३.
दिलाच्या हाकेला दिलदारचा 'ओ'
दिलाने दिलेल्या हाकेला 'ओ' देत दिलदारसिंगने पहिला निर्णय घेतला.. तो म्हणजे आधी गावच्या देवीचा आशीर्वाद घेणे.. मग गावोगावी फिरून कुठे 'कुछ कुछ होता है' का ते पाहणे. पोरं शाळा नि काॅलेजात जातात, तिथे या गोष्टींची 'सोय' आपोआप होते. पण दिलदार कधी शाळेचीही पायरी न चढलेला. त्यामुळे त्याला ही सोय नाही. त्याने कित्येक चित्रपटांतून हे ज्ञानाचे कण गोळा केलेले. शेजारील गावातल्या घंटाई देवीच्या पुढची घंटा त्याने वाजवली. डोळे मिटून हात जोडले.
समशेरसिंग बरोबर होताच..
"सरदार, तुम्ही आपला घोडा गावाबाहेर सोडून चालत आलात? हाती बंदूक ही नाही .."
"समशेर, अरे देवीच्या दर्शनास घोडा आणि बंदूक कशाला?"
दिलदार अगदी दिलदारपणे म्हणाला असेल, पण खरे कारण त्याला ठाऊक होतेच. हातातली बंदूक पाहून कुणी जवळ येऊ पाहणारी त्याला हवी असलेली देवी.. म्हणजे एखादी कन्यका घाबरून दूर पळायची. आणि घोड्यावरून कुणाला घेऊन जायचे.. वरातीतून.. तर त्या गोष्टीला वेळ आहे अजून. नवरीचाच नाही पत्ता तिथे कोणाला घोड्यावर बसवणार? वरातीआधीच घोड्यावर मिरवावे? यातले तो समशेरला काही बोलला नाही. बाकी घंटाई देवीच्या दर्शनाने काही होवो न होवो, पण मनोमन दिलदार आपल्या डाकूगिरीचा त्याग करून बसला. ती लुटालूट, धाकदपटशा नि पैशांसाठी हाणामारी.. हे सारे कशाला? त्यापेक्षा काव्यशास्त्रविनोदात रमावे नि त्या जोरावर कुणी एखादी आपल्यावर जीव ओवाळून टाकेल.. एखाद्या चित्रपटात पहावी तशी प्रेमकथा घडून येईल. मनोमन डाकूगिरी सोडली त्याने, अर्थात मनोमन म्हणजे मनातल्या मनात! कारण ते सांगायची हिंमत त्याला होणार नाही. बापाची प्रतिक्रिया काय होईल कोणास ठाऊक. तिरीमिरीत त्याने बंदूकच उचलली तर? त्यापेक्षा थोडा धीर धरावा.. आणि आपल्या प्रेमकथेच्या जडण घडणीकडे लक्ष पुरवावे.
गद्धेपंचविशीचे वयच तसे असते.
गद्धेपणा करण्याच्या त्या दिवसांत काय करायचे नाही ते तर ठरवले, पण प्रेमकहाणी घडून येण्यासाठी काय करायचे ते ठरवावे लागेल याचा विचारही त्याच्या मनात नाही .. अशात गाणी ऐकणे नि गुणगुणत बसणे हा एक चाळाच दिलदारला लागला. दरोडेखोर, ते अस्सल. म्हणजे चंबळच्या खोऱ्यातले.. त्यांनी कसे तडकफडक संगीत ऐकावे.. कव्वाली नाहीतर तत्सम काही. तर हा गझल नि हळुवार गाणी ऐकत बसतोय.. शेरवानी घालून 'मेहबूबा मेहबूबा' गाणाऱ्या डाकूंच्या कळपात दिलदार झब्बा पायजमा घालून एखाद्या तंबोरा घेऊन बसलेल्या शास्त्रीय गायकासारखा.. हे कमी म्हणून की काय, अगदी जमेल तसे स्वतःचे शब्द शब्द जोडून कविताही करतोय.. दरोडेखोरांच्या घराण्यास न शोभेल असे सारे .. हम में है क्या कि हमें कोई हसीना चाहे.. ही संगीतमय तक्रार दिलदारच्या मनात चाललेली. संतोकसिंगच्या नजरेतून त्याचे हे बदललेले वागणे सुटले तर नव्हते, पण त्याबद्दल करावे काय हे त्यास समजत नव्हते.
जे घडावेसे वाटते त्या बद्दल अष्टोप्रहर विचार केला की ती गोष्ट घडून आल्यावाचून राहात नसावी. म्हणजे झाले असे, त्या दिवशी जवळच्या एका गावातील एका गावदेवीच्या देवळातील घंटा दिलदारने वाजवली नि देवीस आपण आल्याची वर्दी त्याने दिली. दोन्ही हात जोडून तो गाभाऱ्यात उभा राहिलेला. समशेर बाहेरच उभा होता. आणि आतून 'ती' बाहेर पडली. ती .. तिच्याकडे पाहून दिलदारच्या दिलाचे पाणी पाणी झाले. ती बाहेर आली नि तशीच काही क्षणात नाहिशी झाली. क्षणात नाहीसे होणारे दिव्य भास जणू. देवळाबाहेरच्या मातीच्या रस्त्यावरून ती जात होती. दिलदार तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात होता. आज प्रथमच देवी पावली असे वाटत होते त्याला. संमोहित झाल्यासारखा तो एकाएकी देवळातून बाहेर पडला. रस्त्यावर येता येता दोघा तिघांना त्याचा धक्का लागला .. एका मावशीच्या हातची पूजेची थाळी उधळली गेली.. एका म्हाताऱ्याची काठी त्याचा पाय अडकून हातातून सटकली. पण दिलदारसिंग सगळ्याची तमा न बाळगता पुढे निघाला .. प्यार यह सब दुनियाकी चीजें नहीं जानता म्हणत. अर्थात तोवर ती निघून नाहीशी झालेली.. पाठोपाठ समशेर दिलदारच्या मागे येत होता. आणि दिलदारला त्याची खबरबातही नव्हती. ती पूर्णपणे दिसेनाशी झाली..
"सरदार .. काय खबरबात?"
"खबर आणि बात? ती.. ती कोण होती?"
"ती? तुम्हाला काय तिचे?"
"मला काय? जवानीच्या जोशात निघालेल्या मला विचारतोस?"
"जवानी? जवानी दिवानी असेल पण ती भवानी कोण ते ठाऊक करून घ्यायचेय?"
"समशेर, मला आवडली ती.."
"छान. शेवटी हीच एक सापडली तुम्हाला?"
"का? माझ्यासारख्या तरण्याबांड जवानास ती सापडली नि आवडली.."
"सरदार, तरणाबांड वगैरे ठीक आहे, पण हे होण्यातले नाही. तुमच्याने तर नाहीच नाही .."
"का? आमच्याने का होणार नाही? आम्ही कित्येक चित्रपटांची पारायणे केलीत. आता आम्हाला काय नि कसे करावे ह्या बद्दल अंदाज आहे .."
"सरदार, तोच तर प्रश्न आहे. अंदाज आहे पण चित्रपटात जे दाखवतात ते सत्य असेल तरच .. पण ते तसे नसते. तसे नसतेच. तुम्ही हिला पाहिलेत. काही क्षणांसाठी. आता विसरून जावे."
"म्हणजे? समशेर तू ओळखतोस हिला?'
"सरदार, ही ह्या देवळाच्या पुजाऱ्याची मुलगी. कजरी. देवळातील पुजारी एका डाकूच्या टोळीत आपली मुलगी धाडेल.. तुम्हाला वाटते नि पटते ते?"
"पटते असे नाही. वाटते मात्र खरे.."
"पण तसा एक मार्ग आहे.."
"सांग. कजरी.. तिच्याइतकेच छान नाव आहे. कजरी.."
"ऐका सरदार, मार्ग एकच.. घोड्यावरून या. आजूबाजूस लूटालूट करा.. गोंधळ होईलच. त्यात वाड्यावरून उचलून कजरीभाभीला घेऊन पळून जा."
"समशेर.. तुला माहितीय असले काही मी करणार नाही."
"अर्थात सरदार, पण मार्ग एकच आहे हा. म्हणूनच म्हटले, विसरून जा. कजरीचे पिताजी मोठे भटजी आहेत. गावात मान आहे. अगदी गेलातच तुम्ही त्यांच्या घरी तर सांगणार काय? भटजीबुवा, तुमच्या गोठ्यातील गाय या घोड्याच्या तबेल्यात बांधा म्हणून?"
"ते मला ठाऊक नाही समशेर, या दिलदाराचे दिल चोरून गेली.. हे चुकीचे आहे समशेर! डाका उसने डाला. आणि डाकू म्हणून नाव आमचे. कजरी.. काहीतरी मार्ग काढ समशेर."
"सरदार, मी? मार्ग काढू? असे म्हणता जसे मी तुमच्या भाभीला घरी आणून ठेवलीय. मला माहिती असते तर.."
"तर? सांग.. कळू देत तुझी प्रेमकथा.."
"सरदार, ते जाऊ द्यात. आपल्यासारख्या डाकूंच्या आयुष्यात असले काही होत नाही. होणार नाही. उगाच नसता विचार कशाला?"
"समशेर, तूच खरा शेर. पण तूच तुझी समशेर म्यान केलीस तर नाही खैर. आता पुढे कसे होणार?"
दोन मिनिटापूर्वी दोन सेकंदासाठी दिसलेल्या पुजारी कन्यकेने, कजरीने दिलदारसिंगची दुनिया बदलवून टाकली. कजरीच्या दर्शनाने घायाळ होऊन तो परतला. नजरोंके तीर चलाए म्हणायला तिने तर त्याच्याकडे पाहिलेही नव्हते. पण काही क्षणात असे ह्रदय चोरून जावे तिने. आता पुढे काय? या प्रश्नाचे उत्तर सापडणे अशक्य. की समशेर म्हणतो तेच खरे? तिला विसरून जावे? एका पुजारी कन्येची जोडी एका डाकूपुत्राबरोबर जमेल? राजपुत्रासारखा डाकूपुत्र शब्द दिलदारला सुचला नि ह्या गोष्टीची अशक्यता जाणवून तो अधिकच अस्वस्थ झाला. दिलदारचे वागणे बोलणे बदलले. कजरीच्या विचारात तो रंगला.. दंगला. संतोकसिंगचे बारकाईने लक्ष होतेच. पण दिलदारचे कशातच ध्यान नाही .. आणि समोर होते ते स्वत:स हरवून बसलेल्या दिलदारचे ध्यान .. संतोकसिंग वैतागला. पण काय करावे कळेना. त्याच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात करावी म्हणून आटापिटा करता करता हे नवीन त्रांगडं.. अर्थात दिलदारच्या दिलाची अवस्था ह्यास कारणीभूत आहे हे त्या संतोकसिंगच्या रांगड्या मनास कळणे अशक्यच होते, पण अशा हातातोंडाशी आलेल्या जवान मुलाने असे डाकूगिरीस न शोभल असे खाली मान घालून दिवसेंदिवस बसून रहावे? आपल्या कष्टाने उभारलेल्या साम्राज्याची अशाने वाताहात होईल. आणि दिलदार असाच हातावर हात धरून बसून राहिला तर स्वकष्टाने मिळवलेली टोळीची पत निघून जाईल..