'खड्ड... खड्ड, एक मोठा दगड डिक्कीवर आपटला होता. काहीही फायदा झाला नाही. उलट ती अजूनच घट्ट झाली. बाजूला उभ्या असलेल्या आपल्या गाडीतील स्पॅनर आणि इतर साहित्य काढून त्याने फटफटी सुरु करण्याचा पर्यंत केला. तो ही व्यर्थ होता. फटफटी जागची हलेना. चावी सुद्धा लॉकमध्ये आत फसून बसली होती. त्यामुळे गाडी स्टार्ट होईना आणि डिक्की सुद्धा उघडू शकत नव्हती. एवढे दिवस पावसात भिजल्याने तिची अवस्था वाईट झाली होती. भर पावसात अभिमन्यूला घाम फुटला. आंगातला पांढरा शर्ट चिखल-मातीने लालेलाल झाला होता. गाडी पार उलटी-पालटी करू झाली, तरीही जैसे थे स्थिती होती. रागाने गाडीला एक सणसणीत लाथ घालण्याची इच्छा असूनही ते करता येत नव्हते, कारण गाडीमागच्या नंबरप्लेटच्या बरोबर वरती हौसेने चिकटवून घेतलेली अगदी छोटीशी आणि पातळ अशी प्लॅस्टिकची गणपतीची मूर्ती... ऊन-पाऊस असो वा वारा-वादळ असो, हा बाप्पा गाडीच्या मागे आणि अर्थातच अभिमन्यूच्याही मागे ' सदरक्षणाय खलनिग्रहणाय' म्हणत उभा असायचा.'
' सूर्यनारायण पश्चिमेकडे झुकण्याच्या तयारीत होते. दिवस मावळतीकडे चालला होता. रात्रीचे इथे थांबणे शक्य नाही, सगळे प्रयत्न करून झाले. गाडी तीळमात्र जागची हलेना. काहीतरी विचार मनाशी पक्का करून अभिमन्यू उठला. बाजूला रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या आपल्या मारुती कारचा दरवाजा उघडून त्याने रॉकेल डब्बा आणि माचीस पेटी बाहेर काढली. एका हातात छत्री पकडून तो फटफटीकडे वळला. रॉकेल डब्बा बाजूला ठेवून खिशातील कटरने सावकाशपाने फटफटी मागचा गणपती कोरुन बाहेर काढू लागला. कडेकडेने अलगदपणे कातरून झाले होते, गणपतीची मूर्ती जवळजवळ त्याच्या हातात आली. "सॉरी बाप्पा, खूप साथ दिलीस पण आता तुला माझ्या मागे राहता येणार नाही. आतल्या डायरीचा किस्सा संपवण्यासाठी मला हि गाडीच नष्ट करावी लागेल, त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही. " म्हणत त्याने बापाला हातात घेतले आणि सावकाशपणे खिशात ठेवून दिले. लागलीच खाली असलेल्या डब्याचे झाकण काढून आत असलेले रॉकेल फटफटीवरती ओतायला सुरुवात केली. पण, पण, संधीकाळ वर आला आणि त्याबरोबरच दिनकर अस्त पावला. दाही दिशा अंधारू लागल्या, एका अशुभ प्रहरात दिवसाची कायापालट झाली होती. वाऱ्याने साशंक होऊन आपली दिशा बदलली, तोच वरूनराजा निर्ढावला. सरपटणारा रंगबदलू चूकsss, चूकsss करत दिसेनासा झाला. दोन वटवाघळे उडत-उडत जाऊन शेवरीच्या झाडात गडप झाली. तेच झाड, स्वप्नात दिसलेले, अगदी हाकेच्या अंतरावर असलेले, तेच झाड. ए क वाऱ्याची उष्ण झुळूक कानाला घासून गेली त्याबरोबर अभिमन्यूने आपला पाय मागे मागे घ्यायला सुरुवात केली. " कोण आहे इथे? कोण आहे? " तो मोठ्याने ओरडला. आणि तोल जाऊन मागे चिखलात पडला. समोर फटफटीला किक बसली होती. आपोआपच, आणि ती चालू लागली, त्या शेवरीच्या झाडाच्या दिशेने, जणू तिला ओढ होती कुणाच्या तरी भेटीची. "माझी गाडी, सोड तिला, माझी गाडी... " गाडीचा पाठलाग करत अभिमन्यूही घाटावरून नदीकाठाकडे सरळ थेट वाऱ्याच्या वेगाने धावू लागला होता. बाप्पाचा वरदहस्त काढून घेतल्यावर आज अखेर इतक्या दिवसांनी तिने त्या फटफटीवर आपले वर्चस्व प्राप्त केले होते, जणू ती वाटच पहात होती, या संधीची. एवढे प्रयत्न करूनही, एवढी हिम्मत एकवटुनही अभिमन्यूला शेवटच्या क्षणाला चकवा मिळाला होता.
**************
" हॅलो काकू, अभि कुठे आहे? फोन का उचलत नाही? "
पलीकडून रक्षा काळजीने विचारात होती.
"अगं तो तासापूर्वीच बाहेर गेलाय, ती त्याची जुनी बाईक होती ना, ती घेऊन येतो म्हणाला. " अभिमन्यूच्या आईचे हे शब्द ऐकल्याबरोबर रक्षाला घाम फुटल.
"का, कायsss बोलताय! "
ती जवळजवळ ओरडलीच आणि फोन तसाच कट करून ती सलीमच्या घरी जायला निघाली. सोबत बन्यालाही घेऊ असा विचार तिच्या मनात आला.
'का गेला तो? त्याच्या जीवाला धोका आहे, माहित असूनही गेला, त्या सलीमसाठी. नाही..... मी असं होऊ देणार नाही.'
काय करावे तिला काही सुचत नव्हते. स्वतःशी पुटपुटत रक्षाने गाडी स्टार्ट केली.
******
"सोड माझी गाडी. कोण आहेस तू? काय पाहिजे तुला? बोलsss बोलs! " अभिमन्यू मोठं-मोठ्याने ओरडत होता. एक निर्जन-निसरडे असे ते ठिकाण, तिथे त्याला गाडीसकट ती दुष्टशक्ती फरफटत घेऊन आली होती, चार दगडी भिंतींचे पडके खोपटे, सर्वत्र मिट्ट काळोखाचे साम्राज्य पसरले होते. पाय ठेवावा तिथे दलदलीचे थर होते, आणि भिंतीवर शेवाळाची ठिगळे लावलेली चादर. अंगावर काटा यावा एवढे हिडीस वातावरण. हाताला आणि गुढग्याला बराच मार बसला होता. त्यामुळे एका जागेवरून हलणे अभिमन्यूला शक्य नव्हते. आणि शरीरात तेवढी ताकद राहिली नव्हती. तो चक्कर येऊन खाली पडला. समोर त्या विद्रुप काळया शक्तीने विचित्र हावभाव करत एकाच फटक्यात त्या फटफटीचे दोन तुकडे केले, बिचार्या गाडीचे तुकडे तिथेच कोपऱ्यात विखुरले गेले. तिच्या हातात आता डायरी लागली होती. तिचे प्रत्येक पानं उलट-सुलट करून अधाशीपणाने ती पाहत होती. शेवटी लिखाणाची पाने संपली, तिथे एक कोरडा कटाक्ष टाकून तिने तिरकस नजरेने अभिमन्यूकडे पहिले. आणि तिच्या खोबणीत आत घुसलेल्या त्या हिरव्यागार डोळ्यांच्या बुबुळात हिंस्र भाव उमटले. तोंडावर पसरलेल्या मातकट केसाच्या दोन-चार बटा मागे सरकवत ती हळूहळू अभिमन्यूच्या जवळ येऊ लागली. आपला रुक्ष काटकुळा हाडांचा सापळा झालेला हात पुढे करत तिने अभिमन्यूची मान पकडण्याचा प्रयत्न केला, पण झटका लागावा तसे काहीस होऊन ती मागच्या मागे कोलमडून पडली.
रक्षा आणि सलीम तिथे पोहोचले होते, सोबत आलेल्या बन्याने आपल्या खिशातील एक अंगाऱ्याची पुडी हातात घेऊन तिच्यावर फुंकर मारली होती. आजूबाजूच्या वातावरणात थोडाफार बदल झाला होता. कोलमडून पडलेली ती दुष्टशक्ती अजूनच चवताळून उठली. डायरी अभिमन्यूच्या अंगावर टाकून ती मोठ्याने ओरडली, " आता यात तुझा शेवट लिही, आणि संपवून टाक ती कथा. तेव्हाच माझा बदल पूर्ण होईल. हाहाहाहा... " तिच्या गडगडाटी हास्या बरोबर एक उष्णतेची लाट पसरली आणि दुसऱ्याच क्षणी तिने आपल्या हात लांब करून सलीमच्या बखोटीला पकडले होते आणि फरफटत घेऊन सरळ भिंतीवर आपटले होते.
आधीच आधू झालेला तो, पुन्हा विव्हळू लागला. उजव्या हाताचे मनगट वाकडे झाले होते, आणि मान डावीकडे कलली होती. आता त्याची जगण्याची आशा जवळजवळ संपली होती. 'त्याला आपण उगाच घेऊन आलो' असे रक्षाला वाटले. आपले अंगारे-धुपारे इथे तिच्या राज्यात चालत नाहीत, हे बघून बन्याची दातखिळी बसली होती. तरीही हिम्मत एकवटून त्याने एक रेशमी धागा तिच्यासमोर पकडला. "बोल, काय पायजे तुला? समद तुज्या मनासारक व्हईल, म्या वचन देतो. "
पुन्हा आपले मोठे डोळे बन्यावर रोखून ती ओरडली. " तू काय देणार रेsss ? मला याचा मृत्यू बघायचा आहे. तडफडताना बघायचं आहे, ते पण माझ्या डोळ्यासमोर. " अभिमन्यूकडे इशारा करत तिने उत्तर दिले.
"पण का? तुला काय मिळणार त्याने?" रक्षाने घाबरत घाबरत प्रश्न केला.
"खूप वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता करायचा आहे. सात वर्षे झाली, त्या, बाजूच्या स्टेशनवरती कामाला लागले होते मी, याच्या कथेमुळे मालगाडी उलटली आणि तिथे गरीब लोक नाहक बळी गेले. त्यात मी सुद्धा होते. क्षणात सारं होत्याच नव्हतं झाल ते याच्यामुळे, आणि अजून हा मुक्त फिरतोय. काय झालं? कसं झालं? कोणाला माहित नाही, आणि याला कोणतीही शिक्षा झाली नाही. "
"हे बघ, तू कोण आहेस, ते मला माहित नाही, पण मी एवढं नक्की सांगू शकते की, मालगाडी उलटून जे झालं, त्याला अभि जबाबदार नाही आहे. तिथल्या गरीब लोकांनी त्यांच्या जमिनीसाठी आपले प्राण गमावले, त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नव्हता. जे त्यांना जिवंतपणे शक्य झाले नाही, ते त्यांनी मरणानंतर शक्य केले होते. त्यांच्या जागेवर उभे राहिलेले रेल्वे स्टेशन आणि ती मालगाडी हे सारे उध्वस्त करून टाकले. त्यामध्ये तुम्हा सगळ्यांना जीव गमवावा लागला, याचे आम्हाला देखील वाईट वाटते. पण यामध्ये अभि किंवा त्याच्या कथेचा काही दोष नाही, कथा आणि ती घटना हा निव्वळ योगायोग आहे. मी वनांनी करते, समजून घे, आणि प्लिज त्याला सोड. "
"कथा आणि ती घटना हा निव्वळ योगायोग वाटतो तुम्हाला? अजून तुम्हाला समजले नाही तर? ती डायरी करते हे सगळं, माझी डायरी. हॅहॅहॅहॅ, हाहा!" कुस्तीरपणे हसत तिने पुन्हा डायरीकडे पाहिले.
भिंतीला पाठ करून निपचित पडलेल्या अभिमन्यूला जाग आली होती. काहीतरी गवसल्याचा आनंद त्याच्या डोळ्यात चमकत होता. लगोलग डायरी हातात पकडून त्याने ती घट्ट धरून ठेवली. त्या दुष्ट शक्तीची नजर त्याच्यावरच स्थिरावली होती, केव्हाही झडप घालून तो आपला बदला घेऊ शकत होती. पण अभिमन्यूला आता याची जणू फिकीर नव्हती. डायरीची शेवटची कथा जिथे क्रमशः होती. तिथून पुढे असणाऱ्या कोऱ्या पानावर त्यांनी नजर फिरवली. दुरूनच तिच्या समोर डायरी धरून त्याने पेन हातात घेतला.
" तुला माझा शेवट हवा आहे ना? आणि तो ही माझ्याच हाताने लिहिलेला. हा बघ ! मी माझा आणि तुझा दोघांचा हि शेवट करतोय. बघ! " तो शक्य तितक्या मोठ्या आवाजात ओरडला.
"अभि काय करतोस? नाही, तू काहीही लिहिणार नाहीस." रक्षा त्याला अडवण्यासाठी धावून आली होती, त्या चेटकिणीने तिला मागच्या मागे दाबून ठेवले, तिच्या हिडीस हाताच्या बोटांचा विळखा रक्षाच्या मानेवर पडला होता. रक्षा सुटण्यासाठी तडफड करत होती. अगदी सगळी शक्ती पानास लावून तिने सुटण्याचा प्रयत्न केला, पण ते अजिबात शक्य नव्हते. तिच्या मानेवरची पकड अजूनच घट्ट झाली, ती बेशुद्ध झाली होती. सलीम ने आपला लोंबकळत असलेला तुटका हात उचलण्याचा खूप प्रयत्न केला, पण पाय आणि हात कायमचेच जेरबंद झाले होते. "अभिमन्यू तिचा शेवट... " एवढेच शब्द त्याच्या तोंडून पडले. परिस्थिती आपल्या कंट्रोल मध्ये आहे, ते लक्षात येताच ती दुष्टशक्ती अजूनच चवताळली.
" जर हिला जिवंत बघायचं असेल, तर तुला तुझा शेवट लिहावाचं लागेल. ते ही तुझ्या हाताने लिही." तिने डायरीच्या कोऱ्या पानाकडे बघत आज्ञा केली. तिच्या हातात बेशुद्ध अवस्थेत पडलेली रक्षा आणि बाजूलाच अधर्मेला झालेला सलीम यांच्याकडे बघून अभिमन्यूने लिहायला सुरुवात केली. आता नाईलाज होता. स्वतःसाठी कोणाच्याही जीवाशी खेळणे अभिमन्यूला शक्य नव्हते.
"सायब जरा इचार करा, काय बी लिवू नका. ती तुम्हाला हात लावू शकत नाय, काय तरी ताकद हाय तुमच्यात. नायतर तीनं आत्तापर्यंत तुम्हाला मारलं बी असत नाय." कोपऱ्यात फटफटीच्या तुकड्यांच्या मागे घाबरून लपलेला बन्या उठून उभा राहिला होता. ढाब्यावर स्टोव्ह पेटवण्यासाठी वापरत असलेले लायटर खिशातून काढून त्याने ते पेटवले होते. काय समजायचं ते अभिमन्यू समजला होता. डोक्याला एक हिसका देत त्या विकृत भुताने आपला मोर्चा बन्याकडे वळवला. आणि तेवढीचं संधी साधून अभिमन्यूने उर्वरित कथा खरडायला सुरुवात केली होती.
क्रमश:
©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन
https://siddhic.blogspot.com