१७
मास्तरांचे कजरीला पत्र!
मग दोघे घोडेस्वार दूरच्या रस्त्याने निघाले. इकडे सकाळचे घोडेस्वार परत येतीलच म्हणत कजरी आपल्या माडीवर वाट पाहात बसलेली.. .. ती पार संध्याकाळपर्यंत.. तिला दुसरीकडून सायकलवरून येणारा दिलदार डाकिया दिसेपर्यंत. ती झटकन नदीकिनारी आपल्या खडकाकडे निघाली.
"काय म्हणाले हरिनाथ गुरूजी?"
"ठीक आहेत म्हणाले. बरी आठवण काढलीस म्हणत होते .. पण त्यांनी चिठ्ठी नाही दिली काही.."
"आणि माझी चिठ्ठी?"
"ती दिली.."
"ती नव्हे. चार शब्दी चिठ्ठी .."
इथे अखंड सावधान असणे कसे जरूरी आहे याचा प्रत्यय आला दिलदारला. ही चार शब्दी चिठ्ठी म्हणजे काय हे ठाऊक असण्याचे त्याला कारण नव्हते .. साळसूदपणे तो म्हणाला,
"म्हणजे?"
"तुम्हाला ठाऊक नाही?"
"नाही. कसे असणार?"
"तीच, तुमच्या मित्राची चिठ्ठी .."
"तुमचा तो मित्र फक्त चार शब्द लिहितो चिठ्ठीत."
"चार शब्द फक्त? म्हणजे? कंजूस दिसतोय शब्दांच्या बाबतीत. पण तो खरेच चारच शब्द लिहितो?"
"हो ना.. पण गंमत म्हणजे पहिल्या पत्रापासून सुरूवात केली ना तर सगळी वाक्ये एकाला एक जोडून असतात.."
"हुशार दिसतोय .. शेवटी मित्र माझा आहे.."
"हुशार .. हुशार तर खरेच.. एका गावाहून दुसऱ्या गावाला पत्र पाठवायला तिसऱ्याच गावाहून कुणी मोठ्या मनाचा असा पोस्टमन मिळवला.. जो इनामे इतबारे, अगदी दिलदारपणे काम करतो.. हुशारच म्हणावा.."
तिच्या बोलण्याकडे लक्ष नाही असे दाखवत दिलदार म्हणाला,"गुरूजी म्हणाले .. तुम्ही खूप हुशार आहात म्हणून .."
"आणि अजून काही?"
"नाही. फक्त हुशारच आहात म्हणाले. त्या मित्राला विचारले तर तो अजून काही म्हणेल.. शेवटी प्रियेचे वर्णन प्रियकरानेच करावे नाही का? त्याला विचारून सांगू का?"
"विचारून? पत्र आहे की.. लिहायला. तसा तुमचा मित्र लिहितो चांगला. चारच शब्द पण नीट लिहितो. आम्हाला हरिनाथ गुरूजी असेच व्यवस्थित लिहायला शिकवायचे. अजूनही सवय गेली नाही माझी. हा तुमचा मित्रही हरिनाथ गुरूजींचाच शिष्य तर नाही ना?"
"ते मी विचारले नाही कधी.. हरिनाथ गुरूजी पण काही बोलले नाहीत.."
"ते कशाला काही सांगतील? त्यांना माहिती आहे तुम्ही कबूतर आहात म्हणून?"
"कबूतर?"
"हो ना. मी आणि लीला तुम्हाला कबूतर म्हणतो.."
लीलाचे नाव ऐकून दिलदार थोडा गडबडला. ती कोण हे त्याला माहिती असण्याची शक्यता नाही ..
"लीला? कोण लीला?"
"माझी मोठी बहीण.."
"तिला चिठ्ठीबद्दल माहिती आहे?"
"अर्थात. माझी बहीणच नाही. मैत्रिणीसारखी आहे ती.."
"पण ते कबूतर?"
"तुम्ही कबुतरासारखे पत्र पोहोचवण्याचे काम करता ना.. म्हणून. पण हरिनाथ गुरूजींना काय ठाऊक?"
दिलदारला कळेना बोलता बोलता घसरलेल्या जिभेला कसे सावरावे? सावरून घेत पुढे म्हणाला,
"ते नाही हो.. गुरूजी काही बोलले नाहीत.. काही त्रास झाल्याचे बोलले नाहीत .. त्या डाकूंनी त्यांना काहीच त्रास दिला नाही म्हणाले .. जेवू खावू घातले नि सोडून दिले.."
"मग पळवून नेलेच कशाला? जेवू घालायला?"
"असेल ही कदाचित."
"जाऊ देत. पण आज आमच्या गावावरून दोन डाकूंसारखे कोणीतरी पहाटे पहाटे घोड्यावरून गेले.."
"तुम्ही पाहिलेत?"
"वाड्याच्या माडीवरून सगळे दिसते.."
"कोण होते?"
"उजेड कमी होता म्हणून नीट दिसले नाही. संतोकसिंगाची माणसं असतील.. कारण आली ती त्या बाजूने. पण नसतील ही. बंदुका नव्हत्या हातात. कसला दंगा नाही, काही नाही. त्या टोळीला असे शांतपणे जायची सवय नाही .. तुम्हाला कधी रस्त्यात भेटली नाहीत त्यांची माणसं?"
"अं.. कोणाची?
"कोणाची काय? त्या डाकूंच्या टोळीतील."
"नाही. आणि माझ्या वाटेला जाऊन काय मिळणार?"
"पण मग गुरूजींना पळवून काय मिळाले असेल? जाऊ देत. त्या डाकूंचे नाव नको.. पण आजची चिठ्ठी?"
"आज? आज नाही लिहिली.. विसरलो.. गडबडीत."
"काय?"
"चिठ्ठी. विसरलो.."
"लिहायला?"
"लिहायला.. तो विसरला.. आणायला.. मी विसरलो.."
"ती कशी काय? नाही, लिहिलीच नाही तर तुम्ही विसरलात कसे?"
"ते पण खरेय.. म्हणजे मी त्याला चिठ्ठी लिही नि दे हे सांगायला विसरलो गडबडीत .."
"पण गडबडीत .. म्हणजे? कसली गडबड?"
"हरिनामपुरात जाऊन येण्याची .."
"पण ते तर तुम्ही रोज करता ना?"
"हो ना.. पण आज थोडी गडबड झाली.."
"राहू देत. फारच वेंधळा दिसतोय एक माणूस .."
"कोण?"
"ते तुम्हीच ठरवा.. वेंधळा माणूस एकच आहे की दोघे .. तुम्हीच ठरवा.."
परतताना दिलदारच्या डोक्याला नवे खाद्य मिळालेले. सकाळी मास्तर म्हणाले, कजरी फारच हुशार आहे.. आणि आता ही.. तिच्या बोलण्याचा अंदाज थोडा वेगळा वाटतो.. तिने पहाटे पाहिले की काय? नि शेवटी बोलली ते एक माणूस नि दोन माणसं .. नि त्यांचा वेंधळेपणा? नक्की काय प्रकार आहे? पण तिला दिलदार कोण नि पोस्टमन कोण हे ठाऊक झाले तरी ती इतकी शांत कशी? की नसणारच ठाऊक झाले. नाहीतर ती तीन ताड उडाली असती जागच्या जागी. आजवर त्या चिठ्ठी लेखकाचे न नाव विचारले, ना चौकशी केली.. पण चिठ्ठी घ्यायला उत्सुक असते ती.. हा प्रकार काय की नुसतेच स्वतःच्या मनाचे खेळ? समशेरला हे सारे सांगितले तर तो हसणार, त्याने सर्व गोष्टींचा विचार आधीच करून ठेवलेला आहे. तो एकच सांगत राहतो.. इस रात की सुबह नहीं. त्याचे सांगणे पटते.. कळते पण वळत नाही.
- आणि कितीही ठरवले तरी दिलदारची दुचाकी कजरीला भेटायला इकडे वळतेच..
नंतर कजरीच्या भेटी होत राहिल्या. कजरी त्याच्याशी असेच बोलत राहायची. बहुतेक वेळा ती येणे चुकवायची नाही. पण कधी त्या पत्रलेखकाबद्दल विचारायची नाही नि कधी काही त्याला द्यायला पत्रोत्तरही द्यायची नाही. फक्त मधून मधून डाकूंच्या टोळीचा उल्लेख यायचा तेवढाच. एकदा तिने सहज विचारले, "त्या संतोकसिंग टोळीत खूप भयंकर लोक असतील का हो?"
दिलदार यावर काय उत्तर देणार होता? डाकू असून असून किती कमी भयंकर असतात म्हणून समजावून सांगणार होता तो?
"कुणास ठाऊक?"
"पण असे डोंगरदऱ्यात कसे राहात असतील. वर पोलिसांची भीती.. तुम्ही कधी भेटला आहात कुणाला?"
"कसा भेटणार? ते लोक काय गंमत म्हणून भेटणार आहेत कोणाला? गप्पा मारायला?"
"मग गुरूजींना का नेले असेल? नि सोडून ही दिले.."
"तुम्ही जास्त विचार करू नका. गुरुजी सारे विसरून गेलेत.."
अशी मध्ये मध्ये डाकूंच्या टोळीबद्दल चर्चा होई. अर्थात खोऱ्याच्या आजूबाजूच्या गावात अशी चर्चा नेहमीच चाले. त्या टोळ्यांच्या बद्दल भीती नि थोडीफार उत्सुकता असे. लोक शिव्याशाप देत पण त्यांच्याबद्दल कुतूहलही असे.
बाकी पोस्टमनची भूमिका दिलदारच्या अंगवळणी पडली होती. संतोकसिंग क्वचित कधी आलाच तर दिलदारचे कान उपटायचा पण दिलदार त्याला दाद देईल तर.. दिवस चालले होते. कजरी दिवसेंदिवस त्याला जास्तच आवडत होती. नदी किनारी ती पंधरा मिनिटांची भेट.. बाकी दिवस तिच्या विचारात घालवणे. आणि तिच्या मंजूळ आवाजाची रेकॉर्ड कानात परत परत वाजवीत ठेवणे.. पुढच्या चिठ्ठीत चार शब्द लिहायचे कोणते याचा विचार करत राहणे.. या सर्व गोष्टींना एक दिवस छेद गेला..
नदी किनाऱ्यावरच्या भेटीत एके दिवशी कजरीने विचारले,
"हरिनाथ गुरूजी तुम्हाला गावात भेटत नाहीत का हो?"
"कधी कधी भेटतात. म्हणजे भेटतात तसे. परत काही पत्र वगैरे द्यायचेय? द्या. बंदा हाजिर है."
"कधी भेटले होते?"
या प्रश्नाचे उत्तर नक्की काय द्यावे? खूप पूर्वी म्हणावे की कालच भेटले म्हणून सांगावे? मध्यम मार्ग स्वीकारत तो म्हणाला,
"मागे एकदा भेटलेले.. त्यांना पत्र द्यायचेय परत?"
"छे हो. त्यांचेच पत्र आलेय. मला. पोस्टाने. आमच्या खऱ्या पोस्टमनने आणून दिलेय.."
"खऱ्या पोस्टमनने म्हणजे?"
"म्हणजे असा इकडे एकच चिठ्ठी पोहोचवणारा.. कबूतर नाही .. तुम्ही कसे हरिनामपुरात खरे पोस्टमन असता .. तसा.."
"काय म्हणतात गुरूजी?"
"काही नाही. बोलावलेय."
"कोणाला? तुम्हाला?" दिलदार कितीही प्रयत्न करूनही आवाजातली भीती लपवू शकला नाही ..
"का हो घाबरलात?"
"घाबरत नाही .. पण इतक्या दूर.. डाकूंचा प्रदेश.."
"पण गुरुजींनी मला नाहीच बोलावले .."
"मग?"
"तुम्हाला बोलावलेय भेटायला .."
"मला? कशासाठी असेल?"
"जाल तेव्हा कळेलच.."
"हो ना.. जातो उद्याच.."
"म्हणजे? रात्री तुम्ही हरिनामपुरात परत जाणार नाही?"
"तसे नाही. त्यांना भेटायला उद्याच जातो.."
गुरूजींनी भेटायला बोलावले? काय असावे कारण? ते ही कजरीला पत्र लिहून. अजून काय लिहिले असेल? गुरूजी असे लिहिणार नाहीत. नाहीतर ह्या कजरीच्या वागण्यात फरक पडलाच असता.. आणि त्यांनी कजरीला पत्रात मला भेटायचे म्हणून लिहावे? ती मला भेटते हे त्यांना ठाऊक .. पण ते त्यांना ठाऊक असल्याचे कजरीला कसे ठाऊक? आणि तसे त्यांनी कजरीला लिहून कळवावे?
तंबूत परतला तो हाच विचार करत. रात्री पुढ्यात वाढलेले जेवताना आता पुढे काय वाढून ठेवले असेल याचा विचार करत तो बसला.