जुई आणि निशिकांत दोघेही एकाचवेळी फोनवर बोलल्यामुळे त्यांना थोडं गोंधळल्यासारख झालं. दोघेही एकमेकांचे आवाज इतक्या वर्षानंतर ऐकत होते. निशिकांतने पुन्हा एकदा 'जुई' असा आवाज दिला, पण त्यावेळी जयकडे फोन होता. जुईने फोन स्वत:चा समजून उचलल्यामुळे गोंधळ झाला हे जयला समजल. जय आणि जुई ची रिंगटोन सारखीच होती. जुईला विश्वास बसेना की ती निशी सोबत बोलली. अजून तसाच आवाज, तशीच नाव घेण्याची सवय. काहीच बदल नाही निशीमध्ये. जय निशिकांतशी बोलत होता; निशिकांतने त्याला विचारलं, "आता जी मुलगी फोनवर होती ती कोण होती?" जय म्हणाला, "अरे ती जुई माझी ज्युनियर जुई कदम. काही म्हणाली का ती तुला?" "नाही रे दा, मी सहज विचारलं, आणि तसंही तू कुठे काही बोलू दिलंस, फोन लगेच घेतलास तू" निशी म्हणाला. यावर दोघेही हसले, खुशाली विचारून झाल्यावर दोघांनी फोन ठेवून दिला.
संध्याकाळी जुईने सहज जयला विचारलं निशिकांतबद्दल, आणि तिला खात्री पटली की सकाळी ती तिच्या निशीसोबतच बोलली होती. तिला खरंतर निशिकांतशी बोलून खूप बरं वाटलं. पण जुईचा आवाज निशिकांतने जेंव्हा पासून ऐकला तेंव्हा पासून तो खूप अस्वस्थ झाला. जुईला कधी आणि कसं भेटता येईल याचा विचार तो करत होता. इकडे जुईला अजूनही तो दिवस आठवत होता; कॉलेजमध्ये मिलिटरीसाठी मेडिकल कॅम्प होता. कॅम्प सर्वाना बंधनकारक नव्हता, पण जुईची इच्छा होती की निशिने आणि तिने या कॅम्पसाठी जावं. आणि त्यानुसार तिने निशिकांतशी बोलायला फोन केला कारण सकाळचे १०:०० वाजले तरी तो अजून कॉलेजला आला नव्हता. तिला हे नाही समजल की निशीचा फोन रमाकडे कसा? रमा म्हणाली "निशिकांत आज कॉलेजला नाही येणार आणि त्याने तुझ्यासाठी निरोप ठेवलाय की तू पुन्हा त्याला भेटायचं नाहीस." यावर जुईने विचारलं की "तुला कुणी सांगितलं हे आणि सांगायच असेल तर निशिकांतला सांग हे सांगायला." यावर रमा खरंतर चिडली पण बहुतेक तिने मनाशी एक योजना ठरवली. ती जुईला म्हणाली,"ठीक आहे करेल निशी तुला कॉल पण त्याने कॉल केल्यानंतर तू त्याला पुन्हा कधी भेटणार नाहीस प्रॉमिस कर." आता जुई चिडली आणि म्हणाली की "हो, ठीक आहे."
जुईला माहिती होतं की निशी असं स्वप्नात सुद्धा म्हणणार नाही रमा उगाच मस्करी करते. जुईने त्याची दिवसभर वाट पाहिली. संध्याकाळची ५:०० ची वेळ शेवटची होती नाव नोंदवण्याची. तिने तिच नाव नोंदवलं मेडिकल कॅम्प साठी. पण निशिकांतने कॉनटॅक्ट तर केला नाहीच पण आलाही नाही तो कॉलेजला आज. काय झालं असेल काही अंदाज बांधता येईना जुईला. तिने ऋचाला फोन केला पण ऋचाचा फोन बंद. तिला समजेना काय करावं. निशिकांतला भेटण्याचा काही चान्स नव्हता. निशी आणि ऋचासाठी निरोप ठेवायचा पण कुठे, कुणाकडे तिला सुचेना. तिने रमाकडे निरोप दिला की ती उद्या सकाळी ६:०० ला कॅम्पला जाणार आहे. जुईला अपेक्षा होती की निदान सकाळी तरी निशी भेटेल तिला पण निशी आलाच नाही. रमा मात्र भेटली जुईला आणि म्हणाली की, "निशीला मी तुझा निरोप दिला पण त्याला तुला भेटायची इच्छा नाहीये त्यामुळे तू निघालीस तरी चालेल." यावर जुईने पुन्हा नाराजीने विचारलं, "असं काय झालंय की निशी मला भेटायलाच नाही म्हणतोय, परवा तर आम्ही भेटलो होतो तेंव्हा नाही काही म्हणाला तो मग काल काय झालं?" यावर रमा गप्प बसली.
उशीर झाल्यामुळे जुई निघाली कॅम्पसाठी. तसंही नुकतीच इंटर्नशिप संपली होती. तिने ठरवलं होत जर मिलिटरीमध्ये काम जमलं पटलं तर तिकडेच करू काम इकडे पुन्हा फिरून येण्यामध्ये तसा काही रस नव्हता तिला आणि ती नाराजही होती निशिवर. पण एक गोष्ट होती जी तिच्या बुद्धीला पटत नव्हती की निशी असं का करेन?
क्रमश: