"सायब जरा इचार करा, काय बी लिवू नका. ती तुम्हाला हात लावू शकत नाय, काय तरी ताकद हाय तुमच्यात. नायतर तीनं आत्तापर्यंत तुम्हाला मारलं बी असत नाय." कोपऱ्यात फटफटीच्या तुकड्यांच्या मागे घाबरून लपलेला बन्या उठून उभा राहिला होता. ढाब्यावर स्टोव्ह पेटवण्यासाठी वापरत असलेले लायटर खिशातून काढून त्याने ते पेटवले होते. काय समजायचं ते अभिमन्यू समजला होता. डोक्याला एक हिसका देत त्या विकृत भुताने आपला मोर्चा बन्याकडे वळवला. आणि तेवढीचं संधी साधून अभिमन्यूने उर्वरित कथा खरडायला सुरुवात केली होती.
काही वेळापूर्वी फटफटीमागील खिशात ठेवलेला बाप्पाचा तो फोटो चाचपडत अभिमन्यूने त्याला हातात घेतले. एका हाताने लेखणी सुरु होती. डायरीवर भराभर अक्षरे उठू लागली होती. बन्याच्या अंगामध्ये कंप सुटला होता, ती दुष्टशक्ती त्याच्या जवळ जवळ जाऊ लागली होती. तो मागे-मागे सरकू लागला होता. अगदी मागच्या भिंतीला डोके टेकेपर्यंत बन्याने निकराने प्रतिकार केले. पण आता मागे जाणे शक्य नव्हते. आणि तिने बन्याच्या मानेला धरून त्याला सरळ वरती उचलून धरले. तो हात-पाय मारू लागला होता. त्याची असह्य तडफड सुरु होती. कुठल्याही क्षणी त्याने आपले प्राण गमावले असते. हातातील लेखणी तशीच खाली टाकून अभिमन्यू उठला.
"थांब कादंबरी!" त्याच्या वाक्यासरशी त्या जखिणीने आपले डोळे त्याच्या दिशने वळवले. आश्चर्य आणि कुत्सितपणाचे भाव तिच्या डोळ्यात उमटले होते.
"म्हणजे, शेवटी तू ओळखलस मला? " ती अभिमन्यूच्या जवळ येत ओरडली.
"हो ओळखलं! आणि तुझा डाव देखील ओळखला आहे, सात वर्षांपूर्वीच तू मला मारण्यासाठी ही डायरी दिली होतीस. बरोबर ना? पण दुर्दैव, मी माझे मरण या डायरीमध्ये लिहिण्याआधीच त्या स्टेशनवरील मालगाडी अपघातात तुझा अंत झाला. आणि मला या अशुभ डायरीच्या पराक्रमाची चाहूल लागली होती. त्यानंतर मी केव्हाच यात लिखाण केले नाही. जेव्हा मला या प्रकरणाचा आणि माझ्या मागे लागलेल्या आरोपांचा सोक्षमोक्ष लावायचा होता, तेव्हा मी परत या डायरीमध्ये कथा लिहिण्यास सुरुवात केली, ही संधी साधून तू परत माझ्या मागे लागलीस, तसे तर तू त्याच दिवशी या नदीघाटात घाटात मला अडवू शकत होतीस. पण माझ्या फटफटीच्या मागे असणाऱ्या गजाननाने माझे नेहमीप्रमाणे रक्षण केले आणि तेव्हा तुला काही करता आले नाही. स्टेशन ते हा नदी घाट, या पुढे तुझी काहीही ताकद चालत नाही. म्हणून तू त्यादिवशी सलीमला तुझे सावज केलेस. त्याचे हाल-हाल करायला सुरुवात केलीस, त्याच्या मार्फत तुला माझ्यापर्यंत पोहोचायचे होते. हा बघ! तोच विघ्नहर्ता आजही माझ्यासोबत आहे. आजही तू माझं काहीही वाईट करू शकत नाहीस."
हातातील छोटासा बाप्पा दाखवत अभिमन्यू तिच्यासमोर तटस्थ उभा राहिला होता. आणि डिवचलेल्या नागाप्रमाणे फंकारे मारत ती मागे मागे होऊ लागली. मागे भिंतीजवळ निपचित पडलेली रक्षा आता हळूहळू शुद्धीवर येत होती. पण कादंबरीच्या हातात टांगलेल्या बन्याची शुद्ध कायमचीच हरपण्याची शक्यता होती. त्याचा प्रतिकारही आता गळून पडला.
"का? का करतेस हे सगळं? तुझं मी काय वाईट केलं? " सावध पवित्रा घेत अभिमन्यू तिच्या जवळ-जवळ सरकत होता.
" कॉलेजमध्ये असताना तुझ्या लिखणामुळे मी कायम दुय्यम स्थानी राहिले. तुला नेहमीच पहिला नंबर, तुझे हजारो फॅन्स, आणि कॊतुकही. त्यामुळे माझे लिखाण कोणीही वाचायचे नाही. सगळीकडे तुझी वाह वाह होती, यात माझे लेखक होण्याचे स्वप्न कुठल्या कुठे मागे पडले. आणि तेव्हाच मी तुझ्या विनाशासाठी आणि तुझ्या लेखणीच्या सर्वनाशासाठी तुला ती अशुभ डायरी दिली होती. तू तुझ्याच हाताने, तुझ्याच लिखणाने कुप्रसिद्ध व्हावास आणि तुझे नावलौकिक मातीमोल होऊन तुझा विनाश व्हावा याची मी वाट बघत होती. पण काहीच दिवसात त्या स्टेशन अपघातात मी मारले गेले. आणि माझा सूड अपूर्ण राहिला. आज तू माझी इच्छा पूर्ण करणार आहेस. तुझा विनाश लिह त्यात, नाहीतर मी या टपरीवाल्याला मारून टाकेन, त्या लंगड्याला आणि त्या तुझ्या रक्षाला मारून टाकेन, कॉलेजमध्ये असताना पासून प्रेम करतोस ना तिच्यावर. मग उचल ती डायरी आणि लिही तुझा मृत्यू. " आपल्या विस्फारलेल्या डोळ्यातून आग ओकत तिने फर्मान सोडला होता. अभिमन्यू खाली पडलेली डायरी उचलणार होता. आणि एवढयात इकडे शुद्ध हरपलेल्या बन्याच्या हातातील पेटते लायटर फटफटीच्या अस्थाव्यस्थ पडलेल्या दोन तुकड्यांवर पडून त्यावर आधीच ओतलेला रॉकेलमुले क्षणात भडका उडाला होता. बन्याने नकळत का होईना, आपले काम केले होते. आणि शुद्धीवर आलेल्या रक्षाने खाली पडलेल्या डायरीवर एक लाथ मारून ती सरळ त्या पेटत्या गाडीच्या तुकड्यांवरती फेकून दिली होती.
"शेवट तर त्याने केव्हाच लिहिलंय, पण त्याचा नाही तुझा." एवढे बोलून ती अभिमन्यूच्या शेजारी उभी राहिली.
'काही समजण्याच्या आताच डायरीने पेट घेतला होता. तिच्या चिंद्याचिंध्या होऊन हजारो जळके तुकडे चोहीकडे विखुरले गेले. कादंबरीने आपल्या कानावर दोन्ही हात घेत मोठ्याने किंकाळी फोडली. त्यामुळे बन्या तिच्या हातून निसटला होता. आगीच्या लाटांमध्ये आपसूकच ती ओढली गेल्याने त्याच अग्निज्वालांमध्ये लपेटलेले तिचे शरीर भस्म होऊ लागले. अभिमन्यूने डायरीमध्ये लिहिल्या प्रमाणे तिचा शेवट झाला होता. तरीही जाता-जाता ती मोठ्याने ओरडली, "वाचलास रे वाचलास."
अग्निदेवतेने त्या विनाशकारी डायरीचे देखील अस्तित्व संपुष्टात आणले होते. बाहेर बेभान सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने जळून पडलेले राखेचे कण दाही दिशांत सैरभैर उधळून लावले. जणू ते पुन्हा केव्हाही या कलियुगात एकत्र येऊ नयेत. अंधाराचे सावट दूर झाले होते. बन्या आणि अभिमन्यू आपल्या दोन्ही हातांनी सलीमला उचलून गाडीच्या दिशेने चालू लागले. तश्या अवस्थेतही तो झालेल्या विजयावरती मंद हसला. अर्धमेले झालेल्या सलीमच्या शरीरात अचानक नव चैतन्य दिसू लागले होते. आपल्या लायटरचे किंचिंतसे आभार व्यक्त करत बन्याही या आनंदात वाटेकरी झाला. रक्षाला मिठी मारून अभिमन्यू एकच शब्द म्हणाला, "सॉरी " '
'खऱ्या होतील या भीतीने अपूर्णच राहिलेल्या अश्या अजून खूप साऱ्या भयकथा लिहायच्या बाकी आहेत, ते ही माझ्या साथीने, 'रक्षा त्याच्या कानात पुटपुटली.
फटफटीवरील तोच छोटासा बाप्पा अभिमन्यूच्या मारुती कारच्या स्टिअरिंगच्या बरोबर वरती विराजमान झाला होता. त्याचे मनोमन आभार मानून सगळ्यांनी शहराचा रस्ता धरला.
----------------------------------------------------------------------------
समाप्त.
©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन
https://siddhic.blogspot.com