Dildar Kajari - 7 in Marathi Fiction Stories by Nitin More books and stories PDF | दिलदार कजरी - 7

Featured Books
Categories
Share

दिलदार कजरी - 7

७.

लेखन वाचन

मास्तरांचे शिकवणे सुरू झाले. दोन गोष्टी .. एक अक्षर ओळख, आकडे, लिहिणे वाचणे आणि दुसरे.. सायकल चालवणे. घोडा दौडवणे कठीण नसेल पण दुचाकी सायकलीवर तोल सांभाळत ती चालवणे मात्र कठीण. आपल्या हातातील लगामाने सारे काही कंट्रोल करण्याची सवय डाकूलोकांना. अगदी जिभेच्या लगामापासून सुरूवात. आजूबाजूच्या गावांवर दहशतीचा लगाम लावूनच इतकी वर्षे टोळी पोलिसांपासून बचावली होती. घोड्याचा लगाम म्हणजे त्या जंगलातील आयुष्याचे प्रतीक होते जणू. आणि दिलदार शिकतोय या सायकलीला तर असा लगामच नव्हता! ब्रेक मारला की थांबते ती सायकल, पण लगामासारखी 'मर्दानी' मानावी अशी गोष्टच सायकलीत नाही. टोळीत होणाऱ्या बदलाचे तर संकेत नव्हते हे? दिलदार विद्यार्थी म्हणून तसा चांगला. मुख्य म्हणजे त्याच्या सगळ्या शिकण्याला एक उद्देश होता. एक प्रकारे जीवनोपयोगी शिक्षण होते ते! मास्तरांना तो भलेही ठाऊक नसेल. काही दिवसांतच दिलदार बाराखडी नि अक्षर ओळख शिकला. मग लिहिणे वाचणे.

एक दिवस तो मास्तरांना म्हणाला,"गुरूजी, पत्र कसं लिहितात ते शिकवा ना.."

"पत्र लिहिण्यात काय कठीण? आधी लिहायला शिक की मग पत्र लिहिता येईल आपोआप.. पण तुला रे पत्र कोणाला लिहायचेय? मी पाहिलंय.. या सगळ्या डाकूंमध्ये तू वेगळा आहेस. तू कधी यांच्यासारखा जात नाहीस दरोडे घालायला. ते लोक लिहायला नि वाचायला शिकलेत थोडेफार म्हणजे खंडणी नि धमक्यांच्या चिठ्ठ्या पाठवायला. बरे, तुला तर ते करायचे नाही .."

दिलदार लाजला. पण बोलला काही नाही.

"काही नाही गुरूजी. उगाच .."

"ठीक आहे. शिक. शिक्षणानेच पुढे जाशील तू."

दिलदारला ते मनोमन पटले. या 'शिक्षणा'नेच पुढे काही होईल. सायकलचा तोल सांभाळता सांभाळता आयुष्याचा तोलही सांभाळला जाईल. मास्तर मन लावून शिकवत होते. डाकूंच्या वस्तीत राहण्याचा अनुभव खास होताच. पण समशेर नि दिलदार दोघांनी त्यांना बाकी जणांपासून दूर ठेवलेले. आजवर मास्तरांना दिलदारची शिकण्याची इच्छा कळून तर चुकलेली. त्यामुळे तिकडून पळून जाण्याचा विचारही न करता ते शिकवत होते. कुठे का होईना शिकवायचेच तर आहे. आणि न जाणो यातून कोणी या डाकूच्या आयुष्यातून बाहेर पडला तर त्यांच्यासारख्या हाडाच्या शिक्षकाला बरेच वाटणार होते. दिलदारची दिवसागणिक प्रगती होत होती. आणि सायकलीवर आता दिलदार स्वार होऊ लागला होता. मास्तरही आता खुलले होते.. खरेतर दिलदार त्यांच्याशी दिलखुलास बोलू लागला होता. मास्तरांचा अंदाज खरा होता. एक दिवस दिलदार स्वतःच त्यांना सारे सांगणार होता..

दिलदार आता बऱ्यापैकी शिकून तयार झाला होता. मध्ये गावात सायकलवर जाऊन दुसरीची पुस्तके घेऊन आलेला. एका महिन्यात त्याची चांगलीच प्रगती झालेली.

"गुरुजी आता मी पत्र लिहू शकेन?"

"अर्थात. तुला आता लिहिता येईल. वाचता येईल. इतक्या वर्षात तुला अशी इच्छा व्हावी.. याचाच आनंद आहे मला."

"खरं सांगू गुरुजी, मला सारे तिच्यासाठी करायचे आहे?"

"ती? कोण?"

"आहे एक.."

"ती तुला काय म्हणाली, लिहा वाचायला शिक?"

"नाही गुरूजी. तिच्याशी तर मी एक शब्दही बोललो नाहीये. ती मला ओळखतही नाही."

"मग? तिला पत्र लिहायचे आहे?"

"हो गुरुजी .." दिलदार लाजत म्हणाला. "पण तेवढेच नाही गुरूजी.."

"म्हणजे?"

"तुम्हाला सगळेच सांगून टाकतो. म्हणजे तुम्हाला इकडे का आणावे लागले ते ही कळेल. आणि तुम्ही त्याबद्दल आम्हाला माफ कराल."

दिलदारने आपली दिलकी पुकार नि त्यासाठी चाललेला आटापिटा याचे वर्णन केले. मास्तर ऐकत होते. त्यांचा अंदाज बऱ्यापैकी खरा निघत होता.. काही ठिकाणी मात्र अजिबात चुकीचा होता तो.

"गुरुजी, आम्ही हे असे. दऱ्याखोऱ्यातील राहणे, न शिक्षण, न नोकरी न धंदा. सगळे काही दहशतीने आणि बंदुकीच्या जोरावर. आमच्याकडे आजूबाजूच्या गावातून कोणालाही उचलून नि पळवून आणतात. असली तर लग्नं होतात. मी आजवर एकाही दरोड्यात गेलो नाही. संतोकसिंगचा मुलगा म्हणून टोळीत टिकून आहे, नाहीतर कधीच खलास करून टाकला असता सगळ्यांनी. इथल्या सगळ्यांना याशिवाय दुसरे जीवन असू शकते हेच ठाऊक नाही. ते कसे असते मला ठाऊक नाही, पण असणार हे मात्र ठाऊक आहे.. मला कजरी आवडली. आवडते. पण तिला उचलून नाही आणणार मी. नाहीतर बाकीच्यात नि माझ्यात काय फरक उरणार?"

"म्हणजे आता तू तुझ्या कजरीला पत्रे लिहिणारेस?"

"हो गुरूजी .." बोलताना ही दिलदार लाजत होता.

"अरे पण लिहायला मी शिकवतो.. पण प्रेमपत्रे मात्र पहिली दुसरीच्या अभ्यासात नाही शिकवत.."

"काय गुरुजी. तुम्हीपण.."

"पण मला तुझं आश्चर्य वाटते.. तुझी भाषा इतकी चांगली कशी?"

"माझ्या आईकडून गुरुजी. ती एक शिक्षिका होती. बाबांची इच्छा झाली नि एका दरोड्यात तिला उचलून आणले गेले. माझ्या वयाच्या आठ दहा वर्षांपर्यंत ती होती. तिने बोलायला शिकवलं. खूप गोष्टी सांगायची. तिच्याकडून खूप काही शिकलो. माझ्यामुळे असेल पण ती या जंगलात शांतपणे राहिली. मग एकदा खूप ताप आला त्यात गेली ती. तिने कधी वचन मागितले नाही, पण ती अंथरूणात होती तेव्हा मनातल्या मनात वचन दिले मी, मी डाकू होणार नाही. संतोकसिंग टोळीत हे कोणाला ठाऊक नाही. पण समशेरला माहितीय, मी कुठल्याच डाक्यामध्ये जात नाही."

"म्हणून तुला हे सगळे शिकायचेय?"

"माहिती नाही गुरुजी. मलाच ठाऊक नाही. मी फक्त कजरीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय.."

"सायकलीवरून?"

"तुम्ही हसणार नसाल तर सांगतो .."

"बोल.."

"एकदा परत येताना मी एका पोस्टमनवर धडकलो. डाकिया म्हणे. त्याचे कपडे माझ्यासारखेच खाकी.. तो डाकिया.. मी डाकू.. म्हटले मी डाकू ऐवजी खोटा का होईना डाकिया होईन.. तो सायकलीवरून जातो तसा मी जाईन.. कजरीला पत्रे देऊन येईन.. नाहीतर मला कोण दारासमोर उभे करेल?"

"म्हणून हा खटाटोप?"

"डाकिया बनायला थोडं लिहा-वाचायला यायला पाहिजे ना. माझा आधी बेत तेवढाच होता. डाकिया बनून चकरा मारून ओळख काढायची. पण आता ठरले.. मीच तिला पत्र लिहिणार. ती डाकिया बनून देऊन येणार. पुढे काय होईल ते नाही माहिती. ती माझी होईल किंवा नाही .. पण तिला पळवून आणणार नाही."

दिलदार मास्तरांशी मनमोकळेपणाने बोलत होता. मास्तरही ऐकत होते. काहीच दिवसांत मास्तरांना परत पोहोचवण्याची वेळ आली.

"समशेर, गुरूजींना व्यवस्थित सोडून ये. गावात नीट. सायकल सकट.."

"सायकल? ती तुला दिली समज मी. एकदा तुझे ते काम झाले की आणून दे.. नाहीतर तुझे हे मित्र कोणा दुसऱ्याची पळवून आणतील.."

"गुरूजी.."

"आणि समशेर, डोळे बांधूनच सोड मला गावात. नाहीतर ते लोक चौकशा करतील. मग मला जेवढे माहिती ते सांगावे लागेल. पट्टी बांधली असली की सांगण्याची गरज नाही कुठून कुठे आलो त्याबद्दल. मला खोटं बोलणं जमणार नाही मला नि तुम्ही सारे पकडले जाल.. एकच करा जमलं तर, हे सारे सोडण्याचा प्रयत्न करा.. माणसासारखे जगा.."

मास्तरांना डोळे बांधून गावात सोडताना समशेर आणि दिलदार दोघांचे डोळे भरून आले.. एक दीड महिन्यात दिलदार अजून बदललेला नि समशेरही दरोडेखोरी सोडून जगात अजून काही आहे हे समजलेला..

 

मास्तर परतले. दिलदारचे पूर्वीचे दिवस परतले. फक्त आता कागदावर लिहिणे नि लिहिलेले वाचणे जमू लागलेले. आता डाकिया बनून पत्र देण्याची वेळ आलेली.. खरंतर त्या आधी पत्रलेखनाची.. ते किती कठीण आहे त्याची जाणीव त्याला कागद आणि पेन हाती घेतल्यानंतरच झाली. पण याचसाठी केला होता अट्टाहास .. पत्र तर लिहायला हवे.. गावात जाऊन कजरीच्या हाती द्यायला हवे. पत्र हाती देताना होईल ती पहिली भेट. पोस्टमन बनून पत्र देईन .. ती एकटी भेटेल ना त्यासाठी? आता खरी गोष्ट सुरू होणार. तरीही गुरूजींचे अपहरण आणि त्यांच्याकडून शिकून घेणे .. हे संकेत तरी त्याला चांगले वाटत होते. इतके जमले तर पत्र लेखन ही जमेलच .. नि त्यापुढे जाऊन कजरीशीही सूत जुळेलच..