१२
आचार्य!
आज सकाळी दिलदार उठला.. चार दिवस मध्ये उलटून गेलेले. आता तो ज्योतिषी बनून पुजारीबुवांच्या घरात घुसायला तयार होता. समशेर त्याला तयारी करून देत होता. ज्योतिषी म्हणून सायकलीवर जाऊ शकत होता तो, पण गावात कोणी ओळखली सायकल तर पंचाईत. म्हणून समशेर बरोबर घोड्यावरून स्वारी निघाली. गावाबाहेर समशेर थांबून राहिल नि तोवर दिलदार आपला पराक्रम गाजवून येईल..
"आज तरी काम होऊ दे तुझे.."
"तुला इतकी माझी काळजी रे समशेर.."
"तुझी नाही, स्वतःची काळजी. नाहीतर अजून काही दिवसांनी अजून नवीन काही.. नाही, अजून नव्या कोणाला तरी पळवून आणायला सांगायचास तू.. गुरुजी झाले.. आता हे दोघे.. पळवून आणायचे पण मारायचे नाही ना काही खंडणी गोळा करायची.. डाकूपणाला काळिमा फासण्याचे काम हे. दरोडेखोर असूनही ही असली कामे करायला सांगतोस?"
"नाही, दरोडेखोर आहेस म्हणूनच ही कामे सांगतो.."
"अशाने काय पत राहिल आमची?"
"पत? अरे सोहनी महिवाल नि हीर रांझा यांच्या बरोबरीने दिलदार कजरीची प्रेमकथा लिहिली जाईल. वर्षानुवर्षे लोक ऐकतील. त्यात तुझा सहभाग असेल. आमच्या प्रेमकथेत तू अमर होशील.. विचार कर.. दिलदारचा यार समशेर.. या प्रेमकथेचा प्रत्यक्ष साक्षीदार.."
दिलदार गावात पोहोचला. देवळात पूजेची वेळ होती. ती संपेतोवर आपल्या पिशवीतल्या चोपड्या उघडून धोतर सांभाळत बसावे लागले त्याला. जाणाऱ्या येणाऱ्यांकडे न बघता तो बसून राहिला. न जाणो कुणी खरेच भविष्य बघायला येऊन बसायचा.. तरीही दोघे तिघे येऊन पुढ्यात बसलेच. पण त्याने वाचनात दंग असल्याचा अभिनय चांगला केला नि ते कंटाळून निघून गेले. पूजा संपली. आपल्या पोटाचा ढोल घेऊन पुजारीबुवा जायला निघाले .. पाठोपाठ दिलदार उठला.. आता परीक्षा सुरू होत होती. चार दिवसांच्या मेहनतीचे फळ मिळेल की नाही? कमीतकमी त्याची बुलबुल कैद में आहे की नाही हे तरी कळू शकेल. थोड्या हुशारीने केले सारे की होईल काम..
पुजारीबुवा घरात शिरले. दरवाजा ठोठावत दिलदार पुढे झाला..
"प्रणाम गुरूजी."
उघडेबंब पुजारीबुवा पुढे येत म्हणाले ..
"कोण आपण?"
"हम काशी के पंडित .. सामुद्रशास्त्र पारंगत.. हस्तसामुद्रिक .."
"अहो भाग्यम्.. अहो भाग्यम.. यावे यावे .. आपले नाव?"
दिलदार अडखळला. त्याने नावाबद्दल विचारच केला नव्हता. बाकी बोलण्याची भाषा बदलली, अवतार बदलला.. ऐन वेळी नाव काय सांगावे..
"सब हमें आचार्य कहते हैं. पचास साल सामुद्रिक शास्त्रमें बिताए हैं."
"आचार्य.. पण आपले पूर्ण नाव?"
"आचार्य दिलजारलाल. काशीवाले.."
माहिती असलेल्या नावांची तोडफोड करत कसेबसे नाव बनवले त्याने नि एकाएकी सावरून घेत विषय बदलला,
"हमें संदेसा आया. देवीने कहकर यहांपर भेजा है. मौर्यागुरूजी अति पुण्यशील व्यक्ति हैं. उनके यहांपर जाकर उन्हें सलाहकारी की जरूरत हो तो मदद करना.. इसलिए काशीसे आया हूं.."
"आमचे भाग्य थोर. म्हणून तुमचे चरण आमच्या घरास लागले.. बसावे आचार्य.. दूध आणि केळी आणतो.."
मटण आणि कोंबडीच्या तामसी खाण्यापुढे हा दूध केळ्याचा सात्विक पोषक आहार? पण प्रेमात काहीही करावे लागते.. कजरी तुझ्यासाठी मी दूधही पिईन आणि केळीही खाईन..
पुजारी आत निघून गेले. दिलदार आजूबाजूस निरखून पाहू लागला. पुजाऱ्याचे असावे तसे घर. वाडाच म्हणावा. यातील एखाद्या खोलीत कजरी लपली, नव्हे लपवली गेली असेल? एकाएकी विचार आला.. वास्तुशास्त्र .. कजरीचा पत्ता लागलाच नाही तर वास्तुशास्त्राचे निमित्त करून घरभर फिरून घ्यावे. तशी वास्तुशास्त्राची जुजबी माहिती करून घेतली असती तर बरे झाले असते. त्यातल्या त्यात भैरवलाल ज्योतिषी म्हणालेला काहीतरी .. दिशांबद्दल. त्यावर आधारित काहीतरी करावे लागेल.
दूध आणि केळ्यांचा सात्विक आहार आला. कोणी एक बाई घेऊन आल्या.. पाठोपाठ पुजारीबुवा.
"हे आचार्य. आचार्य लाल. काशीवरून खास आलेत.."
"सामुद्रिक. विवाह स्पेशालिस्ट."
हे विवाह स्पेशालिस्ट त्याला ऐनवेळी सुचले. असे काही तात्काळ सुचत राहिले तर किल्ला सर होईलच .. दिलदार मनातून खुश झाला.
"ही माझ्या मिसेसची मोठी बहिण.. कुसुमावती."
"और आपके बच्चियोंकी मां?"
"दस साल हुए.. गुजर गई. ही मावशीच मुलींची आई.. आजकाल मुलींना खूप सांभाळावे लागते.."
हे कजरीला उद्देशून तर नाही? कजरीला लपवून ठेवल्याचा दिलदारचा संशय अजूनच बळावला.
दिलदार पुजारीबुवांच्या तोंडाकडे निरखून पाहात म्हणाला,
"चिंता मत कीजिए.. आपके घर से एक बेटी ब्याहकर गई.. वह सुखी होगी.. आप भी सुखी रहेंगे.. आपका चेहराही बताता है.. चेहरा मानो व्यक्तित्व का आईना है.. उसका मुआईना करो तो व्यक्ति की विशेषताएं शीशेकी तरह साफ दिखाई देती हैं.."
आपल्या हिंदीवरील प्रभुत्वावर दिलदार क्षणभर खूश झाला..
"और आपका जीवन सुखी रहेगा. पुण्यशील व्यक्तिके जीवन में भी सुखदुख तो आते रहेंगे. मगर आप धैर्यसे सबका सामना करेंगे.. दिखाईए आपकी हथेली.."
जगाच्या पाठीवर कुठेही जा.. विश्वास असो किंवा नसो.. कुणी हस्तरेषा पाहून काही सांगत असेल तर समोरचा हात पुढे करणारच.. तसा पुजारीबुवांनीही केला. भावी सासऱ्याचा हात हाती घेऊन दिलदार परत सुटला..
"आप बडे भाग्यशाली हैं. आपकी जीवन रेखा लंबी है. आपने कई संघर्षों के बाद अपना यह सन्मान हासिल किया है. और भी आपका उत्कर्ष होना तय है.. आपकी दूसरी बेटी.. उसका ब्याह और भी प्रगतीपथपर ले जाएगा.."
"सो तो है.. हमारी लीला है ही गुणी.."
लीला? ही नवीन कोण? मग कजरीचा नंबर? लीलाच्या लग्नानेच सासऱ्याचा उत्कर्ष होणार असेल तर कजरीला रोल काय उरला? मनातल्या मनात दिलदारने जलद आकडेमोड केली. उगाच गहन विचारात असल्यासारखा चेहरा करत म्हणाला,
"आपकी बेटियां.. तीन.."
"तीन नहीं दो.."
आता आली पंचाईत. दोन पैकी पहिली लग्न होऊन गेली. दुसरी लीला.. मग कजरी कुठेय?
"जो ब्याहकर गई.."
"वह मौसीजीकी कन्या. लीला माझी मोठी.."
आता आशेचा किरण दिलदारच्या मनात चमकला.
"और दूसरी..?"
बाहेरून कुणाचे बोलावणे आले तसे "आचार्य.. मैं अब हाजिर होता हूं.." म्हणत पुजारी बुवा डुलत डुलत जमेल तितक्या वेगाने पटकन निघून गेले. मावशी समोर होती.. तिचा हात पहायची इच्छा नव्हती खरेतर, पण आता वेळ निभावून नेली पाहिजे. आणि माहिती मिळण्याचा एकही स्त्रोत वाया घालवून चालायचा नाही..
"मौसीजी.. आप हाथ दिखाना चाहेंगी?"
"माझा कसला हात नि बीत. मोठीचे वडील गेले तेव्हापासून मी इकडेच. माझी मोठी बहीण. लीलाची आई.. ती पण गेली. आता भाग्यवान काय नि अभागी काय.."
दिलदार शृंगाररस निष्पत्तीच्या प्रयत्नात आलेला तर इथे हा करूणरस स्त्रवू लागला.. कमीतकमी हास्य रस तरी पाझरावा.. बोलण्याचा ओघ बदलत दिलदारने संभाषणाची गाडी वळवली..
"तो बडी बेटीका ब्याह बाकी है .."
"तिचे तर झाले.. दुसरीचे बाकी आहे.."
"लीलाका ब्याह? उसकी चिंता मत कीजिए.."
"लीलाका ब्याह नहीं.. तिची कसली चिंता.."
काही करून कजरीचे नाव यायलाच तयार नसावे?
"आम्ही चिंता नाही करत कधी. तो वर बसून पाहातो आहे. त्याच्या दरबारात सगळ्यांना न्याय आहे.. त्याच्यावर सोपवले की बघायला नको.. देवीचा आशीर्वाद आहे.. मला दररोज देवी स्वप्नात येऊन सांगते.. उद्या काय होईल ते.. त्यामुळे तुम्ही येणार हे मला आधीच ठाऊक होते.. देवीमाते, तूच सगळ्यांना सांभाळ गं.." मावशीच्या बोलण्यातून भक्तिरस पाझरू लागला.. स्वप्नात देवीने अजून काय सांगितले याची माहिती दिलदारला हवी होती.. इतक्यात पुजारीबुवा परतले. हातात पेढ्यांचा पुडा घेऊन..
"लीजिए. आमच्या मित्रांपैकी एकाच्या मुलीचा साखरपुडा झाला काल.. मुलगी हुशार आहे. मॅट्रिक पास.. तिकडे होशियारपुरात दिलीय. दहेज नाही नि काही नाही."
"कोणाचे ठरले?" मावशीला कोणाच्या लग्नाचा पेढा खातोय हे माहिती असल्याशिवाय तो गोड लागला नसता बहुधा.
"त्या कजरीचे. होशियारपुरात.. मुलगा मोठा हुशार आहे.."
कजरी? मित्राची मुलगी? दिलदारला पांढऱ्या दाढीमागे नि केसांच्या टोपाच्या आत घाम फुटला. कजरी पुजारी कन्या नाहीच? आणि ज्याची कोणाची असेल तिचा तिकडे साखरपुडाही झाला.. ज्याचे पेढे तो हातात घेऊन खातोय? एकाएकी तो पेढा त्याला कडवट वाटायला लागला .. सारे काढून पळून जावेसे वाटायला लागले. इतकी मेहनत करावी आणि ज्या पत्त्यावर यावे तोच चुकीचा निघावा? आजवरची सगळी मेहनत पाण्यात? तरीही अजून दुसऱ्या मुलीचे नाव माहिती व्हायचे बाकी होते. कजऱ्या दोन असूच शकतात. शेवटी उम्मीदपर जीती ही दुनिया. थोडक्यात त्या द्वितीय पुजारीकन्येचे नाव ठाऊक होईतोवर धीर धरावा असे समजून त्याने आपल्याला सुटलेल्या घामाच्या धारांकडे दुर्लक्ष केले.