Manachya vaatevarti Avyakt to an mi - 12 in Marathi Fiction Stories by अनु... books and stories PDF | मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 12

Featured Books
Categories
Share

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 12

पुढे...

आपल्या प्रिय व्यक्तीने आपल्याशी न बोलणं हे किती जीवघेणं असतं याची प्रचिती मला येत होती...मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही वेळ शोधत होतो आणि जेंव्हा वेळ आली तेंव्हा मात्र भावनांची एवढी ओढाताण झाली की केवळ रागच व्यक्त झाला...मनाच्या चक्रव्यूहात अडकल्यावर खूप धडपड होतं असते प्रेम व्यक्त करण्यासाठी.. पण चक्रव्यूह ना ते...!! सहजासहजी त्यातून बाहेर कसं पडता येईल..?? आणि कॉलेजमध्ये उगाच चर्चेला उधाण येवू नये, मनीचे भाव जगाला उमजू नये यासाठी काही ठराविक वेळीच बोलण्याचं प्रयोजन करायचो आम्ही अणि त्यात ही अशी डोक्याला मारून घ्यायची वेळ यायची...

"जीस दिन सोचते है, आज पुरी बात करेंगे,
'झगडा' भी कहता है, हम भी आज करेंगे।"

..काय विचार करावा आणि भलतंच काही व्हावं, असंच माझ्या अन अतुलच्या बाबतीत घडत होतं...अव्यक्त प्रेमात शिगेला जाणारी अधीरता बांधून ठेवणं खूप अवघड असतं आणि त्याहूनही अवघड असतं ते जपणं...कधी कधी स्वतःचीचं भीती वाटायची की या भावनांच्या हेलकाव्यात मी तग धरू शकेल का??? मनाला आवर घालू शकेल का?? आणि जेव्हापासून लायब्ररीत माझं आणि अतुलचं बोलणं झालं होतं, तेंव्हापासून ही भीती आणखी वाढत जात होती...त्याचेच परिणाम मला माझ्या पहिल्या सेमिस्टर च्या रिझल्ट मध्ये दिसून आले...खूप हताश हतबल झाल्यासारखं वाटत होतं...माझ्या हळव्या मनातून अतुलचे विचार मात्र जात नव्हते...किती सहजपणे बोलून गेला होता तो 'कोण लागतो आपण एकमेकांचे'.. पण माझ्या मनाला ते किती लागलं असेल याचा विचार आला नसेल का त्याला??? कसा येणार...त्याला फरकच पडत नाही काही..किती मश्गुल असतो तो आपल्या मित्रांमध्ये, खासकरून प्रिया मध्ये...मग मी का त्याच ठिकाणी उभं राहून स्वतःचं नुकसान करून घेते..सगळे पुढे जात असताना मी मागे राहून स्वतःचं भविष्य खराब करणं म्हणजे मूर्खपणाच होता...

बाबांना वाटलं मला काहीतरी अडचण असावी ज्यामुळे माझं मन जागेवर नाही, आणि त्यांना वाटलं की मी त्यांना मोकळेपणाने बोलू शकत नाही त्यामुळे त्यांनी चेतनला पुढे केलं मला बोलायला..पण मी त्यालाही टाळाटाळ करायला लागली...तारुण्याचं वयचं तसं असतं...चमत्कारिक, अगदी बेलगाम...!! कोणी मनात रुजल्यावर आपण वाहून जातो..काय चूक काय बरोबर हे काहीच कळत नाही... त्यामुळे असं वाटायचं की चेतनला सांगून काहीही उपयोग नाही, आणि सांगणार तरी काय??? त्यामुळे त्याला बोलणंच टाळत होती मी... पण चेतन तर चेतन आहे, तो काही केल्या माघार घेणाऱ्यातला नव्हता...जानेवारीत दुसरं सेमिस्टर आताशी सुरूच झालं होतं माझं, जेंव्हा चेतनने अचानक बॉम्ब टाकला की तो पुण्याला येतोय...आता त्याला प्रत्यक्ष भेटणं म्हणजे त्याच्या सोबत 'आप की अदालत' खेळणं होतं.. तो प्रश्न विचारून हैराण करेल पण आता तो येणार त्यामुळे मला त्याला भेटावंच लागणार होतं...

ठरल्या दिवशी चेतन आला, तो आल्यावर मला त्याचं खरं कारण कळलं होतं येण्याचं... खरं तर मला भेटणं त्याच्यासाठी बहानाच होता, तो तर साक्षिच्या भावाला भेटायला आला होता, त्यांचं आधीच ठरलं होतं ते...हा चेतन पण ना, पक्का लोफर वाटत होता मला..आम्ही कॅन्टीन मध्ये जाऊन बसलो आणि नेहमीप्रमाणे त्याने त्याच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू केली...

"बोल ग...काय अडचण आहे...तुझे बाबा काळजी करत आहेत तुझी खूप??"

"काही नाही रे, हेच जरा वातावरण नवीन आहे, एकटी कधी राहिली नाही ना..त्यामुळे, बाकी काही नाही..."

"नक्की ना...तुझ्या बाबांच्या खुप अपेक्षा आहेत हं तुझ्याकडून, आणि त्यांनी तुला इतकं स्वातंत्र्य दिलं आहे त्यामुळे काही असेल तर बोलून टाक त्यांना बिनधास्त.."

"हम्म...पण काही नाही अडचण...मलाच जमलं नाही सगळं पचावायला...अम्म्म, म्हणजे हेच रे नवीन ठिकाण अँड ऑल...पण पुढे असं नाही होणार....प्रॉमिस...."

"हम्मम...ठीक आहे... मला वाटलं होतं की काहीतरी मसालेदार सांगशील तू, की तुला कोणीतरी आवडतो वैगरे..पण ही तर फारच बोरिंग स्टोरी आहे..खिखिखी..."
आणि त्याची मस्ती सुरू झाली...

"नालायका...आयुष्यात कोणती तरी गोष्ट सिरीयस घेशील का तू??? आणि मला सांग, स्वतःचं मनोरंजन करायला आला आहेस तू, की माझ्या अडचणी जाणून घ्यायला...मसालेदार तर तुझ्याकडे आहे सध्या..साक्षी...बरं तुला जायचं होत ना तिच्याकडे? कधी जाणार..?"

"हो ग, पण अतुल येतोय, त्याला भेटून मग जातो..."

चेतनने अतुललाही बोलावलं आहे हे ऐकून मला पुन्हा त्याच्यासमोर बसण्याची मनस्थिती नव्हती..त्यामुळे मी विचार केला की तो यायच्या आधी मी जाते, म्हणजे नको त्याला बघणं आणि नको तो मनस्ताप... चेतन मात्र मला थांबवण्यासाठी आग्रह करत होता, पण मी काही त्याचं ऐकलं नाही आणि उठून जायला निघाली तर त्याने माझा हात पकडून उगाच केविलवाणा चेहरा पाडून 'प्लिज, प्लिज' करत पुन्हा मला थांबवण्याचा प्रयत्न केला...इतक्यात अतुल येऊन उभा झाला..चेतनने माझा हात तसाच पकडून ठेवला आणि अतुलकडे बघत बोलला,

"अरे...तू आलास .….."

"हो...पण चुकीच्या वेळी आलो का मी???"
अतुल माझ्याकडे बघून बोलला, इतक्यात मी माझा हात चेतनच्या हातातून मागे घेतला....

"चुकीच्या वेळी म्हणजे??" चेतन बोलला,

"अरे म्हणजे, मला म्हणायचं होतं की उशीर तर नाही झाला ना मला यायला....बाकी..कसं काय अचानक आलास? काही विशेष कारण होतं का?"

"हो, म्हणजे काय, हे बघ.... ही विशेष आहे ना..! "
माझ्याकडे ईशारा करत चेतन बोलला,

"अरे हो... कळायला हवं होतं मला ते.." आणि अतुलचं ते वाक्य माझ्या जिव्हारी लागलं, आता मला तिथे बसणं कठीण झालं होतं, पण चेतनमुळे बसावं लागत होतं, अतुलचं आणि चेतनचं बोलणं सुरू होतं आणि मला मात्र तिथून कधी एकदाची निघते असं झालं होतं...पण चेतनचं बोलणं सुरू झालं की थांबायचं नावचं घेत नव्हतं...त्याच्या इतक्या गप्पा तर मुलींनाही सुचत नसाव्यात..

"तू हिला काही सांगत का नाहीस रे समजवून?? ग्रेडिंग किती कमी झालं मॅडमचं?? तू मदत करायला हवीस ना तिला अभ्यासात???"
आणि चेतनने माझं गाऱ्हाणं अतुलकडे मांडलं...अतुलच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव पाहून हे कळत होतं की त्याला माझ्या रिझल्ट बद्दल कल्पना नाही...पण स्वतःच्या भावना कश्या काबूत ठेवायच्या हे खूप चांगलं जमायचं त्याला... मीच त्याबाबतीत मूर्ख होती...तो बोलला,

"माझ्याकडे कोणी अडचण घेऊन आलं तर मी नक्कीच मदत करतो रे, आणि इलेक्ट्रिकल चा व्यक्ती सिव्हिल वाल्याला काय मदत करेल...?"
अतुलने असं बोलून सरळ सरळ हात वरती केले होते, मला चेतचाही राग आला की का त्याने अतुलसमोर विषय काढला आणि अतुलच्याही बोलण्यात मला हे जाणवलं की तो फक्त बहाने करत आहे मला टाळण्याचे...

"चेतन... इंजिनिअरिंग मध्ये ना, फर्स्ट इयर मध्ये सगळ्यांना सगळे विषय सारखेच असतात.. त्यामुळे एका सिनिअर ने असं बोलणं शोभत नाही, आणि मला कोणाच्याही मदतीची गरज नाही...." मी पण तितकंच खऊट उत्तर दिलं...

"पण इतक्या हुशार व्यक्तीचे ग्रेडिंग कमी होणं चांगलं नाही, प्लेसमेंट ला अडचण येईल...आणि हे समजत नाही, इतपत कोणी लहान नाही इथे..कळायला हवं ना..."
माझ्याकडे एक तिरकस नजर टाकत अतुल बोलला, पण मला अतुलच्या बोलण्याचा खूप राग आला होता..असा दाखवत होता जसं त्याला माझी परिस्थिती कळतच नाही...

"हो रे, पण लहानच आहे ती...हे बघ यामुळे तुला बोलत होतो मेडिकल ला ऍडमिशन घे, आपण सोबत असतो तर ह्या अडचणी आल्या नसत्या...मी बोललो होतो ना, माझ्याशिवाय तुला कोणी हँडल नाही करू शकत..हाहाहा..."
आणि चेतन मस्करी करत बोलला...

"हो रे, चुकलंच माझं...तुझ्या सारखं कोणी समजून घेणारं आणि समजवून सांगणारं दुसरं कोणीच नाही...पण आता मला माझी चूक कळली, तू इतक्या चांगल्याने समजवून सांगितलंस ना मला...."
मी पण अतुलकडे बघत तावातावात चेतनला बोलली, माझं बोलणं ऐकून अतुल ताडकन उभा झाला आणि जायला निघाला पण चेतनने त्याला थांबवलं अन बोलला,

"काय घाई आहे रे तुम्हा दोघांना जायची...बसा गुपचूप दोघंही...बरं अतुल, हिच्या आयुष्यात तर माझ्याशिवाय कोणी नाही, त्यामुळे तिच्याकडे काही नाही मसालेदार सांगायला...तू सांग, तुझ्या आयुष्यात होती ना ती, काय यार तिचं नाव आठवत नाही, तुमचं काय झालं..?"

"तुझ्यासारखं नशीब कुठे भावा माझं, माझं तर आयुष्यचं अळणी अन सपक वाटायला लागलंय मला??"

"का रे काय झालं?"

"काही नाही तेच,

वो फुल किसीं और का था,
जो मेरे अंगने खिला नही,
जीस रंग मे घुलना था मुझको,
वो रंग उसमे मिला नही।"

अतुलचं बोलणं मला असह्य झालं आणि चेतनला बोलून मी लगेच होस्टेलवर निघून आली... काय समजतो हा मुलगा स्वतःला? कधीही येणार आणि मला दुखवुन जाणार, पण आता यापुढे असं नाही होऊ देणार मी...मी स्वतःला समजवत होती.. आणि मला त्या मनस्थितीतून निघणं गरजेचं होतं, कारण मी बाबांना नाराज केलं होतं, आज चेतन इतक्या हौसेने मला भेटायला आला पण मी माझ्या मित्राला ही त्याच्या हक्काचा वेळ देऊ शकली नाही, त्यामुळे मी ठरवलं आता काहीही झालं तरी चालेल पण एका अतुलमुळे मी माझ्या आयुष्यातील बाकी नात्यांना निराश होऊ देणार नाही....
*******************

प्रेमात दोन व्यक्तींमध्ये कितीही रहस्यमय अबोला असला तरी त्या शांततेत निरागसता असते...हेच निरागस प्रेम त्या व्यक्तीची सतत काळजी करत राहते...पण तरीही, कुणावर प्रेम करून देखील त्याला ते समजू नये, यासारखी मोठी व्यथा नाही...कायम सोबत राहताना एकाने बहरावं आणि दुसऱ्याने मात्र तो बहर पाहू ही नये ही मोठी शोकांतिका वाटते मला...अतुलला तेंव्हा काय वाटत होतं माहीत नाही, पण मी मात्र आतल्या आतमध्ये कुढत होती...त्यादिवशी कॅन्टीनमधून आल्यावर रूममध्ये मनसोक्त रडून घेतलं...अतुलचे शब्द मला तीळ तीळ मारत होते, बरोबर बोलला तो, मी काही लहान नाही की मला माझं बरं वाईट समजू नये, आणि माझ्या परिस्थितीला मीच जबाबदार आहे त्यामुळे त्यासाठी अतुलला दोष देऊन काहीही होणार नव्हतं...'जब जागो तब सवेरा' म्हणतात ना, त्यामुळे आता नवीन सेमिस्टर ला मी पण दाखवून देईल अतुलला की त्याच्या असण्या नसण्याचा मला काहीही फरक पडणार नाही...आता मी सज्ज होती नव्या सुरुवातीसाठी...!!!

जानेवारी फेब्रुवारी म्हणजे फेस्टिव्हल टाईम असतो कॉलेजमध्ये...त्यामुळे मुलांना अभ्यास, लेक्चर्स, यातून थोडी शांतता मिळते...तसे आम्ही फ्रेशर्स पण मागे राहणारे नव्हतो.. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कल्चरल प्रोग्राम होते, त्याआधी टेक्नीकल इव्हेंट्स होते...ऋता आणि अनिमिष पेपर प्रेझेन्टेशन मध्ये बिझी होते...मी आणि निखिलने मात्र रोबोटिक्सचं वर्कशॉप करायचं ठरवलं... शिकवणारे आमचे सिनिअर्स होते, त्यात अतुल आणि प्रियाही होते, पण जेव्हा मनाने ठरवलं होतं की आता काही फरक पडूच द्यायचा नाही, तर मी पण त्याला सरळ दुर्लक्षित केलं...तीन दिवस ते वर्कशॉप होतं त्यामुळे रात्री नऊ वाजेपर्यंत ते चालायचं, मला तशी होस्टेलमधून परवानगी ही मिळाली होती...वर्कशॉप मध्ये आम्हाला काहीही अडचण यायची तर मी अतुल सोडून बाकी सगळ्यांची मदत घ्यायची...त्याला कदाचित कळत असावं की मी त्याला टाळत आहे...एक दोन वेळा तो माझ्या टेबलाजवळून फिरला ही, पण मात्र त्याच्याकडे लक्ष दिलं नाही...

रात्री वर्कशॉप झाल्यावर मला बॉईज हॉस्टेल क्रॉस करून यावं लागायचं... तसा निखिल असायचा सोबत पण त्यादिवशी त्याला त्याचे बाबा भेटायला आले त्यामुळे तो लवकर निघून गेला...वर्कशॉप झाल्यावर सगळे निघून गेले, मी बाहेर येऊन पाहिलं तर कोणीही दिसलं नाही, आणि गडद अंधार पाहून भीती वाटत होती खूप...मी ऋताला फोन करणार इतक्यात,

"मी आहे सोबत...चल.. येतो हॉस्टेलपर्यंत मी..."
अचानक अतुल माझ्या बाजूने येऊन उभा झाला..मी फक्त त्याला पाहिलं आणि काहीही उत्तर न देता पुढे निघाली..मी माझे पाऊलं झपाझप पुढे टाकत होती, तरी त्याने माझ्या मागून पळत येऊन मला रोखलंच...आणि बोलला,

"मी आता काहीतरी बोललो तुला...उत्तर तर दे.."

"कोणत्या अधिकाराने??? आणि अनोळखी लोकांशी बोलत नाही मी..." आणि असं बोलून मी पुन्हा चालायला लागली...

"त्यादिवशी साठी अजूनही नाराज आहेस??...सॉरी... मलाही वाईट वाटलं पण तुला बोलण्याची हिम्मत होतं नव्हती...पण आता बोलू शकतो ना आपण...."
त्याच्या ह्या बोलण्यावर मी थांबली आणि बोलली,

"काय?? काय बोलायचं आहे??? जेंव्हा मी वारंवार तुला बोलायला सांगितलं तेंव्हा तर काही बोलला नाहीस तू.. आणि त्यादिवशी, कॅन्टीनमध्ये, काय बोलला, की मला सगळं कळायला हवं, मी लहान नाही...माझे ग्रेडिंग कमी का आले, याची खरंच तुला काही माहिती नाही??? पण ठीक आहे, तो माझा प्रश्न आहे, आणि आताही मी लहान नाही जे तु मला बोट पकडून हॉस्टेलपर्यंत नेशील..जाईल माझी मी...गरज नाही कोणाची मला...."
आणि असं बोलून मी पुन्हा माझे पाऊलं उचचले तर त्याने जबरदस्ती माझा हात पकडून मला थांबवलं आणि माझ्या समोर येऊन उभा झाला...

"पण मला गरज आहे तुझी...म्हणजे तुला बोलायची....मी क्लियर करतो ना सगळं..."
तो माझ्या चेहऱ्याकडे बघत बोलला...

"बोल..काय क्लियर करणार तू?? आज बोलचं तू...तुझा तो रोष पाहून माझ्यावर काय बितली, हे क्लियर करणार तू?? माझ्या मनात काय चाललंय तुझ्याबद्दल हे तुला दिसत असताना ही माझे ग्रेडिंग कमी का आले यावरून टोमणे कसे द्यावे हे क्लियर करणार तू?? की आता जेंव्हा सगळं काही विसरून मी पुढे जाण्याचा प्रयत्न करते, आणि ते प्रयत्न कसे असफल करायचे हे क्लियर करणार तू...?? तू ना...दगड आहेस, ज्याला माझ्यासाठी कधीच पाझर फुटणार नाही...तू मला कधीच समजू शकणार नाहीस अतुल...कधीच नाही...आणि मी आयुष्यात कधी तुला बोलणार ना..."
आणि बोलता बोलता माझा कंठ दाटून आला, माझे शब्द बाहेर पडत नव्हते...आवाज थरथरत होता...मला माझे अश्रू अनावर झाले होते...मी दोन्ही हातांनी माझा चेहरा लपवला आणि माझे अश्रू लपवण्याचे निरर्थक प्रयत्न केला, तेवढ्यात अतुल ने अचानक मला त्याच्या मिठीत घेतलं... आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवत, मला समजवत बोलला,

"बस....शांत हो...प्लिज... शांत हो...

गलती की है तो माफ़ कर ,
मगर यूँ ना नजरअंदाज कर।
दिल बैठ जाता है तेरे खामोशी से,
इस किस्से का गलत अंजामकर।"

त्याचे स्वर माझ्या कानात पडताच मला जाणवलं की त्याला ही गहिवरून आलंय...या जगात सगळ्यात सुरक्षित आणि सुखाची जागा असेल तर ती आहे आपल्या प्रिय व्यक्तीची मिठी...!! त्याच्या कवेत जे समाधान मला भेटत होतं ते कुठेच नव्हतं..आज इतक्या वर्षांनी मी आणि अतुल इतक्या जवळ होतो, मला त्याच्या हृदयाची धडधड, त्याचे स्पंदनं कळत होते...त्या निरव शांततेतही इतकं समाधान होतं...असं वाटत होतं ही वेळ, हे क्षण मला कैद करता आले तर...!! पण असं झालं नाही..काही क्षणांनंतरच अतुलचा मोबाईल वाजला, आणि आम्ही भानावर आलो..मी लगेच अतुलपासून लांब झाली...त्याने फोन उचलला तर तो प्रिया चा होता...आम्ही अजूनही इतक्या जवळ होतो की मला त्याच्या फोनमधून प्रियाचा आवाज येत होता, आणि आजूबाजूला इतकी शांतता होती त्यामुळे तिचे शब्द मला स्पष्ट ऐकू आले...

"हॅलो, कुठे आहेस डिअर... मी वाट पाहत होती तुझ्या फोनची...." प्रियाचे शब्द होते हे.....
आणि हे ऐकून माझा मलाच राग आला की का हा समोर येताच माझं मन मेणासारखं वितळून जातं... पण स्वतःच्या मनावर ताबा ठेवणं गरजेचं होतं...

"मी सध्या बिझी आहे, नंतर बोलतो...." असं बोलून अतुलने लगेच फोन कट केला....आणि मी त्याला असा धक्का देत बाजूला झाली त्यामुळे तो बोलला,

"सॉरी... प्लिज आता काही चुकीचं नको समजू... तू अशी रडत होती, मला ते बघवल्या नाही गेलं आणि मी तुला असं जवळ...पण खरंच, माझं तुझ्यावर किती...."
तो अगदी माझ्याजवळ येऊन माझ्या दोन्ही खांद्याना पकडून, माझ्या डोळ्यांत बघत बोलला, पण त्यापुढे तो अजून काही बोलेल त्याआधी मला ते प्रियाचे शब्द आठवले... आणि मी डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेतला आणि अतुलचे दोन्ही हात माझ्या खांद्यावरुन काढत बोलली,

"पूढे काहीही बोलू नकोस तू...तीन वर्षे..तीन वर्षे मी सतत तुझ्या विचारात घालवले, मला नाही माहीत काय भावना आहे ही पण यामुळे फक्त अन फक्त मीच त्रास भोगला आहे हे मला जाणवतंय आता...त्यामुळे सगळं विसरून मी आता पुढे जाण्याचा निर्णय घेतलाय...कितीतरी रात्री रडवण्यात घालवल्या आणि जेंव्हा जेंव्हा त्यातुन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तू असा समोर उभा राहिलास, तुझ्या 'सॉरी' सोबत...मला विसरून जायचं आहे सगळं.. वेळ लागेल, पण असं वारंवार एकमेकांसमोर येऊन, मनं दुखवुन पुन्हा 'सॉरी' बोलण्यात काही अर्थ नाही... विसरायचंच आहे तर दुःख तरी का द्यायचं एकमेकांना... बरोबर ना?? "

माझ्या ह्या बोलण्यावर तो फक्त टक लावून माझ्याकडे बघत होता...माझ्या पाणावलेल्या डोळ्यांना आता तो अस्पष्ट दिसत होता...इतक्यात पुन्हा त्याचा फोन वाजला आणि यावेळी ही प्रियाच होती..मला कळून चुकलं होतं की आता माझी निघण्याची वेळ झाली आहे, या जागेवरून ही आणि अतुलच्या आयुष्यातुन ही....आणि मी निघून आली, काय माहीत का, पण वाटत होतं मनाला की यावेळी अतुल येईल पुन्हा माझा हात धरून मला थांबवेल, पण त्याने मागून साधा आवाजही दिला नाही... यावेळी ही निराशाच पदरी पडली... होस्टेलच्या मेन गेटच्या बाहेर जो बेंच होता तिथे बसून मनसोक्त रडून घेतलं जोपर्यंत माझे अश्रू सुकून जात नाहीत...
*********************

क्रमशः