Manachya vaatevarti Avyakt to an mi - 7 in Marathi Fiction Stories by अनु... books and stories PDF | मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 7

Featured Books
Categories
Share

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 7

पुढे...

आपण मैत्री कितीही लोकांशी वाटू शकतो,पण प्रेमात वाटा पडलेला नको असतो आपल्याला...म्हणजे कसं आहे ना, आपण प्रेमात असलो की आपल्याला वाटतं, की त्या खास व्यक्तीने केवळ आपल्यालाच महत्त्व द्यावं... सतत आपल्याच आजूबाजूला असावं, त्याला केवळ आपलाच ध्यास असावा...आणि हे का वाटतं? कारण प्रेम आपल्या मनात संचारलेलं असतं..पण प्रेम समजून घेण्यासाठी ते केवळ मनात रुजवून चालत नाही तर त्याची समज ही असावी लागते...आणि ही समज केंव्हा येते?? जेंव्हा आपण आपल्या भावनांना वाट मोकळी करून देऊ तेंव्हा...कधी कधी भावना प्रकट करायला शब्दही अपुरे पडतात, तर कधी कधी ते बोलण्याचं धाडस होत नाही...आणि खूप वेळा तर आपण स्वतःच्या मनानेच काहीही गृहीत धरून मोकळे होतो, त्याची शहानिशा न करता..!!

मी आणि अतुलनेही असंच केलं...जे डोळ्यांना दिसतंय तेच खरं मानून, बोलण्याची तसदी घेतलीच नाही...स्वतःचा शहाणपण मिरवण्यात इतके व्यस्त झालो की दोघांच्या मनात एकच गोष्ट असू शकते एकमेकांसाठी, याचा विचारच केला नाही...आठवणींचे काटे हृदयात घुसवून जगणं मंजूर होतं आम्हाला, पण जे आहे त्याला कबूल करणं नाही...एकमेकांबद्दल नको ते गैरसमज करून जीवाचा तिळपापड केल्यापेक्षा बोलून सगळं सोडवलं असतं तर आयुष्य आज खूप वेगळं असतं...पण शहाणपण उशिराने येते म्हणतात ना...! अणि तसही प्रेम आणि शहाणपण एकत्र नांदत नाही...

ठरल्या प्रमाणे दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे आम्हाला परीक्षेसाठी नागपूर ला निघायचं होतं...आम्ही सकाळी सहालाच घरातून निघालो..चेतन आम्हाला बसस्टँड पर्यत सोडवायला आला होता..बस लागलेली होती त्यामुळे आम्ही लगेच बसमध्ये जाऊन बसलो...बस निघायला आणखी पाच मिनिटं होती त्यामुळे चेतन थांबला, मी खिडकीजवळ बसली असल्याने तो मला बाहेरूनच बोलत होता,

"चांगला देशील हं पेपर...काही घाई गडबड नको करू, आणि एकदा चेक करून घे ऍडमिट कार्ड कुठे आहे, पेन वैगरे सगळं...आणि डब्बा दिलाय वहिनीने काही खाऊन घेशील नक्की, उपाशी राहिली की ऍसिडिटी होते तुला..."

"बस रे... कालपासून हीच माळ जपतोयेस तू, कितीवेळा तीच ती कॅसेट पुन्हा पुन्हा वाजवणार आहेस...मी लहान आहे का??"

"ये बाई, लहानच आहेस तू, आणि मी सोबत नाहीये त्यामुळे वारंवार सांगत आहे सगळं..माझ्यासारखा काळजी करणारा दुसरा कोणी भेटणार नाही तुला..समजलं..आणि अतुल सांभाळून घेऊन जा रे बाबा हिला.."

"हो ना.. तू बोललास म्हणजे सांभाळावं लागेलच..तुझ्याइतकी नाही, पण मला जेवढी घेता येईल तेवढी काळजी घेईल मी...ठीक आहे ना..."
अतुलचं टोचून बोलणं चेतनच्या लक्षात आलं नसलं तरी मला मात्र चांगल्याने कळलं होतं...का माहीत नाही, पण खूप काही असूनही माझ्या आणि अतुलच्या मध्ये एक रुक्षपणा जाणवत होता, त्यामुळे आम्ही एकमेकांना बघणं बोलणं टाळत होतो...एकाच सीटवर आजूबाजूला बसून सुद्धा आम्ही एकमेकांना बोलत नव्हतो..त्याच्याकडे लक्ष नको जायला म्हणून मी उगाच एक पुस्तक काढून त्यात डोळे रोखून बसली...गाडीने वेग धरला होता, पण माझ्या आणि अतुलच्या मध्ये मात्र सगळं थांबलेलं वाटत होतं.. मला त्या गोष्टींचा त्रास व्हायला नको म्हणून मी अभ्यासात लक्ष देण्याचं पुरेपूर प्रयत्न करत होती, अतुलही विरुद्ध दिशेला तोंड करून बसला होता... तेवढ्यात अतुलचा मोबाईल वाजला..तो जरी मला पाठमोरा बसला होता तरी जेंव्हा त्याने मोबाईल त्याच्या खिशातुन बाहेर काढला, तेंव्हा त्यावर प्रियाचं नाव झळकतंय हे दिसत होतं..त्याचं बोलणं सुरू होतं, पण माझ्या अंगाची का लाही लाही होतेय हे मला कळत नव्हतं..त्यामुळे मी रागारागत बोलली,

"मी अभ्यास करत आहे इकडे, प्लिज तुमचं जे काही बोलणं आहे ते नंतर करा किंवा तू मागच्या सीट वर जाऊन बस, आणि मग मनसोक्त गप्पा मार...."

माझं असं अचानक बोलल्यावर त्याने एक तिरकस नजर माझ्यावर टाकली आणि फोनवर त्याच्या मैत्रिणीला बोलला...." मी जरा बाहेर आहे, तुला रात्री बोलतो..." आणि त्याने फोन कट केला, आणि आता माझ्याकडे बघत फक्त "सॉरी" बोलला आणि गुपचूप मागच्या सीटवर जाऊन बसला...मला अपेक्षित होतं की तो काहीतरी बोलेल पण त्याची इतकी थंड प्रतिक्रिया मला अजूनच चिडवत होती...पण विचार केला बरंच झालं नाही बोलला काही, नाहीतर मी पण त्याला नको ते बोलून गेली असती...

एकदाचं नागपूरला पोचलो...सगळ्यात आधी ऑटो घेऊन परीक्षा केंद्रावर पोचलो... अजून अर्धा तास बाकी होता, त्यामुळे चहाच्या टपरीकडे बघून एक चहा तरी घ्यावा हा विचार आला...मी अतुलला काही बोलणार इतक्यात तोच बोलला,

"परीक्षेच्या आधी काहीतरी खाऊन घे...उपाशीपोटी जास्त चहा घेशील तर ऍसिडिटी होईल..."
मला कोणत्या गोष्टीचं वाईट वाटत होतं देव जाणे, का अतुलवर माझा राग निघतोय कळत नव्हतं, उगाच चिडचिड होत होती पण सध्या शांत राहणं गरजेचं होतं आणि ती शांतता मला अतुलपासून दूर गेल्यावरच मिळणार होती, त्यामुळे मी त्याला बोलली,

"मला काहीही नको..मी आत जात आहे...परीक्षा झाली की तीन तासांनी भेटू इथेच..."
त्यावर त्यानेही फक्त "हम्म" एवढचं उत्तर दिलं..मला वाटलं होतं तो काळजीने काही सांगेल मला, थांबवेल मला पण त्याने तस काहीही केलं नाही...माझं मन भरून येत होतं...
ताईने आजच्या दिवशी तिचा मोबाईल माझ्याजवळ दिला होता...परीक्षा झाल्यावर माझी अन अतुलची चुकाभुल होऊ नये आणि मला काही अडचण येवू नये म्हणुन तिने मुद्दामच मला फोन दिला होता...मी अतुलला बोलून आतमध्ये जाणार तेवढ्यात मला चेतनचा फोन आला...त्याने मला पुन्हा त्याच सूचना दिल्या आणि त्यांनंतर तो अतुलला ही बोलला त्याच फोनवरून...त्यांचं बोलणं झाल्यावर अतुलने मला फोन परत केला आणि बोलला,
"तुझा मित्राचा खास निरोप आहे तुझ्यासाठी, की उपाशी पोटी आत जाऊ नको...माझ्यासाठी नाही, त्याच्यासाठी तरी काही खाऊन घे..."
आणि असं बोलून त्याने माझा हात पकडला आणि मला काही कळायच्या आत तो मला बाजूला असलेल्या एका छोट्या रेस्टॉरंट मध्ये घेऊन गेला...तिथे थोडा नाश्ता केल्यावर मी आत जायला निघाली.. एव्हाना इतक्या वेळेत मला चेतनचे दोन फोन येऊन गेले...आता पुन्हा जेंव्हा तिसऱ्यांदा त्याचा फोन आला तेंव्हा आपुसकच माझ्या तोंडून निघालं...
"अरे यार...किती फोन करतो हा मुलगा, काय हवंय याला काय माहीत..."
आणि बाजूला पाहिलं तर अतुल एकटक माझ्याकडेच बघत होता...त्याला माहित नाही काय झालं, मला बेस्ट लक देऊन तो निघून गेला...

तीन तासांनी जेंव्हा पेपर संपला, माझा मूड जरा चांगला झाला होता आणि याचं एक कारण हे होतं की मला पेपर चांगला गेला होता..त्या आनंदात मी ताईला फोन लावला, आईबाबांना फोन केला आणि बोलता बोलता मी दुसऱ्या गेटने बाहेर पडली हे मला कळलंच नाही...अतुल माझी पहिल्या गेटवर वाट पाहत होता हे माझ्या ध्यानात ही आलं नाही...मी गेटच्या बाहेर येऊन त्याला शोधत होती आणि तो तिकडे मला शोधत होता..इतक्यात मला पुन्हा फोन आला चेतनाचा..मी त्यालाही परीक्षेचं सांगत बसली...मी फोनवर बोलत असताना समोरून अतुल आला..त्याला घामाच्या धारा लागलेल्या, धापा टाकत येऊन उभा राहिला...आणि चेहऱ्यावर इतका राग...आता मला माझी चूक कळली की आम्ही पहिल्या गेटवर भेटायचं ठरवलं होतं आणि मी इकडे येऊन थांबलीये, त्यात त्याने ह्या फोनवर फोन केलेही असतील तरी मी मगाच पासनं फोनवर बोलत असल्याने त्याला फोन बिझी लागला असेल..मला शोधतना अतुलची चिडचिड झाली असावी..त्याने माझा हात पकडला आणि आम्हीं सरळ जाऊन ऑटोत बसलो... बसस्टँड वर येईपर्यंत त्याने माझ्याकडे पाहिलंही नाही आणि बोलला ही नाही पण राग इतका की त्याचे डोळे लालबुंद झाले होते... आम्ही लगेच जाऊन बसमध्ये बसलो...तो पाण्याची बॉटल घ्यायला जाणार इतक्यात पुन्हा माझा फोन वाजला...पण मी तो उचलणार त्याआधी अतुलने माझ्या हातून फोन घेऊन कट केला..आणि आदळला माझ्या बॅगेवर...त्याचं हे वागणं मला निःशब्द करून गेलं..माझे डोळे भरून आले....

दिवसभराची दगदग आणि त्यात अतुलचं असं वागणं, त्या विचारात परतीच्या प्रवासात मला कधी झोप लागली कळलंच नाही...मला अतुलच्या वागण्याचा राग आला होता...त्यामुळे त्याला काहीही बोलण्याची मनस्थिती नव्हती माझी...आम्हाला संध्याकाळचे सात वाजले घरी पोहोचायला...ऑटोतून घरी येत असताना मला चेतनाचा फोन आला कुठे आहेस हे विचारायला, मी फोन घेतला तर त्याने अतुलकडे द्यायला सांगितला.. मला वाटलं चेतनला काही बोलायचं असेल अतुलला, त्यामुळे मी अतुलला फोन दिला तर त्याने काही न बोलता फोन बंद केला आणि मला परत केला... तो चेतनशी का नाही बोलला, आणि माझा राग त्याच्यावर का काढला म्हणून आता मात्र माझी चिडचिड असहनिय होती, मी त्याचा डावा हात पकडत रागातच बोलली,
"काय रे...प्रॉब्लेम काय आहे तुझा..?"
त्याने झटक्याने त्याचा हात माझ्या हातातून सोडवून घेतला पण काहीही बोलला नाही...रागाने माझं डोकं मात्र तापलं होतं, पुढच्या पाच मिनिटांत आम्ही घरी पोहोचलो...घराच्या आत जायला मी पहिलं पाऊल पुढे टाकलच होतं तितक्यात अतुल बोलला,

"सब कुछ जान कर भी,
कितने अनजान बनते हो,
अहमियत कम करके मेरी,
मुझिसे शिकायत करते हो।"

"हं..???" मला त्याचं बोलणं काही कळलं नाही त्यामुळे मी प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याला पाहिलं...तो थोडा जवळ आला आणि बोलला,

"माझं उत्तर...विचारलं होतंस ना..प्रॉब्लेम काय आहे..त्याचं उत्तर...ठीक आहे..?? घर आलंय...."
आणि असं बोलून तो घराच्या आत शिरला.. त्याच्या पाठोपाठ मी पण गेली...सगळे मला पेपर बद्दल विचारत होते, बोलत होते पण माझ्या कानात मात्र अतुलचे स्वर गुंजत होते....
********************

काही माणसं आयुष्यात जितक्या शांततेत येतात, जातांना मात्र आपल्या मनात खुप वादळ निर्माण करून जातात...आणि हे दुखणं असं असते की कोणाला बोलूनही दाखवल्या जात नाही व सहनही होत नाही...माझी अवस्था तशीच झाली होती...अतुलचं वागणं माझ्या मनात असंख्य घाव करत होतं पण का असं होतंय ते कळत नव्हतं...तशी तर कोणाला डोक्यावर नाचवणाऱ्या पैकी मी नव्हतीच..जो आपली कदर करतो त्याच्यासाठी जीव द्यायचा आणि ज्याला आपली किंमत नाही त्याला हवेत उडवायचं, ही अगदी साधी सरळ फिलॉसॉफी होती माझी जीवन जगण्याची...पण जिथे प्रश्न अतुलचा यायचा तिथे माझे सगळे नियम, सगळ्या फिलॉसॉफी निरर्थक व्हायच्या...

मीनल ताईच्या साखरपुड्याच्या दिवस उगवला...दुपारी कार्यक्रम होता त्यामुळे सकाळपासून सगळ्यांची आवरसावर सुरू होती... माझे आईबाबा ही आले होते... मी माझं आवरून सकाळपासून मिनल ताईच्या रुममध्येच होती...थोड्याच वेळेत कार्यक्रम सुरू होणार होता, चेतनला बाहेर जेवणाची व्यवस्था बघायला जिजुंनी पाठवलं होतं...त्यामुळे ते मला बोलले की त्याला लवकर तयार व्हायला सांग...तेच सांगण्यासाठी मी त्याला शोधत होती तर साहेब घरच्या मागच्या साईड ला फोनवर बोलताना आढळले..मला पुन्हा मस्ती सुचली आणि हळूच जाऊन ऐकायला लागली तो कोणासोबत बोलतोय...आणि तेवड्यात त्याचं लक्ष गेलं माझ्याकडे..आणि त्याने जस भूत पाहिलं असेल तसा तो घाबरला...

"तत्त्त..तू....तू इथे काय करतेस??"

"मी तर तुला बोलवायला आली होती पण तुझा तर वेगळाच कार्यक्रम दिसतोय इथे...हम्मम्म...सांगू का ताई अन जिजूला की लगे हाथो तुम्हारे भी हात पिले करदे..हाहाहा..."

"ये..काय पण काय बोलते....वेडी आहेस का..मी कुठे कोणाला काही बोलत नव्हतो...खरंच..."

"हाहाहा..पण मी कुठे बोलली की तू कोणाला काही बोलला...चोराच्या मनात पोलिस स्टेशन..हम्म....कोण आहे ही साक्षी...बोल...मी ऐकलं सगळं.."

"अग माते... गप्प बस ना...सांगेल मी तुला सगळं पण तू अजून कोणासमोर तोंड नको उगडू....वेळ आल्यावर मी सांगेन ना...."

"हो का बच्चू.... मला जे इतका त्रास देतो आज तर त्याचा बदला घेणारचं मी...हाहाहा..."
आणि मी त्याच्या हातातला फोन घेऊन उगाच त्याला चिडवायचं म्हणून धावत सुटली..तो माझ्यामागे त्याचा फोन घ्यायला म्हणून धावत होता आणि शेवटी त्याने मला पकडलंच.. मी त्याचा फोन देत नाही म्हणून त्याने मागून दोन्ही हाताने मला विळखा घातला आणि बोलला...
"ये बाई...पाया पडतो तुझ्या, दे ग फोन..तुला जे हवं ते देतो तुला आज मी...प्लिज नको जाऊ कोणाला दाखवायला..."
आणि मी काही ऐकत नव्हती..आणि तो पुन्हा पुन्हा तेच बोलत होता..."नको ना जाऊ..नको ना जाऊ...प्लिज"

आणि आमच्या या मस्तीत अतुल केंव्हा पुढ्यात उभा झाला काही कळलंच नाही...जेंव्हा माझं लक्ष गेलं त्याच्याकडे, मी चेतनला बोलत होती की सोड मला पटकन पण तो काही ऐकत नव्हता..शेवटी मी त्याला त्याचा फोन दिलाच तेंव्हा कुठे तो बाजूला झाला...त्याचं लक्ष जेंव्हा अतुलकडे गेलं..तो बोलला...

"तू काही ऐकलं तर नाही ना भावा... ऐकलं असेल तरी सगळं विसरुन जा.. ही मुलगी वेडी आहे, काहीही बोलते.. लक्ष नको देऊ हिच्यावर.. तिचा एक स्क्रू पडला आहे...हाहाहा खिखिखि...."

"हो, चुकलंच माझं...लक्षच द्यायला नको होतं... बाय द वे, तुला सगळे शोधत आहेत त्यासाठी तुला बोलवायला आलो होतो...पण तू इकडे बिझी आहेस..."
पुन्हा अतुलचे टोमणे माझं काळीज चिरत होते...त्याची ती तिरकस नजर पुन्हा माझं मन भेदून त्यावर घाव करत होती...का असा करतोय ते कळत नव्हतं..पण त्याला नक्की काय वाटतयं हे पण तो बोलायला तयार नव्हता..मी माझ्याच विचारांत गुंग होती...तेवढ्यात पुन्हा चेतनने मला धक्का दिला आणि बोलला...

"जाम ताकत आहे यार तुझ्यात...किती थकवलस तू मला...बरं अतुल...तुझा मामला कुठपर्यंत आलाय...हम्मम?? हे बघ मला माहित आहे नुसतीच मैत्रीण इतक्या वेळा फोन करत नसते...बरं सांग ना यार..भावाला नाही सांगणार का...??"

त्यावर अतुलने केवळ एक उपहासात्मक स्मित दिलं आणि पुढे बोलला,
"सांगण्यासारखं काही असतं तर सांगितलं असतं ना, कसं आहे...
कुछ रिश्तो की मजबुरीया भी खूब होती है,
करीब होकर भी दुरीया बहुत होती है।"

आता अतुलचं काही पुढे ऐकण्याची इच्छाच नव्हती मला, कदाचित तिथे जास्त थांबली असती तर रडू कोसळलं असतं, त्यामुळे मी बोलली,

"जायचं का??? लोकं शोधतायेत आपल्याला..."
मी जायला निघाली तेवढ्यात पुन्हा चेतन बोलला,

"तुझं काही कळत नाही मला, मधेच इतकी हसते, मधेच सिरीयस होते...काहीतरी तर नक्की झालंय तुला..बरं, एक सांग ना, तू आजच इतकी सुंदर दिसत आहेस की तेरे गुस्से ने किया ये हंसी सितम... खिखिखी..." आणि पुन्हा चेतनची बस्तीशी दाखवणं सुरू झालं...पण त्याच्या ह्या बोलण्यावर अतुल मात्र एका झटक्यात तिथून निघून गेला.. आता मात्र माझी चिडचिड अनावर झाली होती आणि याचा ज्वालामुखी बिचाऱ्या चेतनवर फुटणार होता.. मी एकाचा राग दुसऱ्यावर काढणार होती.. आणि त्याच रागात मी चेतन ला बोलली...

"बस्सस...बस कर यार...किती वायफळ बकबक असते तुझी... थोडी तरी शांती दे मला...उशीर होतोय..किती त्रास देशील आणखी ..."
माझा चिडलेला अवतार पाहून तो शांत झाला..

"सॉरी...पण तुझं मला खरच काही कळत नाहीये..आधी तर माझा मजाक तुला हसवायचा, आता काय झालं?? पण ठीक आहे, आता नाही देणार तुला त्रास..मला वाटलं होतं आपण बेस्ट फ्रेंड आहोत...पण राहू दे सोड..."

आणि चेतनही नाराज होऊन निघून गेला...आता मात्र मला खरंच रडू कोसळलं.. मी नकळत माझ्या मित्राचं ही मन दुखावलं होतं..काय करू काही कळत नव्हतं.. माझ्या मनातल्या कल्लोळाने सगळा घोळ घातला होता... आता पुढे अजून काही घडावं याआधी मी आता आईबाबासोबत परत जायचं ठरवलं होतं...तेही अतुलला काही न बोलता काही न सांगता...
*******************
क्रमशः