१३
सब्र का फल!
आता काय करावे? दिलदार पेचात पडला. जिच्यासाठी तो आला ती पुजारी कन्याच नसावी? पण हे कसे शक्य आहे? आजवर कित्येकदा तिला इकडे पाहिलेले.. पुढे घोडे दामटत दिलदार म्हणाला,
"लीलाको बुलाएंगे तो.. हम चेहरा देखकर बता देंगे.."
लीला बरोबर कदाचित ती धाकटीपण यायची.. ती आपलीवालीच असेल तर नाव काही का असेना तिचे.. नावात नाहीतरी आहे काय?
"लीला? ती तर पाठराखीण म्हणून गेलेली. आली होती. पण परत गेलीय. येईल आठवड्यात.."
म्हणजे त्याचीवाली धाकटी पण कदाचित त्या भलीथोरलीच्या घरी, थोरलीच्या पाठोपाठ गेली असणार .. की इकडेच घरात बंद करून ठेवलीय तिला?
"वैसे फोटो देखकर भी भविष्य बताते हैं हम.. एक फोटो दिखा देंगे तो .."
दोन्ही बहिणींचा एकत्र फोटो तर असणार. त्यात मुखदर्शन झाले तर.. पुजारीबुवा आत गेले. येताना हातात एक फोटो होता.. दहा एक वर्षांची मुलगी रागीट चेहरा करून उभी होती. डोळ्यात काजळाची डबी उपडी केल्यासारखे काजळ डोळ्याबाहेर पसरलेले..
"यह लीला की है?"
"जी हां. आता लग्नात काढले पण अजून आले नाहीत. शहरातून फोटो यायला वेळ जातो खूप.."
लीलाच्या त्या फोटोत दिलदारला रस नव्हता. पण तिच्या लहान बहिणीचा विषय काढायला तो फोटो पाहणे गरजेचे होते. तो फोटो हाती घेत बारकाईने न्याहाळू लागला.
"यह बहुत भाग्यशाली लडकी है. होशियार और मेहनती."
"जी आचार्य. सो तो है. हमारी लीला कामात तरबेज. माझ्या मोठीच्या लग्नात किती कामे केली.. लीला आहे गुणाची. माझ्या बहिणीवर गेलीय.. लाडकी माझी. ज्या घरी जाईल तिथे सोनं करील." मावशी आता वात्सल्यरसात डुंबत होती.
"सही बात है. इसका भाग्य उसके पीछे जो बहन है उससे है.. जरा उसका नाम तो बताइए.."
"सही बात.. तिची बहीण जन्मली त्यानंतरच ही चालायला लागली. तोवर नुसतीच रांगायची. आचार्य तुम्ही सांगता ते खरेच असणार. झाशीचे विद्वान तुम्ही."
"रसीलाबेन, झाशीचे नाही. काशीचे .." पुजारीबुवा चूक सुधारत म्हणाले. रसीलाबेन.. त्या मावशीचे नाव. तरीच विविध रसात डुंबत असतात ..
"तो छुटकी का नाम बताएंगे ..?"
"याद आया.."
म्हणजे? छोटीला तिच्या नावासकट विसरलेले सगळे?
"याद आया? अरे बारशाच्या वेळी असेच एक गुरूजी आलेले.. अशीच दुपारी बाराची वेळ .. बारशाची तयारी सुरू होती. पाळण्यात पोर झोपलेली.. नाव ठेवणार इतक्यात ते गुरूजी आले.."
कुठच्यातरी सिनेमात असाच कोणीतरी लग्न लागायच्या ऐन क्षणी पोहोचतो आणि ओरडतो.. ठहरो.. त्याची आठवण आली दिलदारला.. सगळे काही सांगताहेत पण तिचे नाव काही घेत नाहीत.
"हो ना. रसीलाबेन. गुरुदासपूरातून आलेले गुरूजी .. काय नाव होतं त्यांचं.."
"भैरवलाल.. अजून आठवते नाव. एकदम तरूण होते.."
त्या गुरूजीचेही नाव सांगून झाले पण छुटकीचे नाही सांगणार .. आणि हा तोच भैरव असणार? म्हणजे यांच्याकडे अशी बनावट ज्योतिषी येण्याची परंपराच आहे की काय? दुनिया गोल आहे खरी, आणि खरेतर गोलमाल ही!
"तर सांगत काय होते.. पाळण्यात मुलीला झोपवलेली. माझी बहीण म्हणजे तिची आई अशी इथे उभी. तसा माझ्या बहिणीला गुडघेदुखीचा त्रास पण नारायण तेल लावायची ती.."
"महा नारायण तेल.." पुजारीबुवांनी चूक सुधारली. नसती सुधारली तर त्या तेलाने काम करणे बंद केले असते? गुरूजींचे नाव झाले.. तेलाचे नाव झाले पण त्या छोटीचे नाव.. दिलदारच्या सहनशीलतेचा अंत समीप आलेला.. पण सब्र का फल मीठा होता है.. हे एका दरोड्यात पळवून आणलेल्या पेट्यांतील पिकलेले आंबे खाताना ऐकलेले वाक्य आठवले..
"हां. महानारायण तेल. ते लावून ती अशी उभी. आमच्यात नाव कानात नाही सांगत.. नाकात सांगतात. तशीच रीत आहे."
रसीला मावशीबाई अद्भुत रसाचा शिडकावा करत बोलल्या.
"तर नाव ठरलेले एक. भैरव गुरूजी म्हणाले, ल वरून ठेवा.. मग ऐनवेळी नाव बदलले."
"फिर क्या नाम रखा छुटकी का?"
"लीला. छुटकीका नहीं.. यह बात लीला के समय की.."
दिलदारला आता रसीलाबाईंना कुठल्यातरी रौद्र नाहीतर भयानक रसात बुडवावेसे वाटू लागले..
"छुटकी तर आमची लाडाची.. शेंडेफळ."
"दिख नहीं रही कहीं.."
"वह एक जगह बैठे तो ना. खूप चुलबुली आहे ती. नादान आहे.."
"उसका फोटो हो तो उसका भी भविष्य.."
पुजारीबुवा झटकन उठून आत गेले.. फोटो घेऊन आले.
"हा घ्या.."
फोटो हातात घेता घेता दिलदारचा श्वास रोधला गेला. ती तीच की दुसरी कोणी? कोणास ठाऊक? फोटो उत्सुकतेने पाहिला त्याने.. एक दोन वर्षाची मुलगी उभी होती..
"यह है हमारी लाडली .. मालती.."
अथक प्रयत्नानंतर सापडलेल्या या छोटीचे नाव मालती निघावे? डोंगर पोखरून मालती निघावी? कजरीचे काय? ती नाहीच? नव्हती? की ती मित्रकन्याच होती जिच्या साखरपुड्याच्या पुडीतला पेढा नुकताच त्याने खाल्ला?
दिलदारच्या सहनशक्तीचा अंत झालाच. तो उठून उभा राहात म्हणाला, हम निकलते हैं अब. हमें देवीका संदेसा आया अब. निकलना पडेगा."
"आचार्यजी, थांबा. जेवून जा.."
"नहीं. हम निकलते हैं."
"परत कधी याल?"
"देवी का संदेसा आए तो हम खुद हाजिर हो जाएंगे.."
आपल्या दाढीवर हात फिरवत दिलदार उठून उभा राहिला. पाठून पुजारी आणि रसीलाबेन काहीतरी बोलत होते पण दिलदारला त्यातील एक शब्द ऐकू येईल तर शपथ..
तो देवळाबाहेर येऊन चालायला लागला.. तोच पाठून आवाज आला,
"पंडितजी..'
हा तोच आवाज.. जो त्यादिवशी कानात साठवलेला. कजरीचा आवाज? नक्कीच भास असावा. पण परत तीच हाक कानी आली.. त्याने पाहिले तर ती तीच होती! नाव काय असेल हिचे? मालती की कजरी?
"पंडितजी, जरा थांबा.."
दिलदार आता अनंत काळही थांबायला तयार होता. त्याच्या ह्रदयाची धडधड वाढायला लागली..
"पंडितजी, तुम्ही भविष्य सांगता ना?"
"हां बेटी.. क्या नाम है तुम्हारा?"
"मेरा बताएंगे?"
"क्या? नाम बताऊं तुम्हारा?"
"नाव नाही पंडितजी.. भविष्य.."
छोटीचे नाव काही झाले तरी न सांगण्याचा चंग अख्ख्या कुटुंबाने बांधला की काय?
"वह तो बताएंगे. पहले आपका नाम तो जानूं.."
"नावात काय आहे पंडितजी?"
"वह भी सच है.. तुम पुजारीजी की कनिष्ठ कन्या हो?"
"जी हां.. पंडितजी.."
ह्या प्रश्नाचे सरळ उत्तर मिळाले म्हणून दिलदार खूश झाला..
"खरंतर मी कोणाची तरी वाट पाहाते.. तो कधी भेटेल ते सांगू शकाल?"
दिलदारच्या डोक्यातली चक्रे वेगात म्हणजे अगदी विद्युत वेगाने फिरू लागली. काही दिवस ही नव्हती, ती आली नि चार दिवस तो पोस्टमन आला नाही. त्या चिठ्ठीबद्दल काही असणार .. दोन आणि दोन चार.. अतिजलद हिशेब लावत तो म्हणाला,
"चिंता मत करो बेटा.. तुम जिसकी राह देख रही हो वह कल तुम्हें यहींपर मिलेगा.."
"सच पंडितजी?"
"अर्थात. एक पल रूकना बेटी.."
त्याने किलकिले करून डोळे मिटून घेतले.. काही क्षणानंतर म्हणाला,
"तुम्हें जो भी मिलनेवाला है वह एक बहुत अच्छा आदमी है.. तुम्हारे जीवनमें वही खुशियां लाएगा.. बेटी तुम नसीबवाली हो.."
"पर पंडितजी.. वह तो सिर्फ चिठ्ठी लेकर आता है.."
दिलदारचा अंदाज खराच होता. खूश होत त्याने परत ज्योतिषाचे बेअरिंग घेतले.. उगाच डोळे बारीक करून तिच्याकडे नजर लावून तिला पाहून घेतले..
"सही. वही है जो तुम्हें सही आदमीतक पहुंचाएगा. भगवान किस रूप में आकर मदद करेंगे कह नहीं सकते बेटी. वही चिठ्ठी लानेवाला तुम्हें मंजिलतक पहुंचाएगा.."
"धन्यवाद पंडितजी.."
इतक्या घरातून हाक आली..
"कजरी.. ओ कजरी.. कुठे गेलीस..?"
"आले मावशी.." म्हणत ती निघून गेली..
ही कजरी? मग मालती कोण? काही असो, ही पुजारी कन्या आहे आणि हीच आपल्याला हवी ती आहे.. आता पुढील भाग परत डाकिया बनून पुढे!
गावाबाहेर समशेर त्याची वाट पाहात होता. दिलदार गावाबाहेर आला. त्याचे दाढीचे जंजाळ दोघांनी मिळून काढून टाकले.. आडोशाला जाऊन धोतर बदलले.. त्याचा चेहरा पाहूनच समशेर समजलेला, मोहिम फत्ते.. आणि खरेतर चेहरा वाचनाची शिकवणी घेतली होती ती दिलदारने!