Manachya vaatevarti Avyakt to an mi - 10 in Marathi Fiction Stories by अनु... books and stories PDF | मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 10

Featured Books
  • પ્રેમ સમાધિ - પ્રકરણ-122

    પ્રેમ સમાધિ પ્રકરણ-122 બધાં જમી પરવાર્યા.... પછી વિજયે કહ્યુ...

  • સિંઘમ અગેન

    સિંઘમ અગેન- રાકેશ ઠક્કર       જો ‘સિંઘમ અગેન’ 2024 ની દિવાળી...

  • સરખામણી

    સરખામણી એટલે તુલના , મુકાબલો..માનવી નો સ્વભાવ જ છે સરખામણી ક...

  • ભાગવત રહસ્ય - 109

    ભાગવત રહસ્ય-૧૦૯   જીવ હાય-હાય કરતો એકલો જ જાય છે. અંતકાળે યમ...

  • ખજાનો - 76

    બધા એક સાથે જ બોલી ઉઠ્યા. દરેકના ચહેરા પર ગજબ નો આનંદ જોઈ, ડ...

Categories
Share

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 10

पुढे...

प्रेम लपवता येत नाही म्हणतात... खरं आहे...पण काही वेळा प्रेम हे अलगद जपून ठेवल्या जातं, ते बोलून दाखवल्या जात नाही आणि मिरवल्याही जात नाही...ते प्रेम फक्त त्या दोन व्यक्तींनाच कळत असतं, तिसऱ्या कोणालाही त्याची फारशी कल्पना नसते...अबोल असतं पण कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते व्यक्त होतंच असतं...अशी ही नजरेची, स्पर्शाची, इशाऱ्यांची भाषा त्या दोन लोकांना कधी अवगत होऊन जाते हे त्यांनाही कळत नाही....असं प्रेम खूप विशेष असतं... अगदी खास..!!आणि सोप्प नाही हं प्रेमाची ही परिभाषा समजणं...त्यामुळेच तर मनोहर श्याम जोशी म्हणतात की प्रेमाचा आनंद प्रेमाच्या पिडेतून वेगळा करता येत नाही...जिथे आनंद अन पीडा सोबत नांदत असतात ते घर म्हणजे प्रेम...!!

...पण काय असतं, माहीत आहे??? कृतीला शब्दांची जोड हवीच..प्रत्येकवेळी तुमची कृती तुमच्या भावना सांगू शकत नाही...कधी कधी कृतीतून काळजी जाणवते, पण प्रेम नाही..प्रेम आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला काळजी ही करावी लागते आणि बोलूनही दाखवावं लागतं...अतुलच्या वागण्यावरून खूप वेळा असं वाटायचं की तो मला खूप खास मानत असेल का?? पण त्याने ते कधी बोलून दाखवलं नव्हतं, कबूल केलं नव्हतं, त्यामुळे उगाच स्वप्नांचे मनोरे मला केवळ कल्पनेच्या जमिनीवर बांधायचे नव्हते...आणि कदाचित यामुळेच जशी मी त्याची वाट बघत होती व्यक्त होण्याची, तो ही माझ्याकडून तीच अपेक्षा करत होता हे मला कळलंच नाही...

त्यादिवशी संध्याकाळी माझा होस्टेलच्या पहिला दिवस होता, पहिल्यांदा आईबाबांपासून दूर राहताना त्रास तर होतच होता..मी रूममध्ये सामान ठेवून बाहेर जाऊन बसली..प्रशस्त होस्टेलच्या प्रांगणात भरपूर झाडं होती, आणि आजूबाजूला बेंचेस होते...मी तिथे जाऊन दोन अश्रू गाळले तेवढ्यात मोबाईल वर अनोळखी नंबर वरून फोन येत होता...मी घरच्यांना सोडून माझा नंबर अजून कोणालाही दिला नव्हता त्यामुळे फोन उचलावा की नको या चलबिचल अवस्थेत असतांना शेवटी फोन केलाच रिसिव्ह तर तिकडणं आवाज आला...

"अतुल बोलतोय...." आणि हा आवाज ऐकून काय आनंद झाला सांगू...कारण जेवढा वेळ तो दिवसभर सोबत होता तितका वेळ त्याने एक नजर ही दिली नाही मला आणि आता फोन केला...त्याने फोन केला नसता तर माझी तर कधीच हिम्मत झाली नसती त्याला नंबर मागायची...आणि काही उत्तर न देता मी त्या फोनकडेच पाहत होती,

"हॅलो...हॅलो...अग आवाज येतोय का..."
त्याचे स्वर पुन्हा कानावर पडल्यावर मी लगबगीने उत्तर दिलं,

"हं.. हा, हो..येतोय आवाज...."
आता मी उत्तर देऊन झाल्यावर मात्र काहीच सुचत नव्हतं बोलायला...काही सेकंद असेच शांततेत गेल्यावर , मीच पुन्हा बोलली,

"काही..काही काम होतं का??"

"नाही...तुझा पहिला दिवस आहे आज, तुझे बाबा गेले तेंव्हा तू रडत होतीस, मला वाटलं तुला करमत नसेल, त्यामुळे फोन केला...बाकी काम काही नव्हतं..पुढच्या वेळी काम असेल तेंव्हाच कॉल करेल..."

"अरे..नाही..तस नाही.. मला तसं नव्हतं बोलायचं..."

"राहूदे..तुला कसं आणि कोणत्या अर्थाने बोलायचं असतं हेच मला कळलं नाहीये अजून...असो, सॉरी तेंव्हा तू कॉलेजमध्ये फॉर्म भरत होतीस तेंव्हा तुला न विचारता तिथून तुझा नंबर घेतला...काळजी घे...बाय...."

त्याला बोलण्यासाठी मी हॅलो हॅलो करत राहिली पण तोपर्यंत त्याने फोन कट केला होता.. मला स्वतःवरच राग येत होता की का मी असं विचारलं त्याला की काही काम आहे का.? त्याने तर काही काम नसतांनाही शंभर फोन केले तरी मला आवडेल....शीट..पुन्हा त्याला कॉल बॅक करून बोलावं हा विचारच केला तेवढ्यात माझ्या समोर थोडीशी ठेंगणी, थोडीशी जाड, चष्मा लावलेली आणि चेहऱ्यावर 'कोलगेट विसीबल स्माईल' घेऊन एक मुलगी उभी होती..मी तिच्याकडे बघताच, ते स्माईल अजून वाढवत ती बोलली,

"हे..हाय... तू रूम नंबर अकरा मध्ये आहेस ना...म्हणजे आता तूच सामान आणून ठेवलंस ना तिथे...??"

"हो..का...काही प्रॉब्लेम झाला का??" मी जरा चिंतेने विचारलं...

"नाही ग..मला पण तीच रूम ऑलोकेट झाली आहे..बरं झालं ना आपण दोघी फर्स्ट इअर सोबत आहोत...बाय द वे...मी ऋता... आजपासून आपण फ्रेंड्स..."
नाकावरचा चष्मा सरळ करत आणि बत्तीशी दाखवत ऋताने आपला हात पुढे केला...आणि आमची मैत्री झाली..कायमचीच... तिचं हास्य जितकं निरागस होतं, मन त्याहूनही नितळ होतं... थोडीशी बालिश होती, खूप जास्त बकबक करणारी, पण मनाने खूप चांगली...आणि विशेष म्हणजे माझ्याच क्लास मध्ये होती...पहिल्या भेटीत मन जिंकून जाणारी आयुष्याभराची पक्की मैत्रीण होईल हे तेंव्हा वाटलं नव्हतं...

तिच्या बडबडीत मी पूर्णपणे विसरून गेली की अतुलला एक फोन करावा...किती अजब ना...! ऋता अगदी थोड्यावेळा पूर्वीच भेटली होती तरीही जे मनात आहे सगळं बोलून मोकळी झाली, आणि त्यामुळे मलाही किती सहजपणे तिने आपलंस करून घेतलं...मी आणि अतुल तर कधीपासून ओळखतो एकमेकांना मग तरीही इतके का अवघडतो बोलतांना... म्हणजे मैत्रिपेक्षा काही जास्त आहे का आमच्यात?? त्याला पुन्हा फोन करून बोलावं वाटलं पण काय बोलावं हेच कळेना...बोलायचं ही आहे अन बोलायला काही सुचत ही नाही, किती अवघड परिस्थिती आहे...त्यामुळेच मला काय वाटतं,

"एक मंजिल तलाशता परेशान है,
दुजा खुश है यारो के सफर मे,
बस इतनासा फर्क है दोस्ती और प्यार मे..."

एक आठवडा झाला होता होस्टेलला येऊन, कॉलेजही सुरू झालं होतं... आता सिव्हिल म्हटल्यावर क्लास मध्ये मुलींचा दुष्काळ होता...साठ लोकांमध्ये आम्ही फक्त पाच मुली होतो...बाकी तिघी मुलींची मुलांसोबत चांगली मैत्री झाली होती, पण मी आणि ऋता मात्र थोडे लांबच होतो... पण असं कसं जमणार होतं?? सोबतच शिकत असतांना काय मुलगा आणि काय मुलगी...मैत्री सगळ्यांसोबत करावी लागते...त्यामुळे अनिमिष आणि निखिल च्या रुपात चांगले मित्र ही मिळले..मी, ऋता, अनिमिष, निखिल बऱ्यापैकी रुळलो होतो खरे, पण रॅगिंग वजा सीनिअर्स च्या 'इन्ट्रो' ने अतिशय कंटाळलो होतो... येता जाता 'इन्ट्रो' च्या नावाखाली कोणीही आम्हाला गाणं गावून दाखव, कविता बोलून दाखव, शुद्ध मराठी बोलून दाखव, नाचून दाखव आणि माहीत नाही काय काय करायला भाग पाडत होते...जीव रडकुंडीला यायचा...बरं मुलं तर मुलं, हॉस्टेल मध्ये सिनिअर मुलीही काही कमी नव्हत्या...रोज रात्री जेवण झाल्यावर सगळ्यांची मैफिल जमायची आणि त्यात आम्ही बिचारे फर्स्ट इअर त्यांचं मनोरंजन करायचो...आणि सगळ्यांमध्ये अतुलला काही बोलणं झालं नाही...एकदा मी फोन केला होता त्याला, त्याने उचलला नाही...मला वाटलं तो नाराज असावा...आणि भेटायचं म्हटलं तर त्याची बिल्डिंग वेगळी, माझी वेगळी त्यात अक्खा दिवस लेक्चर्स असायचे...फुरसत काही मिळली नाही...पण हे सगळं घडत असताना मात्र मन बैचेन होतंच माझं की इतके दिवस सोबत नव्हतो पण आता सोबत एकाच कॉलेजमध्ये असूनही सोबत नाही....
********************

माझ्यासाठी सगळं काही नवीन होतं...पूर्ण दिवस कॉलेज, त्यात सगळे नवीन विषय, आणि प्रोफेसर ही असे होते की फर्स्ट इयर म्हणून आमच्या सोबतच जास्त कठोर असायचे...सिनिअर्स कॉलेज बंक करायचे, फ्रेशर पार्टी च्या नावाखाली बाहेर फिरत बसायचे ते मात्र चालायचं, पण आमच्या सोबत तर सावत्र व्यवहार सुरू होता... त्यात फिझिक्स चे सर तर इतके तत्ववादी होते की क्लास मध्ये जरा उशिरा गेलं तर सगळ्यांसमोर उभं करून आमचा सन्मान करायचे, त्यामुळे त्यांचा क्लास चुकवणं किंवा उशिरा जाणं सगळेच टाळायचे...असा 'मान' कोणालाही नकोच असतो....त्यादिवशी संध्याकाळी चार वाजता आमचं फिझिक्सचं लेक्चर होतं, पण अनिमिष आणि ऋता कॅन्टीन मध्ये खायला बसले की त्यांना वेळेचं भानच राहायचं नाही...शेवटी त्या दोघांना सोडून मी अन निखिल धावत पळत क्लास रूम कडे जात असताना मला वाटलं, कोणीतरी मला हाक मारली...मागे वळून पाहिलं तर अतुल होता...

"तू त्यादिवशी फोन केला होतास..सॉरी माझं लक्ष नव्हतं...काही अडचण होती का..." अतुल बोलला, पण....
निखिलला अतुलच्या मागून सर येताना दिसले आणि त्याने माझा हात पकडला अन बोलला,

"याला उत्तर नंतर देशील ग, वेळ बघ ना जरा..."
हातातल्या घडीत निखिल वेळ दाखवत बोलला, चार वाजून गेले होते, सर कोणत्याही क्षणी क्लास मध्ये पोहचणार होते, त्यामुळे आमची धांदल उडाली आणि मी घाईघाईत अतुलला बोलली,

"अतुल आता वेळ नाहीये प्लिज...मी नंतर बोलते..."...असं बोलून मी अन निखिलने क्लास कडे धाव घेतली पण त्यावेळी अतुलला असं वाटलं की मी त्याला दुर्लक्ष केलं...

प्रेमासोबत अपेक्षा ही किती वाढतात आपल्या...म्हणजे प्रेमात कितीही समजदारीची भाषा आपण बोललो तरी एक सत्य हे असतं की आपण त्या व्यक्तीबद्दल थोडे पसेसिव्ह तर होतोच... त्यामुळे कधी जर एखद्या वेळी तो आपल्या मनासारखा नाही वागला तर ते मनाला लागून जातं.. बोलून नाही दाखवत आपण ते, पण वाईट वाटतं हे नक्की... असंच त्यादिवशी अतुलला वाटलं होतं...त्यामुळे संध्याकाळी जेंव्हा मी होस्टेलला परत आली आणि त्याला कॉल केला तर त्याने फोन उचलला नाही...मग मी पण विचार केला त्याला भेटूनच बोलते...

दुसऱ्या दिवशी सकाळी दहालाच लायब्ररीमध्ये जायचं होतं बुक बँकेसाठी... त्यामुळे मी निखिल, ऋता, अनिमिष सोबतच गेलो... मी बुक्स घेऊन बाहेर आली तर तिथे मला अतुल दिसला...मला बोलायचं तर होतंच त्याच्याशी..त्यामुळे मी त्याला आवाज देत होती, त्यानेही मागे वळून पाहिलं पण तेवढ्यात त्याच्यासोबतचा त्याचा मित्र जो बाहेर कट्ट्यावर बसला होता त्याने मला आवाज दिला आणि बोलावलं...अतुलही त्याच्या सोबत जाऊन बसला...

"काय ग?? फर्स्ट इयर का?" तो मुलगा मला बोलला, आणि त्याच्याकडे बघून मी फक्त होकारार्थी मान हलवली.. त्यांच्यात एक मुलगी बसली होती, मला बघून ती उभी झाली आणि अतुलला बोलली,

"मी हँडल करू??" अतुलने फक्त हसून मान डोलावली,

"तुला माहीत आहे, भारतीय संस्कृतीत जस बायको नवऱ्याचं नाव घेत नाही, तसं इंजिनिअरिंग मध्ये ज्युनिअर सिनिअर्सला नावाने हाक मारत नाहीत..आणि तू तर पार लायब्ररी मधूनचं अतुलच्या नावाची माळ जपत होतीस...होस्टेलला हे नियम कोणी शिकवले नाही का तुला??"

मी पुन्हा 'इन्ट्रो' च्या कचाट्यात सापडली होती हे कळलं होतं मला...भांबावून मी बोलली,

"स...सॉरी..पण मला काम होतं त्यामुळे..."

"ओहहहह...काम होतं म्हणून तोंडातून सॉरी निघालं का?? काय काम होतं, जुन्या रिडींग घेऊन जर्नल मध्ये छपायच्या
होत्या का?? काही मतलब असल्याशिवाय तर जुनिअर्स सिनिअर्स च्या आसपास ही भटकत नाहीत..." आणि ते सगळे मिळून टाळ्या देत हसायला लागले...हसता हसता अतुल बोलला,

"राहू दे ग प्रिया, दुनियाच मतलबी आहे, त्यात हीची बिचारीची काय चूक...ते काय आहे ना,

दुनिया की सबसे बडी बिमारी तुमने कहा जानी है
वक्त नही किसिके पास, जबतक मतलब ना हो खास।"

"चला आता शिक्षा म्हणून उठाबशा काढा..." प्रिया बोलली आणि सगळे हसायला लागले,

आता सगळ्यांच्या हसण्यात अतुलही शामिल झाला होता, त्याचं असं वागणं माझं मन दुखवुन गेलं होतं..मला वाटलं होतं, तो त्याच्या मित्रांना थांबवेल पण तो तर त्यांना टाळ्या देऊन देऊन माझी मज्जा घेत होता... इतक्यात मागून निखिल, अनिमिष आणि ऋता ही आले..आम्ही सगळे अश्या वागण्याला खूप कंटाळलो होतो आता..त्यामुळे निखिल थोडा चिडूनच बोलला,

"बस करा ना यार आता...एक महिना झालाय सगळे आम्हाला ज्युनिअर म्हणून आमची थट्टा करताय, पण आता खरंच खुप झालं...तुम्ही ही या परिस्थितीतुन गेलेच असणार ना, मग का असं करताय..तुम्ही तर समजून घ्यायला हवं..."

"ओ...ओ सर...बस हं, पुरे झालं दोन शब्दांचं भाषण...पुढच्या वर्षी जेंव्हा तू सिनिअर होशील ना तेंव्हा तू ही मज्जा घेशीलच... तेंव्हा बघतो तुझे तत्व कुठे जातात...आणि आम्ही फक्त मजाक करत आहोत, जेणेकरून आपल्यात एक हेल्दी वातावरण तयार व्हावं.."
अतुलचा मित्र बोलला,

पण आता माझे डोळे भरून आले होते, कदाचित ते अतुलला जाणवलं असेल त्यामुळे त्याने सगळ्यांना गप्प राहायला सांगितलं आणि दोन पाऊलं पूढे येऊन मला काही बोलणार तेवड्यात ऋता बोलली,

"चला यार, इथेच टाईमपास करायचा आहे का?? क्लास आहे आपल्याला...चल ग, तू कशाला चेहरा पाडलाय, हे लोकं अजून एक सेमिस्टर असाच त्रास देतील.. तर तू काय प्रत्येकवेळी अशी रडणार आहेस का...."

"हो, बरोबर बोलते ऋता..चल तू, आता डायरेक्ट प्रिंसीपल च्या ऑफिसमधेच जाऊ..."
आणि असं बोलून ऋता आणि निखिल मला ओढत घेऊन गेले.. रस्त्यात अनिमिष एकदम गोंधळून बोलला,

"अरे यार, तुम्ही इतके टशन देऊन आले, खरंच आपण प्रिंसीपल सरांकडे गेलो तर हे लोकं आपला जीव घेतील.."

"गप्प बस रे...धमकी द्यायला काय जाते...हहहाखिखिखी..." आणि असं बोलून निखिल अन ऋता एकमेकांकडे बघून जोर जोरात हसायला लागले..पण मला खरंच दुःख झालं होतं.. अतुल का वागला असेल असा आणि ही तीच प्रिया असावी नक्की, त्याची मैत्रीण..किती बोडिंग आहे त्यांचं, म्हणजे अतुल आणि तिची खूप चांगली मैत्री असेल का किंवा अजून काही आहे?? हा सगळा विचार करून मला अजूनच भरून येत होतं...आम्ही जात असताना मागून अतुल धावत धावत आला आणि येऊन अचानक माझ्या समोर उभा झाला आणि धापा टाकत बोलला,

"तू सरीअस झाली यार, सॉरी...आम्ही तर मजाक करत होतो...."

"हो, कळला तुमचा मजाक किती मजेशीर होता..आता व्हा बाजूला जाऊद्या आम्हाला..." निखिल रागात बोलला,

"मी तुला नाही बोलत आहे, मी हिच्याशी बोलत आहे..."

"ये तू ना...." निखिल रागात अजून काही बोलेल याआधीच मी त्याला थांबवलं आणि बोलली,

"निखिल, अनिमिष, ऋता...तुम्ही जा पुढे, मी आली लगेच...प्लिज जा..." ते सगळे जायला तयार नव्हते पण मी हट्ट केल्यामुळे बेमनाने गेले... ते गेल्यावर मी अतुलकडे नजर वळवली, आणि रागातच बोलली,

"हम्म, बोला सर, अजून काय करावं लागेल मला, म्हणजे सिनिअर्स चा रिस्पेक्ट नाही केला तर अजून काय शिक्षा?? बरं झालं माझा गैरसमज दूर केला तुम्ही?? मला वाटलं होतं, आपण ओळखतो एकमेकांना चांगलं त्यामुळे असं सगळ्यांसमोर तरी तू मला अपमानित करणार नाहीस.. मला वाटतं होतं मी तू मला....जाऊदे सोड..."
मी माझे डोळे पुसत दुसरीकडे मान वळवत बोलली,

"हे बघ, मी सॉरी बोलतोय ना...तू मनाला लावून नको घेऊ, मजाक करत होतो आम्ही..तुला मुद्दाम दुखवायचं मी कधीच विचार करू शकत नाही, आणि माझ्या मित्रांनाही माहीत आहे तू काय आहेस माझ्यासाठी.. खूप समजदार आहेत ते सगळे, पण ती प्रिया बोलली की इतका मजाक तर आपण करूच शकतो... आणि खरंच तू त्यांच्यात मिसळून पहा तुझेही खूप चांगले मित्र बनतील ते.. प्रियाने मजाक केला असेल तरी ती पण खूप चांगली आहे मनाने...."

ते पुन्हा पुन्हा प्रियाचं नाव ऐकून ऐकून माझी तळपायाची मस्तकात गेली होती..,सतत चेतनचे तेच शब्द आठवत होते की प्रिया खूप खास आहे अतुलची, आणि मला त्रास होत होता त्या गोष्टीचा..का प्रियाच नाव मला अतुलसोबत आलेलं आवडत नव्हतं काय माहीत, पण आता मला खूप राग आला होता,

"हे बघ...ना मी तेवढी समजदार आहे, ना मला त्यांच्यात मिसळायचं आहे....आणि... ना आपल्यात तशी मैत्री आहे...काल मी क्लास ला जात असताना तू मला भेटला होता ना अन मी बोलली की वेळ नाही, त्यामुळे सगळ्यांसमोर तू मला टोमणे मारत होतास ना..."

"अरे यार...कुठली गोष्ट कुठे घेऊन गेलीस तू...मी बोललो ना, आम्ही मजाक करत होतो आणि तेही यासाठी की मला वाटते तू पण आमच्यात शामिल व्हावं...."

"बस्सस...तुझ्या त्या हायफंडू मैत्रिणीसारखी मैत्री नाही करता येत मला...जाऊदे मला... माझे मित्र पुढे गेलेत..."

"ठीक आहे..एवढा सॉरी बोलूनही तुझ्यामागे तुला मनवायला यायचं आणि तुझं ऐकूनही घ्यायचं...नाही ना मैत्री आपल्यात..निघ तू मग आता..."
तो मला वाट देत बोलला... आणि मी तिथून निघून आली... मला वाटलं तो पुन्हा थांबवेल मला, पण तोही मागे वळून आला नाही...शब्दाने शब्द वाढतो म्हणतात, पण आमच्यात तर या भांडणाने नको ते गैरसमज वाढले होते...आणि हे गैरसमज कधी दूर होणारही होते की नाही हे ही माहीत नव्हतं...
******************

क्रमशः