१८.
कजरीचे दिलदारला पत्र!
दिलदार रात्रभर विचारात होता, मास्तरांनी भेटायला का बोलवावे यापेक्षा त्यांनी कजरीला पत्र का लिहिले नि त्यात काय लिहिले असावे? ते त्यांना भेटूनच कळणार होते. पण कजरीच्या बोलण्यात आलेला दिलदार शब्द? तो असंच आला की मुद्दाम? तिला डाकूंच्या टोळीची भीती वाटते तर तिला सारे ठाऊक असेल तर ती अशी शांत कशी? समशेरला न सांगता दिलदार हरिनामपुरात पोहोचला. मास्तर घरात वाट पाहात बसलेले ..
"ये. आलास. छान."
"तुम्ही बोलावले गुरूजी?"
"अरे हो. तुला बोलवायचे. पण तुला निरोप कसा देणार. मग कजरीबेटीला पत्र लिहिले."
"ती म्हणाली मला. पण.."
"काळजी करू नकोस.. कजरीला मी जे सांगायचे ते सांगितलेय.. तू फक्त आता मी काय सांगेन यावर विचार कर."
"होय गुरूजी. कजरीला सारे समजेल तेव्हा काय होईल? मला कळत नाही .."
"दिलदार, इरादा नेक आणि पक्का असेल तर मार्ग निघतोच. आणि मग त्याचा शेवट कसा होईल याचा विचार करण्याची गरज नाही. तू तुझे डाकूपण मनापासून सोडले आहेस.. निव्वळ कजरी मिळण्यापुरते नाही.. त्यामुळे तुझा इरादा नेक आहेच."
"होय गुरूजी. आणि पक्का ही."
"पण कजरीला मिळवणे हा तुझा इरादा असू शकत नाही दिलदार .. तेच सांगायला बोलावले तुला."
"म्हणजे?"
"म्हणजे नीट ऐक.. तुझा जन्म डाकूंच्या टोळीतला. त्याबद्दल तू काहीच करू शकत नाहीस. पण तुझ्यात ते डाकू बनण्याचे गुण म्हण किंवा अवगुण म्हण, ते नाहीत. तू माणसांना मारू शकत नाहीस. बायकामुलांना त्रास देऊ शकत नाहीस. तू तुझ्या आईला जंगलात त्रास भोगताना पाहिलेस. तसा तू कोणाला त्रास देऊ शकत नाहीस.. पण.. तुला वाटते हे पुरेसे आहे?"
"म्हणजे काय गुरूजी?"
"म्हणजे हेच.. हे पुरेसे नाही. काय करणार नाहीस तू ते तुला ठाऊक आहे. मला ठाऊक आहे. डाकूंच्या टोळीतून आलास तरी तू तसा नाहीस हे मी जाणतो.. मी ते इतरांना पटवून देईन.. पण बेटा हे पुरेसे नाही."
"मला ठाऊक आहे गुरूजी .."
"नाही. पुढे ऐक. तू जिथून सुरूवात करतोस त्या गोष्टी बाकी समाजात गृहित धरल्या जातात. गावागावातून लोक काही बंदुका घेऊन मारत फिरत नाहीत. ना ही लुटालूट करत. लोकांचे साधे आयुष्य ही असेच असते. डाकूंच्या टोळीत राहून तू तसा नाहीस.. ही चांगली गोष्ट आहे. पण ती पुरेशी नाही .."
"म्हणजे गुरूजी?"
"म्हणजे तुला या पुढे जावे लागेल. उद्या कजरी तयार झाली तरी तिला तुझ्या तंबूत सगळ्या डाकूंच्या टोळीत घेऊन जाशील? सध्या चोवीस तास प्रेमाची गाणी गात प्रेमाच्या गावा जायची स्वप्ने पाहतोस.. काय करणार नाहीस हे ठाऊक आहे, पण काय करणार आहेस ते ठरवावे लागेल.. तू दादागिरी करणार नाहीस.. पण दुसरे बरोबर असे काही तुला करावेच लागेल."
"दुसरे काही?"
"मी दोन गोष्टी सांगतो. दोन्ही कठीण आहेत. पण अशक्य नाहीत. त्यात तुझे भले आहे नि समशेरसकट इतरांचेही. बंदुकीच्या धाकावर दहशत पसरवण्यात फार काही मर्दुमकी नाही. चार दोन मुडदे पाडले की लोक घाबरतात. कठीण भाग मात्र इथून सुरू होतो. एक, तुला स्वतःचे पोट भरण्याचा सन्मान्य व्यवसाय करावाच लागेल. आणि त्यासाठी टोळीतून बाहेर पडावे लागेल. ते तसे शक्य नाही. तेव्हा दुसरी महत्त्वाची नि कठीण गोष्ट .. संतोकसिंग निवडणूक लढवू इच्छितो. आनंद आहे. पण त्याचा इरादा नेक नाही. त्याला फक्त टोळीला राजकीय संरक्षण हवेय. पण ती टोळीच नसेल तर? टोळीतील सगळे शरण आले तर? टोळीच नसेल तर या भागातील दहशत नाहीशी होईल.. तुलाही बाहेर पडता येईल.."
"तुम्ही सांगता ते खूप अवघड आहे गुरूजी .."
"आहेच. पण वेळ गेलेली नाही. समजून घे.. एखादा गरीब घरात जन्म घेतलेला मुलगा असेल.. पण समाजात कोणी त्याच्याकडे भीत भीत पाहात नाही. तुझी सुरूवात त्याहूनही कठीण आहे. तुझ्याकडे कोणी प्रेमाने बघणार नाही कधी. समशेरला ह्या साध्या आयुष्याचे आकर्षण आहे. पण तो दरोडेखोरीत बुडलेला आहे. बाकीच्यांना काय वाटते मला ठाऊक नाही. पण त्या मारधाडीला सोडून दुसरे कुठले जग नि दुसरे शांतपणे जगावे असे आयुष्य आहे तेच त्यांना माहिती नाही. तू समशेरला तयार कर. तो इतरांना तयार करेल. काम कठीण आहे.. संतोकसिंग सहज होऊ देणार नाही. पण निवडणूक म्हटले की त्याला पडते घ्यावे लागेल. टोळीतील लोक तयार झाले तर त्याचा इलाज नाही. विचार कर.."
"होय गुरूजी .."
"आणि अजून एक. जोवर तुझा हेतू प्रामाणिक आहे नि विचार पक्का आहे.. मी तुझ्या बरोबर असेन. पण विचार तुझा तूच करायचा आहे.. मी फक्त तुला दिशा दाखवेन. चालायचे तुलाच आहे.."
"होय गुरूजी .. मी प्रयत्न करतो. एकदा समशेरला तुम्ही सांगाल तर?"
"सांगेन. पण तू सांगितलेस तरी त्याला कळेल. मुलगा हुशार आहे तो. चांगला ही आहे. फक्त तुम्हा लोकांना वाट दाखवण्याची गरज आहे.."
"जमेल मला सारे गुरूजी? मला तर शंका वाटते. सरदार म्हणजे माझ्या वडिलांना कळले तर काही खरे नाही. तुम्ही म्हणता ते खरे. टोळीच्या रक्षणासाठी ते राजकारणात चाललेत.."
"तेच राजकारण वापरून टोळीच संपवून टाक. ताठ मानेने जगायला तयार हो. जोवर ह्या निवडणुका होत नाहीत, घाबरायचे कारण नाही. समशेरला समजाव."
"प्रयत्न करतो गुरूजी ..
दिलदार परतला तो मास्तरांनी सांगितले त्यावर विचार करत करत. समशेर बरोबर असता तर त्याला आपोआप सगळे समजले असते. तेही गुरूजींच्या शब्दात.. त्याला न सांगता येण्याचा पश्चात्ताप दिलदारला झाला पण आता गोष्ट घडून गेलेली.. गुरूजी सांगतात त्यात चुकीचे काहीच नाही. आधीही डाकूंच्या टोळ्या शरण गेलेल्या होत्या. आता कुठे कुठे मेहनत करून जगताहेत. तशीच मेहनत करायला हवी. आणि कजरी साथ असेल तर.. सहज होऊन जाईल सारे. फक्त टोळीच संपवणे शक्य दिसत नाही. ते कसे जमावे?
संध्याकाळी तो कजरीला भेटायला आला. तीच चार शब्दी चिठ्ठी घेऊन. गुरूजींच्या भेटीची उत्सुकता तिला ही होतीच.
"काय म्हणाले गुरूजी?"
"काही नाही, असेच बोलावलेले. काही काम होते त्यांचे."
"त्यांना कसे ठाऊक तुम्हाला माझ्याकडून निरोप मिळेल?"
"कोणास ठाऊक. असेल एक अंदाज.. तुम्ही पाठवलीत चिठ्ठी तर वाटले असणार .."
"खरंच की. पण तुम्ही रोज रोज जाऊन येऊन थकत नाहीत?"
"सवय आहे. नोकरी म्हटले की सगळे आलेच."
"नोकरी? पण मग तिकडून इकडे रोज."
"त्याची पण सवय झालीय. मित्राचे काम म्हणजे यायलाच हवे, नाही का? एक मित्र नाहीतर दुसरे कोण करणार?"
"खरंय. पण तुमच्या मित्राचा पत्ता काही तुम्ही लागू दिला नाहीत अजून. चिठ्ठी कोणाची आणता.. नाव तरी कळू दिले असतेत .."
"नाव? अहो नावात काय आहे? काहीही म्हणा, नावं ठेवू नका फक्त म्हणजे झाले! आता सोयीसाठी तुम्ही त्याला भेटेतोवर त्याला आपण त म्हणून नाव ठेवू. म्हणजे त नामक व्यक्तीची चिठ्ठी मी आणत जाईन."
"त?"
"जोवर तुमची चिठ्ठी जाणार नाही त आपले नाव गाव कसले सांगतोय. एक मी आहे जो रोज जा ये करतोय.."
"हो ना. अगदी स्वतःचे समजून तुम्ही पत्र पोहोचते करता. तसे तुमचे तरी नाव कुठे ठाऊक आहे मला? गुरूजींना देखील नाही माहिती. पण नका सांगू. नावात काय आहे? तात्पुरते तुम्हाला आपण द म्हणू. म्हणजे सोयीसाठी. म्हणजे द नामक व्यक्ती त नामक व्यक्तीची चिठ्ठी या क नामक मुलीस आणून देतो.."
"छान. तुम्ही क. छानच! बाकी पोस्टाचे काम काय.. काहीतरी चांगलेवाईट कळवणे. क्षेमकुशल कळवण्यासाठी सारा पत्रव्यवहार .. फक्त हे द नव्हे त नि क चे हिशेब नाही ठाऊक आपल्याला. इतकी पत्रे पोहोचवतो पण त्यातले एकही पत्र वाचत नाही कधी. नाहीतर कित्येक गोष्टी अशा कळल्या असत्या.."
"खरे आहे.. काही काही गोष्टी कळल्या असत्याच.. तुम्हाला. हे खरे आहे.."
"पण काही म्हणा तुमचा स्वभाव चांगला आहे. मनमोकळा. अगदी दिलदार. त्यामुळे त्या पत्राची वाट पाहात असते.. म्हणजे त्या त नामक पत्रलेखकाला भेटायचेय एकदा.."
"सांगू मी? पण तो असा येणार नाही .. त्याला पत्र लिहून द्या. मी देतो. बिचारा कधीपासून वाट पाहातोय.."
एकाएकी कजरीने हातात पत्र ठेवले त्याच्या. पाकीटबंद ..
"त ला क कडून .. द्या. मी लिहिलेय त्यात.."
"काय? नाही म्हणजे मी विचारू नये.. पण त्याला बोलावणार असाल तर माझ्या फेऱ्या बंद होतील.."
"तसं काही नाही. तुम्ही ही या. मला तर वाटतं की तुम्ही यालच. शेवटी मित्राची काळजी आहेच तुम्हाला. तुम्ही काही त्याला एकटे सोडायचे नाहीत .."
"छे हो.. मी कशाला मध्ये मध्ये.."
"बरं ते पाहूच.. मी निघते आता.."
दिलदारच्या हातावर चिठ्ठी ठेऊन कजरी पुढे निघाली. दिलदार थिजून उभा राहिला. ती चिठ्ठी उघडण्याचे धैर्य गोळा करायला त्याला वेळ लागणार होताच. सायकलीवर टांग मारून तो सायकल पळवू लागला.. थोडे दूरवर गेल्यावर मात्र त्याला राहवले नाही. निर्जन अशा ठिकाणी त्याने पाकीट उघडले.. आपल्या वाड्याच्या माडीवर बसून कजरी सायकलीवरून उतरून ते पत्राचे पाकीट उघडणाऱ्या दिलदारला पाहात होती!