तो हम कमाल के है, या तुम कमाल करते हो।"

एखाद्या चोराची चोरी पकडल्या जावी तशीच माझी अवस्था झाली होती, काय बोलावं, काय उत्तर द्यावं काही कळत नव्हतं...पण स्वतःला सावरत मी बोलली..

"मी...ते, ट्रेन आली का ते बघत होती..."

"हो का..."
दोन्ही भुवया उंचावत आणि माझ्या उत्तरावर समाधान नाही, त्यावर विश्वास नाही हे भाव चेहऱ्यावर आणत अतुल बोलला....

"बाय द वे...हॅपी फ्रेंडशिप डे..."
शुभेच्छा देण्यासाठी अतुल हात पुढे करत बोलला, आणि आता मला आठवलं की आज फ्रेंडशिप डे आहे...मी काहीही न बोलता फक्त त्याच्या चेहऱ्यावरची निरागसता बघत होती आणि मी त्याला हँडशेक करेल याच आशेने अजूनही हात तसाच ठेवला होता... शेवटी मी काही उत्तर देत नाही म्हणून तो निराशेने हात मागे घेणार तेवढ्यात मी लगेच त्याच्या हातात हात देत बोलली,

"म्हणजे आता आपण मित्र आहोत तर...??"
मी थोडं मिश्किल हास्य देत बोलली...

"तस समजायला तू मला तुझं काहीही समजू शकतेस, माझी हरकत नाही....पण सध्या मित्राची जागा मिळत असेल तर मी त्यातही खुश आहे..अर्थात तुला काही अडचण नसेल तर..."
त्यानेही हसत हसत उत्तर दिलं...
आता काही क्षणांसाठी पुन्हा आमच्या दोघांत शांतता पसरली... काय बोलावं काही कळत नव्हतं, अधूनमधून एकमेकांवर नजर जायची आणि उगाच हलकंस हसून पुन्हा आम्ही इकडेतिकडे बघायला लागायचो...

"अम्म्मम... मला वाटलं होतं, पुन्हा कधीच बोलणार नाहीस कदाचित... म्हणजे त्यादिवशी तू अशी निघून गेलीस..." अतुल खूप विचार करून बोलला,

"तू पण तर थांबवलं नाहीस..."
आणि मी नकळतपणे बोलून गेली, आणि नंतर वाटलं की उगाच बोलली,

माझ्या अश्या बोलण्यावर अतुलच्या चेहऱ्यावर थोडं हसू आलं आणि तो बोलला,
"नाही थांबवलं...तू बोलली होती ना, काय अधिकार आहे?? त्यामुळे नाही थांबवलं..."

अतुलच्या बोलण्यावर मी विचार करायला लागली की माझं बोलणं किती सहजपणे हा मान्य करून घेतो, म्हणजे मी बोलली मैत्री नाही तर त्यानेही मान्य केलं, मी बोलली अधिकार नाही तर त्याने ही त्याचे पाऊलं माझ्याकडे उचलले नाही... हो, कदाचित मीच जास्त अपेक्षा ठेवल्या त्याच्याकडून त्यामुळे मला त्रास झाला...त्याला काही वाटतंच नाही तर पुढे बोलून काय फायदा...

"हो, तेही आहेच...समजू शकते मी..." थोड्या नाराजीने उत्तर दिलं मी...

"नाही...नाही समजु शकत तू....

दिल के दरीचों मे आज भी हमने,
उम्मीद दबाये रखी है।
छोड दी थी नाराजगी मे तुमने,
वो डोर हमने आज भी थामे रखी है।"

तो काय बोलला हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होती मी, त्याच्या नजरेत जेंव्हा मला माझंच प्रतिबंब दिसलं तेंव्हा मी बोलली,

"तुला का वाटतं मी नाही समजू शकत...तू बोलून तर बघ.."

"तीच तर अडचण आहे... खूप काही आहे पण सुरुवात कुठून करू तेच कळत नाही, कदाचित मलाच कळत नाहीये की मला काय हवंय, त्यामुळे काही स्पष्टपणे सांगता येत नाहीये...पण आता जास्त वेळ नाही माझ्याकडे...हे माझं शेवटचं वर्ष आहे, त्यात प्लेसमेंट चं टेन्शन वेगळं...त्यामुळे डोकं शांत ठेवायचं आहे....."

"ठीक आहे...अभ्यास, करिअर ते महत्त्वाचं आहे आधी..बाकी गोष्टी क्षुल्लक आहे...."

"हो..गोष्टी क्षुल्लक असतात...व्यक्ती नाही...काही व्यक्ती खूप खास असतात...पण त्यांना ते कळत नाही...असो, ट्रेन येईलच आता...मी बघून येतो लगेच, तू थांब...."
आणि तो उठून उभाच झाला आणि काहीच पाऊलं पुढे गेला असेल, इतक्यात मागे वळून बोलला...

"....आणि यावेळी हे गेट सोडून दुसऱ्या गेट ने बाहेर जाऊ नको हं...हाहाहा..."
त्याला बघून माझ्याही चेहऱ्यावर नकळत हसू आलं, अन मी बोलली,

"आता मी लहान राहिलेली नाही...."

मनात तर आलं की आता काय आयुष्याभर ही तुला सोडून जाणार नाही मी...पण का असं प्रत्येकवेळी हा मुलगा माझी परीक्षा घेतो?? जेंव्हा सगळ्या आशा मी सोडून देते, तेंव्हा पुन्हा येऊन आशेची एक नवी किरण देऊन जातो...ऊन सावलीचा खेळ झाला होता आमच्यात, पण यावेळी समाधान होतं की उगाच भांडण होऊन पुन्हा गैरसमज वाढले नाहीत...इतक्यात ट्रेन ही आली आणि आमचे गेस्ट ही भेटले...त्यादिवशीचं गेस्ट लेक्चर खूप छान झालं, सर अतुलवर खूप खुश झाले... पूर्ण ऑडीटोरिअम मध्ये जिथे टाळ्यांचा गडगडाट सुरू होता, तिथे आम्ही एकमेकांमध्ये हरवुन फक्त आमच्यातली शांतता अनुभवत होतो...यावेळी खात्री झाली होती की आता सगळं काही सुरळीतच होईल...पण नियतीवर आपलं नियंत्रण आहे का??
*******************

क्रमशः
(Dear Readers,
इतक्या कमी कालावधीतच मला इतके वाचक मिळाले यासाठी मी तुम्हा सर्वांची खुप आभारी आहे...पण यावेळी एक विनंती आहे, आणि तुम्ही ती मान्य कराल ही खात्री आहे..माझं लिखाण तुम्हाला आवडत असेल किंवा नसेलही तरी मला ते आवर्जून कळवा...तुमच्या समीक्षा, तुमचे मेसेजेस नेहमीच स्वागतार्ह आहेत...पण जोपर्यंत तुम्ही कळवणार नाही, तोपर्यंत मलाही कळणार नाही की उणीव कुठे आहे.. त्यामुळे माझी ही कळकळीची विनंती मान्य करा...पुढच्या 2 भागांत ही कथा संपणार आहे, त्यामुळे रेटिंग देऊन ही कथा आणखी वाचकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करा...)

तुमचीच,
अनु...🍁🍁