Swash Aseparyat - 11 in Marathi Fiction Stories by Suraj Kamble books and stories PDF | श्वास असेपर्यंत - भाग ११

Featured Books
Categories
Share

श्वास असेपर्यंत - भाग ११

पावसाळा सुरू झाला होता. एक-दोन पाऊस सुरुवातीला चांगले झाले होते. पहिल्या पावसाने सर्व बाजूला मातीचा सुगंध दरवळत होता. पक्षी चिवचिव करत होते , कुणी पक्षी आपली घरटी बांधण्यात गुंतून पडले होते , मध्येचं सुर्यासमोर ढग येऊ तो सूर्य ढगांमध्ये लपून जायचा. मग सर्व बाजूला अंधार व्हायचा. त्यामुळे काळीभोर जमीन अधिक काळी दिसत असायची.

उन्हाळ्यात शेतीची मशागत नांगरणी, वखरणी झाल्याने फक्त आता पावसाची वाट होती. ती वाट या पावसाने संपली होती . काही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता . जिकडे तिकडे कालवाकालव सुरू झाली . शेती शेतीसाठी बियाणे आणण्याची शेतकरी तयारी करत होतो . कुणी आपल्या घरावर असणारी कवेलू फेरून चांगली करत होती, काही बकऱ्यांचा गोठा चांगला करण्यात गुंतली होती , तर काही जनावरांना असलेला चारा सुरक्षित हलवत होती .

बाबांनी सुद्धा बियाणे खरेदी केली होती. घराची डागडुजी करून आता फक्त शेतीत बियाणी टाकायची वेळ होती. या वर्षी चांगला पाऊस पडेल या आशेने शेतकरी शेतजमिनीत बियाणे टाकीत होते , पेरणी करीत होते . सर्व शेतकरी एकाच वेळेस बियाणे ,पेरणी करत असल्याने बैलजोडी , नांगरणी पेरणी ची अवजारे ज्यांच्याकडे आहेत , ते शेतकरी पहिले शेतीत बियाणे टाकत. शेतीची मशागत करत असत आणि दुसरे शेतकरी ज्यांच्याकडे यांतील काहीच नसते , ते फक्त पोट भरण्यासाठी एक जमिनीचा तुकडा असतो , तेवढेच ते वाहत असतात.

काही मजूर वर्ग असतो, तो दुसऱ्याच्या शेतात काम करत असतात, व आपल्या पोटाचा प्रश्न मिटवित असतात. आम्ही म्हणजे दुसऱ्या प्रकारातील शेतकरी सोबतच मजुरदार. शेतीचा तुकडा वडिलोपार्जित असल्याने शेती करायची आणि मग सर्वांची शेतीची कामे झाली की , भाड्याने म्हणून एखाद्या कास्तकाराच्या बैलाने , शेती वहायची. सगळ्यांची पेरणी झाल्यानंतर , आमच्या वावरात आमचं काही भागात ज्वारी आणि काहीं भागांत कापूस लावला होता. मी शक्य होईल ती मदत करून कॉलेज सुरू होणार म्हणून, मी कॉलेज ला जाण्याची तयारी करू लागलो. बी.ए. चे शेवटचे वर्ष होते. आई बाबांचा आशिर्वाद घेऊन मी आपल्या वसतिगृहात जाण्यासाठी वाट चालू लागलो. आज आईने मासोळी ची भाजी बनवली होती. ती घरी खाल्ली. सोबत भाकरी आणि मासोळी भाजी बांधून दिली. " खाऊन घे " अशी सूचना आईने केली होती.

कॉलेज चे सुरुवातीचे दिवस असल्याने, कॉलेज मध्यें मुला- मुलींचा सध्या कुठे थवा दिसत नव्हता . अधून मधून नवीन प्रवेशित विद्यार्थी त्यांच्या वडिलांसोबत प्रवेश घेण्यासाठी येत असायचे.कुणी एक कारकून कागदपत्र घेऊन लगबगीने जात होता . कॉलेजची इमारत , कॉलेजचा परिसर मोठा असल्याने , परिसरात विविध प्रकारचे झाडे लावलेली होती . परिसरातील काही माती पावसाच्या पाण्या बरोबर वाहून जाऊन एका कडेला जाऊन ती वरचेवर त्यावर बसत होती.त्यामुळे तिथे मऊशार मातीचा लेप तयार झाला होता. कुठे पाण्याचे डबके भरले होते .

आनंद आणि मी कॉलेजच्या परिसरात बसलो होतो . आमच्यात काहीतरी , कुठेतरी कमी असल्यासारखं वाटत होतं . पूर्वी अशी आमच्यात तफावत वाटत नसायची, पण आज ती जाणवत होती. म्हणजे आमचा एक कॉलेज ला ग्रुप तयार झाला होता. कमी वेळात लक्ष्मी आमच्या सर्वांची लाडकी होऊन गेली होती. आज मात्र लक्ष्मी कुठे दिसत नव्हती. वर्षभरापुर्वीच लक्ष्मीने आमच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता आणि तेवढ्या कमी वेळात ती सर्वांची होऊन बनली होती. अभ्यासात हुशार, इतरही गोष्टीमध्ये हुशार ,प्रत्येक कार्यक्रमात भाग घ्यायची. म्हणून मी आणि आनंद लक्ष्मीची वाट पाहत बसलो होतो. तशी लक्ष्मी नियमित कॉलेजला यायची. त्यामुळे आज येईल अशी आशा दोघांच्या मनात होती.

तेवढ्यात ती म्हणजे लक्ष्मी आली .एखादं फुल कसं सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात, आपल्या कळ्या फुलवीत होऊन टवटवीत दिसतं, तेच फुल आपलंही लक्ष वेधून घेत असतं, तशीच ती लक्ष्मी टवटवीत दिसत होती.

हाय फ्रेंड्स, " समथिंग इज ऑल राइट ????"
पाठीमागून येत लक्ष्मीने आम्हांला प्रश्न केला...आम्हीं ज्या व्यक्तीची आतुरतेने वाट पाहत बसलो ती व्यक्ती शेवटी आली..

" सर्व ठीक आहे लक्ष्मी". आनंद उत्तरला..

" मग तुम्ही नेमके असे का दिसत आहे ????चेहऱ्यावर बारा वाजलेले दिसतं आहे. जणू कुणी येण्याची वाट बघत असावी !!!!" लक्ष्मी बोलत होती..

तेवढ्यात ,
अग काही नाही लक्ष्मी," तुझीचं येण्याची वाट बघत बसलो होतो. तु येणार, एवढी आमच्या मनाला खात्री होती आणि म्हणून आम्ही वाट पाहत बसलो..आनंद बोलून गेला.

" आणि आम्हीं का दुसऱ्याची वाट बघणार आहे???? एवढा कोण आमच्यामध्ये इंटरेस्ट घेईल???. चेहऱ्यावर वाढलेले केस , मिशी , दाढी अश्या अवतारात कोण बरे आम्हांला भाव देतील????"
आनंद बिनधास्तपणे बोलत होता. कारण आता लक्ष्मी त्याची सुद्धा मैत्री झाली होती .

अरे अमर , " लगेच गावावरून आलास!!!!"
माझ्या कडे पाहत लक्ष्मी म्हणाली.

होय, " सर्व शेतीची कामे , पाऊस झाला . यावर्षी बाबांनी घरी शेती वाहिली . त्यांना मदत करून सरळ इकडे आलो ."
मी लक्ष्मीला सांगितले.

" कशी आहे गावची परिस्थिती ??? पाऊस पाणी वैगरे,????

लक्ष्मी आता खूप कमी गावी येत असायची. म्हणजे तिच्या वडिलांनी मुले शहरात शिकतात म्हणून याचं शहरात एक घर घेतलं होतं. पाटील - पाटलीन बाई गावी राहत असायचे आणि लक्ष्मीची भावंडे व लक्ष्मीची विधवा आत्या, तिची मुले इथे राहायचे.

" सर्व एकदम ठीक आहे . पाऊस चांगला झाला की, पीक पाणी होईल यावर्षी चांगले".
मी बोलून गेलो.

" बरं ठीक आहे " म्हणतं आम्हीं दोघांनीही लक्ष्मी चा निरोप घेतला. यावर्षी पाऊस पाणी चांगला होईल असा आशावाद माझ्या मनात नेहमी वाटत असायचा. कारण यावर्षी घरी कर्ज काढून शेती वाहिली होती. बाबांकडून काम होत नसल्याने त्यांनी कर्ज काढून शेतीला पैसा लावला होता. पुढील दोन महिने कसे निघून गेले,कळलेच नाही.

आता पावसाने उघाड दिली होती. पिकं सुद्धा हवेबरोबर डोलत होती. ते बघून शेतकऱ्यांना आनंद होत असायचा. पावसाने उघाड दिल्याने निंदन, डवरणी, खुरपणी अशी कामे सुरू झाली. एक महिना जास्त असेल , पावसाने आपली हजेरी लावली नव्हती. पाऊस गेला महिनाभर कुठे रस्ता विसरला की काय असं झालं होतं कधी. कुठे एक दिवस पडायचा आणि लगेच गायब होऊन बसायचा. कुठे दडी मारून बसला देव जाणे. सर्व शेतकरी, कास्तकार ,मजूर पावसाला विनवणी करत होता. सगळ्यांच्या नजरा या पावसाकडे लागल्या होत्या. जिकडे तिकडे चं पावसाने बोंबाबोंब केली होती.. पावसाळा असून सुद्धा उन्हाळ्यात जशी स्थिती असते तशीच अवस्था दिसत होती. आता मात्र हा पाऊस शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा आणू लागला.

आता पिके करपायला लागली होती. पिकांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना धास्ती भरली होती. शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रूंच्या धारा वाहत होत्या मात्र हा पाऊस काही केल्या पडत नव्हता. ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा होती त्यांची पिके जगली होती पण सर्वांकडे, कोरडवाहू शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय नसल्याने , धरणे, कॅनल, बांध,बंधारे, यांचा फारसा विकास झाला नसल्याने जिकडे तिकडे पाण्याची वणवण सुरू झाली होती . जमिनी कोरड्या पडल्या होत्या. शेतातील पिके करपून गेली होती. ज्यांची वाचली तीच तग धरून टिकली होती.

अशातचं यावर्षी बाबांनी मोठ्या हिंमतीने कर्ज घेऊन शेती करण्याची तयारी केली होती. पाऊस काळ चांगला पडेल तर घेतलेले उसनवारी कर्ज पण देता येईल पण दोन महिने पाऊस दडी मारून बसला होता. नेहमीचं हा पाऊस शेतकरी लोकांच्या डोळ्यांत अश्रू घेऊन येत असतो. आई - बाबा कसे असतील????? या चिंतेने मला पूर्णत: ग्रासून टाकले होते . अभ्यासात मन लागत नव्हते. कॉलेजमध्ये काही केल्या मन लागत नव्हते . सर्व लक्ष आता आई- बाबांकडे लागले होते. शेवटी मी आनंदला घरी जायचं आहे , आठवण येते, म्हणून जायचं आहे असं सांगितलं. गावची मोटर पकडली आणि गावच्या रस्त्याने निघालो. जशी गाडी पळत होती तसंच माझं मन इकडून तिकडे विचाराने भरकटत होतं. शेवटी गावचा पांदण रस्ता घेऊन पायदळ रस्ता तुडवत चाललो होतो . पावले वेगाने टाकत गाव जवळ करण्याचा प्रयत्न करत होतो. एकदाचा कुत्रे भुंकण्याचा आवाज आला म्हणजे मी गावी पोहोचलो असाचं तो प्रत्येकाला संदेश होता.....

क्रमशः .....