'अंधार्या रात्री आजूबाजूचा परिसर राकट धुक्याने आच्छादला होता. झाडे-वेली शांत निवांतपणे पहुडलेल्या, त्यावर नुकत्याच पडुन गेलेल्या पावसाचे ओघवते थेंब पाझरू लागले. सकाळचा पाच-साडेपाच चा प्रहर. अभिमन्यूची गाडी पार्किंगमध्ये उभी होती, शेजारी रक्षाची बाईक. या वेळी बाबाच्या अड्ड्यावर तसे कोणी चिटपाखरूही नसे. त्यामुळे बोलायला निवांत वेळ मिळतो. शिवाय हा अड्डा शहरवस्तीपासुन एका बाजूला येतो. त्यामुळे एवढ्या पहाटे इथे फक्त आणि फक्त अंधारलेल्या शांततेचे साम्राज्य होते. शिवाय रहदारीच्या ठिकाणी रक्षा भेटायला येणे, हे जवळजवळ अशक्य, म्हणुनच अभिमन्यूने ही जागा निवडली होती.
आल्यापासून चार-पाच कप चहा प्रत्येकी संपवून झाला होता. ' गेल्याचं आठवड्यात घडुन गेलेली घटणा आपण सांगितली, पण तिची काहीच प्रतिक्रीया नाही. नक्की काय चालु असावं तिच्या डोक्यात? ' या विचारात तो असतानाच रक्षाने आपला फोन कानाला लावला.
" सुन्या, सकाळी सातला भेट, शिवाजी चौकात, तो टेकडीवरचा बुवा भेटेल का रे? थोडं कामं होत."
"..... “
" ठिक आहे."
"..... "
काहीतरी बोलून पलिकडून फोन कट झाला होता. अभिमन्यूने अधाशीपणाने फोनकडे पाहत लगेच प्रश्न केला, " कधी भेटतोय, तो मांत्रिक, बुवा."
" तो दोन वर्षांपूर्वी वारला, म्हातारा झाला होता त्यामुळे असेल." रक्षा त्यांच्याकडे कटाक्ष टाकत म्हणाली. आणि अभिमन्यू पुन्हा नाराज झाला.
" एक विचारू का? "
" हो, काय? "
" अभी तू सांगतोस ना, त्यावर माझा अजिबात विश्वास बसत नाही. फक्त तू म्हणालास म्हणून मी ते मांत्रिक, बुवा वगैरे शोधतेय."
" म्हणजे तुझा विश्वास नाही तर? " तो जरा रागानेच ओरडा."
" आवाज कमी कर, आणि शांत हो. प्रश्न फक्त विश्वासाचा नाही, नाहीतर मी एवढ्या दिवसांनी तुला भेटायला इथे आले नसते. "
" मग?"
" एक वाईट स्वप्न समजून तू हे सगळं विसरून का जात नाहीस. मग बघ, सारं काही व्यवस्थित होईल. तसेही त्या एका स्वप्नाव्यतिरीक्त तुला याचा पर्सनली असा काहीच त्रास नाही. "
" रक्षा, मी तेच ठरवलं होतं, पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची. पण...पण, हे बघ."
सकाळीच आलेला मोबाईलवरचा मेसेज वाचुन दोन मिनिटे ती देखील अवाक झाली होती. सलीम चा मेसेज होता.
................... ' मित्रा खुप दिवस तुला शोधण्याचा प्रयत्न केला. पण नावापलिकडे मला काहीही माहित नव्हते. जेव्हा तू एक मोठा कथालेखक आहेस हे समजलं तेव्हा वेबसाईट वरून तुझा व्यावसायिक नंबर मिळाला. फोन तर उचलत नाहीस. कमीतकमी मेसेज उघडुन बघशील अशी आशा करतो. मी फार मोठ्या अडचणीत सापडलो रे. ती जी कोण होती ती, जिथे जाईन तिथे माझा पाठलाग करतेय. मला बोलावतेय, त्याच नदीघाटावर... मी एकटाच आहे आणि माझी फक्त एक अम्मी.... याव्यतिरिक्त आम्हाला दुसरं कोण नाही रे. फक्त एकदा येऊन जा. मग सविस्तर बोलू.
तुझी मदत लागेल.'
---------------------------------- सलीम महोम्मद.
" हा सलीम, तो तुझ्याबरोबर तिथे घाटात सापडलेला मुलगा? राईट."
" हो. माझ्यामुळे तो बिचारा अडचणीत सापडला. "
"आणि ते कसं? उलट तुचं त्याची मदत केलीस ना, म्हणून तर तो बचावला. नाहीतर... "
"तो देखील असच समजतोय. पण सत्य काहीतरी वेगळं आहे."
" तो जो प्रसंग आमच्या सोबत घडला त्याच्याच आदल्या रात्री मी नवीन कथा लिहायला घेतली होती. त्या कथेची सुरुवात जिथून झाली, आणि पुढे मी जिथे क्रमश: लिहून कथा तात्पुरती थांबवली, तो सगळा प्रसंग, म्हणजे सलीम आणि माझ्या सोबत घडलेला ती सत्य घटना. "
" नक्की काय म्हणायचं आहे तुला? तू जे लिहीत जातोस ते सत्यात उतरतं, हे खार आहे? आणि आत्ता तू हे मान्य ही करतोस. " रक्षा आपल्या पोलिसी शब्दांत त्याची उलट तपासणी घ्यायला लागली होती.
" होय. म्हणजे सध्या तरी तसाच घडत आहे. "
" पण या आधी जेव्हा, सगळे मीडियावाले आणि इतर तुझे नावापुरते फॅन्स तुझ्यावरती हाच आरोप करायचे तेव्हा तू ते मान्य करायचा नाहीस. "
" होय! कारण तेव्हा मला तसं कधीही जाणवलं नाही. "
" आता अचानक का जाणवलं बरं? एक, एक मिनिट, म्हणजे तुझ्या या कथेत मुख्य पात्र तू आहेस तर? आणि आधी लिहिलेल्या कथा तू दुसऱ्या कोणालाही मध्यस्थानी ठेवून लिहायचासं."
" एक्झॅक्ट्ली ! त्यामुळे ते सत्यात उतरते कि नाही, हे मला समजायचे नाही. पण इथे मी लिहीणार्या कथेत स्वतः समाविष्ट आहे, त्यामुळे मी जशी कथा लिहिली तंतोतंत तशीच घटना माझ्या सोबत घडली, आणि सलीम फक्त त्या रस्त्याने जात होता. तो यात विनाकारण अडकला गेला. "
" मग हे जर खर असेल तर तुला त्याची मदत केली पाहिजे. पण माझा अजून विश्वास बसत नाही. हे असं देखील घडत ? आणि यामध्ये कोणाच्या तरी जीवावर देखील बेतू शकत? निव्वळ अशक्य वाटत रे. "
" कालपर्यंत मी ही हेच समजत होतो. पण आज मला त्याचा प्रत्यय येऊ लागलाय. "
त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा भयचकित भाव दिसू लागले होते. फासातं अडकलेल्या सावजासारखी अवस्था होती. कधीही शिकारी येईल आणि फास आवळेल. मग त्या सलीम ची काय अवस्था असणार? रक्षा देखील क्षणभर विचार करू लागली.
" अभि, तुला काय मदत हवी? आय मिन, मी काय करू शकते सांग? "
" हे नक्की काय चाललं आहे? याचा छडा लावायचा ठरवलंय मी. त्या प्रमाणे मी विचार करतोय, त्याप्रमाणे सगळं असेल तर... तर हे प्रकरण संपवणार मी. कायमचं. "
" ते कसं काय? "
" एक मांत्रिक शोधशील प्लिज. तुझे चेले असतात इकडे तिकडे फिरत, त्यांना सांग.... माझ्यासाठी. "
" चेले काय बोलतोस. गुप्तहेर आहेत, ते आम्हाला एखाद्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी मदत करतात. "
" असुदे. एवढं करशील?"
" होय. पुढे?"
" बघतो मी. कारण अजूनही या गोष्टीवर तुझा विश्वास नाही बसलाय. सध्या एवढीच मदत पुरे. "
" ऐकतोस, त्या बन्याला भेटायचं का? म्हणजे तू म्हणतोस तसं, तो आपल्याला काहीतरी मदत करू शकेल. "
" नक्कीच. आणि तो भेटल्यावर तुझी सुध्या खात्री पटेल, तुझा माझ्यावर विश्वास बसण्यासाठी आपण त्याला नक्कीच भेटू. "
" अभि माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि काही झालं तरीही मी तुला मदत करणार, हे देखील तुला चांगलं ठाऊक आहे, म्हणून तर सगळी दुनियादारी सोडून मला भेटायला बोलावलस ना! "
" थॅक्स. निघूया मग ? " चावी आणि पाकीट घेऊन तो ही उठला.
क्रमश:
©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन
https://siddhic.blogspot.com